Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीरसूर on Mon, 04/07/2014 - 17:27
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले. असे मस्त मस्त वाटत होते. कार्यालयातून येता-जाता एका जाहिरातीच्या बोर्डावर मंद हसत असलेल्या दीपिका पदुकोनच्या विशाल नेत्रांमध्ये उगीच डोकावल्यावर कसे प्रसन्न वाटते, अगदी तसेच मला हे जेवण झाल्यानंतर वाटले. हे सुख आहे की फक्त तात्पुरता आनंद? सुखाची भावना देखील तात्पुरतीच असेल ना? सारखं आपलं कुणी 'मी सुखी आहे' असं स्वत:ला बजावत असेल असं वाटत नाही. अमेरिकेत आमच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी बायको असे आम्ही दोघंच राहत होतो. एकदा रविवारी सकाळी ७:३० वाजता मी उठलो; सकाळचे कार्यक्रम आटोपले आणि 'द शायनिंग' नावाचा एक हॉरर चित्रपट लावून बसलो. जॅक निकोल्सनचा हा चित्रपट अतिशय दर्जेदार अशा मोजक्या चित्रपटांच्या यादीमधला एक चित्रपट आहे. एक अतिशय निर्जन पर्वतरांगांमधले अवाढव्य हॉटेल, लांबून कुठून तरी तिथे कारने येणारा नायक, त्याची बायको, आणि एक मुलगा. आणि त्या निर्मनुष्य हॉटेलमध्ये घडणार्‍या थरारक घटना! चित्रपट संपल्यावर काहीतरी वेगळे पाहिल्याचा आनंद जाणवला. तशाच प्रकारचा आनंद 'स्कारफेस', 'कसिनो', 'सिटीझन केन' या व अशा बर्‍याच चित्रपटांनी दिला. हा आनंद म्हणजेच सुख का? की असा आनंद मिळवण्यासाठी ज्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ती पूर्तता म्हणजे सुख? म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सगळं आलबेल असणं, नोकरीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशातून टीव्ही, काँम्प्युटर, इंटरनेट, इत्यादी सुखसुविधांचा ताफा आपल्या तैनातीत ठेवणं हे सुख? आम्ही मित्रमंडळी काही वर्षांपूर्वी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये भेटायचो. तिथे मग मस्त मैफल जमायची. गरमागरम तंदूर चिकन, झणझणीत चिकन हैदराबादी किंवा मुर्ग मुसल्लम, गरम रोट्या, आणि मनमुराद गप्पा अशी रंगीत मैफल जमायची. कुणालाच घाई नसायची. मग गुलाम अली, पंकज उधास, जगजीत सिंग यांच्या अजरामर गजलांचा कार्यक्रम व्हायचा. तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने की फिर ना होश का दावा किया कभी मैने वो और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी निगाह-ए-यार से पायी है जिंदगी मैंने... किंवा मैं तेरी मस्तनिगाही का भरम रख लुंगा होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही वरना मैं कुछ भी हूं एहसानफरामोश नही अशा शराबी, धुंद गजलांच्या माहोलमध्ये भरपूर गप्पा रंगायच्या. मध्येच सब चमन से गुलाब ले आये, हुस्नवाले शबाब ले आये शेखसाहब ने मांग ली जन्नत, हम वहां से शराब ले आये अशी एखाद्या गजलेची सुरुवात व्हायची. मग गाडी हळूच "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..." वरून "एकटेच जगू, एवढंच ना, आमचं हसं, आमचं रडं, ठेवून समोर एकटेच बघू..." ही दु:खाची स्टेशने घेत घेत "सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गयी हैं सारी मंजिले, हो सारी मंजिले, सो गया हैं रस्ता..." असा पेंगलेला निष्कर्ष काढून रात्री १-२ वाजता आपापल्या घरांच्या यार्डात जायची. या मैफलींमध्ये खूप मजा यायची. खूप गप्पा-गाणी आणि मनमुराद हसणे (खिदळणे, दात काढणे म्हटलं तरी चालेल) चालायचे. हे सुख आहे का? की हे क्षणभंगूर सुख आहे? मग या न्यायाने सगळीच सुखे क्षणभंगूर नाहीत का? भविष्याच्या चिंतेचे, विचारांचे, योजनांचे शेवाळ लगेच चढते आजकाल वर्तमानाच्या सुरेख शिल्पावर! मग वर्तमान कितीही सुसह्य केला तरी सुखी झाला असे म्हणता येईल का? माझा एक मित्र आहे. त्याला फिरण्याची, पर्यटनाची अजिबात आवड नाही. महिनोनमहिने तो, त्याची बायको आणि एक छोटा मुलगा कुठेच जात नाहीत. तो फक्त रोज कार्यालयात जातो. राजस्थानी असल्याने बायकोला मैत्रिणी वगैरे फारशा नाहीत. बायकांनी घराबाहेर पडणे जवळ-जवळ अशक्य! शनिवार-रविवारी अगदी जवळच्या कुठल्यातरी मित्राकडे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाकडे जाणे एवढाच काय तो बदल! पण त्याला नवनवीन गॅजेट्सची हौस भारी! आयपॅड, आयफोन, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, महागडी घड्याळे यावर तो बर्‍यापैकी पैसे खर्च करतो. अशी कुठली वस्तू घेतली