कान गुंतले बोंड्यांमध्ये!!
लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात. आणि ते दिवसभर कानात घालून गाणी ऐकत बसणा-या/फिरणा-या मला - बोंडूराम!! किंवा बोंड्या!!
काय करावं, हे सुचेनासं झालं, कशातच मन रमेनासं झालं, की मी कानात ही बोंडं घालून मनाला सुखावणारी गाणी ऐकत बसतो. त्या वेळी मला बाहेरच्या जगाचा विसर पडतो, आणि मी माझ्याच एका वेगळ्या जगात एंट्री मारतो. अशा वेळी मला टेलिफोनची घंटी, दाराबाहेरची घंटा, घरात कोणीही मला मारलेली हाक, किंवा माझ्यासमोर येऊन मला देण्यात येणा-या सुचना यांपैकी काहीही ऐकायला येत नाही. मग वैतागून बाबा मोठ्याने आतल्या खोलीतून अख्ख्या कॉलनीला दचकवेल इतक्या मोठ्या आवाजात हाका मारत सुटतात. आईने यावर एक शक्कल लढवलीये. मला बोलवायचं असलं, की ती टाळ्या वाजवते. त्या मला ऐकायला येतात. मध्यंतरी बोंडं घालणं कमालीचं वाढलं होतं, तेव्हा टाळ्या वाजवायची आईला इतकी सवय झाली होती, की मी गाणी ऐकत नसतानासुद्धा आई मला बोलावण्यासाठी टाळ्या वाजवायलाच सुरुवात करायची. दादा मला खिजवण्यासाठी त्याला जे काही बोलायचं असेल ते मुद्दामून पुटपुटत बोलायचा, आणि मी 'काय??' असं विचारल्यावर 'बघ ती बोंडं घालून तू बहिरा होत चाल्लायस' असं म्हणायचा.
माझी आजी यांना 'भोकरं' म्हणते. ही भोकरं मी घातलेली तिला दिसली, की ती तिचं नेहमीचं पालुपद चालू करते.
'हे बघ, तू ते कानात घालत जाऊ नकोस. त्याने तुझ्या शरीराला त्रास होतो. पेपरात रोज लेख येतायत... ही भोकरं वापरणा-याला दहा वर्षांत कॅन्सर होणार हे सिद्ध झालंय. मी काय सांगत्येय ते ऐक. तुला आत्ता कळणार नाही. मी उगाच सांगत नाहीये. ती बोंडं घालून तू बहिरा होशील.'
प्रसंगी ती मला संदर्भासाठी पेपरातले असे लेखही आणून देते. मी त्या सगळ्याबद्दल तिच्याशी सहमती दाखवतो आणि तिचं बोलून झालं की पुन्हा ती भोकरं कानात घालतो. घरी जायला निघालो, की -
'हे बघ. रस्त्यावर असताना, कुठेही जाताना कानात घालून जायचं नाही. हा... नुसती मान डोलावू नकोस मी काय सांगत्येय ते ऐक. रस्त्यात गाड्या-बिड्या असतात त्यांचे हॉर्न वगैरे ऐकायला येणार नाहीत...' इत्यादी इत्यादी सुचना दिल्याशिवाय निरोप देत नाही. इतक्यावरच तिचं समाधान होत नाही. ती खिडकीत येऊन मी बोंडं घातली नाहीयेत ना, याची खातरजमा करून घेते. घातली असतील, तर खिडकीतून तिच्या अंगातली सगळी शक्ती एकटवून ओरडत सुटते. कारण तसं तिनं ओरडल्याशिवाय मला ते ऐकायलाच येत नाही. मग मी तिच्या नजरेच्या टप्प्याआड जाईपर्यंत बोंडं काढतो आणि मग लगेच ती कानात घालून चालू पडतो.
खरं तर हे एक व्यसनच आहे. ही बोंडं कानात घातली की माणसाला किक लागते आणि तो त्याच्या अशा एका वेगळ्याच जगात रममाण होतो. या जगाचा आनंद लुटत असताना कोणीही डिस्टर्ब करून तो सुखानुभव 'पॉज' करायला लावला, की खूप वैताग येतो. या व्यसनाची ओढ एवढी असते, की समोरचा काय बोलतोय, हे ऐकू येत नसलं, तर आपण हज्जारदा त्याला 'काय? काय?' असं विचारत बसतो, पण कानातलं एकही बोंडूक काढणं जीवावर येतं. शेवटी तो माणूसच कंटाळून आपल्याला 'ते कानातलं काढ आधी.' असं म्हणतो. या व्यसनाचा अतिरेक व्हायला सुरुवात कधी होते हे व्यसनाधीन झालेल्या माणसालाही लक्षात येत नाही. माझा स्वतःचा अनुभव असा, की माझं डोकं दुखायला लागतं, कान दुखायला लागतात, प्रसंगी कानात छोटीशी जखम होते(खरचटल्यागत), आणि आपल्याला खरंच कमी ऐकायला येतंय असं वाटू लागतं. मग मी ठरवून, मनाशी निश्चय करून गाणी ऐकणं बंद करतो. हा निश्चय काही दिवस, काही आठवडे, प्रसंगी एखाद-दोन महिने टिकतो. मग थोडं-थोडं, अधुन-मधुन करत पुन्हा गाडी व्यसनाच्या वळणावर येते.
पण तरी या व्यसनाचा अतिरेक इतरांच्या तुलनेत माझ्या बाबतीत कमीच झालाय असं वाटतं. एकदा काही मित्र गप्पा मारत बसलो होतो. मी गमतीत म्हटलं -
'अरे, माझा एक मित्र कमोडात सुद्धा गाणी ऐकत बसतो.' असं म्हणून मी हसायला लागलो. सगळे मित्र माझ्याकडे 'यात हसण्यासारखं काय?' अशा भावनेनने बघत होते. मला कळेना.
'त्यात काय एवढं? मी सुद्धा ऐकतो.' - एक मित्र.
'हो मी सुद्धा ऐकतो. करायचं काय साफ होईपर्यंत?' - दुसरा.
'अरे त्याचं ठीक आहे तो कमोडात जातो, तुझ्या घरी तर संडास आहे ना, तू सुद्धा?' - मी.
'हो मग? संडास असला म्हणून काय झालं? माझ्याकडे सुद्धा संडासच आहे, मला जमतं ना.' - तिसरा.
'कसं जमतं पण? तो मोबाईल हातातच धरून बसता की कुठे ठेवता काय करता काय नेमकं?' - मी.
तेव्हा एक उतावळा मित्र मला (पँट न काढता) प्रात्यक्षिक दाखवायला गेला. बाकीच्यांनी त्याला आवर घातला. पण तेव्हा या व्यसनाच्या शिगेवर आपण अद्याप तरी पोचलेलो नाही, हे मला जाणवलं.
बाकी या बोंडांचा कधीकधी फायदासुद्धा होतो. गाणी ऐकत असल्याचं नाटक करत, नुसतीच बोंडं कानात घालून ठेवून आपल्याला, आपल्यासमोर असलेल्या लोकांचे संवाद ऐकू येत नाहीयेत, असं सोंग घेता येतं... आणि सगळं ऐकता येतं. अर्थात, ही शक्कल सुद्धा आता सर्वज्ञात झाली असल्याने, माणूस बोंडांत गुंतलाय म्हणजे तो आपल्या गप्पांना बहिरा असेलच असं नाही, हे लक्षात घेऊन लोक सांभाळूनच बोलतात. तसंही मला, लोकांच्या गप्पा चोरून ऐकायची हौस नाही, पण माझं बोलणं असं ऐकलं गेल्याचा अनुभव आहे म्हणून इथे नमूद करतोय.
ह्या बोंडांच्या वायरीचा नेहमी गुंता झालेला असतो. तो सोडवत बसणं म्हणजे कटकट असते. कधी कधी आपण शिवणकाम करतोय असं वाटतं. या वायरींप्रमाणेच आपणही कळत-नकळत या बोंडांमध्ये गुंतत जातो. रस्त्यातून चालताना, ट्रेनमध्ये, बसमध्ये, थोडक्यात प्रवासात, वेळ घालवायला इतर काहीही सुचत नसताना, आपण एकटे असताना, आपसुकच हात खिशात किंवा बॅगेत जातो आणि ही बोंडं बाहेर निघतात. काही माणसांना तर पोट साफ करतानासुद्धा ते लागतं. ही सवय, हे व्यसन, सहजपणे सुटत नाही. ते प्रयत्नपूर्वकच सोडवावं लागतं. ते कायमचं सुटतंच असंही नाही. आपला निर्धार कायम ठेवावा लागतो. माझं हे व्यसन मी तीच तीच गाणी ऐकून ऐकून कंटाळलोय आणि मुद्दामून कोणाकडूनही नवी गाणी घेत नाहीये त्यामुळे कमी कमी होत चाल्लंय. पण बरीच माणसं रेडिओ ऐकत बसतात.
बहिरेपण, आणि कॅन्सरसारख्या रोगांची शक्यता नसती, तर हे व्यसन बाळगायला काहीच हरकत नव्हती. पण दुर्दैवाने तसं नाहीये. व्यसन म्हणजे एखाद्या बाबीबाबत आटोक्यात न ठेवता येणारी, अतिरेकामुळे दुष्परिणाम भोगायला लावणारी सवय. तेव्हा ही बोंडं शक्य तेवढी कानापासून लांब ठेवावीत, आणि गरजेपुरतीच (समजा दोन्ही हात खराब आहेत, किंवा मुलींनी मेहंदी काढलीये, आणि कोणाचा तरी फोन आलाय) वापरावीत... मला अधून-मधून अशी उपरती होतच असते. त्यानुसार मी स्वतःवर नियंत्रण ठेवत असतो. या व्यसनातून माझी आणि माझ्यासारख्या अनेकांची लवकरात लवकर पुर्णपणे सुटका व्हावी, अशी आशा करतो, अजुन काय!!
प्रतिक्रिया
मस्त लिहिलेत :)
चान चान !!
चान चान !!
चान चान!!
चान छान.
(No subject)
छान.
छान . मिपाव्यसनी -तथास्तु
सहमत; आणि असहमत.
मला अशी सवय लागली होती जेव्हा
Klipsch चे हेडफोन वापरून बघा.
धन्स !
Klipsch Image S4 or S4-II (which is version II)
व्होक्के... शोधतो जालावर.
मबा.. बोसचे एअरफोन सुद्धा
सध्या तरी बोसचा विचार नाही...
bowers and wilkins, Cambridge
थँक्स मन्द्या...
खरं तर ज्या दुकानात मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळेसेनहेइजर शी फक्त आणि फक्त
एवढी ऑडीओ क्लिआरिटी दुसर्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }Klipsch Image S4i-II
होय
सध्या हे वापरतोय. चांगले
गुंता..छे!
नोकिआ आशा ५०३ का ?
छान लिहिलंय
मस्तच, छोट्या छोट्या
हाहाहा. खूप हसले. छान आहे.
जबरा लेख एक संडास चा अनावश्यक