"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."
खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला.
नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो.
एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती.
घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते.
मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं.
पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता.
तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड...
मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले.
आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर.
असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही.
चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो.
घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी..
बरं.
तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी.
आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे.
अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात.
त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात.
मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही.
आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्यातून येणार्या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन.
कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं.
नुसतीच अंडी. पक्षी नाहीच.

श्रीमती घुत्कर:

पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.
म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.

पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.

अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:

बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.
आत्तापर्यंत दिसलेलं:
- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.
- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.
पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.
काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.
बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.
सी यू सून.
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट..
भन्नाट..
खरच भारी ... जमल्यास विदेओ ओं
In reply to भन्नाट.. by शैलेन्द्र
खरच भारी ... जमल्यास विदेओ ओं टाका कि हो ... you tube वर ... windows movie maker, format factory वगैरे मदत करू शकतील ..
वेगळाच विषय हाताळायला मिळतोय
वेगळाच विषय हाताळायला मिळतोय गवि अभिनंदन आणि शुभेच्छा.
वेळो वेळी डिटेल्स मिळत जातीलच याची खात्री आहे.
वेबकॅमची कल्पना पण भारीच.
सहि.... पुढचे अपडेट्स पण देत
सहि.... पुढचे अपडेट्स पण देत रहा. :)
प्रचंड उत्कंठावर्धक आणि
प्रचंड उत्कंठावर्धक आणि सस्पेन्सही जबरदस्त. पाच पिल्ले पडद्यावर उतरायची आहेत. त्यातली कोणती टिकतील? कोणती गळतील? अगदी बिग बॉस स्टाइल रिअॅलिटी शो. 'आगे पर्देपर' ची वाट पहातो आहोत.
असेच म्हणतो.
In reply to प्रचंड उत्कंठावर्धक आणि by राही
+१
-दिलीप बिरुटे
आयला
भारी कल्पना आहे... लगे रहो, पुढचे अपडेस् वाचायला उत्सुक.
अपशकुनी????..... नव्हे भाग्यवान
गवि,
भाग्यवान आहात तुम्ही. सहसा अत्यंत दुर्मिळ पक्ष्याने (चकवा-चांदण) तुमच्या घरी वस्ती केली आणि तुमचे अस्तित्व लक्षात येऊन देखील घरट्याची जागा बदलली नाही किवा अन्डी फोडुन टाकली नाहीत हे महत्वाचे. (बंगालमधील समजुतीनुसार या पक्ष्याच्या घरट्या खाली गुप्तधन सापडते म्हणतात)
या लेखावरून 'श्री मारुती चितमपल्ली' यांच्या 'उलुक वेळ' या अत्यंत सुंदर लेखाची आठवण झाली.

हा पिंगळा नावाचा पक्षी आहे
हा पिंगळा नावाचा पक्षी आहे घुबड नाही.
पिंगळा, spotted owlet वेगळं.
In reply to हा पिंगळा नावाचा पक्षी आहे by ग्रेटथिन्कर
पिंगळा, spotted owlet वेगळं. छोटं ठिपकेवालं असतं. तोही घुबडाचाच प्रकार.
हे घुबड बार्न आऊल आहे. मराठीत गव्हाणी घुबड.
मी तुमचे नॉलेज तपासत होतो
In reply to पिंगळा, spotted owlet वेगळं. by गवि
मी तुमचे नॉलेज तपासत होतो
अद्याप आपण...
In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर
नथूगुग्गुळ घेतलेले दिसत नाही...
असो...
हा असा स्वतःहून तोंडावर पडायचा ठेका आपण घेतलाच आहे....तर आम्ही तरी काय करणार?
मुद्दाम हून जास्त गहन विचार केला की असे होणारच.....
नळी फुंकली सोनारे अन पालथ्या घड्यावर पाणी.
मुद्दाम गहन विचार करूनी टंकती ट्रोल वाणी.....
(स्मॉल पेगर)
+११११११११११११११११११११
In reply to अद्याप आपण... by मुक्त विहारि
+११११११११११११११११११११
११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि
In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर
११:४५ ला गविंचा प्रतिसाद आणि ११.४९ ला तुमची सारवासारवी... म्हणजे वारंवार करायला लागल्याने अश्या सारवासारवीची चांगलीच सवय झालेली आहे हे सिद्ध झालेय ! :) ;)
मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक.
"कोमन बार्न आउल" आहे का?
हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड
In reply to मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक. by nishant
हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड.
हेच घुबड महिनाभरापूर्वी
In reply to हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड by गवि
हेच घुबड महिनाभरापूर्वी आमच्या घराजवळ पाहिले होते. अगदी कमी उन्चीवरुन स्मोरुनच उडत गेलं. उत्सुकतेनी आम्ही त्याच्याकडे बघत उभे राहिलो तर लाजून या झाडावरुन त्या झाडावर पळत ( उडत) होतं... शेवटी कुठेतरी लांब पळालं.... :(
अवांतरः घरातल्या पाली पकडून त्यांना दिल्या तर खातायत का चेक करा.. :P
रोचक.
समोरच्या घराच्या भिंतीवर बसलेली ३-४ घुबडे रोज रात्रि पाहतोय, अगदी जमिनीपासुन ५ फुट उंचीच्या कट्यावर आरामात बसलेली असतात.
@मनिम्याऊ क्या बात है! सच हय किया ? वर उल्लेखलेल्या घुबडाचे घरटे माझ्या मित्राच्या घरावरच आहे, सांगुन टाकतो त्याला आजच खोदकाम सुरु कर म्हणुन!
ं मानो या ना मानो...
In reply to रोचक. by अग्निकोल्हा
ं मानो या ना मानो... ;)
व्हिडीवो यु ट्युब वर टाकुन
व्हिडीवो यु ट्युब वर टाकुन लिंक द्या..
उत्तम
मागोवा अजुन पुढील माहिती साठी प्रतिक्षा करत आहे.
क्या बात! क्या बात!! लैच्च्च
क्या बात! क्या बात!! लैच्च्च जब्री. पुढे काय होतंय ते पाहण्याची अत्यंत उत्सुकता आहे.
+१
In reply to क्या बात! क्या बात!! लैच्च्च by बॅटमॅन
+१
*****
काही तरी वेगळ पहायला मिळणार .
मस्त उद्योग
उद्योग आवडला.
त्या घुबडीणीची पिल्ल जेवत नसली की ती त्यांना सांगत असेल. "गुपचुप खा गविकाका बघतायत"
आणि घुबडबुवा आले की गाणं म्हणेल "इथ नको तिथ जाउ आडोशाला उभ राहु"
घुबडबुवा :- का?
घुबडकाकु :- गवि बघत्यात
स्वगतः- च्यायला ह्या टेक्नॉलॉजी मुळे माणसाची प्रायव्हसी तर हरवलीच आहे आता पक्षांनापण प्रायव्हसी दुर्मिळ ठरणार.
+ १
In reply to मस्त उद्योग by ज्ञानोबाचे पैजार
च्यायला ह्या टेक्नॉलॉजी मुळे माणसाची प्रायव्हसी तर हरवलीच आहे आता पक्षांनापण प्रायव्हसी दुर्मिळ ठरणार.
मस्त...
एक वेगळीच कल्पना आहे.
अच्छा तर या घुबडा बद्धल
अच्छा तर या घुबडा बद्धल तुम्ही बोलला होतात तर ! :)
काय म्हणातात ते.. हं. क्युट आहे हो. ;)
जाता जाता :- तंत्र-मंत्र प्रकारात घुबडाचा बळी दिला जातो, यांच्या नखांनाही या उलट्या उध्योगाय मागणी असते. मला वाटतं बहुतेक हिंदुस्थानात तांत्रीक विधीसाठी सर्वात जास्त ठार मारला जाणारा हा पक्षी आहे.
पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा...
In reply to अच्छा तर या घुबडा बद्धल by मदनबाण
असे मला वाटते...
हो...बरोबर, पण माझ्या माहिती
In reply to पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा... by मुक्त विहारि
हो...बरोबर, पण माझ्या माहिती नुसार काही तांत्रिक विधींना घुबडच लागते. कोंबडीचा बळी दिला जातो पण अनेकदा ती प्रथा किंवा उतारा किंवा इतर कोणत्या कारणासाठी दिला जातो.
आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या
In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण
आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या घुबडांचा लयं डिमांड होणार ! आपली दिवाळी आणि यांची मरण यात्रा
आत्ताच वाचलेले काही दुवे :-
India's secret shame: Owl sacrifice mars Hinduism's biggest holiday
India’s Festival of Lights darkens the future for owls
आयला हे काय चालले आहे तरी काय?