की तो ४-२ दिवस खूप खुश असतो. ही खुशी म्हणजे सुख म्हणता येईल का? पण ही खुशी पण चार दिवस टिकते; नंतर अंगवळणी पडून नाहीशी होते. एका अतिगरीब माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतील, नव्हे, वेगळ्या असतातच. दोन वेळेला स्वतःला आणि कुटुंबाला पोटभर खायला मिळाले आणि सगळ्यांचे आरोग्य उत्तम असले म्हणजे देखील एखादी व्यक्ती स्वतःला सुखी म्हणवून घेत असेल. सुखाची ही भावना चिरकाल टिकणारी असते का? मला वाटते ही भावना चिरकालीन टिकणारी नसावी कारण त्या भावनेला हादरे देणार्‍या अडचणी असतातच की. कधी काम मिळते, कधी नाही मिळत, कधी घरादारावर गदा येते, कधी मुले-बाळे व्यसनी होतात, कधी मुलीचे लग्न फसते अशा समस्यांचा लकडा असतोच. म्हणजे शुद्ध सुखाची भावना कायम टिकणारी आहे असे म्हणता येणार नाही. शेवटी ती देखील क्षणभंगूरच! मिसळपाव.कॉमवर लिहिलेल्या लेखाला खूप प्रशंसा मिळाली किंवा फेसबुकवर टाकलेल्या फोटोला भरपूर लाईक्स मिळाले म्हणजे मन सुखावते. ही सुखावलेपणाची भावना तशी अल्पायुषीच असते. फार तर दोन दिवस! सुख मानण्यावर असते असेही म्हटले जाते. आम्ही न्यू यॉर्क, नायगाराच्या सहलीला गेलो तेव्हा अमेरिकन सरकारचा बंद होता. ही नवीनच भानगड ऐकली होती. सरकारच बंद! आणि ते बंद असून देखील सगळे सुरळीत चालू होते. आपले सरकार पूर्ण वेळ जागे असून देखील इतका गोंधळ असतो. असो. त्या बंदमुळे वॉशिंग्टन डीसी मधली महत्वाची वस्तूसंग्रहालये, स्मारके, काही खूप सुंदर असे बगिचे वगैरे पर्यटकांसाठी बंद होते. सगळे बुकिंग आधीच झाल्याने काही करता येणे शक्य नव्हते. सगळ्यांनी आमचे सांत्वन केले. "अब क्या देखोगे? तुम्हारे पैसे तो बेकार गये. ठीक हैं, जितना मिले उतना ही देख लेना, क्या कर सकते हैं? थोडा लेट जाना चाहिये था..." वगैरे वगैरे. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं की बराकभाऊंनी होर्डिंग लावलं होतं की त्यांचं सरकार झोपणार आहे म्हणून! पण आता हे सांत्वन ऐकून घावं लागणार होतं. आम्ही सहलीला गेलो. सहल खूप छान पार पडली. डीसी मधली काही ठिकाणे नाहीच पाहता आली. पण रिव्हर पोटोमॅकमध्ये दोन तासांचा क्रुझ करता आला, व्हाईट हाऊस, युएस कॅपिटॉल, राष्ट्राध्यक्षांच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय (मादम तुसॉ) बघता आले, डीसीच्या भव्य रस्त्यांवरून फिरून तिथल्या भव्यतेचा आनंद लुटता आला. आम्ही घरी परत आल्यावर आम्हाला छान वाटले. आपण काही मिस केले म्हणून वैषम्य अजिबात वाटले नाही. इतके पैसे खर्च केले आणि सगळं डीसी नाही बघता आलं असा खेद नावालाही वाटला नाही. हे ही सुख अल्पायुषीच. मनाची समजूत म्हणा हवं तर. मग सुख सुख म्हणजे आहे तरी काय नेमकं? राजकारण्यांना सत्तेसाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष म्हणजे सुख? की इच्छित सत्तास्थान काबीज केल्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे सुख? एखादी अवघड गोष्ट ठरवून, कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला सुख म्हणता येईल? मग तसं म्हणायला गेलं तर कित्येक कुठलीही ध्येये नसणारी, साधी सरळ माणसे सुखातच दिसतात की! साधा टपरीवर काम करणारा मुलगा देखील मजेत असतो. मजेत असणं म्हणजे सुख असते का? जबाबदार्‍या वाढल्या की आयुष्यातली मजा हळू-हळू कमी होत जाते म्हणजेच सुख देखील कमी होत जाते का? अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय? भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत घेता येऊ शकतो का? बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं. अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात काहींना सुख वाटतं तर काहींना फक्त पैसे कमवण्यात. काहींना पर्यटनात आनंद मिळतो तर काहींना खेळण्यात किंवा वाचण्यात. माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी सुख देतात आणि पुढच्या प्रवासासाठी धीर देतात असा अनुभव आहे. मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं (मग ते अगदी 'तुम तो ठहरे परदेसी' किंवा 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' असेल किंवा 'चांदण्यात फिरतांना' किंवा 'बगळ्यांची माळफुले' असेल) की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं. तुमचं काय मत?
  • Log in or register to post comments
  • 27505 views

