Skip to main content

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 25/07/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?

वाचने 97588
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

व्हरांडा हा शब्द मराठी कि इंग्रजी ? बाकी लक्ष्मी वरून लैक्मे झालेलं ऐकलं कुठंतरी मदर फादर सुद्धा मातृ पितृ वरून घेतलंय हे खरं का ? आम्ही पण क्रमश:

मुंबईत लाखाला पेटी बोलतात आणि कोटीला खोका शंभरच्या नोटेला कान बोलतात आणि पाचशेच्या नोटेला बापू.. डान्सबार या ईंग्रजी शब्दाला काय म्हणे तर छमछम .. खंबा कशाला बोलतात हे जाणकारांना सांगायला नकोच, आणि अश्यांना मग चपटी कशाला म्हणतात ते ही माहीत असेल.. सुपारी, कबूतर, घोडा, घंटा ... वाट लावली या अंडरवर्ल्डने मराठी आणि ईंग्लिश दोन्ही भाषांची :(

एकदा आमचे इकोनोमिक्स चे मास्तर (मातृभाषा - अर्थातच हिंदी) म्हणाले मराठी फारच गमतीदार आहे. काहीही बोलतात. " आनंद मेला … पाहायला चला." मी आणि मित्र मागच्या बाकावरून उभे राहिलो आणि म्हणालो …" गुर्जी !!!! ते मेला नाही …मेळा आहे…म्हणून दाखवा जरा आम्हाला जरा ' ळ ' !!!" जीभ वळत नाही म्हणून मराठी गमतीदार काय ? त्यानंतर नेहमीच आमच्यावर खार खाउन असायचे. लोकमान्य टिळकांचे नावच बदलून टाकणारे हे लोक ( सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण नाही ). यांना काय कपाळ मराठी कळणार.

In reply to by सरनौबत

सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण काही नाही बोलत.....असे म्ह्णायचे होते

In reply to by सरनौबत

उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही ! यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्‍या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"ळ" संस्कृतमध्येही नाही !
आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति आणखी काही उदाहरणे असू शकतील!

In reply to by सुनील

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम् || -ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा. बाकी हे ळ वैदिक संस्कृतमध्ये होते. पाणिनीय संस्कृतमधून गायब झाले.

In reply to by बॅटमॅन

ही ही ही... आमचा संस्कृतचा इतका गाढा अभ्यास नाही (अभ्यास नाही असे म्हटले तरी चालेल... अकरावी नंतर संस्कृतचा सहवास संपला :) ). पण आमचा तो युक्तीवाद ऐकून स्वतःला संस्कृतचे पंडित समजणारे गार पडत असत हे मात्र खरे. (उगा शेखी मिरवणार्‍यांना गारद करण्यात मजा वाटणारा) ईए

In reply to by बॅटमॅन

-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा.
बाकी तुमची ही लगोलग संदर्भसहित उदाहरणे, श्लोक, ऋचा इत्यादि देण्याची पद्धत पाहून आम्ही लई जळतो बॅटमॅनराव.. (हो हो जळतो.!)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"ळ" संस्कृतमध्येही नाही !
वेदांमधील 'ळ' चे मूळ हा दीड शतक चाललेला वाद आहे. अजून संपला नाही आणि कधी संपणंही कठीण दिसतंय... :)

In reply to by सरनौबत

उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही ! यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्‍या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)

माझा एक मित्र बनियनला 'बनेन' आणी अंडरवेअरला 'अंडरवेल' म्हणायचा. :D आम्ही 'ईश्टील' किंवा 'प्याश्टीक'च्या पेल्याला 'गिलास' म्हणतो. सायकलला शायकल आणी क्रोसीनला क्रोशीन म्हणतो. टाईल्सला ष्टाईलच्या फरश्या म्हणतो. काम्पुटर, किरकेट, ष्टंपा, बॅटा, बेल्सा, यष्टी, लज्गरी बस, वगैरे शब्द मराठीच आहेत.

In reply to by यसवायजी

बनियानला अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी असे दोन समर्पक शब्द आहेत! वापरा आणि खात्री करा!

