मंगलाष्टक वन्स मोअर - पाणचट टू द कोअर!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काल संध्याकाळी जालावर 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे पोस्टर पाहिले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही आजची मराठीतील आघाडीची जोडी! 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका, 'मुंबई-पुणे-मुंबई' हा चित्रपट तसे छान हलके-फुलके आणि नर्मविनोदी वाटले होते. 'मुंबई-पुणे-मुंबई' तर छान निवांत चित्रपट वाटला होता. थोडा संथ होता पण पुण्यातल्या भांडारकर रस्त्यावरचे क्रिकेट खेळतांनाचे प्रसंग, सिंहगडावरील प्रसंग, रेल्वे स्टेशनवरील प्रसंग आणि चित्रपटाचा एकूणच निवांतपणा असे सगळे खूप छान वाटले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी खूप छान अभिनय केला होता. हा अनुभव जमेस असल्याने आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मोठ्या आशेने सुरु केला. वाटले आता दोन तास जरा मनाला तजेला देणारं, थोडं निखळ हसवणारं असं काहीतरी खुमासदार बघायला मिळेल. आधी मला वाटलं की या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडेच आहेत. त्यामुळे मी निर्धास्त होऊन चित्रपट सुरु केला. आणि जांभया देत देत कसाबसा संपवला...
आरती (मुक्ता बर्वे) आणि सत्या (स्वप्नील जोशी) हे एक तरुण जोडपं. सत्या रेडिओ मिर्ची मध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आणि आरती सत्याची 'मॅनेजर' म्हणून काम करते. त्यांचं भलंमोठं घर असतं. (एवढं मोठं घर कसं काय परवडतं देव जाणे; आम्ही तर टिचभर घराचा खर्च भागवता भागवता इंचभर मरतो रोज) सत्या सकाळी ऑफीसला जातांना नेहमी त्याचे इस्त्री केलेले कपडे, रुमाल, मोबाईल, वगैरे सगळं त्याच्या बेडवर तयार असतं. हे बहुतेक सगळ्या नवर्यांचं स्वप्न असतं. पण फार थोड्या नशीबवान नवर्यांवर देव, नियती, लेडी लक, वगैरे सगळे एकदम प्रसन्न होतात. एरवी...जाऊ द्या; उगीच कशाला कुणाला दुखवा. तर सत्या बाथरूममधून बाहेर आला की त्याचा नाश्ता, चहा-कॉफी टेबलवर तयार असतं. हे ही एक स्वप्नच! कमीत कमी पाच वेळा ओरडून झाल्याशिवाय नाश्ता हातात दिला तर तमाम सांस-बहू मालिकांमधल्या सांस-बहूंचे तळतळाट लागतील असा साधारणपणे बायकांचा समज असतो. सकाळी जाग आल्यानंतर सत्याने थोडं जरी 'ऊं आं' केलं किंवा डोळ्यांची दोनपेक्षा अधिक वेळा उघड-झाप केली की आरतीचा जीव टांगणीला लागतो. मग ती त्याला, "काय होतय राजा? बरं नाही वाटत आहे का? गोळी घेतोस का? जाऊ दे, सुटी घेऊन आराम कर, राजा" असं चेहर्यावर शंभरदा हात फिरवून विचारते-बजावते. रात्री एकदा सत्या थोडा वैतागलेला असतो. चिडून तो "माझ्या छातीत जळजळतंय" असं आरतीला म्हणतो. आरती लगेच त्याची शांत झोप लागण्यासाठीची सीडी लावते आणि त्याला छान पांघरूण घालून झोपी घालते. मग सत्या अंगठा चोखत चोखत झोपी जातो! तर असं हे बाळबोध कुटुंब! सत्याला हे सुख मानवत नाही. आरती त्याला नेहमी त्याच्या बीयर पिण्यावरून टोमणे मारत असते. आपल्या सगळ्या मैत्रिणी, सत्याचे बालिश मित्र आणि जो कुणी भेटेल तो फक्त आपल्याच संसाराची चिंता करण्यासाठी जन्माला आलेला आहे असा आरतीचा घट्ट समज असल्याने ती जो भेटेल त्याला आपण सत्याची कशी नीट काळजी घेतो हे पुराण ऐकवून पकवत असते. त्याच्या तथाकथित बीयर पिण्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल मुक्ताफळं उधळून आपण आहोत म्हणूनच कसं त्याचं व्यवस्थित चालू आहे हे पटवून देण्यात तिचे दिवस जात असतात. या दोघांना मूल होत नसल्याने वैद्यकीय उपाय सुरु असतात हा अजून एक वेगळाच ट्रॅक! डॉक्टरचं म्हणणं असतं की नुसता फिजीकल काँटॅ़क्ट वाढवून उपयोग नाही; मने देखील जुळली पाहिजेत. आरती अगदी मनापासून मने जुळवण्याचा प्रयत्न करते. तिचे सत्याच्या चेहर्यावरून हात फिरवणे वाढते (काँटॅक्ट वाढवणे म्हणजे हेच वाटत असावे बहुधा तिला); त्याचं वजन मोजून त्याने योगा आणि सायकलिंग करणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्याची फ्रि॑क्वन्सी वाढते; प्रत्येक वाक्यागणिक 'राजा' म्हणणे मळमळ होण्याइतपत वाढते. "असं रे काय करतोस राजा", "आलेच रे राजा", "तिथेच असेल ना ते राजा", "सायकलिंग करत जा बरं राजा" असं सतत 'राजा राजा' ऐकून आपल्याच मस्तकात तिडीक जाते. सत्याच्या ऑफीसमधल्या कामात खूप टेंशन असते. त्याचं सेल्स टारगेट एक कोटी रुपयांचं असतं. त्याची बॉस शालिनी (सई ताम्हणकर) खूप जास्त अग्रेसीव्ह आणि भडक डोक्याची असते. सई ताम्हणकरचा असल्या भूमिकांमध्ये हातखंडा आहेच. आणि आरतीसारख्या काकूटाईप व्यक्तिरेखेला बॅलन्स करण्यासाठी शालिनीसारखी बेबटाईप व्यक्तिरेखा असणं हे आपण ख्रिस्तपूर्व काळापासून बघत आलो आहोत. तीच शिळी विटकी खिचडी पुन्हा इथे आहेच.
या सगळ्या प्रकाराला सत्या आधीच वैतागलेला असतो. एक दिवस त्याचं आणि आरतीचं भांडण होतं. आरती सत्याला फक्त मनेच जुळण्याचं महत्व सांगत असतांना "सत्याचा स्फोट" होतो. "नुसती मने जुळून उपयोग नाही; फिजीकल काँटॅक्टदेखील व्हायला हवा असं डॉक्टर म्हणतात पण फिजीकल काँटॅक्टसाठी माझी बायको असते कुठे?" असा सत्याचा उद्रेक झाल्यावर आरती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा त्याच्या चेहर्यावरून हात फिरवायला लागते (पुन्हा तेच). शेवटी त्याचा कडेलोट होतो आणि तो तिला घराबाहेर काढतो. टिपीकल मराठी कादंबरीच्या नायिकेसारखं आरतीचं 'सैरभैर होणं' 'उध्वस्त होणं' 'उन्मळून पडणं' 'कोलमडून पडणं' वगैरे सगळं यथासांग होतं. मध्येच एक चोर तिची पर्स चोरून पळून जातो. त्याचा राग ही सैरभैरवी एका वॉचमनला दगडं मारून काढते. तिचं कोलमडून वगैरे पडणं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा केविलवाणा आणि थातूर-मातूर प्रयत्न! सत्याचा कडेलोट का होतो ते ही खरं म्हणजे नीटसं उलगडत नाही. तो का कोलमडून पडतो ते ही कळत नाही. बालिश बायका सांभाळणारे काही कमी नाहीत या जगात आणि बीयर बेली मिरवणारे नवरे देखील कमी नाहीत. पण चित्रपटात कोलमडणं वगैरे असलं की चित्रपटाला वजन येतं असाच अजून मराठी दिग्दर्शकांचा समज असावा बहुतेक. जितकं कोलमडणं आणि पिचलेलं असणं जास्त तितका क्रिटीकल अॅक्लेम जास्त! पुरस्कार जास्त! आणि मग "मराठी सिनेमा कात टाकतोय" छाप लेखांचा अजीर्ण होण्याएवढा रतीब सुरु!! हे ही आता शिळं झालंय. गेली १५ वर्षे मराठी चित्रपट अजून कातच टाकतोय. अरे हा साप मोठा तरी किती? एवढी मोठी कात आहे याची? जमाना दिवसागणिक बदलतो आणि मराठी चित्रपट मराठी माणसासारखाच आळसावत पडलाय असे तर वाटत नाही ना? नवनवीन विषयांवर चित्रपट काढून मानवी मनाचा थांग-बिंग आणि धांडोळा-बिंडोळा घेणारे मराठी चित्रपट आता बघवत नाहीत. 'जोगवा' '७२ मैल एक प्रवास' 'मी सिधूताई सपकाळ बोलतेय' 'मला आई व्हायचंय' वगैरे चित्रपटांची पोस्टर्सदेखील बघायची भीती वाटते ती याच कारणांमुळे. एक समस्या घ्यायची आणि प्रेक्षकांना रड-रड रडवायचं फक्त हेच मराठी सिनेमामधले 'धांडोळा'छाप चित्रपट करत असतात. साहजिकच गल्ला रिकामा जातो आणि पोस्टरच्या वरची थोडी जागा चार-दोन फुटकळ पुरस्कारांनी भरते. 'द शॉशँक रीडींप्शन' एका निरपराध बॅक अधिकार्याला तुरुंगात २० वर्षे कसे खितपत पडावे लागते आणि तो कशी स्वतःची सुटका करून घेतो याची कहाणी आहे. मजाल आहे की चित्रपट कुठे कंटाळवाणा, बापुडवाणा, ठिगळं लावलेला, आणि रडका वाटेल! तिच गत 'शिंडलर्स लिस्ट'ची. इतक्या महाभयंकर आणि क्रूर अत्याचाराच्या कहाण्या क्वचितच कुठे सापडतील. पण ३.१५ तास चित्रपट खिळवून ठेवतो की नाही? पण मराठी सिनेमा अजून हृदय पिळवटून टाकण्याच्या भानगडीतच गुंतलेला आहे. असो.
इकडे सत्या मात्र कूल असतो. म्हणजे थोडक्यात आता नेमकं काय करायचं हेच त्याला (दिग्दर्शक, लेखकाला) कळत नाही. मग तो काहीतरी फडतूस ऑफीसच्या मीटींगा करतो. आश्चर्य म्हणजे बायको घरातून निघून गेली आहे; आपणच तिला घराबाहेर काढली आहे याविषयी खेदाची, निराशेची, अनिश्चिततेची, काळजीची छटादेखील त्याच्या चेहर्यावर दिसत नाही. शालिनी तारस्वरात ओरडून त्याचं जगणं हराम करत असतेच. मध्येच जगाच्या आरंभापासून जो सीन आपण बघत आलो आहोत तो देखील साग्रसंगीत होतो. सत्या, त्याचा निखिल नावाचा बालिश मित्र आणि अजून एक बायकोने सोडलेला मित्र दारूमध्ये आपले दु:ख बुडवत असतात. आता या सीनमध्ये काय बघायचं? मग ते तिघे काहीतरी बाष्कळ बडबड करतात. एकमेकांना विनाकरण शिव्या देतात. असं दाखवल्याने चित्रपट वास्तवाच्या जवळ जात असावा बहुतेक. स्वतःचं खाजगी आयुष्य चिवडत बसतात आणि तिथे दारूच्या नशेत सत्याला साक्षात्कार होतो की आपली फार मोठी भयंकर चूक झालेली आहे. बघा, ज्या दारूमुळे आरती सत्याला टोमणे मारते त्याच दारूच्या नशेत सत्याला सत्याचा साक्षात्कार होणे ही दिग्दर्शकाच्या चित्रपटीय भाषेच्या जाणीवांची प्रगल्भता दर्शवते.. हुश्श!! मध्येच सत्याला शालिनीचा मुलगा पाचगणीमध्ये, नवरा दिल्लीमध्ये आणि ती पुण्यात अशा शालिनीच्या भौगोलिक कुटुंबाची कहाणी शालिनीच्या झरणार्या डोळ्यामधून बयान होते. वरून कशीही असले तरी मी माझ्या कुटुंबाला मिस करते, करीअरपुढे कुटुंबाची आबाळ होते, ही रेस आहे, प्रत्येकाला पुढे जायचे आहे वगैरे घासून-घासून गुळगुळीत झालेली फालतू वाक्ये शालिनी सत्याच्या तोंडावर फेकते. सत्या बावळटपणाचा मूर्तिमंत कहर असतोच; तो ती वाक्ये कॅच करतो आणि चघळत बसतो. मला एक समजत नाही इतक्या साध्या गोष्टी चित्रपटातल्या नायक-नायिकांना अशा कुणा दुसर्याच्या कृतीमुळे किंवा सांगण्यानेच का समजतात? स्वतःचं डोकं काय गहाण ठेवलेलं असतं का या नायक-नायिकांनी? पण आता सत्या अंतर्बाह्य बदललेला असतो. शालिनी आणि त्याच्या फडतूस मित्रांनी दोन-दोन मिनिटांत त्याच्यामध्ये आणि त्याच्या स्वभावामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणलेला असतो.
मिनव्हाईल, आरतीची एक मैत्रिण (कादंबरी कदम) आरतीच्या नखर्यांना सहन करण्यासाठीच जन्माला आलेली असल्याने आरतीला आपल्या घरी ठेवून घेते. आरती तिथं सगळं भडाभडा ओकते. मग आपल्या बापाचं घर असल्यासारखी आरती तिथे राहू लागते. मैत्रिण (व्यक्तिरेखेचे नाव आठवत नाही; काहीही समजा, दगडी, धोंडी, क्या फरक पडता है?) आरतीच्या आयुष्यात नाक खुपसण्याव्यतिरीक्त कधी-मधी कामावर पण जाते. आरती हप्ता वसूल केल्यासारखे मैत्रिणीकडून वारंवार पैसे पण घेते. मग मैत्रिणीच्या आग्रहाखातर आरती रिसेप्शनिस्टची नोकरी धरते. आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे; मैत्रिण किती दिवस फुकाचा घास गिळायला देणार ही किरकोळ गोष्टदेखील आरतीला स्वत:ची स्वत: कळत नाही. विनोद म्हणजे ती एमबीए असते. आता बोला? आता प्रेक्षकच 'सैरभैर' 'उध्वस्त' होण्याच्या मार्गावर असतात. इकडे सत्या सायकलिंगला जातो; मोलकरणीला फक्त उकडलेल्या भाज्या करायला लावतो आणि वजन कमी करतो (वाटत नाही पण तसं भासवलेलं आहे). आणि मग ते दोघे पुन्हा भेटतात. पुन्हा काहीबाही पाणचट गप्पा, तथाकथित बाष्कळ रोमान्स वगैरे होतो. दोघांना आपण दोघेही चुकत असल्याचा साक्षात्कार होतो आणि शेवटी दोघे पुन्हा एकत्र येतात. **प्रचंड मोठी जांभई**
माझ्या मनात काही प्रामाणिक प्रश्न 'मंगलाष्टक वन्स मोअर' पाहतांना सतत येत होते. अगदी माफक रोमान्स किंवा रोमँटीक आठवणींच्या प्रसंगात मराठी चित्रपटात बॅकग्राऊंडला "हे हे हे..हे हे हे हे" अशा संतापजनक सुरावटी का असतात नेहमी? कुणी उत्तर देता का उत्तर? आपले मराठीमधले सुरेश वाडकरछाप गोड गोड गळ्याचे गोड गोड गायक दर दोन-पाच मिनिटांनी 'हे हे हे हे हे हे' करत विव्हळत असतात. प्रेक्षकांनी एकदम रोमँटीक मूडमध्ये जाण्यासाठी या निरर्थक सुरावटी घुसडलेल्या असतात का? आणि गाणी तरी किती फालतू. "तुझ्यासवे मी उमलले.." "हे का भासे असे..." "स्पंदनांची हाक.." वगैरे अतिशय छापील आणि तोचतोचपणाचा प्रत्यय देणारी गाणी किती रटाळ वाटतात हे संगीतकरांना कधी कळेल. हे शब्द आजकालच्या रोमँटीक गाण्यांचे प्रतिनिधित्व करतात; ही 'मंगलाष्टक वन्स मोअर' मधली गाणी नाहीत पण त्यातली गाणी इतकीच निरर्थक आणि गचाळ आहेत.
अचानक सत्याची सिंगापूरला बदली होते आणि शालिनीसहित सगळं टोळकं सत्याला न सांगता सत्याच्या घरी धूडगूस घालायला येतं. अरे हे काय आहे? डायरेक्ट घरी जाऊन बॉस सांगते की तुझी सिंगापूरला बदली झाली आहे? अरे सिंगापूर म्हणजे काय शनि शिंगणापूर आहे का? नाही तेव्हा सत्याला टारगेट पूर्ण होत नाही म्हणून झापणारी शालिनी एकदम एक कोटीच्या १६% जास्त टारगेट पूर्ण झाल्याची खबर देते. अगदी ३-४ महिन्यातच हे टारगेट पूर्ण होऊन १६% वर बिझनेस होतो. आहे की नाही कमाल? आणि अभिनंदन करतांना शालिनी मोठ्या भावाने आपल्या लहानग्या बहीणीला जवळ घ्यावे तसे शालिनी सत्याला मिठीमध्ये बोलावते. आणि येस्स यू गेस्सड इट राईट! नेमकी तेव्हाच आरती तिथे दारात येऊन कडमडते. किती फालतूपणा करावा? मग थोडा संशयकल्लोळ होतो. ही फोडणी नित्याचीच आहे त्यामुळे तिचा ठसकाही लागत नाही, चवही लागत नाही, आणि ही फोडणी दिलेल्या पदार्थाने पोटही भरत नाही.
सत्याला काय खुपत असते हे तो कधीच आरतीला सांगत नाही. ती बोलते, विचारायचा प्रयत्न करते, फाटण्याच्या आधीच शिवण्याचा प्रयत्न करते पण का कुणास ठाऊक सत्या तिला सांगतच नाही. त्याने आधीच सांगीतलं असतं तर पुढचं सगळं रामायण कसं दाखवता आलं असतं? आणि मग दारू ढोसतांना एका मित्राच्या अनुभवावरून याला कळतं की आपण प्रॉब्लेम काय होता हे सांगीतलच नाही; त्यावर नीट बसून चर्चाच केली नाही; एवढे शिकलेलो आपण पण एवढी साधी गोष्ट आपल्या मठ्ठ डोक्यात आलीच नाही. हे कुठल्या अँगलने तार्किक वाटतं यावर लेखक-दिग्दर्शकासोबत मला पुण्याच्या ना. सी. फडके सभागृहात चर्चासत्र आयोजित करायला आवडेल. नक्की यायचं हं! उपस्थितांपैकी प्रत्येकाला आम्ही 'मंगलाष्टक वन्स मोअर'चे स्टँम्प साईझचे एक पोस्टर (साईझ रिडक्शन करून झेरॉक्स केलेले), एक पारले-जीचे बिस्कीट, आणि 'मंगलाष्टक वन्स मोअर'च्या डीव्हीडीवर १.५% ची घसघशीत सूट देणारे कुपन देणार आहोत. पुण्यातल्या मंडळींनी तर यायलाच पाहिजे. तासभर बसून एवढा ऐवज (किंवा घबाड म्हणा हवं तर) मिळणार असेल तर काय हरकत आहे?
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या व्यक्तिरेखाच फालतू आहे त्यामुळे यांच्या अभिनयाबद्दल न बोललेलंच बरं. सत्याचा एक अत्यंत बालिश मित्र बालिश आवाजात (याला आपण विनोदी समजायचं) बडबड करत असतो; तो डोक्यात जाणारच असतो; जातोच. आरतीची मैत्रिण हे एक फालतू कॅरॅक्टर. तिला काही कामधंदा नसतोच. सई ताम्हणकर आता जरा जास्तच 'भारदस्त' वाटते. तिने काळजी घ्यावी ही विनंती नाही तर तिची समीरा रेड्डी व्हायला वेळ लागणार नाही. मदत करण्याचा लेखकाचा स्वभाव असल्याने तिला हवे असल्यास मार्गदर्शन पुरवले जाईल. बाकी तिच्या भूमिकांचा साचा जवळपास ठरत चाललेला आहे. ही देखील एक काळजीचीच बाब!
कथेत आणि पटकथेतच आनंदी-आनंद असल्याने दिग्दर्शनात परमानंद आहे. प्रेक्षकांना थोडेसे जरी बरे वाटले तर अहमदनगर-भिंगार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या वज्रकमळाचे चान्सेस कमी होतील ही भीती असल्याने दिग्दर्शकाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहेच. आणि बाकी सगळ्यांनी मनापासून साथ दिलेली आहे. टीमवर्कशिवाय असा मास्टरपीस शक्य नाही हेच खरे!
...शेवटी कळलं हा सतीश राजवाडेचा चित्रपट नव्हताच. समीर हेमंत जोशी नावाच्या दिग्दर्शकाचा होता. 'समीर' नावातच काही दोष आहे स्साला...जो भी करेंगे पचकाच करेंगे...डॅम इट!!!
प्रतिक्रिया
अभिनंदन ……
+१
आडवं तिडवं पोस्टर फाडलयं
आडवं तिडवं पोस्टर
मला तर "मुंबई-पुणे-मुंबई" पण
सेम पिंच. मला पण बिल्कुल
तुमचं फुलस्केप-दोन फुलस्केप
धन्यवाद!
अरे हो...
मुक्ता बर्वे ' लग्न ' या
मुक्ता बर्वे ' लग्न ' या
दुर्दैवाने...
लै भारी
जबरी
आवडले!
कालच पाहिला , आधी पाहिला आणि
असह्य
*lol**lol**lol**lol*
....
हाहाहा चोख प्रतिसाद .
मी पण हा चित्रपट थेटरात पहिला
Pagination