Skip to main content

आयुर्वेद-सामान्य ओळख.

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 19/12/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
//आयुर्वेद// प्रयोजन- स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम,आतुरस्स विकार प्रशनम !! चरक संहिता स्वस्थ (निरोगी)व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आतुर (रोगी) व्यक्तीचा विकार (रोग) बरा करणे. आयुर्वेदाची व्याख्याः- हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम ! मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदःस उच्चते !!------चरक सुत्रस्थान. आयुर्वेद म्हणजे काय ? हितकर आयुष्य,अहितकर आयुष्य ,सुखकर आयुष्य ,दुखकर अयुष्य,यांचे तसेच या आयुष्यासाठीच्या हितकर म्हणजे पथ्यकारक व अहितकारक म्हणजे अपथ्यकारक गोष्टींचा अभ्यास ज्या शास्र्तामध्ये केला जातो,त्यास आयुर्वेद असे म्हणतात. आता असा पश्न पडतो की हितकर ,सुखकर आयुष्य म्हणजे काय ? हितकर आयुष्य म्हणजे दिर्घकालिन सुखकारक, स्वस्थ आयुष्य होय.कधी कधी काही गोष्ठी तत्काळ सुखकारक वाटल्या तरी दिर्घकालिन आयुष्याच्या दृष्टीने शरिरास हानिकारक असतात.उदा.जिव्हासुख देणारे पाणीपुरी,बटाटावडा यासारखे पदार्थांचे अतीसेवन झाले तर ते अपचन,पित्ताचे विकार,मुळव्याध,केसांचे विकार इ.अनेक प्रकारचे आजार त्या मनुष्याच्या प्रकृतीनुसार उत्पन्न करतात.्या सर्वांचे उपाय ज्या शास्र्तात येतात तो आयुर्वेद होय. • आधुनिक काळात आयुर्वेद शास्त्रचा उपयोग व त्याचे महत्वः- सुखाने जगावे असे सर्वाना वाटते! पण जगण्याचे सुख फार थोडया लोकाना लाभते.भारतीयांनी जगाला दाखविलेले दोन राजमार्ग आयुर्वेद व योगासने. अमेरिकेत च्यवनप्राश विकला जातो! जर्मनीत आसन प्राणयामाचे वर्ग चालत्तात………………पण भारतातील [महाराष्ट्रातील] किती लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व समजते?............ १ याचे महत्त्व सर्वांना उमगावे याकरिता आमचा हा प्रयत्नः……… आयुर्वेदाची प्रगती ही माणसाच्या अनुभवजन्य ज्ञानातून झाली आहे. आयुर्वेद हे पुरातन शास्त्र आहे परंतु आजही आयुर्वेदाची तत्त्वे बदललेली नाहीत. तिच तत्त्वे वापरुन आजही तितक्याच प्रभावीपणे रुग्ण बरे करता येतात ही गोष्टच आयुर्वेदाची प्रगल्भता स्पष्ट करण्यास पुरेसी आहे. आयुर्वेदामध्ये रोग होऊच नये म्हणुन करावयाच्या गो्ष्टी (स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम) व रुग्णास रोग मुक्त करणे ( आतुरस्य व्याधी परिमोक्षः) या दोन्ही गोष्टीचे वर्णन आले आहे . ॠतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा व त्यावरील उपायांचा विचार फक्त आयुर्वेदामध्येच आला आहे. फक्त आजारी पडल्यावर औषध घ्या असे आयुर्वेद सांगत नाही, आयुर्वेद सांगतो ‘’ हितकर आहार घ्या, निरामय ,स्वस्थ जीवन जगा.’’ वॄदधांनी वातुळ पदार्थ टाळावेत, तरुणांनी खवळते पित्त आवरावे, बालगोपाळांनी खोकला वाढविणारा कफ औषधांनी थोपवावा हेच आयुर्वदाचे सांगणे. आज आपल्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत . आजची तरुणपिढि ही उत्साह, तारुण्य , चैतन्य यांनी परिपुर्ण हवी,पण प्रत्यक्षात दिसताहेत केस पांढरे होणे, केस गळणे, डोळ्यांचे विकार, व व्यसनांच्या आधीन झालेले, स्पॉंडीलायसिस, लठ्ठपणा अशा विकारांनी जखडलेली आजची तरुणपिढी! अनेक स्त्रियाही घर व करियर सांभाळताना तारेवरची कसरत करताहेत पण त्याबरोबर आवश्यक तो आहार, आराम ,व्यायाम,योग्य औषधोपचार यांच्या अभावामुळे स्त्रीयांमध्ये आढळतात, अशक्तपणा, हिमोग्लोबीन कमी असणे ,पाळीच्या तक्रारी इ…… सध्याच्या धावपळीच्या जगात आजारापासुन मुक्त होण्यासाठी काही वेळा तात्कालिक आराम देण्या-या आधुनिक औषधांचे उपचार केले जातात. अशा उपचारांमुळे रोगाची लक्षणे नाहीशी झाल्यावर रोगमुक्त झाल्याची गैरसमजुत करुन घेतली जाते व रोगाच्या मुळ कारणांवर उपचार करण्याचे दुर्लक्ष होते.यावर उपाय एकच,तो म्हणजे पुर्वापार चालत आलेला आयुर्वेद आचरणात आणने. कारण आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11234
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

कारण आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आयुर्वेदिक उपचार सुरू असताना कोणतं अन्न खावं नि कोणतं खाऊ नये, दिवसातून पाणी किती वेळा प्यावं, झोप किती घ्यावी या सगळ्या साध्या उपचारांचा अगदी जवळून अनुभव घेतलाय/घेतोय, त्यामुळेच या वरील वाक्याशी शंभरवेळा सहमत.

एक चांगली लेखमालिका वाचायला मिळेल याची खात्री या पहिल्या लेखावरून झाली आहे. धन्यवाद!

लेखन आवडले. बरेच दिवसांपासून (बहुतेक आमच्या सगळ्यांच्याच मनात ) एक विनंती करायची होती. मिपावरील सगळ्या डॉक्टर्सना. अनाहितामध्ये एका तब्येतविषयक धाग्यात नोकरी आणि घर, यामध्ये जी ओढाताण होते त्यामुळे स्त्रीयांना काही तब्येतीचे प्रश्न उदभवतात, भविष्यात ते विकोपाला जाऊ शकतात असे वाटावे अशी परिस्थिती एकूणच समाजात असल्याचे जाणवले. पौष्टीक आहार, त्यात ऋतुमानानुसार बदल, याबद्दल माहिती व किती ताण घ्यावा किंवा घेऊ नये, व का? हे सांगणारा लेख जर आला तर सगळ्यांना मदत होईल असे वाटते. अगदी वेगळा लेख फक्त त्रीयांच्या दृष्टीकोनातून लिहेणे नाही जमले तरी, डॉ. बाबा पाटील यांन्ची परवानगी असल्यास त्यांच्या लेखमालिकेच्या प्रतिसादातून जरी सांगितले तरी चालेल.

In reply to by रेवती

सर्व डॉक्टरांना (अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी) अनाहितावर, 'आरोग्य विभाग' उघडून, 'एक डॉक्टर' म्हणून प्रवेश देण्यात यावा असे सुचवितो. इथे सर्व स्त्री सदस्यांना आणि फक्त डॉक्टर पुरुष सदस्यांना प्रवेश असावा. ह्या विभागापलीकडे डॉक्टर सद्स्यांसही प्रवेश नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यापेक्षा इथे मुख्य बोर्‍डावर लिहीलं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचेल... इतर सदस्यांच्या घरातल्या सगळ्या स्त्रिया पण वाचतील...

In reply to by आनन्दिता

परंतु मुख्य फलकावर प्रामाणिक प्रतिसाद देणे, आपल्या समस्या/अनुभव मांडणे मिपाच्या महिला सदस्यांना अवघड वाटेल अशा विचाराने मूळ प्रतिसादातील प्रतिबंधित विभागाची कल्पना मांडली आहे. तुम्ही म्हणता आहात तेही पटतंय. पण अशा जास्तीतजास्त महिलांनी मिपाचे सदस्यत्व घ्यावे हा एक मार्ग उरतो.

पहिला भाग आवडेश .. मध्ये सोडु नका हि नम्र विनंती !! ( ते अनाहिता ई. साठी नंतर लिहा हवे तर ;) ) मेडिसीनपेक्षा आहारावर तब्येत अवलंबुन असते यावर ठाम विश्वास असलेला

आयुर्वेदाची अगदी सुरुवातीपासून समग्र माहिती देणारी लेखमाला सुरु झालेली बघून फार बरे वाटले. पुभाप्र.

सहमत. निरोगी राहण्यासाठी तिचा स्वीकार करणे उत्तमच. पण आजार आला तर त्याचे निदान करण्यासाठी निष्णात वैद्याचा अनुभव याहून जास्त काय आहे? आधुनिक अ‍ॅलोपाथीमध्ये उपलब्ध असलेल्या असंख्य प्रकारच्या चाचण्या हा प्लस पॉइंट आहे.

मी या विषयातला अंतिम शब्द नाही.आणी फक्त एकाच शास्त्राचा माझा दुराग्रह देखिल नाही. आज पर्यंत जे काही शिकलो आहे (अभ्यास व अनुभवजन्य ) ते सर्वां पर्यंत पोहचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.तुमच्या शंकांची माझ्या अल्प मतीनुसार योग्य ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल.साधारण दिड ते दोन वर्ष ही लेखमाला चालेल असा अंदाज आहे.ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा येइल त्या दिवशी स्पष्ट सांगा लेखनी बंद करेल. पुनःएकदा धन्यवाद. आपला बाबा पाटील उर्फ डॉ. प्रशांत दौंडकर-पाटील www.ayurvedandpanchakarma.com

In reply to by बाबा पाटील

बाबा साहेब, एक मूळ( फालतू पण असू शकेल) शंका. आज काल पंचकर्म हा परवलीचा शब्द झाला आहे. तीस एक वर्षा पुर्वी ते फारसे ऐकू येत नसे. (म्हणजे मी माझ्या मित्रांबरोबर पुण्यात ताराचंद मध्ये आयुर्वेदाची अगदी बाळबोध माहिती घेण्यासाठी जात असे तेंव्हा). तेंव्हा पंचकर्म हे किती आवश्यक आणि किती बाजारीकारणाचा रेटा आहे? तेंव्हा आणि आताच्या आयुर्वेदात इतका जमीन अस्मानाचा फरक झालेला नाही असे मला वाटते

In reply to by सुबोध खरे

या प्रत्येक गोष्टीवर त्या त्या वेळी तपशिलवार चर्चा केली जाइल्,शक्यतो प्रत्येक शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाइल.

In reply to by बाबा पाटील

निर्वाणीची भाषा कशाला? पुढील भागांसाठी शुभेच्छा. त्यातून नक्कीच काही तरी चांगले वाचायला मिळेल.

येऊ द्या बाबा. स्वागतच आहे अशा डिट्टेल अन प्रांजळ लेखनाचे. तुमच्या प्रतिसादातून तुमचा फटकळ पण दिलखुलास राजेपणा जाणवतोच, आणि आवडतो सुध्दा.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आयुर्वेद किस भानगड का नाम है ते नेमकं जाणून घ्यायची इच्छा फार आहे. पेप्रातले लेख परिभाषेचा मारा करतात त्यामुळे टर्न ऑफ होतं, घंटा कळत नाही.

In reply to by मारकुटे

आयुर्वेदाला चांगले ठरवायवे असल्यास इतर पद्धतींचा पुरस्कार करणार्‍या लोकांना 'चिखलफेकू' ठरवण्याची गरज आहे का? आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत आणि त्यांच्यामुळेच ही पद्धत लोकप्रिय राहणार आहे. पण जिथे इतर पद्धतींमधून फायदा होत असेल तिथे तोसुद्धा करून घेणेच हिताचे असते हे सर्वजण जाणतात आणि तो करून घेतात. आज आपले सरासरी आयुष्यमान वाढलेले आहे ते अ‍ॅलोपथीमुळे की आयुर्वेदामुळे की होमिओपाथी, युनानी वगैरेंमुळे?

In reply to by आनंद घारे

वाढलेले सरासरी आयुष्यमान (विशेषतः भारतातील) याबद्दल जास्त माहिती देता येईल का? (पूर्वी केंव्हा केंव्हा किती किती होते, जनसंख्येच्या मानाने मृत्युंचे प्रमाण किती होते व आहे, जास्त मृत्यु कोणत्या वयात होत व आता होत आहेत? सरासरी आयुष्य कसे वाढले, वगैरे?)

In reply to by चित्रगुप्त

भारतातील आयुर्मानाबद्दलचा माहिती गेल्या सुमारे पन्नास वर्षांत अत्यंत विश्वसनीयरीत्या नोंदली गेलेली आहे. या दुव्यावरचं टेबल क्र. १.२५ पहा. १९७१ ते १९९९ या २८ वर्षांत बालमृत्यूंचं प्रमाण सुमारे ६० टक्क्यांनी घटलेलं आहे (वय वर्षं ० ते ४ आणि ५ ते ९). इतरही वयोगटांत नेत्रदीपक सुधारणा आहेत. जन्माच्या वेळचं अपेक्षित आयुष्य १९६० साली ४२ होतं. ते वाढून आता ६५ च्या आसपास झालेलं आहे.

In reply to by मारकुटे

साहेब, नमस्कार ! असा "प्रथम ग्रासे मक्षिकापात" करण्याने काय साधणार आहे? आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी या एकमेकाच्या विरोधी नसून पूरक आहेत हे मानून अनेक मान्यवर तज्ञ आणि रुग्णालये दोन्हींचा सर्वसमावेशक (होलिस्टिक) उपचारात विचारपूर्वक समावेश करत असतात. कोणत्याही बाबतीत काही हितसंबद्धी एका बाजूने प्रचार करत दुसर्‍याची हेटाळणी करतात, तसेच आयुर्वेदाच्या बाबतितही होते. तुम्ही पण तोच प्रकार दुसर्‍या बाजूने करत आहात (आणि या धाग्यावर तसे करण्यासारखे अजून काही कारण नसताना केवळ पूर्वग्रहदुषित कारणांनी होते आहे) हे तुमच्या ध्यानात यावे यासाठीच हे लिहीले आहे. समजून घ्याल अशी आशा आहे... कारण हा उत्तम विषयावरचा धागा भरकटू नये हीच इच्छा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राम राम आम्ही तुमच्याएवढे ४ बुकं शिकलेलो नाही. आजुबाजुला जेव्हा आम्ही आयुर्वेदाबद्दल कुणी काही लिहिलं, बोललं की त्याची कशी शिकलेल्या लोकांकडून खिल्ली उडवली जाते, हिणावले जाते, तुच्छतेने पाहिले जाते ते अगदी जवळून पाहिले आहे. आमचे पहाणे, आकलन, निरिक्षण चू़कीचे असेल तर आम्हाला आनंदच आहे. मिपावरल्या आमच्या छोट्या कालावधीत आम्ही जे काहि भारतीय ते थिल्लर अशीच भुमिका अनेकांनी घेतलेली पाहिली आहे म्हणून तसे वाक्य लिहिले. चुकीचे असेल तर मोठ्या मनाने माफ करा... पण जर का ते वाक्य बरोबर असेल तर... असो.

आयुर्वेद आणि ज्योतिष यांचा जवळचा संबंध आहे, असे ऐकून आहे, याबद्दलही लिहावे. नाडी परिक्षेबद्दल येईलच, अशी आशा.

In reply to by चित्रगुप्त

माझ्या माहिती प्रमाणे कफ वात पित्त पैकी कोणती प्रकृती आहे, हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेवरून सांगता येते. मागे मी डॉ. दीपक चोपडा यांच्या पुस्तकात अतिशय तपशीलवार प्रश्नावली दिलेली बघितली आहे, त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रकृती ओळखता येते, वगैरे.

माझा आणी ज्योतीष विद्येचा कधीच संबध आला नाही किंवा त्याविषयी काही माहितीही नाही त्यामुळे एथे फक्त आयुर्वेदाची बेसिक माहिती व व्यवहारिक दैंनदिन आयुर्वेद यावरच भर देइल.

चान्गली सुरुवात्,पु भा प्र.

आयुर्वेदावर शास्त्रशुद्ध भाष्य अश्वमुखातून ऐकायला (वाचायला) आवडेल.

कोणतेही शास्त्र सर्व रोगांवर पूर्ण आणि हमखास इलाज करू शकत नाही असे माझे मत आहे . विश्वास उडण्याचे कारण ते शास्त्र जाणणारे हे कबूल करत नाहित ."एवढ्या दिवसांत गुण नाही आल्यास दुसरे उपाय कर " असे सांगत नाहित .

In reply to by कंजूस

आपणही माझ्यासारखेच भुगतभोगी आहेत असे वाटते, म्हणून मी आपणास काही महत्त्वाची प्रश्न विचारतो. आपला ह्या विषयावर गहन अभ्यास असावा, असे वाटते. कृपया आपले शिक्षण चिकित्साविज्ञानाच्या कोणत्या शाळेत/महाविद्यालयात/विद्यापीठात झाले आहे ते कळवावे. जे हे विधान चिडून केले असले तर १)आधी शांत होऊन १ ते १०० मनामध्ये मोजून मगच परत एकदा विचार करणे. २)तोच तोच विचार येत असेल तर परत पायरी (step no.) १ अनुसरावी/follow करावी हि विनंती. जर आपल्याला काही गहन शंका असतील तर मला व्य नि पाठविणे. मी सर्व शंकांचे निरसन करू शकेन असे वाटते. आपला मिपास्नेही : आयुर्हीत

आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करताना जाणवते की ज्या सिध्दांतांचा शोध आधुनिकामध्ये काही शेकडो वर्षांपुर्वी लागला त्याच सिध्दांतांचे वर्णन हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदीय ग्रंथात आधीच करून ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही शरीरघटकांची नावं त्यांच्याच संस्कृत नावाशी बरीच मिळतीजुळती वाटतात. उदा: स्वेद - sweat ह्रत् - heart शिरोब्रह्म - cerebrum शिरोविलोम - cerebellum

माझ्या अ‍ॅलर्जी चा उपचार आयुर्वेदानेच शक्य झाला (पंचकर्म). माझेही डॉक्टर एक पाटील म्हणूनच होते. आणि मला एका अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरनीच सांगीतलं होतं की "आल्टर्नेटीव्ह थेरपी" वापरायला. आणि अतिशयच फरक पडला. त्या नंतर माझा आयुर्वेदा वर विश्वास बसला तो अजून ही कायम आहे.