ती आणि तिचा भाऊ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ती आणि तिचा भाऊ
(ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती)
.....अचानक समोर तिला तिच्या ओळखीची परी दिसली.—घामाघूम व धोडीशी घाबरलेली. “अगं, तुझा भाऊ वर आलाय, मी किती वेळ शोधत्येय तुला सांगायला”. “काय?” ती किंचाळली. “पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला गेल्याच पक्षात पृथ्विदर्शन वर पाह्यलं होतं”. हातांतली फुलं तिने परीकडे सोपवली व ती सुसाट निघाली. “अगं पण तो कुठे आहे हे तरी सांगूदे मला”, परी म्हणाली. “कांही आवश्यकता नाही, मला कल्पना आहे, आणि तिथं तो नसला तर त्याला शोधून काढेनच की मी” ती जाताजाता ओरडली. “पण त्या भूजन्गाच्या रस्त्याने जाऊ नकोस”, परीने उलट ओरडून सांगितलं पण तो पर्यंत ती दृष्टीआड झाली होती. विविधरंगी ट्युलिपच्या ताटव्यांतून कधी सुसाट धांवत तर कधी हळुवार तरंगत ती महावृक्षापर्यंत पोचली.
..............इथून समोर भूजन्गाचा प्रदेश सुरु होत होता. या भूजन्गाबद्दल फारसं कुणालाच कांही ठाऊक नव्हतं. परी सांगायची की तो इथं आदिकालापासून आहे म्हणजे इथली ही वस्ती वसायच्या आधीपासून; कुठून इथं वर आला कुणास ठाऊक पण इथले कुठलेच नियम त्याला लागू नाहींत किंवा तो ते जुमानत नाहीं. कुठलाही व्यक्ति-आत्मा त्याच्या प्रदेशात चुकून गेला तर तो तिथेच अद्दृश्य होत असावा. तसं पहायला गेलं तर व्यक्ति-आत्मे नियमितपणे या वस्तीतून दिसेनासे व्हायचे, पण इथं कुणालाच त्याची क्षिती नव्हती. शिवाय इथं इतर व्यक्ति-आत्म्यान्समवेत संपर्क ठेवणं ऐच्छिक –वैकल्पिक होतं. प्रत्येक व्यक्ति-आत्म्याला एक विशिष्ठ फ्रेक्वन्सी दिलेली असायची व या आपल्या फ्रेक्वन्सीत एकट राहणं सगळ्यांनाच शक्य असे व बहुसंख्य व्यक्ति-आत्मे हाच पर्याय निवडायचे. वर आल्यानंतर हे सर्वात मोठ स्थित्यन्तर असायचं, खालच्या जगातले सर्व अनुबंध वर येताना तुटून पडलेले. ती एकटीच याला अपवाद होती. या वस्तीचे सर्वे संकेत पाळून ती मनाने राह्यची मात्र खालच्या जगांत जे तिने कधीच पाह्यलं नव्हतं.
