Skip to main content

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38066
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

भारतात ८१ कोटींपेक्षा जास्त मतदार असून, २०१४ची निवडणूक ही जगातील सर्वांत जास्त मतदारांनी भाग घेतलेली निवडणूक ठरली आहे. भारतीय जनता सध्या आपल्या १६व्या लोकसभेसाठी ५४३ खासदार निवडण्यात गुंतलेली आहे. ७ एप्रिलला सुरू झालेले हे मतदान नऊ टप्प्यांनंतर १२ मे रोजी संपेल व त्यानंतर १६मे रोजी मतमोजणी सुरू होऊन बहुदा त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत भारतीयांना आपला पुढील पाच वर्षांसाठीचा भाग्यविधाता कोण आहे हे कळेल. आपली ही पाच आठवडे चालणारी निवडणूक जगातली सर्वात जास्त कालावधी घेणारी आणि आतापर्यंतच्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा जास्त खर्चिक निवडणूक आहे. ३५०० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार असून, त्यात सुरक्षेवर होणारा खर्च धरलेला नाही. शिवाय विविध राजकीय पक्ष ३००० कोटी खर्च करतील, असा अंदाज आहे. हा खर्च २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूक खर्चाच्या तिप्पट असणार आहे. अमेरिकेने गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केलेल्या ७०० कोटी डॉलर्सच्या खर्चाच्या (४२०० कोटी रुपये) तुलनेत आपला दुसरा क्रमांक लागतो! १५ व्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असून, त्या आधी नव्या सरकारचा शपथविधी करविण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. आजच्या तारखेच्या परिस्थितीनुसार बहुतेक सर्व समीक्षकांचे, संख्याशास्त्रज्ञांचे व वेगवेगळ्या मतचांचण्या घेतलेल्यांचे एकमत आहे की या वेळी नरेंद्र मोदी विजयी होण्याची दाट शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान होऊ घातलेले मोदी आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन (१९८१ ते १९८९) यांच्यात बर्‍याच बाबीत साम्य दिसून येते. दोघांचा जन्म-खास करून मोदींचा-कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात झाला. रेगन व मोदी हे दोघेही राज्यपातळीवर तुफान लोकप्रिय व यशस्वी नेते ठरले आहेत. रेगन कॅलिफोर्नियाचे अधिशासक (गव्हर्नर)[१] होते तर मोदी गेली १२ वर्षें महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. १९११ साली जन्मलेले रेगन वयाच्या ६९ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झाले तर १९५० साली जन्मलेले मोदी विजयी झाल्यास वयाच्या ६४ व्या वर्षी आपले पंतप्रधान होतील. रेगन यांच्याप्रमाणेच मोदीही आपल्या 'मोदीनॉमिक्स' या मुक्त व्यापारव्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेचे आणि भ्रष्टाचारविरोधी सुधारणांचे उघड, खंदे पुरस्कर्ते आहेत. रेगन यांच्या 'रेगनॉमिक्स' या संज्ञेची आठवण करून देणार्‍या 'मोदीनॉमिक्स'ने (मोदींच्या आर्थिक धोरणाने) गुजरातची आर्थिक भरभराट घडवून आणलेली आहे! काही बाबतीत ते वेगळेही आहेत. उदा. रेगन यांनी पूर्वी हॉलीवूडच्या Love in the Air, Dark Victory, Knute Rockne, All American[२] व King's Row अशा सुमारे वीस चित्रपटांत नायकाच्या भूमिका केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा 'ग्लॅमर' आहे जो मोदींच्या व्यक्तिमत्वात दिसत नाही, पण त्यांचे व्यक्तिमत्व काही इतर स्वभावविशेषांमुळे भारतीय जनतेला भावले आहे. रेगन यांनी जेन वायमनशी व तिच्याबरोबर घटस्फोट झाल्यावर नॅन्सी डेव्हिसशी अशी दोन लग्ने केली, याउलट मोदींचा जरी जशोदाबेन यांच्याशी विवाह झालेला असला तरी त्यांनी रा.स्व.