प्रतिक्रिया

Submitted by दिव्यश्री on Mon, 04/07/2014 - 17:33

Permalink

आवडलं

माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत.>>> +++++++ १ . भारीच लिहिलंय . आवडलं . :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 04/07/2014 - 17:35

Permalink

मस्तच

मनातल लिहीलत. माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे. बाकीचे नंतर लिहीतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 04/07/2014 - 17:38

Permalink

माझा मुलगा काल अचानक पळत येऊन

माझा मुलगा काल अचानक पळत येऊन मला म्हणाला .. "आई.. सन्दे..मन्दे..तुस्दे..वेन्स्दे..थ्स्दे..फ्लाय्दे..सॅतलेदे..सन्देएएएए" आणि टाळ्या पिटायला लागला.. कधी शिकला..माहित नाही.. अचानक का आठवलं त्याला.. माहित नाही.. पण सलग न चुकता त्यानं मला काहीतरी म्हणुन दाखवलं.. २-३ आठ्वडे तो पाळणाघरात गेलेला नाही म्हणजे त्याआधीच शिकला असेल कधीतरि.. पण त्याच्या ते लक्षात होतं.. त्याक्षणी मला जे वाटलं.. ते सुख..! तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.. ज्यावर कष्ट घेतले ती गोष्ट हळुहळु साकार होताना पहाणं म्हणजे सुख असावं.. आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख..
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 04/08/2014 - 11:37

In reply to माझा मुलगा काल अचानक पळत येऊन by पिलीयन रायडर

Permalink

नक्कीच

हे सुख अतुलनीय असणार यात शंकाच नाही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 04/07/2014 - 17:43

Permalink

लेख प्रचंड आवडला.

लेख प्रचंड आवडला. सविस्तर प्रतिसाद देतो थोड्यावेळाने..
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 04/07/2014 - 17:51

Permalink

"स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात.

एखादी ठरवलेली/अनपेक्षित किंवा आवडीची गोष्ट आपल्याला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढी, वाटेल त्या ठिकाणी, वाटेल त्या व्यक्ती सोबत/व्यक्तीविना मनासारखी उपभोगायला मिळणे व त्यातून कायम स्वरूपाचा आनंद प्राप्त होणे व "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. यात भरपूर काम केल्यावर आलेला थकवा घालविण्यासाठी प्रसंगी अगदी दगड/मातीवर झोपायला मिळणे किंवा तुंबून राहिलेले एखादे काम करून मोकळे होणे यात सुद्धा सुख आढळते. ज्यावेळेला असे सुख प्रथम मिळते ते आयुष्यभर लक्षात राहते. पुढच्यावेळी मात्र ते सुख न राहता "सांखिकीय गुणोत्तर" ठरत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Mon, 04/07/2014 - 17:51

Permalink

खुप छान समीर.....

खुप छान समीर..... शेवटचा परिच्छेद खुप आवडला आणि पटला....
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/07/2014 - 17:59

Permalink

छान लिहिलय.

छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Mon, 04/07/2014 - 18:05

Permalink

खूप छान !

लेखन खूप आवडले. सुखाची एकच एक व्याख्या नाहीच करता येणार. तुमची व्याख्या अगदी पटतेय तरी पूर्ण नाही वाटत. आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच !
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/07/2014 - 19:09

In reply to खूप छान ! by मितान

Permalink

+११११

+११११
  • Log in or register to post comments

Submitted by अरणी on Mon, 04/07/2014 - 19:18

Permalink

हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे

हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! असे वपु म्हणाल्याचे आठवते. चुभू दया घ्या आणि जर ती गोष्ट कष्टाने मिळवली असेल तर सुखाची गोडी वाढते. एकंदरीत सुख हे कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष असते असाच आजवरचा अनुभव आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 04/08/2014 - 11:10

In reply to हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे by अरणी

Permalink

नाही पटलं!

हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे म्हणजे सुख! ही सुखाची फारच सोपी आणि ढोबळ व्याख्या झाली. पण ही व्याख्या अजिबात पटण्यासारखी नाही असे वाटते. जास्त पैसे कुणाला नको असतात? म्हणून मला माझ्या नोकरीमध्ये अचानक जर दुप्पट पगार मिळायला लागला तर त्यात मला सुख वाटणार नाही. मला आज एमबीए करण्याची इच्छा आहे म्हणून मला जर कुणी ताबडतोब प्रमाणपत्र आणून दिले तर त्या सुखाला काहीच अर्थ नाही. हिमालय बघायचा असेल तर तिथे जाण्याचे कष्ट घ्यावेच लागतात. आणि त्यानंतर हिमालयाचे दर्शन जास्त सुखावह भासते. जादू झाल्यासारखं जे हवं ते लगेच, ताबडतोब मिळालं तर जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. 'द अल्केमिस्ट' मध्ये काचेच्या वस्तूंचा व्यापारी मक्क्याला जाणे सतत पुढे ढकलतो. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही तो मक्क्याला जाणे टाळतो; कारण मक्क्याला जाऊन आल्यानंतर त्याची ईस्लामची पाच कर्तव्ये पूर्ण होतात. मग जगण्यासारखे काही राहणारच नाही या भीतीने तो मक्क्याला जातच नाही. काहीतरी हवं असणं आणि त्यासाठी झटणं हे सुखाचं पॅकेज आहे. सगळं लगेच हवं तेव्हा मिळणं म्हणजे सुख खचितच नसावं. खरं म्हणजे जे हवं ते लगेच मिळणं म्हणजे आयुष्यातल्या चैतन्याचा मृत्यूच! चैतन्य हे गतिमध्ये आहे. असो. माझं मत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 04/07/2014 - 19:29

Permalink

सुख म्हणजे क्न्पुची गरज स्न्पने.

.
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Mon, 04/07/2014 - 20:19

Permalink

खुपच आवडला लेख, माझ्या सुखाची

खुपच आवडला लेख, माझ्या सुखाची व्याख्या काय? मलाही नक्की समजत नाहिये ... विचार करायला भाग पाडलत समीरसूर..
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/07/2014 - 20:21

Permalink

सुंदर!

सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 04/07/2014 - 20:43

Permalink

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो. भुक लागली कि जेवायला मिळणे, तहान लागल्यावर पाणी मिळणे, उकडत असताना गार वार्‍याची झुळुक येणे, वगैरे सगळे सुखच कि! मी सुखी समाधानी आहे असे म्हणले कि लोक मला अल्पसंतुष्ट म्हणतात. काही लोक तर म्हणतात लो एम इज क्राईम. ही असली माणस ही जगायला लायक नाहीत या स्पर्धेच्या जगात. काय हे किड्या मुंग्यांच जगण?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/07/2014 - 20:45

In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे

Permalink

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार

भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. त्यांनी प्रेमाने मला चाटल की मला आनंद होतो.
:) परवाच एका पुस्तकाचे टायटल वाचले - हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 04/07/2014 - 23:13

In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by शुचि

Permalink

हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज

हाऊ टू बी अ‍ॅज टेरीफीक अ‍ॅज युअर डॉग थिंक्स यु आर
माणसांच्या विचारांची किंमतच नाही कुणाला ;) ई.घ्या. (इनो नवे इझीं घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/08/2014 - 00:09

In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे

Permalink

भूभूच्या नाकावरचा गारपणा ही

भूभूच्या नाकावरचा गारपणा ही एक जीवघेणी गोष्ट आहे. त्याची तुलना झालीच तर माठाच्या गारथंड अन ओलसर स्पर्शाबरोबरच होऊ शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 04/08/2014 - 01:18

In reply to भूभूच्या नाकावरचा गारपणा ही by बॅटमॅन

Permalink

मला ते ओलं नाक आवडत नाही.

मला ते ओलं नाक आवडत नाही. भूभू आवडतो पण भीती वाटते. कॉलेजात एक गावठी भूभू चावलेलं :(
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 04/08/2014 - 11:15

In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे

Permalink

छोट्या गोष्टींमधला आनंद

छोट्या गोष्टींमधला आनंद खरंच जास्त समाधान देऊन जातो असे वाटते. पाषाण तलावावरची रम्य सकाळ खूप आनंद देऊन जाते. भूभू मला पण आवडतात पण मी पाळलेला नाही. त्यांच्या दिवसभरातल्या अ‍ॅक्टीविटीज मजेदार असतात. उगीच शेपूट हलवत कुठेतरी जाणे आणी कान टवकारून एकटक बघत राहणे, जीभ बाहेर काढून हसणे, समोरचे दोन पाय एकमेकांवर दुमडून टाकणे आणि गहन विचारात बुडून जाणे..हे सगळं बघण्यात देखील मजा आहे बुआ. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 04/08/2014 - 14:54

In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे

Permalink

+१

प्रत्येक वाक्याशी सहमत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 04/07/2014 - 21:38

Permalink

सुख-दु:ख

छान लिहिले आहे. हवी-हवीशी वाटणारी, कधी संपू नये अशी वाटणारी अनुभूति म्हणजे सुख, तर याविरुद्ध असणारी अनुभूति म्हणजे दु:ख असं म्हणता येईल. पण सुख-दु:ख हे एकमेकांशी निगडीतच असतं, जश्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अति झालं, की तेच सुख दु:खात परिवर्तित होतं, जसं गोड खायला आवडावं, पण ते खाता खाता एक वेळ अशी येते, की मग ते नकोसं वाटू लागतं. सुखाची चव कळायला दु:खाचा अनुभव पण आवश्यक असतो. या विषयी एक गोष्ट वाचनात आली आहे ती अशी, की एका राजाला (कदाचित अकबर) त्याची राजनर्तकी फार आवडत असते, तिचं मात्र राजाच्या अंगरक्षकावर प्रेम असतं. हे राजाला समजल्यावर तो त्या दोघांना बोलावून विचारतो, ती दोघे एकमेकांच्या सहवासात कायम राहण्याची इच्छा प्रकट करतात. मग राजा त्यांना परवानगी देतो, ती दोघे आनंदाने मिठी मारतात. मात्र राजा त्यांना कायम एकमेकांच्या सहवासात राहता यावे, म्हणून त्यांना आलिंगनबद्ध अवस्थेत करकचून बांधून टाकतो, काही काळाने उकाडा, घामाची दुर्गंधी, बांधलेल्या अवस्थेतच शौच्यादि करावे लागणे, वगैरेंमुळे ते दोघे इतके कातावतात, की यापुढे त्यांना एकमेकांचे तोंडही बघू नये असे होते.... सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल, हा विचार अनेक प्रकारच्या 'तपश्चर्यां' च्या मुळाशी असावा. काट्यांच्या शैय्येवर निजणे, पंचाग्निसाधन वगैरे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 04/10/2014 - 02:33

