Skip to main content

मुलं - काही नोंदी

लेखक मितान यांनी सोमवार, 21/10/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही ! नीरव,वय १९. लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध ! रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. सरयू.२१ वर्षे. ११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही. संकेत आणि संध्या. १४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले. विरेन.१४ वर्ष. अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही. अक्षता. १५ वर्षं. गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत. रीमा. वय ८. कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण.. अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक. निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे. अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही. राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही. सारिका वय ११ वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही. आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :( केतन. वय १७. वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत. संकल्प, वय १२ आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय. मृण्मयी वय १५. दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे. सारंग, वय ८ मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" ! आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो. निनाद, वय ८ ६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये." निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती. ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही. अकल्पिता, वय ४ घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही. मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35937
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

पि रा ताई, प्रतिसाद द्यावा कि नाही या संभ्रमात होतो. जसे मुलाला त्यःच्या सद्वर्तनाबद्दल बक्षीस द्यावे तसेच दुर्वर्तनाबद्दल शिक्षा सुद्धा द्यावी. मुलांचे मानसशास्त्र हे एका पातळी पर्यंत ठीक असते. दीड दोन वर्षाची मुले हॉटेलात आईच्या थोबाडीत मारताना पाहतो तेंव्हा आयांना किती कानकोंडे होते ते आपल्याला दिसून येते. दीड वर्षाच्या मुलाला आपण करतो आहे हे चूक आहे हे नक्की कळते.पण आक्रस्ताळे पन केला कि मनासारखे होते हे कळून आले कि ती आपल्याला पाहिजे ते करण्यासाठी तसेच परत परत करीत राहतात. एक लहानसा फोक/ छडी आणून ठेवा आणी तो आक्रस्ताळे पण करायला लागला तर प्रथम दोन वेळा स्पष्ट शब्दात सांगून पहा. (त्याने तो बहुधा सुधारणार नाही त्याने तुमचे पाणी जोखले आहे. यानंतर त्याचे हात धरून त्याला घट्ट जमिनीशी दोन ते तीन मिनिटे दाबून ठेवा याने हि त्याने ऐकले नाही तर त्या फोक किंवा छडीने एक वळ उठेल इतके जोरात मारा. आणी या वेळेस त्याला कोणतीही दया दाखवणे चुकीचे ठरेल. त्याला हि गोष्ट स्पष्ट पणे सांगणे जरुरीचे आहे कि कोणालाही चावणे किंवा ओरबाडणे खपवून घेतले जाणार नाही.त्याने परत चावले किंवा ओरबाडले तर परत एक छडी ओढा. तिसर्या छडी पर्यंत मुलाला नक्की कळून येते कि आपला आक्रस्ताळे पणा खपवून घेतला जाणार नाही. मुलगा दहा मिनिटे रडेल तर त्याला रडू द्या मुळीच सहानुभूती दाखवू नका. तुम्हाला हे झेपणार नसेल किंवा तुम्हाला रडायला येणार असेल तर तुमच्या यजमानांना सांगा. मध्येच तुम्ही कच खाल्लीत तर मुलगा तुमचे पाणी जोखेल आणी पुढच्या वेळेस आणखी आक्रस्ताळे पणा करेल. पुढच्या वेळेस मुलाने याची पुनरावृत्ती केली तर परत छडीचा वापर करण्यास कचरू नका एकदा मुलाला हे स्पष्टपणे कळले कि आई वडील भलत्याच गोष्टी खपवून घेत नाहीत कि तो आपोआप सुधारेल. हे आपल्याला जमणार नसेल तर सोडून द्या. या गोष्टीची मुलाचे आजी आजोबा असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात कल्पना देणे आवश्यक आहे अन्यथा दुसरा मोठा यात पडणार असेल तर आपले प्रयत्न व्यर्थ जातील. कारण हीच गोष्ट मुलगा पुढे बाहेरच्या मुलांबरोबर करेल तेंव्हा ते ती मुले खपवून घेणार नाहीत आणी एक तर त्याच्याशी कोणी खेळायला येणार नाही किंवा त्याला मार खावा लागेल. मुलांना वेळेत शिस्त लावणे आणी कोणती गोष्ट खपवली जाणार नाही हे स्पष्ट शब्दात सांगणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुढे आई वडिलांना रडायची पाळी येउ शकते. वरील गोष्ट मी माझ्या स्वतःच्या आक्रस्ताळ्या मुलाला सरळ करण्यात यशस्वीपणे वापरली आहे. सुदैवाने माझ्या घरी माझी पत्नी आई आणी वडील यांच्या कडून मला पूर्ण पाठींबा होता. माझी आई एम ए बी एड आणी एका शाळेची मुख्याध्यापक होती मुलाचे मानस शास्त्र घेऊन बी ए झालेली होती. माझ्या आई वडिलांपैकी एक मुलाला रागवत असेल तर दुसरा कधीही मुलाला पाठीशी घालत नसे. आणी जरी पालकाची चूक असे तरीही मुलासमोर कधीही पाणउतारा करीत नसे. हीच गोष्ट मी माझ्या मुलांबाबत करतो. बाबा वेडेच आहेत आई वाईटच आहे असे मुलांचे सांत्वन कधीही करू नये (असे न केल्यास मुलांना आई किंवा वडिलांची किंमत राहत नाही) माझ्या आईवडिलांची एक शिस्त होती कि शिस्तीच्या वेळेस शिस्त आणी लाडाच्या वेळेस लाड त्यात सरमिसळ नाही. हा उपाय आजच्या पिढीतील नव्या आईबापाना पटेल असे नाही म्हणून मी प्रतिसाद द्यायला कचरत होतो. आपल्याला पटेल तर करा नाही तर सोडून द्या. मुलांचे मानसशास्त्र या विषयावर एखाद्याला पिंक टाकायची असेल तर टाका मी प्रतिसाद देणार नाही.कारण यावर कितीही वितंडवाद घालता येईल. मी बरोबर कि चूक हे मी माझ्या मुलांच्या बाबतीत स्वताला सिद्ध केले आहे इतरांना सिद्ध करायची मला गरज वाटत नाही