In reply to by मराठे

@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif अहो.. सरळ अंतर्वस्त्र म्हणा ना राव! काय ते भयंकर शब्दां-तरण! या वरून मि.पा.वर (आंम्ही-आणलेल्या.. http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif ) एका शब्दभुभू'ची आठवण झाली.ते महाराज असल्या संस्कृतचं तूप सोडलेल्या मराठी शब्दांना - काढण्यात माहिर आहेत!

फक्त दुधापासून बनवलेला चहा म्हणजे "पिव्वर" चहा, म्हणजे इंग्रजीतला "प्युअर" चहा :) पारनेर आणि नगरला हा शब्द बर्यापैकी वापरात आहे. माहित नाही बाकीच्या लोकांनी आइकलाय कि नाही.

बरेचदा पेशंट लोक खुप ब्लडींग (blooding) होत आहे,असे म्हणतात ,त्याची आठवण झाली

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

आमच्या कामवाल्या बाई कपडे धुताना आईला "बै, सगळ्यांच्या बनेलांना नीळ घालयची का?" असे विचारीत. त्या बनियनला बनेल म्हणत. आम्ही मुले त्या तसे म्हणायची वाट बघत असू, नंतर घोड्यासारखे खिंकाळून हसत असू. आता यात हसण्यासारखे काय? अशा चेहर्‍याने त्या आमच्याकडे बघत असत.

In reply to by रेवती

कदाचित त्या बाई हुशार असाव्यात आणि त्यांना त्या वाक्याआडून "सगळ्या बनेल पोरांच्या कपड्यांना नीळ घालायची का?" असे म्हणायचे असेल ;)

दोन्ही शब्द हे अमेरिकेत पूर्णपणे अगम्य आहेत. हे कुठून आले ते कुणी जाणकारच सांगू शकतील. पण ह्यातला कुठलातरी एक शब्द जास्त उच्चभ्रू इंग्रजी आहे असे मला वाटत नाही.

(शब्दकोशात एंट्री करण्याच्यादृष्टीने) एखादा (नवा अथवा इतरभाषी) शब्द भाषेने स्विकारला आहे हे केव्हा समजावे ?

In reply to by माहितगार

एखाद्या सार्वजनीक पत्रकात अथवा किमान तिन चार वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमात वापरला जातो. उदा. गेलाबाजार हा शब्द मि गावात ऐकलाय तसेच मराठी वृत्तपत्रात तसेच अंतरजालावरही बघितलाय. माझ्यामते हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे.

In reply to by मराठी कथालेखक

नापास हा शब्द जबर्‍या आहे. जसे पोष्टपोन वरून भारतीयांनी प्रीपोन हा नवा शब्द काढला तसाच पास वरून नापास काढला. लय आवडतो मला. अनुत्तीर्ण इ.इ. पाहिले की जीर्ण ठिगळांची आठवण येते.

In reply to by बॅटमॅन

मी अनेक वेळा लोकांना दुरुस्ती सांगत असतो की prepone असा शब्द नाहीये. reschedule earlier म्हणा. ८०% वेळा लोक आपल्यालाच हसतात.

In reply to by मैत्र

हे पहा.. http://www.oxforddictionaries.com/definition/english/prepone जरी उगम भारतीय इंग्लिश मधून असला तरी आता प्रमाणित इंग्लिश भाषेने हा शब्द स्वीकारला आहे, तेव्हा लोकांना दुरुस्ती सांगणे थांबवलेत तरी चालेल.

In reply to by मराठी कथालेखक

बेलाशक हा शब्द बघा. बे हा फारसी उपसर्ग विना ह्या अर्थी वापरला जातो. उदा. बेइज्जत, बेमुर्वत, बेईमान वगैरे. पण ला हा अरबी उपसर्ग त्याच अर्थाचा आहे. उदा. लावारिस. आता हे दोन उपसर्ग शक ह्या शब्दाला लावून एक धेडगुजरी शब्द बनवला आहे. तीच गोष्ट बेमालूमची. बे हा फारसी. मालूम हा अरबी इल्म वरून आलेला शब्द. तोही धेडगुजरीच. ताकदवान ह्यात ताकद हा बहुधा फारसी. पण वान हा धनवान, शक्तीवान अशापैकी संस्कृतजन्य. नापास शब्द खुपण्याचे कारण काय? पास हा शब्द इंग्रजी आहे आणि तो सोवळा असावा अशी तीव्र इच्छा की अजून काही?

