✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.

ग
गवि यांनी
Mon, 10/21/2013 - 13:39  ·  लेख
लेख
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.." खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला. नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती. घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते. मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं. पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता. तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड... मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले. आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर. असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही. चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो. घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी.. बरं. तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी. आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे. अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात. त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात. मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही. आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्‍यातून येणार्‍या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन. कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं. नुसतीच अंडी. पक्षी नाहीच. First श्रीमती घुत्कर: B पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें. म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त. D पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप. E अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं: F बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन. आत्तापर्यंत दिसलेलं: - एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही. - काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं. पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत. काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत. बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे. सी यू सून.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
45287 वाचन

💬 प्रतिसाद (152)

प्रतिक्रिया

हर्कत इल्ले. तसेही मुंबैक्र

बॅटमॅन
Mon, 10/28/2013 - 17:35 नवीन
हर्कत इल्ले. तसेही मुंबैक्र मिपाक्र जन्तेला भेतयच आहेच यकदा. णोव्हेंब्र च्या उत्तरार्धात कंदीपन चालंन. यक ट्रिप मारियाचा इच्यार हाये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते सगळं आठवलं होतं रे. पण

गणपा
Tue, 10/22/2013 - 14:48 नवीन
=)) ते सगळं आठवलं होतं रे. पण काये ना, माझ्या ओळखीतले काही महाभाग बाहेर दाबून नॉनवेज चापतात, पण घरच्यांना चालत नसल्याने घरी १००% व्हेजी असतात. आता तुम्ही घरी कधी आमंत्रण दिलं नाहीत त्यामुळे हॅ हॅ हॅ. असो. तेहे दिल्से माँफी मांगता हू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ऐ मेरे प्यारे चिकन..

प्रभाकर पेठकर
Tue, 10/29/2013 - 01:14 नवीन
मला वाटतं चिकनचा तुकडा दोर्‍याला टांगून ठेवावा म्हणजे घुबडाने नाही खाल्ला तर परत ओढून मागे घेता येईल. उगीच फुकट जायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बेष्ट!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/21/2013 - 19:21 नवीन
बेष्ट!
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Mon, 10/21/2013 - 19:55 नवीन
वेगळाच विषय! त्या बाबा घुबडाला कोणी अपशकुनी म्हणून मारलं असलं तर अवघड आहे! :( बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या फेसबुक पेजवर या लेखाची लिंक देऊन पोस्ट टाकली आहे. पाहू कोणी उत्तर देतात का ते.
  • Log in or register to post comments

येस!

स्पंदना
Tue, 10/22/2013 - 07:04 नवीन
पैसाताईला नक्की काय करायचे ते माहीती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे वा!! छानच उपक्रम .

मनीषा
Tue, 10/22/2013 - 07:02 नवीन
अरे वा!! छानच उपक्रम . अवांतर : याला वासु शस्त्रक्रिया (स्टिंग ऑपरेशन) म्हणता येईल का ?
  • Log in or register to post comments

गवि! आता आहेच तुमच्या शेजारी

स्पंदना
Tue, 10/22/2013 - 07:06 नवीन
गवि! आता आहेच तुमच्या शेजारी तर जरा तो आय मेक-अप अन आयब्रोज कोठुन केल्या विचाराना बाईंना. काय बाई तरी एव्ह्ढी पिल्ला झाली तरी इकडच पीस तिकडे नाही, नाही तर आमचा अवतार पहावा.
  • Log in or register to post comments

अपर्णा .. घुबडीण बाईला घरी

मनीषा
Tue, 10/22/2013 - 07:09 नवीन
अपर्णा .. घुबडीण बाईला घरी काही कामंधामं नसतात (व्हिडो पाहिलास ना?) मग जमतय मेन्टेन करायला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

२२ ऑक्टो . सकाळ.

गवि
Tue, 10/22/2013 - 07:39 नवीन
२२ ऑक्टो . सकाळ. आत्ता पहिल्यांदाच भक्ष्य / अन्न पाहिलं . हा पहा उंदीर . म्हणजे अन्नाची सोय होतेय. आता कोण आणतेय ते शोधणे आले. की पिल्लाची आईच डबल ड्यूटी करतेय ? Image removed. हुश्श...!!
  • Log in or register to post comments

हुश्स्य!

