✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बालपणातल्या हिरोंसोबत

न
नवनाथ पवार यांनी
Tue, 12/17/2013 - 13:57  ·  लेख
लेख
कुठल्यान कुठल्या निमित्ताने घरात सतत साफ सफाई सुरु असते. आईने अचानक एकदा फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके. एक एक वस्तू मला भूतकाळात नेणारी. ताम्हणकरांच्या "गोट्या"चा अख्खा संच, चंपक, चांदोबा, ठकठकचे काही अंक, चित्रकलेच्या वहीतील "याला चित्रकला म्हणतात का" असं वाटायला लावणारी चित्रे आणि रोजच्या सुविचारापासून मोटार गाडीच्या चित्रापर्यंत कशाचही कात्रण असलेल्या फायली, रंगपेट्या. मी प्रत्येक गोष्ट अगदी निरखून पाहतोय म्हणून आईचा पारा चढला पण मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. यातल्या प्रत्येक गोष्टीसोबत एक एक आठवण जोडली गेली होती चित्रकलेच्या वहीत "डक टेल्स" मधील संपूर्ण "स्क्रूज" फॅमिलीचं रेखाचित्र सापडलं. माझा अत्यंत आवडता कार्टून शो. दर गुरुवारी संध्याकाळी बरोबर पाचच्या ठोकयाला "ज़िन्दगी तूफानी है" असा कोरस आमच्या घरातून ऐकू यायचा. अत्यंत कवडीचुंबक पण श्रीमंत असलेला म्हातारा अंकल स्क्रूज मैकडक, अंकल डोनाल्ड डक नौदलात गेल्याने स्क्रूजकड़े राहायला आलेले त्याचे तीन अतिमस्तीखोर पुतणे लुई - ड्युई - ह्युई, विमान चालवणारा बेभरवशाचा पाइलट लॉन्चपैड मैकक्वेक आणि अंकल स्क्रूजला रस्त्यावर आणायला टपलेले त्याचे शत्रू ; असा सगळा प्लॉट असल्यावर धमाल ठरलेलीच. स्क्रूजला आपला पैसा सतत वाढतच कसा जाईल याची काळजी. स्वतः च्या पैशाने भरलेल्या गोदामात तो स्विमिंग पूल सारखा पोहे व क्षणात किती पैसे आहेत हेही त्याला कळे. मला सर्वात जास्त आकर्षण वाटायचं त्याच्या लकी कॉइनचं, त्याची आयुष्यातली पहिली कमाई. हा कॉइन त्याच्याकडून हिसकावून घेतल्यास तो दरिद्री बनेल म्हणून त्याचे शत्रू अनेक मार्ग वापरतात पण हार मानेल तो अंकल स्क्रूज कसला ! त्याची पूर्ण फॅमिली त्याच्या सोबत असते, मग ती संकटे अत्यंत दुर्गम अशा वाळवंटातील असो वा नव्यानेच शोधलेल्या कुठलेश्या समुद्रप्रदेशातील असोत. मी पण एक कॉइन सतत सोबत ठेवायचो जेणेकरुन लवकर श्रीमंत होईल. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी पडली की शेजारच्या ताईकडे असलेल्या चांदोबाच्या पुस्तकांत आम्ही डोके खुपसून तासनतास बसत असू. ताईच्या बाबांनी चांदोबाचे खूप जुने अंक बाइंड करुन ठेवले होते. तिचा आम्हाला अजूनही हेवा वाटतो . चांदोबा मधील पात्रांची नावे अगदी कठीण असायची. संस्कृतप्रचूर वगैरे. जगाच्या पाठीवर कुठले आई -बाप आपल्या मुलांची नावे अशी कठीण ठेवत असतील असं आम्हाला वाटायचं. त्यातील विक्रम वेताळच्या गोष्टी वाचून विक्रम राजाला दुसरा कामधंदा नाही का ? किंवा एका रात्रीत वेताळ इतक्या गोष्टी सांगतोय, तर त्याने त्या कुणाकडून ऐकल्या, असे प्रश्न मला पडायचे. गोष्टीच्या सुरुवातीला विक्रम राजाच्या हातात तलवार आहे, भोवताली काळशार जंगल व त्यात हिरवी झाडे आहेत, जमिनीवर ठिकठिकाणी कवटींचा खच पडलाय असं चित्र असायचे. चांदोबातील चित्रेही बोलकी असायची. मध्यंतरी एकदा रेलवे स्टॉलवरून चांदोबाचा अंक विकत घेतला. चांदोबातील चित्रे आज ही सुरेख असतात पण बदलत्या वाचकवर्गाचा विचार करताना गोष्टींचा दर्जा मात्र खालावलाय. "चंपक" आणि "ठकठक" नंतर आवडेनासे झाले. "गोटया"चा संच मीच विकत घेतलेला. त्यातील गोटयाच्या करामती अजूनही फ्रेश वाटणार्या. आगगाडीतून प्रवास करताना इतकी मोठी आगगाडी एवढ़याश्या साखळीने कशी थांबू शकते ? म्हणून साखळी ओढणारा भाबडा गोटया, व्याख्यात्यांनी यायला नकार दिला म्हणून रद्द होत असलेली शाळेतली व्याख्यानमाला चालू रहावी म्हणून कुंभार, सुतार, मदारी यांना व्याख्याते म्हणून बोलवणारा चतुर व प्रसंगवधानी गोटया मला हिरो वाटायचा. त्यावेळी आवडणारे हिरो वेगळे होते. आता आवड बदलली असेल वय वाढल्यामुळे. रविवारी दुपारी दूरदर्शन वर येणारा "शक्तिमान" त्यातील पत्रकार पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री मुळे आवडायचा. त्याचं ते बावळट ध्यान, गीता विश्वासला "देवीजी" म्हणून पुकारण, त्याचा तो चक्रमपणा खूप हसवायचा. संकटात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शक्तिमान यायचा. एक हात वर करून दूसरा हात कमरेवर ठेऊन गोल गोल फिरताना तो हवेत उड़त उड़त इच्छित स्थळी पोहचायचा. अशा वेळी सरकारी कचेरीतील टेबल फैन सारखा आम्ही तोंडाने झू s s झू झू आवाज करायचो. शक्तिमान योगासन करताना पाठीच्या कण्यावर सात चक्र दिसायची व ती फिरत असायची. आमच्या सामान्य विज्ञान भाग २ च्या पुस्तकात याचा कुठेच उल्लेख नव्हता. शक्तिमानच्या लोकप्रियतेमुळे त्याच्यासारखी कपडे, त्याचे चित्र असलेली स्टीकर्स बाजारात आलेली होती.मी निबन्धाच्या वहीला शक्तिमानचा स्टीकर लावला होता तेव्हा भर वर्गात बाईंनी या "शक्तिमान"ने नंतर स्टाफरूम मधे येऊन वही घेऊन जावी असं म्हणून माझा चांगलाच पानउतारा केला होता. "मालगुडी डेज" मधील स्वामी आणि त्याचे दोस्त मला खूप जवळचे वाटायचे. पुस्तकाच्या शेवटी राजनच्या वडिलांची बदली होऊन तो गाव सोडून जातो आणि त्याची आणि स्वामीची भेटही होत नाही हे वाचल्यावर मला अतिशय वाईट वाटल होतं. राजन आपल्याला लक्षात ठेवेल का असा प्रश्न स्वामीला पडतो जर आर. के. नारायण मला भेटले असते तर मी त्यांना नक्कीच विचारलं असतं की मोठेपणी तरी ते एकमेकांना भेटलेत का ? "श्यामची आई" पुस्तक मला बक्षिस मिळालेलं, त्यातील श्याम सारखा समंजस मी त्या वयातही नव्हतो. पुस्तक वाचून रडल्याचं तेवढं आठवतं. खाऊच्या पैशातून स्वतः च्या भावासाठी कोट शिवणारा श्याम त्या वयात जितका समंजस, धाडसी होता तितका मी किंवा माझ्या वयाची मंडळी होतो का असाही प्रश्न मला पडतो. खूप वर्षांनंतर उघडलेली पेटी मला परत बालपणात घेऊन गेली. माणसाने असचं वेळात वेळ काढून स्वताच्या बालपणात परत एकदा जावं, त्यात फार काळ रमू नये पण ती निरागसता सतत जोपासावी. पीटर पैनच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाने या जादुई दुनियेतील आपल्या मनातील परींच राज्य जपावं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8981 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

****

जेपी
Tue, 12/17/2013 - 14:04 नवीन
आवडल .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नवनाथ पवार
Tue, 12/17/2013 - 15:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मुळात हे सगळं तुमच्या कडे आहे

पिलीयन रायडर
Tue, 12/17/2013 - 14:15 नवीन
मुळात हे सगळं तुमच्या कडे आहे??? मला प्लिझ एकदा वाचाय्ला द्याल?!! तुमचा सॉलिड हेवा वाटतोय..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नवनाथ पवार
Tue, 12/17/2013 - 15:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

समवयस्क दिसतोय आपण.

सौंदाळा
Tue, 12/17/2013 - 14:19 नवीन
समवयस्क दिसतोय आपण. अगदी याच आठवणी/अनुभव आहेत. छान लेख.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नवनाथ पवार
Tue, 12/17/2013 - 15:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

छान

माणिकमोति
Tue, 12/17/2013 - 14:55 नवीन
हेच म्हणते.. माझ्यासुद्धा ह्याच बालपणीच्या आठवणी आहेत... आणि हो, माझ्याकडे अजुनही जपुन ठेवलेले कित्तीतरी चांदोबा, चंपक, ठकठक आणि गोट्या १,२,३ बरोबरच चिन्गी सुद्धा आहे..!!! तुमच्यमुळे माझ्यासुद्धा जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नवनाथ पवार
Tue, 12/17/2013 - 15:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माणिकमोति

बालपण आणून दिल परत. विक्रम

मनिम्याऊ
Tue, 12/17/2013 - 15:27 नवीन
बालपण आणून दिल परत. विक्रम वेताळाची आठवण आली की हो.. Image removed.
  • Log in or register to post comments

श्री अशोक माहिमकर ह्यांचे

ज्ञानव
Tue, 12/17/2013 - 15:32 नवीन
फुलबाग हे मासिक आणि किशोर कुणाकडे एखादा तरी अंक आहे का ? माझ्या मुलांना दाखवीन.
  • Log in or register to post comments

पुण्यात असाल तर...

हुप्प्या
Tue, 12/17/2013 - 18:00 नवीन
सेनापती बापट रोडवर बालभारतीचे कार्यालय आहे. तिथे त्यांचा विक्रीविभाग आहे. तिथे किशोरचे जुने अंक मिळतात. फार महाग नाहीत. जमले तर जरूर जा. इलेक्ट्रोनिक स्वरुपात मिळाले असते तर जास्त आवडले असते. फुलबागचे माहित नाही. किशोर हे सरकारी प्रकाशन असल्यामुळे ते टिकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

नॉस्टॅल्जीक

नीलकांत
Tue, 12/17/2013 - 15:54 नवीन
वाह ! हे वाचून अगदी त्या काळात पोहोचल्यासारखं झालंय. चांदोबा , चंपक , ठकठक तर होतेच सोबतच किशोर सुध्दा वाचायचो. त्याकाळी लोकमत कॉमिक्ससुध्दा यायचे. खलील खान नावाचे चित्रकार ते बनवायचे असं आठवतं. सोबतच चाचा चौधरी, फॅन्टम आदीसुध्दा असत.. अगदी अशीच पेटी माझ्या जवळसुध्दा आहे. कधी उघडली तर सगळं बालपण समोर येतं. :) धन्यवाद - नीलकांत
  • Log in or register to post comments

अहो

अमोल मेंढे
Tue, 12/17/2013 - 17:12 नवीन
ते खलील खान पुण्याचेच आहेत
  • Log in or register to post comments

खलील खान बार्शीचे.

अभ्या..
Wed, 12/18/2013 - 00:38 नवीन
खलील खान बार्शीचे. आता मंदावलीय प्रतिभा पण एक काळ प्रत्येक दिवाली अंकाची त्यांन्च्या चित्राशिवाय छपाई होत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल मेंढे

जरा वेळ मिळालाय म्हणून

अभ्या..
Wed, 12/18/2013 - 02:41 नवीन
जरा वेळ मिळालाय म्हणून डिट्टेल देतो. :) खलील खान मुळचे बार्शीचेच. नंतर ते कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेली राजकीय व्यंगचित्रे गाजली. हिरोंची अन राजकीय नेत्यांची कॅरीकेचर्स अत्यंत अप्रतिम असायची. बार्शीत त्यांनी प्रदर्शन भरवले होते. नंतर कार्टून्स हेच कार्यक्षेत्र निवडून त्यांनी काम केले. रविवारची जत्रा, आवाज यांची मु़खपृष्ठे, आतील व्यंगचित्रे खूप गाजली. प्रवाही अन बोल्ड रेषा, मिस्कील पात्रे व त्या काळात कोणी वापरत नसलेल्या पॅटर्न फील रंगाने त्याची चित्रे वेगळी ठरायची. त्यांचा कामाचा उरकही दांडगा होता. लोकमत कॉमिक्ससारखे साप्ताहिक एकहाती भरायचे. सर्व दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे हटकून असायचीच. इतके काम कसे जमते हा आम्हाला प्रश्न असायचा. कालपरत्वे त्यान्च्या चित्रातील विनोद केविलवाणा वाटू लागला. जुन्याच आयडीयावर बेतलेली चित्रे आवडेनासी झाली. इलस्ट्रेशन मध्ये वेगवेगळे प्रयोग करुन पाहणार्‍या नव्या पिढीपुढे त्यांच्या चित्रांचे दर्शन दुर्मिळ होऊ लागलेय. आता पुनरागमनात त्यांच्या चित्रातल्या लाडक्या पपी कुत्र्याशेजारी असणारी त्यांची स्वाक्षरी पण बदललीय. बहुधा मुलाकडे कलेचे हस्तांतरण झाले असावे. काहीही असो माझे ते चित्रकलेतले पहिले आदर्श होते अन एक बार्शीकर म्हणून त्यांचा मला कायमच अभिमान वाटतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आहा.. मस्तच...

ब़जरबट्टू
Tue, 12/17/2013 - 17:26 नवीन
बाकी सुपर कमांडो ध्रुव, नागराज व डोगा कुठी सुटले म्हणायचे.. नम्बर लावून कामिक्स वाचनारा... :)
  • Log in or register to post comments

स्मरणरंजन !!

सुहास..
Tue, 12/17/2013 - 18:02 नवीन
स्मरणरंजन !!
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Tue, 12/17/2013 - 22:34 नवीन
एकदम बालपणात घेऊन जाणारा लेख!
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

कुसुमावती
Wed, 12/18/2013 - 00:14 नवीन
शक्तिमान माझी पण आवडती मालिका. शक्तिमानचा भाग संपल्यावर सॉरी शक्तिमान नावाचं सदर असायचं. शक्तिमान लहान मुलांना त्यांचं काय चुकतयं ते सांगायचा आणि सगळे लगेच सॉरी शक्तिमान म्हणायचे. अजुनही कोणी माझ्यावर कारण नसताना चिडलं तर मी सॉरी शक्तिमान म्ह्णते.
  • Log in or register to post comments

गोट्या नि खडकावरला अंकुर

प्यारे१
Wed, 12/18/2013 - 01:10 नवीन
गोट्या नि खडकावरला अंकुर (जुन्या काळातले कुणी गायक) पुस्तकं बक्षीस म्हणून मिळालेली. ... ना धों ताम्हणकर ना? फास्टर फेणे पण बर्‍यापैकी आठवतो. लायब्ररीमधून आणून वाचलेली. किशोर, चांदोबा, चंपक त्याबरोबरच दिसेल ते वाचणे असा प्रकार होता. भन्नाट होते दिवस!
  • Log in or register to post comments

ज्ञानसागरातील शिंपले, पंचतंत्र

बहुगुणी
Wed, 12/18/2013 - 04:54 नवीन
मुलांच्या जिव्हाळ्याच्या पुस्तकांचा विषय निघालाच आहे म्हणून गो. सी. गोखल्यांचं "ज्ञानसागरातील शिंपले (५ भाग)", तसंच "पंचतंत्र" यांचाही उल्लेख करायला हवा. यांपैकी 'ज्ञानसागरातील शिंपले' या मालिकेचे काही भाग ग्रंथालयात वाचायला किंवा रसिक साहित्य मध्ये विकत घ्यायला उपलब्ध आहेत. 'पंचतंत्र' हे चक्क श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे!
  • Log in or register to post comments

नाॅस्टॅल्जिक करणारा लेख!

किसन शिंदे
Wed, 12/18/2013 - 07:47 नवीन
नाॅस्टॅल्जिक करणारा लेख! चंपक, ठकठक, चांदोबा, फास्टर फेणे, चाचा चौधरी, पिन्की, नागराज, फॅन्टम, या सगळ्या ३०-३५ पुस्तकांचा साठा माझ्याकडे होता, आणि त्यातून एक छोटीसी लायब्ररीही चालवल्याचं आठवतंय. :-)
  • Log in or register to post comments

खुप छान लेख..

शैलेन्द्र
Wed, 12/18/2013 - 08:39 नवीन
खुप छान लेख.. :) आवडला, लिहीत रहा
  • Log in or register to post comments

लेख आवडला.....

मिनेश
Wed, 12/18/2013 - 08:56 नवीन
लेख आवडला........बाकी ही मासिके आता ही online मिळु शकतात....
  • Log in or register to post comments

हिरोबरोबर च्या या आठवणी

देशपांडे विनायक
Wed, 12/18/2013 - 09:51 नवीन
हिरोबरोबर च्या या आठवणी म्हणजे त्या काळात आपण जिवंत होतो याचे पुरावे छान लेख
  • Log in or register to post comments

मस्त लेख

मीता
Wed, 12/18/2013 - 09:53 नवीन
चांदोबामूळे मला वाचायची गोडी लागली ..मला आठवतं तेव्हापासून चांदोबा आमच्या घरी यायचा .दुसरी मध्ये असताना आम्हाला रामायणातील गोष्टी इतिहास या विषयामध्ये होत्या . परीक्षे मध्ये "सेतू बांधताना रामाला कोणी कोणी मदत केली त्यांची नावे सांगा असा प्रश्न होता " तेव्हा चांदोबा मध्ये रामायणाची गोष्ट चालू होती आणि मी आठवतील तशी जवळपास सात ते आठ नावे लिहिली जी इतिहासाच्या पुस्तकात नव्हती . बाईंनी चुकीचा दिलं म्हणून मी आई ला चांदोबा दाखवला होता आणि आई तो घेऊन शाळेत आली होती . चांदोबा मध्ये येणारे रूपधर च्या साहसकथा पण मी आवडीनी वाचायचे .. खूप वर्षांनतर कळाल कि ते होमरचं ओडिसी होतं म्हणून.. चंपक फार नाही आवडलं कधीच .. मग किशोर . पण चांदोबाची सर कशालाच आली नाही . शाळे मध्ये गोटया ,फास्टर फेणे ,चाचा चौधरी आणि साबू ,fantom च्या कॉमिक्स असा खूप वाचलं. एक अप्रतिम पुस्तक शाळेत असताना मिळाल होतं ते म्हणजे "हायडी " या आणि अशाच बऱ्याच पुस्तकांनी आयुष्य समृध्द केलं. त्याची सर कशालाच नाही .
  • Log in or register to post comments

मस्त लेख..

कोमल
Wed, 12/18/2013 - 10:23 नवीन
मस्त लेख.. लहानपणी फडशा पाडलेल्या पुस्तकांची अन् मासिकांची आठवण झाली. डेनिसच्या गोष्टी, त्तोत्तोचान, चीपर बाय दी डझन, या सोबतच फाफे, शेरलॉक होम्सची पण हजेरी लावते.
  • Log in or register to post comments

चंपक वनातील प्राण्यांची सभा ,

देव मासा
गुरुवार, 12/26/2013 - 06:27 नवीन
चंपक वनातील प्राण्यांची सभा , आणि किशोर मधील कपीश माकाड आठवतात आजूनही.ठक-ठकचा दिवाळी अंक ७ रुपय . ते पण महाग वाटायचे त्या वेळी *mamba* *WASSUP* *SUP* *MAMBA* :MAMBA:
  • Log in or register to post comments

माझेही बालपणीचे हीरो अगदी हेच

मितान
Fri, 12/27/2013 - 10:48 नवीन
माझेही बालपणीचे हीरो अगदी हेच ! चांदोबातली हात लांबवून दुसर्‍याच खोलीचे दार उघडणारी हडळ आजही स्वप्नात येते :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा