Skip to main content

विहिरींत पाव

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 28/11/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. Inquisition Cruelty युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते. एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही. आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.
अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.
असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.

वाचने 51564
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

विहिरीत पाव टाकला असता तो पाण्यात बुडेल की तरंगेल?

ईतिहास प्रेमी /तसेच अभ्यासक मंडळींच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

अ.का.प्रियोळकरांच्या गोवा इन्क्विझिशन नामक अप्रतिम पुस्तकात याबद्दल काही माहिती वाचल्याचे आठवते. घरी जाईन तेव्हा त्यात पाहून सांगेन.

गोव्यामधील जी देखणी मोठमोठाली चर्चेस आहेत, त्यांच्या तळघरांत तुम्ही लेखात नमूद केले आहे तसे छळ होत असत, हे तर खरेच...

In reply to by यशोधरा

नुकताच प्रसिद्ध इतिहास संकलक श्रीदत्त राऊत ह्यांच्यासोबत वसई-पालघर परिसरातील १६ गडकोटांचा ट्रेक केला. ह्या छळाविषयी बोलताना ते इतकेच म्हणाले की कशाप्रकारे अनन्वित छळ झाला ते ऐकणे सुद्धा क्लेशदायी आहे आणि तुम्हा लोकांसोबत बरीच लहान मुले असल्याने मी ह्या बाबत मोजकेच बोलेन. पण धर्माच्या नावाखाली अतिशय पाशवी छळ केला गेला हे सत्य आहे.

माझ मुळ गाव विरार आहे. तिथले 'कुपारी' लोक "आम्ही विहीरीत पाव टाकल्याने बाटलो" असच सांगायचे. खर खोट माहीत नाही. पण आजही पैसे घेउन क्रिस्ती धर्म स्विकारणार्यांची कमी नाहीये तिथे याच खर दुख आहे.

In reply to by शिल्पा नाईक

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, पूर्वोत्तर राज्यात अनुभव येतोच आहे. कुपारी म्हणजे कुप ज्यांचा अरि आहे (होता) असा घ्यावा लागेल बहुधा.

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

नुस्ता मैद्याचा पाव नाही. पोर्तुगीझ 'उष्टा पाव' विहिरीत टाकायचे. विहिर हा पिण्याच्या पाण्याचा एकच स्रोत असल्याने अशा 'उष्टा' पाव टाकलेल्या विहिरीतील पाणी प्यायले की हिन्दूचे धर्मांतर होऊन ते ख्रिश्चन होत असत. ह्यात हिन्दूंची खुप मोठी चुक होती. अशा लोकांना ते धर्मबाह्य ठरवत आणि पुन्हा हिन्दू धर्मात परतायला मनाई करायचे. त्यांच्या बरोबरचे सर्व रोटी बेटी व्यवहार बंद केले जायचे. त्यांना अक्षरशः वाळीत टाकलं जायचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिन्दूंच्या ह्या विचारसरणीला कडाडून विरोध केला होता. सावरकर म्हणाले होते, ह्या धर्मांतराने एक व्यक्ती त्या धर्मात जात नसून पुढच्या सर्व पिढ्या त्याच धर्मात जन्माला येतील. ज्यांनी एखाद्या धर्माचा अभ्यास करून त्या धर्माची तत्वे पटली म्हणून धर्मांतर केले त्यांना जाऊ द्या. पण ज्यांना उष्ट्या पावाने वगैरे फसविले आहे त्यांना हिन्दू धर्मात परत यायचे असेल तर परत आपल्या धर्मात सामाऊन घ्या. त्यांच्या पुढच्या पिढ्या अन्य धर्मात जाण्यापासून वाचवा. हिन्दू धर्म इतका दुबळा नाही की कोणी फसवून उष्टा पाव खाऊ घातला म्हणून बुडायला. ते हिन्दूच आहेत आणि हिन्दूच राहूद्या त्यांना तुम्ही जबरदस्तीने मुसलमान किंवा ख्रिश्चन बनवू नका. अंदमानच्या तुरुंगात असताना अशाच फसवणूकीतून दुसर्‍या धर्मात गेलेल्या कैद्यांना हिन्दू कैदी आपल्या पंगतीस जेवायला बसू देत नव्हते. त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून सावरकर जेवले आणि इतर कैद्यांचे प्रबोधन केले. -संदर्भ- माझी जन्मठेप- स्वातंत्र्यवीर सावरकर.

In reply to by प्रभाकर पेठकर

तत्कालिन लेखी पुरावा आहे का हा पहिला प्रश्न आणि माझे दुसरे म्हणणे असे की कॅथॉलिक धर्मांतरे (पोर्तुगीज कालखंड) ही शारीरिक छळातून होत तर प्रॉटेस्टंट (इंग्रज कालखंड) धर्मांतरे ही फसवणूक, आमिषे आणि प्रलोभने ह्या द्वारे होत असत. विहिरीत पाव हे पिल्लू इंग्रजांचे असावे. अर्थात् त्याविषयी अजून अभ्यास करूनच नक्की काय ते सांगता येईल. सध्या मसुराश्रमात स्वगृही परतण्याचा कार्यक्रम होत असतात. वसईकरांना स्वगृही आणण्यासाठी शंकराचार्य ही आले होते असे इतिहास संकलक श्रीदत्त राऊत म्हणाले. बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात परत आणण्याची जी दूरदृष्टि शिवाजी राजांनी दाखवली ती पुढे कोणीही दाखवली नाही हे खेदाने म्हणावे लागेल. असो. लेखाचा मूळ मुद्दा तो नाही. विषयांतर झाले तर परत मूळ मुद्द्यावर येणे कठीण होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

याविषयीचा माझ्या पूर्वीच्या लेखातील एक उतारा:
पाद्री मंडळींनी आपला मोर्चा भारत, आफ्रिका, वगैरे देशांकडे वळवून गावाच्या विहिरीत पावाचा वा गोमांसाचा तुकडा टाकणं, इस्पितळं, अनाथालयं चालवणं, अश्या क्लुप्त्या लढवून हजारो लोकांना आपल्या कळपात ओढलं... अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं, पण तुम्ही पडलात अडाणी आणि भित्रट.
संपूर्ण लेख इथे वाचा: http://www.misalpav.com/node/23698

In reply to by चित्रगुप्त

>>अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं अगदी सहमत!! आपल्याच लोकांनी आधी मिशनर्‍यांतून आलेल्या लोकांनी शिवलं तरी बाटले म्हणून आपल्याच लोकांना बाजूला केलं त्याला कोण काय करणार. आपल्या लोकांनी मिशनर्‍यांना हे काम जास्त सोपं करुन दिलं असं मला वाटतं. जिथं हे काही चालेना तिथे वर म्हटलेले बळजबरीचे मार्ग पोर्तुगीजांनी अवलंबले असतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

सर जी आपले विचार स्तुत्य आहेत.. पण आपल्या हिंदू धर्माचा प्रॉब्लेम हा आहे की धर्मांतरित व्यक्तीला कोणत्या जाती मधे adjust करायचे..??

