✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुख म्हणजे नक्की काय?

स
समीरसूर यांनी
Mon, 04/07/2014 - 17:27  ·  लेख
लेख
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले. असे मस्त मस्त वाटत होते. कार्यालयातून येता-जाता एका जाहिरातीच्या बोर्डावर मंद हसत असलेल्या दीपिका पदुकोनच्या विशाल नेत्रांमध्ये उगीच डोकावल्यावर कसे प्रसन्न वाटते, अगदी तसेच मला हे जेवण झाल्यानंतर वाटले. हे सुख आहे की फक्त तात्पुरता आनंद? सुखाची भावना देखील तात्पुरतीच असेल ना? सारखं आपलं कुणी 'मी सुखी आहे' असं स्वत:ला बजावत असेल असं वाटत नाही. अमेरिकेत आमच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी बायको असे आम्ही दोघंच राहत होतो. एकदा रविवारी सकाळी ७:३० वाजता मी उठलो; सकाळचे कार्यक्रम आटोपले आणि 'द शायनिंग' नावाचा एक हॉरर चित्रपट लावून बसलो. जॅक निकोल्सनचा हा चित्रपट अतिशय दर्जेदार अशा मोजक्या चित्रपटांच्या यादीमधला एक चित्रपट आहे. एक अतिशय निर्जन पर्वतरांगांमधले अवाढव्य हॉटेल, लांबून कुठून तरी तिथे कारने येणारा नायक, त्याची बायको, आणि एक मुलगा. आणि त्या निर्मनुष्य हॉटेलमध्ये घडणार्‍या थरारक घटना! चित्रपट संपल्यावर काहीतरी वेगळे पाहिल्याचा आनंद जाणवला. तशाच प्रकारचा आनंद 'स्कारफेस', 'कसिनो', 'सिटीझन केन' या व अशा बर्‍याच चित्रपटांनी दिला. हा आनंद म्हणजेच सुख का? की असा आनंद मिळवण्यासाठी ज्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ती पूर्तता म्हणजे सुख? म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सगळं आलबेल असणं, नोकरीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशातून टीव्ही, काँम्प्युटर, इंटरनेट, इत्यादी सुखसुविधांचा ताफा आपल्या तैनातीत ठेवणं हे सुख? आम्ही मित्रमंडळी काही वर्षांपूर्वी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये भेटायचो. तिथे मग मस्त मैफल जमायची. गरमागरम तंदूर चिकन, झणझणीत चिकन हैदराबादी किंवा मुर्ग मुसल्लम, गरम रोट्या, आणि मनमुराद गप्पा अशी रंगीत मैफल जमायची. कुणालाच घाई नसायची. मग गुलाम अली, पंकज उधास, जगजीत सिंग यांच्या अजरामर गजलांचा कार्यक्रम व्हायचा. तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने की फिर ना होश का दावा किया कभी मैने वो और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी निगाह-ए-यार से पायी है जिंदगी मैंने... किंवा मैं तेरी मस्तनिगाही का भरम रख लुंगा होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही वरना मैं कुछ भी हूं एहसानफरामोश नही अशा शराबी, धुंद गजलांच्या माहोलमध्ये भरपूर गप्पा रंगायच्या. मध्येच सब चमन से गुलाब ले आये, हुस्नवाले शबाब ले आये शेखसाहब ने मांग ली जन्नत, हम वहां से शराब ले आये अशी एखाद्या गजलेची सुरुवात व्हायची. मग गाडी हळूच "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..." वरून "एकटेच जगू, एवढंच ना, आमचं हसं, आमचं रडं, ठेवून समोर एकटेच बघू..." ही दु:खाची स्टेशने घेत घेत "सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गयी हैं सारी मंजिले, हो सारी मंजिले, सो गया हैं रस्ता..." असा पेंगलेला निष्कर्ष काढून रात्री १-२ वाजता आपापल्या घरांच्या यार्डात जायची. या मैफलींमध्ये खूप मजा यायची. खूप गप्पा-गाणी आणि मनमुराद हसणे (खिदळणे, दात काढणे म्हटलं तरी चालेल) चालायचे. हे सुख आहे का? की हे क्षणभंगूर सुख आहे? मग या न्यायाने सगळीच सुखे क्षणभंगूर नाहीत का? भविष्याच्या चिंतेचे, विचारांचे, योजनांचे शेवाळ लगेच चढते आजकाल वर्तमानाच्या सुरेख शिल्पावर! मग वर्तमान कितीही सुसह्य केला तरी सुखी झाला असे म्हणता येईल का? माझा एक मित्र आहे. त्याला फिरण्याची, पर्यटनाची अजिबात आवड नाही. महिनोनमहिने तो, त्याची बायको आणि एक छोटा मुलगा कुठेच जात नाहीत. तो फक्त रोज कार्यालयात जातो. राजस्थानी असल्याने बायकोला मैत्रिणी वगैरे फारशा नाहीत. बायकांनी घराबाहेर पडणे जवळ-जवळ अशक्य! शनिवार-रविवारी अगदी जवळच्या कुठल्यातरी मित्राकडे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाकडे जाणे एवढाच काय तो बदल! पण त्याला नवनवीन गॅजेट्सची हौस भारी! आयपॅड, आयफोन, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, महागडी घड्याळे यावर तो बर्‍यापैकी पैसे खर्च करतो. अशी कुठली वस्तू घेतली की तो ४-२ दिवस खूप खुश असतो. ही खुशी म्हणजे सुख म्हणता येईल का? पण ही खुशी पण चार दिवस टिकते; नंतर अंगवळणी पडून नाहीशी होते. एका अतिगरीब माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतील, नव्हे, वेगळ्या असतातच. दोन वेळेला स्वतःला आणि कुटुंबाला पोटभर खायला मिळाले आणि सगळ्यांचे आरोग्य उत्तम असले म्हणजे देखील एखादी व्यक्ती स्वतःला सुखी म्हणवून घेत असेल. सुखाची ही भावना चिरकाल टिकणारी असते का? मला वाटते ही भावना चिरकालीन टिकणारी नसावी कारण त्या भावनेला हादरे देणार्‍या अडचणी असतातच की. कधी काम मिळते, कधी नाही मिळत, कधी घरादारावर गदा येते, कधी मुले-बाळे व्यसनी होतात, कधी मुलीचे लग्न फसते अशा समस्यांचा लकडा असतोच. म्हणजे शुद्ध सुखाची भावना कायम टिकणारी आहे असे म्हणता येणार नाही. शेवटी ती देखील क्षणभंगूरच! मिसळपाव.कॉमवर लिहिलेल्या लेखाला खूप प्रशंसा मिळाली किंवा फेसबुकवर टाकलेल्या फोटोला भरपूर लाईक्स मिळाले म्हणजे मन सुखावते. ही सुखावलेपणाची भावना तशी अल्पायुषीच असते. फार तर दोन दिवस! सुख मानण्यावर असते असेही म्हटले जाते. आम्ही न्यू यॉर्क, नायगाराच्या सहलीला गेलो तेव्हा अमेरिकन सरकारचा बंद होता. ही नवीनच भानगड ऐकली होती. सरकारच बंद! आणि ते बंद असून देखील सगळे सुरळीत चालू होते. आपले सरकार पूर्ण वेळ जागे असून देखील इतका गोंधळ असतो. असो. त्या बंदमुळे वॉशिंग्टन डीसी मधली महत्वाची वस्तूसंग्रहालये, स्मारके, काही खूप सुंदर असे बगिचे वगैरे पर्यटकांसाठी बंद होते. सगळे बुकिंग आधीच झाल्याने काही करता येणे शक्य नव्हते. सगळ्यांनी आमचे सांत्वन केले. "अब क्या देखोगे? तुम्हारे पैसे तो बेकार गये. ठीक हैं, जितना मिले उतना ही देख लेना, क्या कर सकते हैं? थोडा लेट जाना चाहिये था..." वगैरे वगैरे. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं की बराकभाऊंनी होर्डिंग लावलं होतं की त्यांचं सरकार झोपणार आहे म्हणून! पण आता हे सांत्वन ऐकून घावं लागणार होतं. आम्ही सहलीला गेलो. सहल खूप छान पार पडली. डीसी मधली काही ठिकाणे नाहीच पाहता आली. पण रिव्हर पोटोमॅकमध्ये दोन तासांचा क्रुझ करता आला, व्हाईट हाऊस, युएस कॅपिटॉल, राष्ट्राध्यक्षांच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय (मादम तुसॉ) बघता आले, डीसीच्या भव्य रस्त्यांवरून फिरून तिथल्या भव्यतेचा आनंद लुटता आला. आम्ही घरी परत आल्यावर आम्हाला छान वाटले. आपण काही मिस केले म्हणून वैषम्य अजिबात वाटले नाही. इतके पैसे खर्च केले आणि सगळं डीसी नाही बघता आलं असा खेद नावालाही वाटला नाही. हे ही सुख अल्पायुषीच. मनाची समजूत म्हणा हवं तर. मग सुख सुख म्हणजे आहे तरी काय नेमकं? राजकारण्यांना सत्तेसाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष म्हणजे सुख? की इच्छित सत्तास्थान काबीज केल्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे सुख? एखादी अवघड गोष्ट ठरवून, कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला सुख म्हणता येईल? मग तसं म्हणायला गेलं तर कित्येक कुठलीही ध्येये नसणारी, साधी सरळ माणसे सुखातच दिसतात की! साधा टपरीवर काम करणारा मुलगा देखील मजेत असतो. मजेत असणं म्हणजे सुख असते का? जबाबदार्‍या वाढल्या की आयुष्यातली मजा हळू-हळू कमी होत जाते म्हणजेच सुख देखील कमी होत जाते का? अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय? भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत घेता येऊ शकतो का? बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं. अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात काहींना सुख वाटतं तर काहींना फक्त पैसे कमवण्यात. काहींना पर्यटनात आनंद मिळतो तर काहींना खेळण्यात किंवा वाचण्यात. माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी सुख देतात आणि पुढच्या प्रवासासाठी धीर देतात असा अनुभव आहे. मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं (मग ते अगदी 'तुम तो ठहरे परदेसी' किंवा 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' असेल किंवा 'चांदण्यात फिरतांना' किंवा 'बगळ्यांची माळफुले' असेल) की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं. तुमचं काय मत?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
27505 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