In reply to सुख-दु:ख by चित्रगुप्त

Permalink

रोचक पण इथे

बंदिस्तपणा सुखाच्या मुळावर उठ्लाय... व दुःख बनला या न्यायाने सुख म्हणजे स्त्रिमुक्ती म्हणता येइल. कारण स्त्री जर मुक्त झाली तर पुरूषाचे जोखड सुधा नाहीसे नाही का होणार ? पहा विचार करा सामिल वहा
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 04/07/2014 - 23:00

Permalink

कल्पने पलीकडील आनंदाची अनुभुती म्हणजे सुख होय.

हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 04/07/2014 - 23:04

Permalink

हवेहवेसे वाटाणारे मिळणे

हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 04/08/2014 - 16:56

In reply to हवेहवेसे वाटाणारे मिळणे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मिळालेले हवेहवेसे वाटणे

मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख! सहमत आहे आणि सुखीही !!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 04/08/2014 - 20:15

In reply to हवेहवेसे वाटाणारे मिळणे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हे छानच! शिवाय डोक्यालाही

हे छानच! शिवाय डोक्यालाही शांतता हा बोनस!
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Mon, 04/07/2014 - 23:06

Permalink

छान लेख. आवडला !

सुखावर लिहावेसे वाटणे हे देखीले एक सुखी माणसाचे लक्षण आहे. तर अभिनंदन, तुम्ही सुखी आहात :) बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/07/2014 - 23:24

In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक

Permalink

क्या बात है!

:) क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 04/08/2014 - 11:26

In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक

Permalink

सुरेख

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. सुरेख! मी सुखी आहे का? माहित नाही. आणि हीच खरी गंमत आहे. स्वतःला नाही मोजता येत. दुसर्‍यांची मापं व्यवस्थित काढता येतात. :-) खूप कठीण परिस्थिती असणारी काही माणसे असतात. अगदी पर्वताएवढी संकटं असतात काहींच्या आयुष्यांत. आरोग्य, गरीबी, व्यसनं, गुन्हेगारी, अपघात, अन्याय अशा अनेक कारणांमुळे काही माणसांना अतिशय प्रखर दु:खाचा सामना करावा लागतो. अशा माणसांविषयी नक्कीच आदर वाटतो. आयुष्यच एक संकट वाटावं किंवा जगणं नकोनकोसं वाटावं ही दु:खाची परिसीमा झाली. असं पराकोटीचं दु:ख आयुष्यात नसणं म्हणजे देखील एक प्रकारचं सुखच असावं. फक्त ते नॉर्मल आयुष्यात जाणवत नाही. खरं तर ते सगळ्यात मोठं सुख असावं. बाकी पैसा, मान, वस्तूंचा संग्रह वगैरे तर येत-जात असतात. आयुष्याच्या शेवटी या सगळ्यांची किंमत फारशी वाटत नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदराव on Sat, 04/12/2014 - 16:01

In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक

Permalink

बिछान्यावर आडवे होऊन

बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.<h1> १००% बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 04/08/2014 - 03:15