सावरकर म्हणाले होते, ह्या धर्मांतराने एक व्यक्ती त्या धर्मात जात नसून पुढच्या सर्व पिढ्या त्याच धर्मात जन्माला येतील. ज्यांनी एखाद्या धर्माचा अभ्यास करून त्या धर्माची तत्वे पटली म्हणून धर्मांतर केले त्यांना जाऊ द्या. पण ज्यांना उष्ट्या पावाने वगैरे फसविले आहे त्यांना हिन्दू धर्मात परत यायचे असेल तर परत आपल्या धर्मात सामाऊन घ्या. त्यांच्या पुढच्या पिढ्या अन्य धर्मात जाण्यापासून वाचवा. हिन्दू धर्म इतका दुबळा नाही की कोणी फसवून उष्टा पाव खाऊ घातला म्हणून बुडायला. जबरदस्त. एकदम पटलं

आम्ही "आमचें गोंय" या लेखमालिकेसाठी जे वाचले त्याचा सारांश http://www.misalpav.com/node/17873 या लेखात आणि प्रतिक्रियांमधे आहे. तेच परत लिहीत नाही. छळ करून बाटवलेल्या लोकांची आकडेवारी पोर्तुगीजांनी मोठ्या अभिमानाने लिहिल्यामुळे उपलब्ध आहे. ख्रिश्चनांनी विहीरीत पाव टाकून हिंदूंना बाटवले असे वाचले आहे, पण त्याची नक्की आकडेवारी कुठे वाचली नाही. त्यामुळे पुढच्या भागाबद्दल काही बोलू शकत नाही. मात्र या काळात हिंदू धर्मात काही चित्रविचित्र रूढी शिरल्या होत्या, उदा. समुद्रपर्यटनासाठी प्रायश्चित्त घेणे इ. तेव्हा अशा तर्‍हेने बाटवाबाटवी अगदीच अशक्य वाटत नाही. अर्थात, श्री शिवाजी महाराजांनी गलबतातून अनेकदा समुद्रात प्रवास केला होता. त्याबद्दल प्रायश्चित्त घेतल्याचेही कुठे वाचले नाही. म्हणजे हे नंतर कधीतरी सुरू झाले असावे, ही प्रायश्चित्ताची प्रथा गोव्यात अजून काही देवळांत चालू आहे.

In reply to by पैसा

आपला लेख मी दोन आठवड्यांपूर्वीच वाचला (तो लेख अतिशय माहीतीपूर्ण आहे). अशी बाटवाबाटवी अशक्य आहे असे मी म्हणत नाही पण त्याचे प्रमाण किती होते आणि जीवाच्या भीतीने, नरक यातना भोगायला लागू नयेत म्हणून ख्रिस्ती झालेले किती हा मूळ प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की त्याविषयी तत्कालिन कागदपत्रांत कुठे उल्लेख आढळतो का... तिसरा प्रश्न असा की पाव/उष्टा पाव म्हणजे गोमांस नव्हे., तुमच्या लेखात जागोजागी आपला धर्म टिकावा म्हणून गोवेकर आणि साष्टीकर जनतेने केलेले प्रामाणिक प्रयत्न दिसतात, असे असताना मैद्याच्या पावासाठी खरोखरच कोणाला धर्म बहिष्कृत केले जात असेल का... कदाचित् प्रायश्चित्त घ्यायला लावत असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

कागदपत्रातले उल्लेख "अमूक हिंदूना ख्रिश्चन केले" "अमूक हिंदूंना मारले" "अमूक देवळे पाडली" अशा प्रकारचे आहेत. कोणत्या प्रकारे धर्मांतरे केली याचा उल्लेख कुठेही मिळणार नाही. मुख्यत्वे इन्क्विझिशनच्या नावावर छळ करून, जवळच्या नातलगांना ठार मारण्याच्या धमक्या देऊन अशी धर्मांतरे करण्यात आली. उच्च वर्गातल्या लोकांना बाप्तिस्मा जबरदस्तीने दिला गेला आणि खालच्या वर्गातल्या अशिक्षित लोकांना विहिरीत पाव टाकून आता तुम्ही ख्रिश्चन झालात असे "बजावण्यात आले" असे मोघम उल्लेख वाचले आहेत. म्हणूनच म्हटले की अचूक आकडे कुठे मिळत नाहीत. जरा अवांतर होईल, पण अशा प्रकारे धर्मांतरित झालेल्या लोकांची रहाणी मनोरंजक होती. मुख्यतः गावडोंगरी वगैरे अगदी दुर्गम भागात असे लोक होते. त्यांची नावे अंतोन गावकर वगैरे हायब्रीड असत. फक्त कागदोपत्री नाव ख्रिश्चन आणि घरात सगळे रीतीरिवाज हिंदूंचे. १९२८ साली मसूराश्रमाच्या महाराजांनी अशा ७८१५ लोकांचे शुद्धीकरण केले. अगदी स्वातंत्रानंतरही काही गावेच्या गावे पुनर्धमांतरित झाली.
मैद्याच्या पावासाठी खरोखरच कोणाला धर्म बहिष्कृत केले जात असेल का... कदाचित् प्रायश्चित्त घ्यायला लावत असण्याची शक्यता जास्त आहे.
रास्त शंका आहे. पण तेव्हा त्या धर्मांतरितांना कोणी बहिष्कृत करायचा प्रश्नच नव्हता, कारण बहिष्कृत करायला गावात कोणी हिंदू शिल्लकच राहिले नव्हते. ही परिस्थिती साष्टी, तिसवाडी आणि बार्देश या ३ तालुक्यात होती. प्रायश्चित्त कोण देणार? आणि कुठे? कारण भटजी/देवळे शिल्लक नव्हती. हिंदू लोक आपले सण सुद्धा साजरे करू शकत नव्हते. मराठ्यांनी पोर्तुगीजांना रोखले म्हणून या हैदोसाची व्याप्ती फक्त ३ तालुक्यात राहिली. मात्र राण्यांच्या एका नातलगाला ख्रिश्चन बनवले गेले. त्यांच्यावर इतर मराठ्यांनी बहिष्कार घातला होता. परंतु छत्रपती संभाजी यांनी त्यांना पंक्तीपावन केले असेही एका ठिकाणी वाचले आहे. बहिष्कार वगैरे उच्च वर्णीयांत घडत होते असे दिसून येते, पण गरीब जनतेची अवस्था फार कुठे लिहिलेली नाही. तसेही मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतर सर्व गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आला, त्यानंतर मराठ्यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला गेला. स्वातंत्र्यापूर्वी अगदी कार्निव्हाल मधे जी दृश्ये दाखवली जात त्यात संभाजीराजांचा पोर्तुगीजांनी पराभव केला अशी दृश्ये दाखवली जात, जे तद्दन खोटे होते. संभाजीराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून तिसवाडीचा काही भाग वगळता सर्व गोवा जिंकून घेतला होता. परंतु एकावेळी अनेक आघाड्यांवर लढत असल्याने त्यांना वेळ कमी पडला. नाहीतर गोव्याचा इतिहास संपूर्ण वेगळा लिहिला गेला असता.

In reply to by पैसा

हा पण प्रतिसाद अतिशय माहितीपूर्ण. संभाजी राजांनी खरोखरच पोर्तुगीजांचा डाव आटपत आणला होता. त्याविषयी अधिक माहिती इथे वाचायला मिळाली. अचूक आकडा आणि योग्य कारण पोर्तुगीज कागदपत्रांत (राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांप्रमाणे) कधीच सापडणार नाही. पण कदाचित् मराठा किंवा मुघल दप्तरांमध्ये उल्लेख सापडण्याची शक्यता जास्त. तुम्ही सांगितलेला वर्ग निहाय मुद्दा पण विचार करण्याजोगा आहे. (तसेच गोरेगावच्या मसुराश्रमात स्वगृही परत आणण्याचे प्रयत्न होत असतात. विशेषकरून प्रेमविवाह करू इच्छिणारा मुलगा किंवा मुलगी हिंदु झाल्याच्या बातम्या धर्मभास्कर मासिकात एका विशेष रकान्यात येत असत पण प्रमाण अगदी थोडे होते. परत त्या आश्रमावर १-२ वेळा गुंडांकरवी हल्ले सुद्धा झाले होते.) अवांतर - गोव्यातील कार्निव्हलचा तुम्ही उल्लेख केलात तसे गोव्यात पोर्तुगीज प्रेमाचे अजून एक उदाहरण म्हणजे दक्षिण गोव्यात मराठी आणि देवनागरी ह्या दोन्हीला विरोध आणि कोंकणी भाषा रोमन लिपीत लिहिले जावी ह्यासाठी आंदोलने. तसाच वसई परिसरात सध्या पोर्तुगीजांचा उदो उदो चालू आहे. नाथाराव सिंदा भोंगळे ह्या कोळी सरदारानेच चार बुरुजांचा वसईचा किल्ला बांधला होता असा कागदोपत्री उल्लेख सापडला असताना इथे तो पोर्तुगीजांनीच बांधल्याचे दाखवण्यासाठी आटापिटा होत आहे. त्यासाठी अंतर्राष्ट्रीय स्तरावर स्वतःची पाठ थोपटून घेणे पण चालू आहे. असो. लिहावे तितके कमीच.

