Skip to main content

कस्टमर केअर - एक गंडवणे

लेखक धन्या यांनी मंगळवार, 29/07/2014 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर." फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला. मला ऑफीसरशी बोलण्यासाठी पैसे पडतील हे एक दाबून मान्य केल्यावर फोन लागला. मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे. कके वरची मुलगी: सर तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का? तिने माझं म्हणणं ऐकलंच नव्हतं सवयीने "तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?" असं विचारुन मोकळी झाली होती. मी: (मनातल्या मनात, भवाने) मी सिम हरवला आहे म्हणतोय तर त्याच नंबरवरुन कसा बोलेन? कके वरची मुलगी: सॉरी सर. पुन्हा सांगता का? मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे. कके वरची मुलगी: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी पोस्टपेडला ट्रान्स्फर करते. कृपया लाईनवर राहा. बयेने मला लाईनवर राहायला सांगितले खरे मात्र तीन चार मिनिटे लाईनवर राहूनही कुणी उत्तर दिलंच नाही. मी वैतागून फोन कट केला आणि पुन्हा लावला. पुन्हा एकदा एक दाबा, दोन दाबाचे सोपस्कार पार पाडून मी त्यांच्या माणसापर्यंत पोहचलो. त्या मुलाला माझा प्रॉब्लेम सांगितला. कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. पोस्टपेडसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावर कॉल करा. त्य दादाने नंबर दिला. मी कॉल केला. पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरु झाले. मी ती दाबादाबी करत मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत पोहचलो. फोन अटेंड करणार्‍या मुलाला माझी समस्या सांगितली. कके वरची मुलगा: सर आता आमच्या सिस्टीमचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे सिस्टीम डाऊन आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही नांव आणि नंबर देऊन ठेवा आणि दोन तासांनी फोन करा. नांव आणि नंबर देऊन ठेवण्यापलिकडे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. मी दोन तासांनी फोन केला. यावेळी थेट पोस्टपेडचा नंबर लावला. पुन्हा एक दाबा, दोन दाबाचा मंत्र सुरु झाला. मी स्टार सिक्सने मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत गेलो. कके वरची मुलगा: सर तुम्ही याआधी चार वेळा कॉल केला होता. हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल. मी पोस्टपेडवाला नंबरच डायल केला होता हे सांगायच्या आत त्याने फोन ठेवला. त्याने बहुतेक नुकतंच डॉ. रमा मराठेंचं "रंग सुखाचे" पुस्तक वाचलेलं असावं. साखर, किराणा मालाचे दुकान आणि पेट्रोल पंपाचे उदाहरण त्याच पुस्तकात आहे. मी हताश, हतबल आणि हतबद्ध. त्याने फोन चालू ठेवला असता तर त्याच्या पुढच्या सात पीढयांना तो शिकवू शकेल इतकं मानसशास्त्राचे ज्ञान मी त्याला दिले असते. पण त्याने फोन फोन ठेवला होता. सिम ब्लॉक कारावाच लागणार होता त्यामुळे मी पुन्हा एकदा उरले सुरले अवसान गोळा करुन मी पुन्हा एकदा थेट पोस्टपेडचा नंबर डायल केला. दाबादाबीचे सोपस्कार पार पाडून मी हव्या त्या पर्यायाला गेलो. कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी तुम्हाला पोस्टपेड डीपार्टमेंटचा नंबर देतो. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहीला जात होता. पण यावेळी मात्र मी "आलीया भोगाशी का घ्यावी माघार" म्हणून जे घडेल त्याला सामोरे जायचे ठरवले. तो मुलगा त्याचा "पोस्टपेड"चा नंबर सांगत होता. हा तोच नंबर होता जो पोस्टपेडचा थेट नंबर डायल करुन दाबादाबी करत मी त्याच्यापर्यंत पोहचलो होतो. लहानपणी मुखोद्गत असणारी घरातील सार्‍यांचा सत्कार करणारी सारी शब्दमौक्तिके त्याच्यावर उधळावीत अशी प्रचंड ईच्छा झाली होती. मात्र मला माझ्या ध्येयाप्रत जायचे असल्यामुळे मी तो मोह आवरला. मी: मित्रा तू जो पोस्टपेडचा नंबर सांगितलास तोच नंबर डायल करुन तुझ्यापर्यंत आलोय. कके वरची मुलगा: असं का? थांबा मी पाहतो. मी तुमचा डेटा चेक करेपर्यंत लाईनवर राहा. तुमचे नांव आणि ब्लॉक करायचा आहे तो नंबर सांगा. मी त्याला नाव आणि नंबर सांगितला. त्याने माझा सिम ब्लॉक केला. मी डुप्लिकेट सिम मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते विचारुन घेतले. कके वरची मुलगा: अजून आपली काय सेवा करु शकतो सर? मी: झाली एव्हढी सेवा खुप झाली. कके वरची मुलगा: धन्यवाद सर. आपला दिवस शुभ होवो.

