Skip to main content

कांदे पोहे … एक अनुभव…

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी शुक्रवार, 29/11/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना.... आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून बसलेले बरेच जण पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले..... खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली.... सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये तेंडुलकर आउट झाल्यावर जितका उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं.... पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय.... समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई..... रोज एक नवीन कारण कळायचं.... आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार.... कधी घरात जीन्स वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ?? मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली... एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी .... तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे… अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? ' इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...." इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना …. एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित … एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या उमेदवारा इतका फरक होता… ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे… संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते… (मी बाजारात चुकून गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात ) मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला … मी - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ?? आई - अरे त्यात काय फसवलं ? मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब… आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं … रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले… अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ?? मॉर्निंग शो च्या त्या मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ?? मन शांत झालं आणि विचार चालू झालें … वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे… इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ?? खरं तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि… माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं ) मी गमतीने म्हणालो अरे १ एप्रिल ला भेटलो होतो , मग काय होणार… तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली … छान … वाटलं तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं … (विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … ) (वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल. किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती ) हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ?? पण आपण हे सगळ बघतच नाही ना लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं … पत्रिकांचे गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता … ता. क. :- सदरचा लेख लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)… वरिल लेख हा माझ्याच ब्लोग वरुन घेतल असुन चौर्य कर्म नाहि....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34055
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by म्हैस

@ काही लोक तर इतके mannersless असतात कि सरळ वाकडं तिकडं तोंड करतात . मग मुलगा अगदी कोळशासारखा काळा , जाडा , बुटका , टकला किवा कितीही कुरूप का असेना सौंदर्याच्या बाबतीत त्याची अपेखा मात्र उच्च असते. >>> येस्स!!! अश्या केसेस भरपूर पाहिल्या आहेत. किंबहुना रंगरूपाचं सोडा,गृहस्थाश्रमाच्या दृष्टीनं अगदी ना-लायक असलेल्या काही मुलांचे आई/वडील,मुलगी मात्र कतृत्ववान/देखणी वगैरे विसंगत अपेक्षा ठेऊन असल्याचंही पाहीलय!
पण.....!
@वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात बघितली कि त्यात पहिली अपेक्षा असते ती मुलगी गोरी आणि सुन्दरच असावी . एखादी मुलगी गुणवान , चांगली नोकरी करणारी आहे, इतर अपेक्षात बसत आहे पण सावळी असेल तर तिला नाकारल जात . >>> कुठलीही?????? कुठल्याही(म्हणजे प्रत्येक असाच अर्थ होतो) जाहिरातीत "ह्याच" अपेक्षा असतात.????? कुठल्याही?????