......वस्तीच्या अभ्यासिकेत जायला सुरूवात झाल्यापासून तिच्या लक्षात आलं की तिचा यंत्र व यंत्रणा-systems कडे खूप मोठा कल आहे. तिने दीर्घ काळ अभ्यास-श्रम घेऊन या वस्तीचे खाली पृथ्वीवर असलेले सर्व बंद मॉनीटर बऱ्याच काळानंतर re-activate केले व आता ती वस्तीच्या वाचनालयात असलेल्या पृथ्विदर्शन वर सर्व काही व सर्वांना पृथ्विदर्शन वर बघू शकायची. कधी कधी युरोपमधील कुठल्या तरी एका देशातून आलेली एक वृद्धा त्या कक्षांत तिला दिसायची. बाकी कुणीच तिथं फिरकायचं नाहीं. पृथ्वीदर्शनवर काय पहायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं व त्या वर्तुळात प्रथम बरेच दिवस फक्त तिची आई होती, आपल्याला दोन मोठ्या बहिणी आहेत हे जेंव्हा तिला समजलं तेंव्हाच तिला उमजलं की आपण या वस्तीत का आलो ते. तिचा मूड कांही क्षण काळवंडला पण तो कांही क्षणच. लगेचच तिने तिच्या दोन्ही मोठ्या बहिणीनादेखील त्या वर्तुळात सामावून घेतलं.त्या तिघींत विशेषतः त्यांच्या वागण्यात आपण कुठे दिसतो का ते ती शोधत बसायची. याच दरम्यान तिची परीशी ओळख झाली. या विषयावर बोलतांना परी तिला म्हणाली, “यावर तू जास्त विचार करत बसू नकोस. एखाद्या कुटुंबात तुम्ही जन्मला तर त्या कुटुंबाशी तुमचं शारीरिक साधर्म्य असतं इतकंच, बाकी कांहीही खरं नसतं.” एकदा तिने तिच्या बहिणींबरोबर तिच्या काकाच्या दोन मुलांना पाह्यलं व तिला ते दोघे खूप आवडले व तिचं वर्तुळ अजून विस्तृत झालं. या व्यक्तींना दिवसाच्या कुठल्याही क्षणी ती पाहू शकत होती.
सुरुवातीस पृथ्वी ‘पहायची’ म्हणून व पृथ्वीदर्शनवर ती सर्व कांही बघू शकते म्हणून नंतर तिने पृथ्वीवरचं सर्व कांही—तिथले चित्रपट-नाटकं, टीव्हीवरचे कार्यक्रम, प्रदर्शनं, संगीत महोत्सव—पाह्यला सुरूवात केली पण कांही अपवाद सोडता या सर्वांत तिला फारसा इंटरेस्ट वाटला नाहीं. इथंही तिनं एक वर्तुळ आंखून घेतलं. पृथ्वीदर्शन पाह्यला गेल्यानंतर भेटणारया वृद्धेला संगीत सोडून इतर कशातही इंटरेस्ट नव्हता.”तुमचं भारतीय शास्त्रीय संगीतसुद्धा खूप छान आहे, ऐकून बघ तरी एकदा”. ती हिला सांगायची. “बघू नंतर कधी तरी’, ती म्हणायची. पृथ्वीदर्शन पाहून झाल्यानंतर तिच्या परीबरोबरच्या गप्पा छान रंगायच्या. “अगं, पृथ्वी खरंच किती सुंदर आहे. इथं आपल्याकडे पृथ्वीच्या तुलनेने कांहीच नाहीं. समुद्र नांहीएत, बर्फाचे डोंगर नाहीत की वाळवंट नाहीं. किती प्रकारची जिवंत माणसं व प्राणी आहेत तिथे.” किंवा “छोटी दीदी अमेरिका नावाच्या देशाला जायच्या प्रयत्नात आहे,” व “आई पुढच्या पक्षात मोठ्या दिदीकडे जाईल बहुधा” असलंच कांहीतरी. पण हे सारं सांगताना ती खुपच उत्तेजित व्हायची व कधी कधी तिचे डोळे पाणवायचे.
