Skip to main content

गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 31/10/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली. नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय. अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??! पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं.. त्याच्या कुशीत झोपायला शिरतं. आईकडे जास्त जात नाही. दादा हा ताईदेखील असू शकेल.. :) आणि उरलेलं तिसरं (मधलं.. म्हणजे २ नंबर) पिल्लू मात्र मम्माज बॉय आहे. ते कायम आईच्या पंखाखाली. लहान्या आणि मोठ्याला पंखातून सुटका करुन मोकळ्यावर खेळायची हौस.. तर मधला मात्र आईच्या पदरात सदैव दडून.. बाहेर आला तरी नुसतं डोचकं बाहेर काढून अंदाज घेतो आणि आत दडतो. थोडक्यात मोठा दादा आणि शेंडेफळ (आत्तापावेतोचं) यांचा कंपू झालेला दिसतो. व्हिडीओ नीट पाहिलेत तर मी काय म्हणतो कळेलच. एकदोनदा तर मला दादा (अर्थात त्याचं स्वतःचं हादडून झाल्यावरच बहुधा..) त्याच्या छोट्या दोस्ताला खायला मदत करतानाही भासला. आणखी निरीक्षणाने पक्कं सांगता येईल. ३१ ऑक्टोबर.. १. आधी बघा एक थोडा मोठा व्हिडीओ. यात आई आणि पोरं यांच्या दिनचर्येतला काही भाग.. शिकारीचे लचके, पोरांची मागणी, घुबडाईची स्वतःची साफसफाई... आणखीही काही दिसलं तर मला कळवा. हा व्हिडीओ फक्त थोडा जास्त वेळ तुम्हाला या घरात डोकावता यावं यासाठी. २. हा व्हिडीओ दिवाळीत काय होईल याची झलक दाखवतो. शेवटपर्यंत पाहिला तर आधी एक सुतळी बॉंम्ब किंवा लक्ष्मीतोटा उडल्यावरची रिअ‍ॅक्शन.. थोडीशीच.. आणि नंतर फटाक्यांची माळ वाजल्यावर मात्र एकदम दचकून चला रे पंखांखाली.. मस्ती बास आता.. असा घुबडाईचा पोक्त इशारा.. ३. बिग ब्रदर ईटिंग लंच.. डिस्टर्बन्स नको.. घुबडाईकडे चिर्र चिर्र अशा आवाजांनी मागणी केली जाते आणि ती आणलेल्या शिकारीचा एक लचका तोडून पिल्लांना देते. पिल्लं गुणी आहेत. आ करुन भरवण्याचा हट्ट न धरता आपापली हाताने जेवतात.. (लिटरली.. पिल्लांचे पंजे प्रचंड आहेत.. ते लचका पंजात पकडून किंवा पंजे त्यात रोवून त्यावर बसून चोचीने आपापले खातात.) माझी अशी समजूत होती की त्यांना चोचीत भरवावं लागत असेल. अर्थात मोठं झालेलं पिल्लू अशा रितीने खात असेल हीदेखील शक्यता आहेच. ४. बिग ब्रो झोपलाय. त्याचा छोटा चाहता त्याला ढोसकलतोय. त्याच्यावर चढायचा प्रयत्न करतोय. इतकावेळ ते दोघे एकमेकांशी काहीतरी ढकलाढकली करत होते. त्यानंतर मोठा भाऊ झोपला. तेव्हा लहान बाळ "माझ्याशी अजून खेळ ना रे.. " असं म्हटल्यासारखं मला वाटलं. ५. मला माझ्या वाट्याचा लचका दे अशी घुबडाईकडे बडादादाची तीव्र मागणी आणि लचका तोडून मिळाल्यावर संतोष पावून तो कोपर्‍यात नेणे. (कोपर्‍यात घेऊन निवांत खात बसण्याचा भाग व्हिडीओत आलेला नाही.) पिल्लं घशातून कसलातरी वेगळाच सीर्र सीर्र अशा आवाज करतात. तो यातल्या बर्‍याचशा व्हिडीओजमधे ऐकायला मिळेलच. पण त्या आवाजाने त्यांची शांतताप्रेमी आई वैतागते आणि त्यांना पंखाखाली घेऊन आणि अर्रर्र किंवा तत्सम दबक्या आवाजात दामटते असं दिसलं. केवळ खाणं / भक्ष्य इतकाच इंटरेस्ट न राहता आता त्या पिल्लांना (निदान थोरल्याला) खेळण्यातही रस उत्पन्न झाला आहे असं वाटतंय. एक रंगीबेरंगी चिंधी मिळाली आहे त्यांना. ती फाडत बसतात. बाकी अपडेट उद्या किंवा जसाजसा लाभेल तसा. साधारण कालक्रमानुसार आणखी एक पिल्लू उद्या यायलाच हवं. भेटू..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 62673
प्रतिक्रिया 187