In reply to आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या by मदनबाण
दिवाळी = घुबडांचे प्राण धोक्यात
दसरा = वन वर्यावरण धोक्यात
होळी = पाण्याचा गैर वापर
गणपती = प्रदूषण
गरबा = ध्वनी प्रदूषण
थोडक्यात काय तर, पाकीस्तान आणि बांगला देशात जशी सामाजीक सुधारणा केली आहे तशीच भारतात पण करायचे ठरलेले दिसते...
असो....
हातात घड्याळ कशाला
प्रार्थनेची वेळ लक्षांत ठेवायला
थोडक्यात काय तर...
In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण
उतारा वेगळा आणि तांत्रीक विधी वेगळे....
म्हणजे लिंबू तेच
पण आधी जीन्/व्होडका ह्यांत घालायचे
आणि
मग जास्त झाली की. उतरावलायला वापरायचे.....
असो....
आपण आपले घुबड आणि घुबडी बघू या...
अत्यंत वेगळा आणि छान लेख अहे.
अत्यंत वेगळा आणि छान लेख अहे. पुढे काय होतंय ह्याची उत्कंठा लागली अहे.
नेहमीप्रमाणे....
गवि रॉक्स आणि मिपाकर टॉक्स....
हे असे वेगळे विषय असतात म्हणूनच इथे येण्यात मजा आहे.
(मुद्दाम पाव्/अर्धा नॅनो मेंदू खाजवून ट्रोलिंग करणार्यांना असे काहीतरी कधीच देता येणार नाही....)
पुढे काय झाल?
पुढे काय झाल?
वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली.
वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. त्यामुळे तुमची पहायची उत्सुकता अन घुबडाला सुरक्षीततेची हमी. पण सिक्सथ सेन्सने जाणवत असणार कुणीतरी पहातय ते.
एक बाहेर आलय पिल्लु तेंव्हा बाकिची दोन अंडी उघडायला सुरवात झाली आहे.
नशिबवान आहात गवि.
नशिबवान आहात गवि.
In reply to वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. by स्पंदना
आपण सगळे पण असेच भाग्यवान आहोत.
छान कल्पना! बघुया पुढं काय
छान कल्पना! बघुया पुढं काय होतय.
घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ
घुबडाचा एक एन्ट्री व्हिडिओ आणि कावळ्यांची पहिली चाहूल.
21 Oct evening update
राग आला किंवा शिव्याशाप द्यायचे झाल्यास गळ्याखालच्या भागाची हालचाल करून घुबडीण काहीतरी पुटपुट करताना दिसते घुबडीण. या व्हिडिओमध्ये पहा:
आज दिवसभरात आणखी पिल्लू बाहेर आलेलं दिसलं नाही पण आहे ते जिवंत आहे इतकंच . बाकी अधुनमधून घुबडाची सर्वांगाची साफसफाई चालू आहे. पिल्लाच्या वरच घुबडीण बसत असूनही ते दबत कसं नाही कोण जाणे.
व्हिडिओ मध्ये पाण्याच्या
In reply to 21 Oct evening update by गवि
व्हिडिओ मध्ये पाण्याच्या प्रवाहासारखा आवाज येतोय
मला तरी वाटते ती कावळ्याला
In reply to 21 Oct evening update by गवि
मला तरी वाटते ती कावळ्याला उत्तर देते आहे. हा चिडण्याचा आवाज नाही या बाबतीत मी खात्री देतो.
त्या पिल्लाला तिने तिच्या पाया मध्ये घेतले असेल असे मला वाटते, घुबडाचे पाय (म्हणजे त्यांच्या पंजा खूप मोठा असतो.) त्या पोकळी मध्ये ते पिल्लू निवांत असेल.
मस्त..
गवि अतिशय स्तुत्य.. तुमचं मनापासून अभिनंदन..
केवळ तिथे त्यांची अंडी आहेत म्हणून घुबडासारखा प्राणी घरात आलाय अन्यथा इतक्या सहज घुबड घरात येत नाही, दरम्यान त्याच्या मुलांना लगेच काही खाणं मिळायची सोय करु शकाल (म्हणजे उंदीर किंवा तत्सम काही जवळ ठेवणं वगैरे..) शिवाय पक्षीमित्र (सर्प मित्रांच्या चालीवर) किंवा एखाद्या संस्थेला सांगून जास्तित जास्त सुकर होईल त्या घुबडांचं हे पाहाता येईल का.. जर बाबा-घुबड येत नसेल/येऊ शकत नसेल आणि आई-घुबड शिकार करण्यापेक्षा संरक्षणावरच सगळा वेळ देत असेल तर पिल्लांची उपाशी पोटी तडफड बघवणार नाही.. त्यांच्या नैसर्गिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ नकोय हे कळतय पण ते घरात आलेत अंडी घालायला तेव्हा काहीतरी करणं (नुसतं बघत बघण्यापेक्षा) प्राप्य वाटतं.. !