कांही क्षण ती महावृक्षाजवळ थांबली व तिने अंदाज घेतला. भुजन्गाचा चौकोनी प्रदेश टाळायचा म्हणजे डावीकडे किंवा उजवीकडे वळायचे व एक लांबलचक डीटूर घेऊन भुजंग-प्रदेशाच्या पूर्वेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या सीमेपर्यंत पोचायचे व पुन्हा वळून उत्तरेकडे जायचे व परत तेवढंच अंतर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे जाऊन पलीकडच्या महावृक्षा पर्यंत पोचल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिने क्षणभर विचार केला—या वस्तीतील कांही विचित्र व्यक्ति-आत्मे नवागतांची वाटच पाहत असतात व त्यांनी तिच्या भावाला हेरण्यापुर्वी तिला तिथं पोचलं पाहिजे. आत्ता मात्र तिने विचार करणं थांबवलं व सरळ भुजन्गाच्या प्रदेशांत प्रवेश केला. जितकं शक्य होतं तितक्या वेगाने समोर अस्पष्ट दिसणाऱ्या पलीकडच्या महावृक्षेच्या दिशेने ती भरधांव सुटली, तिने एकदाही आजूबाजूला किंवा मागे वळून पाह्यलं नाही. समोर कुणीच आडवं आलं नाहीं किंवा मागून कुणाचे विषारी फुत्कार देखिल तिला ऐकू आले नाहींत किंवा ऐकू आले नसावेत. भुजंग –प्रदेशाच्या बाहेर असलेल्या दुसऱ्या महावृक्षाजवळ ती कांही क्षण थांबली. “नाही, तो इथे तिथे नाही भटकायचा, निदान अजून तरी” ती स्वतःशीच म्हणाली. “प्रवेशद्वाराजवळच असेल कुठं तरी”. आणि तो तिला दिसला. दोन्ही गुडघ्यांत डोकं व दोन्ही हात गुडघ्याभंवती. त्याचं हे एकलेपण तिला स्पर्शून गेलं. ती त्याच्या जवळ गेली व कांहीक्षण स्तब्ध उभी राह्यली.
कुणीतरी शेजारी उभं आहे हे त्याला जाणवलं व त्याने गुडघ्यातून डोकं वर केलं व तिच्याकडे प्रश्नार्थक मुड्रेने पाह्यलं. डोळे रडून सुजलेले व चेहरा देखील लाल-ताम्बुस झालेला. “मी दीदी आहे तुझी” ती हळुवारपणे म्हणाली. “पण ...? त्याच्या प्रश्नाचा रोख तिच्या लक्षात आला. “मी तुझी तिसरी दीदी –त्या दोघींच्या मागची—पण माझ्याबद्द्दल कुणालाच कांही बहुधा ठाऊक नसावं –तुझी चाची सोडून”. “नाही, तुझ्याबद्दल कुणीच कांही बोललं नाही कधी” तो म्हणाला. “हे बघ, मला कल्पना आहे तुला कसं आत्ता वाटतंय ते, पण हे सारं कांही बदलायला सुरुवात होईल कांही क्षणातच, नंतर तुला कांहीच वाटायचं नाही उलट आश्चर्यच वाटेल हे कसं झालं म्हणून किंवा असं कसं होऊ शकते. खाली पृथ्वीवर सुद्धा असंच होतं पण बराच काळ जायला लागतो तिथं कुठलंही दुःख विसरायला. इथं एक दोन दिवसातच सर्व विसरू शकतो आपण”. ती थोडा वेळ थांबली व हंसत म्हणाली “तुझी खरीखुरी दीदी इथंच आहे हे तू मात्र विसरता नये हे लक्षात ठेव. इथं असताना इथल्या नियमानुसार आपण पृथ्वीवरील सर्वांना विसरतो, पण पृथ्वीवरच्या कांही व्यक्तींना तुला विसरायचं नसेल तर ते आपण तसं manage करू शकतो. पण याच्याबद्दल आपण नंतर बोलूया.” पुन्हा एकदा ती क्षणभर थांबली व त्याचं निरीक्षण केलं, तिचा अंदाज बरोबर होता—विसरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती, तिने पुन्हा सुरुवात केली, “इथं देखील खोडसाळ व्यक्ती-आत्मे आहेत, त्यातले कांहीजण पुनर्जन्माचे एजंट आहेत. कुणीतरी येऊन सांगेल तुला”, “तुमच्या घरातच तुला आम्ही पुनर्जन्म घेऊन पाठवतो, तुला तुझी सर्व माणसं मिळतील पुन्हा एकदा” तिने मग त्याला बजावून सांगितलं, “ अशा कुणाच्या बतावाणीवर अजिबात विश्वास ठेऊ नकोस, मला नाही जायचं पुन्हा खाली म्हणून सांगून टाक त्यांना.” त्याने शांतपणे तीचं सर्व कांही ऐकून घेतलं व आपली नजर त्याने फिरवली व तो म्हणाला, “पण मला खरंच जायचं असेल तर खाली पुन्हा एकदा तर?” त्याच्या या प्रश्नाने ती थोडीशी हबकली पण स्वतःला लगेचं सांवरून म्हणाली, “माझं स्वतःचं संशोधन चालू आहे या विषयावर, पण मला आत्ता तरी पुनर्जन्म म्हणजे एक फ्रॉड् वाटतंय.” तिने आकाशाकडे पाह्यलं व म्हणाली, “नंतर बोलूया या विषयावर आपण. मला गेलं पाहिजे आत्ता, नवीन व्यक्ती-आत्म्यांबरोबर जास्त वेळ घालविता येत नाही, इथं बरेच संकेत आहेत. अजून एक गोष्टं लक्षात ठेव. पश्चिमेला भुजंग-प्रदेश आहे, तिथं चूकुनहि जाऊ नकोस, मी उद्या येते इथंच याच वेळेस. कोणी पुनर्जन्मवाला आलाच व तुला त्याच्याशी अजिबात बोलायचं नसेल तर डोळे मिटून घे व उजवा हात डावीकडे हृदयावर ठेव. डोळे उघडशील तेंव्हा समोर कुणीच दिसणार नाही. गेल्याच आठवड्यात तुला क्रिकेट खेळतांना मी पाह्यलं होतं, मग असा अचानक कसा आलास इथं? मी येते उद्या”.
दुसऱ्या दिवशी प्रथम ती पृथ्वीदर्शन पहायला गेली; तिला पृथ्वीवरचं दुःख कसं असतं ते जवळून पाह्यचं होतं. जमल्यास तो असं अचानक खालून वर कसा आला हे देखील तिला जाणून घ्यायचं होतं. प्रत्यक्षात मात्र तिच्या काकाच्या घरातलं वातावरण पाहून तिला रडू कोसळलं. तिची आई व मोठी दीदी तिला तिथं दिसली व तिला कळलं कि तिच्या छोट्या दीदीला अमेरिकेत जाऊन कांही महिनेच झाले होते. तिला जास्त कांही पाहवेना, आपण नंतर त्याला विचारू त्याच्या इथं असं अचानक येण्याबद्दल. शिवाय तिने त्याला यायला सांगितलं ती वेळ देखील टळून जात होती. ती तिथं पोचली तेंव्हा तो तिला दिसला. तिची वाटच पाहत होता. “आज सगळ बदललंय, तो सांवरलेला दिसतोय पण मला मात्र कोसळल्यासारख झालंय.” ती स्वतःशीच पुटपुटली. आपला रडवेला चेहरा तिने ठीकठाक केला. त्याने हसून तीचं स्वागत केलं. “बरचसं विसरून गेलेला दिसतोय” ती स्वतःशीच म्हणाली. “दीदी, बरं झालं तू मला त्या पुनर्जन्म एजंट बद्दल सांगितलस ते, कारण दोघं आले होते तू इथून गेल्यानंतर. पण तू मला सांग, तुला कसं माहित झालं की मी गेल्या आठवडयात क्रिकेट खेळत होतो ते? इथं आहे का असं कांही ज्याने आपण खाली काय चाललंय ते पाहू शकू?” तिला हा प्रश्न पूर्णपणे अपेक्षित होता व तिचं उत्तरहि तयार होतं. “हो आहे ना इथं एक पृथ्विदर्शन, पण ते मधूनच कधीतरी दाखवितात, कधी ते सांगता येत नाही.” तिला सहज त्याला अभ्यासिकेत नेता आलं असतं पण घरची लोकं बघून तो पुन्हा बिथरला असता. त्याला थाप मारून तिथंच थोपविण अनिवार्य होतं. “पुढे मागे नेईन त्याला पण तेंव्हा तो देखील इतरांसारखा सर्व कांही विसरून गेला असेल” तिने विचार केला. मग तिने त्याला वस्तीचे सर्व संकेत सांगितले, स्वतःची फ्रेक्वन्सी कशी सम्भाळून ठेवायची ते सांगितलं, परी बद्दल सांगितलं. “भेटवेन तुला मी तिच्याशी, आवडेल ती तुला.” त्याच्याशी बोलताना तिच्या लक्षात आलं कि तो अजून संपूर्णपणे रिक्त झालेला नाही, तेंव्हा तो इथं कसं आला हे आज विचारायला नकोय. पुन्हा तो डिस्टर्ब होईल. तिने संवाद मात्र सुरु ठेवला, “इथं तुला खूप फुलं दिसतील, मोठाली झाडं दिसतील पण प्राणी पक्षी दिसणार नाहीत. इथं भूक लागत नाही, कंटाळा येत नाही, दिवस वा रात्र हा प्रकार असतो इथं पण युरोप-अमेरिकेतले चार seasons किंवा आपल्याकडचे ऋतू तुला दिसणार नाहीत. पण तूला virtual reality किंवा simulation ठाऊक आहे का?” तो हो म्हणाला त्याचं तिला थोडसं आश्चर्य वाटलं पण त्यापेक्षा जास्त बरं वाटलं. “इथं हे सारं सहज करता येतं. दोन्ही हात असे बाजूला नेऊन पसरायचे, आकाशाकडे पाहत राह्यचं व तू पाहिलेला पाऊस आठवायचा. मोठा पाऊस पडेल मग. काळ्या ढगांनी संबंध आकाश भरून जाईल; तुला विजेंचा गडगडाट ऐकू येईल व विजाहि डोळ्यांसमोर चमकतील. जितक्या तीव्रतेने तू हे सर्व आठवशील तितकाच तुझा हा अनुभव जास्त जिवंत असेल”. तिला सांगावसं वाटलं, “तू सुदैवी आहेस, मी जेंव्हा इथं आले तेंव्हा मी हे कांहीच पाह्यलं नव्हतं; डोळे उघडून कांहीही बघण्यापूर्वीच मला इथं वर यावं लागलं होतं. इथं आल्यानंतर पुस्तकं वाचून व पृथ्विदर्शन पाहूनच मला पृथ्वीवरच्या या सुंदर गोष्टी माहित झाल्या वा त्यानंतर त्या माझ्या आठवणीत गेल्या.” पण ज्या क्षणी हा विचार तिच्या मनात आला त्याच क्षणी तिने तो दडपून टाकला. “तुला मी पाह्यलंय तुझ्या लहानपणी खेळण्यातली तुझी ती लाल कार बेधडक चालविताना, मित्राच्या कारमधून पुण्याला जाताना तू underage असूनही चोरून drive करतानाही तुला मी पाह्यलंय. तुला इथं simulated driving कधीही करता येईल. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे इथल्या या simulation ची एक गोड मर्यादा असते; इथं या पावसात भिजून सर्दी होत नाहीं की गाडीचा अपघात झाला तरी कांहीच लागत नाहीं. आजारपण, वेदना या सर्व गोष्टी फक्त खालीच”.
निघतांना पुन्हा एकदा भुजंग प्रदेशाबद्दल तिने त्याला बजावून सांगितलं. त्याला वाटलंच तर त्याने तिच्याशी कसा संपर्क साधावा या बद्दल मात्र तिने एक शब्द देखील काढला नाहीं, मुद्दामच. आत्ता दोन चार दिवसांनीच इथं यायचं, तो पर्यंत तो अगदीच नॉर्मल झालेला असेल. मग सर्व कांही त्याला विचारूया—त्याच्या इथं अकस्मात येण्याबद्दल देखील; पण त्याने तोच प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय सांगायचं त्याला?
प्रतिक्रिया
छान जमलंय...
क्र्म्शः ?
कथा आवडली