प्रतिक्रिया

In reply to by गवि

गुबगुबीत मांसल मस्त दिसताहेत दोघेही., जणू गँडाल्फ आणि चांगुलपणीचा सारुमान आकाशाकडे बघत असावेत असे वाटते आहे.

आवड्ल

In reply to by गवि

उडायला एकदम तयार दिसताहेत!!

In reply to by गवि

काय भरभर वाढली जोडी ! आतातर एका पायावर तप करणारी जोडी एकाच उंचीची दिसतेय. अचानक डोळे उघडून भरारी घेतिल असेच दिसताहेत !!

अरे व्वा ! पहिल्या छायाचित्रात कॅमेरा अँगल आणि झूम बदलले आहे ह्याचीही नोंद घेतली आहे.

जबर्दस्त

In reply to by जेपी

+ ११११

२१ डिसें. - शनिवारपासून मोठं पिल्लू उडायला लागलं आहे. बराच काळ निघूनच गेलं होतं, धाकटं एकटंच राहिलं होतं. त्यामुळे मोठं कायमचं उडून गेलं असं वाटलं. पण काल (२२ डिसें.) संध्याकाळी पाहिलं तर परत आलं होतं. सध्या बहुधा उडण्याचा सराव चालू असल्याने विश्रांतीसाठी अधुनमधून परत येतंय असं दिसतं.. समोरच्या बागेत बरीच झाडं आहेत. प्रत्यक्ष उडणारं पिल्लू दिसत नसलं तरी त्या त्या झाडांच्या वर आकाशात भिरभिरत अखंड कावकाव करणार्‍या कावळ्यांच्या पिलासोबत भटकण्याच्या पॅटर्नवरुन पिल्लू कुठे आहे ते कळतं. उड्डाणाचे फोटो काढण्याची यंत्रणा आणि सुयोग्य परिसर नसल्याने ते करता येणार नाही. पल्ला वाढला की मात्र पिल्लू परत न येण्यासाठी निघून जाईल. एनी डे नाउ. आणि मी येते काही दिवस अनुपस्थित असणार. त्यामुळे बहुधा एकदोन आठवड्यांनी दोघेही निघून गेलेले आणि रिकामी झालेली जागाच थेट दिसणार मला बहुधा.. सध्यातरी घुबड आईबाप या उंचीवर पिल्लांना उडायला कसे शिकवणार हा प्रश्न निकालात निघाला आहे. ते त्यांनी व्यवस्थित तर्‍हेने साध्य केलेलं दिसतं आहे.

In reply to by गवि

मस्तच! (कदाचित) आई आणि ५ पिल्लं एवढीजणं गेल्यानंतर निदान एक तरी पिल्लू नीट मोठं झालं! असंच यशस्वीरीत्या जगलं म्हणजे झालं! त्या दोघांनाही शुभेच्छा! आणि तुम्हाला खूप धन्यवाद! सध्या आमच्या समोरच्या बिल्डिंगवर एक घुबड कुटुंब वस्तीला आलं आहे. पॅरापेटवर ३ पिल्लं बसून असतात. विचित्र जागी असल्याने फोटो काढणे शक्य नाही. एका मोठ्या घुबडाच्या पंखाना इजा झाल्याने त्याला लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात दिले. ते त्याला उपचारासाठी बोंडला इथल्या प्राणीसंग्रहालयात घेऊन गेले. हे घुबड लोक रात्री बराच आवाज करत असले तरी अजूनतरी त्यांना हाकलावं वगैरे कोणी सोसायटीतले लोक म्हणत नाहीयेत नशीब!!

In reply to by गवि

आणि मी येते काही दिवस अनुपस्थित असणार
जानेवारीत मस्त गविटच प्रवासवर्णन्+खाद्ययात्रा वाचायला मिळणार बहुतेक. घुबडांची प्रगती वाचुन आनंद झालाय आणि आता लवकरच तुमचे अपडेट्स बंद होणार म्हणुन हुरहुर पण वाटतेय

अरे व्वा ! एक पिलू पूर्णपणे सक्षम झालं. आता दुसर्‍याला हक्काचा दादा असल्याने तेही लवकरच उडू लागेल, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ! :) मात्र त्यांच्या वाढण्याचे सचित्र अपडेट्स बंद होतील ही हुरहुर लागलीय :(

या घुबडांनो परत फिराSS घराSSकडे आपुल्याSSSSSS! लळा लावला होता हो पोरांनी....... दोघांमधील एक जरी घुबडीण असेल तर, लग्ना नंतर माहेरपणाला येईलच, असा विश्वास बाळगुया.

In reply to by गवि

हूरहूर आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे हे दोन जीव जगले, मोठे झाले आणि तेही आपल्या डोळ्यांदेखत. पिल्ले मोठी होऊन उडून जाणार असतातच. पण त्यांचा तो तिथपर्यंतचा प्रवास पाहण्यात काय सुख असते याची एक प्रचिती ह्या धाग्यानिमित्त आली. आनंद वाटला. कालच सॅन्क्च्युअरी एशियाने एक फोटो अपलोड केला आहे त्यांच्या चेपु पेजवर. त्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियन सरकारने शार्क माशांच्या हल्ल्यांपासून समुद्रात पोहणार्‍यांना वाचवण्यासाठी सरळसरळ शार्कची कत्तल 'कलिंग' या नावाखाली सुरू केली आहे अशी बातमी आहे. फोटोत एका शार्कच्या तोंडात साखळदंड अडकवून त्याला ओढत नेत आहेत असे विदारक चित्रण आहे. सॅन्क्च्युअरीने या सगळ्याला 'वर्ल्डस् मोस्ट डेंजरस अ‍ॅनिमल होमो सेपिअन' अशी उपमा दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपला हा लेख फारच भावला आणि याच होमो सेपिअन्समध्ये निदान थोडेतरी खरोखरच 'सेपिअन' आहेत याची खात्री पुन्हा एकदा पटली. अवांतर - डॉ. गिरीश जठार हे घुबडांचे संशोधक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून ह्या धाग्याची माहिती देतो. आणि मिपावर ह्या लेखाची दखल नक्कीच घेतली गेली पाहिजे अशी संमंला नम्र विनंती.

आणि दंडवत.

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

धन्यवाद गवि ! एक उत्तम विषय, ताजे अपडेट्स आणि सतत उत्कंठा वाढवून ठेवणारा धागा! मजा आली.

दिवाळी आली अन घुबडबाई परत आल्या आहेत. संसार थाटलाय परत.. करिता माहितीस्तव.. घुबडाई परत आलीय की तिचे बाळ मोठे होऊन बाळन्तपणाला आलेय ते शोधावे लागेल. a

सुरवातीच्या लेखात घुबडाबद्दलच्या आख्यायिकेलाच फाट्यावर मारले आहे तरी हे लिहिण्याचा मोह आवरत नाही म्हणुन हे लिहितोय. घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घुबड दिसणे हा शुभशकुन मानला जातो. इथे तर ते चक्क तुमच्या घरीच आले आहे आणि ते ही दिवाळीत आणि ते ही हक्काने! गवि तुम्ही भाग्यवान आहात!

मग पार्टीसाठी कधी बोलावतोयस? वाट पाहतोय... :)

In reply to by कवितानागेश

अंडी घातली आहेत घुबडीने. सध्या ती त्या अंड्यांवर सदैव बसून राहात असल्याने क्यामेरा इंस्टालेशन करण्याचा अवसर मिळत नाहीये. पिल्ले आली की सांगतो.

In reply to by गवि

तुम्ही त्या जागेवर एक चांगल्या प्रतीचा कॅमेरा परमनंटली बसवुन टाका हो. कारण आता हे पाहुणे दर वर्षीच येणार तुम्ही हुसकावून लावत नाही तो पर्यंत. रच्याकने :- तुमच्या शेजार्‍यांनी कधी ऑबजेक्षन घेतल नाही का या पाहुण्यांना? पैजारबुवा,