Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पार्टाकस on Sun, 08/10/2014 - 21:36
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा! खात्री असणार्‍यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते. प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून आणि शास्त्रीय पुराव्यानिशी सिध्द करुन घेण्यावर त्यांचा भर असतो. परंतु अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून कोणी चक्कं भुतांचा फोटो काढला तर?? १९२४ सालच्या डिसेंबर महिन्यात वॉटरटाऊन या जहाजाने न्यूयॉर्क बंदरातून कॅलिफोर्नियाची वाट धरली होती. वॉटरटाऊन हे तेलाची वाहतूक करणारं - ऑईल टॅंकर - जहाज होतं. न्यूयॉर्कमधून अटलांटीक महासागरातून पनाम कालवा ओलांडून पॅसिफीक मध्ये प्रवेश करणं आणि कॅलिफोर्नियाचा पश्चिम किनारा गाठणं असा जहाजाचा नियोजीत प्रवासमार्ग होता. एस्. एस्. वॉटरटाऊन ४ डिसेंबर रोजी एका साठवण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी जेम्स कर्टनी आणि मायकेल मिहान हे खलाशी टाक्यात उतरले होते. त्यांच्या दुर्दैवाने टाक्यातून अनपेक्षीतपणे झालेल्या वायुच्या गळतीमुळे टाक्यातील तेलाने पेट घेतला. कर्टनी आणि मिहान यांना टाक्यातून बाहेर पडण्याचा बराच प्रत्यत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही. टाक्यातच होरपळून दोघांचाही मृत्यू झाला. तत्कालीन प्रथेप्रमाणे दोघांनाही समुद्रात जलसमाधी देण्यात आली आणि जहाज पुढे निघालं. सर्व जहाजावर कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूमुळे दु:खाची छाया पसरलेली होती. लवकरच या छायेचं भीतीमध्ये रुपांतर झालं. दुसर्‍या दिवशी जहाजावरील टेहळ्याला समुद्रात दूरवर काही अंतरावर पोहत असणारी दोन माणसं दिसली. त्याने ताबडतोब कॅप्टन कीथ ट्रेसी याचं तिकडे लक्षं वेधलं. भर समुद्रात पोहत असलेल्या या दोघांना पाहून कॅप्टन ट्रेसी बुचकळ्यात पडला. त्यांना काही मदत हवी आहे का हे पहावं या हेतूने त्याने आपलं जहाज त्यांच्या दिशेला वळवलं. काही अंतर त्या दोघांजवळ जाताच जहाजावरील सर्वांना जबरदस्तं धक्का बसला! "माय गॉड! हे तर कर्टनी आणि मिहान आहेत!" कॅप्टन ट्रेसी न राहवून ओरडला. काही काळ एका लयबध्द गतीने जहाजाला समांतर पोहत राहील्यावर कर्टनी आणि मिहान अचानकपणे दिसेनासे झाले! जहाजावरील कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण जे पाहीलं ते सत्यं की स्वप्नं असा कॅप्टन ट्रेसीसह सर्वांना प्रश्न पडला होता. सुरवातीच्या धक्क्यातून सावरल्यावर कॅप्टन ट्रेसीने या घटनेची जहाजाच्या लॉगबुकमध्ये सविस्तर नोंद केली. कॅप्टनच्या हकीकतीवर साक्षीदार म्हणून जहाजावरील सर्वांनी सह्या केल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तासाभराने कर्टनी आणि मिहान पुन्हा जहाजाच्या बाजूला प्रगटले! टेहळ्याने कॅप्टनच्या कानावर ही गोष्टं घातल्यावर सर्वजण पुन्हा डेकवर जमा झाले. यावेळीही आदल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. काही काळ जहाजाला समांतर पोहून झाल्यावर दोघंही अदृष्यं झाले! "दिवसाच्या कोणत्याही वेळेला ते जहाजाच्या बाजूने पोहताना दिसत असंत!" कॅप्टन ट्रेसीने लॉगबुकात नोंद केली, "जहाजाचा वेग कितीही कमी-जास्तं झाला तरी ते त्या वेगाने जहाजाला समांतर पोहत असत! मात्रं जहाजापासून एका ठराविक अंतरावरुन त्यांचा हा पोहण्याचा कार्यक्रम चालत असे. जहाजाच्या जवळ येण्याचा त्यांनी प्रयत्नं केला नाही. समुद्रात उतरुन त्यांच्या जवळ जाऊन तपास करण्याची आमच्यापैकी कोणापाशीही हिंमत नव्हती!" कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या प्रगट होण्याच्या आणि अदृष्य होण्याच्या प्रत्येक वेळेची काळजीपूर्वक नोंद लॉगबुकमध्ये करुन ठेवली होती. आपल्या सर्व सहकार्‍यांच्या त्यावर सह्या घेण्यास तो विसरला नाही. अटलांटीक महासागरातून जहाजाने पनामा कालव्यात प्रवेश केला आणि कर्टनी आणि मिहान एकदम गायब झाले! पनामा कालव्यातून बाहेर पडून जहाज कॅलिफोर्नियाला