वाचने 28191
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

आमच्या कंपनीत सगळे कॉम्प्युटर लेनोव्होचे आहेत. एकदा एका लॅपटॉपच्या keys अडकत होत्या, म्हणून वॉरंटी रिपेअर/रिप्लेससाठी फोन केला. सगळा मामला ऐकवल्यावर, तो बहाद्दर मला बायस अपडेट करावी लागेल, असं सांगू लागला. त्याला सांगितलं, की हा हार्डवेअरचा इश्यु आहे. तर त्याचं उत्तर होतं " आय अंडरस्टँड, बट आय हॅव टू फॉलो द प्रोसिजर"

"हवा शेपुट" वाले जास्तीच डोक्याची मंडई करतात. अगदी त्यांच्या कस्ट्मर रिलेशन हाफिसात पण कस्ट्मर हा सगळ्यात दुर्लक्षीत प्राणी हाच अनुभव.

In reply to by प्रभो

संध्याकाळी घरी गेल्यावर सविस्तर ईमेल केला. तासाभरात त्यांचे उत्तरही आले. इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन.

In reply to by धन्या

>>>>>> इथून पुढे गरज पडल्यास दाबादाबी करत बसण्यापेक्षा ईमेलचा पर्याय वापरत जाईन. गप की ए माणसा! एक तर नको तिथं व्हिज्युअलायजेशन होतं आम्हाला नि त्यात ही असली वाक्यं??? धन्याच्या छापील उत्तराच्या प्रतीक्षेत. ;)

एअरलेटवाले प्रीपेड असले तरी पोष्टपेड करू का म्हणून सत्रादा पिडतात भो****चे. कष्टमर केअरला सांगून ब्लॉक केले पायजे.

सगळे फोन वाले तसेच आहेत. उडदा माजी काळे गोरे. फोन हरवल्यावर मी तडक त्यांच्या ग्यालरीत गेलो. सीम ब्लॉक करून लगेच दुसरे सिम कार्ड ५ मिनिटात घेऊन आलो ४९ रुपये भरून. कोणत्याही कस्टमर केर( !)ला फोन करण्यापेक्षा इमेल करावी. २४ तासांनी अपिलेट ओथोरीतीला त्याची कॉपी सकट मेल पाठवावी आणी अजून ४८ तासांनी मला पोर्ट आऊट करायचे आहे अशी मेल पाठवावी. बरेच कके वाले आपणहून फोन करून आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात मी तीन वेळेस पोर्ट आउट केले आहे. सुरुवातीचे एक वर्ष चांगले जाते. स्कीम मुळे फोन स्वस्त पडतो. महाग व्हयला लागला किंवा सेवा दर्जा खालावला कि दुसर्याकडे. ज्या कंपनीची ग्यालरी जवळ आहे ती कंपनी स्वीकारा. हेलपाटे घालण्यात वेळ जात नाही.

सगळ्यात भयानक bsnl. अर्धा तास तर thanks for contact us एकु येते. नशिबात असल्यास कुणीतरी बोलत.

वालीला स्वीडन ला रोमिंग चार्जेस विचारले तर तिने सुदानचे सांगायला सुरुवात केली...स्वीडन स्वीडन म्हटल्यावर म्हणाली कुठे आहे हे ....म्हटले युरोपात ...युरोप कुठल्या देशात ....अहो युरोप 'खंड' आहे अनेक देश आहेत युरोपात त्यातला एक स्वीडन...तुम्हाला यु के म्हणायचे आहे का?? ...अहो मला युरोपच म्हणायचे आहे ...पण मग सुदान युरोपातच आहे .. स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक.... कट केला शेवटी मि फोन भोग असतात हो शेवटी....