छडी पायावर मारा. हाताने थोबाडीत मारण्यापेक्षा दुप्पट जोराने पायावर मारलेली छडी हि जास्त परिणामकारक आणी कोणताही शारीरिक अपाय न करणारी असते.रागाच्या भरात हात शिवशिवतात पण थंड डोक्याने छडी घेऊन यावी म्हणजे पुढच्या वेळेस छडी पहिली कि मुल आपोआप वळणावर येते. नंतर नंतर मारण्याची गरजच पडत नाही. फक्त छडीचे नाव पुरते. पण छडी खुंटीवर मात्र असावी

In reply to by सुबोध खरे

तुमचं बरोबर आहे की आज कालच्या पालकांना हे पटणार नाही. मलाही पटले नाही. म्हणजे मला मुद्दा पटलाय पण उपाय नाही. मी माझ्या मुलाला छडीने मारु शकणार नाही. अर्थात मी त्याला पाठीत धपाटा घालणे हा प्रयोग केलाय. मग त्याला ओरडणे आणि त्याच्याशी न बोलणे. त्याने बोचकारलं तर हातावर फटका मारणे इ. पण मुळात त्याची बुद्धी (जी एरवी महा स्पीड्ने चालत असते) ती ह्या वेळेला का चालत नसेल? त्याला हे लक्षातच येत नाहीये की समोरचा ओरडतोय तर ते करायच नाही. त्याला समजेल अशी शिक्षा कोणती? त्याला शिक्षा केलीच पाहीजे ह्या मताशी मी पण सहमत आहेच. कारण जे चांगलं असेल त्याला लग्गेच "वा वा वा" करुन आम्ही त्याची पाठ थोपटतो. तर तो उत्साहाने ती गोष्ट करतो. आता असच काही करुन त्याला हे ही समजावायचे आहे की चुक केली की शिक्षा मिळते. पण छडीचा उपाय माझ्याचाने होणार नाही. कादाचित नवरा करु शकेल. मग मला ते पहावणार नाही. आणि तुमचं हे ही अगदी बरोबर आहे की त्यानी आमचं पाणी जोखलय. आणि त्यने अजुन पब्लिकली ह्युमिलिएट करणे वगैरे सुरु केलं नसलं तरी ह्या मार्गाने लवकरच सुपुत्र श्रीमुखात भडकावुन देतील अशी चिन्हे दिसत आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

मारण्याच्या बाजूने न्हवतो म्हणून वर दिलेल्या लिन्क मध्ल्या टिप्स वपरल्या अनि मुलाना न मारता शिस्त लवण्याचा प्रयत्न आत्ता पर्यन्त यशस्वी झाला आहे. डोक्टरनी सन्गितल्याप्रमणे मेसेज जाणे महतत्वाचे आहे.

