Skip to main content

कांदे पोहे … एक अनुभव…

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी शुक्रवार, 29/11/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना.... आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून बसलेले बरेच जण पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले..... खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली.... सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये तेंडुलकर आउट झाल्यावर जितका उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं.... पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय.... समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई..... रोज एक नवीन कारण कळायचं.... आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार.... कधी घरात जीन्स वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ?? मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली... एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी .... तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे… अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? ' इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...." इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना …. एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित … एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या उमेदवारा इतका फरक होता… ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे… संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते… (मी बाजारात चुकून गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात ) मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला … मी - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ?? आई - अरे त्यात काय फसवलं ? मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब… आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं … रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले… अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ?? मॉर्निंग शो च्या त्या मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ?? मन शांत झालं आणि विचार चालू झालें … वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे… इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ?? खरं तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि… माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं ) मी गमतीने म्हणालो अरे १ एप्रिल ला भेटलो होतो , मग काय होणार… तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली … छान … वाटलं तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं … (विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … ) (वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल. किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती ) हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ?? पण आपण हे सगळ बघतच नाही ना लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं … पत्रिकांचे गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता … ता. क. :- सदरचा लेख लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)… वरिल लेख हा माझ्याच ब्लोग वरुन घेतल असुन चौर्य कर्म नाहि....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34018
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

=)) मज्जा आली , बाय द वे .... आम्हि कि नै शक्यतो कांदेपोहे न करता शिरा करायचो , भय्यानक साखर घालुन तोंडात घालवनार नै इतका गोड =)) पोरं गुपचुप खायची , न आइबाप तोंडं वाकडी करायचे =)) सॉल्लिड होते ते दिवस यार ... मी जाम मिस करते ... कधी कधी तर दर संडे ला पोरं बघायचा पोग्राम असायचा ... घरी बघायचा न मग मॉल मध्ये आणखी बघाय जायचं =)) आत्ताहि बघते म्हणा , पण ती मजा नै :-/

बरचंसं पटणारं आणि सहृदयतेने लिहिलेलं..

काय राव ...एका लेखातच आटोपतं घेतलं? आम्हाला वाटले आता त्या दुसर्‍या सायटीसारखी जंबो डेली सोप वाचायला मिळणार..

माझ्या पहिल्याच लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार....

वाचायला मजा आली. क्रमश: वाचायला आणखी मजा आली असती.

भरुन वगैरे आल हो चिन्मय! दिसण्यावरुन जे मुली नाकारतात ना त्यांना माझा एकच सवाल," ती लेडी डायना एखाद्या स्वप्नापेक्षा सुंदर होती. मग का नाही तिचा संसार सुखाचा झाला?" अर्थात येथे तिचा काही दोष नाही पण लावायचाच म्हंटला क्रायटेरिया तर दिसण्यावरुन ती जगातली अतिशय सुखी बाई हवी होती.

In reply to by स्पंदना

बास का ओ, दिसण्यावरून तर मुलीही नाकारतात मुलांना. ;) बाकी डायना सुंदर होतीच पण नॉट "स्वप्नापेक्षा सुंदर". मधुबालेची सर/मॅडम तिला नाही आज्याबात!

In reply to by बॅटमॅन

"बास का ओ, दिसण्यावरून तर मुलीही नाकारतात मुलांना." "इंग्लिश फ्लुएंट" आले नाही तरी पण...हॉटेलात भेटल्यावर मुलाने बील ५०-५० केल्यावर पण च्यायला काहीही मनाचे श्लोक असतात पोरींचे

In reply to by टवाळ कार्टा

हम्म्म! बदल करायला हवा. पण बायका सोडुन गेलेल्या उदाहरणे नाहीत हो माझ्याकडे. तरीही नुसत्या दिसण्यावरुन जोडीदार नाकरणार्‍यांना...अस म्हणु या.

In reply to by स्पंदना

तरीही नुसत्या दिसण्यावरुन जोडीदार नाकरणार्‍यांना...अस म्हणु या. >> हा हा हा तुला आश्चर्य वाटेल या गोष्टीच ....तिच माझ्यावर प्रेम होत ( हं विचार ! चिचार !! माझ कितव होत), हे तिने कबुल ही केले होत आणि लग्नाला नकार का द्याव माहीत आहे का ? माझी उंची जास्त आहे म्हणुन =)) मी चक्कर उएवुन पडलो होत हे एकुन

In reply to by सुहास..

उची जास्त आहे? काय? काय?? काय??? कारण तरी काय द्यावं म्हणते मी. बाकी सुहास....उठसुठ प्रेमात पडण चांगल नाही हो.

In reply to by स्पंदना

Stuart: Are you crazy? That helmet’s signed by Robert Downey Jr. Leonard: So? Stuart: Okay, if you’re going to question the importance of an actor’s signature on a plastic helmet from a movie based on a comic book, then all of our lives have no meaning!

अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? ' इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...." इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….
याच मुलीला का नाही पसंत केलंत मग ? का ती दिसायला फारशी चांगली न्हवती ? ;) चेष्टाहो हलके घ्या.

@कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या उमेदवारा इतका फरक होता…>>> =))

माझ्या मित्रासाठी स्थळं सांगून येत होती त्यांच्या अपेक्षा (??) ऐकून डोक्याचे स्क्रू फिरायची वेळ आली होती त्याला. उदाहरणार्थः मुलगा अमेरिकेत`च' पाहिजे (फारंच साधी अपेक्षा) मॅनेजर किंवा त्यावरील डेसिग्नेशन हवं (स्वतः बँकेत क्लर्क) किमान १ लाख रुपये महिना `टेक होम' पाहिजे (राग युक्त हशा - `ल्लायकी आहे का रे...' (तो मला विचारी)) वडील बिजनेसमन हवेत (लाँग टर्म विचार आहे या मुलीचा) `पॅकेज' चांगलं हवं म्हणजे १५ किंवा त्यापुढेच. पर्क म्हणून गाडी असावी. (हे मागणारी स्वतः एक `पार्सल' होती हा भाग वेगळा) यावर खरं तर एक दिवस सविस्तर लिहायचंय. बघू. पण तुमच्या लेखांतील शेवटच्या विचाराशी काही अंशी सहमत. `गुण' कितीही जुळले तरी नंतर `गुण' दिसायला लागल्याची उदाहरणं अनेक आहेत. तेंव्हा हा `गुणा'कार जपून करायला हवा.

बघण्याचा कार्यक्रमांचा पूर्वानुभव नाही , लेख फार आवडला

या निमित्तानी गेल्या सहा वर्षात आमच्या "झालेल्या" मुलाखतींचा ढोबळ ग्राह्यांश-- प्रत्यक्ष संवाद रुपात... ते-(हे जे ते असतात..ते तिचे वडील काका मामा इत्यादिंपैकी बोलायची धमक असलेले,असे निवडून अणलेले असतात.)......... प्राथमिक प्रश्न झाल्यानंतर.. ते- गेली किति वर्ष हे काम करताय आपण? आंम्ही- १६ वर्ष.. ते- अस्सं... घर तुमचं एकट्याचच आहे का? आंम्ही- हो! फक्त पुढची ११वर्ष एका बँकेचा सहभाग आहे त्यात! ते- हॅ..हॅ..हॅ.. रोखठोक हं अगदी..चालायचच.. काळाची गरज आहे ती! ही आर्थिक चाचपणी झाल्यावर तिचे प्रत्यक्ष किंवा या "बोलवित्या" कडून आधीच तयार ठेवलेले अप्रत्यक्ष/आडून येणारे प्रश्न सुरु होतात. त्यातला शालेय शिक्षण किती? हा व्यावसाईकाच्या आयुष्यातला निरर्र्थक प्रश्न विचारला जातो... आंम्ही- "दहावी ना'पास" असे उत्तर दिले की.. १२वी अथवा बि.कॉम. असतं तर बरं..असं तक्रारवजा उत्तर येतं..आपल्या मनात त्यावेळी (कश्शा...ला....??????) असा जोरदार अवाज येत असतो. नंतर ह्या धंद्याशिवाय "दुसरं" काही "करत" नाही का? हा एक प्रश्न असतो... हा प्रश्न-भटजी...फोटोग्राफर..अचारी...फास्ट्फूड व्यावसाईक..छोटे दुकानदार..न्हावी...टेलर...अश्या सर्व छोट्या व्यावसाईकांना येतोच! कारण मूळ व्यवसाय सामाजिक प्रतिष्ठेच्या समजांनुसार बेटिव्यवहारासाठी "टुकार" कॅटॅगरीत मोडत असल्यामुळे..त्यावर हे "दुसरं" कलम "हवं" असतं... म्हणजे आमच्या सारखा भटजी असेल,तर चांगल्या उत्पन्नाचा मूळ स्रोत लपवून-"चांगला विमा एजंट आहे,आणी(राहिल्या वेळात) भिक्षुकी सुद्धा करतो" हे सांगायला हवं असतं.

असो...!

सहजिवनासाठी हवे असलेले- "अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो... तो विवाहच काय? खराखुरा शरीर-संग'ही नव्हे... या मतावर (वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण पहाता) आंम्ही ठाम आहोत! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

... तो विवाहच काय?
*drinks* इथे आल्यापासनं हेच सांगतोय!

In reply to by संजय क्षीरसागर

बघा कशी गंमत आहे. आंम्ही सांगतो,ते कसं चटकन समजतं! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हा प्रश्न-भटजी...फोटोग्राफर..अचारी...फास्ट्फूड व्यावसाईक..छोटे दुकानदार..न्हावी...टेलर...अश्या सर्व छोट्या व्यावसाईकांना येतोच
वेदना, ठुसठुस जाणवली...कारण अस्मादिकही त्यातून गेले आहेत. पण आता बर चाललंय ना सगळे! त्यातच आनंद मानायचा झाल!!!

खुसखुशीतपणा आवडला.. आणि प्रामाणिकपणे मांडलेले विचारही पटले.. दिसणे अगदीच विजोड जोडी दिसू नये इतपतच असावे, पण ते तितपत असावे हे देखील खरे. बाकी गुण-स्वभाव कळायला आणि जुळायला लवमॅरेज बेस्ट, ते देखील आधी मैत्री आणि नंतर त्याचे प्रेमात रुपांतर होणे आणखी बेस्ट. अन्यथा डायरेक्ट प्रेमात पडतानाही दिसण्याचे आकर्षणच जास्त काम करून जाते. आंतरजालावर सोशलसाईटवर मैत्री मग भेटून ती मैत्री वाढणे अन अलगद प्रेमात रुपांतर हे मला जास्त आयडियल वाटते. माझे असेच झालेय आणि विश्वास ठेवा यासाठी खूप नशिबवान समजतो स्वताला.

In reply to by तुमचा अभिषेक

माझ्या ओळखीत एक मुलगी अशीच सोशल साईटवरून गप्पा होऊन एकाच्या प्रेमात पडली. दोघेही बेंगलोरमधे रहातात असं कळलं, मग गाठीभेटी झाल्या. मुलीने त्याच्याशी लग्न करणार म्हणून हट्ट धरला. तिचे वडील आमच्या बँकेत मोठ्या पदावर होते. या मुलाचा त्याना संशय आला, पण त्यांच्या विरोधाला न ऐकता ते लग्न झालं. लग्नात मुलाच्या बाजूचे कोणी आले नाहीत. कोणाचा तरी मृत्यू झाला असं कारण सांगितलं गेलं. ३-४ महिने संसार झाला. नवरा अधून मधून बिझिनेसच्या निमित्ताने कुठे कुठे जातो असं सांगायचा. ती मुलगी डेंटिस्ट्री शिकत होती. प्रेग्नंटही झाली. आणि अचानक एक दिवस ती चेक अपला गेली असताना नवरा तिचे सगळे दागिने, घरातले पैसे घेऊन गायब झाला. आल्बममधे स्वतःचा एकही फोटो ठेवला नव्हता. पोलीस चौकशी सगळं झालं. मुलीचे काका कर्नाटकातील राजकारणात बडी आसामी. पण काही उपयोग झाला नाही. त्या नवर्‍याने जो पत्ता, कंपनी वगैरे सांगितलं होतं, तिथे या वर्णानाचा कोणी माणूस कधीही नव्हता असं निष्पन्न झालं. नंतर तिच्या वडिलांनी तिला बराच आधार दिला. आज ती डेंटिस्ट झाली आहे. एक छान मुलगा आहे. पण तिच्या आयुष्यात हा धक्का बसला त्यामुळे आता कधीही लग्न करणार नाही म्हणते. :(

In reply to by संजय क्षीरसागर

२०/२१ वर्षाच्या मुलीला जगाचा कितीसा अनुभव असणार आहे? आणि ३/४ महिने घर चालवण्याइतके पैसे तो कुठूनतरी आणत होता. लवकरच घरच्यांना भेटायला गावाला जाऊया असेही सांगत होता.

In reply to by पैसा

फसणारे खरे तर कुठेही फसतात, अरेंज मॅरेज असो वा मॅरेज साईटवरना जमलेले असो, बाकी काळजी घ्यायची म्हटल्यास सोशलसाईटसवर आपले प्रोफाईल लॉक करून कोणत्याही अनोळखी इसमास एंटरटेन न करणार्‍या मुली देखील असतातच की, याउलट स्वताच अनोळखी मुलांनी आपल्या फोटोला लाईक केले तर लगेच हुरळून त्याच्याशी मैत्री करणार्‍याही असतात, माझा मुद्दा फक्त नाते कसे टप्प्याटप्प्याने उलगडत जाणे चांगले हा होता. आंतरजालावर झालेल्या मैत्रीनंतर तर एकमेकांना न भेटता त्या प्रोफाईलवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे लग्नाचा निर्णय घेणे अपेक्षित नसतेच.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

सोशल साईट मुळे घडलेला एक शॉट आठवला…फ्रॉपर नामक एका डेटिंग साईटवरून एका पोरीची ब्लाइंड डेट मिळाली होती…सुरळीत पारही पडली. नंतर जवळपास १ वर्षांनी त्याच मुलीची पत्रिका आली होती घरी, पत्रिका जुळली नाही म्हणून कांदे-पोहे टळले…समोरासमोर आलो असतो तर कैतरी भारी सीन झाला असता नक्की :)) पैल्याच डेटला एनआयबीएन च्या सुफिज ला 'बसलो' होतो…आणि नंतर तीने त्याच ग्रुप मध्ये असलेल्या २-३ मित्रांना डेट केलं …एकंदर पोरगी वाढीव होती.