आज चिकन ब्रेस्टचा कच्चा
In reply to मस्त.. by उपास
आज चिकन ब्रेस्टचा कच्चा बोनलेस तुकडा दिला. पण तिला कळलंच नाही . बघितलाच नाहीन.
शिवाय गव्हाणी घुबड हा काही तितका एन्डेन्जर्ड पक्षी नसावा माझ्या मते. मुंबईत तरी पुष्कळ असावीत. त्यामुळे त्याचा conservation group असेल असे वाटत नाही
फेसबुक ग्रुप
In reply to आज चिकन ब्रेस्टचा कच्चा by गवि
फेसबुका वरच्या एका ग्रुप चि लिन्क देतो तिथे मदत आणि माहिती दोन्ही मिळेल.
https://www.facebook.com/groups/indianbirds/?fref=ts
+१
In reply to मस्त.. by उपास
अगदी हेच विचार मनात आले होते.
आता गवि कुठे उंदीर मारत बसणार म्हणुन थोडं बोनलेस चिकन (जर गवि मांसाहारी असतील तर) घरात आणुन ठेवावं असा आगावू सल्लाही दिला होता. :P
थोडं बोनलेस चिकन (जर गवि
In reply to +१ by गणपा
मेल्या माझ्या शेजारी बसून माझ्यासोबत एकाच वाडग्यातून कालिमिरी मुर्ग, पहाडी कबाब, चिकन आफताब आणि बेवडा चिकन हे सर्व पदार्थ एकाच वेळी खाल्लेस ना एकेकाळी? तरी तुला असली शंका?
(आपण दोघे सोडून बाकीचे सर्व भुकेले राहिले होते ते.. आठवलं का आता? )
पुराव्याने शाबीत करीन.. कुठे गेला तो विमें?
नाहीतर साक्षात श्री.रा.रा. नीलकांत होते की बाजूला..
बेवडा चिकन?
In reply to थोडं बोनलेस चिकन (जर गवि by गवि
ही कसली डिश हो गविसर्कार? चिकन 'देशी'त घोळवतात की म्यारिनेट वैग्रे करतात की अजून कै =))
(जाणण्यास उत्सुक टी-टोटलर) बॅटमॅन.
ते जाणून घ्यायला मुंबईत यावे
In reply to बेवडा चिकन? by बॅटमॅन
ते जाणून घ्यायला मुंबईत यावे लागेल. कसें !!! :-)
हर्कत इल्ले. तसेही मुंबैक्र
In reply to ते जाणून घ्यायला मुंबईत यावे by विश्वनाथ मेहेंदळे
हर्कत इल्ले. तसेही मुंबैक्र मिपाक्र जन्तेला भेतयच आहेच यकदा. णोव्हेंब्र च्या उत्तरार्धात कंदीपन चालंन. यक ट्रिप मारियाचा इच्यार हाये!
ते सगळं आठवलं होतं रे. पण
In reply to थोडं बोनलेस चिकन (जर गवि by गवि
=)) ते सगळं आठवलं होतं रे. पण काये ना, माझ्या ओळखीतले काही महाभाग बाहेर दाबून नॉनवेज चापतात, पण घरच्यांना चालत नसल्याने घरी १००% व्हेजी असतात. आता तुम्ही घरी कधी आमंत्रण दिलं नाहीत त्यामुळे हॅ हॅ हॅ.
असो. तेहे दिल्से माँफी मांगता हू.
ऐ मेरे प्यारे चिकन..
In reply to +१ by गणपा
मला वाटतं चिकनचा तुकडा दोर्याला टांगून ठेवावा म्हणजे घुबडाने नाही खाल्ला तर परत ओढून मागे घेता येईल. उगीच फुकट जायला नको.
बेष्ट!
बेष्ट!
मस्त!
वेगळाच विषय! त्या बाबा घुबडाला कोणी अपशकुनी म्हणून मारलं असलं तर अवघड आहे! :(
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या फेसबुक पेजवर या लेखाची लिंक देऊन पोस्ट टाकली आहे. पाहू कोणी उत्तर देतात का ते.
येस!
In reply to मस्त! by पैसा
पैसाताईला नक्की काय करायचे ते माहीती आहे.
अरे वा!! छानच उपक्रम .
अरे वा!! छानच उपक्रम .
अवांतर : याला वासु शस्त्रक्रिया (स्टिंग ऑपरेशन) म्हणता येईल का ?
गवि! आता आहेच तुमच्या शेजारी
गवि! आता आहेच तुमच्या शेजारी तर जरा तो आय मेक-अप अन आयब्रोज कोठुन केल्या विचाराना बाईंना. काय बाई तरी एव्ह्ढी पिल्ला झाली तरी इकडच पीस तिकडे नाही, नाही तर आमचा अवतार पहावा.
अपर्णा .. घुबडीण बाईला घरी
In reply to गवि! आता आहेच तुमच्या शेजारी by स्पंदना
अपर्णा .. घुबडीण बाईला घरी काही कामंधामं नसतात (व्हिडो पाहिलास ना?)
मग जमतय मेन्टेन करायला ..
२२ ऑक्टो . सकाळ.
२२ ऑक्टो . सकाळ.
आत्ता पहिल्यांदाच भक्ष्य / अन्न पाहिलं . हा पहा उंदीर .
म्हणजे अन्नाची सोय होतेय. आता कोण आणतेय ते शोधणे आले. की पिल्लाची आईच डबल ड्यूटी करतेय ?
हुश्श...!!
हुश्स्य!
In reply to २२ ऑक्टो . सकाळ. by गवि
माझापण जीव भांड्यात पडला.
चला निदान आता घुत्कारे ब्रदर्स गविंच नाव नाही लावणार पालक म्हणुन. ;)
खूपच सुंदर ! आपल्या सारखी
खूपच सुंदर ! आपल्या सारखी सगळी माणसे असती तर लाखोने घुबडे वाचली असती. आत्ता शहरात जेवढी घुबडे शिल्लक आहेत त्यामुळे थोडा तरी उंदरांच्या संख्येवर ताबा राहिला आहे.
मी सर्पोद्यान मध्ये काम करताना, जवळपास १०-१५ घुबडे तरी कॉल वर वाचवली आहेत. पण हे सापांसारखे कॉल नसायचे,म्हणजे घुबड लोकांच्या घरात घुसलेली नसून लोकच त्याच्या घरात घुसलेले असायचे.
पुण्यात जिकडे जुने वाडे होते, त्याच्या आसपासच्या वडाच्या झाडावर घुबडांचे संसार असायचे. नंतर तेच वाडे बिल्डर ने घशात घातले आणि घुबडाला अपशकुनी म्हणून हुसकावून लावले. तेच सिंहगड रस्ता, सहकारनगर, पर्वतीला झाले , जुनी झाडे गेली आणि घुबड गेली. सिंहगड रस्त्यावर दातार क्लास समोरच्या (वृषाली बार) वडाच्या झाडावर घुबडाची घरटी होती.
मी लोकांच्या घरून अशीच घुबडे पकडली आहेत, कोणच्या पोट माळ्यावर आहे, तर कोणाच्या खिडकीच्या समोर बसते.(त्यामुळे त्यांना अपशकून होतो. )खूप चीड यायची त्या अडाणी-सुखवस्तू घरात जायची पण मुंडी खाली घालून बिचाऱ्या घुबडाला पकडावे लागायचे. नंतर त्यांना सर्पोद्यान मधून दूर अभयारण्यमध्ये सोडले जायचे.
मला स्वतःला हा पक्षी खूप आवडतो, लोकं मोराला क्युट-क्युट करत बसतात, माझ्या मते तर घुबड सगळ्यात गोंडस पक्षी आहे.(मी आई ला तो पाळू का असे गमतीत विचारले पण होते ;)) अशीच अनेक कार्यकर्त्यानी जमा केलीली (लोकांच्या घरी)घुबडे सर्पोद्यांच्या प्राणी-पक्षी अनाथालयात असतात, त्यातल्या किती तरी पिल्लांना आम्ही हाताने खिमा भरवून जगवले आहे.
वरचे जे आहे ते बार्न आउल किंवा साधे घुबड आहे. ते सगळ्यात जास्त आढळून येते. त्यांना दिवसा दिसत नाही (किंवा कमी दिसते ) त्यामुळे कावळे त्यांची वाट लावतात. जर या घरट्या जवळ कावळा दिसला तर हुसकावून लावा. तसेच दिवसा त्या घरट्या जवळ बिलकुल प्रकाश टाकू नका किंवा कुठला मोठा आवाज करू नका. तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुम्हाला घुबडाचे बाळंतपण करायची संधी मिळाली. :)
मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य
In reply to खूपच सुंदर ! आपल्या सारखी by जॅक डनियल्स
मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य आहे. एक मांजर साधारणपणे वर्षाला तीस उंदीर पकडते तर एक घुबड साधारण पणे दोनशे साठ ते तीनशे उंदीर पकडते. याचे कारण उंदीर हेच त्यांचे मुख्य खाद्य आहे. शिवाय घुबडाची दृष्टी माणसाच्या हजार पट चांगली असते. डोक्याच्या मानाने घुबडाचे डोळे इतके मोठे असतात कि माणसाला तेवढे मोठे डोळे बसवले तर त्यांचा(डोळ्यांचा) आकार सफरचन्दासारखा होईल. त्यामुळे घुबड आपले डोळे डावी उजवीकडे फिरवू शकत नाही. त्याचे डोळ्य़ा बाहेरचे स्नायू(EXTRAOCULAR MUSCLES) अविकसित असतात. तर आपली अक्खी मानच पूर्ण गोलाकार फिरवते.
शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते. उंदराने केलेली खुडबुड त्याला शंभर फुटावरून सुद्धा स्पष्ट ऐकू येते आणी त्या दिशेने ते आपले डोके वळवून उंदराच्या स्थिती चा अंदाज घेते. घुबडाचे पंख सुद्धा कात्रीने कापल्या सारखे असतात त्यामुळे त्याच्या पंखांची फडफड मुळीच होत नाही(याउलट कबुतराची फडफड).म्हणून पकडला जाईपर्यंत उंदराला घुबड आल्याचे कळतच नाही.
दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.
शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
+१००
लेखातही उल्लेख केलाच आहे. पण हे प्रत्यक्षच दिसतंय. कितीही दूरवर आणि कितीही हलकासा आवाज झाला तरी घुबड लगेच टक्क डोळे उघडून आवाजाच्या दिशेने बघतं.
मानही नेहमी वरच्या दिशेनेच असते. कारण या जागेचा एन्ट्रन्स (कोणी शत्रू जिथून घुसू शकेल असं मोकळं ओपनिंग) वरच्या दिशेला आहे. या सततच्या अतिजागरुकपणामुळे त्या पक्ष्याची झोप वगैरे अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल.
मधेच डोळे मिटून घेतं तेव्हा झोपलंय असं वाटतं पण क्षणाक्षणाला कसल्यातरी चाहुलीने / आवाजाने डोळे उघडून परत जागरुक.
त्याचा एकूण अविर्भाव झोपेची अत्यंत गरज आहे पण अजिबात मिळत नाही असा वाटतो. पहाटे पहाटे तर गपागप डोळे मिटत असतात पण उघडतातही लगेच.
सुबोधश्री,
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
वरचा निष्कर्श आणि एकूण प्रतिसाद अत्यंत आवडला. मनःपूर्वक धन्यवाद!
+१११११
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
घुबड फार अफलातून ३६० कोनात मान फिरवते.
गवि, मस्तच उपक्रम चालू आहे.
गवि, मस्तच उपक्रम चालू आहे.
मी माझ्या मुलीला (वय वर्षे १०) पण या तुमच्या कार्याची माहिती दिली आहे.
तीला फारच आवडली आहे. आम्ही सतत अपडेट्स बघत आहोत.
मस्तच......!
उपक्रम आवडला.
पुढं काय होणार ह्यचि उत्सुकता लागलीये..! :)
भन्नाट आयडिया गवि!!
क्यामेरा लावून तुम्ही एकदम कल्पक काम केले आहेत. आता अधूनमधून अपडेट्स बघत राहण्याचा चाळा लागणार.
मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.
मलाही घुबड अतिशय आवडते. एक
In reply to भन्नाट आयडिया गवि!! by चतुरंग
अगदी, अगदी!!! शिवाय देखणेपणाही असतो. एकदा एका विहिरीजवळच्या बेचक्यात खबदाडीत एकदम जवळ अचानक घुबडाचे पिल्लू दिसल्यावर पहिल्यांदा दचकलो होतो पण नंतर ते लै आवडले होते त्या प्रसंगाची आठवण झाली.
एकदम सह्हि....
पुढे काय होईल ह्याची खुप उत्सुकता लागुन राहिलीये. बाय द वे एवीतेवी घुबड आता केंद्रस्थानी आहेच तर त्याच्या अपशकुनीपणाचे पण किस्से येउद्यात. कुणाला असा काहि अनुभव आला आहे का कि ह्या फक्त ऐकिव गोष्टि आहेत?
घुबडाच्या काही खास गुणांमुळे
In reply to एकदम सह्हि.... by दिपक.कुवेत
घुबडाच्या काही खास गुणांमुळे त्याला ही गूढता चिकटली असावी असा तर्क आहे:
- रात्रीचा वावर
- दोन्ही डोळे समोरच्या बाजूला (मनुष्याच्या चेहर्याप्रमाणे) बहुधा नाईट व्हिजनसाठी अॅडाप्टेशन. इतर बहुतांश पक्ष्यांमधे डोळे डोक्याच्या दोन विरुद्ध बाजूंना असतात.
- दोन्ही बाजूंना डोळे नसल्यामुळे होणारा व्हिज्युअल फिल्डचा र्हास भरुन काढण्यासाठी मान २७० अंशात म्हणजे जवळजवळ उलटी आणि वरच्याही दिशेने वळवण्याची शरीररचना.
रात्रीच्या संचारामुळे मुळात हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा कमी वेळा उघडपणे नजरेला येतो. त्यामुळे जेव्हा येतो तेव्हा विचित्र / वेगळा भासतो.
सर्व शिकारी पक्ष्यांच्या अंगावरचे रंग, पिसं आणि चोचीचा आकार हे घुबडातही असतात. त्यामुळे अर्थातच एक भीतीदायक चेहरा / रंगसंगती दिसते. घारही जवळून बघितली तर भेदकच दिसते. फक्त डोळे समोर नसतात इतकाच फरक.
- घुबड न पचलेला अन्नाचा भाग गोळीच्या रुपात ओकून टाकतं.
-मनुष्याच्या चेहर्याशी साम्य, घूत्कार करुन आवाज करणं
अशा सर्व गोष्टींमुळे उगीच गूढ आणि भीतीयुक्त वलय तयार झालं आहे असं दिसतं.
एरवी आता पाहतोय त्यामुळे लक्षात आलं आहे की हा अगदी इतर सर्व पक्ष्यांइतकाच साधासरळ आणि काहीही विचित्र नसलेला पक्षी आहे. काही आक्रमकता असेलच तर तितकी किंवा त्याहून जास्त कावळ्यांमधेही पाहिली आहे. तीही फक्त पिल्लांमुळे असावी.
शिवाय पुन्हापुन्हा पाहायला मिळालं तर त्याचं दिसणंही विचित्र वाटत नाहीये.
ह्युन्दाई सँट्रो गाडी १९९९ साली जेव्हा भारतात दिसायला लागली तेव्हा तो उंच उभट शेप अत्यंतच विचित्र दिसायचा. असली गाडी लोक कशी हौसेने विकत घेतात अन चालवतात असं मारुती ८०० ला सरावलेल्या डोळ्यांना वाटायचं. आता डिझाईन चेंज नक्कीच झालाय, पण तरीही मुळातला उभटपणा आता विचित्र वाटत नाही. पुन्हापुन्हा बघून सवय झालीय. तशातला प्रकार.
मस्त
नासिकमधल्या बौद्ध लेणीतील (पांडवलेणी) गुहा क्र. २३ मधील हे घुबडाचे शिल्प (अथेनियन आउल) (३/४ थे शतक)
घरात रहातो का लेणी मध्ये रे?
In reply to मस्त by प्रचेतस
घरात रहातो का कुठे गुहेमध्ये मध्ये रे?
हौना राव.
In reply to घरात रहातो का लेणी मध्ये रे? by लॉरी टांगटूंगकर
लैच तपशील असतात या भल्या माणसाकडे.
-दिलीप बिरुटे
(वल्लीचा पंखा)
कोणी याक्षिण पटवली म्हणे
In reply to घरात रहातो का लेणी मध्ये रे? by लॉरी टांगटूंगकर
कोणी याक्षिण पटवली म्हणे त्यानी…म्हणून गुहेतच रहात असावा :))
बाकी अथीनियन आऊल काय भानगड
In reply to मस्त by प्रचेतस
बाकी अथीनियन आऊल काय भानगड आहे म्हणे?
अरे ती ग्रीक उपदेवता अथेना.
In reply to बाकी अथीनियन आऊल काय भानगड by बॅटमॅन
अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. तिचे घुबड.
पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड
In reply to अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. by प्रचेतस
पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड चवथ्या शतकात नाशकात काय करत होतं??
तिथल्या लेण्यांमध्ये ग्रीक
In reply to पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड by गवि
तिथल्या लेण्यांमध्ये ग्रीक शिल्पकलेचा फार प्रभाव आहे. व्यापाराद्वारे होणारी आदानप्रदान कलेच्या प्रांतातही होत गेली. किंबहुना यातील काही लेणी ग्रीक (यवनी) कलाकारांनीच खोदलेली असावीत.
तिथे अथेनियन घुबडाखेरीज ग्रीक दंतकंथामधले स्फिन्क्स, ग्रिफिन हे काल्पनिक प्राणी पण कोरलेले आहेत.
आह तरीच! मला वाटले कुठली
In reply to अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. by प्रचेतस
आह तरीच! मला वाटले कुठली घुबडाची उपजात इ. आहे की काय.
वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे
In reply to मस्त by प्रचेतस
वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे पाहताना विचित्र जाणीव झाली. ते अंतर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर दगडाच्या आत (पोकळीत) कोरलेलं वाटायला लागतं आणि बहिर्वक्र आहे असं समजून पाहिलं तर खडकातून बाहेर आल्याप्रमाणे (भरीव) वाटायला लागतं.
मिरजेच्या किल्लाभागातल्या एका
In reply to वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे by गवि
मिरजेच्या किल्लाभागातल्या एका फारसी शिलालेखाचा फटू घेतल्यावर त्या फटूकडे पाहतानाही असेच जाणवायचे त्याची आठवण झाली.
ते बास रिलिफ असल्याने असं
In reply to वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे by गवि
ते बास रिलिफ असल्याने असं वाटत असेल. बाकी हे शिल्प शोधणं लै कठीण आहे. सहजी दिसत नै.

हे नक्की घुबड आहे का? ४ पाय
In reply to मस्त by प्रचेतस
हे नक्की घुबड आहे का? ४ पाय आणि पंख आणि शेपटी असे सगळे दिसतय मला..
वल्ली म्हणाला म्हणून मीही
In reply to हे नक्की घुबड आहे का? ४ पाय by कवितानागेश
वल्ली म्हणाला म्हणून मीही शंका घेतली नाही. मला मांजर वाटलं. किंवा वाघ सिंहाचा छावा.
शिवाय आसनाखाली पायाशी बसण्याची जागाही घुबडापेक्षा मांजर / पाळीव प्राण्याशी जास्त जुळते.
ग्रीक मिथकांमधला हे घुबड काही
In reply to वल्ली म्हणाला म्हणून मीही by गवि
ग्रीक मिथकांमधला हे घुबड काही वेळा धड प्राण्याचे आणि शिर पक्ष्याचे (घुबडाचे) अशा स्वरूपातही दाखवले जाते.
हे तिथे असणारे अजून काही ग्रीक मिथकांतले प्राणी
स्फिन्क्स (धड सिंहाचे शिर मानवाचे) आणि ग्रिफिन (धड पशूचे आणि शिर गरूडाचे)
-
घुबड
आमच्या इथे (भांडुप मधे) मागच्य वर्षी चुकुन आलं होतं. पण ते वरच्या फोटोमधे आहे त्यापेक्षा वेगळं होतं दिसायला - छान गुबगुबीत आणि शुभ्र रंगावर काळे ठिपके अस होत. आम्हाला कुणीच ते पाळू दिलं नाही आणि कावळ्यांनी हुसकावून लावलं त्याला :(
मस्त उपक्रम आणि त्यावरचा
मस्त उपक्रम आणि त्यावरचा लेखही ! अपडेटही उत्सुकतेने वाचतोय. सर्वसाधारण लोकांसारखे खुळ्या अंधश्रद्धेला बळी न पडता उलट या घटनेचा चांगल्लच उपयोग केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !
मस्त
घुबड फार क्वचित दिसतं. हल्लीच समोरच्या झाडावरच्या बगळ्यांचा अंडी-ते-पक्षी हा प्रवास पाहिला. अंड्यातून बाहेर आल्यावर दिवसागणीक इंचा-इंचाने मोठी होतात की काय असं वाटायचं. या पक्षांमध्ये पण एखादं पिलू दुबळं निघतं आणि ते बहुदा मरतं. अंडी घालण्याअगोअदर चोचीने घरटं बांधायची कलाही थक्क करणारी.