लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग
लहानांचे दंतोपचार : भाग दोन
दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ...
टूथपेस्ट आणि ब्रशिंग
या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक.
यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश
रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे.
बर्याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल. पण हे दुर्दैवाने शक्य नाही. खड्डा पडलेल्या इनॅमल आणि डेन्टिनला पुनरुत्पादनाची शक्ती नाही. तसे असते तर असे औषध मेडिकल शॉपमधून घेऊन सर्वांनाच आपले दात परत बनवता आले असते.
( दंतक्षयाची लस caries vaccine ही संकल्पना अजून तरी संशोधनाच्या पातळीवरच आहे. स्टेमसेल संशोधन सुद्धा दात पुन्हा बनवू शकेल, असा दावा गॉथेनबर्ग , स्वीडन किंवा इस्तंबूल , टर्की इथल्या अमुकढमुक संशोधकांनी केला असे गेली अनेक वर्षे जर्नल बिर्नल मधून वाचायला मिळते, त्यापुढे काय? असो... माझा एक इन्जिनियर मित्र म्हणतो की त्याच्या कॉन्स्पिरसी थियरीप्रमाणे डेन्टल इन्डस्ट्रीवाल्यांनी हे स्टेम सेल संशोधन दाबून ठेवले आहे इ.इ. तेही असो .. सध्या तरी घरगुती ब्रशिंग फ़्लॉसिन्गला आणि दात किडल्यावर डेन्टिस्टला पर्याय नाही )
कोणत्याही रसायनांपेक्षा यांत्रिक स्वच्छता महत्त्वाची.
म्हणजे कॅविटी असलेला दात परत आपोआप भरत नाही हे ठरले.
आता हे एक लक्षात घेतले पाहिजे की दात स्वच्छ करताना रासायनिक उपायांपेक्षा यांत्रिक उपाय अधिक महत्त्वाचे. डॉक्टर एखादी भारीतली पेस्ट सांगा असे कोणी वि़चारले की मी लगेच विचारतो की ब्रश किती वेळा करता आणि कसे करता हे जास्त महत्त्वाचे आहे. आदर्श ब्रशिंग आणि फ़्लॉसिंग केले तर पेस्ट कोणतीही वापरा, फ़ारसा फ़रक पडत नाही. ( मी तुम्हाला दहा प्रकारच्या पेस्ट्स लिहून देईन पण ब्रशिंग चांगले न करता पेस्ट्स बदलत राहण्यात काही अर्थ नाही. मग काही मज्जेदार रुग्ण त्यांची मल्टिलेवल मार्केटिंगची सातशे रुपयांची भारी पेस्ट ते कशी वापरतात, ते सांगतात आणि माझ्यावर “ ती पेस्ट तुम्ही वापरा” असे सांगत त्यांचे मार्केटिंगचे मर्यादित कौशल्य ( !!) आजमावतात. मग “इतकी भारीतली पेस्ट वापरून सुद्धा तुमचे दात हे असे कसे ?” असा विचारायचा आसुरी आनंद मी घेतो ,ते असोच.)
आणखी एक म्हणजे बोटाने दात स्वच्छ करणे शक्य नाही. पावडर अजिबात वापरू नका. ही पावडरच दातांच्या आणि हिरड्यांच्या फ़टीत अडकून राहते. त्याभोवती अन्नकण अडकून राहतात आणि हिरड्या खराब होतात.
जेवल्यावर चुळा भरणे महत्त्वाचे आहेच पण गोड चिकट पदार्थ ( चॉकलेट्स, मिठाई) खाल्ल्यावर केवळ चुळा भरणे पुरेसे नाही तर दाताच्या फ़िशर्समध्ये अडकलेले चिकट पदार्थ ब्रश फ़िरवून पूर्ण काढणे अधिक महत्त्वाचे आहे. रोज फ़्लॉस केलात तर फ़ारच उत्तम. दोन दातांच्या मधले अडकलेले छोटे अन्नकण फ़्लॉस सहज काढतो. फ़टी असल्यास माउथवॉशमध्ये बुडवून इन्टरडेन्टल ब्रश वापरा पण प्लाक आणि अन्नकण काढा.
ब्रशिंगची योग्य पद्धत :
मुलायम ब्रश, फ़िंगर ग्रिप , ( मुठीत पकडलेला ब्रश ताकद लावून चुकीच्या पद्धतीने आडवा फ़िरवला जातो, अनेक वर्षे ही प्रेशर ब्रशिंगची सवय राहिली तर दातांना खाचा पडतात) योग्य पद्धत म्हणजे दातांवर वरून खाली आणि खालून वर अशा पद्धतीने उभे ( वर्टिकल) ब्रशिंग किंवा गोल गोल ( सर्क्युलर) ब्रशिंग करणे, दाताच्या आणि दाढांच्या सर्व पृष्ठभागावरून ब्रश वर दिलेल्या दिशेने फ़िरवणे आणि दीड दोन मिनिटांत ब्रशिंग संपवणे पुरेसे असते.
काही लोकांना ब्रशिंग करणे अजिबातच आवडत नाही तर काही लोक अत्यंत हिंसक पद्धतीने ब्रश करतात. हे लोक अभिमानाने सांगतात की ते अर्धा अर्धा तास हार्ड ब्रशने ताकद लावून ब्रशिंग करतात आणि दर आठवड्याला ब्रश चे धागे वाकडे करतात आणि ब्रश बदलतात. त्यांच्या उपदाढा आणि पहिल्या दाढांचे नेहमी इनॅमल झिजलेले असते आणि मुळापाशी मोठ्या खाचा पडलेल्या असतात आणि दात सळसळ करायला लागलेले असतात. या सेन्सिटिविटीचे कारण न समजल्याने असे रुग्ण अजून जोरदार ब्रश करतात. असे हिंसक ब्रशिंग घातक असते. ब्रश साधारणपणे पाच सहा महिने तरी पुरला पाहिजे.
( या हिंसक ब्रशवाल्यांना ब्रशिंगची योग्य पद्धत समजावून सांगताना काळजी घ्यावी लागते कारण एकदा त्यांच्या हे लक्षात आले की प्रेशर ब्रशिंगमुळे दाताला खाचा पडतात, दात सेन्सिटिव होतात तर ते अचानक आता ब्रशच बंद करतो आणि बोटाने दात घासतो असे म्हणायला लागतात. यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागते की प्रेशरब्रशिंगने दाताला खाचा पडतात याचा अर्थ असा नव्हे की ब्रशिंगच बंद करा...योग्य पद्धतीने केलेल्या टूथब्रशला पर्याय नाही. )
योग्य ब्रशिंगचे यूट्यूबवरती पुष्कळ विडियो उपलब्ध आहेत. ते पहावेत, लहान मुलांनाही दाखवावेत. डेन्टल फ़्लॉसचा धागा दोन दातांच्या मधल्या भागातून कसा फ़िरवावा, हे आपल्या डेन्टिस्टकडून शिकून घ्यावे किंवा यूट्यूब आहेच.
टूथपेस्टच्या जाहिराती ... या जाहिराती खोटेनाटे अत्युच्च दावे करत असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. पो्टासाठी त्यांनाही जाहिराती करायच्या आहेत, हे समजते पण जाहिरात अनेकवेळा दिशाभूल करणारी असते.
पेस्ट केल्यापासून बारा तास सुरक्षा हे एक भंपक प्रकरण आहे. एखाद्या रसायनाने दातावर वाढलेल्या जीवाणूंना अटकाव होतो, हे समजा संशोधनाने सिद्ध झाले असेल तर जाहिरात मात्र अशी असते की तेच रसायन असलेली ही पेस्ट वापरून तुम्ही बारा तास काहीही चॉकलेट्स खाल्लीत तरी दातांना काहीही होणार नाही. हे सरळ दिशाभूल करणे आहे. शिवाय कोणता डेन्टिस्ट असा हातात एक आरसा किंवा काय ते उपकरण धरून तोंडातले जर्म्स / किटाणू ( हा एक जाहिरात वाल्यांचा आवडता शब्द) बघतो ते मला माहिती नाही.
तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे का, इ.इ. तर फ़ारच भंपक. असो.. या जाहिराती तारतम्य बाळगून बघाव्यात आणि साजिद खानचा सिनेमा पाहतो तशा बघून सोडून द्याव्यात. चिडून त्यांच्याशी भांडायला जाऊ नये.
आता थोडक्यात पुन्हा ...
दाताला खड्डा पडला की त्यानंतर त्या दातासाठी अधिक ब्रशिंगचा उपयोग नाही, डेन्टिस्टला भेटणे आवश्यक.
ब्रशिंग फ़्लॉसिंग हे पेस्ट आणि माउथवॉशपेक्षा अधिक महत्त्वाचे.
बोट आणि पावडर नको.
दिवसातून किमान दोनदा थोडीशी पेस्ट लावून. ( ब्रश भरून पेस्टची गरज नसते)
ब्रश : मुलायम, हलक्या हाताने, बोटांत पकडून, वर्टिकल / सर्क्युलर हालचाल, सर्व पृष्ठभागांवरून दीड दोन मिनिटे ब्रशिंग
Happy Brushing !!!
पूर्वप्रसिद्धी फेसबुक पानावरती
https://www.facebook.com/joglekardental?ref=hl&ref_type=bookmark
मुलायम ब्रश, फ़िंगर ग्रिप , ( मुठीत पकडलेला ब्रश ताकद लावून चुकीच्या पद्धतीने आडवा फ़िरवला जातो, अनेक वर्षे ही प्रेशर ब्रशिंगची सवय राहिली तर दातांना खाचा पडतात) योग्य पद्धत म्हणजे दातांवर वरून खाली आणि खालून वर अशा पद्धतीने उभे ( वर्टिकल) ब्रशिंग किंवा गोल गोल ( सर्क्युलर) ब्रशिंग करणे, दाताच्या आणि दाढांच्या सर्व पृष्ठभागावरून ब्रश वर दिलेल्या दिशेने फ़िरवणे आणि दीड दोन मिनिटांत ब्रशिंग संपवणे पुरेसे असते.
काही लोकांना ब्रशिंग करणे अजिबातच आवडत नाही तर काही लोक अत्यंत हिंसक पद्धतीने ब्रश करतात. हे लोक अभिमानाने सांगतात की ते अर्धा अर्धा तास हार्ड ब्रशने ताकद लावून ब्रशिंग करतात आणि दर आठवड्याला ब्रश चे धागे वाकडे करतात आणि ब्रश बदलतात. त्यांच्या उपदाढा आणि पहिल्या दाढांचे नेहमी इनॅमल झिजलेले असते आणि मुळापाशी मोठ्या खाचा पडलेल्या असतात आणि दात सळसळ करायला लागलेले असतात. या सेन्सिटिविटीचे कारण न समजल्याने असे रुग्ण अजून जोरदार ब्रश करतात. असे हिंसक ब्रशिंग घातक असते. ब्रश साधारणपणे पाच सहा महिने तरी पुरला पाहिजे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अतिशय उपयुक्त लेख!
दाताची झीज होऊन डेन्टीन उघडे
खरे आहे.
खरे आहे. याव्यतिरिक्तही
वा. उपयोगी!
छान लेखमालिका !
साधनाचा बाऊ फार आणि साध्य दूर
अतिशय उपयुक्त लेखमाला.
+१
धन्यवाद.
उत्तम. आता दरवेळी आभार
वाचत आहे.
गेल्या लेखात
इनिगोय ताई
मास्तर,
मंजन, पावडर यातील अ
आमच्या फॅमिली डॉक्टरांनी
छान लेख
धन्यवाद मास्तर.
छान माहितीपूर्ण.