स्पंदना
Tue, 10/22/2013 - 07:45 नवीन
माझापण जीव भांड्यात पडला. चला निदान आता घुत्कारे ब्रदर्स गविंच नाव नाही लावणार पालक म्हणुन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खूपच सुंदर ! आपल्या सारखी

जॅक डनियल्स
Tue, 10/22/2013 - 09:38 नवीन
खूपच सुंदर ! आपल्या सारखी सगळी माणसे असती तर लाखोने घुबडे वाचली असती. आत्ता शहरात जेवढी घुबडे शिल्लक आहेत त्यामुळे थोडा तरी उंदरांच्या संख्येवर ताबा राहिला आहे. मी सर्पोद्यान मध्ये काम करताना, जवळपास १०-१५ घुबडे तरी कॉल वर वाचवली आहेत. पण हे सापांसारखे कॉल नसायचे,म्हणजे घुबड लोकांच्या घरात घुसलेली नसून लोकच त्याच्या घरात घुसलेले असायचे. पुण्यात जिकडे जुने वाडे होते, त्याच्या आसपासच्या वडाच्या झाडावर घुबडांचे संसार असायचे. नंतर तेच वाडे बिल्डर ने घशात घातले आणि घुबडाला अपशकुनी म्हणून हुसकावून लावले. तेच सिंहगड रस्ता, सहकारनगर, पर्वतीला झाले , जुनी झाडे गेली आणि घुबड गेली. सिंहगड रस्त्यावर दातार क्लास समोरच्या (वृषाली बार) वडाच्या झाडावर घुबडाची घरटी होती. मी लोकांच्या घरून अशीच घुबडे पकडली आहेत, कोणच्या पोट माळ्यावर आहे, तर कोणाच्या खिडकीच्या समोर बसते.(त्यामुळे त्यांना अपशकून होतो. )खूप चीड यायची त्या अडाणी-सुखवस्तू घरात जायची पण मुंडी खाली घालून बिचाऱ्या घुबडाला पकडावे लागायचे. नंतर त्यांना सर्पोद्यान मधून दूर अभयारण्यमध्ये सोडले जायचे. मला स्वतःला हा पक्षी खूप आवडतो, लोकं मोराला क्युट-क्युट करत बसतात, माझ्या मते तर घुबड सगळ्यात गोंडस पक्षी आहे.(मी आई ला तो पाळू का असे गमतीत विचारले पण होते ;)) अशीच अनेक कार्यकर्त्यानी जमा केलीली (लोकांच्या घरी)घुबडे सर्पोद्यांच्या प्राणी-पक्षी अनाथालयात असतात, त्यातल्या किती तरी पिल्लांना आम्ही हाताने खिमा भरवून जगवले आहे. वरचे जे आहे ते बार्न आउल किंवा साधे घुबड आहे. ते सगळ्यात जास्त आढळून येते. त्यांना दिवसा दिसत नाही (किंवा कमी दिसते ) त्यामुळे कावळे त्यांची वाट लावतात. जर या घरट्या जवळ कावळा दिसला तर हुसकावून लावा. तसेच दिवसा त्या घरट्या जवळ बिलकुल प्रकाश टाकू नका किंवा कुठला मोठा आवाज करू नका. तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुम्हाला घुबडाचे बाळंतपण करायची संधी मिळाली. :)
  • Log in or register to post comments

मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य

सुबोध खरे
Tue, 10/22/2013 - 12:20 नवीन
मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य आहे. एक मांजर साधारणपणे वर्षाला तीस उंदीर पकडते तर एक घुबड साधारण पणे दोनशे साठ ते तीनशे उंदीर पकडते. याचे कारण उंदीर हेच त्यांचे मुख्य खाद्य आहे. शिवाय घुबडाची दृष्टी माणसाच्या हजार पट चांगली असते. डोक्याच्या मानाने घुबडाचे डोळे इतके मोठे असतात कि माणसाला तेवढे मोठे डोळे बसवले तर त्यांचा(डोळ्यांचा) आकार सफरचन्दासारखा होईल. त्यामुळे घुबड आपले डोळे डावी उजवीकडे फिरवू शकत नाही. त्याचे डोळ्य़ा बाहेरचे स्नायू(EXTRAOCULAR MUSCLES) अविकसित असतात. तर आपली अक्खी मानच पूर्ण गोलाकार फिरवते. शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते. उंदराने केलेली खुडबुड त्याला शंभर फुटावरून सुद्धा स्पष्ट ऐकू येते आणी त्या दिशेने ते आपले डोके वळवून उंदराच्या स्थिती चा अंदाज घेते. घुबडाचे पंख सुद्धा कात्रीने कापल्या सारखे असतात त्यामुळे त्याच्या पंखांची फडफड मुळीच होत नाही(याउलट कबुतराची फडफड).म्हणून पकडला जाईपर्यंत उंदराला घुबड आल्याचे कळतच नाही. दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती

गवि
Tue, 10/22/2013 - 12:30 नवीन
शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते.
+१०० लेखातही उल्लेख केलाच आहे. पण हे प्रत्यक्षच दिसतंय. कितीही दूरवर आणि कितीही हलकासा आवाज झाला तरी घुबड लगेच टक्क डोळे उघडून आवाजाच्या दिशेने बघतं. मानही नेहमी वरच्या दिशेनेच असते. कारण या जागेचा एन्ट्रन्स (कोणी शत्रू जिथून घुसू शकेल असं मोकळं ओपनिंग) वरच्या दिशेला आहे. या सततच्या अतिजागरुकपणामुळे त्या पक्ष्याची झोप वगैरे अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल. मधेच डोळे मिटून घेतं तेव्हा झोपलंय असं वाटतं पण क्षणाक्षणाला कसल्यातरी चाहुलीने / आवाजाने डोळे उघडून परत जागरुक. त्याचा एकूण अविर्भाव झोपेची अत्यंत गरज आहे पण अजिबात मिळत नाही असा वाटतो. पहाटे पहाटे तर गपागप डोळे मिटत असतात पण उघडतातही लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोधश्री,

संजय क्षीरसागर
Tue, 10/22/2013 - 16:58 नवीन
दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.
वरचा निष्कर्श आणि एकूण प्रतिसाद अत्यंत आवडला. मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१११११

जॅक डनियल्स
Tue, 10/22/2013 - 21:04 नवीन
घुबड फार अफलातून ३६० कोनात मान फिरवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गवि, मस्तच उपक्रम चालू आहे.

ओसु
Tue, 10/22/2013 - 09:53 नवीन
गवि, मस्तच उपक्रम चालू आहे. मी माझ्या मुलीला (वय वर्षे १०) पण या तुमच्या कार्याची माहिती दिली आहे. तीला फारच आवडली आहे. आम्ही सतत अपडेट्स बघत आहोत.
  • Log in or register to post comments

मस्तच......!

रुमानी
Tue, 10/22/2013 - 10:06 नवीन
उपक्रम आवडला. पुढं काय होणार ह्यचि उत्सुकता लागलीये..! :)
  • Log in or register to post comments

भन्नाट आयडिया गवि!!

चतुरंग
Tue, 10/22/2013 - 10:47 नवीन
क्यामेरा लावून तुम्ही एकदम कल्पक काम केले आहेत. आता अधूनमधून अपडेट्स बघत राहण्याचा चाळा लागणार. मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्‍यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मलाही घुबड अतिशय आवडते. एक

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 12:33 नवीन
मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्‍यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.
अगदी, अगदी!!! शिवाय देखणेपणाही असतो. एकदा एका विहिरीजवळच्या बेचक्यात खबदाडीत एकदम जवळ अचानक घुबडाचे पिल्लू दिसल्यावर पहिल्यांदा दचकलो होतो पण नंतर ते लै आवडले होते त्या प्रसंगाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एकदम सह्हि....

दिपक.कुवेत
Tue, 10/22/2013 - 11:51 नवीन
पुढे काय होईल ह्याची खुप उत्सुकता लागुन राहिलीये. बाय द वे एवीतेवी घुबड आता केंद्रस्थानी आहेच तर त्याच्या अपशकुनीपणाचे पण किस्से येउद्यात. कुणाला असा काहि अनुभव आला आहे का कि ह्या फक्त ऐकिव गोष्टि आहेत?
  • Log in or register to post comments