Permalink

Be more with less

समीरसूरः लेख आवडला. Parable of The Mexican Fisherman And The Banker आठवली, बर्‍याच जणांनी वाचली असेलच, इतरांसाठी देतो आहे: एक श्रीमंत अमेरिकन गुंतवणूक उद्योजक खूप व्यग्र आयुष्यातून वेळ काढून सुटीसाठी समुद्रकिनारीच्या छोट्याशा मेक्सिकन खेड्यात गेलेला असतो. त्याला तिथे केवळ एकच लहान बोट बांधून ठेवलेली दिसते, बोटीत काही मोठे ताजे मासे असतात आणि नावाडी उन्हाची तिरीप टाळण्यासाठी डोळ्यांवर टोपी ठेवून माडाच्या झाडाखाली पहुडलेला असतो. ते उत्तम मासे पाहून अमेरिकन उद्योजक त्या नावाड्याला विचारतो: "मासे फारच चांगले दिसताहेत, किती वेळ लागला तुला हे पकडायला?" नावाडी: "फार काही नाही, दोन-चार तासांत पकडले." अमेरिकन उद्योजक: "अरे, आणखी काही तास का नाही राहिलास समुद्रात, भरपूर कमाई झाली असती!" नावाडी: "काय करू आणखी वेळ वाया घालवून? झटपट काम आटपलं, माझ्या कुटुंबाला उद्याला आवश्यक इतके पैसे देतील इतके मासे मिळाले, बास झालं!" अमेरिकन उद्योजक: "इथंच तुम्हा लोकांचं चुकतं! अरे, तू मासेमारीचा वेळ वाचवून करतोस काय त्या वेळाचं?" नावाडी: "अहो सिन्योर, मी चांगली झोप काढतो, माझ्या मुलांबरोबर खेळतो, बायकोबरोबर मस्त वेळ काढतो, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकतो, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणतो..." अमेरिकन उद्योजक: "अरे बाबा, मी आयव्ही लीग युनिव्हर्सिटीतून एम बी ए केलंय, मी तुला यशस्वी व्हायला मदत करू शकेन." नावाडी: "ती कशी बुवा?" अमेरिकन उद्योजक: "हे बघ, तू मासेमारीत दर दिवशी आधिक वेळ घालवलास की मासे विकून तुला मोठी बोट घेता येईल, एका मोठ्या बोटीत आणखी जास्त मासे मिळवलेस की त्या पैशांत आणखी काही बोटी विकत घेऊन तू स्वतःचा मोठा व्यवसाय करू शकशील, मग मधल्या दलालाला मासे विकण्यापेक्षा सरळ स्वतःच थेट पंचतारांकित हॉटेल्सना मार्केटिंग करू शकशील." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू स्वत:चं वितरणाचं जाळं निर्माण करू शकशील, गोदामं विकत घेऊन त्यांत फ्रीझर्समध्ये मासे ठेवू शकशील आणि जगभर पुरवू शकशील..." नावाडी: "आणि मग?" अमेरिकन उद्योजक: "मग तू मेक्सिको सिटीसारख्या मोठ्या शहरात आलीशान घरात रहायला जाशील, तुझ्या कंपनीचा आयपीओ निघेल, तुझ्या कंपनीचे शेअर्स जगभरातून लोक विकत घेतील आणि तू गडगंज श्रीमंत होशील?" नावाडी: "काय म्हणता काय? या सगळ्याला किती वेळ लागेल हो?" अमेरिकन उद्योजक: "फक्त १०-१५ वर्षं! मग सगळी मजाच आहे!" नावाडी: "आणि मग काय होईल?" अमेरिकन उद्योजक: "अरे मग तू त्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून लांब, मस्त चार-दोन मासे पकडून झाले की, अशा शांत किनारी पहूडशील, झोप काढशील, तुझ्या मुलांबरोबर खेळशील, बायकोबरोबर मस्त वेळ काढशील, संध्याकाळी गावात मित्रांबरोबर भटकशील, मनसोक्त खाणं-पिणं झालं की गिटार वाजवून गाणी म्हणशील..."
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Tue, 04/08/2014 - 10:11

In reply to Be more with less by बहुगुणी

Permalink

सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी

सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी वर्जनमध्ये वाचलेली. एवढे सारे डिटेल नव्हते पण झाडाखाली आरामात झोपलेल्या एका माणसाला मेहनत करून पैसा कमवायचा आणि मग म्हातारपणी आराम करायचा असा उपदेश देणार्‍याचा त्याने असाच पोपट केला होता. पण या फंड्यामध्ये एक गोची अशी आहे की मेहनत करून पैसा आपण फक्त स्वतासाठी म्हणून नाही कमवत तर काही जणांची जबाबदारी सुद्धा आपल्यावर असते. सुख हे पैसा कमवून स्वता आराम करण्यात नाही तर आपल्या जीवलगांना आरामात ठेवण्यात आहे. कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतोय हि खरी सुखाची जाणीव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Anvita on Tue, 04/08/2014 - 08:53

Permalink

छान लेख!

छान लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 04/08/2014 - 09:03

Permalink

कुणी आपल्याला सुखं व्हावं

कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Tue, 04/08/2014 - 11:33

In reply to कुणी आपल्याला सुखं व्हावं by स्पंदना

Permalink

छान

छान व्याख्या. पण अर्थात अनेक सुखांच्या कल्पनांपैकी ही एक. आदर मिळणं, मान मिळणं, प्रेमापोटी कुणीतरी काळजी घेणं या गोष्टी सुखावून जातातच. अजून एक, कुणाचा तरी तिरस्कार करणं, कुणाला तरी शिव्या हासडणं, कुणापेक्षा मी जरा वरच्या लेव्हलला आहे असं मानणं ही मानवी मनाची गरज असते. टू लिव अ हॅपी लाईफ, इट इज अ‍ॅज एसेन्शियल टू हेट सम पीपल ऑर थिंग्ज अ‍ॅज इट इज टू लव अ फ्यू अदर्स. कुणाचा किंवा कुठल्यातरी बाबींचा किंवा वस्तूंचा तिरस्कार करणं ही मानवी मनाची भावनिक गरज असते. जाणते-अजाणतेपणी आपण आपली ही गरज भागवून घेत असतो. गंमत आहे, नाही? :-) मानवी मन म्हणजे जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Tue, 04/08/2014 - 09:56

Permalink

Quotable quotes..!!

>> माणसाच्या सुखाच्या व्याख्या कालानुरुप व असलेल्या परीस्थितीनुसार बदलत जातात हे ही तेव्हढेच खरे आहे.>> >> आपल्या कष्टाचं चीज.. म्हणजे सुख.. >> >> "स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात. >> >> आपल्याला वाटतंय ते शब्दात उतरवता येणं हे ही सूखंच ! >> >> भुभु लोकांच्या नाकाचा गारगार स्पर्श मला रोमांचित करतो. >> >> सुख हे जर दु:खात परिवर्तित होऊ शकतं, तर दु:ख हे सुद्धा सुखात परिवर्तित होऊ शकेल.. >> >> हवेहवेसे वाटाणारे मिळणे सुखकारक होईलच असे नाही... पण मिळालेले हवेहवेसे वाटणे म्हणजेच सुख ! >> >> बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख. >> >> कुणी आपल्याला सुखं व्हावं म्हणुन काही करु पहातो ते म्हणजे सुख! >> कोटेबल कोट्स चं पोटेन्शिअल असलेली भरपुर वाक्य आहेत हां प्रतिसादात. लेखाचा शेवटचा पॅरा तर फुल्ल कोट्च आहे. पण ... >> हे चिरकाल हवे असेल तर कल्पना लोप पावली पाहिजे. >> ईथे मात्र गोची आहे हां. कल्पनाच लोप पावली तर स्वप्नाळु लोकांनी काय करायच?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 04/08/2014 - 10:06

Permalink

छान लिहिलय. आवडलं!