सुख म्हणजे ..

चौकटराजा
Tue, 04/08/2014 - 17:47 नवीन
अत्यंत नैसर्गिक कारणे उदा .भूक तहान, कामवासना ई नी शरीरावर येणारा ताण . काही मनोधारणांमुळे मनावर येणारा ताण उदा महत्वाकांक्षा , स्वाभिमान, ई ई यांचा निचरा होतानाची शरीराची व मनाची अस्वस्था म्हणजे सुख.
  • Log in or register to post comments

सुख म्हणजे नक्की काय?

अवतार
Tue, 04/08/2014 - 19:32 नवीन
हा प्रश्न पडण्याइतकी उसंत आणि स्वातंत्र्य मिळणे हे खरे सुख!
  • Log in or register to post comments

क ड क! आवडले!

ऋषिकेश
गुरुवार, 04/10/2014 - 11:20 नवीन
क ड क! आवडले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

धन्यवाद

अवतार
Fri, 04/11/2014 - 23:29 नवीन
प्रतिसाद आवडण्याचे सुख मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

जगी सर्व सुखी असा कोण आहे।

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/08/2014 - 21:02 नवीन
जगी सर्व सुखी असा कोण आहे। विचारी मना तुची शोधोनी पाहे। जय जय रघुवीर समर्थ
  • Log in or register to post comments

जरूर ऐका .

दिव्यश्री
Tue, 04/08/2014 - 21:14 नवीन
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत ...जरूर ऐका . :) https://www.youtube.com/watch?v=OprOJoTM8BE
  • Log in or register to post comments

https://www.youtube.com/watch

दिव्यश्री
Tue, 04/08/2014 - 21:15 नवीन
https://www.youtube.com/watch?v=OprOJoTM8BE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

सुख म्हणजे...

अर्धवटराव
गुरुवार, 04/10/2014 - 06:47 नवीन
तो एक प्रकारचा केमीकल लोचा आहे शरीरातला. त्यातला एक घटक म्हणजे शर्करा ज्वलन मोजणारी यंत्रणा. असं बरच काहिबाहि आहे त्या समिकरणात.
  • Log in or register to post comments

खर आहे

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/10/2014 - 09:38 नवीन
खर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आपल्याला हव्या असणार्‍या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/10/2014 - 09:43 नवीन
आपल्याला हव्या असणार्‍या व्यक्ती,वस्तु किंवा अनुभव अनपेक्षितपणे मिळणं ह्यासारख सुख नाही. (पहाटे ९.३० ला उठणं आणि दुपारच्या गाढ झोपेचं सुख हरवलेला) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

समीरजी,

ज्ञानव
गुरुवार, 04/10/2014 - 10:55 नवीन
माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या
एक भाकरी आणि अनेक ही "भाकरी"च हे वाचून अत्यंत आनंद झाला कारण सर्व सामान्यपणे भाकर्या असे म्हंटले जाते....तेव्हा योग्य शब्द वापराचे सुख तुम्ही दिलेत त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एक आणि अनेक

चित्रगुप्त
गुरुवार, 04/10/2014 - 11:14 नवीन
एक भाकरी खाल्ली -- अनेक भाकरी खाल्ल्या. एक मुलगी दिसली -- अनेक मुली दिसल्या. एक पिशवी घेतली -- अनेक पिशव्या घेतल्या. एक रेकॉर्ड वाजवली -- अनेक रेकॉर्डी वाजवल्या. एक सायकल चालवली -- अनेक सायकली चालवल्या.... नेमका नियम काय आहे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

नियम!!

