आर्र....राजकुमार
आर्र... राजकुमार
पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.
जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. पण दोन अफीम माफियांचे एका गांवात कायम युद्ध चालू असते, त्याच गांवात चंदा नांवाची एक चटकचांदणी मटकत असते आणि वेळप्रसंगी लोकांची धुलाईही करते याचे ज्ञान प्राप्त झाले. त्यातला झिपर्या हिरो तर कायम चुंबनाच्या पोझमधेच उभा बघून परमसंतोष जाहला. हिरविणीला तो इतक्यावेळा 'लॉलीपॉप' म्हणत असतो की चित्रपटाचे नांव, ल... लॉलीपॉप' असे का ठेवले नाही असा विचार डोक्यांत आला. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. मारामार्यांची भरपूर रेलचेल आहे. प्रत्येक मारामारीत लगावलेल्या ठोशांचा आवाज एखादा बाँबस्फोट व्हावा इतका मोठा होता. चित्रपटातील गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. गंदी बात, सारीके फॉलसा, मतमारी, धोखाधडी, कद्दु कटेगा या गाण्यांमधे आशयगर्भ काव्याचा आपण आस्वाद घेऊ शकता. हिरोची जीवनाबद्दलची मते त्या थोर शायरांनी पद्यात छान उतरवली आहेत. हिरो म्हणतो, मैं तो प्यार करता हूँ या मारता हूँ. लगेच त्याबरहुकुम 'प्यार प्यार या मार मार, असे लाजवाब गाणे तयार झाले. अशी काव्ये वाचायला,ऐकायला मिळाली की पुढच्या पिढीचे भवितव्य किती उज्वल आहे त्याची कल्पना येते.
या चित्रपटाचे वेगळेपण असे की यांत व्हिलनला भरपूर न्याय दिला आहे. आत्तापर्यंत कुठल्याही हिंदी सिनेमात मी कधी हिरोची इतकी जबरदस्त धुलाई झालेली बघितली नाहीये. बाकी पोटांत सुरे खुपसून गाडला गेल्यावरही शेवटच्या मेगा मारामारीत हिरो परत कसा येतो असले प्रश्न विचारायचे नसतात. मसाला मात्र ठासून भरला आहे. सोनाक्षीचे साडी नेसताना पदर खाली टकण्याचे दृश्य, लग्न झाल्यावर हिरो माझी साडी फेडून कायकाय करेल हे रिपीटेड संवाद चित्रपटाची उंची दाखवून देतात. हिरोचे डायलॉग तर अफलातून. 'तू सायलेंट हो जा नही तो मैं व्हायोलेंट हो जाऊंगा' हा तर भलताच भारी! विनोदासाठी पुन्हा असराणीला वेठीस धरले आहे. एका माफियाचा चमचा, भविष्यवेत्ता आणि प्रत्येक डायलॉग नंतर ते खास असराणी टच असलेलं, शोलेपासून चालत आलेलं, हॅ हॉ!
दिग्दर्शकाने यांत, तरुण पिढीला बरेच संदेश दिले आहेत. कुठल्याही मुलीला सतत छेडत रहावे, एक ना एक दिवस ती गळाला लागतेच. तिच्यासमोरच, तिला कोणी और चाहनेवाला असला तर त्याचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी द्यावी, म्हणजे मग, आता याला 'वरल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्या चाणाक्ष्/सोनाक्ष मुलींच्या लगेच ध्यानात येते. 'तुम किसी औरको चाहोगी तो मुष्किल होगी' असे राजकपूरप्रमाणे मुळमुळीत सांगण्याचे दिवस संपले आहेत. प्यार या शब्दातच इतकी ताकद आहे की तुम्हाला कोणी मरेस्तोवर मारो, पोटांत सुरा खुपसो वा गाडून टाको. तुम्ही मरणे शक्यच नाही. आणि त्या प्यार साठी तुम्ही कितीही खून केलेत तरी तो गुन्हा धरला जात नाही.
घरी आल्यावर माहितीजालावर कळलं की तो झिपर्या म्हणजे शाहिद कपूर, व्हिलन सूद आणि इतक्या महान सिनेमाचे दिग्दर्शक 'प्रभुदेवा'.
अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्यावर दिसत होते.
प्रतिक्रिया
ह हॅ!
(No subject)
मस्त. मजा आली.
अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होतीकोणते हो ते प्रसंग?? ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)टैमपास शिणुमा हाय त्यो.
तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल.
लब्बाड
आमचीच
मस्तच!
हाहाहा खूप हसले! मजा आली.
बेफ्फाम मारलय!!!
तुम्हाला कस कळल...
हा हा हा.. मस्तच काका.. ह.ह
आभार