संघाच्या कार्याला वाहून घेतल्यामुळे वैवाहिक जीवनाकडे पाठ फिरविली होती. रेगन रोज जास्त तास काम करणार्‍यातले नव्हते. ते रोज रात्री ८ तास झोप घेत व त्यांना अर्ध्या रात्रीत कुणी उठवले नाही. एकदा आपल्या सहकार्‍यांना आपल्या धोरणाचे ठळक मुद्दे नीट समजावून सांगितले की त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ते त्या त्या सहकार्‍यावर सोडत असत. या उलट मोदी रोज १६ तास आपल्या कार्यालयात कार्यमग्न असतात. रेगन व मोदी यांच्या टीकाकारांमध्येही खूप साम्य आहे. अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगन यांचा जसा तिटकारा करत असे अगदी तस्साच तिटकारा भारतातील आचार-विचाराने स्वत:ला उच्चभ्रू समजणारा वर्ग मोदींचा करतो[३]. एकेकाळी चहा विकणार्‍या व धड इंग्लिश बोलू न शकणार्‍या मोदींकडे ही मंडळी तुच्छतेने बघतात. (जणू काही रशियाचे सर्वेसर्वा पुतिन आणि चीनचे सर्वेसर्वा शी चिनपिंग (Xi Jinping) 'फाडफाड' इंग्लिश बोलतात!) रेगन निवडून आल्यास कसा हाहाकार उडेल याबद्दलची एक यादी (आणि घोर ताकीदही) त्यांच्या टीकाकारांनी अमेरिकन जनतेला दिली होती, आपल्याकडेही आपले मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जानेवारी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून दिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रकारपरिषदेत सांगितले की भाजपने पंतप्रधानपदासाठी निवडलेले उमेदवार नरेंद्र मोदी जर खरोखरच पंतप्रधान झाले तर भारताच्या दृष्टीने तो एक अनर्थ ठरेल. पण जसा रेगन यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत राष्ट्रसंघाचा पाडाव झाला तसाच चमत्कार चीन-पाकिस्तानच्या संदर्भात मोदींच्या हातूनही घडो अशीच आशा त्यांच्या भारतीय समर्थकांना आहे. हा अमेरिकन उच्चभ्रू वर्ग रेगनना 'वर्णद्वेष्टा'ही मानत असे. कंबरडं मोडणार्‍या, संख्येने प्रचंड होत जाणार्‍या सरकारी नोकरशाहीऐवजी तगड्या, धडधाकट व वाढत्या व्यापारावर विसंबणार्‍या अर्थव्यवस्थेवर विश्वसणार्‍या व्यक्तींना समाजवादाकडे झुकणारा उच्चभ्रू वर्ग सर्वसाधारणपणे 'वर्णद्वेष्टा' ही संज्ञा वापरतो. उलट अशी अर्थव्यवस्थाच गरीबांची आणि अल्पसंख्याकांची उन्नती करण्याचा उत्तम मार्ग आहे, असे रेगन आणि मोदी मानतात.[४] प्रचंड संख्येची सरकारी नोकरशाही वैयक्तिक व उद्योगशहांच्या लोभी वृत्तीमुळे व एकमेकांच्या क्षेत्रांत हस्तक्षेप केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फैलावण्यास पोषक ठरते व शेवटी अशी नोकरशाही कुठल्याही समस्येचा उलगडा करण्यात असमर्थ ठरते असे रेगन समजत. मोदींचाही भर शासनापेक्षा सुशासनावरच आहे. गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव असाच आहे. मोदींचे टीकाकार स्वाभिमानी हिंदूधर्मीय असलेल्या मोदींनाही वर्णद्वेष्टे समजतात. ही संज्ञा जशी रेगनना लागू पडत नव्हती, तशीच ती मोदींनाही लागू पडत नाही. या संज्ञेचा दुरुपयोग मोदींचे राजकीय विरोधक अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी व त्यातून अल्पसंख्याकांचे अनुमोदन स्वत:कडे खेचण्यासाठी करतात. गुजरातेत हिंदू यात्रेकरूंना नेणार्‍या रेल्वेला लावलेल्या आगीत ६० लोक मृत्यू पावले. या जाळपोळीला मुस्लिम दंगलखोर जबाबदार होते हे कानावर आल्यावर मुस्लिमविरोधी उग्र दंगल उसळली आणि त्यात शेकडो लोक बळी पडले. मोदींच्या कारकीर्दीवर २००२ सालच्या या मृत्यूंचे सावट पडलेले आहे. दंगलीत सापडलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी संचारबंदी पुकारणे, लष्कराला पाचारण करणे व दंगलखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देणे यासारखी अनेक पावले दंगल आटोक्यात आणण्यासाठी मोदींनी उचलली. तरीही त्यांच्यावर दंगलीपासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय न योजल्याचेच नव्हे तर दंगलींकडे काणाडोळा केल्याचेही आरोप त्यांच्या विरोधकांनी केले आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एका खास अन्वेषण गटाची (SIT) स्थापना केली. या गटाच्या अन्वेषणातून मोदींविरुद्धचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे उघडकीस आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे जाहीर केले. मोदींच्या राजकीय विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविरुद्धची चारित्र्यहननाची व वर्णद्वेष्टे म्हणण्याची मोहीम (आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थही) सुरूच ठेवला आहे.