ज्ञानव
गुरुवार, 04/10/2014 - 11:21 नवीन
रेकॉर्ड, सायकल सारख्या इंग्रजी शब्दांचे अनेकवचन मराठीत भयंकरच होते जसे सिनेमा आणि सिनेमे (हे जास्तच त्रासदायक आहे पण सर्रास वापरातही आहे.) बाकी इकारांत शब्दांचे अनेकवचन ज्या नियमानुसार होते त्याबाबत तज्ञ इतरत्र चर्चा करत आहेत तिथे डोकवावे इथे सुखी धाग्याचे उगाचच रणकंदन नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मलाही भारीचे अनेकवचन वाचून

रेवती
Sat, 04/12/2014 - 00:25 नवीन
मलाही भारीचे अनेकवचन वाचून असाच आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

खुपच सुंदर.... लिहलय...

वन्दना सपकाल
Sat, 04/12/2014 - 04:00 नवीन
खुपच सुंदर....लिहलय....
  • Log in or register to post comments

@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ

अनिता ठाकूर
Sat, 04/12/2014 - 14:37 नवीन
@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ'. (तत+ज्ञ=तज्ज्ञ).( 'त' चा पाय मोडता येत नाही.)म्हणजे, त्या संबंधित विषयातील जाणकार. तसेच, 'रणकंदन' नाही, तर, 'रणक्रंदन'.म्हणजे, रणावर चाललेली धुमश्चक्री. @रेवती, आपल्याला 'भाकरी' म्हणावयाचे आहे का? बाकी, सुखाबद्दल जे वर लिहिले गेले आहे त्यात सगळं आलं आहेच. एखाद्या अक्षराचा पाय कसा मोडायचा ते कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

"तज्ञ" च अन "रणकंदन" च

शुचि
Mon, 04/14/2014 - 19:01 नवीन
"तज्ञ" च अन "रणकंदन" च वाचलेलं तरी आहे. आक्रंदन वेगळं पण रणकंदन हा शब्द रणकंदन म्हणूनच वाचला आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

होय अनिताताई, चूक लक्षात आणून

रेवती
Mon, 04/14/2014 - 19:17 नवीन
होय अनिताताई, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. भाकरीच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

मस्त विचारमंथन....

मुक्त विहारि
Mon, 04/14/2014 - 23:01 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख.

अमीबा
Wed, 04/16/2014 - 11:31 नवीन
"मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत." >> हे विशेष पटले. साध्या आणि मोजक्या शब्दांत मांडले आहे.
  • Log in or register to post comments

