Skip to main content

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 08/06/2014 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. केवळ भारतात दंगे होतात म्हणून हे देश आपल्या नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घालेल अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. पण असले उठसुठ दंगे होणे भारताला परवडेल का? तशात मोदींकडे कलुषित नजरेने बघणारे कमी नाहीत त्यामुळे असे काही घडले की थेट मोदींवर आरोप केले जाऊ शकतात आणि जातातही. लोकांनी आपल्या दैवतांचा अपमान करणे सहन करायला शिकलेच पाहिजे असे मला वाटते. मग ते हिंदू असोत वा मुस्लिम वा अन्य कुणी. ड्यानिश व्यंगचित्रकाराचे प्रकरण आठवत असेलच. आपणास काय वाटते? ह्या विषयाशी संबंधित काही बातम्या. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Pune-IT-Enginee… http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/fear-drives-man…

वाचने 33776
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by भृशुंडी

तुमच्या प्रतिसादात मला सरळसरळ विभूतींची विटंबना करण्याचा प्रयत्न मला दिसतो. भाजपाला आख्ख्या देशाने एकमताने निवडून दिलेलं असताना त्या पक्षाविरुद्ध काही बोलणं हेच ब्लास्फेमस आहे. तुम्ही यातून संपूर्ण भारताच्या संपूर्ण जनतेच्या भावना दुखवत आहात. याला देशद्रोहच का म्हणू नये असा मला प्रश्न पडतो. ही ही असली मानसिकता ठेचून काढली पाहिजे. अशा कुरापतखोर माणसांमुळेच दंगली होतात. असल्या विभूतीभंजनाच्या कृतीने भक्तांच्या भावना दुखावल्या की मग ते बिचारे नाइलाजाने चवताळून उठतात. मग त्यातून दंगली झाल्या तर दोष कुणाचा? शब्दांनी उचकवणारे आणि लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडून खून पाडणारे तत्वतः सारखेच.

राजीव साने यांचा एक वाचनीय लेख अगदी याच विषयावर बोलतो. त्याची लिंक खाली आहे. अद्याप वाचला नसेल तर जरुर वाचावा. http://www.loksatta.com/sampadkiya-news/emotion-get-hurt-271325/ शीर्षक : दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार? थोडे अंश खाली चोप्य पस्ते करत आहे: एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय? सात शेपटय़ांचा उंदीर असे म्हणून चिडविला जाणारा उंदीर एकेक शेपटी कापत जातो. एक शेपटी उरल्यावर त्याला 'एक शेपटीचा उंदीर' म्हणूनही चिडविले जातेच. खरे तर एक शेपटीचा म्हणजे नॉर्मल! पण हा तीही कापतो!! ही गोष्ट, 'चिडवून घेण्यात' मुख्य दोष आहे, हे शिकविते. आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे? जिच्यावर झुंडशाहीचा हल्ला होतो, ती व्यक्ती भावना दुखावण्याच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही गुन्हय़ात दोषी होती की नव्हती, हा मुद्दाच गरलागू आहे. कोणत्याही कथित अपराध्याला शासन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहिला पाहिजे. अगदी 'रेडहॅण्ड' सापडलेल्या 'पाकीटमारा'ला जमावाने मारहाण करणे हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा आणि पाकीटमाराच्या नागरी अधिकाराचा भंग करणेच ठरते. 'रेडहॅण्ड' पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दंडार्हता तुम्हाला 'साक्षात' असेल, पण तुम्ही दंडाधिकारी नाही आहात, हे कसे विसरता? ज्या क्षणी आपण ग्रस्तता ही गोष्ट 'समूहाला' बहाल करतो, त्या क्षणी आपण झुंडशाहीला अधिमान्यता देत असतो. कायदा असा हवा की, उदाहरणार्थ समजा मला कोणी जन्मावरून 'भटुरडय़ा' म्हटले तर म्हणणाऱ्याला काहीही शिक्षा नको, पण मी जर 'ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या गेल्या' असे म्हटले, तर मला शिक्षा झाली पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ प्रोव्होकेटिव्ह पब्लिक क्लेिमग ऑफ कम्युनल इन्सल्ट अ‍ॅक्ट! याने टवाळखोरी वाढेल की काय अशी चिंता वाटेल, पण मुद्दा आहे तो, टवाळखोरी 'गंभीर'पणे न घ्यायला शिकण्याचा, दुखरेपणा घालवायचा आणि खोडसाळपणाच्या उपद्रवमूल्यातली हवा काढून टाकण्याचा! सर्व विचार सर्वांना पटतील असं नाही, पण मांडणी लाजवाब आहे.

आपण इतरांच्या हातातील बाहुले बनत जात असतो याचे भान ठेवायला हवे. मागच्या १० दिवसामध्ये हजारो गाड्यांच्या काचा फुटल्या, दोन समाजात तेढ निर्माण झाली, काही लोक भयाच्या सावलीत जगत होते याचा विचार करता स्वप्रबोधन हाच खरा मार्ग आहे.

@पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?>>> काही दिवसापूर्वीच हा अनुभव आला. फेसबुकावर भूत नावाचा एक ग्रुप आहे.तिथे मी भूत बनविण्याची पाककृती नावाचा छोटा लेख टाकला. त्याच्यावर काहि वेळातच परित्राणाय साधूनाम नावाचा एक पेज धारक(आय.डी.) येऊन वाट्टेल तसं आणि वाट्टेल ते बरळू लागला.माझं लेखन मार्मिक आणि प्रबोधनात्मक अंगानी जाणारं होतं.त्यात कोणत्याही विशिष्ट धर्माचा अपमान इत्यादी काहिही नव्हता. तरी त्यानी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. कारण त्यात सनातन कल्पनांची मी रेवडी उडवली होती..(किंबहुना ज्यांनी हल्ला केला,तसल्याच दुष्प्रवृतीं विरोधात जाणारी मत त्यात होती..ते एष धर्मः तन्नातन्नः वाले होते! हे निश्चित ) मी ही प्रतिवाद करत होतो. पण अ‍ॅडमिननी त्याला सुनावण्या ऐवजी सदर पोस्टच डिलिट केली(नंतर त्या सर्व कोल्ह्यांन्नी मिळून,तिथे माझ्यासारख्याला खिजवता येइल अशी पोस्ट टाकून बराच राग शमवून घेतला..आणि ती पोस्ट मात्र राहिलीच!) शेवट मीच त्या ग्रुपला त्याच्या एडमिन सह समजून घेतले..आणि त्यांन्ना त्यांच्या भयाण भवितव्यावर सोडून दिले. :)

बदनामी सगळेच करत असतात. कोण गान्धीन्ची करतो , कोण शिवाजीन्ची. व्यक्ती आनी पaddhat यात फरक आसाटॉ.

एका खासगी बसवरील दगडफेकीत डोक्याला दगड लागून जखमी झालेली प्रवासी वसंत रूपनर (वय ४०, रा. सांगोला) नावाची व्यक्ती कोमामध्ये गेली आहे असे वृत्त आहे. संदर्भ: १. दैनिक लोक्सत्ता ९ जून २०१४ २. पुणे मिरर Jun 9, 2014, ३. इंडीयन एक्सप्रेस June 9, 2014

ह्यासमस्येला एक जालीम उपाय आहे ... कोणाला महापुरुष म्हणुच नको ... सगळे तुमच्या आमच्या सारखे सामान्यच होते हो *pleasantry*

अस्मितांची गळवे आधीच नाजुक होती. आता तर बघायला नको, त्यांना धक्का लावला नाही तरी कधी फुटतील नेम राहिलेला नाही! :(

आपली सहनशीलता संपत चालली आहे. यात राजनीती ही असू शकते. पण ज्या देशात चार्वाकला ही ऋषीचा दर्जा मिळाला आहे. तिथे निंदा नालस्ती सहन करण्याची शक्ती का हरवली याचा विचार करणे गरजेचे आहे. कबीरदास यांनी म्हंटलेले आहे, निंदा करणार्याची झोपडी घराचा शेजारी असलेली बरी. त्या वेळी देशात प्रचलित असलेल्या हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मांच्या आडंबरांचा विरोध केला, त्यांची भाषा ही कडक होती तरी ही त्यांना आपल्या विचारांचा प्रचार करण्याची मुभा होती. दोन्ही धर्मावालंबी त्यांना संत मानतात. कुठल्या ही व्यक्तीचे किंवा धर्माचे आपल्या परीने विश्लेषण करण्याची स्वतंत्रता असली पाहिजे. तालिबान प्रमाणे आपण ही धर्मांधतेने वागू लागलो तर देशाचे तीन तेरा व्हायला उशीर लागणार नाही.


In reply to by राजेश घासकडवी

ही कारवाई कुणाच्या अख्त्यारीत झाली? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आणीबाणी घोषित करुन तमाम राज्यांची सूत्रे (अजून तरी) हातात घेतलेली नाहीत. पोलिस खाते हे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारच्या हाताखाली असते तेव्हा आपल्या उचंबळून येणार्‍या भावनांना काबूत ठेवा. थोडा धीर धरा. लवकरच मोदी भारताचे हुकुमशहा बनतील आणि आपला धर्मांध चेहरा दाखवतील मग तुम्हाला रान मोकळे होईल. चिंता नसावी!

