Skip to main content

विहिरींत पाव

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 28/11/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. Inquisition Cruelty युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते. एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही. आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.
अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.
असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.

वाचने 51564
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

ईशान्य भारतातदेखिल तेरेसा बाईंमुळे अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता असे वाचले आहे. पुर्वी बहुसंख्य हिंदु, बौद्ध असणार्‍या या प्रदेशात आता ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या ख्रिश्चन आहे म्हणे. (तो अर्थात गोडीगुलाबीमुळे झाला होता.) केरळातदेखिल बरेच लोक बाटुन ख्रिश्चन झाले ते गोव्याच्या पद्धतीने का ईशान्य भारताच्या?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदर असणाऱ्यांनी एकदा हेल्स एन्जल हे पुस्तक वाचावे किंवा त्यावर बीबीसी ने काढलेली डॉक्युमेंटरी पाहावी. दारात आलेल्या मरणासन्न माणसाला उपचार देण्याआधी ख्रिस्ती करून घेतले जायचे असे ऐकून/वाचून आहे.

बरीच मौलिक माहिती मिळाली. पाच सहा वर्षांपूर्वी एका ऑफिस पार्टीमध्ये एक डिमेलो/डिकास्टा/डाकुन्हा (तत्सम) नावाचा इसम भेटला होता. त्याने ही कथा आणि आजही अशा धर्मांतरित लोकांना "माँ का पाव" म्हणतात वगैरे व्यथा सांगितली होती. मला वाटलं त्याचं विमान हवेत गेलं असल्यामुळे सेंटी झाला असावा.

In reply to by आदूबाळ

अशा धर्मांतरित लोकांना "माँ का पाव" म्हणतात
"माँ का पाव" हे पहिल्यांदाच ऐकले!!! हां, किरिस्ताव मंडळी चर्चमध्ये जाऊन, "देवा माका पाव" अशी प्रार्थना करतात, असे ऐकले आहे! अवांतर १ - देवा माका पाव (कोंकणी) = देवा मला पाव (मराठी) अवांतर २ - इथे पाव हा शब्द खाण्याचा पदार्थ ह्या अर्थाने वापरला नसावा, असे वाटते ;)

In reply to by आदूबाळ

ते "माका पाव" असावं! म्हणजे "देवा मला पाव" (प्रसन्न हो). थोडक्यात म्हणजे तो देवाला म्हणत होता, की "देवा सॉरी, पण हे बोललो म्हणून रागावू नको."

In reply to by पैसा

`आजकल पाव जमींपर नही पडते मेरे' अशी गोष्ट असेल तरच सॉरी म्हणावं लागेल. कारण पाव जमीनी ऐवजी `विहीरीत' पडलायं म्हणून.

In reply to by संजय क्षीरसागर

याचा खरा उच्चार "म्हाका पाव" असा आहे. देवाला (येशूला)सॉरी म्हणण्याचं कारण हे की तो आता जन्माने ख्रिश्चन आहे पण पूर्वजांच्या हिंदू धर्म आणि देवाबद्दल आपुलकी दाखवतो आहे. गोव्यात हे अगदी कॉमन आहे. आपण करतोय हे बरोबर की चूक अशा गोंधळात कोणीही पडतो तेव्हा बोलताना "देवा तू पाव" असे शब्द सतत वापरतो.

In reply to by पैसा

पाववाले हा शब्दप्रयोग या लोकांसाठी सर्रास होताना ऐकला आहे.

कोंकणीत आणि जुन्या मराठीतही पावणे म्हणजे पोचणे, अलीकडच्या मराठीत मिळणे, भेटणे. वस्तू पोचल्याचा दस्त म्ह्णजे पोच-पावती. धाव पाव सावळे विठाई म्हणजे विठूमाउली, तू धावत येऊन मला भेट, माझ्यासमोर येऊन ठेप, मला दर्शन दे. प्रसन्न होणे हा मराठीतला अर्थविस्तार नंतरचा आहे.

In reply to by राही

महाराष्ट्रीय क्रिस्टियनांमध्ये देव, देऊळ, माउली, सण हे शब्द सररास वापरले जातात. त्यांच्या धर्मात येशु हा मसीह, प्रेषित असला तरी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही ट्रिनिटीसुद्धा आहे.

In reply to by राही

दिवसांनी हे लोक दया, क्षमा, शांती, करूणा, प्रभु इ. शब्दांचे पण स्वामित्वाधिकार मिळवणार आहेत.

सृष्टिलावण्या यांच्या काही लेखनाशी मी अनेकदा असहमत झालो आहे. मात्र, यावेळी अतिशय मार्मिक लेखन आहे.. पटले.. आवडले. यादृष्टिकोनातून (धर्मातंरात पावाचा वाटा किती नी छळाचा किती?) अधिक माहिती वाचायला उत्सूक आहे

मुसलमान गाईचे मांस तोंडात कोंबत असे ऐकले आहे.

इनक्विझीशन साठी निघालेली पुर्तुगिज पाद्री आणि सैन्याची पलटण, १७८३ सालचे हे चित्र आहे. हे प्रयत्न चौल शेजारच्या मराठी मुलखात झाले म्हणून संभाजीराजांनी २ पाद्र्यांची मुंडकी छाटली आणि अनेकांना कैदेत टाकले. १६८२ साली चौल बंदर आणि किल्ल्यावर मराठ्यांनी केलेला हल्ला याच संदर्भात होता. वसई,कोकण, गोवा या भागात इनक्विझीशन ज्या संस्थेने अथवा धर्मसत्तेने केले ती म्हणजे La Compañía de Jesús (चर्च ऑफ दि सोसायटी ऑफ जिजस), आजही याचं अस्तित्व जगातील ६९ देशात आहे.

In reply to by मालोजीराव

जबरा आहे, कुठे मिळाले...

In reply to by मालोजीराव

अविनाश धर्माधकारी यांनी सांगितल्या प्रमाणे पाद्रयांची मुंडके शिवाजी महाराजांनी छाटली होती.. संभाजी महाराजांनी नव्हे.

सौन्दाळा यांच्या मुद्द्याला अनुसरून, आज भारतीय लोकसंख्येचे जे चित्र दाखवले जाते ते खरे आहे का असा प्रश्न पडतो. ८०$ हिंदू ,१३% मुस्लीम, ४& ख्रिश्चन वगैरे आकडे हे हिंदुना व हिंदू-हितवादी संघटनांना भ्रमात ठेवण्यासाठी फेकलेले आकडे वाटतात . प्रत्यक्षात हा भ्रमाचा भोपळा फोडून सत्य आकडे कोणास माहित आहेत का? माझ्या मते हिंदू ६०% पेक्षा कमी असून मुस्लीम २५% व ख्रिश्चन १२% पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे . खांग्रेस सारखे राजकीय पक्ष मुस्लीम व ख्रिश्चन व्होट बँक साठी एवढे लांगुलचालन करतात ते उगाच नाही ! बाकी लेख व चर्चा फारच उद्बोधक आणि विचारप्रवर्तक होत चालली आहे ,यात संशय नाही.

येशु असे म्हणतो की पाव हे माझे मांस आणि वाईन हे रक्त. असे असल्याने विहीर बाटली (आणि पाणी पिणारे लोकही) ... संदर्भः आजीच्या गोष्टी, लिखीत पुरावा नाही.

त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली.
कडक त्याच्यामायला!

हे प्रकरण जगाला सुपरिचित, वेल-डॉक्युमेंटेड आणि इतिहासाने मान्य केलेले असे आहे. आपण नव्याने सिद्ध करण्याजोगे असे यात काहीही नाही. आपल्याला विचार करण्याजोगी गोष्ट ही की सोळाव्या सतराव्या अठराव्या शतकानंतरही क्रिस्टिअन धर्म जगभर झपाट्याने का वाढला? आफ्रिकेतल्या टोळ्यांचे धर्मांतर का झाले? ईशान्य भारतात का झाले? आंध्रात का झाले? आता ओडिशात का होत आहे? हेमलकसाच्या अरण्यात नागर वस्तीतले कोणी बाबा आमटे पोचण्याआधी नागेपळ्ळी येथे मिशन कार्य का आणि कसे सुरू झाले? आजही तुळूभाषक कोळी क्रिस्टिअन बायका का करीत आहेत? आमच्या खंडप्राय भारतात बाबा आमटे नामक एकुलत्या एक संताला जी गोष्ट विसाव्या शतकाच्या मध्यावर सुचली, ती त्याआधी दीडशे वर्षे कुणाला का सुचली नाही? अज्ञानी भोळसट लोकांचा गैरफायदा घेतला गेला असे मानले तर हा सामना ज्ञानी आणि हुशार विरुद्ध अडाणी आणि भोळेभाबडे असा होता हे कबूल करावे लागते. म्हणजे हे'युद्ध' (या जागी हा शब्द मला योजावासा वाटत नाही) उरू होण्यापूर्वीच हरले गेले होते. ह्या भोळ्या लोकांकडे जे जुने ज्ञान होते त्या जोरावर ते ह्या नव्या लोकांवर मात का करू शकले नाहीत? योरपमधल्या लोकांकडे असे काय होते म्हणून ते जग पादाक्रांत करू शकले? त्यांना कोणती नवी विद्या मिळाली होती, त्यांच्या रहाणीत, आचारविचारात असे कोणते बदल झाले होते की ज्यामुळे हे शक्य झाले? इतर जगातील, विशेषतः भारतातील जनता अडाणी का राहिली? ती या लोकांच्या भूलथापांना का बळी पडली? या सर्वाचा विचार जोवर आपण करीत नाही, आत्मपरीक्षण करीत नाही तोवर मिशनर्‍यांचे हेतू शोधत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. हे म्हणजे मेलेल्या सापाला पुन्हा पुन्हा बडवण्यासारखे किंवा साप निघून गेल्यावर भुई धोपटण्यासारखे आहे. ता.क. बाबा आमटे एकटेच नव्हेत, रास्वसंघाचे, रामकृष्ण मिशनचे, इतरही संस्थांचे कार्य आहे हे मला ठाऊक आहे. पण या प्रश्नाची व्याप्ती पहाता ते 'फार थोडे आणि फार उशीरा' या स्वरूपाचे आहे.

In reply to by राही

मूळ उद्देश ख्रिश्चन धर्मावर टीका नसून पोर्तुगीजांच्या द्वारे तो ज्या प्रकारे पसरवण्यात आला त्याविषयी लोकजागृति तसेच आपल्या पूर्वजांच्या भूमित अत्याचारांचे थैमान मांडणाऱ्या पोर्तुगीजांविषयी केवळ समान धर्मीय म्हणून काही साष्टीकर नागरिकांच्या व ख्रिस्ती मिशनरीज् द्वारे दाखवले जाणारे ममत्व हा आहे. आफ्रिकेतील टोळ्या ख्रिश्चन नक्कीच झाल्या पण त्यातल्या ज्या शिल्लक राहील्या त्या ख्रिश्चन झाल्या (वा ज्या ख्रिश्चन झाल्या त्याच शिल्लक राहील्या) हे सांगायचे आपण विसलेले दिसता. आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे वंशच्छेदासाठी प्रसिद्ध आहेत. वंशच्छेद आणि मानवी गुलामांची तस्करी ह्यात अफ्रिका पोळून निघाला. वर मी डेसमंड टूटूंची अवतरणे दिलीच आहेत. श्रीलंकीय कर्णधार अर्जुन रणतुंग अगदी मार्मिक पणे म्हणाला होता, आम्हाला अडीच हजार वर्षांची संस्कृति आहे आणि ऑस्टेलियाची (वंशविनाशाची) संस्कृति सर्वच जाणतात.

In reply to by सृष्टीलावण्या

माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात किंवा प्रतिसादांत क्रिस्टिअन धर्मावर टीका आहे' या गृहीतकावर आधारित नव्हता किंवा त्या धर्माची भलामण करण्यासाठीही नव्हता. किंबहुना मी हे गृहीतक मानलेच नव्हते. माझा रोख इतकाच होता की हे लोक आपल्यापर्यंत सात समुद्र ओलांडून पोचलेच कसे, परक्या भूमीत त्यांनी बस्तान बसवलेच कसे, इतकी क्षमता त्यांच्याकडे कशी आली आणि आम्ही त्यांच्यापुढे इतके दुबळे का ठरलो यावर आता विचार व्हावा. गोवा-वसई हा संपूर्ण भारताच्या मानाने फारच छोटा प्रदेश आहे आणि तिथे धर्मछळ झाला हे सर्वांनाच मान्य आहे. मुंबई-ठाण्यातल्या साष्टी प्रांतातल्या ईस्ट इंडिअनांविषयी म्हणाल तर आमचा त्यांच्याशी नित्य संबंध होता. त्यांच्या बहुतेक चालीरीती ह्या ठाणे जिल्ह्यातल्या आगरी-भंडारी-सोमवंशी क्षत्रियांसारख्या आहेत. गेल्या पिढीपर्यंत त्यांच्यात मराठीतूनच शिक्षण घेण्याचा आग्रह असे. तिथल्या हिंदू जमीनदारांनी जमिनी विकल्या तरी (चर्चच्या सहाय्याने का होईना) बिल्डरांचे आक्रमण परतवून लावण्यात हा समाज बराच काळ यशस्वी झाला. तिथे हिंदू आणि क्रिस्टिअनांमध्ये वैमनस्य नव्हते. 'हरित वसई' आंदोलन हे मुख्यतः याच लोकांच्या पाठबळावर दीर्घकाळ चालू शकले. ते अजूनही आपल्या शेतात खपतात.आणि त्यामुळेच स्वभूमीविषयी त्यांना अभिमान आहे. इतके लिहिण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वागण्याबोलण्यात हिंदुद्वेष कधी फारसा दिसला नाही. मुंबईतही काही ईस्ट इंडिअन गावठाणे आहेत, तिथे हा समाज आता अगदी अल्पसंख्य आहे आणि काळाच्या रेट्याविरुद्ध आपल्या जुन्या (मूळच्या आगरी-भंडारी) परंपरा, चालीरीती जपतो आहे. आता तर मुंबईच्या आजूबाजूचा मोठा परिसर महानगरे म्हणून विकास पावताना यांची मूळ गावठाणे अधिकच संकोच पावत आहेत. आणि परप्रांतीयांच्या आगमनामुळे अल्पसंख्य होत गेल्यामुळे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याइतकी ताकद त्यांच्याकडे राहिलेली नाही. भ्रष्टाचार,खाबूगिरी याला या लोकांचा विरोध असतो आणि सद्य परिस्थितीचा कानोसा घेता यांचा कल स्वच्छ कारभार देण्याचे आश्वासन देणार्‍या (promising) मोदी यांच्या बाजूने आहे. धर्मछळामुले ते क्रिस्टिअन झाले असतीलही, पण त्याचे आता काय? २) अर्जुन रणतुंग यांच्या 'त्या' विधानाचा रोख हा ऑस्ट्रेलिया हे युरोपातल्या, विशेषतः इंग्लंड मधल्या तडीपार लोकांनी वसवलेले आहे याच्याशी होता. त्यांच्या गुन्हेगार पार्श्वभूमीशी होता.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद. आपलेही लेखन वाचनीय, माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे अभिनिवेशरहित असते आणि अर्थात माझ्याकडून उत्सुकतेने वाचले जाते.

In reply to by राही

वसई-विरार-उमराळा ह्या ठिकाणच्या काही ख्रिस्ती बांधवांशी आमचे पण घरगुती संबंध आहेत. इतकेच नव्हे तर आमच्याकडे पण सुवार्ता अंक येत असे. हरित वसई ह्या आंदोलनाविषयी पण बरेच वाचले आहे. माझा आक्षेप केवळ काही मंडळींच्या द्वारे पोर्तुगीजांच्या उदात्तीकरणाला आहे. इन्क्विझिशन हे सत्य आहे आणि त्यासाठी त्या परिसरातील (तसेच गोव्यातील) चर्चेस नी पोर्तुगीज सरकार कडे माफिनाम्याची जाहीर मागणी केली पाहिजे. तसेच ह्या छळांसाठी जबाबदार लोकांना देण्यात आलेले संतपद काढून घेण्यात यावे अशी जाहीर मागणी केलीच पाहिजे. धर्माचे प्रेम वेगळी गोष्ट आहे आणि आक्रमकांचे प्रेम ही गोष्ट वेगळी आहे. अर्जुन रणतुंग कोणता विचार घेऊन बोलला हे क्षणभर बाजूला ठेवले तरी ऑस्ट्रेलियातील वंशसंहार हा प्रत्येक सहृदय मानवाकडून आजही तिरस्कृत आहे. From the beginning of the British invasion of Australia (justified on the myth of terra nullius), the Indigenous people were slaughtered on a grand scale. In Tasmania between 1804 and 1834, the Aboriginal population was reduced from an estimated 5000 people to just 200, which represented a 90% reduction in just 30 years. In Victoria it has been estimated that the Koori population declined by about 60% in just 15 years between 1835 and 1850 as more than 68 individual ‘massacres’ were perpetrated in that period. Indeed, according to representative of the North West Clans of Victoria, Mr Gary Murray, of the 38 clans that lived in Victoria B.C. (Before Cook) only 24 today have living descendants. By 1850 virtually all active resistance to the invasion had been quelled in Victoria. Census figures published in March 1857 showed that only 1,768 Aborigines were left in all of that state. So comprehensive was the ‘ethnic cleansing’ of Australia that out of an estimated 500 language groups on mainland Australia when the British arrived, barely half that number of languages were to survive.

In reply to by राही

प्रचंड वेगाने शाकाहारी सोसायट्यांच्या ताब्यात चाललेल्या मुंबईत या मांसाहारी अल्पसंख्यकांचे कसे निभावणार बरे? बाय द वे, प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला ग्रामण्यांचा इतिहास देखील वाचनीय आहे. पेशवाईमध्ये नेमके काय घडले याचा हा एक छोटासा नमुना.
पेशवाईत पहिले ग्रामण्य दैवज्ञ (सोनार) जातीविरुद्ध करण्यात आले. त्यांचा वेदोक्ताचा अधिकार काढून टाकण्यात आला. दुस-या ग्रामण्याच्या वेळी पुण्यातील प्रमुख दैवज्ञांच्या घरांवर गारद्यांनी धाडी घातल्या. दैवज्ञांना बेड्या ठोकून त्यांच्या घरातील धार्मिक विधीच्या चीजवस्तू जप्त करण्यात आल्या. मग दैवज्ञांना खरपूस मारहाण करून कोठड्यात कोंडले. दोन-दोन दिवस अन्नोदकही त्यांना नाकारले. या भयंकर शिक्षेचे कारण काय तर दैवज्ञ आपणास ब्राह्मण म्हणवीत आणि वेदोक्त पद्धतीने स्वज्ञातियांच्या वृत्ती चालवीत. त्यांच्या मुसक्या बांधून नाना फडणीसासमोर सुनावणी झाली. कित्येक दिवस त्यांना कोठडीत ठेवून प्राणांतिक मारहाण चालू ठेवण्यात आली. पंडीत बोलावण्यात आले. काहींच्या मते त्यांना ब्रह्मकर्म करायचा अधिकार आहे, असा कौल झाला. इतर काहींनी विरोध केला. अय्याशास्त्री यांनी विरोधी कौल देऊन वेदोक्त नाकारले. ताबडतोब गारद्यांनी दैवज्ञांची जानवी तोडविली, धोतरे फाडून पंचे करवून नेसविले व गंध पुसून टाकून पुन्हा कोठडीत डांबले. प्रबोधनकार म्हणतात की, दैवज्ञ सोनारांनी वेदोच्चार करू नये, देवळात जाऊ नये, वेदोच्चार केल्यास जिव्हा छेदून काढावी. संध्या केल्यास शेंड कापावी, आडवे उभे गंध लावू नये, मौजीबंधन केल्यास हद्दपार करावे, वरात मिरवू नये, असे केल्यास सहा महिने दारिद्र्य येईल. ज्या गावात मिरवेल तिथे महामारीची साथ येईल, अशी अनेक क्षेपके धर्मग्रंथात घुसडलेली आहेत. परशुरामभाऊ पटवर्धन तासगावला देवळात गेले असता दैवज्ञ ब्राह्मण तेथे अनुष्ठानास बसलेले पाहताच त्यांनी आपल्या सैनिकांकडून त्यांना मरमरेतो मारविले. त्यांचे प्राण कासावीस झाले. पण त्यांनी परशुरामभाऊंच्या हातचे पाणी पिण्यास नकार देताच त्यांनी त्या सर्वांस ठार मारण्याचा हुकूम देऊन सर्व इसमांस ठार मारण्यात आले व आजुबाजूच्या गावातील सोनारांच्या जिभा कापून टाकण्यात आल्या. पंढरपूरच्या ग्रामण्यात सोनार ब्राह्मण म्हणवितात म्हणून त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली व हत्तीच्या पायाशी बांधून त्यास ठार मारवावे अशी शिफारस करण्यात आली. श्रीमंत नाना शंकरशेट कृष्णेच्या स्नानाकरिता वाईस गेले असताना तेथच्या भटांनी त्यांना शूद्र शूद्र म्हणून त्यांचा फार उपमर्द केला व कृष्णा नदीत उतरू देणार नाही, असा दम भरला. नानांनी सातारच्या प्रतापसिंह महाराजांपाशी फिर्याद दाखल केली. महाराजांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना शिक्षा ठोठावल्या व नंतर मोठा दरबार भरवून नानांना भरजरी शाल देऊन त्यांचा गौरव केला. नानांवर असाच प्रसंग नाशिकमध्येही आला. नानांनी हत्यारी पोलिस पार्टी आणून भटांचा बंदोबस्त केला. वसई व साष्टी प्रांतात चित्पावन पेशव्यांचा अंमल बसताच हजारो चित्पावन स्थायिक झाले व त्यांनी शुक्ल यजुर्वेद्यांच्या वृत्त्या बळकविण्यास प्रारंभ केला. स्वतःचे ब्राह्मण्य हिणकस असताही हे शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणच नव्हेत अशा उलटा शंख फुंकण्यास त्यांनी सुरुवात केली. १७४२मध्ये वसई येथील चित्पावन ब्राह्मणांनी अग्निहोत्र उच्छेद करून श्रौताग्नी कुंडांचा उच्छेद केला. पळशीकर आदी शुक्ल यजुर्वेद्यांना श्रौताग्नी अग्निहोत्राचा अधिकार नाही, असे सांगून कुंडाचा विनाश केला. १७६५मध्ये अग्नहोत्राचा दुसरा खटला झाला. चित्पावन नारायण जोशी याने, यजुर्वेदी अनंत जोशी यांची हौत्राग्नीकुंडे विच्छिन्न केली. १७७५साली श्री त्र्यंबकेश्वराच्या नव्या देवालयाच्या प्रासाद प्रतिष्ठेत दक्षिणद्वार यजुर्वेदास देण्याऐवजी चित्पावनांस देण्याचा पेशव्यांचा मानस होता. त्यावरून मोठा दंगा झाला. तेव्हा सुमारे शे-सव्वाशे शुक्ल यजुर्वेद्यांस कैद करून कर्नाटकात रवाना करण्यात आले.
अधिक माहितीसाठी हे पहा.

In reply to by अवतार

हे जातिद्वेषाच्या चष्म्यातून एकांगी लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते. इतिहासकार म्हणून कितपत गांभीर्याने बघावे हा प्रश्नच आहे.
वसई व साष्टी प्रांतात चित्पावन पेशव्यांचा अंमल बसताच हजारो चित्पावन स्थायिक झाले व त्यांनी शुक्ल यजुर्वेद्यांच्या वृत्त्या बळकविण्यास प्रारंभ केला.
इतिहास सांगतो की वसई व लगतचा प्रांत पेशव्यांनी आधीच गंगाजी नाईक व बुबाजी नाईक ह्यांचे वतन असल्याचा कबुल केले होते. इथे त्याविषयी प्रत्यक्ष पत्र आहे. ही दोघे भाऊ नावारून तरी चित्तपावन वाटत नाहीत. तसेच १७३९ ला वसई मोहिम आटपली आणि १७४० व १७४१ ह्या दोन लागोपाठ वर्षी थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा ह्यांचे निधन झाले. त्यानंतर आलेल्या पेशव्यांनी ह्या भागाकडे अजिबात लक्ष दिले नाही/ते देऊ शकले नाहीत असे श्रीदत्त राऊत ह्यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादात त्यांनी म्हटले.
पाहावी.

In reply to by सृष्टीलावण्या

यांचे सर्वच लेखन आंधळेपणाने मान्य करावे अशी अपेक्षा नाही. पण पेशवाईच्या काळात धार्मिक अत्याचारांना ऊत आला होता हे अमान्य करण्याचेही काही कारण नाही. इथे पेशव्यांना टार्गेट करणे हा हेतू नसून धार्मिक छळाची परंपरा ही एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी नाही हे सत्य दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. राहिला प्रश्न जातीद्वेषाचा. प्रबोधनकार यांच्या घरात वीर आणि ब्राह्मण असे दोन चांदीचे टाक पूजले जात होते. गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलीत स्वत: प्रबोधनकारांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण कुटुंबाचे प्राण वाचवले होते. ज्या शाहू छत्रपतींनी प्रबोधनकारांना सर्व सहाय्य केले त्या शाहूंना देखील प्रबोधनकारांनी प्रसंगी त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित खरा ब्राह्मण हे नाटक देखील प्रबोधनकारांनी लिहिले आहे. त्यामुळे ज्यांच्या आसपास स्वजातभाईंचीच गर्दी होती अशा इतिहासकारांपेक्षा प्रबोधनकारांची विश्वासार्हता निश्चितच अधिक आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

>>त्यांच्या लेखनात कोणतेही संदर्भ, पुरावे आढळत नाहीत. तुम्हाला कोणते पेशवे, कोणता कालखंड हे हवं होतं नै का? आता तो तपशील आहे तर तुम्ही संदर्भ, पुरावे शोधताय. छान !!. योग्य-अयोग्य, खरंखोटं जर तुम्हीच ठरवणार असाल तर मग चांगलंच आहे. चालू द्या

In reply to by सूड

प्रबोधनकारांचे समकालिन पुढारी एकदा जाहीर सभेत म्हणाले होते की दोन पैशाचा गांजा ओढला की आपोआप नवनव्या कल्पना सुचतात, कल्पनांची विमाने आकाशात घिरट्या घालायला लागतात. ऐतिहासिक विषयांमध्ये कागदी संदर्भ, पुरावा सोडून केलेले लिखाण हे त्याच पठडीतील नव्हे का?

In reply to by सृष्टीलावण्या

>>प्रबोधनकारांचे समकालिन पुढारी एकदा जाहीर सभेत म्हणाले होते की दोन पैशाचा गांजा ओढला की आपोआप नवनव्या कल्पना सुचतात, कल्पनांची विमाने आकाशात घिरट्या घालायला लागतात. आता हे असं बोलणारे जे कोणी पुढारी होते त्यांच्या बोलण्यात किती तथ्य होतं याचे पुरावे तुम्ही मिळवले असतीलच!! ते इथे प्रस्तुत कराल आम्हालाही समजून घ्यायला मदत होईल.कसं??

In reply to by सूड

कोणीच म्हणाले नव्हते (नाहीतर संदर्भ नसते का दिले?) पण एरवी संदर्भहीन गोष्टींचे समर्थन करणारे तुम्ही साळसूदपणे दुसऱ्याकडून कसे लगेच पुरावे मागता ते तर लोकांना कळले. ;) तोच हेतु होता. हे हे हे.

In reply to by राही

+ १ इन्क्विज़िशन ह्या प्रकाराचा अवलंब करुन बर्याच हिंदुना ख्रीस्ती केले गेले मान्य ! पण आपल्या पुर्वजांची जी वर्ण व्यवस्था होती तीदेखील धर्मांतराला तीतकीच कारणीभुत आहे , अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभुत गरजापुर्तीसाठी दलितांना फार संघर्ष करावा लागला , अन्न मागायला आलेल्या दलिताकडुन मणभर लाकडे फोडुन घेणे , इतर अशी बरीच अवजड कामे करुन घेणे , त्यांना सर्व सुविधापासुन चार हात लांब ठेवणे, मंदिरात प्रवेश दिल्याने देव किंवा धर्म बाटेल अशा बालिश रुढी जो समाज पाळतो अशा समाजातील दलितांना दुसरे कुणी सहजासाजी अन्न वस्त्र निवारा उपलब्ध् करुन देत असतील तर ते स्वतःहुन त्या धर्मात का नाही प्रवेश करणार ? बळजबरी करायची काय गरज आहे ? आपला समाज आपल्याला काय वागवतो आहे यापेक्षा हे लोक तरी बरे, म्हणुन पुर्वी स्वतःहुन बरीच दलीत ख्रीस्ती झाले.

In reply to by पियुशा

हे निश्चित सांगितलेत तर बरे कारण इंग्रज राजवटीत म्हणाल तर अनेक ब्राह्मण पण स्वतःहून प्रलोभनांना बळी पडून (तुमच्या भाषेत सांगायचे तर सहजासहजी अन्न, वस्त्र, निवारा मिळतो म्हणून) ख्रिस्ती झाले. (संदर्भ - धनुर्धारी कृत वाईकर भटजी पुस्तक) ह्याच उलट पोर्तुगीज काळात अनेक मागासवर्गीयांनी, कोळ्यांनी, भंडाऱ्यांनी आणि इतर लढवय्या जातींनी प्राण दिला पण स्वतःचा धर्म जाऊ दिला नाही. खेदाची गोष्ट अशी की जे दलित जातिभेदाला कंटाळून ख्रिस्ती झाले त्यांना धर्मांतरानंतर अधिकच खडतर जातिभेदाचा अनुभव आला.

In reply to by सृष्टीलावण्या

खेदाची गोष्ट अशी की जे दलित जातिभेदाला कंटाळून ख्रिस्ती झाले त्यांना धर्मांतरानंतर अधिकच खडतर जातिभेदाचा अनुभव आला.
हो का? तुमचा बराच अभ्यास दिसतो आहे, मग जरा उदाहरण देऊन स्पष्ट करा बरं.

In reply to by अधिराज

गोव्यात ख्रिश्चन समाजात हिंदूंप्रमाणेच जाती आहेत. ते नाईक किरिस्तांव, बामण किरिस्तांव, खारवी किरिस्तांव इ नावाने ओळखले जातात. बामण आणि नाईक किरिस्तांव इ उच्च वर्णातून धर्मांतरित झालेले खारवी आणि तत्सम ख्रिश्चनांना खूप कमी दर्जाचे समजतात आणि आपसात लग्नेही करत नाहीत.

In reply to by पैसा

मिसळपाववरील गोव्यासंदर्भातील लेखामध्ये ही ह्याचे एक उदाहरण दिले आहे ते आठवले.

In reply to by पैसा

धन्यवाद पैसाताई माहितीबद्दल. मला ह्या बद्दल तितकी माहिती नव्हती पण तुम्ही सांगत आहात म्हणजे त्यात तथ्य असेलच. शेवटी धर्म बदलला तरी जातीभेदाची परंपरा लोकांनी चालूच ठेवली म्हणायची.

In reply to by अधिराज

फाऊस्टिना बामा असं नाव असलेली ही लेखिका बामा या नावाने लिखाण करते. तामीळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातल्या ओनगूर या गावातल्या शाळेत ती शिक्षिका आहे. गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासून बामा लेखन करते आहे. तिच्या लिखाणाची सुरुवात आत्मकथेने झाली. बामाच्या गावातील विशिष्ट दलित जातीतील सारेजण ख्रिस्ती झाले होते. ती ख्रिश्चन धर्मातील दलित आहे. तिच्या आजोबांच्या काळातच हे धर्मांतर झालं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट नाही. धर्म बदलला तरी दलितत्व पुसलं जात नसल्याने आलेले अनुभव बामाच्या मनात घर करून बसले. हे दलितत्व ख्रिश्चन धर्मातील लोकही विसरत नाहीत हा अनुभव तर अधिकच त्रासदायक होता. बामाला जोगीण (नन) व्हायचं होतं, पण रोमन कॅथॉलिक चर्चमधल्या ननच्या प्रशिक्षणाच्या वेळी आलेल्या भेदभावाच्या वागणुकीने तिला हादराच बसला. नन बनायला जाताना तिच्या मनात असलेला तळागाळातल्या लोकांचा विचार तिला तिथे कुठेच दिसला नाही. चर्च आणि कॉन्व्हेंटचे विचार आणि संकल्प काही वेगळेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपला अभ्यासक्रम अर्ध्यावरच सोडून ती गावात परतली. मग धर्मपीठाकडून होणारा जाच, अन्याय आणि शोषण याला वैतागून तिने नन होण्याचा मार्गच सोडून दिला. अजून गूगलून अजून लिंक मिळतील. कळावें...

In reply to by अधिराज

संजय सोनवणी म्हणतात - धर्म बदलला तर जातिसंस्था नष्ट होईल असा प्रचार करण्याचा काही कथित विचारवंतांचा कल दिसतो आहे. जाती हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग असल्याने हा धर्मच सोडला तर जातिसंस्था व तदनुषंगिक विषमता नष्ट होईल असा यामागील तर्क आहे. हा तर्क तसा नवीन नाही. बाबासाहेबांनीही धर्मांतराची घोषणा केली व प्रत्यक्षातही आणली ती हिंदू धर्मातील अन्याय्य व अस्पृष्यता बाळगणा-या जातिव्यवस्थेवर लाथ मारण्यासाठीच. तटस्थपणे पाहिले तर या तर्कात फारसा अर्थ नाही हे आपल्याला धर्मांतरीत बांधवांकडे पाहून लक्षात येते. धर्म बदलला म्हणुन जात बदलत नाही हे वास्तव अधिक ठळक होते. भारताबाहेर मुस्लिमांत पंथ असले तरी जाती नाहीत. परंतु भारतात मध्ययुगातच जे धर्मांतरीत झाले तेही आजतागायत आपल्या मुळच्या जातीभावना जपून आहेत असे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गेल्या पाच-सहाशे वर्षांतही येथील मुस्लिमांची जात नष्ट झालेली नाही. खरे तर असे होणे हेच मुळात इस्लामच्या मुलतत्वांविरोधात आहे. ख्रिस्त्यांची व बौद्ध धर्मियांचीही अवस्था वेगळी नाही. आपापल्या पोटजातींचेही निर्मुलन धर्मांतराने साध्य झालेले नाही तर मग जाती कशा नष्ट होणार? आजही असंख्य मुस्लिम/ख्रिस्ती धर्मीय ओबीसी/एस.सी/एस.टी. अंतर्गत गटांत विभागले गेलेले आहेत हे एक वास्तव आहे. मुस्लिम-ख्रिस्त्यांतील जातीव्यवस्था हिंदूएवढी अन्यायकारक नाही असा तर्क अनेकदा दिला जातो, पण ते तेवढे वास्तव नाही.दक्षीणेत दलित ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र चर्चेस व दफनभुम्या असतात. उत्तरेतही वेगळी परिस्थिती नाही.

सेवाकार्याच्या बाबतीत आत्मपरीक्षण करायला हवे ह्या विधानाशी मी ही सहमत. आता आपल्याकडे वैयक्तिक पातळीवर अनेक जणांकडून सेवाकार्ये घडत आहेत. पण त्यांचा धर्माशी आपण संबंध जोडत नाही हे पण खरेच आहे. कारण आपली सेवा बऱ्याच प्रमाणात निरपेक्ष असते. तरीही मोठ्या प्रमाणात समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे हे खरेच अगदी.

इनक्विझिशन विषयी अजून एक गोष्ट. वसई किल्ल्यात खोदकाम करताना एक विहिर मिळाली. त्या विहिरीला कोणताही जिवंत पाण्याचा स्रोत नाही. मात्र त्या विहिरीत काही मानवी हाडे मिळाली. त्यावर श्रीदत्त राऊत ह्यांचे म्हणणे असे की पुरातत्त्व खात्याने त्या हाडांचे कार्बन डेटिंग करावे आणि तेथील मातीचे रासायनिक पृथक्करण करावे. कारण त्यांना असा दाट संशय आहे की त्याकाळच्या पोर्तुगीज धर्मसभेच्या मागे सापडलेल्या ह्या निर्जल विहिरीत ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदुंना तेलात बुडवून जिवंत जाळण्यासाठी करत असावेत. (वाचकांसाठी टीप - श्रीदत्त राऊत ह्यांनी त्या भागातील विस्मरणात गेलेले अनेक किल्ले शोधून काढून, तिथे शास्त्रोक्त खोदकाम करून अनेक ऐतिहासिक पुरावे गोळा केले आहेत. तसेच तिथे शिलालेख शोधून काढून त्यांचे लिप्यंतर करून नवे ऐतिहासिक पुरावे गोळा केलेले आहेत.) पण काही पोर्तुगीज प्रेमी मंडळींच्या दबावाखाली येऊन आजही पुरातत्त्व खाते ही मागणी मान्य करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. (मात्र ट्रेकर्सनी/इतिहासप्रेमींनी ती विहिर अवश्य जाऊन पाहावी.)

In reply to by सृष्टीलावण्या

अरेरे,तेलाच्या विहिरीतून प्रल्हादाला भगवंतानी वाचवलं , मग ते भगवंत यान्ना का बरे वाचवत नव्हते?

In reply to by उद्दाम

नॉन ख्रिस्चन लोकांचे आयुष्य हमखास सुखाचे करु शकणारा येशू जसे कॅथॉलिक - प्रॉटेस्टंट लढ्यात दोघांपैकी कोणालाच मदत न करता, कोणाचेच दु:ख दूर न करता शांत बसून राहिला होता, अगदी तस्सेच बघा.

In reply to by बॅटमॅन

असल्या वादात निरपेक्ष प्रभूच परवडतो.. प्रभू कुणाची बाजू घेऊन कुणाच्या तरी रथावर चढून शानपना करत बसला असता तर मूळ बायबल बाजूलाच राहून नवे धर्मकाव्य जन्माला आले असते. :)

In reply to by उद्दाम

असं कसं? असं कसं? प्रभूने सांगीतलेल्या बायबलच्याही अनेक आवृत्या कालाच्या सोईप्रमाणे बदलत गेल्या आहेतच !

In reply to by यशोधरा

किंवा येशू ची बायको मेरी मॅग्डलीनचा येशू च्या मृत्यू नंतर चर्च कडून होणारा छळ जसा गॉड थांबवू शकला नाही तसाच. किंवा महम्मदाचे सहा वर्षांच्या मुली बरोबर चे लग्न जसे अल्ला थांबवू शकला नाही तसाच. किंवा मुसलमानांतर्फे बामियान च्या मूर्तींचे विध्वंस बुद्ध जसा थांबवू शकला नाही तसाच. "शिकायचा हक्क दिला तरी अक्कल येतेच असे नाही"

फेसबुकवर माझी प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी हा लेख वाचला नव्हता कारण चेपूवर याची फक्त लिन्क होती. आपला शेरा वाचल्यानंतर मिपावर हा लेख आणि यावरील प्रतिक्रिया वाचल्या. इतिहासाचा त्रयस्थ आणि निष्पक्ष दृष्टीकोनामधून अभ्यास करून त्यातून काही बोध घेता आला तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत. इतिहासकाळात कोणकोणत्या प्रकारे किती लोक बाटवले गेले, त्यातले किती लोक आमिषांना बळी पडले, किती लोकांनी अन्य धर्मीयांनी केलेल्या छळामुळे भयापोटी धर्म बदलला, किती लोकांना हिंदू बांधवांनीच छळले, किती लोकांना बाहेर ढकलले गेले वगैरेची आकडेवारी मिळणे तर अशक्य आहेच, त्या बद्दल आज आपण काहीही करूही शकत नाही. एक अभ्यासविषय म्हणून तो ठीक आहे, पण त्यावर होत असलेली बाचाबाची पाहता त्यातून काही भले होण्याची शक्यता दिसत नाही.

In reply to by आनंद घारे

सहमत आहे. असल्या लेखांचा उद्देश परधर्मियांच्या ऐतिहासिक चित्रात काही ग्रे* भाग राहिलेले दिसतात तेही काळ्या रंगाने रंगवून चित्र पूर्ण काळे दाखवणे हा असतो. *नोटः ग्रे लिहिले आहे. पांढरे लिहिलेले नाही.

In reply to by नितिन थत्ते

इन्क्विझिशन हा ग्रे भाग? मग काळा भाग कशाला म्हणायचं? असोच आता.. बाकी माझ्यामते बाटगे लोकं पोर्तुगीज कसे चांगले होते वेग्रे करुन काहीतरी राजकारण करताहेत म्हणुन हा धागा काढलाय असं मला वाटतंय.

In reply to by शिल्पा ब

ऐला ! इन्क्विझिशनला कोण ग्रे म्हणतंय? इन्क्विझिशनख्रीज अन्य मार्गाने घर्मांतर झाले असू शकेल अशी शक्यता असणारी पाव थिअरी हा ग्रे भाग. या लेखाचा उद्देश "छे, पाव थिअरीने धर्मांतर झाले असणे शक्यच नाही केवळ इनक्विझिशननेच/छळानेच धर्मांतर झाले आहे" हे सांगण्याचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून ग्रे उरलेला भाग काळा करणे असे म्हटले आहे.

In reply to by आनंद घारे

अगदी खरे आहे. शिवाय आणखी काही गोष्टी. १)वसईत इन्क्वि़ज़िशनची शाखा नव्हती. २)वसई आणि साष्टी इथल्या लोकांची धर्मांतरे झाली हे खरेच पण त्यांची वेषांतरे म्हणजे सुटाबुटाची सक्ती वगैरे, झाली नाहीत. उलट त्यांच्या चर्चचे मराठीकरण करण्यात आले. पोर्ट्युगीज़ची सक्तीही अजिबात नव्हती. ३)मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असे चर्चचे मत होते. ४)वसई हा सुपीक प्रांत होता. पोर्ट्युगेज़ांच्या इतर वसाहतींना म्हणजे चिंचणी, तारापूर, अशेरी(वर आपण दिलेल्या पेशव्यांच्या लिप्यंतर केलेल्या पत्रातले असेरी) दमण इ.ना धान्य,फळफळावळ वगैरेंचा पुरवठा वसईतून होई. या पुरवठादार शेतकर्‍यांशी त्यांचे संबंध चांगले होते. ५)आज वसईत हिंदू आणि क्रिस्टिअन हे दोन्ही समाज अत्यंत सलोख्याने नांदत आहेत. ६)या लोकांत 'नव्याने उफाळून आलेल्या पोर्ट्युगीज़् प्रेमा' विषयीची आपण चौकटीत दिलेली कहाणी नव्या काळात म्हणजे निदान गेल्या पन्नास वर्षांत घडलेलीच नाही असे वसईतल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. हे नागरिक समाजकार्यात सहभागी असतात. ७) मालाड, भिवंडी वगैरे ठिकाणी परंपरागत वतनदार पाठारेप्रभूंची वतने पोर्ट्युगीज़ांनी घेतली. (नंतर ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली तशीं) यामुळे प्रभूंमध्ये असंतोष निर्माण झाला. अणजूरचे नाईक हे त्यापैकीच. त्यांनी या पोर्ट्युगीज़ांचे पारिपत्य करावे म्हणून पेशवे दरबारात सुमारे पंचवीस वर्षे प्रयत्न केले. पण या काळात एक तर पेशवे निज़ामाला नेस्तनामूद करण्यात गुंतले होते आणि दुसरे म्हणजे या मुंबई,साष्टी,वसई प्रदेशाचे महत्त्व तितकेसे जाणवले नसावे. वसईच्या लढाईतही या एके काळच्या वतनदारांनी मोठे शौर्य गाजवले याचा वृत्तांत 'साष्टीची बखर' या छोटेखानी पुस्तकात आहे. पण या शौर्याच्या मानाने श्रेय त्यांच्या पदरात पडले नाही अशी खंतही आहे. आपल्या हिसकावून घेतलेल्या वतनांसाठी त्यांना बर्‍याच अर्जविनंत्या कराव्या लागल्या. अणजूरकर नाईकांना ती वतने परत दिल्याचे पत्र आपण उद्धृत केले आहेच. ८) जुनी वैमनस्ये आता विसरायला हवीत. ब्राह्मण-मराठे, सवर्ण-दलित यांच्या सध्याच्या भांडणांनाही हाच न्याय लावला पाहिजे. ९)पूर्वीच्या धर्मछळासंबंधात जागृती व्हावी म्हणून हे लेखन आहे असे धागाकर्तीने एका प्रतिसादात म्हटले आहे. हे लेखन वाचणारे तुम्ही-आम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करू हे शक्य वाटत नाही, जिथे जागृती आवश्यक आहे, जे वल्नरेबल आहेत, त्यांच्यापर्यंत 'ते' लोक केव्हाच पोचले आहेत. १०)डी लॉन नावाच्या लेखकाचे इन्क्विज़िशनवरचे लेखन प्रसिद्ध आहे. (ज्याचा थोडाफार आधार प्रियोळकरांनीही घेतला आहे) पण त्यावर एक आक्षेप असाही आहे की तो स्वतः प्रॉटेस्टंट होता आणि कॅथलिकांनी केलेल धर्मछळ त्याने जाणूनबुजून भडक रंगविला, काही गोष्टी फॅब्रिकेट केल्या. हे म्हणजे शेजवलकरांनी राजवाड्यांच्या लिखाणावर टीका करावी तसे झाले. टीकाही खरी आणि मूळ लेखनही प्रामाणिक. असो.

In reply to by राही

पोर्तुगीज प्रेम पण अतोनात दिसते आहे. तरी त्यातील अगदी पहिल्याच वाक्याविषयी लिहिते.
वसईत इन्क्वि़ज़िशनची शाखा नव्हती.
वसई किल्ल्यात खोदकाम करताना एक विहिर मिळाली. त्या विहिरीला कोणताही जिवंत पाण्याचा स्रोत नाही. मात्र त्या विहिरीत काही मानवी हाडे/सांगाडे मिळाले. त्यावर श्रीदत्त राऊत ह्यांचे म्हणणे असे की पुरातत्त्व खात्याने त्या हाडांचे कार्बन डेटिंग करावे आणि तेथील मातीचे रासायनिक पृथक्करण करावे. कारण त्यांना असा दाट संशय आहे की त्याकाळच्या पोर्तुगीज धर्मसभेच्या मागे सापडलेल्या ह्या निर्जल विहिरीत ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदुंना तेलात बुडवून जिवंत जाळण्यासाठी करत असावेत. (वाचकांसाठी टीप - श्रीदत्त राऊत ह्यांनी त्या भागातील विस्मरणात गेलेले अनेक किल्ले शोधून काढून, तिथे शास्त्रोक्त खोदकाम करून अनेक ऐतिहासिक पुरावे गोळा केले आहेत. तसेच तिथे शिलालेख शोधून काढून त्यांचे लिप्यंतर करून नवे ऐतिहासिक पुरावे गोळा केलेले आहेत.) पण काही पोर्तुगीज प्रेमी मंडळींच्या दबावाखाली येऊन आजही पुरातत्त्व खाते ही मागणी मान्य करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. (मात्र ट्रेकर्सनी/इतिहासप्रेमींनी ती विहिर अवश्य जाऊन पाहावी.) जर वसई भागात इन्क्विझिशन झाले नाही तर अशा ऐतिहासिक पुराव्यांची निरपेक्ष तपासणी का होत नाही, तो होऊ नये ह्यासाठी दबाव का टाकण्यात येतो....

In reply to by राही

मुद्दा १०) हा डेलॉन कॅथ्लिकच होता पण उदारमतवादी होता. प्रॉटेस्टंट योरपमध्ये त्याचे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले. एकदोन शतके ते प्रचारकी म्हणूनही गणले गेले. पण नवीन संशोधनानुसार त्यातले तपशील खरे असण्याची शक्यता दिसू लागली आहे.

In reply to by आनंद घारे

त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत. इथे माझ्याकडून कोणत्याही धर्माचा द्वेष चाललेला नाही. हे आपल्याच मनातून निघालेले पिल्लू आहे. इथे केवळ क्रूर आक्रमकांचा आणि त्या आक्रमकांचा अनाठायी पुळका आलेल्या द्वेष आहे आणि तो का नसावा हे सांगाल का... धर्माचा द्वेष पाहायला गेलात तर ह्या लेखावरील प्रतिसादांत आपल्या संदर्भरहित, विसंगत प्रतिसादांद्वारे हिंदु धर्माच्या द्वेष्ट्यांनीच धुमाकुळ घातलेला आहे असे प्रथमदर्शनी तीव्रतेने दिसते.

In reply to by आनंद घारे

त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत.
इथे माझ्याकडून कोणत्याही धर्माचा द्वेष चाललेला नाही. हे आपल्याच मनातून निघालेले पिल्लू आहे. इथे केवळ क्रूर आक्रमकांचा आणि त्या आक्रमकांचा अनाठायी पुळका आलेल्या द्वेष आहे आणि तो का नसावा हे सांगाल का... धर्माचा द्वेष पाहायला गेलात तर ह्या लेखावरील प्रतिसादांत आपल्या संदर्भरहित, विसंगत प्रतिसादांद्वारे हिंदु धर्माच्या द्वेष्ट्यांनीच धुमाकुळ घातलेला आहे असे प्रथमदर्शनी तीव्रतेने दिसते. > > मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे। सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥ - समर्थ रामदास स्वामी

धागा वर आला म्हणून मिसळीचे धुरीण माझ्यावर रागावतील पण नाइलाज आहे. धर्मांतर या विषयाचा शोध घेताना हा अतिशय माहितीपूर्ण धागा सापडला. अशाच ख्रिस्ती धर्मांतरावर आधारीत एक पुस्तक मराठीत आलेले आहे. त्याचे नाव कुणी सांगू शकेल का ! मागच्या वर्षभराच्या कालावधीत त्या पुस्तकाचा परिचय वृत्तपत्रात आला होता. गोव्याला लागून असलेल्या कोकणातील घटना इतिहास यांची पार्श्वभूमी त्यामधे होती.