भारतात इतर धर्म स्थापले जाऊन त्यांची भरभराट झालेली आहे हे भारतीय हिंदू बहुसंख्यांकांच्या सहिष्णुतेला मिळालेले प्रमाणपत्रच आहे.
याउलट शेजारच्या पाकिस्तानात व बांगलादेशात तेथील मुस्लिम बहुसंख्यांकांच्या मतांनुसार न वागल्यास तेथील अल्पसंख्यांकाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे व त्या कशाबशा जिवंत आहेत. अल्पसंख्यांकांबाबत असहिष्णू असल्याचे बिनपुराव्याचे आरोप मोदींवर करताना ते दक्षिण आशियातील चालू परिस्थितीतील प्रमाणांकडे दुर्लक्ष करून बोलत असतात. पाकिस्तानप्रणीत दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण स्वीकारण्याचे आश्वासन मोदींनी दिलेले आहे. हे अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत आहे. मुस्लिम दहशतवादी जगातील सर्व बिगर-मुस्लिम राष्ट्रांबरोबर लढत आहेत. त्यात थायलंडमधील बुद्धधर्मीय आले, नायजेरिया, फिलिपीन्स, चेचन्या, सायप्रस, कोसोवो, बोस्निया, मॅसेडोनिया, आयव्हरी कोस्ट, सुदान (व पूर्वी इंडोनेशियाचा भाग असलेल्या) लेस्ते-तिमूर या देशांतील ख्रिश्चनधर्मीय आले, इस्रायलमधील ज्यूधर्मीय आले, संपूर्ण मुस्लिम जगतातील अल्पसंख्यांक आले व शेवटी 'दहशतवादाविरुद्धच्या युद्धा'च्या आघाडीवर असलेल्या भारतातील बहुसंख्यांक हिंदूही आले. मोदींचा पाकिस्तानविरुद्धच्या खंबीर पवित्रा रेगन यांच्या सोवियेत संघराज्याविरुद्धच्या खंबीर पवित्र्याची आठवण करून देतो व म्हणून मोदींना अमेरिकेने स्वाभाविक मित्र मानणे अमेरिकेच्या हिताचे आहे. मोदी जर खरोखर भारताचे पंतप्रधान झाले तर तो भारताच्या राजकारणातील एका महत्वाच्या बदलाचे निदर्शक ठरेल. पंतप्रधानपदासाठी मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत नेहरू-गांधी 'राजघराण्या'चे वंशज राहुल गांधी. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या घराण्याने भारतावर थोडा काळ सोडला तर सातत्याने राज्य केलेले आहे. इटलीत जन्मलेल्या आणि भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींच्या पत्नी व राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी सध्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आहेत. राजीव गांधी इंदिरा गांधींचे सुपुत्र आणि भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे नातू होत. या सर्व गांधी कुटुंबियांचा महात्मा गांधींशी कांहीच संबंध नाहीं. इंदिरा गांधींनी ज्या गृहस्थाशी लग्न केले त्याने आपले मूळ आडनाव बदलून गांधी ठेवून घेतले आणि पहाता-पहाता या 'गांधी' नावाने जणू जादूच केली आणि ते कायमचे 'नेहरू' या राजवंशाला जोडले गेले. नेहरू राजवंशाच्या (आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या) कारकीर्दीत भारत आपल्या खर्‍याखुर्‍या आर्थिक क्षमतेची पातळी कधी गाठूच शकलेला नाही! याचे कारण आहे काँग्रेस पक्षाचे पक्षपाती, भ्रष्ट, बेगडी समाजवादी धोरण! बर्‍याच लोकांना असे वाटते की 'मोदीनॉमिक्स'मुळे भारताची स्वाभाविक उद्योजकता तिच्या बंधनांतून मुक्त होऊन तिच्यात एक नवा जोश उत्पन्न होईल व त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती उंच भरार्‍या मारू लागेल. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला गुजरातचा आर्थिक विकास सर्व विभागांना-खास करून गरीबांना[५]- एक वरदान ठरला आहे. हा भक्कम पुरावा भविष्यकाळातील भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने आशादायक आहे. अमेरिकेतील काही वर्तुळांतील मंडळींनी मोदींना जणू वाळीतच टाकलेले आहे. अशाच अमेरिकन मंडळींनी एके काळी रेगन यांनाही वाळीत टाकले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील नोकरशहांमध्ये खूप आधीपासून डाव्या विचारसरणीच्या उच्चभ्रूंचा प्रभाव व वर्चस्व आहे. आणि हा उच्चभ्रू गट आजपर्यंत मोदींना अमेरिकेला भेट देण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा नाकारत आलेला आहे. मोदींवर आग पाखडणारे प्रमुख