१. आमच्या कडे वीज गेली हे मराठीत / हिंदी मध्ये -- करंट नाहीये.. करंट आया क्या? असं म्हटलं जाते. ते जास्त सयुक्तिक वाटतं २. आजही ओळख करून देताना उलट सांगायची वेळ आली -- "मी हिचा नवरा" तर काहीतरी भाषिक चूक वाटते. मग इंग्रजीच्या आधाराने I am her husband किंवा she is my wife हे सोपं पडतं ३. ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक शब्द आपल्या वापराशी साधर्म्य असलेले सापडले. तेव्हा लिहून ठेवलं नाही म्हणून लक्षात नाही. पण आश्चर्यकारक साम्य आहे. ४. सावरकरांचे मुद्दे बाजूला ठेवले तर आज सर्वमान्य झालेले महापौर संपादक वगैरे शब्द आता योग्य वाटतात जे प्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी पर्याय आहेत. तहसीलदार हा शब्द वापरात असताना प्रांताधिकारी त्यांनी आणला वगैरे थोडा ओढून ताणून केलेला मुद्दा वाटतो (आळशांच्या राजांना विचारायला हवं की उत्तर भारतात प्रांत शब्द आहे का आणि तिथेही तो सावरकरांनी नेला का?) पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला -- मग काय अखंड उत्तर भारतीयांनी तो सावरकरांपासून प्रेरणा घेऊन गावागावात नेला का? (आठवा डाकिया डाक लाया).. असो.. ५. bicycle ला सायकल. प्रत्येक ठिकाणी सवयीने शब्द वापरला जातो. युरोपात सायकलला बाईक आणि आपण ज्याला बाईक म्हणतो त्याला मोटरबाईक किंवा इतर शब्द वापरतात. बाईक ही बहुधा सायकलच असते - विशेषतः सायकलचा देश हॉलंड मध्ये. त्यामुळे त्या स्थानिक सोयीस्कर वापरात फार काही गैर आहे असं नाही.

In reply to by मैत्र

ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक शब्द आपल्या वापराशी साधर्म्य असलेले सापडले. तेव्हा लिहून ठेवलं नाही म्हणून लक्षात नाही. पण आश्चर्यकारक साम्य आहे.
एकच लँग्वेज फ्यामिली असल्याने साम्य अपेक्षितच आहे. पण ग्रीक अन संस्कृतमध्ये जरा जास्तीच सिमिल्यारिटी आहे खरी. ते मदर-मितेरा, फादर-पातेरास, इ. सोडलं तरी संस्कृत छाप वाटणारे कैक शब्द आहेत. अन जितक्या जुन्या ग्रीकमध्ये डोकावाल तितकं हे साम्य अधिक गहिरं होत जातं, उदा. केंद्र-केंद्रो. पात्रम्-पोतिरी. पदम्- पॉदि. पुरम्-पोलिस. (हे तर कॉग्नेटच आहेत.) पत्नी-पोत्निया. (अर्थात हे प्राचीन ग्रीकमध्ये, अर्वाचीन नाही). क्रीणाति-किरिआजो(बहुधा, लिनिअर बी लिपीत असा काहीसा फॉर्म आहे.) अर्थ आहे विकत घेणे. ऋतम्- आरेते. कीर्ती आणि क्लिऑस हेही कॉग्नेट आहेत. मतलब तोच- ऋलृयो: सावर्ण्यं या न्यायाने र-ल दोन्ही एकच धरल्या जातात. असे कितीतरी शब्द तर सांगता येतीलच, पण ग्रीक व्याकरणाची रचनाही संस्कृतप्रमाणेच आहे. क्रियापदांचे ४ गण (संस्कृतात १०) आणि मॉडर्न ग्रीकमध्ये ३ विभक्त्या (प्राचीन ग्रीकमध्ये ८ विभक्त्या, अगदी संस्कृतप्रमाणेच. भरीस भर म्हणून द्विवचनही होते.) शिवाय मॉडर्न ग्रीकमध्ये स्ट्रेस अ‍ॅक्सेंट आहे तो प्राचीन ग्रीकमध्ये वैदिक संस्कृतसारखा टोन/पिज अ‍ॅक्सेंट होता. उगीच नाही त्या विल्यम जोन्सनं इंडोयुरोपियन भाषाकुळाची कल्पना मांडली! जितके पहाल तितकी साम्येच साम्ये आहेत. अन शब्द सोडून व्याक्रणातही आहेत हे लैच विशेष.

In reply to by बॅटमॅन

द्विवचन असलेली संस्कृत ही एकमेव भाषा आहे असं आमच्या एका संस्कृत शिक्षकांनी सांगितल्याचं स्मरतं. हे साम्य खूपच रोचक आहे.

In reply to by अनुप ढेरे

हे साम्य फक्त ग्रीकपुरतं मर्यादित नाही. इंडोयुरोपीय भाषाकुळातील कैक भाषांत ते आढळतं, उदा. लॅटिन आणि अवेस्ता ग्रंथातील 'अवेस्तन' या नावाने ओळखली जाणारी भाषा. http://en.wikipedia.org/wiki/Dual_%28grammatical_number%29#Languages_wi… वरील दुव्यात द्विवचन असलेल्या भाषांची लिष्ट मिळेल. जगातल्या बर्‍याच लँग्वेज फ्यामिल्यांत हा गुणधर्म आढळतो.

In reply to by अनुप ढेरे

अरेबीकमध्येही व्दिवचन आहे ! सर्वांना माहित असलेले बहरेन हे अल् बहर (समुद्र) चे व्दिवचन आहे. ते नाव त्या बेटांच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे या संदर्भात आहे. अल आयुन (एक डोळा), आयुनेन (दोन डोळे) एकवचन, व्दिवचन आणि अनेकवच आधुनिक अरेबिकमध्येही नेहमी वापरले जाते.

In reply to by मैत्र

नवरा हा शब्द नववर ह्यावरुन आला असावा. त्यामुळे काटेकोरपणे बोलायचे तर नवरा हा शब्द पती असा वापरणे चूक आहे. मी हिचा पती वा ही माझी बायको/पत्नी. फार ग्रामीण हवे असल्यास मी हिचा दादला असे म्हणता येईल. बायसिकलला सायकल म्हणणे मला आजिबात म्हणजे आजिबातच चूक वाटत नाही. क्यूला लाईन आणि लाईनचे लायनी असे अनेकवचन करणेही मला चूक वाटत नाही. लोक आपल्या भाषेच्या सोयीने शब्दांचे कंगोरे घासून नवे शब्द बनवतात. प्लॅटफॉर्म हा शब्द अत्यंत किचकट आहे त्याचा फलाट होतो तो अगदी सोपा आहे. ऑस्ट्रेलियात टूडे ला टूडाय म्हणतात तेही त्यातलेच. त्याचे मात्र कौतुक. एतद्देशीयांची मात्र अवहेलना. भारतात (कदाचित महाराष्ट्रातच असेल) प्यांटीची चेन असे सर्रास म्हणतात. अमेरिकेत मात्र त्याला झिप (वा झिपर) म्हणतात. चेन आणि झिप हे समानार्थी आजिबात नाहीत. कदाचित इंग्लंडमधेही म्हणत असतील. कारण चेनचा डिक्शनरीतील अर्थ पाहिला तर झिप वा झिपर असा अर्थ मला तरी सापडला नाही. पुण्यात पोहण्याच्या तलावाला ट्यांक म्हणतात. ते मला आता कमालीचे विचित्र वाटते. इंग्रजी शब्द हवाच असेल तर पूल असा सोपा शब्द आहे त्याऐवजी ट्यांक कशाला? त्या शब्दाचा मूळ अर्थ (पाण्याची) टाकी असा आहे. (अर्थात ट्यांक म्हटल्याने इंग्रजीचे पावित्र्य भ्रष्ट होते वगैरे मी म्हणणार नाही!)

तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
नाही. आणि करणारही नाही. हे चुकीचे वापर आहेत असल्या गैरसमजांसाठी काहीतरी नक्कीच करेन. आपण भाषा बोलतो म्हणजे काय वाट्टेल त्या पद्धतीने वाट्टेल ते बडबडत नसतो. आपल्या भाषेचा एक पॅटर्न आपल्या डोक्यात फिट्ट बसलेला असतो. त्यापलीकडे एका मर्यादेपुढे जाणं हा त्या भाषिकांसाठी एक वेगळा मानसिक ताण होऊ शकतो. म्हणून एखाद्या परकी भाषेतील शब्द आपल्या नकळत हळूहळू आपल्या भाषेत शिरकाव करतात तेव्हा आपल्या नकळतच ते आपल्या भाषेच्या त्या पॅटर्नमधे सामावले जातात. ध्वनिदृष्ट्या तर हे अगदी सहज होतेच. पण त्यांच्या अर्थ/ अर्थच्छटा यांच्यातही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार काही ना काही बदल होतातच. हे काही मराठी-इंग्लिश च्या बाबतीतलं जगावेगळं उदाहरण नाही. जिथे दोन भाषा एकत्र नांदल्या/ नांदत आहेत तिथे हे होणारच. त्यापासून सुटकाच नाही. त्यामुळे हे चुकीचे वापर आहेत असे समजून महाराष्ट्रातील इंग्लिशच्या भवितव्याची चिंता करायची काही गरज नाही. अगदी कसलीतरी चिंता करायचीच असेल, तर मराठीच्या अनेक बोलींची चिंता करा..

मराठी न येणार्‍या संस्कृत पंडीताला "अपरोक्ष" या शब्दाचा मराठीतला "प्रमाण अर्थ" सांगीतला तर घेरी येईल असे वाटते ;)

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी प्रतिसाद देत आहे.. मला वाटतंय मला जे म्हणायचं होतं ते नेमकं स्पष्ट झालं नाही बहुधा (काही प्रतिसादांवरुन असं वाटतंय) इंग्रजीच्या किंवा मराठीच्या शुध्दतेच्या आग्रहातून मी हा धागा काढला नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की , एखाद्या इंग्रजी वाक्यात X हा इंग्रजी शब्द वापरला जात असेल तर त्याच अर्थाचे मराठी वाक्य बोलताना क्ष हा मराठी शब्द वापरला जावा, किंवा एक्स हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा उच्चारला गेला किंवा उचाराचा अपभ्रंश होवून येक्स, येक्श असे काही झाले तरी मी समजू शकतो. पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

दुसर्‍या भाषेतला कुठला शब्द आपल्या भाषेत घ्यावा आणि तो कसा वापरावा हे भाषिक ठरवतात... प्रथम भाषा (शब्द आणि त्यांच्या वापराची पद्धत) बनते आणि नंतर व्याकरण (भाषेच्या आस्तित्वात असलेल्या वापरावरून बनलेले नियम) लिहीले जातात. हा प्रवास उलटा करणे असफल ठरते. १०० वर्षे जुनी / ५० वर्षे जुनी / आताची मराठी (किंवा कोणतीही) भाषा पाहिल्यास हेच दिसेल. पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते. याचे चपखल उदाहरण वरच्याच प्रतिसादात दिलेले आहे. "अपरोक्ष" या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ पाहिल्यास हे स्पष्ट होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अपरोक्षचा संस्कृत अर्थ मला माहीत नाही. तसाच तो अनेकांना माहित नसेल म्हणून काही घोळ होत असेल अशी शक्यता असू शकते. पण इंग्रजी जाणणारे, लिहणारे आणि बोलणारे मराठीतून तेच बोलताना जर X ऐवजी Y वापरत असतील तर नक्कीच मोठं आश्चर्य आहे ना. म्हणजे "Yesterday I watched a movie. There was a huge queue for the ticket." असं छान बोलणाराच मराठीत बोलताना मात्र "मी काल पिक्चरला गेलो होतो.तिकीटासाठी मोठी लाईन होती." असं बोलतो तेव्हा आश्चर्य वाटतं बाकी अपरोक्षच्या बाबत दुसरी शक्यताही असू शकते ती म्हणजे की एकच शब्द मराठी आणि संस्कृतमध्ये वेगवेगळ्या अर्थाने योगायोगाने असेल. जसे इंग्रजीत soon आहे आणि मराठीतही सून आहे *lol*