In reply to by अत्रन्गि पाउस

सेम असाच अनुभव. बहुतेक एचडीएफसी बँक. मी पहिले जर्मनीतील संपर्क क्रमांक विचारला तर उत्तर मिळाले वेबसाइटवर आहे. घ्या. आता पहिले तिकडे न शोधता तुला कशाला फोन करेन ना मी. पण असो. मग म्हणाली की सिंगापुरचा आहे. सांगु का? म्हटले की अहो ताई, जर्मनी नसेल तर युरोपातला द्या. मग म्हणाली युएसचा आहे. शेवटी उत्तर मिळाले की मी देते सगळे. (चार देश) तुम्ही ट्राय करुन बघा तुम्हाला कुठ्ला हवा तो. मी पण फोन कट केला वैतागुन.

स्वीडन आणि सुदान एकच आहे बहुतेक....
हा हा हा...जबरीच. आता कोणी विचारले की कुठे असतोस म्हणून तर मी पण "सुदान" ला असतो असेच सांगेन; तेव्हढच आपल्याला बोलायला सोप्पं आणि ऐकण्यार्‍याला सुद्धा. :)

कस्टमर केअर च्या बाबतीत मला तरी वोडाफोन आणि त्यानंतर एअरटेल "बरे" वाट्तात. बाकि आयडिया, रीलायन्स डोकोमो फारच भंगार आहेत या बाबतित.

शिंग मोडून घुसलो पण पस्तावा सुरु झाला २९ मे २०१४ ला रुपये १५०००/- खर्च करून LENOVO MOBILE घेतला निरनिराळी APP शिकत बसलो . मराठीतून SMS करू लागलो NET BANKING जमू लागले संध्याकाळी हातात पेपर न घेता कुठे कोणता सिनेमा आहे हे सांगून बायकोकडून कौतुक करून घेतले पण आज सकाळी MOBILE चालू केला तर काहीच दिसेना DISPLAY PROBLEM AMAZON कडून MOBILE घेतला आहे आणि आता वर आलेल्या प्रतिसादांचा अनुभव घेणे सुरु झाले आहे हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? आपल्या उत्तराच्या अपेक्षेत आहे

In reply to by देशपांडे विनायक

>>>>..... बायकोकडून कौतुक करून घेतले ..... >>>>हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? व्वा! ७२ वर्षांनी का होईना, जमलं तुम्हाला....अभिनंदन.

In reply to by देशपांडे विनायक

पंधरा हजाराचा फोन वाया गेला ही भावना मनाला सतावणारी नसेल तर असे अनुभव नाही घेतलेत तरी चालण्यासारखे आहे. :)

In reply to by देशपांडे विनायक

हे असले अनुभव ७२ व्या वर्षी घ्यावेत की नाही ? सहमत. हे अनुभव आता घ्यायला लागू नयेत. यासाठी डॉ. खरे म्हणतात ते पटले. जवळचे दुकन शोधल्यास तिथे जाणे सोपे पडेल. त्याच्यासमोर फोन ठेवून काय झालय ते बघ रे बाबा म्हणाता येतं. फक्त तो मनुष्य फसवणारा निघू नये म्हणजे झालं.

युनिनौर इतके बंडल छाप नेटवर्क कोणत्याही इतर कंपनीचे नसेल....... साल्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहावी असे वाटते ... आपण कोणत्याही युनिनौर नंबर ला फोन करा.. (बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) "अब युनिनौर के XX रुपये के रेचार्ज पार पायीये XXXX एस टी डी आणि लोकल मिनिट्स फ्री. " टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टुक.. टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक..टुक.. टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक..टिक.. (पुन्हा एकदा बैक ग्राउंड ला गावठी बेंजो पार्टी टाईप म्युझिक) द नंबर यु आर ट्रएंग टू रिच इज आउट ऑफ कवरेज एरिया प्लीज ट्राय लेटर..... Now get unlimited local uninor calls free on a recharge of XX अब पयिए अन लिमिटेड लोकल युनिनौर कौल बिलकुल फ्री सिर्फ XX के रेचार्ज पर पुरे XX दिनो के लिये. साले हराम** *****.. ****** एक तर फोनला कवरेज देत नाही वर आणि इतर लोकांना एवढा वेळ तुमची जाहिरात आणि ते सुगम संगीत ऐकवताय काय..??? जहिरात आणि ते टुक.. टुक ऐकण्याच्या गोंधळात आपणा जवळपास २-३ मिनटे गमावून बसलेलो असतो...