In reply to by मालोजीराव

काही झेपले नाही. मुलीबद्दल नकारात्मक सूर वाटला. डेट ला गेली म्हणून, "बसली" होती म्हणून की नंतर २-३ मित्रांना डेट केले म्हणून? कारण यातील २ गोष्टी तुम्ही पण केल्या होत्या आणि संधी मिळाली असती तर तिसरी पण केली असती (किंवा केली असेलही). शिवाय ते वाढीव प्रकरण नाही कळले.

In reply to by तुमचा अभिषेक

जनरली स्वभावापेक्षाही सवयी कळणे महत्वाचे म्हणजे घरभर पसारा करणारा किंवा करणारी अशी सवय असलेले जर एकत्र आले तर होणारी भांडणे का होतात? सवय वाईट म्हणून कि १०००००००००००.....एन टाइम्स सांगूनही सवय ना बदलण्याच्या स्वभावामुळे ..... लोच्या आहे राव....लग्न म्हणजे आतल्या बाजूला उघडणारी झडप आहे आणि आम्ही "झडप घालून" लग्न केले ना आता बसलोय....जाऊ द्यात झाले.

मला एक भेटली होती स्त्री पुरुष समानतावाली. मला पहिल्या भेटीतच तिने सांगितले की ती जीन्स घालते, ट्रेक्स करते वगैरे.. मला त्यात काही प्रोब्लेम नव्हता. मला जोपर्यंत ट्रेकला यायचा आग्रह करत नाही तोपर्यंत मी सुखी राह्यलो असतो... मग नेहेमीचे दोन प्रष्ण केले तिने.. सिगारेट पिता का.. आणि पिता का ? मी दोन्ही प्रष्णाला " हो" असे सांगितले. त्यावर ती वैतागले असावी. तिने पुढे विचारले की " का पिता ?" मी प्रामाणिकपणे सांगितले की " सिगारेट पितो ती व्यसन म्हणून... दारू आवड म्हणून " मग मी तिला विचारले.. " तुम्ही पिता का सिगारेट आणि दारू? " तर भडकली. मग सांगायला लागले की ताई जसं तू मला बघतेयस तसं मीही तुला बघतोय... गेली शेवटी एकदाची.

होतकरू तरुणांना फुकटचा पण मोलाचा सल्ला.... कांपोच्यावेळेस हातचे काहीही राखून ठीऊ नका.. भिडस्त वागू नका... समोरची किंवा समोरचा आपल्या आयुष्यात येऊन मोठे उपकार करणार आहे असे समजू नका... पूर्ण कॉन्फिडन्स आल्यावरच होकार किंवा नकार द्या...

Do you remember 'THAT' tingling feeling when you took the decision to get married? he he he he ... That was your COMMON SENSE leaving your body...

पण पसंत कोठली केलीस? यातलीच का अजुन कांदेपोहे कार्यक्रम करुन?????????? :)

प्रतिसाद वाचून करमणूक झाली आणि समाधान पण वाटले …. धन्यवाद मित्रहो…. पुढील लेख लवकरच ….

वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात बघितली कि त्यात पहिली अपेक्षा असते ती मुलगी गोरी आणि सुन्दरच असावी . एखादी मुलगी गुणवान , चांगली नोकरी करणारी आहे, इतर अपेक्षात बसत आहे पण सावळी असेल तर तिला नाकारल जात . काही लोक तर इतके mannersless असतात कि सरळ वाकडं तिकडं तोंड करतात . मग मुलगा अगदी कोळशासारखा काळा , जाडा , बुटका , टकला किवा कितीही कुरूप का असेना सौंदर्याच्या बाबतीत त्याची अपेखा मात्र उच्च असते .

In reply to by म्हैस

आणि बर्‍याच मुलीही स्वतः यःकश्चित असल्या तरी मुलाकडून अपेक्षा मात्र सात आकडी पगार, तिशीच्या आत पुण्यासारख्या शहरात स्वतःचे घर, इ.इ. असतात.

In reply to by बॅटमॅन

ते चार चाकी आणि अमेरिकावारी/नोकरी राहील की वो ! आणि
स्वतःचे घर
साधसुधं नाही काही. किमान २-BKH.

In reply to by बॅटमॅन

आणि बर्‍याच मुलीही स्वतः यःकश्चित असल्या तरी मुलाकडून अपेक्षा मात्र सात आकडी पगार, तिशीच्या आत पुण्यासारख्या शहरात स्वतःचे घर, इ.इ. असतात.
हायला , अशा पोरी तुम्हालाच कशा भेटतात .... मला का भेटत नाहीत ??

In reply to by म्हैस

@ काही लोक तर इतके mannersless असतात कि सरळ वाकडं तिकडं तोंड करतात . मग मुलगा अगदी कोळशासारखा काळा , जाडा , बुटका , टकला किवा कितीही कुरूप का असेना सौंदर्याच्या बाबतीत त्याची अपेखा मात्र उच्च असते. >>> येस्स!!! अश्या केसेस भरपूर पाहिल्या आहेत. किंबहुना रंगरूपाचं सोडा,गृहस्थाश्रमाच्या दृष्टीनं अगदी ना-लायक असलेल्या काही मुलांचे आई/वडील,मुलगी मात्र कतृत्ववान/देखणी वगैरे विसंगत अपेक्षा ठेऊन असल्याचंही पाहीलय!
पण.....!
@वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात बघितली कि त्यात पहिली अपेक्षा असते ती मुलगी गोरी आणि सुन्दरच असावी . एखादी मुलगी गुणवान , चांगली नोकरी करणारी आहे, इतर अपेक्षात बसत आहे पण सावळी असेल तर तिला नाकारल जात . >>> कुठलीही?????? कुठल्याही(म्हणजे प्रत्येक असाच अर्थ होतो) जाहिरातीत "ह्याच" अपेक्षा असतात.????? कुठल्याही?????