छान लिहिलय. आवडलं!
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Tue, 04/08/2014 - 10:32

Permalink

छान लेख्..आवडला

छान लेख्..आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 04/08/2014 - 10:45

Permalink

मस्त लिहिलंय!

आवडलंच. वाचताना वाचनाचं सुख मिळालं पुरेपूर! सुख काय किंवा आनंद याच्या कल्पना व्यक्तीनुसार बदलतात. त्याच्या कंडिशनिंगवर अवलंबून असतात. आणि त्यावर खूपदा आजूबाजूची परिस्थिती, इतर दडपणं यांचाही परिणाम होतो. अर्थात ज्यांचं सुख ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं, ते खरे सुखी. मात्र दु:खाचा अभाव म्हणजे सुख असेलच असं काही सांगता येणार नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 04/08/2014 - 11:42

Permalink

'माझे खाद्यजीवन' या लेखाच्या

'माझे खाद्यजीवन' या लेखाच्या शेवटी पुलंनी लिहिलेली सुखाची कल्पना आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by हवालदार on Tue, 04/08/2014 - 14:41

Permalink

तहानलेले असताना

गार पाणि मिळणे आणि घाईची लागलेली असताना सोडायला मिळणे तो सुखी मनुश्य. एकन्दरीत तहान असणे आणि ती शमवली जाउ शकणे हे खरे सुख असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/08/2014 - 14:52

In reply to तहानलेले असताना by हवालदार

Permalink

दोन्हीबद्दल प्रचंड सहमत!!!!

दोन्हीबद्दल प्रचंड सहमत!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Tue, 04/08/2014 - 15:41

Permalink

छान लेख. विचार करायला भाग

छान लेख. विचार करायला भाग पाडलंत एवधं खरं. मी सुखी आहे का नाही? खरंच माहीत नाही. कदाचित खूप विचार करून सुखाच्या संकल्पना उगाच कीचकट करून ठेवल्यात मी. बहुतेक असा सुख दु:खाचा विचारच करत न बसणारी माणसं जास्त सुखी असावीत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पेट थेरपी on Tue, 04/08/2014 - 16:39

Permalink

हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप

हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप वाट्ते. गॅजेट आवडत नाही. छोट्या गोष्टीत खूष आहे. इत्यादी. पण इतरांची सुखाची व्याख्या निराळी असू शकते. अगदी व्यक्तिसापेक्ष आहे हे. जीवनात खूप झगडलेले तरी ही यशस्वी न झालेले, खूप काही हरवलेले जीव असतात किंवा हकनाक अन्यायाचे बळी झालेले लोक असतात त्यांना सूख नको असते का पण नाही मिळत. अपंग, मूक बधिर, मानसिक आजारी लोक, अत्याचार सहन केलेली लहान मुले, टाकलेली अनाथ मुले, बायका ह्यांना पण सुखाची गरज आहेच. इट इज अ व्हेरी पर्सनल जर्नी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 04/08/2014 - 17:46

In reply to हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप by पेट थेरपी

Permalink

+१

रिव्हर्स स्नॉबरीबद्दल सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 04/09/2014 - 19:48