In reply to by सृष्टीलावण्या

संभाजी राजांनी खरोखरच पोर्तुगीजांचा डाव आटपत आणला होता.
conde_de_alvor मा.कौंट डी अल्वोर साहेब खरोखर…७५% गोवा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला होता…पूर्ण गोवा जिंकण्याची संधी होती पण कौंट अल्वोर (व्हाईसरॉय) शंभूराजेंच्या तावडीतून वाचला. वसई,चौल,बार्देश,साष्टी,सांत एस्तेहाव किल्ला अशी अनेक ठिकाणी मराठ्यांनी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली आघाडी उघडल्याने पोर्तुगीजांच्या तोंडचं पाणी पळालं… २४ नोव्हेंबर १६८३ ते नाताळ सुरु होईपर्यंत आणीबाणी जाहीर झाली. युद्धाच्या शेवटी तर गोवा (ओल्ड गोवा सिटी) शहराला करकचून वेढा टाकून शंभूराजे वेशीवर तर…हातभार फाटलेले व्हाईसरॉय कौंट अल्वोर,आर्चबिशप प्रिमस दो म्यनुअल,सेक्रेटरी लुइस गोन्जाल्वीस आणि इतर पोर्तुगीज लोक सेंट झेवियर चर्च मध्ये करुणा भाकत आहेत असे विनोदी चित्र निर्माण झाले होते. व्हाईसरॉयने आणि आर्चबिशप ने संपूर्ण गोवा झेवियरच्या पदरात टाकून संकटातून मुक्तता करण्याची प्रार्थना केली आणि तिथेच बसून राहिले. औरंगजेबाचा मुलगा शाहआलम मोठी सेना घेऊन बिचोलीम कडे येत आहे अशी बातमी मिळाल्याने शंभूछत्रपतींनी वेढा उठवला. इकडे ऐन नाताळच्या सुरुवातीला हा अशक्यप्राय वेढा उठल्याने हर्षवायू झालेल्या आर्चबिशपने हा सेंट झेवियरचा दैवी चमत्कार असल्याचे जाहीर केले आणि आनंदोत्सव केला :))

बाटुन ख्रिश्चन झालेली गोव्यातील काही गौड सारस्वत घराणी रेंगो (रेगे), डेंपो (ढेपे), माँटेरिओ (मंत्री) वगैरे.. हिंदुंच्या संकुचित व्रुत्तीचा परिणाम नाहीतर कोकणपट्टीतील कितीतरी मुसलमान आणि गोव्यातील ख्रिश्चन घराणी अजुनही हिंदु राहिली असती. इतिहासात कोणी हिंदु धर्म स्वीकरल्याचे एखादे उदाहरण आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माँटेरिओ हे खरोखरचे पोर्तुगीज आडनावही आहे असे दिसते. कारण ब्राझीलमध्ये त्या नावाची एक नगरपालिका आहे. http://en.wikipedia.org/wiki/Monteiro

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिवाजीमहाराजांनी नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते ना? खालील माहिते आंतरजालावर मिळाली - विजयनगर साम्राज्याचे हरिहर आणि बुक्क - इस्लाम स्वीकारला पण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश. खुस्रो खान - जबरदस्तीने इस्लाम स्वीकारावा लागला, पण पुन्हा हिंदू धर्म प्रवेश हरिलाल गांधी - इस्लाम स्वीकृती, पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश सरमद - पर्शियाहून भारतात आलेले संत. काही काळासाठी इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश. अजूनही हल्लीच्या काळातीलही उदाहरणे दिसली पण इतिहासातील विचारली म्हणून.

In reply to by यशोधरा

शिवाय पुरातन काळी (इसपू २ रे शतक) हेलिओदोरस नामक एका ग्रीक राजदूताने हिंदू धर्म स्वीकारला होता. हा हेलिओदोरस वासुदेवाचा भक्त होता. त्याने वासुदेवाला अर्पण केलेला एक दगडी स्तंभ मध्य प्रदेशात बेसनगर इथे अजूनही बघायला मिळतो. त्यावर स्पष्ट शिलालेखही लिहिलेला आहे की "तक्षशिलेत राहणार्‍या, यवन राजाच्या हेलिओदोरस नामक भक्ताने हा स्तंभ अर्पण केला असे." http://en.wikipedia.org/wiki/Heliodorus_pillar

In reply to by यशोधरा

विजयनगर साम्राज्याचे हरिहर आणि बुक्क - इस्लाम स्वीकारला पण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश. मी लहान पणी 'किशोर' मध्ये वाचल होत यांच्या बद्दल, कि एक राजकिय खेळी म्हणून त्यांनी इस्लाम स्विकारला होता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

इतिहासात नाही पण आत्ता या क्षणी "आनंदमार्गी" (नेटवर यांची माहीती उपलब्ध नाही. पण मी या साधुंना/कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटले आहे. आपले "निनाद" याबद्दल जास्त माहीती देतील.) हा एक पंथ सार्‍या जगभरात कार्यरत आहे. हिंदु धर्म म्हणजे काय हे सुलभतेने सांगुन अगदी निग्रोज जे इस्लाम स्विकारलेले आहेत त्या ठिकाणी सुद्ध त्यांनी हिंदु धर्मांतर केले आहे. कोणतेहे लोभ्,जोर अंधश्रद्धा न वापरता फकत चर्चेतुन हे घडते.

In reply to by स्पंदना

नीग्रो हा शब्द ऑफेन्सिव समजला जातो. कोणाला तरी म्हारड्या म्हणून हिणवण्याप्रमाणे. कृष्णवर्णीय हा प्रतिशब्द वापरावा ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

ओके. पण मग तुम्ही इंग्लिश मध्ये त्यांना काय ब्लॅक म्हणता? येथे लिहीताना निग्रो का नाही लिहायच? आपल्याबद्दल उल्लेख "देशी" अथवा "करी पिपल"असा सर्रास होतो. तो ऑफेन्सिव्ह नाही का?

In reply to by स्पंदना

काळ्या लोकांना ब्लॅक म्हणणं हे जवळपास वाईट समजलं जात नाही, पण निगरो किंवा निग्गर म्हणणं हे फारच वाईट समजलं जात. 'आफ्रिकन अमेरिकन्स' हा सर्वमान्य सभ्य शब्दप्रयोग आहे. अमेरिकन इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या वंशांसाठी आता त्यांचं मूळ कुठचं याप्रमाणे नावं आहेत. इथे लिहिताना का लिहायचं नाही हा चांगला प्रश्न आहे. मराठी लोकांसाठी तशा उच्चनीचतेच्या भावना त्या समाजाविषयी अस्तित्वात नाहीत. असे शब्द बदलून नक्की कितपत चांगले बदल होतात याबद्दल मी साशंक आहे. कारण शब्द काय हेतूने वापरला आहे हे महत्त्वाचं ठरतं. तुमचा मूळ वापर योग्य हेतूने होता. तरीही केवळ शब्दामुळे कोणाच्या भावना दुखवू जाऊ शकतील, किंवा गैरसमज होतील ते टाळण्यासाठी सूचना केली. मी तरी काळे, कृष्णवंशीय असे शब्द मराठीत वापरतो. देसी हा शब्द मी आपल्याआपल्यातच - म्हणजे भारतीय, पाकिस्तान्यांमध्येच वापरलेला ऐकलेला आहे. मिक्स्ड कंपनीत उल्लेख झाला तर अमेरिकनांना देसीचा अर्थ समजावून द्यायला लागतो. करी पीपल हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. हा अमेरिकेत तरी प्रचलित नाही.

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटते त्यांचा उल्लेख आता "अफ्रिकन अमेरिकन्स" किंवा इतरांसाठी "अफ्रिकन्स" असा करायची पद्धत आहे. कृष्णवर्णीय हा उल्लेख सुद्धा अपमानास्पद मानला जातो. अर्थात तुम्ही तिकडे रहात असल्याने तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्यामुळे माझी माहिती चुकीची असण्याचा संभव आहे

In reply to by स्पंदना

हिंदुची प्रार्थनेची कोणती एक विशिष्ट पद्धत नाही वा कोणते एक दैवत/पुस्तक नाही. त्यामुळे धर्मांतरासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले नाहीत. लोक भारतीय धर्मांकडे आकर्षित झाले असलेच तर ते केवळ तत्त्वज्ञान पटल्यामुळे, मुख्यतः चर्चेद्वारे, अहिंसक पद्धतीने.

हे विहीरीत पाव टाकणे म्हणजे "अन्नाची नासाडी" नव्हे का?

हा लेखाचा मूळ मुद्दा नाही. हौशी लेखकांनी त्यासाठी वेगळा धागा काढावा ही विनम्र विनंती. कृपया परखड लिहिले त्याबद्दल राग मानू नये.

हिंदू धर्मात आणि इतर धर्मांत दोन फार मोठे मूलभूत फरक आहेत... १. कुठल्याही क्षुल्लक कारणाने धर्मातून बाहेर काढणे... याला पाव खाणे हे एक क्षुल्लक कारण पुरेसे होते. याविरुद्ध बहुतेक इतर धर्मांत धर्माबाहेर पडाणारा आणि त्याला मदत करणारा या दोघांनाही विरोध केला जातो. २. जर जर कोणी स्वतःहून धर्मात येतो म्हणाला तर पहिला प्रश्न, "आँ, का म्हणून?" याविरुद्ध इतर अनेक धर्मात साम, दाम, दंड, भेद वापरून इतराना आपल्या धर्मात ओढायला संघटीत प्रयत्न होतात. यावरून हिंदू धर्मियांनी आत्मपरिक्षण करून खूप काही शिकण्यासारखे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच! तरी आर्यसमाजी लोक त्या दिशेने प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांनी कोलकात्यात शंभरेक मुसलमानांचे हिंदूकरण केल्याचे वाचले. तूनळीवर "आर्य समाज-मुस्लिम्स बिकम हिंदूज़़" असे काहीसे सर्चवले तर व्हिडिओ दिसेल.

In reply to by बॅटमॅन

बाटलेल्या लोकांचे हिंदु धर्मात परतणे हा लेखाचा विषय नव्हे. अवांतर प्रतिसाद येत राहिल्यास लेखाचा मूळ मुद्दा बाजूला पडतो. कृपया नवीन धागा उघडावा.

हिंदूंतल्या नीचतम जातीच्या स्पर्शानेही भ्रष्टाचार होत असे, पाणवठा अपवित्र होत असे हे वास्तव तर अगदी आपल्या डोळ्यांसमोरचे आहे. एक गाव एक पाणवठा हे मिशन अद्यापही साध्य झालेले नाही. मिशनर्‍यांसोबत चहापान केले म्हणून पंचहौद मिशन प्रकरणात खुद्द टिळकांवर ग्रामण्य घातले गेले होते. हे शिवाशिवीचे प्रस्थ फारच होते. त्यामुळे म्लेंच्छाच्या हातचा पाव, पाणी प्यायल्यामुळे बहिष्कृत व्हावे लागण्यासारख्या गोष्टी प्रत्यक्ष घडल्या असाव्यात असे मानायला जागा आहे. सक्तीने धर्मांतरे झालीच असणार पण इतर धर्मांतरांमध्ये परित्यक्ता, विधवा आणि त्यांची विवाहबाह्य संतती यांचाही वाटा खूप मोठा आहे. अनाथ, भुकेकंगाल लोकांना मिशनमध्ये आसरा मिळत असे आणि त्यांची मुलेबाळे आपोआपच क्रिस्टिअन बनत. आजही कोल्हापूर-कर्नाटक सीमाप्रदेशात खालच्या जातीच्या अनेक लोकांचे धर्मांतर होत आहे. आमच्या भागात काम करणारे खाजगी सफाईकामगार हे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत क्रिस्टिअन झाले आहेत. आमच्या इथल्या कचरावाल्याचे वडील एका रोगाच्या साथीत क्रिस्टिअन झाले. ते जमातप्रमुख होते. लगोलग त्यांची मुलेबाळे, लेकीसुना सर्वच धर्मांतरित झाले. या बाबतीत आंध्रही आघाडीवर आहे. ओदिशा आणि आदिवासी पट्टा त्यांचा स्ट्राँगहोल्ड आहेच. भूतकाळात सक्ती झाली असेल पण आज गोडीगुलाबी आणि समानतेचे स्वप्न अथवा आमिष हीच खरी कारणे आहेत.

In reply to by राही

विहिरीत पाव ह्या पद्धतीने धर्मांतर हे जर इतके सोपे असते तर मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती. मग त्यासाठी संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता. खुद्द पोर्तुगीज अमलाखालील प्रदेशांत हिंदु नावालाही शिल्लक उरले नसते.

ही इंग्रज कालखंडातील घटना असू शकते आणि ती सर्व इंग्रज अमलाखालील सर्वच प्रदेशांना लागू झाली असावी. पण सोळाव्या, सतराव्या शतकांत असे काही घडल्याचे मोडी, फारसी वा अन्य कागदपत्रांत पुरावे आहेत का हा प्रश्न आहे.

In reply to by परिंदा

ते धर्मांतर कोणी केले असावे, पोर्तुगीजांनी की इंग्रजांनी. जर पोर्तुगीजांनी केवळ विहिरीत पाव टाकून धर्मांतर केले असेल तर साष्टीच्या आणि गोव्याच्या जनतेने वेळोवेळी शिवाजीराजे, संभाजीराजे आणि शाहूमहाराजांना साकडे का घातले असावे बरे...

महाबळेश्वर सैल या लेखकाची "तांडव" नावाची एक अत्यंत वाचनीय कादंबरी आहे गोव्यात पोर्तुगीजांनी केलेले सर्व प्रकार ,आणि मानवी स्वभावाचे अत्यंत सुंदर वर्णन या कादंबरीत आहे. गोव्यातील जनतेने दिलेला लढा, इन्क्विझिशन, देव व देऊळ वाचवण्यासाठी केलेली प्रयत्नाची शर्थ,इत्यादी फार सुरेख वर्णन आहे. गोडीगुलाबीने धर्मांतर करू पाहणारा एक पाद्रीबाबा सुद्धा, इन्क्विझिशन या शिक्षेला कसा पात्र ठरतो,आणि त्याचा जेल मध्ये होणारा अंत इत्यादी इत्यादी. अंगणातील तुळस उपटून एका रात्रीत तेथे क्रूस उभारला जात असे. पण "पाव" प्रकरण वाचल्याचे आठवत नाही. हि कादंबरी कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रकाशित झाली आहे. एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान नक्की मिळेल.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

विहिरीतील पाव हा विषय अशासाठी अभ्यासला पाहिजे की बरेच ख्रिस्ती धर्मोपदेशक बाटलेल्या ख्रिस्ती बांधवांना सांगतात की बघा शुल्लक कारणासाठी हिंदुंनी तुम्हाला कसे धर्माबाहेर काढले पण त्याचवेळी पोर्तुगीजांनी केलेल्या क्रूर अत्याचारांविषयी बोलायला सोयीस्कर विसरतात. मग आपोआप ख्रिस्ती धर्म शांतीचे प्रतीक होतो आणि लाखो लोकांना वेदनादायी मृत्यु देण्यास कारणीभूत असलेला फ्रांसिस झेवियर संतमहात्मा होतो. पण ह्यात आश्चर्य काहीच नाही. साने गुरूजी लिहितात - शार्लमननें एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटीं त्यांच्या गळीं ख्रिश्चन धर्म उतरविलाच. जे जिवंत राहिले त्यांनीं ख्रिस्त हा दयाळू आहे हें मुकाट्यानें कबूल करून बॅप्टिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला. पुढें तीनशें वर्षांनी ख्रिश्चन चर्चनें त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केलें. पण ख्रिस्तानें अशांचा अन्तर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नसता. ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती कीं, त्या भरांत ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माहि तो विसरून गेला. ईश्वराच्या नांवाआड स्वत:चीं पापकृत्यें लपविणार्‍या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणि होता!

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

हे पुस्तक छान माहितीपूर्ण आहे हिंदूंनीच दूर लोटल्याने निरुपाय झाल्याचेही दिसते. पण त्यात त्यांचे काही चूक आहे असेही म्हणता येत नाही. धर्म बदलणार्‍याची सहज हिम्मत होवू नये, सर्व समाजाने एकवटून त्याचा विरोध करावा... धर्मांतरापेक्षा लोकांचं वाळीत टाकणं भयंकर वाटावं असा हेतु असावा...

>>संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता. बाकी जौंद्या. संभाजी राजांचा छळ "इस्लाम स्वीकारण्यासाठी" झाला होता असे वाटत नाही. म्हणजे त्यांनी इस्लाम स्वीकारायला होकार दिला असता तर त्यांना सोडून दिले असते यावर विश्वास बसत नाही. पक्षी औरंगजेब धर्मांध वगैरे काही असला तरी राजकारणात इतका कच्चा नव्हता.

In reply to by नितिन थत्ते

एखादा राज्यकर्ता जर दुसर्‍या एखाद्या धर्माला स्विकारतो तेंव्हा त्याच्या राज्यातील त्या धर्मियांना अभय मिळतं तसेच इतर धर्मियांना राजाच्या (नव्या) धर्मात प्रवेश करण्यास प्रोत्साहन मिळते. त्याकाळी राजाला देव मानायचे. त्याने तो धर्म स्विकारला म्हणजेच तो धर्म चांगला असला पाहिजे. आपणही तो स्विकारला म्हणजे आपण राजाच्या नजरेत चांगले ठरू आणि आयुष्य सुखी होईल अशी कल्पना असायची त्यामुळे राजाला मुसलमान करून घेण्यात घाऊक फायदे असायचे. त्या विचारांनीच औरंगजेबाने प्रयत्न केला असावा. शत्रु प्रदेशातील प्रबळ राजघराण्यास नमविणे हाही उद्देश असू शकतो. त्यामुळे शिवाजी राजे हाती नाही लागले तरी त्यांच्या वारसाला मुसलमान बनवून त्या प्रदेशाला आपले अंकित बनविण्याचा उद्देश असू शकतो. औरंगझेबाची एक मुलगी संभाजी राजांच्या प्रेमात होती असे कादंबर्‍यातून वाचले आहे. औरंगझेबाने, मुसलमान होण़्याच्या अटीवर, संभाजीचे लग्न (निकाह) तिच्याशी लावून देण्याचे आमिष दाखविले होते असे म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून संभाजीला जीवे मारीला तसेच औंरगजेबाची मुलगी झेबुन्निसा संभाजीराजांच्या प्रेमात होती असे चिटणीसाची बखर म्हणते तथापी ह्याला काहीही आधार नाही. औरंगजेबाविरूद्ध शहजाद्या अकबराने १६८१ रोजी बंड केले तेव्हा तिने अकबराला सहाय्य केले होते मग औरंगजेबाने तिला सलिमगड येथे कैदेत ठेवले, अकबराशी झालेला तिचा पत्रव्यवहार उघडकीस येतास तिचा तनखाही बंद होऊन सर्व मालमत्ताही जप्त झाली बंदिवासातच ती २६ मे १७०२ रोजी मरण पावली त्यामुळे ती दक्षिणेत यायचा प्रश्नच आला नाही. संभाजीराजांनी केलेली मोगलांच्या प्रदेशाची नासाडी, अनेक मुसलमानांचा केलेला वध यामुळे बरेच इस्लामी धर्मपंडित त्यांजवर चिडूनच होते. तस्मात राजांना मारावे असाच फतवा त्यांनी काढला होता. संभाजीराजांच्या वधाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर म्हणतो - फतवा काढल्यावर दोन दिवसांनी (पेडगावच्या बहादूरगडावर) बादशाहाने सरदार रूहुल्लाखानास आज्ञा केली की संभाजीकडे जाऊन खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कोठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोण कोण संभाजीस सामिल आहेत याची चौकशी कर. पण संभाजी गर्विष्ठ होता. जीविताची आशा सुटल्यामुळे त्याने बादशहाविषयी घाणेरडे शब्द उच्चारिले, त्याची निंदानालस्ती केली. संभाजी जे काही बोलला ते जशेच्या तसे न सांगता तशा आशयाचे बोलणे रुहुल्लाखानाए औरंगजेबास सांगितले. त्याच दिवशी बादशहाने आज्ञा दिली की ह्याला नवी दृष्टी द्यावी त्याच रात्री संभाजीचे डोळे काढण्यात आले. त्यानंतर राजांनी जेवणखाण सोडले असे बरेच दिवस उपवास घडल्यानंतर ही गोष्ट बादशाहास कळवण्यात आली. त्यानंतर त्यास वढू बुद्रुक येथे नेऊन त्यास ठार करण्यात आले.

In reply to by नितिन थत्ते

आपले सर्वांचे खास मराठी मतभेद टळावेत म्हणून संभाजी राजांऐवजी गुरू गोविंद सिंह आणि त्यांच्या मुलांचे नाव घेऊया.

विहिरीत पाव ह्या पद्धतीने धर्मांतर हे जर इतके सोपे असते तर मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती. मग त्यासाठी संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता.
विहिरीत उष्टा पाव टाकून धर्मांतरे झाली ही शुद्ध अफवा आहे असे आपले म्हणणे आहे का? किंवा अशा पद्धतीने एकही धर्मांतर झाले नाही अशी तुमचा विश्वास आहे का? संभाजी राजांच्या काळात भारतात पाव प्रचलीत होता का?
खुद्द पोर्तुगीज अमलाखालील प्रदेशांत हिंदु नावालाही शिल्लक उरले नसते. >ही इंग्रज कालखंडातील घटना असू शकते आणि ती सर्व इंग्रज अमलाखालील सर्वच प्रदेशांना लागू झाली असावी.
मग १५० वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत अशा सोप्या पद्धतीने धर्मांतरे करून भारत हा सुद्धा एक ख्रिश्चन देश व्हायला पाहिजे होता. पण तसे झाले नाही. तरी पण 'उष्टा पाव' प्रथा इंग्रजांच्या काळात असू शकते असे तुम्हाला वाटते आहेच. जर इंग्रजांच्या काळात असू शकते तर पोर्तुगिझांच्या काळात तशी प्रथा नसेलच असे ठामपणे कसे म्हणता येईल? धर्मांतराचे अनेक मार्ग होते. त्या पैकी 'उष्टा पाव' हा फक्त एक मार्ग. गरीबीत अन्न धान्य, पैशाची मदत, वैद्यकिय मदत, ब्रेन वॉशिंग, धाकदपटशा, दहशत असलेल्या पोर्तुगिझांच्या शत्रू राज्यकर्त्यांपासून संरक्षण, आंतरधर्मिय विवाह, एखाद्या विशिष्ट धर्मातील चमकधमक, आर्थिक किंवा सामाजिक फायदे अशा अनेक कारणांसाठी आणि अनेक मार्गांनी धर्मांतरे झाली. आजही होत आहेत. पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मुस्लिमांना हात लावल्यास मुस्लिम राज्यकर्ते मदतीला धावून यायचे आणि त्यांच्याशी पंगा नको म्हणून हे सरदार मुसलमान झालेल्यांचे छळ करायचे नाहित. कोकणात असे अनेक मुसलमान आहेत जे पेशव्यांच्या सरदारांपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी मुसलमान झाले आहेत. असे ऐतिहासिक कादंबर्‍यातून वाचले आहे. इथे मस्कत मध्ये आजच्या घडीलाही कांही आर्थिक आणि सामाजिक फायद्यांसाठी मुसलमान धर्म स्विकारलेली अनेक गुजराथी व्यापारी घराणी आहेत. त्यांची नांवेही बदलण्यात आली आहेत, ते अरबांचाच वेश करतात (तसे कंपल्सरी आहे) पण भारतिय गोतावळ्यात ते हिन्दू नांवानेच प्रसिद्ध आहेत. अजून पाच सहाशे वर्षांनी कोणी म्हणेल कि, 'आर्थिक आणि सामाजिक फायद्यासाठी त्या काळची (म्हणजे आजची) सर्व भारतिय हिन्दू जनता अरब कशी नाही झाली?' तर त्या काळी (भविष्यात) पुन्हा तो खमंग चर्चेचा विषय होऊ शकेल. त्याकाळच्या इथल्या सर्वसामान्य भारतिय जनतेजवळ (तेंव्हाही भारतिय जनता इथे अस्तित्वात असेल तर..) लेखी पुरावे नसतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मुस्लिमांना हात लावल्यास मुस्लिम राज्यकर्ते मदतीला धावून यायचे आणि त्यांच्याशी पंगा नको म्हणून हे सरदार मुसलमान झालेल्यांचे छळ करायचे नाहित. कोकणात असे अनेक मुसलमान आहेत जे पेशव्यांच्या सरदारांपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी मुसलमान झाले आहेत. असे ऐतिहासिक कादंबर्‍यातून वाचले आहे.
याची शक्यता कमी वाटते. कारण त्या काळात कोकणात आंग्रे प्रबळ होते. सावंतवाडीकडे सावंतांचे राज्य होते आणि मुंबईला इंग्रज आलेले होते. सारावसुलीसाठी मराठ्यांनी अत्याचार केल्याच्या कहाण्या बंगाल आणि मध्य प्रांतात सांगितल्या जातात पण ते फार उशिराच्या काळात. पेशवाईपूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात गुलाम करण्यासाठी सिद्द्यांनी धरून नेलेल्या बाळाजी आवजी चित्रेला त्याच्या आईसह शिवाजी महाराजांनी सोडवून आश्रय दिला आणि नंतर चिटणिशी दिली. आदिलशाही फौजा आणि जंजिर्‍याचा सिद्दी हेही रयतेचा जमेल तसा छळच करत असत. लोकांना पकडून जहाजात घालून गुलाम म्हणून विकणे वगैरे प्रकार ते करत असत. त्यांचा अनुभव घेतलेला कोणीही आपणहून मुस्लिम झाला असेल अशा शक्यता वाटत नाही. रत्नागिरीजवळ बरीच मोठी मुस्लिम वस्ती पूर्वीपासून आहे पण ते शिवाजी महाराजांच्या काळापासून तिथे आहेत असं ऐकलं आहे.

In reply to by पैसा

सहमत. कोकणातील त्यातही वरच्या कोकणातील बहुसंख्य मुसलमान हे जंजिर्‍याच्या सिद्दीने प्रचंड छळ करून बाटवलेले आहेत. सिद्दी छळाच्या बाबतीत पोर्तुगीजांसमच होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपल्या प्रतिसादावर सविस्तर प्रतिसाद लिहिनच. पण आता सकाळी बरीच कामे असल्याने प्रतिसाद राखून ठेवत आहे.
संभाजीच्या काळात पाव
- पोर्तुगीज भारतात इ.स. १५३६ साली आले. येताना त्यांनी पाव आणलाच असेल. असो. पाव हे एक धर्मांतराचे लाक्षणिक साधन मानले तर माझे म्हणणे असे की मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

'उष्टा पाव' प्रथा इंग्रजांच्या काळात असू शकते असे तुम्हाला वाटते आहेच. जर इंग्रजांच्या काळात असू शकते तर पोर्तुगिझांच्या काळात तशी प्रथा नसेलच असे ठामपणे कसे म्हणता येईल?
त्यासाठी प्रथम इंग्रज आणि पोर्तुगीज ह्यांच्या मधील फरक समजून घ्यावा लागेल. इंग्रज हे प्रॉटेस्टंट पंथाचे होते ज्या पंथाला त्या मानाने मवाळ आणि कमी धर्मवेडे समजले जाते (जसे शिया हे सुन्नींपेक्षा थोडे मवाळ जास्त असतात). भारतात आल्यावर इंग्रज म्हणाले की आम्ही मसाल्यांसाठी (व्यापारासाठी) भारतात आलो आहोत. तर पोर्तुगीज कॅथॉलिक पंथाचे होते जो जास्त जहाल होता. त्याविषयी मी वर दुवा दिलेला आहेच. पोर्तुगीज आले तेव्हा ते म्हणाले की आम्ही धर्मप्रचार आणि मसाल्यांसाठी आलो आहोत. पण हळूहळू धर्मवेडाने राजसत्तेवर ताबा मिळाला आणि व्यापारापेक्षा धर्मांधतेला जोर आला. जेम्स डग्लस लिहितो की दुष्ट पोर्तुगीजांचा नाश त्यांच्याच कर्माने झाला आणि तो अटळ होता - The crying evil of Bassein (it was the same with Goa) was intolerance, and for this wanton offence which she offered to free inquiry and private judgement, one of the most sacred instincts of our nature, she has suffered a terrible retribution. That sin of intolenee never goes unpunished. It was against Nature, and Nature in another form has had her revenge. - James Douglas in Bombay and Western India (1893).

In reply to by सृष्टीलावण्या

इथे थोडी सुधारणा .. इंग्रज हे प्रॉटेस्टंट पंथाचे होते ज्या पंथाला त्या मानाने मवाळ आणि कमी धर्मवेडे समजले जाते (जसे शिया हे सुन्नींपेक्षा थोडे मवाळ जास्त असतात) पोर्तुगीज कॅथॉलिक पंथाचे होते जो जास्त जहाल होता. गल्लत होते आहे मुळात ख्रीस्ती धर्मियामध्ये कॅथॉलिक हा मवाळ पंथ आहे अन प्रॉटेस्टंट हा जहाल पंथात मोडतो कॅथॉलिक धर्मामधील काही तत्वाना / मान्यतांना तिव्र विरोध / निषेध करुन जो गट या पंथातुन बंड करुन बाहेर पडला अन नविन पंथ स्थापित झाला तोच प्रॉटेस्टंट पंथ .

In reply to by पियुशा

केतकर ज्ञानकोश म्हणतो - मार्टिन ल्यूथरने १५१७ मध्ये व्हिटन्बेर्क (जर्मनी) येथील चर्चच्या दारावर ९५ मुद्यांचे (थेसिस) पत्रक लावले तेव्हापासून प्रॉटेस्टंट चळवळीला ऐतिहासिक दृष्ट्या सुरुवात झाली, असे समजतात. ह्या चळवळीचे परिणाम मात्र ल्यूथरच्या अपेक्षेबाहेर झाले. ती एक स्वतंत्र व फार दूरवर परिणाम करणारी चळवळ ठरली. ह्या चळवळीमुळे चर्चची शकले होतील, असे ल्यूथरलाही त्यावेळी वाटले नव्हते. कॅथलिक चर्चची काही धर्मतत्त्वे व आचारपद्धती ह्यांच्यात सुधारणा व्हावी एवढीच ल्यूथरची मर्यादित अपेक्षा होती; परंतु विक्लिफ आणि हस ह्या विचारवंतांनी तयार केलेल्या वैचारिक भूमिकेमुळे ल्यूथरच्या विरोधाला (प्रोटेस्ट) जागतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. हे बंड नव्हते; सुधारणेची चळवळ होती, तरी तिचा परिणाम क्रांतीसारखा झाला. कारण तिच्यामुळे केवळ ख्रिस्ती धर्मातील चर्चव्यवस्थाच बदलली असे नाही, तर एक वैचारिक नवचैतन्य निर्माण झाले. >ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन त्यामुळे पुरोगामी बनला. ह्या उलट कॅथॉलिक हे अतिजहाल होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. माहिती पूर्णतः नवीन आहे. केवळ पेशवे म्हणणे म्हणजे सामान्यनाम वापरल्यासारखे होईल. कोणते पेशवे, कोणता कार्यकाल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा पुराव्यांसाठी लेखी पुरावा, पुस्तकी संदर्भ द्यावा ही विनम्र विनंती. मी स्वतः इथे प्रत्येक प्रतिसादात माझे म्हणणे मांडताना जास्तीत जास्त ऑनलाईन दुवे देण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहिलेच असेल. त्याने वाचकांनाही दिलेला प्रतिसाद वाचताना तो विश्वसनीय वाटतो.

In reply to by सृष्टीलावण्या

कोणते पेशवे, कोणता कार्यकाल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा पुराव्यांसाठी लेखी पुरावा, पुस्तकी संदर्भ द्यावा ही विनम्र विनंती. मी स्वतः इथे प्रत्येक प्रतिसादात माझे म्हणणे मांडताना जास्तीत जास्त ऑनलाईन दुवे देण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहिलेच असेल.
माझे लेखन हे आंतरजालावरून उतरवलेले नसल्याने लिखीत पुरावा देऊ शकत नाही. मी हे सर्व कादंबर्‍यातून वाचलेले आहे. पेशव्यांचा काळ हा मुळतः माधवराव पेशव्यांचा काळ असावा. माधवराव पेशव्यांच्या काळात ब्राह्मणाब्राह्मणामध्येही वितुष्ट होते. देशस्थ आणि कोकणस्थ असे दोन प्रबळ पक्ष एकमेकांविरूद्ध कार्यरत होते. शिवाय ब्राह्मण-मराठा वाद तर होतेच. बहुतेक सरदार मराठा होते. ह्या सर्व वितुष्टाची झळ सामान्य जनतेस पोहोचायची. असो. माझे ज्ञान कादंबर्‍यातून मिळविलेले असल्याने आणि मी कुठले पुरावे देऊ शकत नसल्याने ते ग्राह्य धरता येत नसेल तर माझी कांही हरकत नाही. मी नुसता वाचनमात्र राहण्यातही आनंद मानेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कादंबऱ्या हा ऐतिहासिक पुरावा होऊ शकतो का? तरीही २-३ कादंबऱ्यांची नावे सांगाल का म्हणजे मी त्या बाजारातून मिळवण्याचा प्रयत्न करेन. मी पण तसे काही प्रत्यक्ष घडले होते का ते पाहीन. तसेच पेशवाईचे अभ्यासक कौस्तुभ कस्तुरेंशी पण बोलेन. आपण पण थोडी शोधाशोध करावी ही विनंती. तसेच पुरावे मिळाले नाहीत तर मोठ्या मनाने आपली विधाने पाठी घ्यावीत ही विनम्र विनंती. नाहीतर लोकांना वाटेल की आपण पूर्वग्रहातून ही टीका केली आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

कादंबऱ्या हा ऐतिहासिक पुरावा होऊ शकतो का?
'हा ऐतिहासिक पुरावा आहे' असे मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे का?
तरीही २-३ कादंबऱ्यांची नावे सांगाल का म्हणजे मी त्या बाजारातून मिळवण्याचा प्रयत्न करेन.
कुठल्याही कथा-कादंबर्‍यांच्या दुकानात नुसते पेशवाईवरील कादंबर्‍यांची विचारणा केली तरी ५-६ कादंबर्‍या हाती लागतील. कांही कादंबर्‍यांची नांवे तुम्हालाही ठाऊक असतीलच. मी वाचलेल्या ५-६ कादंबर्‍यांपैकी नेमक्या कुठल्या कादंबरीत हे उल्लेख आहेत हे आठवत नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातही शिवाजी महाराज औरंगझेबाच्या वाढदिवसा निमित्त पुण्याहून दिल्लीस निघाले असता वाटेत एका शिरजोर सरदाराचे धाबे दणाणले आणि त्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मुस्लीम धर्म स्विकारल्याचा उल्लेख आहे.
आपण पण थोडी शोधाशोध करावी ही विनंती.
वेळे अभावी शक्य नाही.
तसेच पुरावे मिळाले नाहीत तर मोठ्या मनाने आपली विधाने पाठी घ्यावीत ही विनम्र विनंती.
ही विधाने, कुठल्याही दिशेने, आपणाविरुद्ध वैयक्तिक विधाने नाहीत, तेंव्हा आपली विनंती मान्य करता येत नाही.
नाहीतर लोकांना वाटेल की आपण पूर्वग्रहातून ही टीका केली आहे.
इतर सदस्यांचा माझ्याबद्दल तसा समज होईल नं? होऊ दे. आपण काळजी करू नये.

दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे जे परिवर्तीत किंवा बाटवलेले ख्रिश्चन आहेत त्यांना त्यांच्या धर्माबद्दल नको तेव्हढा अभिमान अन हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे. सिंगापुरात सपना म्हणुन एक ख्रिश्चन माझ्या ओळखीची होती. उगा हिंदि धर्मात हेच वाईट तेच वाईट अस चालायच. दिसण भारतिय, नाव भारतिय. त्यातच ते क्षेपणास्त्र की काहीतरी एक चाचणीबद्दल चालल होतं. मग ही लागली (पुरी पाश्च्यात्त म्हणजे अगदी देव्हार्‍यातले अशी समजूत) नॉर्थ कोरीया प्रकरण. हे लोक दर रविवारी जे एकत्र जमुन भाषण ऐकतात त्याचा परिणाम शुक्रवारच्या भाषणांपेक्षा कमी नसतो हे लक्षात घ्या. तर काय म्हणे नॉर्थ कोरीयाचे ते क्षेपणास्त्र जर जपानवर पडल तर? किती लोक मरतील? मी विचारल 'जपान? ते दोन अणुबऑम्ब टाकलेलं?" पडला चेहरा काही बोलता येइना. मग सांगायला लागली जर ब्रिटीश आले नसते तर भारत अजुन मागासलेलाच राहिला असता. मी म्हंटल भारत सुधर्वायला ब्रिटीश आले होते का? की लुटायला आले होते? आणि लुटत कोण? ज्यांच्याकडे काहीही नसते तो. धर्मांतरामुळे किती लोकांनी जीव दिले माहीते आहे का? तुला हे धर्मांतर मिअरवायला लाज कशी वाटत नाही? जाम भडकली. म्हणे उखडुन टाका ती रेल्वे मग. कशाला हवि. ती तुमच्या प्रॉस्पेरीटीसाठी केली गेली ना? हसुन हसून पुरेवाट माझी. म्हंटल लुटलुट जलद व्हावी म्हणुन रेल्वे आणली गेली. तुम्ही लोक चायनात पोहोचला नाहीत म्हणुन चायनाची प्रगती थांबली का काय? उद्दंड असतात हे लोक. चर्च मध्ये राजकिय अन सामाजिक प्रवचने दिली जातात. त्यातलच एक शिखांना चिथावणी देणारा भाग म्हणजे "शिख हे एक बेट होते आणि ते भारताला येउन चिकटले" अडाणी ऐकतात म्हणुन आश्चर्य नाही वाटत पण जेंव्हा शिकलेले सुद्धा असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात तेंव्हा खरच खेद वाटतो. आत्ता माझ्याबरोअबर वॉलेंटिअर म्हणुन काम करणार्‍या दोन बायका आहेत. एक ख्रिश्चन दक्षिण भारतिय, एक चायनिज. या चायनिजला फार हौस भारतातल्या घडामोडी घेउन भारताचा अपमान करण्याची. अश्यावेळी मला अपमान वाटतो,पण या ख्रिश्चन बाईला नाही. ती गप्प बसुन हा हा म्हणत असते.

In reply to by स्पंदना

दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे जे परिवर्तीत किंवा बाटवलेले ख्रिश्चन आहेत त्यांना त्यांच्या धर्माबद्दल नको तेव्हढा अभिमान अन हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे.
बाटगा नेहमी जोरात बांग देतो असे म्हणतात ते उगाच नाहि.

In reply to by स्पंदना

यात उद्दंडपणा काय आहे हे समजले नाही. काही वर्शांपूर्वी काही लोकाना सक्तीने बाट्वले गेले. पण त्यानंतरच्या पिढ्यांना तो धर्म जन्माने मिळालेला असतो आणि त्या धर्माबद्दल त्याना प्रेम वाटणं यात काही गैर नाही.

In reply to by उद्दाम

आपल्या धर्माचा अभिमान असणे कधीही चुक नाही पण "हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे." हे सुध्धा त्यातच??? हा "उद्दंडपणा" न समजण्याइतके "reading between the lines"???

In reply to by नितिन थत्ते

भूतकालातल्या अप्रिय आठवणी उगाळणं हे गेलेल्या माणसाला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यासारखं आहे.

In reply to by नितिन थत्ते

या असल्या धाग्यांतून काय फीड केलं जातंय एकवीसाव्या शतकात? >>> काय दिवस आलेत ?? इतक्या प्रतिसादांमधुन या एका प्रतिसादाशी सहमत , ते ही चक्क थत्ते चाचांच्या .....सुर्य कुठुन उगवला आज ? अरे हो , आज उगवलाच नसावा बहुधा ... मी वरील प्रतिसादाशी हज्जार्वेळा सहमत आहे आणि स्ट्रॉन्गली सहमत आहे .

इन्॑क्विज़िशन ही युरोपीय मध्ययुगात पुरेपूर बदनाम झालेली संस्था आहे. भारतात पोर्ट्युगीज़ांच्या ताब्यातल्या इटुकल्या प्रदेशात इतके अनन्वित अत्याचार झाले, मग युरोपात किती हाहा:कार उडाला असेल? या जाचाला कंटाळून प्रॉटेस्टंट्स वेगाळे झाले, रनाय्सांसचे नवे युग अवतरले, योरपला नव्या जगाचा शोध लागला, वसाहती झाल्या हा सर्व इतिहास चांगल्या दस्तैवजांनिशी ग्रंथबद्ध आहे. मेक्सिको, (मेहिको) ब्रझील सारख्या वसाहतींमध्ये प्रचंड लुटालूट झाली. माया, अ‍ॅझ्टेक, इंका या संस्कृती धुळीस पावल्या. हे नवे आक्रमक ताज्या दमाचे आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. टोळ्याटोळ्यांच्या (ट्राय्बल) जीवनशैलीहून वेगळी जीवनपद्धती आचरीत होते. नव्या जगातल्या टोळीप्रमुखांना यांच्या शस्त्रांचे आकर्षण वाटे. सोन्याचांदीसारख्या मौल्यवान वस्तूंच्या बदल्यात त्यांनी ती घेतली. टोळीयुद्धातल्या वर्चस्वासाठी या शस्त्रांचा स्वजनविनाशकारी उपयोग झाला. टोळ्यांतले वैमनस्य हे जबर असते हे आजही आपल्याला अफ्घान वॉर-लॉर्ड्स किंवा आपल्या अब्रूहत्यांवरून दिसतेच. मेक्सिकोमध्ये कोंक्विस्टेडॉर्स्नी धुमाकूळ घातला. ते पेशाने स्पॅनिश साम्राज्यशाहीचे धंदेवाईक सैनिक (प्रोफेशनल वॉरियर्स) आणि धर्माने कॅथलिक होते. त्यांच्या मोहिमा या सुरुवातीला संपत्तीसाठी होत्या, धर्मप्रसार हे उद्दिष्ट नव्हते. आधुनिक युगात अशी लुटालूट आणि सक्तीची धर्मांतरे थोडी कमी झाली तरी पाश्चात्य संस्कृती आणि समृद्धीची इतकी भुरळ जगावर पडली की थोड्याश्याच मेंदूमार्जनाने धडाधड धर्मांतरे होऊ लागली. विसाव्या शतकाचे मृदू लक्ष्य बौद्धप्रदेश हे होते. फिलिपीन्स मॅगेलनच्या आगमनापासूनच क्रिस्टिअनिटीच्या रडारवर होता, तो आणि कोरिया आता पूर्णपणे क्रिस्टिअन झाले. पॅसिफिक आणि पॉलिनेशियामध्ये क्रिस्टियन धर्माने चांगलाच जम बसवला आहे. आफ्रिकेमध्येआल्बेर्ट श्वाय्त्झर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सेवाकार्याद्वारे क्रिस्टियन धर्माची मुहूर्तमेढ रोवली. उत्तर आफ्रिकेत इस्लामच्या प्रखर विरोधाला तोंड देत क्रिस्टिअन धर्माची आगेकूच चालू आहे. पोर्ट्युगेज़ांनी त्यांच्या ताब्यातल्या इटुकल्या प्रदेशात धर्मछळ केला हे खरेच. पण बाकी भारताचे काय? अडाणी गरीब जनतेचा गैर्फायदा त्यांनी घेतला हेही खरेच (मानू). पण ही जनता अडाणी का राहिली? या दरिद्री प्रदेशात विकासाचे वारे आणि नारे का घुमले नाहीत याची उत्तरे शोधायला हवीत आणि ती त्या काळच्या भारतीय आणि जागतिक अशा सामाजिक-राजकीय वास्तवाशी निगडित आहेत. ता.क. ही चर्चा फक्त पावाच्या आख्यायिकेच्या खरेखोटेपणापुरतीच मर्यादित रहावी हा उद्देश धागाकर्तीने पुरेसा स्पष्ट केला आहे. पण इतर आनुषंगिक मुद्देही बरेच आहेत आणि प्रतिसादांतून दिसले, म्हणून लिहिले आहे.

In reply to by राही

पूर्णपणे सहमत.
आफ्रिकेमध्ये आल्बेर्ट श्वाय्त्झर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सेवाकार्याद्वारे क्रिस्टियन धर्माची मुहूर्तमेढ रोवली.
पण ह्या सेवाकार्यांचा मूळ उद्देश काय होता ते पाहाणे महत्त्वाचे आहे. द. अफ्रिकेत (कृष्णवर्णीय) डेसमण्ड टूटू नावाचा पाद्री होऊन गेला. त्याची अर्थगर्भ अवतरणे वाचण्याजोगी आहेत. तो म्हणतो - १) When the missionaries came to Africa they had the Bible and we had the land. They said "Let us pray." We closed our eyes. When we opened them, we had the Bible and they had the land. २) Be nice to the whites, they need you to rediscover their humanity.