जुन्या पिढीला नवी पिढी वाया गेली असे वाटण्याचे हे एक कारण आहे वाया घालवण्याचे त्यांना सोयर सुतकच नसते

एअरटेल आणि टाटा इंडिकॉमवाल्यांशी भांडून डोक्याचे केस पांढरे झालेत. परवा फोन शिफ्टिंग करताना आपल्या बीयश्नेल चा अनुभव. शिफ्टिंगचा अर्ज दिल्यावर साहेबाने सांगितलं तुमचा फोन लगेच कट करतो. पण नवीन जागेत शिफ्ट करायचं काम लाईनमन करणार. त्याचा नंबर देतो त्याच्याशी बोला. त्याला फोन केला तर सुरुवातीला २/३ वेळा त्याने घेतला. आता पावसामुळे कंप्लेंट्स खूप आहेत. तुमच्या घराजवळपास आलो की करून टाकतो म्हणाला. नंतर त्याचा फोन सतत आव्टाप्कवरेजेरिया. साहेबाला फोन केला तर तो सांगतोय, मी त्याला आठवण करतोच आहे. ८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. तिथून थेट घरापर्यंत वायर होतीच आधीची. मात्र तिला जोडकाम आहे. बदलून टाकूया म्हणून गेला तो गेलाच. परत ८ दिवस गायब. एका भलत्याच नंबरावरून फोन केल्यावर सापडला. आणि हलकट सांगतो काय, वायर संपलीय. लगेच त्याच्या साहेबाला फोन करून विचारले, सगळ्या बीयसएनेलातल्या वायरी संपल्या काय? तो म्हणे, आमचं काम हे असंच चालतंय. तुम्हाला घाई असली तर नंबर सरेंडर करा आणि टाटाकडे जावा. मेल्याने हे सुरुवातीलाच सांगितलं असतं तर आधीच टाटा फोटॉन घेतलं नसतं का? मग माझं डॉकं सटकलं. नवर्‍याला म्हटलं कोण ऑफिस इन चार्ज इंजिनिअर असेल त्याच्या डोक्यावर जाऊन बसूया चल. बीएसएनेलाच्या हापिसाच्या गेटात पोचलो तर हा लाईनमन धावत आला. "ओ, ही बघा वायर. तुमच्या घरीच निघालोय. चला" म्हणे. आम्ही त्याच्या पाठोपाठ आलो, तर हा पुन्हा नाहीसा. शेवट शनिवारी दुपारी ४.३० ला फोन चालू झाला. इंटरनेट सोमवारी म्हणे. ते त्या दिवशीही नाहीच झालं. ईदीची सुटी झाली आणि मग काल एकदाचं ब्रॉडबँड सुरू झालं. १५ तारखेला अर्ज दिल्यावर काल ३० ला फोन नीट सुरू झाला. तेही सतत पाठपुरावा करून. आता कानाला खडा. पुन्हा घर हलवताना लँडलाईन फोन सरेंडर करून टाकणार. ३जी महाग पडलं तरी चालेल. अर्थात त्यांचे नेटवर्क मिळाले पाहिजे ही अट आहेच. आणि सध्यातरी आयडिया सोडता कोणाचेच नेटवर्क धड नाहीये. पण मिपावर यायचं तर दुसरा काही इलाज नाही! *dash1*

In reply to by पैसा

@८ दिवसांनी शेजारच्या खांबावर काम करताना सापडला. >>> *lol* अत्यंत वैट्ट खपल्या गेलो आहे! *lol* पैसा ताई लाईनमनच्या मागे जसे..आंम्ही वावरात चतुर पकडायला गवताचे झाडू घेऊन मागे पळायचो..तसं पळातानाचं चित्र आलं =)) लाईनमन:- अहो..थांबा थांबा..आलोच २ दिवसात पैसाताई:- थांब..मेल्या..थांब..हुट हुट..आता सापडला! =)) खांबावर चढून बसतोस काय!? =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