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी, आपण दिलेले शिर्षक वाचुन कोणालाही त्या विद्ध्यार्थ्यांची/प्राचर्यांची खरोखर किव येइल हो! आपल्या दुर्दैवाने व आपली इच्छा नसतांना मोदी आता पंतप्रधान झाले आहेत. आता तरी घास गोड मानुन खा. किती दिवस दुस्वास करणार? मोदींचा फोटो केवळ इतर नकारात्मक चेहेऱ्यांच्या रांगेत छापला म्हणून नव्हे तर आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. देव आपले व त्या नादान विद्द्यार्थ्यांचेही भले करो.

In reply to by आयुर्हित

नाही तर काय? देशाच्या पंतप्रधानाबद्द्ल वाट्टेल ते कसं लिहू शकतं कुणी? स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी म्हणूनच ते मासिक जाळले. साधी गोष्ट आहे.

In reply to by आयुर्हित

आपली भारताच्या पंतप्रधानंबद्दल संकुचीत मानसिकता व अल्पबुद्धि दाखविल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
संकुचित मानसिकता आणि अल्पबुद्धि हा गुन्हा! अईशप्पथ, खरंच अच्छे दिन आले आहेत भारतात! पण आपल्या न्यायव्यवस्थेवर अतिरेकी ताण येईल याची काळजी वाटते. असो, ही बातमी देण्याचं कारण म्हणजे केवळ ऑनलाइनच नव्हे, तर छापील मीडियातही भक्तांच्या भावना किती चटकन दुखावल्या जातात हे लेखाच्या मूळ मुद्द्याशी सुसंगत विधान करायचं होतं. पण असं विधान करणं म्हणजेही न सहन होणारी टीका अनेकांना वाटते, त्याला काय करणार? चालूद्यात.

In reply to by राजेश घासकडवी

मोदींविरुद्ध वादग्रस्त लिहिलेल्या गोष्टीवर बंदी घालणारे त्यांचे भक्त हे आपण कसे ठरवले? केरळातील पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर ती त्या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली. केरळात आपले लाडके काँग्रेसचे सरकार आहे. तेव्हा जो दोष द्यायचा तो खुल्या दिलाने काँग्रेसला द्यावा. ह्या लेखावरील बंदीमागे मोदी समर्थक आहेत असे कुठेही दिसत नाही. आपल्या दिव्य (की पूर्वग्रहदूषित) दृष्टीलाच ते दिसतात असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. आणि तो आपण दामटून, खोटेनाटे सांगून लोकांच्या गळी उतरवत आहात ह्याचा राग आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अरे, अरे ! केरळमध्ये भाजप चे सरकार निवडून आलेसुद्धा !!!??? की आणीबाणी जाहीर करून कायदे बदलून दिल्लीतल्या सरकारने सगळ्या राज्यातील पोलिसदले ताब्यात घेतली ???!!! =)) , =)) , =)) (काल झोपी जाण्यापूर्वीपर्यंत पोलीस हा राज्यांच्या ताब्यातला विषय असल्याचे ऐकून होतो !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या बातमीनुसार तक्रार भाजपच्या युवा मोर्चाने केली आहे. करणारच! भाजपाच्या मुख्य नेत्यावर टीका करणे सोपे नाही, हे सगळ्यांना समजावण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कोणीही सोम्यागोम्या उद्या टीका करायचा. भाजपा कार्यकर्यांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे.

In reply to by भृशुंडी

भारतीय दंड विधानाच्या १५३ वे कलम हे पोलीसांनी लावले. हे कलम "Provoking with the intend to create rioting" साठीचे आहे. भाजपाच्या युवा मोर्चाने (मोदी विरोधकांना अपेक्षित असलेली) दंगल करण्याऐवजी दंगलीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीबद्दल प्रस्थापित कायद्यानुसार तक्रार केली. त्यात काही गैर दिसत नाही. तुम्हाला नक्की काय चुकीचे वाटते आहे? मला स्वतःला असल्या कारणावरून (कुठल्याही पुस्तक/लेख/विचारांवर) बंदी, अटक अथवा दंगल काहीच घडू नये असे वाटते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. दंगली घडवण्याच्या उद्देशानेच हे घडते. त्यामुळे, जो पर्यंत खोडसाळपणे हिंसेला उद्युक्त करणार्‍या घटना घडत असतील तेथे बंदी नाही पण असे खोडसाळपणा करणार्‍यांना अटक जरूर करावी आणि कायद्याप्रमाणे शिक्षा करावी असे नक्की वाटते.

In reply to by विकास

महाविद्यालयातील एका मासिकात व्यक्त केलेली मते दंगल घडवण्यासाठी असतील, असं वाटत नाही. काहीशी चुकीची तुलना होती- नक्कीच. या इतर अनेक मान्यवरांमध्ये जॉर्ज बुशसाहेबही होते! पण त्या प्रमादासाठीच्या शिक्षेचे प्रमाण म्हणजे अटक (प्राचार्यांनादेखील) काहीच्या काही आहे. तथापि भाजपाच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी दंगल किंवा गेला बाजार शिवसेनेची ट्रेडमार्क असलेली जाळपोळ, दगडफेक केली नाही, आणि निव्वळ तक्रार केली - याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन. ह्याच उद्या समजा एखाद्या महाविद्यालयीन हस्तलिखित अनियतकालिकात मोदी-उमा भारती यांची व्यंगचित्रे जर खोमेनी-KKK ह्यांबरोबर आली तर काय होईल ते बघणं ईंटरेस्टिंग असेल.