In reply to हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप by पेट थेरपी

Permalink

असेल

रिव्हर्स स्नॉबरी अशी काही थिअरी असू शकेल पण त्याने मनाचे समाधान कसे मिळणार? भव्य काही घडवणे जमत नाही म्हणून कुणाला लहान-सहान गोष्टींमध्येच आनंद मिळतो अशी फुशारकी मारता येईल पण स्वतःला कसे फसवणार? मन अशांतच राहील अशा परिस्थितीमध्ये. माझ्या एका प्रतिसादात मी संकटग्रस्त लोकांच्या सुखाच्या कल्पनेविषयी लिहिले आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना अगदी भिन्न असू शकतील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुखाच्या कल्पना व्यक्तीसापेक्षच आहेत. पण ढोबळ अर्थाने ज्याला सुख म्हटले जाते ते सुख तितकेसे सकस नसते असेच वाटते. नारायणमूर्तींनी ठरवलं तर ते कुठेही बिझनेस क्लासने आरामदायी प्रवास करू शकतात. हजारो कोटींची संपत्ती असलेला हा माणूस सहसा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. यात रिव्हर्स स्नॉबरीपेक्षा मोठ्या ध्येयांकडे असलेली दृष्टी जास्त महत्वाची असावी असे वाटते. एक मित्र मी अमेरिकेत ज्या गावात राहत होतो तिथून कुटुंबासहित अटलांटा शहर बघण्यासाठी ३.५ दिवस गेला. दोन-तीन नेहमीची आकर्षणे पाहिल्यानंतर त्यांनी तिथल्या ग्लोबल मॉलमध्ये १.५ दिवस फक्त भारतीय पदार्थ खाण्यात घालवले. मी अटलांटाला जाऊन आल्यानंतर २ दिवसात काय काय पाहिले हे सांगीतले. तो म्हटला "यार, ये सब तो हमने देखा ही नही. हम सिर्फ इंडियन खाने पे अटके हुए थे". मी त्याला सांगीतलं की आम्ही २ दिवसाचे खाण्याचे पदार्थ सोबत घेउन गेलो होतो. त्यामुळे आमचा हॉटेलमध्ये खाण्याचा वेळ आणि खर्च वाचला आणि तेवढे अधिक स्थलदर्शन करता आले. फोकस फिरण्यावर होता, जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणे पाहण्यावर, अनुभवण्यावर होता; खाण्यावर नाही. भारतीय पदार्थ एरवी आपण नेहमीच खातच असतो की. अगदी अमेरिकेत घरीसुद्धा भारतीय पदार्थ करता येतातच. मग त्या नेहमीच्या अ‍ॅक्टीविटीवर आपला सहलीमधला अमूल्य वेळ का दवडा? त्याला पटले. अर्थात, त्याच्या सुखाची कल्पना निराळी असू शकते. मला वाटते फोकस महत्वाचा असतो. काय अपेक्षित आहे त्यावर फोकस केला की बाकी गोष्टी गौण ठरवून इच्छित गोष्टींचा पुरेपूर आनंद घेता येतो. आणि मनाला खरे समाधान लाभते. तेच सुख, अजून वेगळे काय? बर्‍याच लोकांना पैसे खर्च करतांना किंवा कुठलीही गोष्ट करतांना हा फोकस लक्षात येत नाही. नको तिथे नको ते वाचवतांना किंवा टाळतांना बर्‍याच आनंदांना मुकतो आपण. सगळ्यांकडे आहे म्हणून मलाही स्मार्टफोन घ्यायचा; सगळे वापरतात म्हणून मलाही कार हवी, सगळ्यांकडे आलिशान फर्निचर आहे म्हणजे आपल्याकडे हवेच हवे; नाहीतर लोकं काय म्हणतील अशा भावनेपोटीच अनावश्यक वस्तूसंग्रहालय तयार होत जाते. आणि मग अ‍ॅटॅचमेंट्स तयार होत जातात. आपण नेमके या अ‍ॅटॅचमेंट्सना सुख समजण्याची चूक करून बसतो. :-) नायगारा धबधबा बघून आल्यावर तिथल्या 'मेड ऑफ द मिस्ट' क्रूझची तिकिटे जपून ठेवावीत असे बायकोने सुचवले. मी कशासाठी जपून ठेवायची असे विचारले. "आठवण म्हणून" असे उत्तर आल्यानंतर मला हसू आले. मी म्हटलं आपल्या मनात आठवण आहे; आणि तो धबधबा पाहिला तो क्षण आपण उपभोगला आहे; अजून काय पाहिजे? किती वेळा ते तिकिट पाहणार आहेस तू? आणि ते तिकिट बघून आपल्याला तो क्षण अनुभवता येणार नाही पण मनात साद घातल्यानंतर मात्र तो क्षण कदाचित आपल्याला पुन्हा अनुभवता येईल; मग कागदाच्या त्या तुकड्याचे जोखड कशासाठी? तिला पटलं. आनंद वस्तूंमध्ये सहसा नसतो; त्या वस्तू आणि त्याहूनही कैक पटीने महत्वाचे असे काही हासिल करण्याच्या क्षमतेत आणि प्रक्रियेत असतो असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 04/08/2014 - 16:43

Permalink

समाधान!

"समाधान हे सुखाचे मुळ आहे" ही माझी सुखाची व्याख्या आहे. लेखही चांगलाय
  • Log in or register to post comments

Submitted by भावना कल्लोळ on Tue, 04/08/2014 - 17:14

Permalink

आपल्यामुल चारजनाच्या

आपल्यामुल चारजनाच्या चेहऱ्यावर आलेले हसू म्हणजे सुख, चार घटका मित्र मैत्रीणीसोबत हसत खेळत घालवणे म्हणजे सुख, दमडी हातात नसतांना अथक प्रयत्नाने उभ्या केलेल्या घराच्या गृहप्रवेशावेळी बंद दरवाज्यावरून हात फिरवताना आलेले अश्रू म्हणजे सुख, मातृत्वची चाहुल व ते निभावताना तो प्रत्येक क्षण अनुभवणे म्हणजे सुख. हिरव्यागार गवतावर पाडून चांदण्या रात्री आसमंत न्याहाळणे म्हणजे सुख, भुकेल्या निरागस जीवाला अन्न दिल्यावर त्याने पहिला घास घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे सुख. स्वताला उपेक्षित समजणाऱ्या जीवाला मैत्रीपुर्ण दिलेली साद म्हणजे सुख. पहिल्या पावसात मनसोक्त भिजणे म्हणजे सुख. माझी तरी हीच व्याख्या आहे. जे आहे, जे हवे आहे ते देतांना येणारी अनुभुती म्हणजे सुख.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com