देवाशप्पथ! तो एक पाय कंपाउंड वॉलवर आणि एक पाय खांबाला टेकवून असा हुच्च स्थानावरून आमच्याशी बातचीत करत होता, म्हणून सुरक्षित अंतरावर होता! =))

In reply to by पैसा

आव्टाप्कवरेजेरिया
बर्मग्ठीव्काला भाऊ सापडला. :) बाकी तुमची बीयेशेनेल जोडनी बदलाची चित्तरकथा जबराच. फोनाफोनी करुन तुम्हाला जोडनी करुन अजून एखादा महिना घालवला असता त्यांनी. प्रत्यक्ष कार्यालयात गेलात हे बरे केलेत.

In reply to by पैसा

अरेरे, काय करावं इंटरनेटा धावाधाव लाईनमनच्या पाठी किती जीवाचा आटापिटा एका मिपावर येण्यासाठी ;-)

In reply to by पैसा

छ्या... तुम्ही जून्या पीढीतील लोकं कशालाही कविता म्हणता. ही तर चारोळी होती. इतका साधेपणा दाखवलात तर ककेवाले तुम्हाला आरामात गुंडाळतील. :)

ह्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकदा कॉल करणे आणि जे झाले त्याचा एक निबंध लिहिणे आणि साईट वर contact us नावाचे पेज असते त्यावर जे काही इमेल असतील (ह्यात बर्याच वरिष्ठ लोकांचे मेल मिळतात) त्या सगळ्या इमेल वर पाठवणे, आणखी एक करणे त्या कंपनी चे ज्या काही सोशल साईट असतील तिकडे कॉपी पेस्ट करणे एवढ सगळ करायला ज्यास्तीत ज्यास्त १०-१५ मिनटे लागतात २ तासात स्वत कॉल करतात; काम झालंच म्हणून समजा उदाहरणार्थ मी केलेला उपाय खालील निबंध जेट एअरवे च्या सगळ्या मेल वर(http://www.jetairways.com/EN/IN/AboutUs/CorporateCommunications.aspx) आणि फेसबुक पेज वर टाकला २ तासात स्वत कॉल;सगळे पैसे परत; वर आणि दहा वेळा सॉरी आणि आम्हाला सोडून जावू नका न गडे चा मेल *biggrin* "How and why Jet Airways is in profit? my experience....... Hi Team, I (jet privilege #XXXXX booked ticket for round trip from Singapore to Mumbai onward and return (Ticket # XXXXX PNR XXXXX attached herewith). In ticket passengers name I misspelled my wife name as ACBDF instead ABCDF . I called customer care for correction in name and agent said there is no way for correction and I need to cancel the ticket and re book again. I cancelled it, (refund receipt attached) But while re booking I got error message that same information is already in system (screen shot below and attached) and I was not able to book it again. Once again I called customer care and told whole story, but surprisingly agent said that there was no need to cancel the ticket and he can correct spelling mistake; he transferred my called to another senior level agent who was ready to correct spelling mistake and once I told that I already cancelled the ticket, He immediately took round-turn and said information from first agent is connect and he can not change name. Due to this I lost around 470 SGD in the booking and more importantly I lost faith in Jet Airways as an professional service. Please check and revert where it went wrong. So that I can continue to travel with your service. Today morning I called again for same error, your agent is saying we can not help for this and you need to write mail to clear the error. When I asked system should clear the information automatically; he replied there is no way to clear and if you wish to travel by jet airways you must need to send mail to info@jetairlines.com (which is wrong email id correct one is info@jetairways.com). and wait for 24 Hrs. I told that I already sent mail after getting this error 2 times (ह्याला खोटेपणा म्हणत नाहीत *biggrin* ), but still I did not received replay and if I need to wait for 24 Hrs again, it may happen that flight will get book fully, his reply is if you want send a mail or you can opt for other airline service. I am afraid next booking will be last booking with Jet Airways which I am doing unwillingly because I have done my booking and need to do my wife's booking in same flight."