In reply to by मराठी कथालेखक

मराठी : अपरोक्ष = नजरेआड किंवा अनुपस्थितीत (उदा: ही घटना माझ्या अपरोक्ष घडली.) संस्कृत : अपरोक्ष = डोळ्यासमोर किंवा उपस्थितीत

मधुमेह अस सध्या ऐकण्यात येत नाहि...'शुगर' शब्द सर्रास वापरला जातो

धागाकर्त्याचा अभिनिवेश कळला पण सामान्य ज्ञान कमी पडते आहे असे जाणवलं. म्हणून.... : १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. >> क्यु आणि लाईन हे दोन्ही शब्द पुर्णपणे बरोबर आहेत. त्याच चुकीचे काहीच नाही. लाईन शब्द वापरण्याचे कारण 'फॉल इन लाईन' हा इंग्रजी वाक्प्रचार असू शकतो. साहेबांनी नेटीवांना दरडावून दरडावून नागरी+लष्करी शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा अवशेष म्हणून 'क्यु' च्या ऐवजी लाईन शब्द प्रचलित झाला असेल. rr २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' >> थोडं भूतकाळात डोकावलं तर लाईट या शब्दाचा वीज या अर्थी वापर का सुरु झाला आणि तोच कसा बरोबर आहे हे लक्षात येईल. जेंव्हा वीज सर्वात प्रथम आली तेव्हा फक्त लाईट बल्ब वापरले जायचे. बाकीच्या उपकरणांचा शोधही लागला नव्हता किंवा तेवढा प्रचंड वापर होत नव्हता. लाईट बल्ब म्हणजे वीज असा सरळ अर्थ होता. त्यामुळे लाईट बल्ब चालू-बंद असणे हा वीजप्रवाह चालू-बंद असण्याचा पुरावा होता. म्हणून लाईट आले-गेले यालाच महत्त्व होते. वीज आली-गेली यापेक्षा लाईट आले-गेले असे म्हणणे त्याकाळात जास्त संयुक्तिक होते. तीच सवय पुढे कायम आहे. ३) Bicycle करिता 'सायकल' >> बायसिकल करता बाईक किंवा सायकल हे शब्द सर्वत्र प्रचलित आहेत. जसे आपल्याला पल्सर, युनिकॉर्न सदृश्य वाहनांना मोटरसायकल न म्हणता बाईक म्हणतो आणि ते चुकीचे वाटत नाही तसेच सायकलला सायकल म्हणणे चुकीचे नाही. ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. >> इंग्रजी पद्धतीत ओळख करून देण्याच्या परंपरेतून हे मिस्टर आणि मिसेस आले असेल. 'धिस इज मिस्टर एक्स अँड हि़ज वाईफ' म्हणण्याऐवजी 'धिस इज मिस्टर एक्स अँड मिसेस एक्स' असे म्हटले जायचे असे बघितले आहे. उंचावरून पाणी खालपर्यंत येता येता गढूळ होत जाते, भाषा, चालीरीती, परंपराही तशाच. माझे हजबंड किंवा माझी वाईफ म्हणण्यापेक्षा माझे मिस्टर अँड माझी मिसेस असे उल्लेखणे जास्त आदरयुक्त वाटत असेल. हा माझा नवरा किंवा ही माझी बायको म्हणण्यापेक्षा आमचे "हे" किंवा 'आमचे कुटूंब' म्हणणे जास्त आदरयुक्त वाटते तसे. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! >> झेरॉक्सच का, कोलगेट, बिसलेरी, जीप, मारुती इत्यादी पायोनिअर कंपन्यांची नावेच उत्पादनांची नावे म्हणून प्रसिद्ध होतात. तेही संयुक्तिक आहे. कारण दात घासायची पावडर/ब्रश, बॉटल्ड ड्रिंकिन्ग वॉटर/पिण्याचे पाण्याची बाटली, मुळ कागदपत्राची छायाप्रत असे दुकानदाराकडे जाऊन म्हणणे किंवा बोलीभाषेच्या जलद संभाषणात तीव्र गरजेच्या वेळी समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी किचकट आणि अव्यवहारी असते कधी कधी. तेही त्या उत्पादनांच्या अगदी सुरवातीच्या दिवसात फारच कठीण जेव्हा ती संकल्पनाच फार नवीन असते. जसे आपण आता इंटरनेटवर शोधाच्या ऐवजी गुगुलून बघा असे म्हणतो. कारण इंटरनेटवर शोधणे म्हणजेच गुगलचा वापर करणे असेच सर्वमान्य झाले आहे म्हणून. ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. >> तो अभिप्रेत असलेला अर्थ इथे सांगितला असता तर बरं झालं असते. तुम्हाला माहित्ये तर जणांसी करावे शहाणे. असो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. विशिष्ट पद्धतीने बनवतात असा ब्रेड हा खाण्याचा पदार्थ आहे. अक्षरशः शेकडो प्रकारचे ब्रेड जगात बनवले जातात. फक्त मैदाच नाही, तर बर्‍याच प्रकारच्या धान्यांच्या पिठापासून बनवतात. त्यातलाच पाव हा एक प्रकारचा ब्रेडच आहे. चपाती किंवा पोळी हा पण बेडच. आता तुम्ही मिल्क-ब्रेडलाच ब्रेड म्हणत असाल तर जाऊद्या. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' >> सिनेमा, मूव्ही, मोशन पिक्चर्स हे सर्व एकाच गोष्टीला म्हटले जाते. याचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक फिचर फिल्म. फीचर फिल्म हा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. फिचर फिल्म म्हणजे ४० मिनिटांपेक्षा जास्त लांबीचे चित्रपट. एका शो च्या वेळेत चित्रगृहात दाखवले जाणार्‍या तीन ते चार छोट्या चित्रपटांपेक्षा जास्त लांबीचा व प्रमुख चित्रपट म्हणजे फिचर फिल्म. कमर्शियल फिल्म्स्/मूव्हीज्/सिनेमांचे वितरण व प्रसिद्धी करतांना त्यामुळे कोणती फिचर फिल्म आहे ते सांगावे लागत असे. त्यामुळे मुख्य चित्रपटास फिचर फिल्म असे संबोधन वापरायचे. त्यावरूनच अपभ्रंश होऊन फिचर चे पिक्चर झाले. बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा...

