Skip to main content

MH370 - फ्लाईट डीलेड..

लेखक गवि यांनी मंगळवार, 11/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे. जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन. १९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी. हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?! फोटो आभारः विकीमीडिया बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू. त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते: -रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट. -याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी. बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः - रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही. - रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे". - आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते. MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे. बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी. जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्‍याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं. या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं. वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते. कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये. रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत. अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः शक्यतासंच एकः - जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे. - विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत. - अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं) - हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्‍या दोषामुळे नाही. शक्यतासंच दोनः -या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्‍यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो. पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा. या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो. कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल. ......... जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट. केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव. आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो. फोटो आभारः विकीमीडिया.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 80665
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

तुमच्या हातात सुपर कॉम्प्युटर आहे उपग्रहातून मिळणारी छायाचित्रे आहेत. आकाश बर्‍याच अंशी निरभ्र आहे. एक विमाना सारखा ऑब्जेकट आहे ज्याची काळ काम वेगाची गणित बांधून कोणत्याही क्राऊड सोर्सींग शिवाय सुद्धा चार नाही सहा दिवसात विमानाच काय झाल याच उत्तर अगदी मलेशियाच्या मदती शिवाय आमेरीका रशिया चीन भारत या सर्वच देशांना देण जमायला हव. दुसर्‍या देशाच्या मुव्हींग मिसाईल्सचा बरोबर वेध घेऊन पाडता येतात, एका भल्यामोठ्या विमानाचा शोध घेता येत नाही ? टेक्नॉलॉजी गॅप नाही पण टेक्नॉलॉजीच्या वापरातला गॅप म्हणता येईल आणि मग नाही नाही त्या थेअरीज येऊ लागल्या आहेत. इतर देशांच माहित नाही भारताकरता याचा अर्थ एवढाच होतो की चिनने किंवा इतर देशांनी पाठवलेल इंटर काँटीनेंटल बॅलेस्टीक मिसाईल ट्रॅक करण्याकरता वाटेत हाणून पाडण्या करता आम्ही अजून मागे आहोत २१व्या शतकात भारताकडे उपलब्ध साधन क्षमता लक्षात घेता अजिबात भूषणावह वाटत नाही. मी भारतातील आलतूफालतू विरोधी पक्ष नेता असतो तरी या टेक्नॉलॉजी गॅपकरता भारताच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागीतला असता आजी माजी केंद्रीय मंत्र्यांना निवडणूका लढण्यापासून बाद करण्याची मागणी केली असती.

In reply to by माहितगार

भारताला इतके कमी लेखणे बरोबर नाही. असे ही असू शकेल की : विमान hijack झाले असून मलेशिया, चीन, भारत वगैरे देशाच्या उच्च अधिकार्‍याना याची कल्पना असेल व अतिरेक्यांबरोबर वाटाघाटी चालू असतील. काही गुप्त कारणामुळे ही माहिती आपल्यापर्यंत उघड केली नसेल.

In reply to by योगी९००

तस नाहीए हो, मी भारताला कमी लेखत नाहीए. सत्तेतल्या लोकांना काय गुप्त खलबत करायचीत ते करू दे ना ! येता जाता दुहाई देणारे विरोधी पक्ष रोखठोक प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या भूमीकेत कमी पडत नाहीत ना असाही प्रश्न आहे .

In reply to by योगी९००

सिएनएनच्या या वृत्तातील खालील तर्क पटण्या जोगा वाटतो.
There's another possible wrinkle, experts say. Some countries may be hesitant to reveal what they've seen on radar. "They want to protect their own capabilities," Beatty said. "Their intelligence services are not going to want to publicize exactly what their capabilities are."

आता सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे आणि कालापव्यय झाल्यामुळे विमान सापडण्याची शक्यता बरीच विरळ झाली आहे. या काळात शेकड्यांनी नवनव्या थियरीज पुढे आल्या आहेत. यापैकी बरीचशी तर्कटे केवळ एक शक्यता म्हणून मांडली गेलेली आहेत. कोणत्याही खास माहितीविनाही असे अंदाज करता येतात. उदा. विमानात असलेल्या संवेदनशील कार्गोमुळे विमान अन्यत्र नेले गेले. किंवा ते अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या तळावर उतरवले गेले. किंवा भारतावरुन पूर्ण प्रवास या विमानाने सिंगापूर एअरलाईन्सच्या त्याच वेळी प्रवास करणार्‍या कायदेशीर विमानाच्या मागेमागे अत्यंत जवळून उडत केला, ज्यामुळे रडार्सवर त्या दोन्हीचा मिळून एकच ठिपका दिसला असणार आणि तीही फ्लाईट सिंगापूर एअरलाईन्सच्या सावलीत क्लियर झाली. एअरबॉर्न कोलिजन अव्हॉईडन्स सिस्टीममुळे जवळजवळ उडणार्‍या विमानाची वॉर्निंग एरवी सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानाला मिळाली असती, पण MH370ने आपल्या सिस्टीम्स बंद करुन ते टाळलं इत्यादि. या थियरीज म्हटलं तर केवळ तात्विकदृष्ट्या शक्य आहेतच, पण प्रत्यक्षात कितपत घडू शकल्या असतील याविषयी मोठी शंका घेता येईल. एकूण काही संकीर्ण मुद्दे खाली नोंदवतो आहे. - मलेशियाने अधिकृतरित्या असं जाहीर केलं होतं पायलट्सकडून आलेला शेवटचा संदेश "ऑल राईट, गुड नाईट" हा विमानाची ACARS सिस्टीम मॅन्युअली बंद करण्यापूर्वी / आपोआप बंद होण्यापूर्वी आलेला नसून ती बंद केल्यावर / झाल्यावर आला होता. याचा अर्थ पायलट्सनी एक सिस्टीम बंद होऊनही कोणताही दुरित संदेश न देता संभाषण संपवलं होतं. पण आज मलेशिया म्हणते की वरील माहिती अयोग्य असून आता आम्ही असे म्हणतो की पायलट्सचा "ऑल राईट गुड नाईट" हा शेवटचा संदेश हा सिस्टीम बंद होण्यापूर्वी आलेला नव्हता. याचा अर्थ अजूनही होय होय- नाही नाही असा प्रकार आणि माहितीच्या बाबतीत यू टर्न्स चालू आहेतच. -शेवटचा संदेश को पायलटच्या आवाजात होता. म्हणजे एकट्या मुख्य पायलटवर संशय घेऊन भागणार नाही. - मुख्य पायलट हा "पोलिटिकली अ‍ॅक्टिव्ह" होता, आणि तो विरोधी पक्षप्रमुखाचा खंदा समर्थक होता, आणि तो फ्लाईटपूर्वी या प्रमुखावर चाललेल्या खटल्याला हजर राहिला होता, आणि त्याबद्दल अस्वस्थ होता. अशी माहिती जाहीर झाली आहे. मुख्य पायलटचे काही फोटो जाहीर झाले आहेत. त्यात त्याने "डेमॉक्रसी इज डेड" असा संदेश परिधान केलेला दिसतो आहे. पण एकूण माहितीवरुन थेट पायलटवर संशय घेणं अत्यंत हीनतेचं वाटतं. समजा डेमॉक्रसीचा गळा घोटला जात आहे अशा मताची व्यक्ती असली तरी तरी या प्रकारच्या व्यक्तीच्या विचारधारेचा कडवा सपोर्ट डेमॉक्रसीला म्हणजे लोकशाहीला असणार. अशा वेळी ही व्यक्ती अन्य काही लोकशाहीच्या तत्वाने प्रतिकार करेल.. अतिरेकी मार्गाने विरोध का व्यक्त करेल? त्या विरोधी पक्षनेत्यानेही पायलटवर घेतल्या जाणार्‍या संशयाविषयी अतिशय तीव्र निषेध केला आहे. हायजॅक किंवा अपहरणाची थियरी मानण्यात अत्यंत मोठा धोंडा म्हणजे मोटिव्ह, अर्थात उद्देशाचा अभाव. कोणताही मोटिव्ह दुरुनही नजरेत न येणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. आठ दिवसांत पॅसेंजर्स किंवा पायलट्स किंवा अपहरणकर्ते यांच्याकडून कोणताही संपर्क नसणं हे न पटण्यासारखं आहे. अपहरणकर्त्यांना आठ दिवस गप्प बसून अडीचशे लोकांना गुप्तपणे विमानासह दडवून ठेवणं हे अशक्यप्राय आहे. याचाच अर्थ विमान आता अस्तित्वात नसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. माझ्यामते विमानाचा ब्लॅक बॉक्स भविष्यात कधीच मिळणार नाही (न मिळण्याची फारच मोठी शक्यता आहे..) कारणे: विमानाचा क्रॅश झालाच असेल तर तो त्याच दिवशी इंधन संपताक्षणी झाला असणार. म्हणजे त्याला ९-१० दिवस झाले. विमान इन्टॅक्ट पाण्याखाली गेलं नसेल तर विमानाचे तरंगणारे हलके भाग म्हणजे खुर्च्यांची कुशन्स, बॅगा, कपडे इत्यादि. हे गेल्या दहा दिवसांत मूळ ठिकाणापासून शेकडो किलोमीटर रँडमली भरकटले असणार. पण ब्लॅक बॉक्सेस मात्र मूळ जागीच पाण्यात बुडाले असणार. त्यामुळे आता तरंगणारे अवशेष जरी सापडले तरी ब्लॅकबॉक्सचा थांग त्यावरुन लागणार नाही. जर हिंदी महासागरात ते बुडाले असतील तर त्यांचे संदेश पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता बहुतांश भागांत शून्यवत आहे. आणि हे जे काही संदेश ट्रान्समिट होतात ते ३० दिवसांपर्यंतच होतात. बॅटरी तेवढीच असते. पूर्ण हिंदी महासागर तळातून सावडणे जवळजवळ अशक्य आहे. आणि तसं केलं तरी महिन्याभरात तिथे पोचणं त्याहून अशक्य. जाणार्‍या प्रत्येक दिवसासोबत समुद्रतळाशी विसावलेले ब्लॅकबॉक्स आणि इतर पार्ट्स वाळूखाली गाडले जाण्याची शक्यता जास्तजास्त. वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही. त्यामुळे खरंच बाकी काही कळो न कळो, या लोकांचं काय झालं याचा निकाल मात्र नक्की लागू दे अशी तीव्र इच्छा..

In reply to by गवि

वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही. +१ आपले परिचित अशा दुर्दैवी घटनांत असतात, त्यावेळी बातमी फक्त बातमी राहात नाही :-(

In reply to by गवि

सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे
सर्च एरीआ अमर्याद वाढला म्हणजे काय ? उपग्रहातन काहीच छायाचित्र मिळत नसती विमान त्यात न दिसण्या एवढ छोट असत तर वेगळी गोष्ट होती. विमान निघाल्या वेळे पासूनचा उपग्रहछायाचित्रातून प्रत्येक मिनीटाचा मागोवा घेता येत असणार. विमान कोणत्याही दिशेला वळल तरी ३६० बाय ३६० अँगल मध्ये वळल तरीही उपग्रह छायाचित्रातून सुटण्याच काहीच कारण नाही (केवळ ढगांच परसेंटेज फार मोठ असेल आणि विमान त्यातच अडकून वेदरमुळे खाली कोसळल तर वेगळा भाग पण प्रत्यक्षात वेदर बर्‍यापैकी स्वच्छ होत अस दिसतय, मी स्वतः टॉमनॉड डॉट कॉम वरील छायाचित्र शोधात सहभाग घेतला मला तरी आभाळ बर्‍यापैकी स्वच्छ वाटल अर्थात टॉमनॉड डॉट कॉमवालेही लॉजीकली काम करताना दिसत नाहीत म्हटल्यावर मी सहभाग बंद केला). फक्त सुयोग्य कोऑर्डीनेट्सची छायाचित्र एका नंतर एक लावण्याची आवश्यकता असावी ते आमेरीकन टॉमनॉड कंपनीन केल नाही पण भारतासहीत इतर महासत्ता झोपल्या सारख्या वागतात याच आता प्रचंड आश्चर्य वाटत आहे.

In reply to by माहितगार

समुद्रतळाशी सर्च आणि छुप्या ठिकाणांची सर्च याविषयीचा तो उल्लेख आहे. केवळ तरंगणारे अवशेष उपग्रहामार्फत शोधण्याचा नव्हे.

In reply to by गवि

वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.>>> :( रविवारचीच गोष्ट आहे. माझी बहिण लंडन हून निघाली होती , शनिवारी रात्रीच विमान होतं...शनिवार पासून मी अक्षरशः त्या online status कडे भीतभीत बघत होते . अगदी Flight Operating , Departure etc . पण जोपर्यंत मी तिचा आवाज ऐकला नाही तो पर्यंत लक्ष लागत नव्हत कशातही... तिचा हेलो ऐकून स्मितरेशच उमटली . आणि online status वर Arrived दिसलच नाही शेवटपर्यंत...नंतर मग मी विसरूनही गेले . शेवटी आपलं माणूस नसाव अशा कुठल्याही प्रसंगात असच वाटत . सतत प्रार्थना चालू होती मनातल्यामनात कि ती सुखरूप असू दे .

मला तर अजुनही असच वाटतं कि; १. सडन मेकेनिकल फेल्युअर. २. एअर प्रेशर ड्रॉप. त्यामुळे सुमारे ८-१० सेकन्दात पायलटसह सगळेच बेशुद्ध. ३. सगळ्या सिस्टिम्स बंद पडल्यामुळे ट्रॅक न होता, ईंधन संपेपर्यंत विमान ग्लाईड होतं उडत राहिले. ४. आणि कोसळले तिथे पाण्याची खोली ४०००-४५०० मिटर्स असावि. खुप टेक्नीकली बरोबर लिहिता येत नाहीये. पण आत्महत्या किंवा हायजॅक नसाव असच, का कोण जाणे, पण वाटत.

In reply to by स्वप्नांची राणी

असंच वाटत होतं.. अजूनही बर्‍याच अंशी हेच वाटतं. पण बरेच पुरावे तांत्रिक दोषापेक्षा मानवी हस्तक्षेप असल्याचं निश्चितच दाखवतात. महत्वाचे: - पहिले डायव्हर्शन हे विमानाच्या कंट्रोल कॉलमने (फिजिकल कंट्रोल हाताने फिरवून) केलेले नसून फ्लाईट कॉम्प्युटरला फीड केलेल्या प्लॅनमधे बदल करुन घडवलेले दिसले आहे. इमर्जन्सीत, बेशुद्ध होताहोता केलेली इमर्जन्सी वळण्याची किंवा अन्य हालचाल ही कॉम्प्युटर एंट्रीतर्फे केली जाईल हे शक्य दिसत नाही. - आकार्स आणि ट्रान्सपाँडर या दोन वेगवेगळ्या सिस्टीम्स काही काळाच्या अंतराने बंद केल्या गेल्या आहेत. "सडन फेल्युअर"च्या किंवा सडन क्रॅशच्या केसमधे सर्व सिस्टीम्स एकदम बंद पडायला हव्या. -इंधन संपेपर्यंत विमान उडत राहिले असेल तर ते शेवटच्या ट्रॅजेक्टरीमधे ऑटोपायलटवर स्ट्रेट अ‍ॅन्ड लेव्हल फ्लाईटमधे उडत राहायला हवे. पण इथे मात्र त्या विमानाने पुढचा प्रवास हा ठराविक चेकपॉईन्ट्स पार करत (VAMPI --> GIVAL) केला. म्हणजेच मूळ मार्गावर नसलेले चेकपॉईन्ट्स त्याने घेतले. हे चेकपॉईन्ट्स घेताना मार्ग बदलावा लागतो. या चेकपॉईन्ट्सना वापरुन प्रवास करण्याने ठराविक एअरवेवर राहून कोणत्यातरी ठिकाणाकडे कूच करण्याचा उद्देश सरळ दिसतो. सर्वजण बेशुद्ध होऊन मूळ मार्गावर विमान राहिले असते तर ते बीजिंगच्या दिशेत जात राहिले असते. जर बेशुद्ध होण्यापूर्वी पायलटने नवी दिशा दिली असती तर त्या दिशेत जात राहिले असते. पण असे वेगळ्या मार्गाचे चेकपॉईंट्स घेतले नेमके क्रमाने घेतले नसते. -शिवाय मूळ ३५००० फुटांच्या पातळीवरुन ४५००० फुटांपर्यंत उंच आणि २३००० आणि कदाचित ५००० फूट, इतक्या प्रकारे लेव्हल्स चेंज केल्या. फ्लाईट लेव्हल कमी होणंही कदाचित समजता येईल, पण खाली उतरुन परत वर चढणं आणि तेही हजारांच्या पटीत फूट, हे आपोआप होणारं मॅनुव्हर नक्कीच नाही.

गवि, फार सुरेख माहिती, आभारी आहे, माझा प्रणाम आपल्याला

गवि … धन्यवाद या लेखाबद्दल. गेले काही दिवस हा एक लेख follow करतेय. आज हे वाचायला मिळालं, बघा तुम्हाला पटतंय का … कुणी काही वाईट हेतूने प्रेरित होऊन केलंच नसेल पण ही खरच एक अतिशय दुर्दैवी घटना / अपघात असेल असं असू शकेल ? https://plus.google.com/app/basic/stream/z13cv1gohsmbv5jmy221vrfyiz3vdh…

हा लेख मला कालवॉट्स अप वर आला.. असाच्या असा! वरती "सौजन्य गवि" असे लिहिले होते ! पाठविणाराला मिसळ्पाव बद्दल काही ही माहीती नव्हती , त्याने तो फक्त पुढे ढकलला. .. मी ही फार चौकशी केली नाही. तात्पर्य . ग विंचे लेखन सर्वदूर अन्य माध्यमात ही वाचले जाते ! या विषयाचे औत्सुक्य खूप ताणले गेले आहे. ही लिंक पहावी. http://www.malaysiaairlines.com/my/en/site/dark-site.html निवेदन इंग्रजी आणि चीनी भाषेत (?) आहे .

बोइंग कंपनीच्या सुत्रांकडुन आलेल्या माहिती नुसार, सदर विमान पाकिस्तानात उतरलेले असण्याची शक्यता आहे. ह्या घटनेत ईराणी लोकांचा सहभाग असल्याने इज्राईल जास्त सावध झाला आहे. एरवीही सावध असणारा हा देश आता युद्दाच्या पवित्र्यात आलेला आहे. अश्या पार्श्वभुमीवर अश्या प्रकारच्या संभाव्य धोक्याकडे भारताची प्रतिक्रीया काहीच नाहीय. ईज्राईल वर आक्रमण करु शकले नाहीत तर भारतावर सहज करु शकतील अशी शक्यता नाकारता येणार नाही. बाकी आपल्याला जाग अ‍ॅटॅक आल्या नंतरच येईल याची शक्यता जास्त आहे. The Malaysian government reportedly is investigating the possibility that missing Malaysia Airlines Flight MH370 avoided radar detection and landed in Pakistan near the Afghanistan border inside Taliban-controlled territory, according to the UK Independent . . . investigators confiscated a homemade flight simulator from the pilot’s home to see if it reveals any useful information . . . the Malaysian foreign minister told reporters that Malaysia asked several Asian countries for assistance in its investigation, including Pakistan . . . Pakistan dismissed the idea that a Boeing 777 could land undetected inside the country but promised to work with the Malaysian government in its search for the missing plane . . . a LIGNET analyst received information from a source at Boeing that the company believes the plane did land in Pakistan . . . Israel is taking the possibility of a terrorist attack seriously by mobilizing air defenses and scrutinizing approaching civilian aircraft, according to the Times of Israel . . . a Boeing 777 requires a lengthy, 7,500-foot runway, and Pakistan has many of them, meaning Flight 370 could conceivably be hidden in a hangar inside the country . . . U.S. surveillance of the area may be able to shed light on the theory through satellite imagery or signals intelligence. http://www.lignet.com/InBriefs/Malaysia-Hunts-for-Missing-Jet-in-Pakist…-

In reply to by डँबिस००७

आता फक्त रशिया-युक्रेन परिस्थीतीवर तोडग्यासाठी अपहरण झाले एव्हडीच थिअरी उरली आहे....असो विमानाचे अपहरण झालेच असेल(?) तर ते कोणत्याही देशाच्या पाठिंब्या शिवाय शक्य वाटत नाही. विषेशतः भारत, चिन, आणी मलेशीया. बाकी चालुद्या.

ते विमान एलिअनने पळवून नेले असावे हे ऐकून हसावे का रडावे ते कळत नाहीये.

ही बातमी देण्याची इतकी घाई का केली हे कळत नाही. हिंदी महासागरात आढळलेल्या वस्तू ह्या विमानाचेच भाग आहेत हे तपासण्या-आधीच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी माध्यमांना सांगितलंय "हे असू शकेल किंवा नसूही शकेल"

In reply to by मी_आहे_ना

घाई नसावी.त्यांना जवळपास कळले असावे.बातमी दिली नाही तर 'बातमी दडवून ठेवता आहेत निश्चितच काहीतरी काळबेर आहे' असेही म्हणता येते.

In reply to by चिरोटा

तेही आहेच म्हणा, नाहीतर इतक्या उच्चा दर्ज्याच्या माणसाने माध्यमांकडे अशी माहिती (ज्याच्याकडे सगळं जग डोळे लावून बसलंय) जाहीर करणे सहज घडणार नाही. काहीही असो, लवकर सत्य बाहेर येवो. त्या शे-दोनशे लोकांच्या (जे बीजिंग एयरपोर्टवर गेले १२ दिवस वाट पाहतायेत) भावनांचा विचारही केला तरी डोळ्यांत पाणी येते.

ह्म्म्म, वाईट बातमीने या सर्व प्रकरणाला पुर्णविराम मिळणार असे दिसते. पण अजूनही आशा सुटत नाही अमोल केळकर

In reply to by माहितगार

भारताला घेण्यासारखे असे अनेक धडे आहेत..... पण भारताने घ्यायचा म्हणजे नेमके कोणी घ्यायचा, ह्या विषयी कदाचित साशंकता असल्याने असे अनेक धडे वेगवेगळ्या पुस्तकांत, वर्तमानपत्रांत आणि इतर ठिकाणी तसेच पडून राहिले असावेत.

In reply to by सुहासदवन

भारताला घेण्यासारखे अनेक धडे अजुनही अनेक अहवालात पुरलेले आहेत. कोणालाही भारताच्या भल्याचा प्रश्नच पडत नाही, प्रश्न काही ठरावीक राजकीय पक्षाच्या,काही ठरावीक धर्माच्या च्या भल्याचाच पडत असतो, ज्या देशात दर वर्षी ५०,००० ते ७५.००० कोटी रु अन्न धान्याच्या नासाडीवर व्यर्थ जातात त्या देशातच संरक्षण दला साठी लागणारी आयु धे आणि शस्त्र सामुग्री घ्यायला पैसे नाहीत या कारणास्तव सैन्य दलाच्या मागण्या धुडकावल्या जातात. ह्या देशाला फक्त देवच चालवत आहे अन्यथा देशाच्या आता पर्यंत चिंधड्या झाल्या असत्या !!

In reply to by मेघनाद

त्याची भुख हा लेख भागवतो... मेडीयाकडे वळलो तर रोज एक नवं अन बेभरवशाचे सामोरे येत असताना हा लेख सुरेखच, याला दुखद घटनेची किनार आहे हेच काय ते दुर्दैव. :(

In reply to by मेघनाद

माझ्याकडे पण व्हॉट्स अप वर हा लेख आला आहे.मी त्या ग्रुपला हा लेख कोणी लिहिला आहे,कुठे आहे,तसेच लेखकाच्या आणि संस्थळाच्या नावाशिवाय तो असा फिरवणे कसे चुकीचे आहे ई. ज्ञानामृत पाजले आत्ताच.

आता जिथे संशयास्पद अवशेष उपग्रहातून दिसले (होते) ती जागा समुद्रात साधारण चौदाशे नॉटिकल माईल्स (अडीच हजार किलोमीटर्सच्या आसपास) इतकी दूर आहे. शोधकार्यासाठी ही निखालस एक अत्यंत अवघड जागा आहे. यात असंख्य समस्या आहेतः १. त्या जागी शोधपथकाच्या विमानाला एक फेरी मारायची तरी जाऊन येऊन पाच हजार किलोमीटर्सचा प्रवास (चार + चार = आठ तास) करावा लागणार. २. त्या ठिकाणी अर्थातच लँडिंग करता येणार नसल्याने परतीचे फ्युएल निघतानाच घ्यावे लागणार. तसंच तिथे शोधकार्यासाठी उडत राहण्याचं फ्युएलही निघतानाच घ्यावं लागणार. याचा अर्थ परत येण्याची शाश्वती हवी असेल तर शोधविमानाला तिथे संशयित घटनास्थळी शोध घेण्यासाठी एका खेपेत फार कमी वेळ मिळणार. (सध्याची काही शोधविमानं तिथे दोन तास(च) घिरट्या घालू शकताहेत. ३. तिथे विमानाने शोधकार्य करण्यात आणखी अन मुख्य अडचण अशी की विमानाला हेलिकॉप्टरप्रमाणे स्थिर तरंगत राहून एका विशिष्ट जागेचे जवळून निरीक्षण करता येत नाही. शिवाय हेलिकॉप्टरप्रमाणे विमानाला दोरी खाली सोडून लटकता मनुष्य उतरवता येत नाही. ४. हेलिकॉप्टर्स या ठिकाणी स्वतः उडत पोहोचणे विमानापेक्षा आणखी कठीण. कारण हेलिकॉप्टर्सचा वेग विमानापेक्षा फार कमी असल्याने तिथे पोचायला आणखी बरेच तास लागतील, आणि इंधन खाण्याची हेलिकॉप्टरची भूक अन रेंज पाहता एकाच फ्युएलिंगमधे हेलिकॉप्टर्स इतका लांबचा प्रवास येऊन जाऊन करु शकतील हे शक्य दिसत नाही. ५. म्हणजेच मोठ्या बोटी हाच पाण्याच्या पृष्ठभागालगत अनेक दिवस स्थिर राहून शोध घेण्याचा मार्ग आहे. मोठ्या लष्करी बोटीवरुन हेलिकॉप्टर्स आणि काही विमानं टेकऑफ / लँडिंग आणि इंधन भरणे या गोष्टी करु शकतात. ६. या ठिकाणी बोटी पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतील. योगायोगाने त्याच भागात सध्या असलेली नॉर्वे देशाची कमर्शियल बोट शोध घेतेय, पण ती या कामासाठी खास बनलेली बोट नाही. ७. समुद्राची खोली या ठिकाणी अंदाजे १३००० ते १६००० फूट आहे. बोटी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि प्रत्यक्ष शोध सुरु झाला तरी विमानाचा ब्लॅक बॉक्स त्या अवशेषांच्या ठिकाणी बुडलेला असेलच अशी शक्यता कमी आहे. तरंगणारे अवशेष एव्हाना भरकटत मूळ ठिकाणाहून बरेच दूर आले असणार. त्यामुळे ब्लॅक बॉक्स नेमका कुठे बुडला ते कळणं फारच कठीण आहे. ८. वर दिलेल्या सर्व गोष्टी या एका गृहीतकावर अवलंबून आहेत. ते उपग्रहाला दिसलेले अवशेष प्रत्यक्षात शोधपथकाला डोळ्यांनी दिसले आणि ते MH370चेच अवशेष आहेत हे सिद्ध झालं तरच या सर्व गोष्टी अ‍ॅप्लिकेबल आहेत. आजरोजी अजून तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असे अवशेष सापडलेले किंवा दिसलेले नाहीत. उपग्रहाने डिटेक्ट केलेली ती चित्रं पाच दिवसांपूर्वीची आहेत. इतक्या दूरवर हे विमान नेऊन कोसळवणे (किंवा इतक्या दूरवर ते विमान जाऊन कोसळणे अशी शब्दरचना करता येईल..) म्हणजे घोस्ट फ्लाईट (पायलट्स / पॅसेंजर्स मृत किंवा बेशुद्ध असणे, आणि विमान सरळ रेषेत उडत राहणे) किंवा पायलटची आत्महत्या इतकेच पर्याय मलातरी दिसतात. बाकी कोणत्याही मेकॅनिकल किंवा अन्य फेल्युअरने हे होऊ शकणं माझ्यातरी विचारकुवतीपलीकडचं आहे. घोस्ट फ्लाईट किंवा आत्महत्या या दोन्हीमधे विमान इंधन संपेपर्यंत ऑटो पायलटवर उंची मेंटेन करुन सरळ उडत राहतं. इथे मात्र विमानाकडून मार्ग आणि उंचीही -खाली आणि परत वर- बदलत गेल्याचे रिपोर्ट आहेत. यापैकी एक गोष्ट चुकीची आहे हे नक्की. हे अवशेष जर खरंच MH370चे निघाले तर ही आतापर्यंतची विमानविश्वातली सर्वात गूढ घटना आणि सर्वात लांब फ्लाईटपाथ डायव्हर्जन असेल.

In reply to by गवि

तुमचा लेख जरी वॉट्स अ‍ॅप फिरत असला तरी तुमचे हे पुढचे प्रतिसाद जास्त माहितीपुर्ण आहेत.. त्यामुळे लोकांनी लेख चोप्य पस्ते करण्यापेक्षा (किंवा त्या सोबतच..) ह्या धाग्याची लिंक पण द्यावी.. मी हा लेख चेपु वर शेअर करत आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल तरी की लेखक तुम्ही आहात..

'courtesy - gavee' asha heading khali tumcha lekh whatsapp var firtoy!!!

मराठीत अपडेट्स इथेच वाचायला मिळत आहेत , म्हणून सारखा सारखा इथेच येत आहे मी , पण सारे लोक विंग्रजी बातम्यांच्या संकेत स्थळे दाखउन इथे, वाचा , आणि हे वाचा म्हणुन फक्त लिंक पेस्टत आहेत . आणखी एक अशीच शंका विचारायची होती एवढ्या मोठया विमानाचे disassemble , म्हणजेच विमानाचे सुट्टे भाग करायचे म्हंटले तर किती वेळ लागेल हो , अगदी युद्ध पातळीवर करायचे झाले तरी ?

In reply to by सचिन कुलकर्णी

विमान अपघातात सापडल्याचीच शक्यता जास्त होती. ते शक्यतेची पुरेशी खात्री करून आता आशा सोडली आहे हे अधिकृतपणे सांगीतल गेल आहे. मला वाटत आशा दाखवून शॉक देण्यापेक्षा; "बातमी अप्रीयही असू शकते" अस सांगून विमान प्रवाशांच्या नातेवाईकांची मानसिक तयारी आठवड्या भरापूर्वीच मलेशियन एअरलाइन्सनी करून ठेवण अधीक चांगल राहील असतं. विमानात भारतीय प्रवासी कमी होते म्हणून शब्द योजनेने खूप फरक पडतो आहे असे नाही तरीही, अर्थात "शोध अधिकृतरीत्या बंद" ही वरील प्रतिसादातील शब्द योजना नेमकी आणि सुयोग्य असल्याबद्दल मी अल्पसा साशंक आहे. कारण विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळेपर्यंत अधिकृतपणे शोध बंद केला जात नाही. आणि समुद्रातून ब्लॅक बॉक्स मिळवणे २-४वर्षे लागणारेही काम असू शकते. सुयोग्य शब्द योजना काहीशी "पुरेशा खात्रीशीर विश्लेषणानंतर, मलेशिया एअरलाईन्सने आशा सोडली असून अधिकृतपणे विमान प्रवाशांसोबात बुडाल्याच गृहीत धरलं जात आहे. (प्रिझ्युम्ड डेड) " अशी हवी असे वाटते.

In reply to by माहितगार

विमान आपल्या निर्धारित मार्गावरच कोसळले असते तर हा अपघात आहे असे म्हणता आले असते. परंतु विमान आपल्या निर्धारित मार्गावरून मुद्दाम हटवून, जबरदस्तीने/अपहरण करून/रिमोट कंट्रोल वापरून हिंदी महासागरात कोसळवले आहे. याचा अर्थ नक्कीच विमानात असे काही असणार, ज्याचा शत्रूला पत्ता लागला असावा. मलेशिया एअरलाईन्स ला या बद्दल आधीपासूनच माहिती असावी, त्यामुळे वेळच्या वेळी योग्य ते निरीक्षणे नोद्विण्यात अथवा निष्कर्ष देण्यात खोडसाळपणा करण्यात आला आहे असेच वाटते.

In reply to by माहितगार

"शोध अधिकृतरीत्या बंद" ही वरील प्रतिसादातील शब्द योजना नेमकी आणि सुयोग्य असल्याबद्दल मी अल्पसा साशंक आहे. -- हेच म्हणायला आले होते. दुवा १ आणि दुवा २ मध्ये प्लेनचा अंत (शोध अंत नव्हे) दुर्देवाने हिंदी महासागरात झाल्याचे दिसते. फक्त एक कळले नाही ३० दिवसाच्या आत ब्लॅक बॉक्स मिळायला पाहीजे असे ब-याच वेळा ऐकले, त्याचे काही विशेष कारण असु शकेल का? एअर फ्रान्सच्या अपघातानंतर तो २ वर्षानंतर मिळाला तरी काम करत होता....कॉलिंग गवि...

In reply to by सखी

माझ्या माहितीप्रमाणे ३० दिवस ही ब्लॅकबॉक्सच्या ट्रान्समिटरला व विद्युत पुरवठा करणारी बॅटरीची क्षमता आहे. पाण्यात बुडालेला असताना त्याचा शोध घेणे सोपे जावे हे यामागचे प्रयोजन आहे. अपघात झाल्यास ब्लॅकबॉक्समध्ये लिहिली गेलेली माहिती नष्ट होऊ नये अशीच त्याची रचना केली गेलेली असते. विकी दुवा.

गवि, धन्यवाद लेखाबद्दल आणि पुढच्या प्रतिसादांबद्दल.. एक प्रश्न मनात येतो की ब्लॅक बॉक्स विमानातच असायला लागतो का आणि असे असल्यास का? ब्लॅक बॉक्स म्हणजे माझा क्रिटीकल डेटाबेस आहे आणि इतर कुठल्याही मिशन क्रिटिकल अ‍ॅप्लिकेशन प्रमाणे तो मी नियमित (कधी कधी तर सेकंदाला) रिप्लिकेट करेन, तसेच अतिशय संरक्षित अशा डेटा सेंटर मध्ये ठेवेन, त्याचे (फक्त) विमानाबरोबरच असण्याचे नेमके प्रयोजन काय?

In reply to by उपास

आजच्या पुढे गेलेल्या टेक्नोलोजीच्या पार्श्वभूमीवर ही शंका अत्यंत रास्त आहे. बिलीव्ह मी. 120 टक्के आता या अपघातानंतर समूळ बदलेल ट्रॅकिंग.. अर्थात रिमोट डेटा ट्रान्सफरवर पूर्ण अवलंबता येणार नाही. विमानात एक सर्वात रिलायेबल आणि थेट कनेकशन म्हणून इनबिल्ट रेकोर्डर राहणारच..

In reply to by उपास

शंका वर वर जरूर रास्त वाटते पण व्यावहारिकतेबद्दल शंका आल्याने उत्सुकतेने जरा खाली दिलेली डोकेफोड केली आहे... जालावर अशी चौकशी केली: "Total number of flights in one whole day around the world?" तर ही माहिती सापडली... that is an increbily hard question to answer. If you define a flight as a takeoff and landing, then the total number of daily commercial flights is going to be high. I have estimated that the total number of flights per day is around 85,000 to 90,000. Bearing in mind that this includes flights that carry less than 19 people to fully loaded jumbo jets. Source: Rank 1: Star Alliance = 16,930 Rank 2: Sky Team = 14,615 Rank 3: One World = 8,000 एकूण = ३९,००५. These are the top 3 airline alliances covering more than 50 airlines. There are over 1,000 airlines in the world. म्हणजे सर्व १००० कमर्शियल एअर्लाईन्सच्या एका दिवसाच्या उड्डाणांची संख्या नक्कीच ५०,००० पेक्षा बरीच जास्त होईल. त्यांत चार्टर्ड आणि खाजगी विमानोड्डाणाची संख्या अजून वाढ करेल. तर आता असे प्रश्न उभे राहतात... १. एका उड्डाणाचा (२० मिनीटे ते ८ तास) अव्हरेज डेटा २० जीबी (हे व्हॉईस डेटाच्या तासांच्या आकारमानाप्रमाणे फार कमी-जास्त असू शकते पण केवळ कामाच्या व्याप्तीच्या धोपट अंदाजाकरीता समजूया) धरला तर दर दिवशी १००० टेरॅबाईट डेटा, म्हणजेच दर वर्षीचा ३६५,००० टीबी डेटा होईल. प्रत्यक्षात हा आकडा अनेक पटींनी मोठा असू शकतो. इतका डेटा विश्वासूपणे साठवणे म्हणजे त्याच्या अनेक कॉपीज एकमेकापासून दूर अनेक ठिकाणी ठेवणे आले. इतका डेटा प्रत्येक सेकंदाला जमिनीवरच्या सेंटरला प्रक्षेपित करणे, साठवून ठेवणे आणि काँकरंट म्हणजे सतत एकमेकासारसा ठेवणे हे तांत्रीदृष्ट्या अशक्य नक्कीच नाही पण गुंतागुंतीचे आणि खार्चीक असणार आहे. यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील... आजच्या घडीला विमान प्रवासात होणार्‍या अपघातांचे आणि जिवीतहानीचे प्रमाण रस्त्यावरच्या वाहतूकीपेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी आहे. हे बघता, या नविन पद्ध्तीने होणारा फायदा कॉस्ट इफेक्टीव्ह आहे का? ल्बॅक बॉक्सच्या तुलनेने खूप जास्त असलेल्या या अतिरिक्त खर्चाचा भार अर्थातच प्रवाश्यांवर पडेल, हे प्रवासी आणि एअर्लाईन्सना परवडेल काय? असे असते तर स्वतःच्या हक्कांकरता जागरूक असणार्‍या पाश्च्यात्य प्रवासी संघटनांनी आतापर्यंत न्यायिक पावले उचलली असती असे वाटते. २. सुचवलेल्या व्यवस्थेतला खर्च कमी करण्यासाठी बर्‍याच एअरलाईन्सनी ही व्यवस्था एकत्रितपणे करण्यालाही बर्‍याच अडचणी आहेत... अ) या संवेदनाशील डेटाची सिक्युरीटी: हा डेटा फक्त अपघातासंबंद्धीचाच डेटा नाही तर कॉकपिटमधले "सर्व" संभाषण मुद्रित करतो. हे संभाषण थर्ड पार्टीच्या हाती देणे सर्वच एअरलाईन्सना "अस्वस्थ" करेल ! आ) डेटा फिजिकली साठवलेल्या जागेच्या देशाचे, विमान कंपनीच्या देशाचे आणि ज्यांचे नागरीक अपघातग्रस्त झाले आहेत त्या सर्व देशांच्या कायद्यांतील फरक आणि काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टस् , इ. असो. इतरही बरेच मुद्दे आहेत. पण सद्या इतके पुरे. जाणकार अधिक भर घालतीलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१. एका उड्डाणाचा (२० मिनीटे ते ८ तास) अव्हरेज डेटा २० जीबी (हे व्हॉईस डेटाच्या तासांच्या आकारमानाप्रमाणे फार कमी-जास्त असू शकते पण केवळ कामाच्या व्याप्तीच्या धोपट अंदाजाकरीता समजूया) धरला तर दर दिवशी १००० टेरॅबाईट डेटा, म्हणजेच दर वर्षीचा ३६५,००० टीबी डेटा होईल. प्रत्यक्षात हा आकडा अनेक पटींनी मोठा असू शकतो.
अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त डेटा दरवर्षी साठवून ठेवत असाव्यात आणि वापरतात देखील. आणि प्रत्येक फ्लाईटचा सारा डेटा सेन्ट्रली इतका वेळ कशाला साठवायला हवा. विमानाचा उड्डाणासाठी लागणारा महत्वपूर्ण डेटा विमान निदान जमिनीवर सुखरूप उतरेपर्यंत तरी ठेवायचा नंतर वाटल्यास काढून टाकावा. आणि काय गोपनीय माहिती लिक होईल अशी भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी इतका हव्यास कशाला हवा व्यक्ती स्वातंत्र्याचा. एक विमान इतक्या इंचीवरून जिवंत व्यक्तींना घेऊन उडते आहे आणि त्याचे कधीही काहीही होऊ शकते. अशा वेळी त्या विमानावर पूर्णवेळ सक्तीने लक्ष ठेवलेच पाहिजे. अशी स्वयंपूर्ण यंत्रणा असायलाच हवी. प्रत्येक विमान कंपनीने स्वतःहून अशी यंत्रणा निर्माण करायला हवी होती आणि आहे. प्रत्येक विमान कंपन्यांची जबाबदारी असायला हवी ती. दर वर्षी अविश्वसनीय हवामान अंदाज वर्तविणाऱ्या कामासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा, मध्ये मध्ये नेटवर्क सतत जात येत असणाऱ्या मोबाईल कंपन्यासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा निदान ह्या कामासाठी चार पाच राष्ट्रांनी मिळून एक सर्वेक्षण उपग्रह ठेवायला हवा. अशा प्रकारची यंत्रणा अशक्य आणि खर्चिक नाही पण करायची कुवत, इच्छा इत्यादी नसणे हेच कारण असावे. कारण यंत्रणेत अशा प्रकारचा/चे बग असणे हे ज्या प्रमाणे पुढील संशोधनासाठी कारणीभूत असते तसेच असे बग माहित असून देखील काही काळ ते तसेच ठेवणे, बऱ्याच लोकांसाठी तरी फायद्याचे / स्वार्थाचे असते. एक अवांतर - असाच डेटा खाजगी बस वाले, एसटीवाले, प्रवास करीत असणाऱ्या प्रवाशांचा घेतात. नाव, वय, फोन नंबर, कुठे उतरणार इत्यादी. पण हा डेटा प्रवास करीत असताना चालक आणि क्लिनर ह्यांनी तो वेळ असताना शेअर न करणे आणि फक्त स्वतः जवळ बाळगणे, किती लॉजिकल आहे? समजा गाडीला अपघात झाला आणि ही यादी / डेटा हरवला, जळाला, भिजला तर काय उपयोग आहे त्याचा. मला तर वाटते विमानासारखा रिकॉर्डर, निदान प्राथमिक अवस्थेतला तरी प्रत्येक गाडीत, निदान मोठ्या गाड्यांना देखील असायला हवा. विमान प्रवास आजपर्यंत सर्वात सुखरूप ठरला आहे म्हणून भविष्यात देखील तो सर्वात सुखरूप असेल हे माझ्या मते नशिबाचा भाग आहे. नाहीतर भारतासारख्या देशात तिथल्या यंत्रणा रस्त्यावर जाण्याऱ्या गाड्या, माणसे सुखरूप हाताळू शकत नाहीत तिथे उडणारी विमाने सुखरूप आहेत ह्याबद्दल कोणाचे आभार मानावे.

In reply to by सुहासदवन

मॉडर्न सिस्टीम्स लावण्यासाठी पाच-पंचवीस कोतीही खर्च होईल. अपघातात वर गेलेल्यांच्या आयुष्याच नुकसान हा एक भाग झाला; दुसर अस की काँपन्सेशनची माणशी एकेक कोटी किंमत जरी धरली समुद्रातून ब्लॅकबॉक्स शोधण्याचा खर्च किंवा ज्यांच्या जमिनीवर पडले त्यांना द्यावी लागणारी भरपाई धरली तर अधिक प्रगत तंत्रज्ञानावर खर्च करण्यास फार खर्च येईल असे वाटत नाही. गळ्या पर्यंत येत नाही तो पर्यंत अ‍ॅक्शन नाही असा प्रकार आहे. रेल्वे कोच मध्ये बसलेल्यांच्या प्रायव्हसीचे ठिक आहे. रेल्वे इंजीन चालवणार्‍यास रेल्वेच्या सुरक्षे पेक्षा प्रायव्हसी महत्वाची असू शकत नाही. प्रायव्हसी पाहीजे म्हणून उद्या विमानतळावरच चेकींग नको म्हणतील. प्रयव्हसी महत्वाचीच पण प्रायव्हसीचा मुद्दा सुरक्षेच्या (तुलनेत) बाबतीत तर्कसुसंगत ठरत नाही.

In reply to by सुहासदवन

आणि काय गोपनीय माहिती लिक होईल अशी भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी इतका हव्यास कशाला हवा व्यक्ती स्वातंत्र्याचा. पुर्ण अनुमोदन. मानवी हस्तक्षेपामुळे होणार्‍या चुका टाळण्यासाठीच 'थर्ड अम्पायर' या संकल्पनेचा जन्म झाला. पण सुरुवातीला त्यालाही असाच विरोध झाला होता. या घटनेवरुन योग्य तो बोध घेउन खरोखर एविएशन क्षेत्रात पण असा थर्ड अम्पायर असायलाच हवाय. शेवटी २३७ लोकांचे जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य हे २ लोकांच्या खाजगी बातचितीच्या स्वातंत्र्यापेक्षा नक्कीच जास्त असेल.

In reply to by सुहासदवन

मी केवळ फक्त सद्य वस्तूस्थितीचे माझ्या अल्पमतीने विश्लेषण करण्याच्या थोडासा प्रयत्न केला. सद्य वस्तुस्थिती आणि ती कशी असावी याबद्दलचा तुमचा (आणि माझाही) दृष्टीकोन यांच्यंत बराच फरक असू शकतो.... किंबहुना आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इस्पिक एक्का.. माझ्या अनुभवानुसार तुम्ही दिलेली आकडेवारी जरी ग्राह्य मानली तरी खर्च (इम्प्लिमेंटेशन/ मेन्टेनन्स) हा करायलाच हवा. ९/११ नंतर वाढलेल्या सिक्युरीटी मुळे आणि प्रवाशांचा त्यात जो वेळ जातो त्याचा हिशोब करता अपरिमित खर्च होतोय पण म्हणून तो टाळता येऊ शकणार नाहीच. गुगल/ फेसबुक/ याहू इतके मोठे सर्वर्स चालवतात, त्यामुळे सिस्टीम जर फूल प्रूफ होत असेल तर खर्च करायलाच हवा.. एखादा प्रायव्हेट क्लाऊड किंवा तत्सम नेटवर्क उभं राहायला हवं, आणि प्रायव्हसी हवी म्हणून सिक्युरीटी नको असं म्हणणं तितकसं उचित नाहीच. आज त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला असता तर चित्र वेगळं असतं, कदाचित प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न तरी नक्कीच करता आले असते आणि हे केवळ टेक्नॉलॉजिच अपयश आहे असं मी मानतो, हे टेक्निकल डेब्ट घेऊनच आपल्याला वावरावे लागणार अजून काही काळ हे एक टेक्निकल माणूस म्ह्णून मला निराशाजनक वाटतं!

In reply to by उपास

उपास, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अधिक उपयोगी सिस्टीम नको असे कधिच म्हटले नाही. प्रवास करण्याची आवड असल्याने अशी काही व्यवस्था होऊ शकली तर इतरांसाठीच नाही तर माझ्या स्वतःसाठीही मला अत्यानंदच होईल. मी माझ्या मूळ प्रतिसादात फक्त असे का होत नसावे याची फक्त काही संभाव्य कारणे लिहीली आहेत. हे एक कठोर सत्य आहे की मोठे व्यवसाय (यात विमानवाहतूकही आली) हे सर्व कॉस्ट-बेनेफीट रेशोच्या प्रत्यक्ष आणि संवेदीत (परसिव्ह्ड) तत्वांवर चालविले जातात. त्याशिवाय ते फार काळ कारकिर्दित राहू शकणार नाहीत... मग कंपनीही नाही आणि सेवाही नाही असे होईल. बिलियन्समध्ये कंपनीत गुंतवणूक करणारी कंपनी "सरळ सरळ अपघात आणि आताच्या अनाकलनिय विमान दुर्घटनेसारख्या गोष्टी झाल्या तर त्यांचे कंपनीवर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (टँजिबल-इनटँजिबल) परिणाम" आणि "त्यावरच्या प्रतिबंधक आणि निवारक उपाययोजनांवर होणारा खर्च" या दोन गोष्टी प्लॅनिंग मध्ये धरणार नाही असे गृहीत धरणे जरा फारच धारिष्ट्याचे होईल. याशिवाय या सर्व कंपन्यांना त्या ज्या ज्या देशात कार्यरत आहेत त्या सगळ्या देशांच्या रेग्युलेटरी संस्थांच्या नियमांचे पालन करावे लागते. हे नियम बनवताना "किती कडक नियम म्हणजे अती कडक नियम ?" हा यक्षप्रश्न नेहमीच असतो. प्रत्येक अधिक सुरक्षा व्यवस्थेने खर्चही त्याप्रमाणात वाढणार हे नक्की. तेव्हा पहिल्या प्रश्नाबरोबरच "प्रतिबंधक उपाययोजनांचा किती खर्च म्हणजे अती खर्च?" हा दुसरा यक्षप्रश्नही उभा असतो. यात विमानकंपनी आणि प्रवासी या दोघांच्या हितसंबंधांचा तोल सांभाळत निर्णय घेऊन नियम करावे लागतात. अपघात कोणालाचा सुखद नसतो... प्रवाश्यांना, कंपनीला आणि प्रवासी/कंपनीच्या देशातील व जागतीक नियमन करणार्‍या संस्थाना. तेव्हा, नियमन करणार्‍या संस्था प्रवाश्यांची सुरक्षा सर्वात वर ठेवून नियम बनवतात. याचसाठी आजही विमानप्रवासातली मनुष्यहानी आज रस्त्यावरच्या मनुष्यहानीपेक्षा लक्षणिय कमी आहे. मात्र "किती सुरक्षा म्हणजे अती सुरक्षा ?" हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहणार आहे... कारण वरच्या प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून त्याचे उत्तर सतत वेगळेच राहणार आहे. असो. या दुर्घटनेतून जगभरात विमानप्रवासाच्या सुरक्षेबद्दल काही नविन शिकले जावून तो अजून जास्त सुरक्षित बनावा ही इच्छा करणेच माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशाच्या हातात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचा मुद्दा एक व्यावसायिक म्हणून पटला आणि कळला, पण एक तंत्रज्ञ ह्या दृष्टीकोनातून मी येथे पाहात असल्याने टॅक्नॉलोजिकल फॅल्युअर अस्वस्थ करतेय, ह्यातून पुढे नेमक्या सुधारणा होताहेत हे बघण्यासारखं असेल, गवि म्हणतात तसं १२०% जर काही होणार असेल तर पहायला प्रचंड उत्सुक आहे, त्या दृष्टीने अपघातात गेलेल्यांच 'व्यर्थ न हो बलिदान' इतकंच म्हणेन! दहशतवाद्यांनी केलेल्या ९/११ च्या हल्ल्यात कित्येक माणसं मेली/ नुकसान झालं पण ते मानवनिर्मित होतं, काही तांत्रिक कारणाने असं जेव्हा होतं तेव्हा व्यावसायिक दृष्टीकोना पलिकडे विचार करावाच लागतो, तंत्रावरचा किंवा ते वापरणार्‍यांवरचा सामान्य माणसाचा विश्वास ढेपाळू शकतो, ते जास्त निराशाजनक आहे विज्ञानाच्या प्रगतिच्या दृष्टीने.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा प्रतिसाद मला आहे का? पण मी तर सुहास्वदन साठी लिहिला होता. अर्थात काहिही पर्सनल घेउ नका प्लीज. प्रतिसाद देतांना माझ्या डोक्यात जरा स्नोडेन आणि विकीलीक्स पण घोळत होतं.

In reply to by स्वप्नांची राणी

नाही, तो प्रतिसाद उपास यांनी उपस्थित केलेल्या माझ्या मूळ प्रतिसादातील मुद्द्यांचा थोडा अजून विस्तार म्हणून लिहीला होता. मीही एक प्रवासी याच दृष्टीकोनातून विचार करून लिहीतोय. पण ते करताना "किती मागण्या म्हणजे अती मागण्या?" असाही विचार करतोय. कारण जितकी मला माझ्या जिवाची काळजी आहे तितकीच कंपनीलाही असते... त्याचे कारण माझ्या प्रत्यक्ष जीवाइतकेच (किंवा काहिंच्या मते त्याहीपेक्षा जास्त !) कंपनीच्या भवितव्य हे असते. कारण कोणत्याही मोठ्या अपघाताने विमान कंपनीचे आस्तित्वच धोक्यात येऊ शकते... कमीत कमी व्यवसायत मोठा तोटा तर नक्कीच होतो. हे कोणत्याही कंपनीला नकोच असते. प्रवासी म्हणून मलाही अती सुरक्षा मागताना तिची किंमत परवडेल काय असाही विचार करावाच लागेल. कारण प्रत्येक वाढलेला खर्च प्रवाश्याच्या तिकीटाच्या किंमतीत वाढ करतो (दुसरे कोण देणार तो?)... त्यामुळे विमानप्रवास जर माझ्या आवाक्याबाहेर गेला तर एक प्रवासी कमी झाला म्हणून कंपनीचे जेवढे नुकसान होईल तसेही विमानप्रवासाला मुकल्यामुळे माझेही होईल. विमानप्रवासातला अपघात म्हणजे जिवावरचा खेळ आणि त्यात आवश्यक सर्व सुरक्षा हवी हे अगदी मान्य. पण आपल्याला तो सुरक्षित ठेवून परत कमीतकमी खर्चातही हवा असतो... ही "आखूड शिंगी, भरपूर दूध देणारी गाय... वगैर" अशीच तारेवरची कसरत करायला लावणारी मागणी असते ही वस्तुस्थिती आहे, इतकेच. माझा विमानव्यवसायाशी आतापर्यंत एकाच प्रकारचा संबंध आला आहे... प्रवासी म्हणून. सो, अ‍ॅब्सॉल्युटली नथिंग पर्सनल... एक्सेप्ट फॉर माय (पॅसेंजर) सेफ्टी अँड द कॉस्ट दॅट आय अ‍ॅम रेडी तो बेअर फॉर इट :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा विमानव्यवसायाशी आतापर्यंत एकाच प्रकारचा संबंध आला आहे... प्रवासी म्हणून
पुन्हा एकदा गविंच्या प्रतीक्षेत. यात नेमकी विमान कंपन्यांची / जबाबदार संस्थांची भूमिका काय असते ते कदाचित तेच सांगू शकतील.

Beyond all reasonable doubts.. अशी शब्दरचना करुन मलेशियाच्या मुख्यमंत्र्यांनी या विमानाचा अंत झाल्याचं जाहीर केलं आहे. या डिक्लेरेशनचा जाहीर आणि उघड केलेला स्रोत म्हणजे नव्याने हाती लागलेले उपग्रह ट्रॅकिंग. या ट्रॅकिंगने विमान नक्की दक्षिणेकडेच गेलं आणि जिथे शेवटचे सिग्नल मिळाले तसंच इंधनाची मर्यादा संपली ते ठिकाण कोणत्याही जमिनीपासून हजारो किलोमीटर दूर असल्याने लॅंडिंगचा प्रश्नच नव्हता. आणि समुद्रात इतक्या आतवर दोन आठवडे सर्व्हायव्हर्स असण्याची जराशीही शक्यता नाही..या तर्काने हे विधान केलेलं आहे. नेमकं काय नवीन पद्धतीने ट्रॅकिंग केलं ती माहिती नंतर पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन. त्याच पहिल्या दिवशी हा पत्ता लागला असता तर काही सर्व्हायव्हर्स मिळू शकले असतेही. पण ही जर तर ची गोष्ट. ही लाजिरवाणी गॅप आहे. त्याविषयी परत कधीतरी.

नेट वर चाललेला एक भन्नाट संवाद : Questions and answers about missing Malaysia airliner: User 1: Is it possible that plane flew vertically up and left earth’s atmosphere into deep space? I am just trying to think outside the box User 2: No. Get back in the box.

पायलटने विमान का भरकटवले ? हे जाणीवपुर्वक असेल तर आत्मघाती हल्ला टाळण्यासाठीच असाच माझा कयास आहे...

In reply to by आत्मशून्य

जर विमानाने आपली आल्टिट्यूड आणि दिशा बदलत प्रवास केला ही थिअरी / माहिती चुकीची ठरली तर मग घोस्ट फ्लाईट स्थिती उत्पन्न झाली असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हेलिओस घोस्ट फ्लाईटप्रमाणे. हेलिओसविषयी मी इथे पूर्वी लिहिलं होतं. आत्ता लिंक देणं शक्य नाहीये. फक्त हेलिओसच्या बाबतीत पायलट्स बेशुद्ध झाल्याचं आणि एकूण परिस्थितीविषयी त्याचवेळी कळलं होतं. स्क्रॅंबल करायला आलेल्या एअरफोर्स फायटर विमानांनी जवळ समांतर उडून cockpit च्या आत बघितलं होतं. ती फ्लाईट जमिनीवर होती आणि लगेच ॲकशन झाली म्हणून गूढ राहिलं नाही. mh370 च्या बाबतीत त्याच्यावर सतत लक्ष असतं तर ते वाचवता आलं असतं कदाचित. कदाचितच अर्थात. या विमानाला फ्लाय बाय वायर यंत्रणा असल्याने काही कंट्रोल कदाचित करता आला असता. बाकी निव्वळ सत्य काय ते black box / FDR सापडला तरच कळू शकेल. ती शक्यता कमीच वाटते. पण शोध चालू राहील हे नक्की.

In reply to by गवि

गवि, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे (आणि अजूनही कुठेतरी २-३ ठिकाणी वर्तवलेल्या शक्यतेनुसार) जर ३७० घोस्ट फ्लाईट झाली असेल, तर अश्या फ्लाईट्स साठी काही संवैधानिक अधिकार एखाद्या देशाला असतात का? जसे, न जाणो पण ही ३७० फ्लाईट कमी अंशातून वळून वायव्येकडे (पर्यायाने भारताकडे) किंवा जास्त अंशात वळून ऑस्ट्रेलियाकडे गेली असती आणि जमिनीवर पडली असती तर होणारी जीवित हानी भयंकर असती. अश्या वेळी 'डिसिजन पावर' कोणाकडे असते का?

आजच लोकसत्तामध्ये हा लेख वाचनात आला. एक अभ्यासपूर्ण आणि बर्‍याच शंकांना उत्तरे देणारा लेख... http://www.loksatta.com/vishesh-news/mystery-of-malaysia-airlines-fligh… ह्या घटनेनंतर कदाचित एविएशन इंडस्ट्रीचा आणि त्यांतील तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा सुधारेल ही आशा.....

हा लेख आल्यापासून सतत अपडेट्स वाचायची सवय लागली होती. कुठेतरी खोटी आशा वाटत होती.. आता फक्त खूप वाईट वाटतंय. :( या अशा घटनेवरही जोक्स सुचणार्‍या, सांगणार्‍या आणि फिरवणार्‍या लोकांमुळे उद्विग्नता आली होती. त्यातील गांभीर्य अतिशय नेमकेपणे जाणवून देणार्‍या या लेखाचे खूप आभार.

विमान पाण्यात पडल्या नंतर, मोठी लाट किंवा पाणी उसळून आले नसेल? ते कुणाला दिसले अथवा जाणवले नसेल? मला वाटतं की हे नक्कीच कुठल्या radar वर डिटेक्ट झाला असेल च ना? मग त्या विषयी अजुन काहीच वाचनात कसं नाही आलं?