मेरा

विटेकर
Wed, 04/16/2014 - 16:12 नवीन
मेरा फंडा इसमे बहुत क्लियर है, नो कन्फ्युजन अ‍ॅट ऑल! मागे मी एकदा याच विषयावर एक अर्धवट लेखमाला लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.. मला वाटते सुख हे चार पातळ्यांवर असते आणि प्रत्य्क पातळीवर त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढत जातो. १. शरीर २. मन ३. बुद्धी ४. आत्मा आता पुन्हा टंकत नाही , तेच चिकटवतो. माणसाची जगण्याची मूलभूत प्रेरणा " सुख " आहे आणि अधिकाधिक सुख मिळवणे , त्यासाठी अधिकाधिक कष्ट करणे आणि सुख मिळवणे याच साठी मनुष्य जगत असतो. आणि मनुष्यच नव्हे तर आखिल प्रणिमात्र हे सुखासाठीच धडपडत असतात. सुख म्हणजे आपल्या मनातील इच्छांची पूर्ती ! गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली , गुलाब्जाम मिळाले सुख ! तहान लागली थंड्गार पाणी मिळाले सुख ! झोप आली , आरामदायी शय्येवर सुरेख झोप मिळाली , सु़ख ! थोडक्यात- आपल्या मनातील इच्छांची पूर्ती पुन्हा पुन्हा होत राहणे म्हणजे पुन्हा पुन्हा सुख ! अधिकाधिक इच्छांची पूर्ती म्हणजे अधिकाधिक सुख ! मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा इतकी सुखाची साधी सोपी सरळ व्याख्या निर्माण झाली, पण सुखाची साधने मर्यादित होती आणि त्यामानाने इच्छुक मात्र उदंड अशी स्थिती निर्माण झाली. मग मनुष्य अधिकाधिक सुखासाठी अधिकाधिक उपभोगाची साधने निर्माण करु लागला / खरेदी करु लागला आणि अश्या प्रकारच्या वस्तुंचा संग्रह करण्यासाठी अधिकाधिक धनसंचय करु लागला आणि धन संचय म्हणजे सुख असा काहींसा समज दृढ झाला. आणि या पैश्याच्या हव्यासासाठी सुखाच्या मागे धावणारा माणूस प्रत्यक्षात मात्र दु:खी झाला ! आणि ही साधने मर्यादीत न रहावीत म्हणून औद्योगिक क्रांती द्वारे अधिकाधिक उत्पाद्न सुरु झाले. अधिकाधिक उत्पादन आणि त्यासाठी बाजारपेठ अशी चक्राकार गती सुरु झाली. आणि अश्या प्रकारची विकसित बाजार पेठ निर्माण करणे, त्यामध्ये खर्च करु शकेल असा वर्ग निर्माण करणे आणि सतत पोकळी निर्माण करून त्यात भर टाकत राहणे यालाच "विकास " असे म्हंटले गेले ! दुर्दैवाने पाश्चिमात्य जगातील हीच विकासाची व्याख्या भारतीयांनी स्वाकारली आणि अक्षय सुखाचा ठेवा देणारी सर्वंकष भारतीय जीवन शैली नाकारली. मनातील इच्छांची पूर्ती सुख = ------------------- मनातील एकूण इच्छा हे समिकरण प्राचीन भारतीयांना माहीत नव्हते काय ? त्याशिवाय चार्वाकांसारखे दार्शनिक ही होते. ययाती सारखी ओर्बाडून सुख घेऊ पाह्णारे ही होते , पण भारतीय तत्ववेत्त्यानी सधा विचार केला , हा भागाकार पूर्ण १ यायचा असेल तर " छेद " कमी केला पाहीजे ! इच्छा कमी केल्या की आपोआपाच भागाकार १ कडे जाईल. पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील ! आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम ! पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव ! मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली. योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात .. १. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा. २. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा) ३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा. ४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल. थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे ! अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम ! धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो. याचा सरल सरळ अर्थ असा की, संयमित अथवा प्रमाणित उपभोग माणसाला सुखापर्यंत नेऊ शकतो ! ही सुखे प्रामाणित करण्यसाठी चार आश्रमांची मांड्णी करुन एकात्म सुख मिळवण्याचा प्रयत्न मनुष्य करु शकतो , नव्हे असे मिळवता येते हे भारतीय संस्कॄतीने सिद्ध केले आहे. या प्रमाणीकरणाला पुरुषार्थाची जोड दिली आहे म्हणजे रस्ता ( आश्रम ) आणि गंतव्य ( पुरुषार्थ ) दोन्हीही सांगितले आहेत. मोक्ष हे नरदेहाचे अंतिम गंतव्य आहे आणि जन्म ते मृत्यु या सार्या प्रवासात सारे लक्ष्य तिकडेच असले पाहीजे, म्हणजे प्रत्येक कर्म हे त्याच्याच अनुसंधानात असले पाहीजे. धर्म या पुरुषार्थाच्या मर्यादेत अर्थ आणि काम या पुरुषर्थाची आखणी केली आहे. आयुष्याचा जीवन प्रवाह हा धर्माचे तीर सांभाळून अर्थ आणि काम पुरुषार्थांने प्रवाहित केले पाहिजेत , म्हणजे मोक्षाप्रत जाता येते ! अर्थ आणि काम हा पुरुषार्थ फक्त गॄहस्थाश्रमातच असल्याने आपोआपच उपभोग मर्यादित झाला. धर्माचे बंधन ही आपोआप प्राप्त झाले. वान्प्रस्थ आणि संन्यासाश्रमात समाजोपयोगी ( आत्मन मोक्षार्थ जगद हितायच ) व मोक्षाप्रत नेणारीच कामे करायची आहेत. या चार पुरुषार्थ आणि चार आश्रमांच्या रचनेमुळे , राष्ट्राचे सर्वात शेवटचे एक़क - मनुष्य हा सुखी होऊ शकला. अशा सुखी लोकांचा समूह म्हणजेच सुखी समाज ! याचाच व्यत्यास असा की केवळ शरिर उपभोगाच्या सुख - सुविधा उपलब्ध करुन आणि भौतिक गोष्टी निर्माण करुन सुखी होता येणे अवघड आहे. त्यामुळे मनुष्य केवळ अर्थ आणि कामाचा अतिरेक करुन दु:खीच होईल !
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट विवेचन