टीकाकार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहाचे सदस्य कीथ एलीसन. यांनी काही लोकांना हाताशी धरून मोदींना अमेरिकेचा व्हिसा अद्यापपर्यंत तरी यशस्वीपणे नाकारलेला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात अमेरिकेला भेट देण्याचे टाळावे, असे मला वाटते. आजच्या जागतिक राजकीय पटावर आशिया खंडाचे वाढते महत्व व तेथील चीनचा वाढता प्रभाव पहाता आज तरी अमेरिकेला भारताची जास्त गरज आहे व त्यादृष्टीने हे धोरण चांगलेच ठरेल, असे मला वाटते. अर्थक्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप, आपल्या पित्त्यांना पक्षपात करून सवलती देणाचे प्रकार, भ्रष्टाचार अशा गोष्टींना प्रखर विरोध करणार्‍या मोदींची धोरणे रेगन यांच्या धोरणांशी खूप मिळती-जुळती आहेत. थोडक्यात असे दिसते की भारताला आपले 'देसी' रेगन सापडलेले आहेत! या उलट आपल्या चुकीच्या धोरणांमुळे नोकरशाहीच्या भाराखाली वाकलेल्या अमेरिकेला स्वत:चा 'अमेरिकन मोदी' शोधावा लागणार आहे काय? रेगन यांच्याबद्दल बरेच लोक म्हणतात की ते एक आदर्श किंवा परिपूर्ण व्यक्ती कधीच नव्हते व त्यांनी खूप चुकाही केल्या. पण ट्रूमनपासून तो ओबामापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षात जर कुणी एका राष्ट्राध्यक्षाने अमेरिकन जनतेला ते अमेरिकन असल्याबद्दल व अमेरिकन राष्ट्राबद्दल अभिमान वाटू दिला असेल तर तो रेगन यांनीच. मला खात्री आहे की मोदींच्या कारकीर्दीनंतर भारतीयांनाही असेच वाटेल. रेगन यांच्याप्रमाणे मोदीही उपजत लोकनायक आहेत. रेगन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे अनेक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (सिनेटर्स व प्रतिनिधीगृहाचे सभासद) “रेगन डेमोक्रॅट्स” म्हणवून घेऊ लागले. मोदी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार-खासदार स्वत:ला “मोदी काँग्रेसजन” म्हणवून घेऊ लागले तर त्यात नवल वाटायला नको! टिपा व संदर्भ: [१] राज्यपाल हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही [२] या चित्रपटात त्यांनी जॉर्ज “द गिप्पर” गिप या सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे काम केले होते व त्यामुळे त्यांना 'गिप्पर (Gipper)' असे टोपणनावही पडले. [३] अमेरिकेत आहेत की नाहीत माहीत नाही, पण गोर्‍या लोकांच्या, खास करून ब्रिटिशांच्या, होकाराने धन्य पावणारे उच्चभ्रू भारतात आजही आहेत. आयुर्वेद श्रेष्ठ आहे हे पटविण्यासाठी आजही आपल्यातले काही ढुढ्ढाचार्य गोर्‍या लोकांनी आयुर्वेदाला दिलेले प्रशस्तीपत्रक वापरताना आपण पाहतोच ना? [४] जसे मोदी “शासन कमी, पण सुशासन हवे” यावर भर देतात तसेच रेगनही म्हणायचे की सरकार हे कुठल्याही समस्येवरचा उतारा नाही, उलट सरकारचे फाजील अस्तित्वच एक समस्या आहे. (In this present crisis, government is not the solution to our problem; government is the problem.) अर्थात हे अगदी टोकाची भूमिका झाली कारण या विधानाने अमेरिकन जनतेची दिशाभूल झाली व ते आता आपल्या सरकारलाच शत्रू मानू लागले आहेत असे मानणारेही अमेरिकन आहेत. सरकार कधी-कधी समस्या असू शकते पण सरकार हीच एक समस्या आहे असे नाही. व्यक्तींमध्ये व भांडवलशहांमध्ये राजकीय भांडणे लावणारी लोभी वृत्तीच समस्या बनू शकते व मग सरकार कुठलीही समस्या सोडवायला असमर्थ बनते हा गेल्या दहा वर्षांतला policy paralysis च्या रूपाने दिसणारा आपलाही अनुभव आहेच. [५] मोदींनी प्रथमच जाती-धर्माचा उपयोग न करता आर्थिक विकास व सुशासन या मुद्द्यांवर निवडणूक लढविल्यामुळे नेहमीचे मुद्दे वापरता येईनासे झाले, म्हणूनच की काय, पण गुजरातचा आर्थिक विकास हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. तो गरीबांनाही कसा एक वरदान ठरला आहे हे 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित झालेल्या खालील लेखात वाचता येईल.Gujarat’s inclusive growth BLOG : स्वत:चा 'रेगन' निवडायला निघालेले भारतीय मतदार! - लेखक-संकलक : सुधीर काळे Monday, April 28, 2014

पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदीच होणार येर्‍या गबाळ्याचे ते काम नोहे !

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच भाजप हा सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचे भाकीत बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी वर्तविले. तसेच कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसून, काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

In reply to by आशु जोग

जर मोदी पंप्र नै झाले तर भाजपाचे अन भाजपसमर्थकांचे काय होणार अशी काळजी वाटते. त्याचबरोबर, मोदी पंप्र झाले तर त्यांच्या विरोधकांचे काय होणार अशीही काळजी वाटते. वरीलपैकी कुठलीही काळजी ही जीवितहानी इ.इ. च्या दृष्टिकोनातली नव्हे, तर यांना पाहिजे ते न झाल्यावर ते जसे फ्रस्ट होतील त्यामुळे यांना नवा विषय कधी अन कसा मिळणार या परम कारुणिक भूतदयेतून आलेल्या विचारापोटीची आहे.

In reply to by बॅटमॅन

जर सरकार भाजपाचे आले पण पंप्र मोदी ना होता दुसरे कोणी झाले तर कोण कसे फ्रस्टेट होतील, असा अंदाज आहे?

In reply to by सुनील

गीतेतील भगवान श्रीकृष्णाचा उपदेश: कर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि। 2.47 You have a right to perform your prescribed action, but you are not entitled to the fruits of your action. Never consider yourself the cause of the results your activities, and never be associated to not doing your duty. कर्म करना तो तुम्हारा अधिकार है, लेकिन उसके फल पर कभी नहीं| कर्म को फल की इच्छा से कभी मत करो, तथा तेरा कर्म ना करने में भी कोई आसक्ति न हो|

In reply to by सुनील

>>> जर सरकार भाजपाचे आले पण पंप्र मोदी ना होता दुसरे कोणी झाले तर कोण कसे फ्रस्टेट होतील, असा अंदाज आहे? १६ मे नंतर खालील शक्यता आहेत. (१) रालोआला पूर्ण बहुमत व मोदी पंतप्रधान (२) संपुआला पूर्ण बहुमत व पप्पू किंवा अजून कोणतरी काँग्रेसवाला पंतप्रधान. (३) रालोआ सर्वात मोठा गट पण बहुमत नाही. मोदींना पाठिंबा द्यायला इतर पक्ष तयार नाहीत किंवा मोदी स्वतःहूनच पंतप्रधानाच्या शर्यतीतून बाहेर. अडवाणी, सुषमा स्वराज, जेटली किंवा राजनाथ सिंग इतर पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान. (४) संपुआ सर्वात मोठा गट पण बहुमत नाही. पप्पू, सुशीलकुमार शिंदे, चिद्दू किंवा मीराकुमार इतर पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान. (५) संपुआच्या पाठिंब्यावर तिसर्‍या आघाडीचे सरकार (६) कोणालाच बहुमत नसल्याने कोणीच सरकार बनविण्यास उत्सुक नाही. त्यामुळे लोकसभा स्थगित ठेवून काही महिन्यांनी परत निवडणुक. यापैकी पर्याय (६) ची शक्यता अत्यल्प वाटते. पर्याय २ अजिबात नको. ४ व ५ पण नको. पर्याय १ ला सर्वाधिक पसंती. पण पर्याय ३ सुद्धा चालेल. काँग्रेसमुक्त भारत हे मुख्य व एकमेव ध्येय आहे. त्यामुळे मोदी किंवा भाजपाचे अजून कोणीही पंतप्रधान झाले तरी चालेल. मोदी पंतप्रधान न होता भाजपचा दुसराच कोणतरी पंतप्रधान झाला तरी चालेल. मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर फ्रस्ट्रेशन वगैरे काही येणार नाही. काँग्रेसमुक्त भारत ध्येय साध्य होत असेल तर भाजपचा कोणीही पंतप्रधान चालेल. परंतु काँग्रेस परत सत्तेवर येणार असेल किंवा सत्तास्थापनेत काँग्रेसचा पाठिंबा असेल तर मात्र नक्कीच नैराश्य येईल.

In reply to by शिद

नाहीतर 'अबकी' च्या ऐवजी 'अगली' बार चा नारा लावायचा. हा हा हा! मस्त! किमान ते पुढचे पाच वर्ष ऐकायची कटकट नको म्हणून तरी मोदी विरोधक एकत्र येऊन मोदींना पंतप्रधान करतील!

टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नावलीला ई-मेलद्वारे दिलेल्या उत्तरांत मोदी यांनी भाजपची सद्यस्थिती, काँग्रेसचे भवितव्य, प्रियांका-राहुलची टीका तसेच त्यांच्यावरील विविध आरोपांना प्रत्युत्तर दिले. .......... प्रश्नः २००४ सालाप्रमाणेच विजय भाजपचाच, असा पक्षात आत्मविश्वास आहे. अनेक नेत्यांनी तर आधीच मंत्रिपदांचे वाटप करून घेतले आहे. इतका विश्वास कशामुळे आलाय? >> माझ्या काही सभांना जरी तुम्ही उपस्थिती लावली असती, तर हा प्रश्न तुमच्या मनात आलाच नसता. काही प्रसारमाध्यमांचेच असे म्हणणे आहे, की निवडणुकांच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र आणण्याचा प्रयोग कधीच झाला नव्हता. राजकीय पंडित, राजकीय सर्वेक्षण, मीडियाच्या जनमत चाचण्या भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचेच सरकार येणार असा निष्कर्ष काढत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीपासून पळ काढला आहे. माझ्या सुमारे शंभराहून अधिक सभांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हे कशाचे लक्षण आहे? प्रश्नः विकास आणि सुप्रशासन या मुद्द्यावर प्रचार करण्यावर तुमचा भर आहे. पण मुस्लिम व इतर अल्पसंख्यांकांना विश्वास मिळवून देण्यात तुम्ही अपयशी ठरलात. हे तुमचे अपयश आहे, की विरोधकांचे यश...२००२च्या दंगलीचा डाग पुसून काढणे तुम्हाला शक्य होईल, असे वाटते काय? >> तुमचा प्रश्नच मीडियातील काही घटक कसे भूतकाळालाच चिकटून आहेत, हे दर्शवते. कोणताही समाज विकास आणि सुप्रशासन नको, असे म्हणत नाही. अनेक मान्यवर अल्पसंख्यांक नेते काँग्रेसने आमच्यासाठी काय केले, हा सवाल करतात. केवळ जात आणि धर्माची भीती दाखवून मतांचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे धोरण आहे. गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या या राजकारणाची आता मात्र 'एक्स्पायरी डेट' येऊन ठेपली आहे. अशा पक्षांनी आता आपले धोरण बदलायला हवे अन्यथा त्यांच्यासमोर राजकारणातून नामशेष होण्याचा धोका आहे. प्रश्नः तुमच्यावर लोकांच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे. याचे दडपण जाणवते? कारण लोकांना झटपट निकाल हवा असतो... >> मला याची अजिबात चिंता नाही. सध्याच्या निराशावादी आणि उपहासपूर्ण वातावरणात देशवासींचा राजकारणावर पुन्हा विश्वास आणू शकलो, याचा मला आनंद आहे. देशभर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रश्नः यूपीए सरकारने तुमच्याविरोधात सीबीआयचा वापर केल्याचा आरोप तुम्ही सातत्याने करता. तुम्ही त्याबाबत विस्ताराने बोलू शकता काय? तुम्ही सत्तेत आल्यास यूपीएच्या काळात गुजरात दंगलीबाबतच्या सीबीआयच्या भूमिकेबद्दल चौकशी कराल काय? >> गेली १० वर्षे कुठल्या ना कुठल्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा मोठे षडयंत्र माझ्याविरोधात रचण्यात आले. याच्या एक औंसभरही प्रयत्न देशातील समस्या सोडवण्यासाठी केला असता, तर सध्या देश सद्यस्थितीत नसता. पण मी सतत पुढे जाणारी व्यक्ती आहे. यूपीए सरकारने केलेल्या चुका आम्ही करू इच्छित नाही. मी व्यक्तिश: राजकीय सुडाच्या भावनेने वागणारा नाही. वैधानिक संस्थांना कायद्याने जे संरक्षण दिले आहे, त्याच चौकटीत राहून त्या संस्थांच्या सशक्तीकरणासाठी आणि व्यावसायिक कारभारासाठी प्रोत्साहन देणे हेच आमचे काम असेल. सीबीआयच्या कामगिरीविषयी सुप्रीम कोर्टानेही वेळोवेळी ताशेरे ओढले आहेत. राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी सीबीआयचा वापर होऊ नये, असाच आमचा प्रयत्न असेल. प्रश्नः तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मत कपिल सिबल यांनी व्यक्त केले आहे. तसेच तुमची व अमित शहा यांची चौकशी करण्यास सीबीआयला अपयश आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल तुमचे मत काय? >> सिबल प्रतिष्ठित वकील व कायदामंत्री आहेत. पण ते त्यांची बुद्धिमत्ता अनेकदा देशाच्या अपायासाठीच खर्च करतात. देशाच्या हिताहून अधिक ते स्वत:च्या व पक्षाच्या हिताला महत्त्व देतात. यूपीए सरकार आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना त्यांची निराशा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्यांनी एक ध्यानात घ्यायला हवे, की या देशात कायदा आहे. आणि या देशाचा कायदा हा कायदेमंत्र्याहून अधिक शक्तिशाली आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गुजरातमध्ये प्रचार करताना, सिबल यांनी जाहीर केले होते की, यूपीए सरकार सत्तेत आल्यास, ते मोदींना तुरुंगात टाकतील. त्यामुळे माझ्याबद्दलचा त्यांचा आकस नवा नाही. प्रश्नः रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाई करणार का, असे विचारले असता, तुम्ही म्हणता की, कुणाविरोधातही राजकीय द्वेषातून कारवाई होणार नाही. दुसरीकडे कायदा त्याचे काम करील, असेही तुम्ही स्पष्ट करता. कुणालाही माफी मिळणार नाही, हे तुम्ही ठामपणे सांगू शकता? >> आपला देश कायद्यानुसार चालतो. मोठ्या पदाच्या खुर्चीत बसलेल्या कुणाच्या इच्छा आणि अनिच्छेनुसार राज्यकारभार चालत नाही. कुणालाही कायद्यापासून माफी मिळेल, याची चर्चा करणेच निरर्थक आहे...