घुबडाच्या काही खास गुणांमुळे

गवि
Tue, 10/22/2013 - 12:05 नवीन
घुबडाच्या काही खास गुणांमुळे त्याला ही गूढता चिकटली असावी असा तर्क आहे: - रात्रीचा वावर - दोन्ही डोळे समोरच्या बाजूला (मनुष्याच्या चेहर्‍याप्रमाणे) बहुधा नाईट व्हिजनसाठी अ‍ॅडाप्टेशन. इतर बहुतांश पक्ष्यांमधे डोळे डोक्याच्या दोन विरुद्ध बाजूंना असतात. - दोन्ही बाजूंना डोळे नसल्यामुळे होणारा व्हिज्युअल फिल्डचा र्‍हास भरुन काढण्यासाठी मान २७० अंशात म्हणजे जवळजवळ उलटी आणि वरच्याही दिशेने वळवण्याची शरीररचना. रात्रीच्या संचारामुळे मुळात हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा कमी वेळा उघडपणे नजरेला येतो. त्यामुळे जेव्हा येतो तेव्हा विचित्र / वेगळा भासतो. सर्व शिकारी पक्ष्यांच्या अंगावरचे रंग, पिसं आणि चोचीचा आकार हे घुबडातही असतात. त्यामुळे अर्थातच एक भीतीदायक चेहरा / रंगसंगती दिसते. घारही जवळून बघितली तर भेदकच दिसते. फक्त डोळे समोर नसतात इतकाच फरक. - घुबड न पचलेला अन्नाचा भाग गोळीच्या रुपात ओकून टाकतं. -मनुष्याच्या चेहर्‍याशी साम्य, घूत्कार करुन आवाज करणं अशा सर्व गोष्टींमुळे उगीच गूढ आणि भीतीयुक्त वलय तयार झालं आहे असं दिसतं. एरवी आता पाहतोय त्यामुळे लक्षात आलं आहे की हा अगदी इतर सर्व पक्ष्यांइतकाच साधासरळ आणि काहीही विचित्र नसलेला पक्षी आहे. काही आक्रमकता असेलच तर तितकी किंवा त्याहून जास्त कावळ्यांमधेही पाहिली आहे. तीही फक्त पिल्लांमुळे असावी. शिवाय पुन्हापुन्हा पाहायला मिळालं तर त्याचं दिसणंही विचित्र वाटत नाहीये. ह्युन्दाई सँट्रो गाडी १९९९ साली जेव्हा भारतात दिसायला लागली तेव्हा तो उंच उभट शेप अत्यंतच विचित्र दिसायचा. असली गाडी लोक कशी हौसेने विकत घेतात अन चालवतात असं मारुती ८०० ला सरावलेल्या डोळ्यांना वाटायचं. आता डिझाईन चेंज नक्कीच झालाय, पण तरीही मुळातला उभटपणा आता विचित्र वाटत नाही. पुन्हापुन्हा बघून सवय झालीय. तशातला प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

मस्त

प्रचेतस
Tue, 10/22/2013 - 13:58 नवीन
नासिकमधल्या बौद्ध लेणीतील (पांडवलेणी) गुहा क्र. २३ मधील हे घुबडाचे शिल्प (अथेनियन आउल) (३/४ थे शतक) Image removed.
  • Log in or register to post comments

घरात रहातो का लेणी मध्ये रे?

लॉरी टांगटूंगकर
Tue, 10/22/2013 - 15:23 नवीन
घरात रहातो का कुठे गुहेमध्ये मध्ये रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हौना राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/23/2013 - 08:36 नवीन
लैच तपशील असतात या भल्या माणसाकडे. -दिलीप बिरुटे (वल्लीचा पंखा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

कोणी याक्षिण पटवली म्हणे

मालोजीराव
Fri, 10/25/2013 - 12:07 नवीन
कोणी याक्षिण पटवली म्हणे त्यानी…म्हणून गुहेतच रहात असावा :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

बाकी अथीनियन आऊल काय भानगड

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 17:02 नवीन
बाकी अथीनियन आऊल काय भानगड आहे म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे ती ग्रीक उपदेवता अथेना.