पोहोचलं. कॅप्टन ट्रेसीने कर्टनी आणि मिहान यांच्या मृत्यूचा आणि 'पुनरागमना'चा तपशीलवार रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना केला. सुरवातीला कंपनीच्या अधिकार्‍यांचा यावर अजिबात विश्वास बसला नाही. अत्यंत संशयाने ते या सर्व प्रकाराकडे पाहत होते. परंतु जहाजाच्या लॉगबुकमधील नोंदी पाहिल्यावर आणि इतर खलाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी परतीच्या वाटेवर कर्टनी आणि मिहान पुन्हा दिसून आल्यास कॅप्टन ट्रेसीने त्यांचा फोटो काढावा अशी सूचना केली! त्यासाठी ट्रेसीला एक कॅमेरा आणि फिल्मही देण्यात आली. वॉटरटाऊन जहाजाने कॅलिफोर्निया सोडलं आणि न्यूयॉर्कच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याने दक्षिणेला येत त्यांनी पनामा कालवा गाठला आणि अटलांटीकमध्ये प्रवेश केला. अटलांटीक महासागरात जहाज शिरताच दुसर्‍याच दिवशी कर्टनी-मिहान जहाजाशेजारी हजर झाले! जहाजाला समांतर पोहत राहण्याचा त्यांचा शिरस्ता पुन्हा सुरु झाला! एक दिवस फोटो घेण्याइतका स्वच्छ सूर्यप्रकाश दिसू लागताच कॅप्टन ट्रेसीने जहाजाच्या तिजोरीत ठेवलेला आपला कॅमेरा बाहेर काढला. तो एक साधा बॉक्स कॅमेरा होता. जहाजाला समांतर पोहणार्‍या कर्टनी आणि मिहान यांच्यावर कॅमेरा रोखून कॅप्टन ट्रेसीने एकापाठोपाठ एक सहा फोटो काढले. फिल्म संपताच कॅमेरा पुन्हा जहाजाच्या तिजोरीत ठेवून त्यावर सील करण्यात आलं. कॅप्टन ट्रेसीने आपल्या लॉगबुकात तशी नोंद करुन ठेवली. कॅप्टन ट्रेसीने फोटो काढल्यानंतरही काही दिवस कर्टनी आणि मिहान यांचं जहाजाच्या बाजूने पोहण्याचं सत्रं सुरूच राहीलं. समुद्राच्या ज्या भागात त्यांचा मृत्यू झाला होता, तो भाग ओलांडून जहाज उत्तरेला निघाल्यावर मात्रं ते दोघं पुन्हा कोणाच्याही नजरेस पडले नाहीत! यशावकाश जहाजाने न्यूयॉर्क गाठलं. बंदरात पोहोचताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीसांच्या साक्षीने जहाजाच्या तिजोरीचं सील उघडण्यात आलं आणि आतला कॅमेरा आणि फिल्म प्रोसेस करण्यासाठी एका स्टुडीओत नेण्यात आली! स्टुडीओत कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि कॅप्टन ट्रेसी अस्वस्थंपणे वाट पाहत बसले होते. एकेक फोटो धुवून झाला की तत्काळ पाहीला जात होता. पहिले दोन फोटो हलले होते. त्यात काहीच दिसत नव्हतं! तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या फोटोत समुद्राच्या लाटाच दिसत होत्या! सहावा फोटो धुतला गेला! तो पाहिल्यावर मात्रं कॅप्टन ट्रेसीने सुटकेचा नि:श्वास टाकला. तर कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आश्चर्याने थक्कं झाले होते. सहाव्या फोटोत जहाजाजवळ पोहोणार्‍या दोघांची डोकी स्पष्टं दिसत होती! हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच प्रचंड खळबळ उडाली. कर्टनी आणि मिहान यांच्या नातेवाईकांनी, मित्र-मंडळींनी आणि त्यांच्या अनेक जुन्या सहकार्‍यांनी फोटोवरुन दोघांना ओळखलं! स्टुडीओमध्ये आणि एका शास्त्रीय प्रयोगशाळेत कॅमेरा आणि फोटोंच्या निगेटीव्हची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. सर्व तपासणी आणि विविध चाचण्यांनंतर फोटोच्या अस्सलपणाची सर्वांची खात्री पटली. सागरावरील या अभूतपूर्व घटनेचं कोणतंही शास्त्रीय स्पष्टीकरण देणं कोणालाही शक्यं झालं नाही! कर्टनी आणि मिहान ( टीप : वॉटरटाऊन जहाजावरील या घटनेबद्दल पुढे अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या. हा फोटो खोटा असल्याचे अनेकांनी दावे केले. परंतु तसा निर्णायक पुरावा कोणालाच देता आला नाही. ही जुनी निगेटीव्ह आता नष्टं झाल्याने त्यावर नव्याने शास्त्रीय संशोधन होणं आता अशक्यं आहे. ) ***************************************************************************************************** संदर्भ :- The Ghost Tale - डग्लस मॅफर्ड Ghost Ships - टी. ड्युप्लेन Ocean Triangle - चार्ल्स बार्लीत्झ
  • Log in or register to post comments
  • 8223 views