In reply to by पिलीयन रायडर

घरातली एक जागा ठरवून घ्या. समजा खोलीचा कोपरा. तुमच्या मुलाने मारले, ओचकारले की प्रथम त्याचे दोन्ही हात घट्ट पकडा. त्याला अतिशय ठाम आणि स्पष्ट शब्दात सांगा "माझ्याकडे बघ!" त्याने तुमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघेपर्यंत हेच वाक्य जरबेने म्हणत राहा (ओरडून नव्हे). मुलांना आवाजातला बदल ताबडतोब समजतो. एकदा त्याने बघितले की मग त्याला सांगा "तू जे आत्ता केले आहेस ते चुकीचे आहे. मला आवडलेले नाही. त्यासाठी तुला या कोपर्‍यात भिंतीकडे तोंड करुन ५ मिनिटे उभे राहावे लागेल." त्याला तिथे जबरदस्तीने नेऊन उभे करा. तो परत येईल पुन्हा उभे करा, रडेल, ओरडेल, आदळआपट करेल बिलकूल लक्ष न देता पुन्हा पुन्हा कोपर्‍यात नेऊन उभे करत राहा. ही प्रक्रिया तुमच्या पेशन्सचा कस पाहणारी असते. परंतु एकदा त्याला समजले की आई-बाबा अजिबात ऐकत नाहीत आणि चूक केली तर ते कोपर्‍यात उभे करतात की तो राहायला लागेल. (या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आजी-आजोबांसकट इतरांनी तटस्थ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूल रडत त्यांच्याकडे गेले तर त्यांनी स्पष्ट सांगायला हवे की "आई-बाबा जसे सांगताहेत तसेच कर." एकदा आपल्या चुकीला कोणाचाही आधार नाही हे समजले की मुले चट सरळ येतात!) पुढचा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. एकदा तो पाच मिनिटे उभा राहिला की त्याला जवळ बोलवा आणि प्रेमाने समजावून सांगा की त्याला तिकडे का उभे केले होते. तो तुमचा लाडका आहे परंतु त्याने चूक केली तर ती अ‍ॅक्सेप्ट केली जाणार नाही आणि त्याला दरवेळी असाच टाईम आऊट मिळेल. याहीवेळी बोलणे हे डोळ्यात बघूनच व्हायला हवे, हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय त्यांचं संपूर्ण चित्त तुमच्या सांगण्याकडे नसतं आणि मुलांच्या मनात तो प्रसंग घर करुन बसत नाही! काही मुले जाम टारगट असतात. पुढेपुढे ओचकारुन किंवा मारुन स्वतःच कोपर्‍यात जाऊन उभी राहतात! तर त्यावरचा उपाय म्हणजे एकतर टाईम आऊटची वेळ वाढवणे किंवा त्यांची आवडती वस्तू काही काळासाठी लपवून ठेवली जाईल असे सांगून ती काढून घेणे. इथपर्यंत बहुतेक वळण लागलेले असते! प्रसंगी एखादा जोरदार धपाटा किंवा पार्श्वभागावर सटका ठेवून देणेही चुकीचे नाहीये. परंतु टाईम आऊट आणि आवडती वस्तू, खेळ न मिळणे, इतरांपासून वेगळे पडणे याचा धाक मोठा असतो. एकूणच तुमच्या वागण्यात सातत्य हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय चालते आणि काय चालत नाही यांच्या सीमारेषा अतिशय स्पष्ट हव्यात. -रंगा

In reply to by चतुरंग

टाइमआउट वपरले आहे अनि तेच मी वर दिलेल्य लिन्क मध्ये शिकवले आहे. त्यामुळे न मारता चान्गली शिस्त लागते याला अनुमोदन

In reply to by पिलीयन रायडर

पी रा ताई जर छडी मारणे जमणार नसेल तर नारळाच्या / काथ्याच्या दोरीने हातपाय घट्ट बांधून ठेवणे हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. मुलगा पहिल्यांदा रडेन, आरडा-ओरड करेन, मग शांत होईल. तोपर्यंत whos the boss here ?? या प्रश्नाचे त्याच्या बालमनाने आकलन केले असणार . त्यानंतर तुम्ही त्याला त्याची चूक समजावून पुन्हा असे न करण्याच्या अटीवर मुक्त करावे .