In reply to by संदीप डांगे

Going to the pictures असं जुन्या ब्रिटिश इंग्रजीत सिनेमा पाहायला जाण्यास म्हणत असत. "अव्वल इंग्रजी" अंगी बाणवण्याच्या तर्खडकरी जमान्यात pictures = चित्रपट असं हुच्चभ्रू समीकरण बनलं असावं. फीचरचं पिक्चर झालं हा निष्कर्ष ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो.

या झेरॉक्सच का, कोलगेट, बिसलेरी, जीप, मारुती इत्यादी पायोनिअर कंपन्यांची नावेच उत्पादनांची नावे म्हणून प्रसिद्ध होतात. >>> हो सहमत आहे. या विषयी अजुन एक उदाहरण म्हणजे कॅडबरीचे. जगात सर्वजणांस हा शब्द माहित आहे. पण एक आडणाव आहे हे कित्येक लोकांना माहिती नाही. आपण खातो ते चॉकलेट असते ते फक्त कॅडबरी कं चे की नेसलेचे की आणखी कुठल्या कं चे असो, म्हणताना मात्र मी कॅडबरी खातो असेच म्हणतात.

In reply to by प्रमोद देर्देकर

हल्ली तर कॅडबरीही कॅडबरीची नसते. कॅडबरीची मालकी आता क्राफ्ट फूड्स नावाच्या कंपनीकडे आहे.