Book traversal links for भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन

  • ‹ भुताळी जहाज - २ - यूबी - ६५
  • Up
  • भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी ›

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Sun, 08/10/2014 - 21:49

Permalink

हा पण भाग मस्त...

जबरा...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 08/10/2014 - 22:18

Permalink

मस्त !!! अजुन येवुद्या !!!

मस्त !!! अजुन येवुद्या !!!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 08/10/2014 - 22:47

Permalink

अजून टाका हो स्पार्टाकस काका हे भाग

बाब्बौ!! आता नाईट शिफ्ट्ला ऑफिसात आलोय नि लागोपाठ हे तिनही भाग वाचून काढले. लय भ्या वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 08/11/2014 - 07:34

Permalink

मस्त रे,अजून येउ दे लवकर लवकर!

मला बी भ्या वाटतंय .....
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Mon, 08/11/2014 - 10:22

Permalink

अनुभव

भारतीय कप्तानांना असा अनुभव आला असेल का? त्यांचे काही अनुभव असतील तर तेही येवु द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 08/11/2014 - 11:15

Permalink

बरं झालं काल रात्री हे काही

बरं झालं काल रात्री हे काही वाचलं नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 08/11/2014 - 11:41

Permalink

जबरा

जबरा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 08/11/2014 - 12:01

Permalink

हम्मम्

विजय देवधर यांनी Ocean Triangle या पुस्तकाचे अनूवादन केले आहे तेव्हा त्यांचे नाव सुद्धा संदर्भात यावे. बाकी डाव्या बाजूचे भूत थोडेफार चार्ली चॅपलीन (आणि हिटलर ) यांच्या सारखे दिसते...!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पार्टाकस on Mon, 08/11/2014 - 12:06

In reply to हम्मम् by योगी९००

Permalink

बाळ भागवत

ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे देवधरांचे नाही. हे पुस्तक रिचर्ड वायनरचे डेव्हील्स ट्रँगल आणि चार्ल्स बार्लीत्झच्या ओशन ट्रँगल पुस्तकाचे एकत्र भाषांतर / संपादन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Mon, 08/11/2014 - 12:20

In reply to बाळ भागवत by स्पार्टाकस

Permalink

हम्मम्

थोडा घोळ झाला... ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे. विजय देवधरांचे "बर्मुडा ट्रॅंगल" आहे...त्यात हा किस्सा (फोटोसकट) वाचला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 08/11/2014 - 12:13

Permalink

मस्त.

वाचतोय. बाकी ही भूतछायाचित्रणकला म्हणजे शुद्ध फेकूपणा असतो हो! ;-) जाऊ द्या! पुढचा भाग आने दो!
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Mon, 08/11/2014 - 12:52

Permalink

थरारक !

थरारक ! चौथ्या भागाच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Mon, 08/11/2014 - 15:16

Permalink

मस्त

पण भीती वाटते वचून झाल्यावर. वाचताना मस्त वाटतं!
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Mon, 08/11/2014 - 17:35

Permalink

रोचक कथामाला

पु. भा. ल. टा.
  • Log in or register to post comments

Submitted by रघुपती.राज on Mon, 08/11/2014 - 17:41

Permalink

वाचतोय

पुढचा भाग आने दो
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Tue, 08/12/2014 - 09:21

Permalink

आधिचेहि भाग वाचले...मी एकूणच

आधिचेहि भाग वाचले...मी एकूणच भुत कथांना घाबरते..पण सविताने लिहिलय तसच ..वाचताना मजा येतिये.. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/15/2014 - 10:39

Permalink

अजुन एक भाग वाचायचा आहे.

अजुन एक भाग वाचायचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/15/2014 - 14:19

Permalink

मस्त कथा!

जाम मजा येतेय वाचायला!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com