In reply to by निम (verified= न पडताळणी केलेला)

आता मी सांगते की ह्या धाग्यावरुन बोध घेऊन मी काय केले आणि त्याचे काय परिणाम दिसत आहेत.. मी मुलाने चावले, ओरबाडले, मारले तर आधी धपाटा देऊन पाहीला. त्याला हे अजिबात कळले नाही की का मारलाय (मुळात मला असं वाटतय की हेच पाहुन तो मारायला शिकलाय..). मग त्याचे केस ओढले की आपण पन त्याचे केस हलकेच धरुन ठेवायचे म्हणजे तो माझ्या केसांच्या नादी लागत नाही हे लक्षात आले. पण ते चावणे आणि बोचकारणे ह्यांना लागु होत नाही. मग शेवटचा उपाय म्हणजे, बाथरुम मध्ये नेऊन दार लावुन घेणे. असं केल्यावर तो रडतो. "बायको.. बायको" म्हणुन हाका मारतो (ही त्याची थिअरी आहे, की आई ऐवजी बायको म्हणलं तर ही बाई पिघळते). ३० सेकंदात मी दार उघडते कारण तो भलताच धाय मोकलुन रडतो. अशानी बाथरुमची हकनाक भिती मनात बसत आहे असही वाटतय. मला असं खुप मनातुन वाटतय की त्याला "शिक्षा" ही गोष्ट कळालीच नाहीये. त्याला "वेदना" झाली तर त्याला ते कळेल (जे अभिप्रेत असते जेव्हा आपण मुलांना मारतो). पण ती वेदना मी माझ्या मुलाला देऊ शकत नाहीये. त्याला वळन लावलं पाहीजे हे ही मला समजतय. पण मी तेवढी कणखर नाही. तो चावतो तेव्हा मला अशीही शंका येतेय की हा दात सळसलत असल्याने असं करतोय का? कारण तो चिडुन चावत नाही. मस्ती म्हणुन मागे लाग्तो. त्याला बोचकारणे पण मस्ती वाटतेय बहुदा. पण तो मारतो ते मात्र चिडुन.. त्याच्या मनविरुद्ध झालं की तो मारतो (त्याला काही लागलं तर त्याला "हात रे" करायला आम्हिच शिकवलय.. राग आला की आम्हि मारतो, त्यामुळे राग आला की मारायचं / ओरडायचं हे हि तो आमच्या कडुन शिक्लाय ) आता बोला काय करु.. आणि हो, दोरीने हात पाय बांधने वगैरे तर मी इतर कुणा सोबत पण करणार नाही, तो तर माझा पोटचा गोळा आहे. मला समजतय की शिस्त लवायलाच हवी, पण १.५ वर्षाच्या मुलासाठी काही सोप्पं नाही का सांगता येणार?

In reply to by पिलीयन रायडर

एवढ्या लहान मुलाला अजिबात मारू नको. काही वेळ न बोलणे आणि मुद्दाम दुर्लक्ष करणे हा उपाय करून बघ. तो चावतो ते दात येत असल्यानेच असेल. पण काही मुलाना सवय असते. आमच्या सोसायटीतला एक मुलगा अगदी ५ वीत जाईपर्यंत दुसर्‍या मुलाना चावायचा. नंतर हळूहळू सुधारला.

In reply to by पिलीयन रायडर

मुलांना दात वयाच्या सहाव्या महिन्यापासून येतात त्यामुळे मुले त्या वयात कोणतीही गोष्ट तोंडात घालतात. दीड वर्षाचे मुल दात येण्यामुळे चावत नाहीत( ते कुत्र्याचे पिल्लू नाही गल्लत करू नका). त्याला आपण चावतो ओरबाडतो किंवा केस ओढतो या गोष्टी कळत नाहीत हा आपला गैरसमज आहे. स्पष्ट शब्दात सांगतो आपण स्वताची फसवणूक करीत आहात. दीड वर्षाच्या मुलाला स्पष्टपणे आपण काय चूक करीत आहोत ते कळले पाहिजे. अन्यथा ते तीच गोष्ट बाहेरच्या माणसाबरोबर करू शकेल आणि यातून आपल्याला अत्यंत अडचणीची किंवा अवघड (embarrassing/ awkward) उद्भवू शकते. मी आपल्याला प्रथमच सांगितले होते कि जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या यजमानांना सांगा. मुलाला त्रास होईल म्हणून आपण लस टोचणे(इञ्जेक्शन) थांबविले आहे काय? मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही.

In reply to by सुबोध खरे

@ डॉ. साहेब, माझा मुलगा उद्याच्या ३ तारखेला एक वर्षाचा होतोय. अजून एकही दात आलेला नाही. काय कारण असेल? दात न आलेला माणूस नसतो मान्य. येतीलही. पण दात वेळेत न येण्यानं खाता न आल्यानं शारिरीक वाढ कमी होते का?

