Skip to main content

MH370 - फ्लाईट डीलेड..

लेखक गवि यांनी मंगळवार, 11/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे. जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन. १९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी. हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?! फोटो आभारः विकीमीडिया बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू. त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते: -रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट. -याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी. बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः - रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही. - रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे". - आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते. MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे. बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी. जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्‍याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं. या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं. वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते. कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये. रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत. अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः शक्यतासंच एकः - जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे. - विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत. - अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं) - हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्‍या दोषामुळे नाही. शक्यतासंच दोनः -या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्‍यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो. पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा. या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो. कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल. ......... जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट. केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव. आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो. फोटो आभारः विकीमीडिया.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 80665
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

आत्ता सीएनएनवर आलेल्या बातमीप्रमाणे विमानातून आलेला शेवटचे कम्युनिकेशन हे कुठून आले यासाठी ट्रेस केले. त्यावरून असे लक्षात आले आहे की शेवटच्या संवादाच्या वेळेस हे विमान त्याच्या नेहमीच्या उड्डाणमार्गापेक्षा शेकडो कोस/योजने दूर असलेल्या एका लहान बेटाजवळ होते. "If the Malaysian Air Force data cited by the source is correct, the aircraft was flying the opposite direction from its scheduled destination and on the opposite side of the Malay Peninsula from its scheduled route." सध्या या शोधकार्यात अमेरीका-चीन-मलेशिया व्यतिरीक्त थायलंड, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलीया, सिंगापूर, न्यूझीलंड हे देश देखील सामील आहेत. त्यातील अमेरीका-ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड यांच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. शोधकार्याचे नेतृत्व मलेशियाकडे आहे. त्या व्यतिरीक्त डिजिटल ग्लोब हे उपग्रहावरून मिळणार्‍या छायाचित्रांवर काम करणारी सेवा सामान्यांच्या मदतीने उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे. कुणास उत्सुकता असल्यास येथे लॉगईन तयार करून सामील होऊ शकता. Malaysia

In reply to by विकास

बिजिंगकडे निघालेलं विमान इतकी अद्ययावत यंत्रणा असूनदेखील बँकॉकच्या दिशेने उडालं? म्हणजे मग "गल्ली चुकलं काय वो हे, पीयेल?" बघा, कदाचित येव्हाना मद्रासमध्ये लॅन्डपण झालं असेल! आणि आपल्याला पत्ताच नसेल!!!

बरीच माहिती मिळाली जी कन्फ्युज करत होती. या आधी एक विमान इंडोनेशियाच्या जवळ्पास कोसळल होतं. अन फक्त एका खुर्चीच्या हातासह तरंगणारा मानवी हात एव्हढच मिळु शकल होतं त्याची आठवण झाली. बरेच नातेवाईक समुद्र किनार्‍यावर जाउन फुले वाहून येत होते. तेंव्हा सुद्धा असच अस्वस्थ वाटल होतं. http://en.wikipedia.org/wiki/Adam_Air_Flight_574 येथे अधिक माहिती मिळेल.

मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला. मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे. जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे. साभार:बेपत्ता विमानाचा गुंता सुटेना

को पायलट फरिक अब्दुल हमीद लहान मुलांना,प्रवाशांना(विशेष करून तरूण मुलींना) कॉकपीट पाहण्याची परवानगी देत असे कळले आहे.विमान चालू असताना सिगरेट पीत गप्पा मारणे असे प्रकारही चालायचे. ह्याचा घटनेशी संबंध असेलच असे नाही पण हमीद ह्यांच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जावू शकतो? hameed

माझा भाऊ भारतात टुर लीडर आहे , तो महिन्यातून एकदा मलेशिया किंवा चीन आणि जगभरात टुर घेऊन हिंडत असतो. ह्या लेखाचा शेवटची वाक्ये वाचली आणि माझे हात पाय गार झाले. ह्या लेखाच्या आधारावर आता आमच्या जर्मन लोकांमध्ये ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलता येईल जय लखू रिसबूड

In reply to by vrushali n

सदर विषयातील माहितगाराने लिहीलेले दिसते. सुंदर माहिती व उहापोह.

बातमी वाचल्यापासून अस्वस्थ आहे. आता गविंचा माहितीपूर्ण लेख वाचल्यावर आणखीनच अस्वस्थ!

आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात. आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.

In reply to by गवि

आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. जर असं असेल तर... चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? असा विचार करतोय.

In reply to by मदनबाण

ते अवशेष विमानाचे नाहीत म्हणत आहेत्.चीनने १० उपग्रह त्या दिशेने वळवल्याची बातमी होती. चीनने क्षेपणास्त्र डागले असेल तर ते पुढाकार घेणार नाहीत संशोधनाच्या कामात. China will not give up

In reply to by वेताळ

ही शक्यता कमी असली, तरी चिनी सरकारला त्यांच्या नागरिकांची इतकी चिंता नसावी... एक अपघात म्हणून पण सांगायला ते कमी करणार नाहीत.. पण आपण प्रार्थना करत राहूच की चांगली बातमी येवो...

या मलेशिया एअर लाइन्स ने २-४ वेळा प्रवास केला आहे..अत्यंत वाईट अनुभव..दर वेळेस फ्लाईट डीले, चेक-इन बॅग न मिळण, व्हेज फूड सांगितलेल असताना ते न मिळण अस काही ना काही घडल होतं..तेव्हापासुन मी सगळ्यांना ही एअर लाईन अजिबात घेऊ नका असा सल्ला देते..एकदा तर टोकीयोला जात असताना फ्लाईट तब्बल १८ तास डीले झाली. क्वालालंपूर मधे मुक्काम करावा लागला होता आहे त्या कपड्यांनिशी..माझा नवरा देखील त्या वेळी असच "फ्लाईट डीले" स्टेटस पहात बसला होता..विमानातल्या त्या प्रवाश्यांच काय झाल असेल कोणास ठावूक?? सुखरुप असावेत ही एक वेडी अपेक्षा!

आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अ‍ॅनलिसिससाठी लागतो. तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.) हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.

In reply to by गवि

तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. कोणत्याही दिशेला...?? म्हणजे खालती समुद्रात पण असू शकेल काय? अपघातामुळे विमान एका जागी पडून इंजिन चालू राहीले असेल अशी शक्यता असू शकेल काय? एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत? http://www.flightradar24.com ह्या वेबसाईटवरून प्रत्येक flight ची real time position दिसते. असे असेल तर ब्लॅक बॉक्स किंवा विमानाचे last GPS co-ordinates मिळाले नसतील काय?

In reply to by योगी९००

एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत?
इतके सोपे नाही ते. जीपीएस विदा पाठवणे म्हणजे प्रायव्हसी चा भंग होउ शकतो..

In reply to by आनन्दा

रोल्स रॉईसकडे इंजिनाचा डाटा जातो वगैरेची कल्पनाच नव्हती. इंजीनाचा मॅन्युफॅक्चर असला तरी अशा पद्धतीने डाटा मॅन्युफॅक्चरने परस्पर मागवणे डाटा लिंकेज स्थापणे कितपत रास्त समजावे. एखाद्या देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तिच्या विमानाचे इंजीन किती तास चालू होते ह्याने फारशी रिस्क नाही पण ऑपोजीट प्रकारचा डाटा लिंकेज करून विमानांची इंजिने नियंत्रित करणे उपग्रहाच्या स्टाईल मध्ये तांत्रिक दृष्ट्या अशक्य नसेल पण सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारचे परीणाम असू शकतात असा प्रश्न मनात उपस्थित होतो आहे. अर्थात मूळ विमान हरवल्याच्या प्रश्नापुढे उपरोक्त प्रश्न सध्यातरी गौणच समजावा लागेल.

In reply to by माहितगार

कदाचित परस्पर नसावे, म्हणजे विमाने विकताना जे काही कॉन्ट्रॅक्ट केले असेल त्यात याचा उल्लेख असेल असे वाटते.

खाली म्हंटल्याप्रमाणे MH370 मधून डेटा दोनदा आला आहे,टेक ऑफच्या वेळी व बीजिंगच्या दिशेने जाताना.हा डेटा उपग्रहामार्फत रोल्स रॉईसकडे जातो. या शिवाय दर अर्ध्या सेकंदाला हवेतील विमाने आपले co-ordinates जमीनीवर transponder मार्फत पाठवत असतात. MH 370

वाचतो आहे. पण एकूणच सर्व प्रकार डोके सुन्न करणारा आहे. गविंचे अपडेट्स महत्वपूर्ण आणि त्यांच्या अनुभवामुळे विश्वासार्ह आहेत. एवढ्या गंभिर प्रसंगात, २३९ प्रवाशांच्या नातेवाईकांची मनःस्थिती आणि दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन उथळ प्रतिक्रिया टाळाव्यात ही विनंती.

लिहल्याप्रमाणे अचानक तयार झालेल्या कृष्णविवरातुन प्रवास करुन हे विमान गायब झाले असावे काय? पाण्यात विमानाची इंजिन सुरु रहाणे शक्य नाही.बाकी आपण सर्व कल्पना व्यक्त करु शकतो.

अतिशय दुर्दैवी घटना. प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक यांना शुभेच्छा देण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. या धाग्यामुळे आणि मेडियातल्या बातम्यांमुळे बरीच माहिती मिळत आहे.

In reply to by आनन्दा

मागे गविंनी अशाच एका अपघाताची कहाणी सांगितल्याचे आठवते.

In reply to by आनन्दा

केबिन प्रेशर अचानक शून्य होण्याचे कारण घेऊन त्या बेसिसवर तर्क लावले जात आहेत. ही एक सर्वाधिक शक्यतांपैकी असलेली थिअरी आहेच. विमान ३५ हजार फुटांवर उडताना बाहेरील हवेचे अत्यंत कमी प्रेशर आणि त्याहून अत्यंत कमी ऑक्सिजन लेव्हल ही मानवी शरीराच्या दृष्टीने तात्काळ मारक आहे. अशा वेळी अचानक पूर्ण कॅबिन प्रेशर नष्ट झालं तर साधारण ६ सेकंदांचा "यूजफुल कॉन्शसनेस" म्हणजे काही विचार करुन अ‍ॅक्शन करण्याइतकी शुद्ध लाभते. त्यानंतर कन्फ्युजन आणि बेशुद्धी, मग कोमा आणि मृत्यू. या सुरुवातीच्या सेकंदांच्या काळात पायलटला ऑक्सिजन मास्क लावता आला नाही तर पुढे तो लावण्याइतके को ऑर्डिनेशन त्याच्याकडे राहात नाही (म्हणूनच विमानात इतरांना मदत करण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा असं सांगतात.) हळूहळू केबिन प्रेशर लॉस झाला तर पायलट्सना ते स्वतः हळूहळू बेहोष / बेभान होताहेत हे कळतच नाही. हळूहळू ऑक्सिजन लेव्हल घटत जाते. पायलट्स असंबद्ध वागतात इत्यादि. या केसमधे अचानक केबिन प्रेशर लॉस झाला असं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती ?!) धरुन पायलटला काही सेकंदच अ‍ॅक्शन करायला मिळाली असं समजून त्याने काय केलं असेल याचं गृहीतक (किंवा काही मार्गाने पक्की माहिती?!) मांडून त्याच्यापुढे विमान ऑटोपायलटवर शेवटच्या ट्रॅजेक्टरीत जात राहिलं आणि इंधन संपून कोसळलं अशी थिअरी धरली गेली आहे. आता ती ट्रॅजेक्टरी नेमकी मादागास्करच्या दिशेनेच होती आणि शेवटी विमान नेमके मादागास्करनजीक कोसळले असा अंदाज व्यक्त करताना अमेरिकन सूत्रांनी त्यांच्याकडे तसे क्लूज आहेत याखेरीज काहीच पक्की कारणमीमांसा / पुरावे दिले नसल्याने पुढे काही बोलता येत नाही. पण इतका प्रचंड खर्च करुन आपली विनाशिका बोट आणि हेलिकॉप्टरे त्या मूळ ठिकाणापासून इतक्या दूरच्या ठराविक ठिकाणी डिप्लॉय करण्याचा अमेरिकेचा निर्णय अनमानधपक्याने असेल असे वाटत नाही.

In reply to by गवि

एक छोटी पुरवणी -- साधारण ३५००० फुटावर उडताना युजफुल कॉन्शसनेस हा अर्धा ते एक मिनिट असतो . तोच पन्नास हजार फुटावर ६-ते १० सेकंद इतका कमी असतो. ३५-३६००० फुट हि उंची साधारण विमानासाठी उत्तम समजली जाते कारण कमी उंचीवर हवेचा रोध जास्त असतो आणी वातावरणातील असमतोल यामुळे विमान धक्के खाते. उंची जितकी जास्त तितका हवेतील ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे विमानाच्या इंजिनाची कार्यक्षमता कमी होत जाते. हा युजफुल कॉन्शसनेस जेंव्हा लष्करी विमान (उदा मिग २९ किंवा सुखोई ३०) एकदम सरळ(VERTICAL ASCENT) वर चढते तेंव्हा फार महत्त्वाचा ठरु शकतो. गवी साहेब यावर जास्त चांगले भाष्य करू शकतील. .

In reply to by सुबोध खरे

उंची जितकी जास्त तितका हवेतील ऑक्सिजन कमी होत जातो त्यामुळे विमानाच्या इंजिनाची कार्यक्षमता कमी होत जाते.
जेट ईंजिन, टर्बो किंवा सुपरचार्ज्ड ईंजिन्स काँप्रेसर च्या तत्वावर काम करतात. जेट ईंजिनांमधे आत घेतलेली हवा वेंचुरी ईफेक्ट नी काँप्रेस केली जाते. काँप्रेस केल्यामुळे हवेची घनता वाढते, अर्थातच हेवेतील ज्वलनशिल प्राणवायुचे प्रमाण वाढते. ह्यामुळे उंचीचा आणि त्यामुळे बदलणार्‍या प्राणवायुचं प्रमाणाचा ईंजिनावर होणारा परिणाम कमी होतो आणि ईंजिनाची ताकद आणि कार्यक्षमता वाढते. आणि एक प्रश्ण. केबिन प्रेशर कमी होताना बाकीची काही वैद्यकीय ल़क्षणे दिसतात का? जसे की डोकं दुखणं, चक्कर येंणं, मळमळण, नाकातुन अथवा कानातुन अचानक रक्त येणं किंवा रक्तदाब ई.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

साहेब, सर्वच जेट विमाने हवा दाबून इंजिनात ढकलतात. त्यामध्ये जमिनीच्या पातळीला हवेचा दाब जास्त असतो पण हवेचा रोद्धी जास्त असतो जितकी उंची तुम्ही वाढवता तितका हा रोध कमी होतो परंतु एका विशिष्ट उंचीनंतर हवेतील ओक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने हवा जास्त दाबली तरीही इंधन आणी हवेचे मिश्रण यात ऑक्सिजन कमी होऊन इंधन अर्धवट जळते आणी इंधन फुकट जाते आम्हाला हवाई वैद्यकशास्त्र शिकवताना असे सांगितल्याचे आठवते कि प्रवासी विमाने साधारण ३५ ते ३६ हजार फुट उंचीला उडवतात यात हवेचा रोध कमी आणी ओक्सिजनचे प्रमाण वाजवी असते त्यामुळे इंधनाची सर्वात जास्त काटकसर होते. अवांतर :- लष्करी विमाने हि याहून जास्त उंचीवरून उडू शकतात. मिग २५ तर ८५००० फुटावरून उडू शकत असे आणी ते क्षेपणास्त्रापेक्षाही जास्त वेगाने जात असे (३. २ MACH) .(MIG 25 CAN OUTRUN A MISSILE) .

In reply to by सुबोध खरे

मिग २५ चा रेकोर्ड आहे फ्लोन अबोव्ह १,००,००० फीट...

गूढ वाढतच चालले आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी असेच एक विमान दक्षिण अमेरीकेतील अँडीज पर्वतरांगात कोसळले होते. परंतु, त्यातील काही व्यक्ती जिवंत राहिल्या होत्या. बर्‍याच काळानंतर शोधपथकाला त्यांचा शोध लागला होता.

खायप्याय्ची व्यवस्था नाही, अपघात झालेला दिसला नाही, अपहरणाची जबाबदारी नाही, रडार वरून गायब झाल पण रोल्स रोइसलामात्र डेटा ट्रांसमीट होत होता ... कमाल आहे कुछ तो गड़बड़ है दया.... कालिंग 221b बेकर रस्ता.

गविंची उत्तम माहितीपूर्ण लेखन आणि प्रतिसाद. सर्व प्रवाशी सुरक्षित असावेत, राहावेत अशा प्रार्थनेशिवाय दुसरं काय करु शक्यतो. :( -दिलीप बिरुटे

मटा ऑनलाइन वृत्त । क्वालालंपूर मलेशिया एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाला अपघात झालेला नसून त्याचं अपहरण झाल्याची दाट शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करून त्याचं अपहरण केलं असल्याचा अंदाज मलेशिया सरकारनं व्यक्त केला आहे. त्यामुळे विमानातील सर्व प्रवाशी जिवंत असल्याचं बोललं जातंय. मलेशियन विमानाच्या अपहरणाबाबत आजूनपर्यंत कुठल्याही मागण्या समोर आलेल्या नाहीत. तसंच हे विमान नेमकं कुठे आहे, याचाही पत्ता लागलेला नाही, असं मलेशियाच्या एका अधिकाऱ्यानं नाव न घेता स्पष्ट केलं. विमानाचं अपहरण झाल्याचा प्रकार फार काळ लपवता येऊ शकत नाही, असंही तो म्हणाला. बेपत्ता विमानाचा उड्डाणानंतरचा प्रवास पाहता ते रडावर येऊ नये म्हणून या विमानाची सर्व संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आहे. त्यामुळेच या विमानाला अपघात झालेला नाही तर त्याचं अपहरण करण्याच आलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. बेपत्ता विमानाचं अपहरण !

Malaysian PM Razak on MH370: Based on new data, location of last communication was at possibly at border of Kazakhstan and Turkmenistan.

गविंचा माहीतीपूर्ण धागा आणि आलेल्या प्रतिसादांतून बरंच काही नविन वाचायला मिळालं. सध्या काही नविन माहीती मिळाली आहे का या विमानासंदर्भात??

विमानांची विमानतळांची संख्या भारतात आणि जगभर वाढती आहे. एकीकडे प्रकाश योजने दूर असलेली अंतराळ याने लीलया नियंत्रीत केली जाताहेत दुसरी कडे MH ३७० सारख्या घटना अजूनही टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापनातील गॅप्स दाखवताहेत. विमाने पडूच नयेत पडलीच तर १०० वर्षापूर्वीपर्यंत समूद्र वाळवंटात जंगलात पडली असती तर ठिक होते. एखादे मोठे विमान एखाद्या मोठ्या तेलवाहू नौकेवर पडले तर काय होईल किंवा एखाद्या हाय डेन्सिटी शहरात अथवा भोपाळ टाइप कारखान्यावर पडले तर काय होईल ? निसर्ग आणि जिवीत हानी अन इमॅजीनेबल असू शकते. भारताकडेही उपग्रह आहेत रडार आणि युद्ध नौका आहेत. इतर देश प्रोअ‍ॅक्टीव्हली इन्व्हेस्टीगेट करताना दिसताहेत. आमच्या प्रायमरी रडारवर विमान दिसल अथवा दिसलच नाही अशी क्लिअर कॉमेंट भारत सरकार कडून येताना दिसत नाही. याचा अर्थ मिडिया फ्रेंझीत पडाव असा नाही. अशी इनव्हेस्टीगेशन्स स्वतःच्या टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापन गॅप्स शोधण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी वापरली जावयास हवीत, या प्रकरणात मलेशियाच्या विनंतीवर तोंडदेखल्या सहभागा खेरीज, इन्व्हेस्टीगेशन साईडला भारतीय एजन्सीजचा (सरकारी) स्वभाव आपल्याला काय देणे घेणे असाच आहे का याची शंका वाटते.

In reply to by माहितगार

भारतीय एजन्सीजचा (सरकारी) स्वभाव
एकंदरच हे प्रकरण बघता भारताने जाणीवपुर्वक कानाडोळा केला आहे की काय अस साँशय येतो ? (हलगर्जीपणा न्हवे).

कोई ये बताये कि ये कारण तो नही? Sun, 29 Sep 2013 11:46 PM (IST) मलेशिया के प्रधानमंत्री के अनुसार, 'वैसे तो कट्टरपंथ सबको प्रभावित कर रहा है लेकिन इसके चलते इस्लाम धर्म में आस्था रखने वाले सबसे ज्यादा नुकसान उठा रहे हैं।' मुसलमानों के अच्छे भविष्य के लिए रजाक ने कट्टरपंथियों के खिलाफ जंग छेड़ने की अपील की। प्रधानमंत्री रजाक के मुताबिक कट्टरपंथी अपने फायदे के लिए शांति और सहिष्णुता के सिद्धांत पर आधारित इस्लाम धर्म की व्याख्या तोड़मरोड़ कर करते हैं। उन्होंने कहा कि कट्टरपंथियों को हाशिये पर लाया जा सकता है। इसके लिए संयम और प्रतिबद्धता की जरूरत है जो इस्लाम में है। उन्होंने आगाह किया कि संयम को हमारी कमजोरी नहीं समझना चाहिए। अपनों से ही मुस्लिमों को सबसे बड़ा खतरा

स्ट्रोब टॅलबोट्ट (क्लिंटनच्या काळातील डेप्यूटी सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि परराष्ट्र धोरणातले तज्ञ) यांची ट्वीट... Malaysian plane mystery: Direction, fuel load & range now lead some to suspect hijackers planned a 9/11-type attack on an Indian city.

In reply to by विकास

विमान अपघाताचे चिन्ह नाही कोणत्याही मागण्या नाहीत सर्व संपर्क यंत्रणा एकाच क्षणी बंद, हे सर्व जरी खरे असले तरी हवाइ हल्यापुर्वी चक्क ५ तास विमान गायब केले जाउन शेजारील देशामधे त्याबद्दल अलर्टनेस निर्माण केला जाण्याची शक्यता नाही. आजच्या जमान्यात मोबाइल सारखी संपर्क साधने असताना ? (SOS काम करेल मोबाइल फ्लाइटमोडवर असेल तरी) असा हवाइ हल्ला यशस्वी करायचा असेल तर अतिशय कमी वेळेचे धक्का तंत्र अत्यावश्यक आहे व म्हणुनच अशा देशाची एअर स्पेस आत्मघाती विमानाकडून चुकुनही ओलांडली जाउ नये अथवा कमीत कमी मिनीटात/सेकंदात पार करता यावी याची काळजी घेतली जाइल. हे जर कोणत्याही कारणाने घडवलेले अपहरण असेल तर अपहरणकर्त्यांचे दोन अंदाच चुकलेच असावेत, १) विमानाचा शोध कितपत घेतला जाइल याची शक्यता २) रोल्स रॉइसला आपोआप मिळणार्‍या लॉग बद्दल अनभिज्ञता आणी आता हल्ला करणे मात्र शक्य नाही कारण आवश्यक अलर्टनेस आला आहे. अन तरीही अभाळातुनच हल्ला झाला तर आपली तीच लायकी आहे हे नक्कि.

In reply to by आत्मशून्य

असा हल्ला केला तर बहुदा सरळ मलेशीयावरच करायचा प्लान असावा. पायलटने पध्दतशीरपणे विमान त्या दिशेने वळवुन संपर्क यंत्रणा बंद झाल्यावर हल्लेखोरांचा प्लान उधळण्यासाठी जाणीवपुर्वक विमान भरकटवले असावे.

In reply to by आत्मशून्य

संशयाची सुई पायलट आणि को-पायलटकडेच बोट दाखवत आहे. त्यामुळे पायलटने मुद्दामून वळवले असण्याची शक्यता कमी असावी असे वाटते.

या विमानाच्या मुख्य पायलट पॉलीटीकल माइंडेड होता आणि आदल्या दिवशी मलेशियाच्या विरोधीपक्ष नेत्याच्या अटकेमुळे अपसेट होता अशी बातमी येते आहे . मलेशिया क्रॉनीकल.कॉमचा दुवा मलेशियन सरकार ही बाब चर्चेत येण्यापासून दाबू पहात होते असे दिसते.

स्टेट्स अजुन ही ऑनलाईन दाखवत आहेत्,तसेच विमानातील काही लोकांचा मोबाईल वर रिंग देखिल वाजत होत्या. मग हे नवीन टेक्नॉलॉजीने ट्रॅक करता येणार नाही काय?

जेव्हा मी डेस्कटॉपवरून ब्राऊसर मधुन सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता फक्त ब्राऊसर बंद करतो तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. तीच गोष्ट मोबाईलची. मी ऑफिसमधुन वाय-फाय वरून सोशल साईट वापरतो आणि त्यातुन लॉग आउट न करता ऑफिसमधुन बाहेर पडल्यावर वाय-फाय नेटवर्कशी संबंध तुटल्यामुळे मला सोशल साईट वापरता येत नाहीत. पण तेव्हा इतरांना मी ऑनलाईन दिसत असतो. मी प्रत्यक्षात लॉग आउट केलेले नसल्याने टेक्निकली मी ऑनलाईनच असतो. अर्थात नविन टेक्नॉलॉजीने हे ट्रॅक करणे सहज शक्य आहे. बहुतेक पोलिस तपासात हे तंत्र वापरले जाते असे बातम्यांमधुन समजते.

मला वाटते मलेशियन सरकारने बेजबादारपणे हे प्रकरण हाताळले आहे. त्यांच्या रडारवर हे विमान दिसले होते तर त्यांनी ती माहिती वेळीच द्यायला हवी होती. कालच्या बातमीनुसार विमान भारतावरून गेले आणि लक्षात आले नाही, असे झाले असेल तर प्रकरण गंभीर आहे. (बहुदा भारतावरून गेले नसावे असे वाटते.) एकुणच सर्वच घडामोडी चमत्कारिक आहेत हे मात्र खरे. आजच्या बातमीनुसार दहशतवादी हल्ला झाला असावा असे गृहीत धरले जाते आहे. कुण्या पकडलेल्या दहशतवाद्याने असे सांगितले की त्याने मलेशियन पायलटला बुटातली स्फोटके दिली होती आणि हा हायजॅकचाच बेत होता. त्यामुळे हे विमान कुठे तरी उतरवले गेले असावे असे आता काही लोक मानताहेत. हे विमान उतरायला ४५ मिटर रुंद १५०० मिटर्स लांब धावपट्टी पुरेशी आहे म्हणे. विमान परत उडवायचे नसेल तर मातीच्या धावपट्टीवरही उतरू शकते. असे असले तरी मोबाईल आणि डिजिटल कॅमेर्‍यांच्या युगात 'विमान उतरलेले कळणार नाही' असा कोणता प्रदेश असेल? रोज येणार्‍या नवनवीन बातम्या आणि शक्यतांमुळे नातेवाइकांच्या भावनांचा काय खेळ होत असेल ते तेच जाणोत. आता बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांद्वारे मलेशियन एयर विरुद्ध दावे दाखल केले जातील का? केल्यास असे खटले कुठे लढले जातील? लंडनला? - कारण इन्शुरन्स तेथला आहे. क्वलालंपूर ? - कारण कंपनी तेथे आहे चीन? - कारण चीनी हद्दीत गायब झाले आहे की जेथे विमान उतरले असेल तेथे? विमान बनवणारी कंपनी अमेरिकन, आणि इंजिने बनवणारी रोल्स रॉइस युरोपीय, हे पण प्रतिवादी होऊ शकतील का? माझ्या ऐकीव माहितीनुसार एयर फ्रान्स ४४७ क्रॅश वरुन सुमारे ४७५ मिलियन डॉलरचे दावे क्लास अ‍ॅक्शनद्वारे दाखल झाले होते. त्यातले बरेच कोर्टाबाहेर मिटवले गेले व उरलेल्यांना १८२ मिलियन या एकरकमी तडजोडीत निकाली काढले.

उपग्रहांनी पाठवलेली छायाचित्रे आंतरजालावरून सामुहीक पद्धतीने (क्राऊडसोर्सींग) शोधण्याचा डिजीटल ग्लोबवर तर्फे www.tomnod.com वर प्रयत्न चालू आहे. त्यात मी एक अनुभव घ्यावा म्हणून वेगवेगळ्या मॅपच्या जवळपास ११०० टाइल्सच्या आसपास रँडमली शोधल्या. त्यात मिळालेला ४ वाजून १४ मिनीटांचा ह्या नकाशात एका विषीष्ट पॅटर्न मध्ये पाण्यावर तरंग आणि शिंतोडे असावेत असे वाटते. पावसाचे असते तर वर ढग राहीले असते. हे कशाचे असू शकतील ? आपल्याला www.tomnod.com ने केवळ मर्यादीत टॅगींग सुविधा दिली आहे त्यामुळे कॉमेंट टाकणे अथवा संपर्काची काही सुविधा दिसली नाही. http://www.tomnod.com/nod/challenge/malaysiaairsar2014/map/682517 या नकाशा बाबत तुम्हाला काय वाटतं ?

हे विमान शोधण्यासाठी ज्योतिषतज्ञ किंवा एखादे सिद्धीप्राप्त बाबा / महाराज ह्यांची मदत होऊ शकते का?

In reply to by अधिराज

फक्त आता तो म्हणायचा कोणी नक्की? मलेशियन एअरलाईन्स च्या अधिकार्यांनी की नेत्यांनी की कोणी? जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

In reply to by लंबूटांग

कृपया धाग्याचे गांभीर्य घालवू नये. सव्वा दोनशे माणसे मिसिग असताना यावर विनोद करणे तुम्हाला पटते काय. दंगा करायला इतर धागे आहेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

मी सिरीयसली विचारला होता प्रश्न ! जर मंत्र म्हणून ते विमान आणि प्रवासी सापडणार असेल तर व्हाय नॉट? धागा माहितीपूर्ण आहे यात वादच नाही आणि काही प्रतिसादही. पण बर्‍याच प्रतिसादांत इकडून तिकडून बातम्यांच्या लिंका पेस्टवून/ स्वतःच्या कॉन्स्पिरसी थीअरीज टंकून जे विनोद झाले आहेत त्याचे काय? असो मला पहिल्यापासूनच त्या वाईट झालं, माझ्या प्रार्थना/ शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत वगैरे फेसबुकी छाप भाषा झेपत नाही त्यामुळे तसा प्रतिसाद दिला नाही. असो, कोणीतरी असा प्रतिसाद देईल असे वाटलेच होते. तुम्ही दिलात. संपादकांनी प्रतिसाद उडवायचा तर उडवावा.

In reply to by लंबूटांग

हे आपल्या नजरेत आलेले दिसत नाही. जगातील बहुतेक सर्व प्रमुख वर्तमानपत्रांतून हे आले होते; त्याचा व्हिडीयोही जालावर मिळावा.

Russia “Puzzled” Over Malaysia Airlines “Capture” By US Navy EU Times च्या १४ मार्च च्या लेखान्वये रशिया चं GRU (सैन्याचे हेर खाते) बुचकळ्यात पडलंय की अमेरिकन नौदलाने या मलेसिअन एअर लाईन्ज चं ३७० या उड्डाणाचा ताबा घेऊन व त्याचा मार्ग बदलून त्याला अमेरिकेच्या दीएगो गार्सिया या भारतीय महासागरात असलेल्या सैनिकी तळाकडे का वळवले. हे उड्डाण GRU च्या नजरेखाली होतं कारण त्यात एक संशयास्पद कार्गो होता व या कार्गोचा संबंध सीशेल्स या देशाशी व अमेरिकेच्या MV Maersk Alabama या व्यापारी जहाजाशी जोडला होता. GRU ने या बाबतीत चीनच्या Ministry of State Security (MSS) शी देखिल संपर्क साधला होता व त्यांना सांगण्यात आलं की चीनच्या वायुहद्दीत आल्यानंतर या कार्गोची चौकशी केली जाईल पण असंहि कळलंय की चीन देश हे विमान बीजिंग ऎवजी त्यांच्या हैनान बेटावरील Haikou Meilan इथल्या आंतर राष्ट्रीय विमानतळावर उतरवून घ्यायच्या तयारीत होता. . या Boeing 777-200ER aircraft विमानात fly-by-wire (FBW) system असल्याने त्याला electronic interface असतो व त्याच कारणाने हे एका ड्रोन विमानाप्रमाणे दुरून देखिल कंट्रोल केलं जाऊ शकते.

In reply to by kurlekaar

विमानाच्या कार्गोत केवळ (मलेशीयन) फळे होती अस मलेशीयन मंत्र्याच विधानाच रिपोर्टींग झाल आहे. स्वतःच्या कमर्शियल विमान कंपनीची क्रेडिबीलीटी धोक्यात घालून मलेशिया सरकार मलेशियन विमान कंपनी असे काही करू देण्याची शक्यता कमीच. लोकांना भरपाई म्हणूनच त्यांचा कोट्यावधीनी खर्च होणार आहे. कोणत्याही सरकारला किमती कार्गो पाठवायच असेल स्पेशल विमानाने पाठवणही शक्य असत त्याच्या करता कमर्शियल फ्लाईटची गरज नाही. आमेरीकी सरकार गुप्तचर कारवाया करत नसेल असे नाही पण जगाच्या महासत्तेला असल कोणतीही काम लपवून करण्याची मुळात गरज असेल अस वाटत नाही.