तिथे मी स्वत: असलो तरीही... प्रश्नः मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनेल, अशी शंका व्यक्त होत आहे. त्यावर तुमचे म्हणणे काय? >> सरकारचा एकमेव धर्मग्रंथ असतो, तो म्हणजे भारतीय राज्यघटना. त्यामुळे आमचे सरकार राज्यघटनेच्या तरतुदींनुसारच राज्यकारभार चालवेल, याबाबत मला शंका नाही. प्रश्नः तुम्ही अमेठीमध्ये प्रचार केलात. पण रायबरेलीपासून दूर राहिलात, त्याचे कारण काय? >> हा निर्णय मी घेत नाही. पक्षाच्या हिताचा विचार करून पक्षनेतृत्वच याबाबत निर्णय घेते. प्रश्नः 'दूरदर्शन'वरील तुमची मुलाखत काटछाट करून प्रदर्शित करण्यात आली. त्याबद्दल तुमचे मत काय? >> राष्ट्रीय प्रसारमाध्यम राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेपास बळी पडते, हे सर्वाधिक दुर्दैवी आहे. सरकारी संस्थांचा काँग्रेसने कसा वापर केला, याचेच हे आणखी एक उदाहरण आहे. काँग्रेसने धक्का लावलेल्या व स्वातंत्र्याला नख लावलेल्या संस्थांची यादी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. सीबीआय, आयबी, केंद्रीय दक्षता आयोग, कॅग या स्वायत्त संस्थांमध्ये काँग्रेसने अनेकदा हस्तक्षेप केला आहे. इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचीही पायमल्ली करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. आजही राज्यपालांच्या पदाचाही दुरुपयोग करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय. खरे तर स्वत:ला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा मसिहा समजणाऱ्या काँग्रेसच्या या नीतीवर राष्ट्रीय चर्चा व्हायला हवी. प्रश्नः तुम्ही सांगता की, काँग्रेसचा मोठा पराभव होईल. त्या पक्षावर त्याचा काय परिणाम होईल, असे तुम्हाला वाटते? >> काँग्रेस त्यांच्या अस्तित्वासाठी लढतेय. काँग्रेसचे अनेक नेते निवडणूक रिंगणातून पळून गेले. प्रचारातही ते कुठेही दिसले नाहीत. काँग्रेसला १०० जागाही मिळवता येणार नाही, असा माझा अंदाज आहे. तसे झाल्यास गांधी कुटुंबाच्या नेतृत्वालाच काँग्रेसमधून आव्हान मिळेल. ही लढाई काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या निर्विवाद वर्चस्वासाठी आहे. म्हणूनच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहू नये, म्हणून कोणत्याही मार्गाने किमान १०० जागा गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रश्नः राहुल अपयशी ठरला, असे तुम्हाला वाटते काय? आणि प्रियांकांना राजकारणात उतरायला हवे, असे तुम्हाला वाटते काय? >> निवडणूक निकालानंतर काँग्रेसनेच याचा निर्णय घ्यायचा आहे. पण हे थोडे विचित्र आहे, की काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष नेतृत्वाबाबत गांधी कुटुंबाच्या पलीकडे कुणाचा विचारच करीत नाही. प्रश्नः आम आदमी पक्षाचे भविष्य काय असेल? मध्यमवर्गीय मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याने ही तुमच्यासाठी अडचण ठरली आहे काय? असेही बोलले जातेय की, डिसेंबरच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने जर भाजपला रोखले नसते, तर तुमच्या लोकसभा विजयाबद्दल शंकाही उपस्थित झाली नसती. >> संघटनात्मक रचना हीच भाजपची शक्ती आहे. यंदा भाजपला मिळणारा जनमताचा आधारच इतका प्रचंड आहे, की कोणताही पक्ष किंवा आघाडी आम्हाला रोखू शकत नाही. भाजप हा स्वबळावर लढणारा पक्ष आहे. आम्ही स्वत:चा अजेंडा स्वत:च तयार केला आहे आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. प्रश्नः काँग्रेसचा येत्या निवडणुकीत तुम्ही म्हणता तसा मोठा पराभव झाल्यास आम आदमी पक्ष हा धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेसला पर्याय ठरू शकेल, असे तुम्हाला वाटते काय? >> निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षच इतका दुबळा झाला असेल की, त्यांची जागा कुणी घेईल, याची शक्यताच मला वाटत नाही. प्रश्नः तुम्ही दिल्लीत गेल्यावर गुजरातचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ते पक्षच ठरवेल, असे तुम्ही म्हणाला होतात. अर्थात तुमचा सल्ला घेतला जाईलच. तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल? आनंदीबेन पटेल? अमित शहा पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळणार का? >> या प्रश्नांना आताच काही उत्तर देता येणार नाही. याबाबत योग्य त्या वेळी निर्णय घेतला जाईल. मी एका गोष्टीची खात्री देतो, ती म्हणजे, हे सर्व पक्षातील सार्वमताने घेतलेले निर्णय असतील आणि अन्य कोणत्याही बाबीपेक्षा गुजरातचे हित हा महत्त्वाचा मुद्दा असेल. प्रश्नः तुमच्या मंत्र्यांपेक्षा कार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारभार करण्यास तुमचे अधिक प्राधान्य असेल, अशी चर्चा आहे. तुमचे यावर मत काय? >> मी याच्याशी सहमत नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय कार्यकारी मंडळ महत्त्वाचे असते. भाजप आणि एनडीएचे अन्य सहकारी पक्ष यांच्याकडे सरकार चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आमच्याकडे सरकार चालवण्यासाठी सर्वाधिक अनुभवी आणि गुणवान व्यक्ती आहेत. मी याआधीही अनेकदा म्हटल्याप्रमाणे आम्हाला एक संघ म्हणून काम करावे लागेल. प्रश्नः तुमच्या पंतप्रधानपदासाठीच्या मोहिमेच्या विरोधात मुस्लिमधर्मीयांना उभे करण्याचा प्रयत्न तुमचे 'धर्मनिरपेक्षतावादी' विरोधक करत असल्याचा आरोप तुमच्या अनेक सहकाऱ्यांनी केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? >> काँग्रेस पक्षाला आता आपला निश्चित पराभव दिसू लागलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना १०० चा आकडा पार करणे जमणार नाही. त्यामुळे शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून ते धर्मनिरपेक्षतावादाच्या बंकरमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अल्पसंख्य समाजामध्ये भीतीचा बागुलबोवा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आजचा भारत हा अशा भीतीच्या बागुलबोवाला भीक घालत नाही, हे त्यांच्या लक्षात येत नाही. या युक्त्यांमागे नेमके काय आहे, हे आता अनेकांना कळू लागले आहे. एक राष्ट्रीय पक्ष अशा प्रकारचे प्रयत्न करतोय, हे दुर्दैवी आहे, असे मला वाटते. मात्र मला खात्री आहे की याचा उलटा परिणाम होईल. अल्पसंख्य समाजही त्यावर उलट प्रतिक्रिया देईल. कारण अल्पसंख्य समाजालाही आता काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण कळू लागले आहे आणि अशा प्रकारच्या राजकारणापासून तेही दूर होऊ लागले आहेत. प्रश्नः देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. त्याच्या उच्चाटनासाठी काही जण कठोर भूमिकेचा पर्याय सुचवतात. तर कुणी सामाजिक-आर्थिक सुधारणांचा मार्ग दाखवतात. तुम्ही कोणता पर्याय स्वीकारणार? >> नक्षलवाद हा शब्दच मुळी चुकीचा आणि कालबाह्य झाला आहे. माओवाद हीच त्याची योग्य परिभाषा आहे. माओवाद आणि दहशतवाद हाच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे. या समस्येशी लढण्यासाठी कठोर धोरणच हवे. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी स्पष्ट घटनात्मक चौकटही हवी. आपल्या पोलिस दलाचे आणि केंद्रीय निमलष्करी दलांचे आधुनिकीकरण करण्यातील दिरंगाई रोखायला हवी. जवानांना आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे द्यायला हवीत. त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण द्यायला हवे आणि त्यांना योग्य ठिकाणी तैनात करायला हवे. केंद्रीय व राज्य सरकारच्या सहकार्यातून माओवादाचे समूळ उच्चाटन शक्य आहे. प्रश्नः पाकिस्तानशी संघर्ष नको, अशी तुमची भूमिका आहे. देशाच्या सुरक्षेबाबतची कठोर भूमिका तुम्हाला पाकिस्तानशी वाटाघाटीत यश देईल, असे वाटते काय? >> कोणत्याही देशाशी आम्हाला संघर्ष नकोय. कोणत्याही देशाशी अथवा शेजारील देशांशी संघर्षाची भूमिका घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरण यशस्वीपणे राबवता येणार नाही. विश्वास आणि परस्पर सहकार्य या मुद्द्यावरच आपल्याला इतर देशांशी परराष्ट्र धोरण आखावे लागेल. तोपर्यंत पाकिस्तानातून आपल्या देशाला असलेला दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही. भारत आणि पाकिस्तानची केवळ सीमाच एक नाही, तर आपली संस्कृती आणि परंपराही सारख्याच आहेत. पण राष्ट्रीय सुरक्षा हाही परराष्ट्र धोरणाचा गाभा असेल. केवळ चर्चेने विवादास्पद मुद्दे सुटत नाहीत. प्रश्नः २००२च्या दंगलीचा मुद्दा छेडत अमेरिकेने गुजरातमध्ये गुंतवणुकीस नकार दिला. पण चीनने मात्र नेहमीच गुजरातला प्राधान्यक्रम दिला. याचा लाभ चीनशी असलेले संबंध सुधारण्यासाठी होईल, असे वाटते काय? >> भारत आणि चीनने द्विराष्ट्रीय प्रश्न मिटवल्यास त्याचा दोन्ही देशांना लाभ मिळेल. २१वे शतक आशियाचे आहे. जगातील ६० टक्के लोकसंख्या आशियात आहे. चीनशी असलेल्या समस्या सोडवणे अशक्य नाही. .... गेली १० वर्षे कुठल्या ना कुठल्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे मोठे षडयंत्र माझ्याविरोधात रचण्यात आले. पण मी सतत पुढे चालत जाणारी व्यक्ती आहे. यूपीए सरकारने केलेल्या चुका आम्ही करू इच्छित नाही. मी व्यक्तिश: राजकीय सुडाच्या भावनेने वागणारा नाही. .... कोणत्याही देशाशी अथवा शेजारील देशांशी संघर्षाची भूमिका घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरण यशस्वीपणे राबवता येणार नाही. विश्वास आणि परस्पर सहकार्य या मुद्द्यावरच आपल्याला इतर देशांशी परराष्ट्र धोरण आखावे लागेल. तोपर्यंत पाकिस्तानातून आपल्या देशाला असलेला दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही. .... माओवाद आणि दहशतवाद हाच आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे. या समस्येशी लढण्यासाठी कठोर धोरणच हवे. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी स्पष्ट घटनात्मक चौकटही हवी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाला काँग्रेसमध्येच आव्हान मिळेल! May 7, 2014, 02.55AM IST

श्रीगुरुजी तिसराही पर्यायही अनेकांच्या गळी उतरणार नाही. आज लोक मोदींच्या फॅन्सची अवस्था रजनीकांतच्या चाहत्यांसारखी झाली आहे. काही सांगता येत नाही. भाजपा आले आणि मोदी नाही झाले तर हे फॅन्स विहिरी बिहिरीत उड्या मारतील...

शेवटी काय ठरलं, होणार का मोदी पंतप्रधान ? मोदी खरचं पंतप्रधान बनतील काय ? या प्रश्नाला माझे उत्तर सपष्ट नाय असेच हाये.