In reply to by प्यारे१

दात येण्यास सुरुवात होण्याची साधारण वेळ म्हणजे ३ ते १ २ महिने. परंतु काही मुलांना जन्मजात सुद्धा दात आलेले असतात त्यामुळे आईला स्तनपान देताना त्रास पण होतो. याउलट काही मुलांना दीड वर्षापर्यंत दात येत नाहीत. दाताचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. दुधाचेच नव्हे तर अक्कलदाढेचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. मुलाला सर्व गोष्टी खायला द्या. दात नसलेले म्हातारे सुद्धा चिक्की कुटून खातात मग तुमच्या बाळाला द्या की कशाला घाबरता?एक वर्षाच्या मुलाला आई बाप जे जेवतात ते पूर्ण जेवण द्यावे. आपल्याकडे संगणक आहे म्हणजे आपण मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडता तेंव्हा मुलाचे पोषण कमी होईल हि भितीसोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही. अगदी मनापासुन सहमत ! आमचं पिल्लु हल्ली फार दंगा करत ! घरातला जो कप्पा /खण दिसला की त्यातल्या सगळ्या वस्तु अत्यंत वेगाने बाहेर फेकणे हा आवडता छंद झाला आहे.{ आत्ता पर्यंत १०-१५ वेळा चिकटपट्या लावुन खण बंद केले होते ज्याचा टिकाव लागला नाही.} मी एकदा झोपलो होतो तेव्हा पायाच्या कंरगळीचा हळुच चावा घेउन बघितला ! मी ओरडलो नाही तेव्हा अंगठा कडकडुन चावला ! बरं हे सर्व करुन हसुन दाखवायच ! एक नंबरी वस्ताद आहे,मध्यंतरी जेव्हा थोडासा पाउस पडत होता आणि ढगांचा कडकडाट होत होता, तेव्हा खिडकी जवळ येउन हीने ढगालाच एयय्य करुन दम दिला. :) ती जे काही नविन शिकते / करुन दाखवते तेव्हा मी अगदी मनभरुन कौतुक करतो, पण जेव्हा मोकाटपणा वाढतो तेव्हा इवल्याशी ढुंगीवर अगदी अलगदच चापटी मारतो आणि ती काय चुकीचे करते आहे ते सांगतो... आत्ता पर्यंतचा अनुभव आहे की तिला चुकीचे काय आहे ते सांगितले की कळते ! आत्ता पर्यंत फक्त १-२ दाच अशी चिंटकली चापटी मारावी लागली आहे,आता मी फक्त तीच्या कौतुक करण्यासाठी ठेवलेल्या अनेक नावांपैकी एखादे घेऊन दणका हवा का ? असे विचारतो त्यानेच काम भागते ! :) जास्तीत जास्त बुवाजीला बोलवुन आणु का ? असा पोकळ धाक दाखवतो. ;) {कोमल पिल्लाचा कोमल हॄद्य असलेला बाबा}

In reply to by पिलीयन रायडर

दोरीने हात पाय बांधने वगैरे बापरे! हे कसं करणं शक्य आहे? नकोच! मीही कल्पना करू शकत नाही. दीड वर्षं म्हणजे लहान आहे तो!

In reply to by सुबोध खरे

किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर... बाकी वरच्या प्रतिसादाशी हजार वेळा सहमत. मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. असो ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by रामपुरी

किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर...
मी असं गॄहीत धरतोय की तुम्हाला इथे पार्श्वभाग अभिप्रेत आहे. तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?
मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे.
एखादी न करण्यासारखी गोष्ट लहान मुलांनी केल्यानंतर जर त्यांना मारले तर कदाचित पुन्हा मार मिळेल या भीतीपोटी ती गोष्ट मुलं करणार नाहीत. परंतू असा मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसते.

In reply to by धन्या

"तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?" पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता. असो... मुलांना केव्हा, कशासाठी, किती, कुठली शिक्षा करायची हा तारतम्याचा भाग असतो. "मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसत", "ती घरी कुठलीही गोष्ट सांगत नाहीत" असे सरसकट म्हणता येत नाही. कुठल्या वेळी समजावून सांगायचं कधी शिक्षा करायची आणि कधी चक्क दुर्लक्ष करायचं हे प्रत्येक मुलासाठी वेगळं असतं. थोड्याश्या निरीक्षणाने आई वडीलांना ते लक्षात येत असतं. शेवटी मुलाला कसं वाढवायचं हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि पालकांसाठी आयुष्यभराचा अनुभव. मुलांना मारणं/शिक्षा करणं पूर्णपणे चुकीचं किंवा अजिबात न मारता फक्त समजावून सांगणं हेच बरोबर अशी सरसकट विधानं मी तरी करू शकत नाही. ती पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे.

