Skip to main content

अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 23/07/2014 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
नभी काजळी दाटता सूर ओला उरा अंतरातून बरसून गेला झरा आत वाहे,तरीही सुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी कुणी हासते वा कुणी गीत गाते कुणी प्रेमरंगात रंगून जाते उभी एकटी दूर सार्‍याहुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती नव्याने नटो ही धरा मेघवेडी नवी बावरी लाजुदे सांज थोडी उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा सुटावे जिणे,श्वास माझा सरावा उरो शेवटाला तुझी होवुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी © डॉ.अदिती शरद जोशी
लेखनविषय:

वाचने 3553
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

सुंदर ,मनाला भिडणारी कविता

कविता मीटरवर म्हणायला मजा आली. पण अर्थाचे म्हणाल तर त्यातल्या सखीची आर्तता तितकीशी भिडली नाही. थोडे अलंकारिक लिहिण्याच्या नादात कदाचित थोडा विस्कळीतपणा आलाय की काय असे वाटले. राग मानू नका हो. हे कदाचित फक्त मलाच जाणवले असेल. इतरांना आवडलीय म्हणजे तसे नसेलही. पुकशु.

In reply to by एस

+१ व्याकरणाला बांधून तरीही अगदी करकचून छंदबद्ध अशी ही कविता केली आहे (कविता मीटर!! :-)) ). पण ती फारच क्लीष्ट झाली आहे वाचायला...

सुंदर :)

झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती खासच..! -दिलीप बिरुटे

In reply to by इनिगोय

असेच म्हणतो. सुंदर रचना. तसेच शेवटचे कडवे वेगळ्या दृष्टीनं बघीतलं तर आणिक सुंदर भासतंय..! खूप छान! :)

(अवांतरः आनंदमयींच्या कवितांमुळे मिपावर याआधी लयदार कविता लिहिणार्‍या प्राजुची आठवण होते.)

अतिशय सुंदर रचना.... आवडली.

असे वाचुनी जाहले दीस फार अभिव्यक्ति केली पहा जोरदार अशी येउद्या येथ काव्ये अपार भुजंगप्रयाती 'य' येतात चार ||