मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अव्यक्तांच्या समिधा

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज ना उद्या वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल.. तग धरून उभारलेली अंग चोरून वाळलेली आज ना उद्या घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !! जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही.. शेजारी उगवूनही जपलेल्या विरहाची माती व्हायची नाही जोडी अचेतन झाल्यावर कुणी पाहीलंच जर.. खणून तर सापडतील त्यांना दबलेल्या हुंदक्यांत गुंडाळलेल्या अव्यक्तांच्या समिधा... ! अवगुंठीत ज्वालामुखीसारख्या आतल्या आत खदखदणा-या अनामिक ओढीने एकमेकांत सळसळत गुंतणा-या चैतन्याच्या समाध्या ...!!

वाचने 2954 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अमेय६३७७ Sun, 11/10/2013 - 20:28
व्वा. तीव्र भावना असूनही भडक किंवा दुर्बोध झालेले नाहे हे विशेष. पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!>> अप्रतिम

झंम्प्या Mon, 11/11/2013 - 08:13
कविता आवडली. नेहमी माझ्या मनात हा विचार येतो, कविता कुठलीही असो, जेव्हा एखादी भावना कवितेत प्रदर्शित होते, तेव्हा ती भावना कवीने / कवयात्रीने स्वतः अनुभवलेली असते ? विना अनुभवाने ती भावना त्याच तीव्रतेने कवितेत उमटू शकते का ?

In reply to by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)

सांजसंध्या Tue, 11/12/2013 - 18:06
मस्त प्रश्न आहे. कविवर्य भा रा तांबे यांना एक वर्षभर कविता सुचत नव्हती असं म्हणतात आणि जेव्हां कविता आली तीच मधुघट ! याउलट दुसरं उदाहरण म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं. " श्रावणात घननिळा " ही कविता त्यांना एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात लोकलच्या घामट डब्यात धक्के खाताना सुचली.

psajid Mon, 11/11/2013 - 11:54
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !! हे खुप तिव्र आणि वेदनांदायक !

राघव Tue, 11/26/2013 - 23:56
म्हटलं तर हसु.. म्हटलं तर आसु! सुंदर.

कवयित्री/कवि कोल्हापूरकडचे दिसतात. कारण उभे राहणे ला उभारणे असा प्रयोग कोल्हापूरी रांगड्या मराठीतच बहुतकरुन होतो. असो. कवितेतले शब्दवैभव छान परंतु सुमार बुद्धीमत्तेमुळे त्यातले अर्थवैभव काही समजू शकले नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अर्धवटराव Wed, 11/27/2013 - 10:27
प्रथमदर्शनी प्रेमीयुगुलाची, पति-पत्नीची धाटणी वाटली कवितेची...पण आणखी काहि क्रीप्टीक असेल तर आपल्या टाळक्यात अजाबात घुसली नाय. कुणी माईचा लाल/लाली रसग्रहण लिहील तर काय उलगडा होईल.