In reply to by रामपुरी

पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता.
"अरे इसने पुलं का माझे शालेय जीवन नही पढा" असं म्हणायचंय का तुम्हाला? ;)

पोरांना शिस्त ही लावलीच पाहिजे-प्रसङ्गी मारूनही. पोराच्या अङ्गाला हात लावणे म्हणजे टॉर्चर नव्हे. तितपत निर्दय होणे म्हणजे मुलांचे घातकर्ते होणे नव्हे.

In reply to by बॅटमॅन

मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारणं हा "क्विक फिक्स" असतो. मारल्याने मुलांच्या मनात भीती निर्माण होते आणि ती गोष्ट पुन्हा करावयास मुलं धजावत नाहीत. परंतू असं केल्याने मुलं त्या कृतीच्या परीणामांपासून अनभिज्ञ राहतात. तसेच कृती आणि तिचे परीणाम यांची सांगड घलणं शिकण्याची संधीही मुलं गमावतात. याला पर्याय हाच की मुलांना त्यांच्या कृतीचे भले-वाईट परीणाम समजावून सांगणं. मुलांना विश्वासात घेऊन हे केलं की मुलंही समजून घेतात. समजावल्यानंतरही मुलं समजत नसतील तर त्या छोटया मुला किंवा मुलीला बालरोगतज्ञाकडे नेणे उत्तम.

In reply to by धन्या

धन्या साहेब, मुलांना अभ्यासाला बसविण्यासाठी मारणे आणी मुल दुसर्या माणसाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर त्यासाठी मारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.मग त्या स्थितीत मुलाला त्याचा अर्थ समजत नसेल तरीही पण उठ सूट मुलाला मारत सुटणे हे वेगळे. आपण म्हणता तशी परिस्थिती हि आदर्श आहे आणी कदाचित अमेरिकेत स्वीकृत केली जाईल. प्रत्येक गोष्ट हि स्थलकाल सापेक्ष आहे. दुर्दैवाने लोक पूर्णपणे वर्ज्य अशा गोष्टींची आणी करू नयेत अशा गोष्टींची गल्लत करताना आढळतात. चूक आणी गुन्हा यातील अंतर समजावून देणे हे अत्यंत आवश्यक आहे. असा प्रयत्न एका मुलाने सरकारी कार्यालयात केला असता( मुलाने संगणकाच्या ups ची तार खेचली आणी त्यांची सिस्टीम क्रेश झाली. त्याच्या बापाला( हा आमचा मित्र होता) सरकारी माणसाने हाकलून दिले आणी अर्थातच पुन्हा कार्यालयात पाऊ ल ठेवू नका अशी तंबी दिली त्यानंतर आपल्या मुलाला शिस्त न लावल्याचा पश्चात्ताप त्या बापाला करायची पाळी आली.

In reply to by सुबोध खरे

आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.
हा परिस्थीती हाताबाहेर गेल्याचा प्रकार आहे. आई वडीलांनी मुल समजावून सांगण्याच्या वयाचं असताना लाडावून ठेवल्यावर ते मुल थोडं मोठं झाल्यावर असे प्रकार होणारच. असं मुल एकदा धपाटा देऊन शांत बसण्याऐवजी अजून एकदा आई वडील किंवा शिक्षकांवर थुंकेल.

In reply to by धन्या

अरे एखादा धपाटा घालणे याचा अर्थ मारणे असा करत असशील तर ते तसं नाहीये. मूल राग आला म्हणून चावत असेल आणि समजावूनही ऐकत नसेल तर पुन्हा कोणाला चावलं तर तिथल्या तिथे एक धपाटा घालणे थोबाडीत मारणे म्हणजे चूक नव्हे. मुलाच्या कलानं घेऊ म्हणता म्हणता मुलं डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. आणि लहानच कशाला मोठ्या मुलांनाही कळलं की आईबाप आपल्या तालावर नाचतायेत की मग मिर्‍या वाटायला कमी करत नाहीत डोक्यावर. अगदी पाहण्यातलं उदाहरण आहे. मुलाला स्टमक अल्सर झाला म्हणून तो बरा होईस्तवर नोकरी सोडायला लावली घरच्यांनी, विशेषत: आईने! याआधीही खुट्टं काही झालं की कित्येक नोकर्‍या सोडायला लावल्याच होत्या. आता अल्सर बरा होऊन दीडेक वर्ष उलटलं मुलगा घराबाहेर पडायचं नाव घेत नाही की आई ठामपणा दाखवत नाही. कोणी विचारलंच तर मुलाला पाठीशी घालणं असतंच. आता स्वत:चेच पाय स्वतःच्या गळ्यात पडलेत, पण सांगणार कोणाला अशी गत आहे. मुलांवर प्रेम नक्कीच असावं पण फाजील लाड हे असे अंगाशी येतात.