In reply to by म्हैस

मला असं सांगा अपेक्षा लिहिताना कोणी "मुलगी काळी, जाडी, सोडावॉटरच्या बाटल्यांच्या चष्मेवाली, कुरुप आणि आळशी हवी. शाळेत गेलेली नसल्यास उत्तम. " च्यामारी अपेक्षा अश्याच असतात. मुली तरी अपेक्षा लिहिताना " ढोल्या, दारुडा, व्यसनी, वेश्यागमनी, बेकार असावा." असे लिहितात का? लिहिताना हे असेच लिहितात. एकदा लग्नाच्या बाजारात आले की बरोबर अवास्तव अपेक्षा दूर सारल्या जाउन योग्य ती तडजोड केली जाते (करावी लागल्यास). लग्नात नेहमीच मुलीचे रुप आणि मुलाचा पगार बघितला जातो. दोघेही कमावते असले तरीही मुलाचा पगार भरपुर असावा अशी अपेक्षा असते. मग तो कुरुप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नौकरी करणारीच मुलगी हवी असा जरी आग्रह असला तरी मुलगी सुंदर असेल तर तिच्या नौकरी न करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कितीही कंठरवाने सांगितले तरी काही गोष्टी बदलत नाहितच. आणि अरेंज मॅरिज मध्ये काय डोंबलाचे कळते स्वभावाबद्दल? किती भेटी होतात दोघांच्या? दुसर्‍याच्या वर तिसरी भेट घ्यायचे म्हटले तर लोकांच्या भुवया उंचावतात. पहिली भेट बहुतेक वेळा सगळ्या घरच्यांबरोबर असते. बहुतेक वेळेस कोंडी फोडण्यासाठी मोठी माणसे जे गप्पा सुरु करतात ते तासभर चालते. मग त्यात "वहिनी तुमचे माहेर आंबेजोगाईचे वाटते? वा वा.माझ्या नणंदेच्या जावेची बहिण असते तिकडे क्षक्षक्ष नावाची. तुम्ही ओळखता का त्याना?" इतपत विषय निघतात. मग दोघी बायका त्या नणंदेच्या जावेच्या बहिणीबद्दल गप्पा चालु करतात. " खुप चांगली माणसे हो. बाळासाहेब म्हणजे तर लाखात एक. मुलगाही चांगला शिकला आहे त्यांचा. फार्मसी टाकणार म्हणतोय....". इथे ज्याचे लग्न ठरवायचे तो मुलगा बेचैन की साले आता आत्याच्या जावेच्या बहिणीच्या मुलाशीच लग्न लावतात की काय मुलीचे. यथावकाश. आलेल्या १०-५ मंडळींपैके एखाद्याची ट्युब पेटते तासाभराने की मुलगा आणि मुलगी अजुन बोलले नाही आहेत. मग पेटंट वाक्य "तुम्हाला दोघांनाही एकमेकांना काही विचारायचे असेल तर विचारा हा. आमचे काय असेच तासभर बोलणे चालु राहिल. " हो ना नाही म्हणता म्हणता किती ओळखी निघतात नाही" (याचा सूचक अर्थ असा की खोटी माहिती नका हं सांगु. आमच्याकडे रिसॉर्सेस आहेत माहिती मिळवण्याचे) या मधल्या एका तासात मुलगा अधुन मधुन मुलीकडे बघत असतो आणि अधुन मधुन गप्पांमध्ये भाग घेत असतो. अगदीच शिष्ट नको वाटायला म्हणुन. मुलगी अधुन मधुन मुलाकडे बघते. उरलेला वेळ ती मुलाचे केस विरळ होत चाललेत, वजन थोडे जास्त वाटते आहे, टीपॉय चे कव्हर सुंदर आहे, एल सी डी दिसतोय. पण २६" च आहे, सासू भलतीच टापटीपीची दिसतिये (किंवा गबाळी दिसतिये), कार्पेट घातलेले दिसतय (फरश्या जुन्या असणार), गॅलरीत फुलझाडे लावलेली दिसताय (ते फूल जरबेरा की डेलिया?), बिस्कीटे ठेवली आहेत खावे की न खावे अश्या विचारात मग्न असते. हे सगळे मुलीकडचे मुलाकडे आले असतील तर. मुलाकडचे मुलीकडे आले असतील तर ती अधुन मधुन कोणाचे लक्ष नाही असे बघुन हॉल आणि आतल्या खोलीतल्या चौकटीमध्ये उभ्या असलेल्या बहिणीकडे / आत्याकडे वगैरे बघुन डोळ्यांनी काही अगम्य खाणाखुणा चललेल्या असतात. ते जर मुलाने बघितले तर त्याचा अर्थ तो "मुलगा यडचाप आहे. आजकाल कोणालाही बोलावतात बाबा" असाच लावतो. मग तासाभराने जेव्हा मुला मुलींना बोलायची सूचना केली जाते त्यावेळेस एकदम १०-१२ लोक दोघांकडे टकामका पहायला लागतात, पहिला प्रश्न कोण टाकणार म्हणुन. बहुतेक वेळेस मुलगी फक्त लाजुन नाही म्हणुन मान हलवते किंवा शुंभासारखी मख्ख बघत बसते. पहिला प्रश्न मुलानेच विचारावा ही अपेक्षा असते. अपेक्षेनुसार मुलगा काहितरी विचारतो. बहुतेक वेळेस नाव माहिती असते (एकदा मी ते पण विसरलो होतो. काहि केल्या नाव आठवेना त्या मुलीचे. बर तिचे आईवडील पण "आमची ही" असाच उल्लेख करत होते.). त्यामुळे अपेक्षेनुसार प्रश्न "कुठल्या कॉलेजात होतीस तु?" असा असतो. हा सगळ्यात सेफ प्रश्न. "लग्नानंतर जॉब करणारेस की नाही" हा प्रश्न खुप स्फोटक ठरु शकतो. मग पुढचा प्रश्न " --- ची बॅच न तुमची?" मग असलेच थातुर मातुर प्रशन " काय आवडते?" (खरे उत्तर "खायला आवडते". द्यायचे उत्तर "म्युझिक"), "काही हॉबिज?" (खरे उत्तर "लोळायला आवडते". द्यायचे उत्तर "ट्रेकिंग"). मग मुलगी प्रश्न विचारते "तुम्हाला काही स्मोकिंग वगैरेचे व्यसन?" (खरे उत्तर "विल्स. रोज २ पाकिटे". द्यायचे उत्तर "कधीतरी करतो स्मोक एखादवेळेस. व्यसन असे नाही), तुमच्या काही हॉबिज (खरे उत्तर "पॉर्न फिल्म्स बघणे" द्यायचे उत्तर "क्रिकेट"). हे असले फालतु प्रशन विचारण्यात अर्धा तास जातो. मग चहा सुपारी दहा मिनिटे. मग मुलीचा मामा (मुलाकडे गेले असल्यास) किंवा मुलाचे वडील (मुलीकडे गेले असल्यास) "चला बराच वेळ. खुप गप्पा झाल्या. निघतो आता" म्हणुन निघतात. या पावणे दोन - दोन तासात. मुलगा - मुलगी फारतर २०-२५ मिनिटे बोलतात तेही अगदी फालतू. "स्वयंपाक येतो का?" हा कळीचा प्रश्न अजुन पोतडीतुन निघालेला नसतो. म्हणजे मुलगा नाही विचारत. त्याला विचारायचा असतो पण नाही विचारत. अपेक्षा मुलीला स्वयंपाक यावा आणि तिने आवडीने करावा अशीच असते. न जाणो ही म्हणायची "मला नाही येत. तुच घे शिकुन" म्हणजे सगळीच बोंब. आईने विचारल्यावर मुलीची आईच उत्तर देते "आजकाल कोण करते हो. सगळ्या कामांना बाया असतात" ( "मुलगी कटाप" इति मुलाची आई) किंवा "सगळे येते हो. करण्याची आवड आहे" (मनात "ऐक कार्टे कानीकपाळी ओरडुन सांगत असते ना की बटाट्याची भाजी तरी शिकुन घे म्हणून" किंवा "एकदा लग्न होउन जाउ द्यात कळेलच तुम्हाला") आता पहिल्या भेटीत जर एवढेच बोलणे झाले तर दुसर्‍या भेटीची गरज असते. पण दुसर्‍यांदा भेटायचे की नाही ते कशावरुन ठरवणार? तर ते ठरते मुलाच्या पगारा वरुन आणि मुलीच्या रुपावरुन (किंवा कधीकधी तिच्याही पगारावरुन). कारण त्याहुन जास्त काही माहिती कळालेलीच नसते. दुसरी एका तासाभराची भेट होते आणि दोन अश्राप जीव जन्माचा साथीदार निवडुन किंवा नाकारुन मो़कळे होतात. काय बघणार या एका तासात आणि काय समजुन घेणार एकमेकांची आवड निवड आणि सवयी? अरेंज मेरिज हा त्यामुळेच एक चांस असतो. साधारण अंदाज घेउन अंधारात उडी मारायची. दिखावु गोष्टींना त्यामुळे महत्व येणारच.

In reply to by मृत्युन्जय

ह ह पु वा! जरा आउटडेटेड वर्णन आहे.. पण जे आहे ते क्लास आहे!!!! फक्त या प्रतिसादासाठी धागा वसू!!!!! मूळ लेखन ठिकठाक!

In reply to by मृत्युन्जय

यावरुन एक सुभाषित आठवलं, पुनरुल्लेख होत असेल कदाचित पण लिहील्यावाचून राहवत नाहीये. तर सुभाषित असं, कन्या वरयते रुपम् । माता वित्तम् पिता श्रुतम्॥ बान्धवा: कुलमिच्छन्ति। मिष्टान्नम् इतरे जना: ॥ मुलगी जोडीदार निवडताना प्रथम त्याचं रुप बघते, (मुलीची)आई पैसा आणि (मुलीचे)वडील त्याचे गुण-अवगुण बघतात. (मुलीच्या)भावंडांना त्या मुलाचं घराणं बर्‍यापैकी असावं अशी अपेक्षा असते. बाकीच्या लोकांना फक्त मिष्टान्न मिळाल्याशी मतलब असतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

मग तासाभराने जेव्हा मुला मुलींना बोलायची सूचना केली जाते त्यावेळेस एकदम १०-१२ लोक दोघांकडे टकामका पहायला लागतात, पहिला प्रश्न कोण टाकणार म्हणुन. बहुतेक वेळेस मुलगी फक्त लाजुन नाही म्हणुन मान हलवते किंवा शुंभासारखी मख्ख बघत बसते. पहिला प्रश्न मुलानेच विचारावा ही अपेक्षा असते. अपेक्षेनुसार मुलगा काहितरी विचारतो. बहुतेक वेळेस नाव माहिती असते (एकदा मी ते पण विसरलो होतो. काहि केल्या नाव आठवेना त्या मुलीचे. बर तिचे आईवडील पण "आमची ही" असाच उल्लेख करत होते.). त्यामुळे अपेक्षेनुसार प्रश्न "कुठल्या कॉलेजात होतीस तु?" असा असतो. हा सगळ्यात सेफ प्रश्न. "लग्नानंतर जॉब करणारेस की नाही" हा प्रश्न खुप स्फोटक ठरु शकतो. मग पुढचा प्रश्न " --- ची बॅच न तुमची?" मग असलेच थातुर मातुर प्रशन " काय आवडते?" (खरे उत्तर "खायला आवडते". द्यायचे उत्तर "म्युझिक"), "काही हॉबिज?" (खरे उत्तर "लोळायला आवडते". द्यायचे उत्तर "ट्रेकिंग"). मग मुलगी प्रश्न विचारते "तुम्हाला काही स्मोकिंग वगैरेचे व्यसन?" (खरे उत्तर "विल्स. रोज २ पाकिटे". द्यायचे उत्तर "कधीतरी करतो स्मोक एखादवेळेस. व्यसन असे नाही), तुमच्या काही हॉबिज (खरे उत्तर "पॉर्न फिल्म्स बघणे" द्यायचे उत्तर "क्रिकेट"). हे असले फालतु प्रशन विचारण्यात अर्धा तास जातो. मग चहा सुपारी दहा मिनिटे. मग मुलीचा मामा (मुलाकडे गेले असल्यास) किंवा मुलाचे वडील (मुलीकडे गेले असल्यास) "चला बराच वेळ. खुप गप्पा झाल्या. निघतो आता" म्हणुन निघतात.
__/\__ http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif __/\__ @आता पहिल्या भेटीत जर एवढेच बोलणे झाले तर दुसर्‍या भेटीची गरज असते. पण दुसर्‍यांदा भेटायचे की नाही ते कशावरुन ठरवणार? तर ते ठरते मुलाच्या पगारा वरुन आणि मुलीच्या रुपावरुन (किंवा कधीकधी तिच्याही पगारावरुन). कारण त्याहुन जास्त काही माहिती कळालेलीच नसते. दुसरी एका तासाभराची भेट होते आणि दोन अश्राप जीव जन्माचा साथीदार निवडुन किंवा नाकारुन मो़कळे होतात. काय बघणार या एका तासात आणि काय समजुन घेणार एकमेकांची आवड निवड आणि सवयी? अरेंज मेरिज हा त्यामुळेच एक चांस असतो. साधारण अंदाज घेउन अंधारात उडी मारायची. दिखावु गोष्टींना त्यामुळे महत्व येणारच. >>> ......... __/\__/\__/\__

आमच्या ओळखीतले एक उदाहरण. मुलाला पगार ७०००० तर मुलीला ३००००. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत, पण मुलाच्या आईच्या मते मुलीला मुलाच्या तुलनेत पगार खुपच कमी आहे, म्हणून स्थळ नाकारले. एक मुलगी आपल्या आईवडीलांची एकुलती एक मुलगी आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. तरीही नकार येतात. का तर कधी ना कधी मुलीच्या आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर पडेल. मुलाला जर अविवाहित बहीण असेल, तर सर्रास नकार येतो. कारण बहिणीच्या लग्नाचा खर्च त्या मुलाला करावा लागणार. मुलगा जर महाराष्ट्राबाहेर कामाला असेल(चैन्नै, कोलकाता, सिमला इ. ), तरीही नकार मिळतात.

मस्त फोडणी बसली आहे कांदे पोह्यांना............ अश्याच वेगवेगल्या डिशेस दया आम्हाला चाखायला.........

मुलीने घरात "ड स्ट बीन्स" किती असे विचारले ? म्हणजे म्हातारी माणसे.... कालाय तस्मै नमः

In reply to by ज्ञानव

येस, हे एका मित्राकडून ऐकले आहे. असल्या मुलीला असे विचारताक्षणी हाडहूड करून हाकलून लावायला पाहिजे. तीच तिची लायकी.

In reply to by बॅटमॅन

डस्टबिन्सचा हा किस्सा इतक्या वेगवेगळ्या लोकांकडून ऐकला आहे आणि इतकी वर्षं ऐकतो आहे (सहा वर्षापूर्वीही एका म्हातार्‍या बाईंनी अगदी सिरियसली असा प्रश्न वधूपक्षाकडून भर बैठकीत आल्याचं सांगितलं होतं...नंतर व्यक्ती बदलल्या पण कथा तीच.. ) की आता तिला एक पसरलेली दंतकथा म्हणायला हरकत नाही. भावी वधू किंव तिच्या नातेवाईकांच्या मनात खोलवर खरोखरच वृद्धांविषयी कितीही घृणा असेल, तरी सुरुवातीच्या फेजमधल्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी थेट वरपक्षाला "डस्टबिन्स" अशा शब्दांत प्रश्न विचारणारे वधूपालक किंवा वधू हे मूर्ख म्हणण्यापेक्षा काल्पनिकच असावेत असं लक्षात येतं.. विशेषतः घरात मोठी माणसं / वृद्ध / वयस्क कोणकोण आहेत ही माहिती काढण्यासाठी सरळ प्रश्न उपलब्ध असताना आपली तिडीक तिथल्यातिथ्थे त्या "डस्टबिन्स" च्या मुलानातवंडांसमोरच सिद्ध करण्याची हौस कोणाला असेल असं वाटत नाही.

In reply to by गवि

असा प्रश्न वधूपालक भर बैठकीत विचारीत नसावेत. विश्वास ठेवायला खरंच कठीण आहे. परंतु, भयंकर अ‍ॅटीट्यूड असणारी मुलगी लग्नाळू मुलाला सी.सी.डी.त विचारू शकते.

In reply to by प्रभाकर पेठकर

व्यक्तिगत भेटीत शक्य आहे, विशेषतः थोडा मोकळेपणा आल्यावर. पण ही पर्टिक्युलर डस्टबिन स्टोरी मात्र काल्पनिक असावी. कोणीतरी एकदा सांगितलेला शब्द लोकांना सेन्सेशनल वाटला असावा. कारण अगदी स्वतःला समोरच अनुभव आल्याप्रमाणे वेगवेगळे एकमेकांशी दुरूनही संबंधित नसलेले लोक आपापल्या नात्यात "डस्टबिन" प्रश्न विचारला गेल्याचं सांगतात.. आणि प्रश्नही तोच.. म्हणजे घटनेचे स्क्रिप्ट एकच, डायलॉग आणि पात्रे तीच.. फक्त सेट प्रत्येक वेळी वेगळा... :)

In reply to by गवि

ही पर्टिक्युलर डस्टबिन स्टोरी मात्र काल्पनिक असावी. कोणीतरी एकदा सांगितलेला शब्द लोकांना सेन्सेशनल वाटला असावा. कारण अगदी स्वतःला समोरच अनुभव आल्याप्रमाणे वेगवेगळे एकमेकांशी दुरूनही संबंधित नसलेले लोक आपापल्या नात्यात "डस्टबिन" प्रश्न विचारला गेल्याचं सांगतात.. आणि प्रश्नही तोच..
सहमत. सेन्सेशनल शब्दप्रयोगामुळेच विनासायास आणि विश्वसनिय प्रचार झाला असावा.

In reply to by बाळ सप्रे

मंग न्क्कीच खरी असेल.. त्यांचा मुलगा (किंवा जावई किंवा नणंदेच्या मावस-दीराचा मेव्हणा किंवा.....) नक्कीच अमेरिका(किंवा ऑस्ट्रेलिया किंवा....)मध्ये असेल.. (लाडू कावळा आठवला!)