प्रचेतस
Tue, 10/22/2013 - 17:24 नवीन
अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. तिचे घुबड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड

गवि
Tue, 10/22/2013 - 17:27 नवीन
पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड चवथ्या शतकात नाशकात काय करत होतं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तिथल्या लेण्यांमध्ये ग्रीक

प्रचेतस
Tue, 10/22/2013 - 18:48 नवीन
तिथल्या लेण्यांमध्ये ग्रीक शिल्पकलेचा फार प्रभाव आहे. व्यापाराद्वारे होणारी आदानप्रदान कलेच्या प्रांतातही होत गेली. किंबहुना यातील काही लेणी ग्रीक (यवनी) कलाकारांनीच खोदलेली असावीत. तिथे अथेनियन घुबडाखेरीज ग्रीक दंतकंथामधले स्फिन्क्स, ग्रिफिन हे काल्पनिक प्राणी पण कोरलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आह तरीच! मला वाटले कुठली

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 21:20 नवीन
आह तरीच! मला वाटले कुठली घुबडाची उपजात इ. आहे की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे

गवि
Wed, 10/23/2013 - 12:07 नवीन
वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे पाहताना विचित्र जाणीव झाली. ते अंतर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर दगडाच्या आत (पोकळीत) कोरलेलं वाटायला लागतं आणि बहिर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर खडकातून बाहेर आल्याप्रमाणे (भरीव) वाटायला लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिरजेच्या किल्लाभागातल्या एका

बॅटमॅन
Wed, 10/23/2013 - 14:13 नवीन
मिरजेच्या किल्लाभागातल्या एका फारसी शिलालेखाचा फटू घेतल्यावर त्या फटूकडे पाहतानाही असेच जाणवायचे त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ते बास रिलिफ असल्याने असं

प्रचेतस
Wed, 10/23/2013 - 16:40 नवीन
ते बास रिलिफ असल्याने असं वाटत असेल. बाकी हे शिल्प शोधणं लै कठीण आहे. सहजी दिसत नै. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे नक्की घुबड आहे का? ४ पाय

कवितानागेश
Fri, 10/25/2013 - 18:08 नवीन
हे नक्की घुबड आहे का? ४ पाय आणि पंख आणि शेपटी असे सगळे दिसतय मला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली म्हणाला म्हणून मीही

गवि
Fri, 10/25/2013 - 18:20 नवीन
वल्ली म्हणाला म्हणून मीही शंका घेतली नाही. मला मांजर वाटलं. किंवा वाघ सिंहाचा छावा. शिवाय आसनाखाली पायाशी बसण्याची जागाही घुबडापेक्षा मांजर / पाळीव प्राण्याशी जास्त जुळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ग्रीक मिथकांमधला हे घुबड काही

प्रचेतस
Sat, 10/26/2013 - 08:48 नवीन
ग्रीक मिथकांमधला हे घुबड काही वेळा धड प्राण्याचे आणि शिर पक्ष्याचे (घुबडाचे) अशा स्वरूपातही दाखवले जाते. हे तिथे असणारे अजून काही ग्रीक मिथकांतले प्राणी स्फिन्क्स (धड सिंहाचे शिर मानवाचे) आणि ग्रिफिन (धड पशूचे आणि शिर गरूडाचे) Image removed.-Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

घुबड

सविता००१
Tue, 10/22/2013 - 14:24 नवीन
आमच्या इथे (भांडुप मधे) मागच्य वर्षी चुकुन आलं होतं. पण ते वरच्या फोटोमधे आहे त्यापेक्षा वेगळं होतं दिसायला - छान गुबगुबीत आणि शुभ्र रंगावर काळे ठिपके अस होत. आम्हाला कुणीच ते पाळू दिलं नाही आणि कावळ्यांनी हुसकावून लावलं त्याला :(
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम आणि त्यावरचा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/22/2013 - 14:45 नवीन
मस्त उपक्रम आणि त्यावरचा लेखही ! अपडेटही उत्सुकतेने वाचतोय. सर्वसाधारण लोकांसारखे खुळ्या अंधश्रद्धेला बळी न पडता उलट या घटनेचा चांगल्लच उपयोग केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त

सुधीर
Tue, 10/22/2013 - 14:51 नवीन
घुबड फार क्वचित दिसतं. हल्लीच समोरच्या झाडावरच्या बगळ्यांचा अंडी-ते-पक्षी हा प्रवास पाहिला. अंड्यातून बाहेर आल्यावर दिवसागणीक इंचा-इंचाने मोठी होतात की काय असं वाटायचं. या पक्षांमध्ये पण एखादं पिलू दुबळं निघतं आणि ते बहुदा मरतं. अंडी घालण्याअगोअदर चोचीने घरटं बांधायची कलाही थक्क करणारी.
  • Log in or register to post comments

सद्गदित वगैरे

बॅटमॅन
Tue, 10/22/2013 - 15:02 नवीन
इंचा-इंचाने
शब्द बाकी काळजाला भिडला. आयडीचे नावही तुमच्यासारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

वेगळाच विषय हाताळायला मिळतोय

सासुरवाडीकर
Tue, 10/22/2013 - 18:57 नवीन
वेगळाच विषय हाताळायला मिळतोय गवि अभिनंदन आणि शुभेच्छा. वेळो वेळी डिटेल्स मिळत जातीलच याची खात्री आहे. वेबकॅमची कल्पना पण भारीच. सहमत.
  • Log in or register to post comments

BRAVO !

शिल्पा ब
Tue, 10/22/2013 - 22:00 नवीन
BRAVO !
  • Log in or register to post comments

२३ ऑक्टो सकाळ.

गवि
Wed, 10/23/2013 - 07:59 नवीन
दुसरे पिल्लू बाहेर. सातपैकी पाच अजूनही अंड्यात. उंदीर गायब. सर्वांनी मिळून पोटात घातलेला दिसतो. ब्रेकफास्ट लंच डिनर.. आता बघू पुढे.
  • Log in or register to post comments

सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/23/2013 - 08:39 नवीन
व्हिडियोची आयड्या भारीय तुमची. आवडीने हे सर्व निरिक्षण चालू आहे म्हटल्यावर क्या कहने. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्तच विडिओ!

चतुरंग
Wed, 10/23/2013 - 11:28 नवीन
त्या घुबडिणीचे कान जबरी तिखट असणार. कारण वेबकॅम चालू झाल्याझाल्या तिने लगेच तिकडे बघितले. तुमच्या वेबकॅमला ऑटोफोकस आहे का? कारण त्यातल्या सर्वो किंवा स्टेपरचा आवाज आला तर ती वर बघणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वेबकॅम सतत चालूच आहे.

गवि
Wed, 10/23/2013 - 11:35 नवीन
या क्लिपच्या वेळी वेबकॅम चालू केला आहे असं नव्हे. वेबकॅम सतत चालूच आहे. या सीनपूर्वीही अनेक व्हिडीओ कॅप्चर झाले आहेत. त्यामुळे या क्षणी कॅमेरा चालू झाल्याचा आवाज वेगळा आला नसणार. मोशन डिटेक्शन मोडमधे अधेमधे ठेवतो (समोर सतत बसणे शक्य नसल्याने). त्यामुळे कॅमेर्‍याच्या एन्डला काही घडत नसावं. फक्त रेकॉर्डिंग (सॉफ्टवेअरमधे) चालू बंद होतं. बाकी वेबकॅममधून काही याखेरीज वेगळा आवाज येत असेल तर माहीत नाही. मॅन्युअल (डिजिटल) झूम आणि काही प्रमाणात पॅनिंगची सोय आहे. ती सॉफ्टवेअर कंट्रोलमधूनच. हा कॅमेरा आहे: Image removed. अर्थात तो एका पॅकेजिंग मटेरियलच्या ठोकळ्यात घालून ठेवला आहे. समोरचा LED बंद ठेवण्याचे सेटिंग केले आहे. (प्रत्यक्ष बंद झाला का हे पहायचे तर पुन्हा सर्व उचकटावे लागेल.) तरीही नवीन वस्तू घुबडिणीने नोट केली आहे. ती घुबडिणीला कदाचित एका डोळ्यासारखी भासत असेल. पण या वस्तूपासून उपद्रव नाही हे दोनतीन दिवसात समजल्याने तिला साधारणपणे त्यापासून आता धोका वाटत नाही असं दिसतं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शॉर्ट फिल्म

सुधीर
Wed, 10/23/2013 - 14:24 नवीन
ह्या वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र जोडून,आणि इतर काही वेगळ्या क्लिप्स जोडून, सोबतीला संगीत आणि समालोचन देऊन एक शॉर्ट फिल्म बनवता येऊ शकेल. जी या पक्षाच्या जीवावर उठणार्‍यांना नवीन काही तरी दाखवेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

छान

सुनील
Wed, 10/23/2013 - 15:16 नवीन
छान ऐडिय्या!! एक घुबड पाळायची इच्छा झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

मस्त

प्रसाद गोडबोले
Wed, 10/23/2013 - 17:54 नवीन
गवि मस्त चालु आहे प्रयोग . हा कॅमेरा भन्नाट आहे ...पुर्णवेळ बीझी न रहाता नीरीक्षण करता येत आहे :) ( लेख फेसबुकावर शेयर करीत आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा