Skip to main content

आज ग. दि. मा यांचा स्मृती दिन

लेखक psajid
Published on शनीवार, 14/12/2013
ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले. स्वातंत्रपूर्व काळामध्ये बेचाळीसच्या लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लागले असताना क्रांतिसिंह नाना पाटील एका झोपडीमध्ये लपण्यास आसरा घेतात त्यावेळी एक वृद्धा आपल्या सुनेबरोबर त्यांना लपण्यास मदत करते आणि पोलीस आल्यानंतर माझी लेक जावई असल्याचे सांगून पोलिसांना चकवा देते. ह्या भावुकप्रसंगावर मराठी साहित्यातील वाल्मिकी गीतरामायणकार कवी. ग. दि. माडगूळकरांनी केलेली कविता मित्रांसाठी - लपवलास तू का थेरडे झोपडीत या कुणी फरारी, 'देवाशप्पत नाही दादा' दोन कापरे ओठ हलले, गळीत देह तो बाजूस सारून, झोत विजेचे आतच घुसले, कोण दोन ते त्या खाटेवर पुसे शत्रूचा एक शिपाही, लाजून, दबकून सांगे वृद्धा, दादा माझी लेक जावई, अंधारातच खाटेवरुनी क्रांतिवीर तो बाजूस होई, नवोढेस त्या म्हणे 'पुन्हा मी तुझ्याच पोटी येईन आई' नवोढेसही गहिवर दाटे, शब्द फुटेना नयनी गंगा, कूस फाडूनी तुझ्यासारख्या रणमर्दाला द्यावी जागा, सखोल डोळे गळू लागले कुरवाळूनिया त्या दोघांना, अश्रुखाली पुनःश्च भिजवी, वीराला ती वृद्ध अंगना , बेचाळीसच्या बलवंतांना, असा लाभला दिव्य आसरा, लोकशक्तीच्या सामर्थ्यावर चिरंजीव हो मग सातारा कवी :- ग. दि. माडगुळकर त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8821
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

स्मृतीस अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! एक उत्तम कविता दिल्याबद्दल साजिद ह्यांना धन्यवाद.... थोडे अ‍ॅडिशन. गदिमा हे एक उत्तम अभिनेते पण होते.त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची नावे देत आहे. १. पहिला पाळणा २. लोकशाहीर रामजोशी ३. बनवासी ४. अदालत (हिंदी) ५. पुढचं पाऊल ६. लाखाची गोष्ट ७. पेडगावचे शहाणे ८. जीत किसकी (हिंदी) ९. अंमलदार १०. जगाच्या पाठीवर आणि ११. वऱ्हाडी आणि वाजंत्री

गदिमां बद्दल काय बोलावे? लहानपणापासुनचा सोबती आहे तो माझा, सतत बरोबर असणारा. त्यांना विनम्र अभिवादन

वा साजिदसाहेब! तीन अण्णांचे लय उपकार - माडगूळकर, चितळकर आणि जोशी. मला आवडणारी एक कविता देतो आहे जोगिया कोन्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग, दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली तबकात राहीले देठ, लवंगा, साली झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज का तुला कंचनी, अजुनी नाही नीज? थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान निरखीसी कुसर वर कलती करुनी मान गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी - स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी. साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान? चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, "का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?" त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग हालले, साधला भावस्वरांचा योग घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा "मी देह विकुनीया मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल', रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र, देही तिळाएवढी जागा. शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम, सावळा तरुण तो खराच गं वनमाली लाविते पान...तो निघून गेला खाली अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव; बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी 'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी' नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार; हांसून म्हणाल्यें, 'दाम वाढवा थोडा... या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा! राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात, जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत, पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला तो कशास येईल भलत्या व्यापाराला? तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात, ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत, वळुनी न पाहतां, कापित अंधाराला तो तारा तुटतो - तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान, त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान; ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे."

सुंदर कविता! शब्दप्रभू गदिमांना अभिवादन!

In reply to by प्यारे१

शब्दप्रभू गदिमांना अभिवादन!

सहज सोप्या गेय रचना लिहिणार्‍या गदिमांना विनम्र अभिवादन! इथे आलेल्या कविताही अतिशय सुरेख आहेत!

गदिमा माझेही अतिशय आवडते कवी व गीतकार तसेच अभिनेतेही. त्यांचे वाटेवरल्या सावल्या हे आत्मचरित्र खूपच छान आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा आदी अष्टसिद्धींसारखी "गदिमा" ही एक मराठी सारस्वताला लाभलेली सिद्धी आहे ह्यात शंकाच नाही. त्यांचे माझे थोडे नातेही आहे ते म्हणजे माझे आजोबा त्यांचे शिक्षक होते (कुंडल येथे) आणि गदिमांच्या नातीची थोडी ट्रिटमेंट मी केली आहे. तेव्हा त्यांच्या मुलीने मला गदिमा डॉट कॉम ही सीडी भेट दिली होती.

शब्दप्रभू गदिमा अभिवादन. गदिमा॑नी लिहिलेले गीत रामायण आकाशवाणीमुळे घराघरामध्ये पोहोचले.

गदिमा, ओ पी नय्यर, मोहमद रफी, साहिर लुधीयानवी, दिलीपकुमार, दिलीप प्रभावळकर व कुमार गंधर्व याना मी आपले मन वाहिले आहे. ही शब्द, स्वर, आवाज. अभिनय यातील सारी महारत्ने आहेत. ये जाग पाखराना आला भरून माठ गवतात झोपलेली भिजली दवांत वाट या ओळी आठवल्या की गदिमा ना सरस्वती कशी प्रसन्न होती ते उलगडते.

गदीमांना जाऊन आता ३५ च्या वर वर्षे झाली. त्यांची अनेक गाणी ती त्याही आधीच्या दशकांमधली...तरी देखील अजूनही आवडतात. अवीट गोडी म्हणजे काय ते त्यावरून समजते.. वर लेखात टाकलेली कविता ही खूपच छान आहे आणि ती सुरवातीपासून वाचण्यासारखी आहे. रामायण, चैत्रबन, वैशाखी मधील चित्रपटगीते, जोगीया मधील कव्य आणि पुरीया मधील त्यांच्या शेवटच्या काळातील काव्य हे सर्वच वाचण्यासारखे आहे. गीत गोविंदला मात्र तशी लोकप्रियता मिळू शकली नाही. त्यांचा अभिनय, पटकथा लेखन आदी देखील अविस्मरणीय होते... लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर वगैरे मधे अभिनय-पटकथा लेखन आण काव्य सगळेच त्यांचे होते. वर्‍हाडीवाजंत्री त्यांनी वठवलेला मधला कन्नड मराठी माणूस एकदम मस्त आहे! त्यांची अनेक गाणी, कविता खूप आवडतात... येथे एक वेगळ्याच विषयावरची त्यांची पूजास्थान कविता खाली चिकटवत आहे. (दुवा: gadima.com) Poojasthan 1 Poojasthan 2