In reply to by म्हैस

मला असं सांगा अपेक्षा लिहिताना कोणी "मुलगी काळी, जाडी, सोडावॉटरच्या बाटल्यांच्या चष्मेवाली, कुरुप आणि आळशी हवी. शाळेत गेलेली नसल्यास उत्तम. " च्यामारी अपेक्षा अश्याच असतात. मुली तरी अपेक्षा लिहिताना " ढोल्या, दारुडा, व्यसनी, वेश्यागमनी, बेकार असावा." असे लिहितात का? लिहिताना हे असेच लिहितात. एकदा लग्नाच्या बाजारात आले की बरोबर अवास्तव अपेक्षा दूर सारल्या जाउन योग्य ती तडजोड केली जाते (करावी लागल्यास). लग्नात नेहमीच मुलीचे रुप आणि मुलाचा पगार बघितला जातो. दोघेही कमावते असले तरीही मुलाचा पगार भरपुर असावा अशी अपेक्षा असते. मग तो कुरुप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नौकरी करणारीच मुलगी हवी असा जरी आग्रह असला तरी मुलगी सुंदर असेल तर तिच्या नौकरी न करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कितीही कंठरवाने सांगितले तरी काही गोष्टी बदलत नाहितच. आणि अरेंज मॅरिज मध्ये काय डोंबलाचे कळते स्वभावाबद्दल? किती भेटी होतात दोघांच्या? दुसर्‍याच्या वर तिसरी भेट घ्यायचे म्हटले तर लोकांच्या भुवया उंचावतात. पहिली भेट बहुतेक वेळा सगळ्या घरच्यांबरोबर असते. बहुतेक वेळेस कोंडी फोडण्यासाठी मोठी माणसे जे गप्पा सुरु करतात ते तासभर चालते. मग त्यात "वहिनी तुमचे माहेर आंबेजोगाईचे वाटते? वा वा.माझ्या नणंदेच्या जावेची बहिण असते तिकडे क्षक्षक्ष नावाची. तुम्ही ओळखता का त्याना?" इतपत विषय निघतात. मग दोघी बायका त्या नणंदेच्या जावेच्या बहिणीबद्दल गप्पा चालु करतात. " खुप चांगली माणसे हो. बाळासाहेब म्हणजे तर लाखात एक. मुलगाही चांगला शिकला आहे त्यांचा. फार्मसी टाकणार म्हणतोय....". इथे ज्याचे लग्न ठरवायचे तो मुलगा बेचैन की साले आता आत्याच्या जावेच्या बहिणीच्या मुलाशीच लग्न लावतात की काय मुलीचे. यथावकाश. आलेल्या १०-५ मंडळींपैके एखाद्याची ट्युब पेटते तासाभराने की मुलगा आणि मुलगी अजुन बोलले नाही आहेत. मग पेटंट वाक्य "तुम्हाला दोघांनाही एकमेकांना काही विचारायचे असेल तर विचारा हा. आमचे काय असेच तासभर बोलणे चालु राहिल. " हो ना नाही म्हणता म्हणता किती ओळखी निघतात नाही" (याचा सूचक अर्थ असा की खोटी माहिती नका हं सांगु. आमच्याकडे रिसॉर्सेस आहेत माहिती मिळवण्याचे) या मधल्या एका तासात मुलगा अधुन मधुन मुलीकडे बघत असतो आणि अधुन मधुन गप्पांमध्ये भाग घेत असतो. अगदीच शिष्ट नको वाटायला म्हणुन. मुलगी अधुन मधुन मुलाकडे बघते. उरलेला वेळ ती मुलाचे केस विरळ होत चाललेत, वजन थोडे जास्त वाटते आहे, टीपॉय चे कव्हर सुंदर आहे, एल सी डी दिसतोय. पण २६" च आहे, सासू भलतीच टापटीपीची दिसतिये (किंवा गबाळी दिसतिये), कार्पेट घातलेले दिसतय (फरश्या जुन्या असणार), गॅलरीत फुलझाडे लावलेली दिसताय (ते फूल जरबेरा की डेलिया?), बिस्कीटे ठेवली आहेत खावे की न खावे अश्या विचारात मग्न असते. हे सगळे मुलीकडचे मुलाकडे आले असतील तर. मुलाकडचे मुलीकडे आले असतील तर ती अधुन मधुन कोणाचे लक्ष नाही असे बघुन हॉल आणि आतल्या खोलीतल्या चौकटीमध्ये उभ्या असलेल्या बहिणीकडे / आत्याकडे वगैरे