In reply to by भृशुंडी

म्हणूनच म्हणले की मला बंदी हा प्रकार मान्यच नाही. पण "भावना दुखावल्या" ह्या नावाखाली बंदी घातली जाते तसेच "भावना भडकवल्या" म्हणून कायदा वापरला जाऊ शकतो. तसे बघायचे गेले तर असे कायदे वापरणे हे मला वाटते भाजपावाले डाव्या आणि स्युडो विचारवंतांकडूनच शिकले असावेत. म्हणूनच फार कमी वेळा वापरला गेलेला एक अमेरीकन विचित्र कायदा या असल्या भारतीय वंशांच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या संघटनांनी मोदींविरुद्ध वापरून त्यांचा व्हिसा रद्द करायला लावला होता.

In reply to by विकास

मोदींविरुद्ध काही केले की लोकशाहीची बूज राखणे असते हे आपल्यासारख्या अनेक मिपा कारकीर्दी पाहिलेल्या मिपाकरास ठाऊक नाही, हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वगैरे :D

हा भावना हा प्रकार कमालीचा व्हल्नरेबल होत चाललाय आजकाल. आणि कशाला किती महत्व द्यायचं हे कळलंय का कधी आपल्याला? कुणी थोर व्यक्ती म्हणून गेला की `व्हॉट्स इन अ नेम' .... आपण नेम तर सोडाच त्यापाठची बिरुदं नी असल्या गोष्टींनाही डोंगराइतकं महत्व देतो. विचार, कार्य हे बाजूलाच पडतं नेहमी.

हा भावना हा प्रकार फारच व्हल्नरेबल झालाय आजकाल. कशाने दुखावतील नेम नाही. महत्व कशाला द्यावं कशाला नाही हे तर आपल्याला कळतच नाही.

In reply to by वेल्लाभट

सहमत. मला वाटतं एकदा होळीच्या निमित्ताने सगळ्या (सर्व जाती, भाषा, धर्म, विचार, इत्यादीच्या) ह्या "भावना विवश" पब्लीकला एकत्र करावे आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक्मेकांविरुद्ध नुसते ठणाणा बोंबलायला लावावे. एकदा का असे ऐकून कान आणि डोके बधीर झाले की मग भावना दुखावणे बंद होईल अशी एक वेडी आशा...

In reply to by विकास

एकदम बराबर बोल्या तुम! भावना दुखावल्या जाण्यावर अक्सीर इलाज!

लुव्र संग्राहलयाच्या धर्तीवर एक मोठ्ठे गोडावुन बांधुन त्यात भारतात असणारे सगळे पुतळे/पुतळी, फ्लेक्स हलवावे. आणी ज्यांचे अस्मितांचे गळवे हळवे आहेत त्यांना तिथे जावुन दर्शन घ्यायला लावावे आणी त्यासाठी जबरदस्त तिकीटही लावावे. असेल प्रेम आस्था तर जातील तिथे आणी पुतळा विटंबना वगैरे प्रकार बंद होतील.

http://www.loksatta.com/pune-news/vinod-tavde-promises-to-make-cyber-la… संतांविरुद्ध लिहिण्याला प्रतिबंध करणारा कायदा बनवण्याचा प्रस्ताव विनोद तावड्यांनी मांडला आहे. वरवर बरा वाटणारा हा प्रस्ताव म्हणजे एक निसरडी वाट आहे. त्या वाटेने जाणारा उत्तरोत्तर घसरतच जाणार. संत कोणाला म्हणायचे, टीका कुठे संपते आणि बदनामी कुठे सुरु होते, श्रद्धेला पोचणारी ठेच मोजण्याचा काही व्यक्तीनिरपेक्ष मापदंड आहे का. अनेक मुद्दे आहेत. असल्या कायद्यांचा ब्ल्याकमेलिंगकरता, पैसे उकळण्याकरता पोलिसांकडून व अन्य समाजकंटकांकडून होण्याची शक्यता आहे. कुणी पंढरपूरच्या वारीत आढळणार्‍या अस्वच्छतेविरुद्ध नाक मुरडले तर त्याला तुकाराम वा ज्ञानेश्वरांविषयीची बदनामी म्हणून बोंबाबोंब होऊ शकते. असली घातक आश्वासने पूर्ण केली नाहीत तर समाजावर मोठे उपकार होतील.