समीरसूर
Fri, 04/18/2014 - 11:05 नवीन
छान प्रतिसाद. पण आजकाल पाश्चिमात्य देश भारतापेक्षा जास्त सुखात आहेत असे वाटते. भारतातल्या लोकांची गोची झालीय. भारतातल्या तात्विक सुखाची कास धरायची की पाश्चिमात्य देशांमधल्या भौतिक सुखांच्या मागे पळायचं या गोंधळात भारतीय माणूस हरवला आहे असे वाटते. आणि सुख अनुभवण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, सच्चेपणा हे गुण देखील लागतातच; या गुणांची भारतात प्रखर वानवा आहे. त्यामुळे सगळंच कठीण झालं आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सुख मिळवण्याची साधनं आणि खरं

प्यारे१
Wed, 04/16/2014 - 16:43 नवीन
सुख मिळवण्याची साधनं आणि खरं सुख(आनंद) ह्यातला फरक (डिस्क्रिमिनेट) समजून घेतला जाणं अपेक्षित आहे. नंतर सुख म्हणजे नक्की काय त्याचा विचार होऊ शकेल. सुखाची साधनं ही एक म्हटलं तर खूप वाईड रेन्ज मानावी लागेल. स्वशरीरापासून सुरुवात करुन जगातली प्रत्येक गोष्ट सुखाचं साधन म्हणता येते. त्याबरोबरच असलेपणानं नि नसले पणानं सुखाची जाणीव होते. अर्थात ही जाणीव खरोखरच त्यावर अवलंबून असते की ती आपली त्या गोष्टीवर निर्माण झालेली 'प्रतिक्रिया' असते? सुख अथवा आनंद कुठल्याही व्यक्ति, वस्तू अथवा परिस्थिती मध्ये बदलत नसेल तरंच त्याला 'खरं सुख' म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

@शुची, मा.का.देशपांड्यांच्या

अनिता ठाकूर
गुरुवार, 04/17/2014 - 12:57 नवीन
@शुची, मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे. मात्र,आपण म्हंटल्याप्रमाणे,'रणकंदन' हा शब्दही आहे. ह्या शब्दाबद्दलची माझी चूक मी सुधारत आहे. मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मा.का.देशपांड्यांच्या मराठी

शुचि
गुरुवार, 04/17/2014 - 19:40 नवीन
मा.का.देशपांड्यांच्या मराठी-इंग्लिश शब्दकोशात 'तज्ज्ञ' असाच शब्द आहे.
अरेच्च्या मग असेल बुवा. आपल्यालाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

पडल्या पडल्या झोप लागणे,

सुशेगाद
Fri, 04/18/2014 - 01:34 नवीन
पडल्या पडल्या झोप लागणे, भरपूर सेक्स , फुल स्पीड इंटरनेट आठवड्याला एखादी समुद्रावर ट्रीप मारणे , मासे खाणे , दारू पिऊन थोडफार झिंगणे आणि लिहिणे म्हणजे सुख. जस जस वय वाढत जाईल तसतस सुखाच्या अपेक्षा देखील बदलत जातील. सुरवातीपासूनच त्या जर मर्यादित ठेवल्या तर सगळ सुख आपलाच आहे. -सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!
  • Log in or register to post comments

सुखाच्या शोधात असणारा एक

शुचि
Fri, 04/18/2014 - 01:52 नवीन
सुखाच्या शोधात असणारा एक तात्पुरता दुखी मनुष्य!
ये दिन भी जायेंगे!
  • Log in or register to post comments

ये दिन भी जायेंगे!

अर्धवटराव
Fri, 04/18/2014 - 03:42 नवीन
काय शाप देताय का ??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नाही हो, दु:खात आहेत म्हणून

शुचि
Fri, 04/18/2014 - 05:15 नवीन
नाही हो, दु:खात आहेत म्हणून म्हटले हे दिवस जातील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा