मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग १ ... खजूराच्या वड्या....

मुक्त विहारि · · पाककृती
आधीच सांगून ठेवत आहे. १. हा पदार्थ आपापल्या कुवतीनुसार खावा. २. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा. ३. माझी फोटोग्राफी कशी आहे, हे आता वेगळे सांगायला नकोच. ४. मी अद्याप इथे फोटो चढवण्यात कुशल झालेलो नाही.जसे जमले तसे चढवले.कुणाला टोचल्यास मंडळ जबाबदार नाही. कुणालाच न टोचल्यास आम्ही आभारी आहोत. ५. भरपूर व्यायाम केल्याशिवाय ह्या पदार्थाच्या वाट्याला जावू नये.पण खूप थकवा जाणवत असेल तर नक्की खा. ६. संपादकांना नम्र विनंती, की माझ्या कडून काही लेखनाच्या चुका झाल्या असल्यास सुधारून देणे.तसदीबद्दल क्षमस्व. आधीच सूचना देवून टाकल्या आहेत.तरीही पुढे वाचत असाल तर खरे मिपाकर..आणि ते पण नाखट.. =========================================================================== मध्यंतरी एका ताईला आरोग्यवर्धक (मिंग्लीश मध्ये "डायेट रेसीपी") पाकक्रुती हव्या होत्या.तसे मुळातच मी वजन राखून आहे.वजन आणि उंची समप्रमाणात आहेत का? हे तर दर ३ महिन्यांनी बघतोच पण शिवाय पोटाचा घेर पण जास्त वाढत नाही आहे ना? इकडे पण लक्ष देत असतो.जरा जास्त झाला की, गिरीभ्रमाणास जातो.भरपूर खातो आणि मनसोक्त भटकतो.पण कसे कुणास ठावूक, गिरीभ्रमण केले की जरा पोटाचा घेर कमी होतो. आता अशा ठिकाणी जातांना कमीत कमी वजनांत जास्तीत जास्त उर्जा देणारे पदार्थ नेलेले उत्तम.मग कधी पाकातले चिरोटे,तर कधी डिंकाचे लाडू किंवा मग मेथीचे लाडू नेले की , भूक पण भागते आणि एक चार लोक जरा कौतूक पण करतात.आपल्या पदार्थांना कुणीतरी नावाजावे अशी इच्छा प्रत्येक बल्लवाची आणि सुग्रणीची असतेच असते. असो. तर ह्या ताईंना नक्की कुठल्या कारणामुळे ही आरोग्यवर्धक पाकक्रुती हवी होती ते त्यांनी स्पष्ट न सांगीतल्यामुळे मी गिरीभ्रमण करणार्‍या लोकांसाठी किंवा जे व्यायाम करतात, त्या लोकांसाठी पा.क्रु. देत आहे. मिपाच्या (अलिखित) धोरणाप्रमाणे पा.क्रु.ला लगेच सुरुवात केलेली नाही.जाणकारांच्या हे लक्षांत आले असेलच आणि नविन सभासदांनी योग्य ती दखल घेतली असेलच. तर आता साहित्य..... , १. २ वाट्या खजूर (अर्थात बिया काढून.बायको मालिका बघत बसली की, मी बसल्या बसल्या तिच्याकडून वाल, लसूण सोलून घेतो.खजूराच्या बिया पण तिनेच काढून दिल्या.मालिकांचा असा पण उपयोग होतो.) २. दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस (दर शनिवारी हा कीस मी करून ठेवतो.हे आमचे आवडते काम आहे.एकदा हा कीस काढला की, आमची बायको आमच्या डोक्याला जास्त त्रास देत नाही.) ३. अंदाजे अर्धा कप दूध (दुधात किती पाणी आहे, त्या प्रमाणात कमी जास्त करणे.) ४. भरपूर बदाम (बदाम नसतील तर शेंगदाणे वापरलेत तरी चालेल.चवीत खूप मोठा फरक पडत नाही आणि प्रथिनांमध्ये पण खूप फरक पडत नाही.) ५. साखर (मला हिचे प्रमाण देता येत नाही.कारण मी नेहमीच अंदाजे साखर टाकतो आणि कसे कुणास ठावूक पण ती नेहमीच प्रमाणात असते.तरी पण साधारण पावणे २ वाट्या असाव्यात.खजूरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, खोबर्‍याच्या वडी करतांना मी जे साखरेचे प्रमाण घेतो, त्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली होती.) ६. पिठीसाखर (जास्त करून ठेवा, कारण क्रुतीच्या वेळीस समजेलच) ७. साय (आता बायकोच्या तावडीतून हा पदार्थ कसा काढायचा, ते तुमचे तुम्ही ठरवा.हा पदार्थ देतांना जाम किटकिट करते आमची बायको.) ८. तूप (ताटाला लावायला.हा बायकोच्या समोर १ चमचा आणि तिच्या नकळत १ चमचा घेतला.आता बिंधास्त लिहीत आहे.कारण समजेलच.) आता क्रुती. सर्वप्रथम,बायको आसपास आहे का? हे बघून घेणे.ती घरात असावी पण स्वैपाकघरात नसावी.(खूलासा योग्य वेळ येताच करण्यात येईल.) १. बदामाचे तुकडे करून घेणे.ते साहित्याच्या फोटोत आधीच दिले आहेत. २. मिक्सरच्या भांड्यात थोडे दूध घालून मग त्यात खजुर आणि बदामाचे तुकडे घालून मिक्सर मधून फिरवणे.साधार्ण पेस्ट तयार होते.खालील फोटो बघा. , ३. मंद आचेवर कढई तापायला ठेवणे. ४. एकीकडे ताटाला तूप लावून ठेवणे. ५, कढई थोडी तापली की नारळाचा कीस आणि साखर घालून गॅस थोडा मोठा करणे आणि एक ३/४ मिनिटे त्यांना ढवळत बसणे.साखर थोडी विरघळायला लागली की, ६. खजूर आणि बदामाचे आपण जे काही पेस्ट रुपी बनवले असेल ते घालणे.साय पण आत्ताच घालून घ्या.खालील फोटो बघा. , ७. आता गॅस नध्यम आंचेवर ठेवा आणि मनसोक्त ढवळत बसा.कुठपर्यंत तर आपला चमचा त्या सारणात उभा राही पर्यंत.इकडे मस्त वास सुटायला लागला असेलच आणि बायको जवळ येवून उभी राहिली असेलच. खाली फोटो देत आहे. , , , (प्रत्येक वड्यांच्या पा.क्रु.ची वेगवेगळी खासीयत असते, अगदी शास्त्रच म्हणाना.आल्याच्या वड्या होत आल्या, हे कसे ओळखायचे? तर कढईच्या आतील भागा भोवती साखर जमा व्हायला लागली की.तसेच ह्या वड्यांसाठी सारण तयार होत आले, हे ओळखायचे कसे? तर.... तर....) ८. आता गॅस मंद करा आणि जेमतेम १/२ मिनीटे अज्जुन परता आणि गॅस बंद करा. ९. परतलेला गोळा ताटावर घ्या. १०. त्यावर पिठीसाखर ओता. जास्त ओतलीत तरी चालेल पण कमी नको.खाली फोटो देत आहे. , ११. आता हा गोळा थापटण्या इतपत तापमानाला आला की, पिठीसाखरेसकट थापून घ्या.(इथे मी माझ्या बायकोची मदत घेतो.आम्ही शीतपेय पिणारे असल्याने चटके सहन होत नाहीत.) १२. थोडा गरम असतांनाच वड्या पाडून घ्या.खाली फोटो देत आहे. , ह्या वड्या केल्या आणि बायकोला दिल्या. "माझ्या सायीचे आणि तुपाचे सार्थक झाले", असे ती म्हणाली.ह्यापेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद बायकोकडून मी अजिबात अपेक्षित करत नाही....

वाचने 30764 वाचनखूण प्रतिक्रिया 54

In reply to by सूड

मुलांनी आणि बायकोने, फोटो काढे पर्यंत धीर धरला हेच आपले नशीब. तुम्ही ही, अशी काही तरी खुसपटे काढता म्हणून मग कुणी बिना फोटूची पा.क्रु. टाकली तर, फोटू का नाही टाकले म्हणून रडत बसता. हे मिपाकर ना कुणाला सुखाने जगू पण देणार नाहीत. ह.घ्या. (आम्ही पण हलकेच घेतले आहे.न घेवून सांगतो कुणाला?)

आयुर्हित 10/02/2014 - 19:04
गिरीभ्रमण केले की जरा पोटाचा घेर कमी होतो.
ही तर अतिशय मोलाची माहिती दिली आहे आपण! एक प्रयोग म्हणून, बिना साखरेची खजुराची वडी मी नक्कीच करून पाहीन. धन्यवाद.

दिव्यश्री 10/02/2014 - 20:00
"माझ्या सायीचे आणि तुपाचे सार्थक झाले", असे ती म्हणाली.ह्यापेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद बायकोकडून मी अजिबात अपेक्षित करत नाही....>>> :) करुण पहिल्या तर सांगेनच चवीला कशा होत्या.

वाटाड्या... 11/02/2014 - 00:05
मुविशेठ, लय भारी. तोपासु. आता जरा ते बायको किचेनमधे नाही असं का बघायचं ते पण सांग की.... :) - वाट्या...

In reply to by वाटाड्या...

आपल्या नवर्‍याला काही येत नाही, ह्या त्यांच्या मताशी ठाम असतात. आणि मग स्वैपाक घरात येवून हे जास्त झाले, ते कमी करा अशा सुचना येत असतात.त्या टाळायच्या असतील तर बायकोला अशा वेळी स्वैपाकघरांत न आणणेच इष्ट. असो, तुर्तास इतकेच ठीक......

स्पंदना 11/02/2014 - 07:35
मुवि मिक्सरच्या भांड्याची अवस्था पाहून ही पाकृ १००% तुम्ही बनवल्याची खात्री पटली. मी नक्किच करुन पाहेन. साय आहे म्हणजे टेस्टी असणारच नाही का?

In reply to by स्पंदना

ज्याच्या ताटी साय आणि तूप त्याला आयुष्य खूप असे म्हणत आमच्या आज्ज्यांनी नव्वदी गाठली होती.पहिल्या वाफेचा वरण,भात,लिंबू आणि घरच्या सायीची धार हे तर खात होत्याच पण शिवाय जेवण झाल्यावर शेवटी सायीचे दही + भात हे पण कधी सोडले नाही. त्यांची दिनचर्याच वेगळी होती.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 11/02/2014 - 15:29
दहिभात वरुन आठवल जो जेवणात शेवटी दहिभात खातो त्याला सासुरवाडी श्रीमंत मिळते असा आमच्याकडे प्रवाद आहे . (वरील कारणासाठी दहिभात खाणारा )जेपी =))

In reply to by जेपी

दिव्यश्री 12/02/2014 - 02:34
आमच्या कडे सासुरवाडीला आल्यावर जेवताना जावयाला अगदी आग्रहाने खाऊ घालतात.नवीन लग्न झाले त्यावेळी माझे बाबा असा आग्रह आमच्या प्यांटवाल्यांना करायचे तेंव्हा त्यांना समजायचे नाही.मग एक दिवस सांगितलं कि अस खाल्ल्याने सासुरवाडी शिर्मन्त होते.मग बाबाणी आग्रह करण्याआधी हेच दही,दूध भात आणा अस सांगायला लागले. ;) *lol* :D

दिपक.कुवेत 11/02/2014 - 11:28
पण येत्या घारापुरी कट्ट्याला घेउन आलात तर "चविचा/मुवि ट्च वड्यांचा" अंदाज येईल. हवा असेल तर खजुर मी येताना आणु का? बाय द वे तुम्हि प्रत्यक्षात "किस" काढता हे बघुन डोळे प्वाणावलेत!

In reply to by दिपक.कुवेत

"किस" काढतो, ते पण फक्त नारळाचे. खोबरे आणि चव, मिळत असेल तर आणि तरच "किस" काढण्यात अर्थ आहे. दगडांचा आणि धोंड्यांचा कसला "किस" काढणार?

In reply to by मुक्त विहारि

सूड 11/02/2014 - 15:15
सुक्या खोबर्‍याचा तो 'कीस' आणि ओल्या नारळाचा तो 'चव' असे कुठेसे वाचलेले आठवले. ;) खुस्पट नाही बर्का, आता आठवलं ते सांगितलं.

In reply to by दिपक.कुवेत

कंजूस 14/02/2014 - 16:11
मला समुद्र फारसा आवडत नाही म्हणून तो कट्टयाचा लेखसुध्दा उघडला नव्हता . परंतु खजुरीच्या वड्यांची जहाजे येणार असतील तर येण्याचा विचार करावा लागेल . बाकी मुवि फारच कलाकार आहेत .

पैसा 11/02/2014 - 12:57
ते डाएट फिएट न्हेऊन घाला १२ गडगड्यांच्या हिरीत! मस्त पाकृ. तुम्ही सगळ्या गोष्टींची कारणे नंतर देतो म्हटलं तरी समझनेवाले को इशारा काफी होता हय. सौ.मुविंची या धाग्यावर वेण्ट्री कधी होते याची वाट बघत आहे! ;)

In reply to by गणपा

हो ना... मला पण हीच शंका होती.... म्हणून तर मी आधीच सांगून ठेवले आहे.... २. तसा हा साखरयुक्त पदार्थ असल्याने, ज्यांना मधूमेह आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा. साखर आणि मसाले पचवायचे असतील तर नियमीत व्यायामाला पर्याय नाही. ज्यांना व्यायामाची गोळी घ्यायला लागते, ते गोळ्या घेवूनच वानप्रस्थ काढतात.

In reply to by अनन्न्या

अजिबात नाही, उलट वाढेल. ह्यावेळी काळाघोडा महोत्सवाला "आल्याच्या वड्या" करून आणल्या होत्या. त्या कशा होत्या, हे रामदास काकांना व्य. नि. करून विचारा.

In reply to by आदूबाळ

जरूर... पण त्याला एक फोटोग्राफर जवळ पाहिजे. शेवटच्या पायरीला जेमतेम ५/१० सेकंदच मिळतात. फोटो काढत बसतो तर वड्यांचे चिक्कीत रुपांतर होईल.

In reply to by आदूबाळ

आपल्याला काय? आल्याच्या वड्या करायला वेळ लागत नाही. तसे ही उद्या एक कट्टा आहेच.तिथे "कुछ मीठा हो जाय" असे म्हणत ह्या आल्याच्या वड्या घेवून जातो.

In reply to by हसरी

दुर्दैवाने, मुलाचा दहावीचा अभ्यास सुरु असल्य्यने, तो पण फोटो काढून द्यायला तयार न्हवता. त्यामुळे समोर जे काही आहे, त्याला "फोटो" म्हणणे, हाच एकमेव मार्ग उरतो, समोर आलेले "फोटो" रुपी संकट हसून साजरे करा, ही विनंती.

In reply to by सोनल परब

त्याला थोडा घट्ट पणा आणण्यासाठी पिठीसाखर मिसळायला लागली. मला तरी वड्या जास्त गोड नाही लागल्या.तसेही चालणे जास्त असल्याने (रोजचे १०/१२ कि.मी.) इतकी साखर माझ्या शरीरात पचून पण जाते.

In reply to by मुक्त विहारि

रोजचे १०/१२ कि.मी. मग मुवि हे तुमच्या "आयडिचे नाव" लैच सार्थ आहे हे म्हणावंच लागेल :)

In reply to by यशोधरा

अजिबात नाही. नंतर मलाच पसारा आवरायला लागतो. जावू दे.... एक तर वड्या करून खायला द्या आणि मग पसारे आवरा. पुरुषांच्या जातीचे भोग आहेत हो!!!! (ह.घ्या.)

In reply to by जेपी

हरकत नाही.... आमची बायको-मुले कॅमेरा घ्यायला पैसे माझ्याच हातातून घेतात पण हातात कॅमेरा देत नाहीत. हवे असल्यास "फोर्ट महोत्सवातल्या" सगळ्या मिपाकरांची साक्ष काढा.

In reply to by प्यारे१

शिपडो...और मीठ शिंपडो हमारे जखमे के उपर... फिर भी दिल नही भर्‍या तो लाल लाल तिखट पण शिंपडो.... मेला हुवा कोंबडा किसको भी भिता नै.

In reply to by मुक्त विहारि

@शिपडो...और मीठ शिंपडो हमारे जखमे के उपर... >>> =)) @फिर भी दिल नही भर्‍या तो लाल लाल तिखट पण शिंपडो....>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/deep-hearty-laughter-smiley-emoticon.gif @मेला हुवा कोंबडा किसको भी भिता नै. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/big-grin-smiley-emoticon.gif

प्यारे१ 14/02/2014 - 13:19
>>>>>आम्ही शीतपेय पिणारे असल्याने चटके सहन होत नाहीत. बिअर, व्होडका, व्हिस्की ह्यांना शीतपेय म्हणतात काय तुमच्याकडं? बाकी खजुराच्या वड्या उत्तम. आणि बायकांकडं 'कट्ट्याच्या स्वच्छतेबाबत वगैरे' जास्त लक्ष देऊ नये. इतर वेळी आपापला वकुब, वय, अनुभव, आकारमान, प्रकृती इ.इ.इ. चा सर्वांगीण विचार करुन द्यावं. - धाग्याच्या टीआरपी साठी प्रयत्नशील

"बिअर, व्होडका, व्हिस्की ह्यांना शीतपेय म्हणतात काय तुमच्याकडं?" हो, येस मिलॉर्ड ============= "- धाग्याच्या टीआरपी साठी प्रयत्नशील" कळीचा मुद्दा ध्यानांत आलेला आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

ते आता मिपाकरांच्या सहनशीलतेवर अवलंबून तर आहेच आणि पचनशक्तीवर जास्त अवलंबून आहे...