बघुन डोळ्यांनी काही अगम्य खाणाखुणा चललेल्या असतात. ते जर मुलाने बघितले तर त्याचा अर्थ तो "मुलगा यडचाप आहे. आजकाल कोणालाही बोलावतात बाबा" असाच लावतो. मग तासाभराने जेव्हा मुला मुलींना बोलायची सूचना केली जाते त्यावेळेस एकदम १०-१२ लोक दोघांकडे टकामका पहायला लागतात, पहिला प्रश्न कोण टाकणार म्हणुन. बहुतेक वेळेस मुलगी फक्त लाजुन नाही म्हणुन मान हलवते किंवा शुंभासारखी मख्ख बघत बसते. पहिला प्रश्न मुलानेच विचारावा ही अपेक्षा असते. अपेक्षेनुसार मुलगा काहितरी विचारतो. बहुतेक वेळेस नाव माहिती असते (एकदा मी ते पण विसरलो होतो. काहि केल्या नाव आठवेना त्या मुलीचे. बर तिचे आईवडील पण "आमची ही" असाच उल्लेख करत होते.). त्यामुळे अपेक्षेनुसार प्रश्न "कुठल्या कॉलेजात होतीस तु?" असा असतो. हा सगळ्यात सेफ प्रश्न. "लग्नानंतर जॉब करणारेस की नाही" हा प्रश्न खुप स्फोटक ठरु शकतो. मग पुढचा प्रश्न " --- ची बॅच न तुमची?" मग असलेच थातुर मातुर प्रशन " काय आवडते?" (खरे उत्तर "खायला आवडते". द्यायचे उत्तर "म्युझिक"), "काही हॉबिज?" (खरे उत्तर "लोळायला आवडते". द्यायचे उत्तर "ट्रेकिंग"). मग मुलगी प्रश्न विचारते "तुम्हाला काही स्मोकिंग वगैरेचे व्यसन?" (खरे उत्तर "विल्स. रोज २ पाकिटे". द्यायचे उत्तर "कधीतरी करतो स्मोक एखादवेळेस. व्यसन असे नाही), तुमच्या काही हॉबिज (खरे उत्तर "पॉर्न फिल्म्स बघणे" द्यायचे उत्तर "क्रिकेट"). हे असले फालतु प्रशन विचारण्यात अर्धा तास जातो. मग चहा सुपारी दहा मिनिटे. मग मुलीचा मामा (मुलाकडे गेले असल्यास) किंवा मुलाचे वडील (मुलीकडे गेले असल्यास) "चला बराच वेळ. खुप गप्पा झाल्या. निघतो आता" म्हणुन निघतात. या पावणे दोन - दोन तासात. मुलगा - मुलगी फारतर २०-२५ मिनिटे बोलतात तेही अगदी फालतू. "स्वयंपाक येतो का?" हा कळीचा प्रश्न अजुन पोतडीतुन निघालेला नसतो. म्हणजे मुलगा नाही विचारत. त्याला विचारायचा असतो पण नाही विचारत. अपेक्षा मुलीला स्वयंपाक यावा आणि तिने आवडीने करावा अशीच असते. न जाणो ही म्हणायची "मला नाही येत. तुच घे शिकुन" म्हणजे सगळीच बोंब. आईने विचारल्यावर मुलीची आईच उत्तर देते "आजकाल कोण करते हो. सगळ्या कामांना बाया असतात" ( "मुलगी कटाप" इति मुलाची आई) किंवा "सगळे येते हो. करण्याची आवड आहे" (मनात "ऐक कार्टे कानीकपाळी ओरडुन सांगत असते ना की बटाट्याची भाजी तरी शिकुन घे म्हणून" किंवा "एकदा लग्न होउन जाउ द्यात कळेलच तुम्हाला") आता पहिल्या भेटीत जर एवढेच बोलणे झाले तर दुसर्‍या भेटीची गरज असते. पण दुसर्‍यांदा भेटायचे की नाही ते कशावरुन ठरवणार? तर ते ठरते मुलाच्या पगारा वरुन आणि मुलीच्या रुपावरुन (किंवा कधीकधी तिच्याही पगारावरुन). कारण त्याहुन जास्त काही माहिती कळालेलीच नसते. दुसरी एका तासाभराची भेट होते आणि दोन अश्राप जीव जन्माचा साथीदार निवडुन किंवा नाकारुन मो़कळे होतात. काय बघणार या एका तासात आणि काय समजुन घेणार एकमेकांची आवड निवड आणि सवयी? अरेंज मेरिज हा त्यामुळेच एक चांस असतो. साधारण अंदाज घेउन अंधारात उडी मारायची. दिखावु गोष्टींना त्यामुळे महत्व येणारच.

In reply to by मृत्युन्जय

ह ह पु वा! जरा आउटडेटेड वर्णन आहे.. पण जे आहे ते क्लास आहे!!!! फक्त या प्रतिसादासाठी धागा वसू!!!!! मूळ लेखन ठिकठाक!

In reply to by मृत्युन्जय

यावरुन एक सुभाषित आठवलं, पुनरुल्लेख होत असेल कदाचित पण लिहील्यावाचून राहवत नाहीये. तर सुभाषित असं, कन्या वरयते रुपम् । माता वित्तम् पिता श्रुतम्॥ बान्धवा: कुलमिच्छन्ति। मिष्टान्नम् इतरे जना: ॥ मुलगी जोडीदार निवडताना प्रथम त्याचं रुप बघते, (मुलीची)आई पैसा आणि (मुलीचे)वडील त्याचे गुण-अवगुण बघतात. (मुलीच्या)भावंडांना त्या मुलाचं घराणं बर्‍यापैकी असावं अशी अपेक्षा असते. बाकीच्या लोकांना फक्त मिष्टान्न मिळाल्याशी मतलब असतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

मग तासाभराने जेव्हा मुला मुलींना बोलायची सूचना केली जाते त्यावेळेस एकदम १०-१२ लोक दोघांकडे टकामका पहायला लागतात, पहिला प्रश्न कोण टाकणार म्हणुन. बहुतेक वेळेस मुलगी फक्त लाजुन नाही म्हणुन मान हलवते किंवा शुंभासारखी मख्ख बघत बसते. पहिला प्रश्न मुलानेच विचारावा ही अपेक्षा असते. अपेक्षेनुसार मुलगा काहितरी विचारतो. बहुतेक वेळेस नाव माहिती असते (एकदा मी ते पण विसरलो होतो. काहि केल्या नाव आठवेना त्या मुलीचे. बर तिचे आईवडील पण "आमची ही" असाच उल्लेख करत होते.). त्यामुळे अपेक्षेनुसार प्रश्न "कुठल्या कॉलेजात होतीस तु?" असा असतो. हा सगळ्यात सेफ प्रश्न. "लग्नानंतर जॉब करणारेस की नाही" हा प्रश्न खुप स्फोटक ठरु शकतो. मग पुढचा प्रश्न " --- ची बॅच न तुमची?" मग असलेच थातुर मातुर प्रशन " काय आवडते?" (खरे उत्तर "खायला आवडते". द्यायचे उत्तर "म्युझिक"), "काही हॉबिज?" (खरे उत्तर "लोळायला आवडते". द्यायचे उत्तर "ट्रेकिंग"). मग मुलगी प्रश्न विचारते "तुम्हाला काही स्मोकिंग वगैरेचे व्यसन?" (खरे उत्तर "विल्स. रोज २ पाकिटे". द्यायचे उत्तर "कधीतरी करतो स्मोक एखादवेळेस. व्यसन असे नाही), तुमच्या काही हॉबिज (खरे उत्तर "पॉर्न फिल्म्स बघणे" द्यायचे उत्तर "क्रिकेट"). हे असले फालतु प्रशन विचारण्यात अर्धा तास जातो. मग चहा सुपारी दहा मिनिटे. मग मुलीचा मामा (मुलाकडे गेले असल्यास) किंवा मुलाचे वडील (मुलीकडे गेले असल्यास) "चला बराच वेळ. खुप गप्पा झाल्या. निघतो आता" म्हणुन निघतात.
__/\__ http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif __/\__ @आता पहिल्या भेटीत जर एवढेच बोलणे झाले तर दुसर्‍या भेटीची गरज असते. पण दुसर्‍यांदा भेटायचे की नाही ते कशावरुन ठरवणार? तर ते ठरते मुलाच्या पगारा वरुन आणि मुलीच्या रुपावरुन (किंवा कधीकधी तिच्याही पगारावरुन). कारण त्याहुन जास्त काही माहिती कळालेलीच नसते. दुसरी एका तासाभराची भेट होते आणि दोन अश्राप जीव जन्माचा साथीदार निवडुन किंवा नाकारुन मो़कळे होतात. काय बघणार या एका तासात आणि काय समजुन घेणार एकमेकांची आवड निवड आणि सवयी? अरेंज मेरिज हा त्यामुळेच एक चांस असतो. साधारण अंदाज घेउन अंधारात उडी मारायची. दिखावु गोष्टींना त्यामुळे महत्व येणारच. >>> ......... __/\__/\__/\__

आमच्या ओळखीतले एक उदाहरण. मुलाला पगार ७०००० तर मुलीला ३००००. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत, पण मुलाच्या आईच्या मते मुलीला मुलाच्या तुलनेत पगार खुपच कमी आहे, म्हणून स्थळ नाकारले. एक मुलगी आपल्या आईवडीलांची एकुलती एक मुलगी आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. तरीही नकार येतात. का तर कधी ना कधी मुलीच्या आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर पडेल. मुलाला जर अविवाहित बहीण असेल, तर सर्रास नकार येतो. कारण बहिणीच्या लग्नाचा खर्च त्या मुलाला करावा लागणार. मुलगा जर महाराष्ट्राबाहेर कामाला असेल(चैन्नै, कोलकाता, सिमला इ. ), तरीही नकार मिळतात.

मस्त फोडणी बसली आहे कांदे पोह्यांना............ अश्याच वेगवेगल्या डिशेस दया आम्हाला चाखायला.........

मुलीने घरात "ड स्ट बीन्स" किती असे विचारले ? म्हणजे म्हातारी माणसे.... कालाय तस्मै नमः

In reply to by ज्ञानव

येस, हे एका मित्राकडून ऐकले आहे. असल्या मुलीला असे विचारताक्षणी हाडहूड करून हाकलून लावायला पाहिजे. तीच तिची लायकी.

In reply to by बॅटमॅन

डस्टबिन्सचा हा किस्सा इतक्या वेगवेगळ्या लोकांकडून ऐकला आहे आणि इतकी वर्षं ऐकतो आहे (सहा वर्षापूर्वीही एका म्हातार्‍या बाईंनी अगदी सिरियसली असा प्रश्न वधूपक्षाकडून भर बैठकीत आल्याचं सांगितलं होतं...नंतर व्यक्ती बदलल्या पण कथा तीच.. ) की आता तिला एक पसरलेली दंतकथा म्हणायला हरकत नाही. भावी वधू किंव तिच्या नातेवाईकांच्या मनात खोलवर खरोखरच वृद्धांविषयी कितीही घृणा असेल, तरी सुरुवातीच्या फेजमधल्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी थेट वरपक्षाला "डस्टबिन्स" अशा शब्दांत प्रश्न विचारणारे वधूपालक किंवा वधू हे मूर्ख म्हणण्यापेक्षा काल्पनिकच असावेत असं लक्षात येतं.. विशेषतः घरात मोठी माणसं / वृद्ध / वयस्क कोणकोण आहेत ही माहिती काढण्यासाठी सरळ प्रश्न उपलब्ध असताना आपली तिडीक तिथल्यातिथ्थे त्या "डस्टबिन्स" च्या मुलानातवंडांसमोरच सिद्ध करण्याची हौस कोणाला असेल असं वाटत नाही.

In reply to by गवि

असा प्रश्न वधूपालक भर बैठकीत विचारीत नसावेत. विश्वास ठेवायला खरंच कठीण आहे. परंतु, भयंकर अ‍ॅटीट्यूड असणारी मुलगी लग्नाळू मुलाला सी.सी.डी.त विचारू शकते.

In reply to by प्रभाकर पेठकर

व्यक्तिगत भेटीत शक्य आहे, विशेषतः थोडा मोकळेपणा आल्यावर. पण ही पर्टिक्युलर डस्टबिन स्टोरी मात्र काल्पनिक असावी. कोणीतरी एकदा सांगितलेला शब्द लोकांना सेन्सेशनल वाटला असावा. कारण अगदी स्वतःला समोरच अनुभव आल्याप्रमाणे वेगवेगळे एकमेकांशी दुरूनही संबंधित नसलेले लोक आपापल्या नात्यात "डस्टबिन" प्रश्न विचारला गेल्याचं सांगतात.. आणि प्रश्नही तोच.. म्हणजे घटनेचे स्क्रिप्ट एकच, डायलॉग आणि पात्रे तीच.. फक्त सेट प्रत्येक वेळी वेगळा... :)

In reply to by गवि

ही पर्टिक्युलर डस्टबिन स्टोरी मात्र काल्पनिक असावी. कोणीतरी एकदा सांगितलेला शब्द लोकांना सेन्सेशनल वाटला असावा. कारण अगदी स्वतःला समोरच अनुभव आल्याप्रमाणे वेगवेगळे एकमेकांशी दुरूनही संबंधित नसलेले लोक आपापल्या नात्यात "डस्टबिन" प्रश्न विचारला गेल्याचं सांगतात.. आणि प्रश्नही तोच..
सहमत. सेन्सेशनल शब्दप्रयोगामुळेच विनासायास आणि विश्वसनिय प्रचार झाला असावा.

In reply to by बाळ सप्रे

मंग न्क्कीच खरी असेल.. त्यांचा मुलगा (किंवा जावई किंवा नणंदेच्या मावस-दीराचा मेव्हणा किंवा.....) नक्कीच अमेरिका(किंवा ऑस्ट्रेलिया किंवा....)मध्ये असेल.. (लाडू कावळा आठवला!)

अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? ' इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
ह्य ह्य ह्य.. आजच्या काळात खरंच एक मुलगी लग्नानंतर प्रत्यक्षातही अशी राहील यावर विश्वास ठेवणारा कोणी लग्नेच्छुक मुलगा असेल तर बिचारा.. ही इज इन फॉर अ ह्यू SSS ज डिसअपॉईंटमेंट..

मृत्युंजय मला काय म्हणायचं ते लक्षात घ्या . आपलं कर्तुत्व आपल्या हातात असतं. ते आपण बदलू शकतो . रूप हे जन्मताच मिळालेलं असतं . त्यात बदल करता येत नहि. काळ्याचा गोरा रंग तर अजिबात करता येत नाही . मग हि मुलगी गोरी नसणं हा तिचा गुन्हा आहे का? मुलाचं कर्तुत्व चांगलं असेल तर त्याच्या रुपाकडे फार काही लक्ष दिलं जात नाही . मग मुलगी कर्तुत्व वन असेल तर मुलं तिच्या रुपावरच का अडून बसतात हा प्रश्न आहे . काही मुलींच्या अपेक्षा त्यांची लायकी नसताना उच्च असतात. मान्य आहे पण प्रत्येक मुलगी ७ आकडी पगार, गाडी, बंगला अमेरिका वारी अश्या गोष्टींवरच अडून बसत नहि. खूप मुली adjustment करतात . पण प्रत्येक मुलाला गोरी, सुंदर बायकोच पाहिजे असते, त्या बाबतीत त्यांची adjustment ची तयारी नस्ते. मग रूपाच्या जोरावर तिने घरच्यांना नोकर सारखं वागवला तरी चलेल. पण लोकांच्या समोर मला किती सुंदर बायको मिळाली आहे ह्याचा दिखावा करायची फार हौस. आणि हे मी प्रत्यक्ष बघितलं अहे.

In reply to by म्हैस

>>पण प्रत्येक मुलाला गोरी, सुंदर बायकोच पाहिजे असते, ओव्हरस्टेटमेंट वाटत नाही का हे? उगा उचलली जीभ आणि चावला कडुलिंब असला प्रकार नका करु.

In reply to by सूड

गोरी सुंदर नसलेली बायको मार्केटात उपलब्धच नसल्याने गो.सुंदरपैकीच एक निवडावी लागत असणार.. बघ ना..हा एक नुसता शांपल आहे.. असेच याच्या वर अन खाली असलेले पानभर सर्व कॉलम्स शोधूनही गोसुंदर नसलेली वधू सापडली नाही बॉ..!! लीडिंग वृत्तपत्राची म्यारेज स्पेशल पुरवणी बरं का.. आडबाजूची नव्हे.. A

In reply to by गवि

हम्म्म्म गवि, लब्बाड! ;) अजून 'वधू/वर' च्या जाहिराती बघता काय? =))

In reply to by सूड

सूडराव माझे असे मत आहे की वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जर आपण सुंदर दिसत नसलो तर ते आपले दुर्दैव आहे. पण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपली बायको (किंवा नवरा) सुंदर नसेल तर तो आपला मूर्खपणा आहे. (ता.क .--सौंदर्याची व्याख्या ही स्थळ काल आणी व्यक्ती सापेक्ष आहे)

In reply to by म्हैस

पण प्रत्येक मुलाला गोरी, सुंदर बायकोच पाहिजे असते, त्या बाबतीत त्यांची adjustment ची तयारी नस्ते.
हे एकदम generalized statement असे नाही वाटत का तुम्हाला?
हे मी प्रत्यक्ष बघितलं अहे.
मी पण असे पुष्कळश्या जोडप्यांना प्रत्यक्ष पाहीले आहे कि नवरा गोरा/सावळा असुन बायको सावळी/काळसर आहे. तरीसुद्धा त्यांचा संसार सुखाचा चालु आहे.

हे एकदम generalized statement असे नाही वाटत का तुम्हाला?
मी स्वतः आणि माझ्या इतर मैत्रिणींना आलेले अनुभव हे ह्या statement मागच कारण अहे. हे general statement वाटू शकतं कारण generally असच घडतं
मी पण असे पुष्कळश्या जोडप्यांना प्रत्यक्ष पाहीले आहे कि नवरा गोरा/सावळा असुन बायको सावळी/काळसर आहे. तरीसुद्धा त्यांचा संसार सुखाचा चालु आहे.
हेच तर म्हणतेय मी . रंगावर संसार सुख अवलंबून नसतं . सावली बायको सुधा हुशार, समजूतदार , नेटाने संसार करू शकते तरीही अश्या मुलींना मुलं आणि त्याच्या घरच्यांकडून डावललं जातं

नुकताच असाच एक पोह्याचा अनुभव आला , (पण तिथं उप्पीट होतं :( ) आणि मी मुळात अर्जुनाच्या जागी नव्हतो , कृष्णाच्या जागी होतो "लड बेट्या" म्हणायला आपलं काय जातय ;) पण तो सगळा सीन पाहुन एकुणच "माझे पोह्याचे प्रयोग " अशी सीरीज लिहायला घ्यावी असे मनात आले आहे =)) अवांतर : मी मॅच मेकींगसाठी एक लय बेस्ट अ‍ॅल्गोरिथम तयार केला आहे , कोणी प्रॉगॅमर असतील तर साईट डेव्हलप करु ... राडा बीझीनेस आहे हा :)

मुलगी गोरी आहे म्हणजे सावळी असते. सावळी आहे म्हणजे काळी असते आणी लग्नाच्या बाजारात काळी मुलगी नसतेच. मुलीचा बांधा सडपातळ आहे म्हणजे मुलगी अंगाने बरी आहे. बांधा मध्यम आहे म्हणजे मुलगी स्थूल आहे. आणी लग्नाच्या बाजारात मुलगी स्थूल नसतेच.