Fondle a son until he is five years of age, and use a stick for another ten years, but when he has attained his sixteenth, treat him as a friend. c मारलं, अन त्याच्या मागचं कारण जर समजावता आलं.. तर लै बेष्ट. न्हाईतर पॉर गेलं कामातन.. (आजोबांचा दररोज न चुकता मार खाऊन मोठ्ठा झालेला.. अन अजुन त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा..)

In reply to by यसवायजी

लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् || खरे तर मारण्याची फारशी गरज पडू नये इतपत धाक असला तरी बास. पण हा धाक असणे आणि पोराला कुत्र्यागत जखडून ठेवणे यात तारतम्याने फरक केला पाहिजे.

आधी स्वतःचं वागणं चेक करून बघायला लागेल असं वाटलं. घरातलं आपलं वागणं एकवेळ कंट्रोल करू. पण बाहेर काय होतं यावर लक्ष ठेवणं हे तितकं सोपं नाही. पण मुलांमधल्या बदलांवर लक्ष ठेवणं, त्याला बोलतं करणं हे जमू शकतं. शक्यतो, ज्या मुलांना आईचं प्रेम मिळतं तिथे कमी समस्या येत असाव्यात (घरचं इतर वातावरण नॉर्मल असल्यास). काही घटना (मृत्यू वगैरे) घडल्यास उदाहरणाने समजावून सांगाव्या लागतात. या समस्यांबद्दल मितान यांच्याकडून अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय. बरेच कन्सेप्टस क्लिअर व्हायला मदत होईल.

आणखी एक प्रसंग आणखी एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतोय. माझी मोठी मुलगी आणि छोटी मुलगी यात ५ वर्षाचे अंतर आहे. लहान मुलीचा जन्म झाल्यावर मोठ्या मुलीकडे आईचे थोडे दुर्लक्ष होवू लागले. मोठी मुलगी विचित्र वागू लागली. आणि हे स्वाभाविक होते. आम्ही नेहमी तिला समजावत असू कि छोटी बाळ आहे तो पर्यंत आई तिच्याकडे जास्त लक्ष देणार कारण तिला चालता बोलता येत नाही आहे. एकदा बाळ चालू बोलू लागले कि तिला पण आम्ही दम देणार मारणार सर्व काही तुझ्या सारखे करणार. बरेच दिवस मोठी गप्प राहिली. एक दिवस म्हणाली कि तुम्ही मला मारून का टाकत नाही? आणि मग बाळाचे लाड करत बसा. आम्हाला काय करावे सुचत नव्हते. आम्ही निरुत्तर होवून गप्प बसतोय हे बघून ती हेच वाक्य वरचेवर उच्चारू लागली? बरेच समजावले, मुद्दामून तिच्यासमोर छोट्या मुलीला ओरडायचो. छोटीला काही कळत नसल्यामुळे तिचा प्रश्नच नव्हता. थोडा अति झाल्यावर माझ्या आई ने एक युक्ती केली. एक दिवस नेहमी प्रमाणे मोठी म्हणाली मला मारून टाका. त्यावर आई म्हणाली "चला आपल्याला तयारी करायला पाहिजे हिला मारण्याची. कस मारायचे हिला. विचार करावा लागेल " हा प्रतिसाद मोठीला नवीन होता. ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली कि तुम्ही खरच मला मारणार आहात? मी म्हणालो, "हो, तुला तेच हवे ना?" त्यावर आई म्हणाली अरे बघत काय बसलास एक दोरी आण तिचे हात पाय बांधावे लागतील. हि मात्र बरोबर लागू पडली. मला घट्ट बिलगून म्हणाली कि बाबा मला वाचव. मी सर्व तिच्याकडून कबुल करून घेतले. परत असे बोलणार नाही. बाळाला त्रास देणार नाही. तिने सर्व कबुल केले. त्यानंतर तिने ते वाक्य कधी उच्चारले नाही. आम्ही कदाचित चुकीचे हि वागले असू. मला माहित नाही. पण मुलांना धाक दाखविल्याशिवाय कधी कधी ती ऐकत नाहीत

In reply to by खटपट्या

काही चुकीचे नाही वागलात. माझ्यापण दोन्ही मुलात सहा वर्षाचे अंतर आहे अन मलापण थोडाबहुत हा प्रश्न आला, अजुनही येतो. पण मग तू ताई ना? तू ताई ना? अस म्हणुन आम्ही संभाळुन नेल. जेंव्हा द्यायला हवेत तेंव्हा दणकेच दिलेले योग्य असतात, फक्त डोक फिरवुन घेउन मारण्याऐवजी सुबोध खरे मह्णतात तसे शांतपणे फटके द्यावे.अगदी डोळ्यात पाहुन्न सांगावे मला आवडत नाही तूला मारायला पण मला असे करणे भाग आहे. माझी मुलगी एका मुलीचे पाहुन थुंकायला शिकली. मी दोनदा सांगितले परत असे केलीस तर तोंडाला चटका देइन, ऐकल नाही...तिसर्‍यावेळी उदबत्ती पेटवली. बाईसाहेब जाम घाबरल्या. चटका द्यायच धाडस माझ्यातही नव्हत, पण आता खरच आई देणार हे तिला पटल.

In reply to by खटपट्या

याला सिबलिंग रायव्हलरी म्हणतात पहा http://en.wikipedia.org/wiki/Sibling_rivalry. यासाठी त्या मुलाची मानसिक तयारी हि आई गरोदर असताना सुरु करावी म्हणजे त्या मुलाला येणाऱ्या भावण्डा बाबत आपले पण निर्माण होईल.

विचारात पाडणारा लेख. समस्या कशा हाताळाव्यात याबद्दल वाचायला आवडेल. मिपाकरांच्या प्रतिक्रिया खूप प्रामाणिक. उगीचच धक्का बसला छाप प्रतिक्रिया नाहीत. मुलाला मारावं कि नाही याबद्दल प्रामाणिक मतं व्यक्त केली आहेत. मितान यांना देखील त्यामुळं उत्तरं देताना सोपं जाईल.

शिस्त आणि शिक्षेविषयी स्वतंत्र लेख लिहिण्याची प्रेरणा तुम्ही मंडळींनी दिली आहे. विषय डोक्यात तयार आहे. लवकरच लिहिते. :) अवांतर ! प्रतिक्रीयांचा पाऊस बघून घाबरले ना मी !!!!!! म्हटलं इथे कोणाची जुंपली की काय :))

मी ज्या सामाजिक संस्थेसाठी काम करतो, तिथे गेल्या बालदिनानिमित्त आम्ही, सातारा जिल्ह्यात अनाथ मुला-मुलिंसाठी आश्रमशाळा चालवणा-या एका ताईंच अनुभव कथन ठेवलं होतं. ताईंनी सांगितलेले अनुभव पण असेच भयंकर होते. ताई सांगत होत्या,तिकडे एक १३-१४ वर्षाची एक मुलगी भरती झाली.ती मुलगी भरती झाल्यापासुन कोणालाही जवळ येऊ देत नव्ह्ती.चौकशी केल्यावर समजलं की ती मुलगी घरातुन पळुन आलेली होती. ती वयात आल्यापासुन तिचा सख्खा बापच तिच्यावर,रोज बलात्कार करत होता...आणि तिची आई पण, माझी सवतं म्ह्णुन माझ्याच पोटी जन्माला आली म्हणुन तिला मारहाण करत असे...एक दिवस अगदीच सहन झालं नाही आणि ती मुलगी घरुन पळुन गेली....हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतं होता....हा लेखं खरोखर अंर्तमुख करणारा आहे...

लेख आणि प्रतिक्रिया प्रचंड आवडल्या ! कितीतरी जणांनी इतक्या खोलवर विचार करून मत लिहीले आहे तर कित्येक स्वानुभव लख्ख प्रामाणिकपणे लिहीले आहेत. असे सभासद असलेल्या मिपाकुटुंबात असल्याचा अभिमान वाटला ! जो पर्यंत "मुद्दाम गहन विचार करून कुणी टंकत नाही" तो पर्यंत जूंपत नाही. या विषयावर कुणी गहन विचारी पिंक टाकली नाही याचे खूप समाधान वाटले.

मला तरी माझ्या आयुष्यात "मूल नको" असणेच ठीक वाटते आहे.