Skip to main content

ब्लॅक आईस

लेखक निनाद
Published on रवीवार, 06/10/2013
सारा ही चाळीशीची गायनॅक डॉक्टर आहे. तिचा नवरा लिओ हा आर्किटेक्चर विषयातला प्राध्यापक आहे. दोघेही हेलसिंकीमध्ये राहत असतात. साराच्या चाळीसावा वाढदिवस लिओने आणि तिने दुपारी रमणीय शृंगारीकपणे साजरा केलाय. आता सायंकाळी पार्टी आहे. पार्टीच्या आधी योगायोगाने साराला समजते की लिओच्या आयुष्यात अजून एक प्रकरण आहे. सारा भडकते. विमनस्क झालेली सारा पार्टी उधळून टाकते. सगळ्यांच्या समोर कंडोम्सचे फुगे करत लिओला जाब विचारते पण लिओ असे काही प्रकरण आहे हेच नाकारतो. थोड्याफार खटपटीतच तिच्या लक्षात येते की मुलीचे नाव तूली आहे आणी ती त्याची विद्यार्थिनीच आहे. तूली मार्शल आर्ट्सची प्रशिक्षिकाही असते. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यासाठी मत्सरग्रस्त सारा तूलीच्याच क्लासला नाव घालते. एकदिवस शांतपणे सारा घर सोडते. तूली बरोबर जवळीक वाढवण्यासाठी नव्या नावाने मानसोपचार तज्ञ असल्याचे भासवून तिच्या आजूबाजूला वावरू लागते. त्यासाठी नव्या नव्या हिकमती लढवते. या सगळ्याचा परिणाम होतो आणि तूली तिला स्वतःची चांगली जवळची मैत्रिण समजू लागते. तूली लिओ विषययी असलेली सर्व माहिती साराला सांगू लागते. त्यातून तिला लिओची अजून अनेक प्रकरणे होती हे लक्षात येते. तरी मनोमन सारा लिओला सोडू शकत नाही. सारा सोडून गेल्याने लिओ अस्वस्थ होतो. त्याचा मित्र इक्का त्याची चांगली कानउघडणी करतो. अस्वस्थ लिओ तूलीला टाळून साराला भेटण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यासाठी तो तूलीकडे दुर्लक्ष्य करू लागतो. तूली अस्वस्थ होऊ लागते. शेवटी सारा भेटायला तयार होते. या भेटीत लिओ तिला सांगतो की माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. मला तुझ्या मुलाचा बाप व्हायचंय. सारा सुखावते पण अजून त्याला निर्णय सांगत नाही. तूली आणि सारा कॉलेजच्या एका कार्यक्रमात जातात. तेथे लिओ अजून तिसर्‍याच मुलीबरोबर या दोघी पाहतात. तूली भडकते. त्याच मानसिक अवस्थेत तूली तिला सांगते की लिओमुळे तीची पाळी चुकली आहे. सारा विचारते की तिने प्रेग्नंसी टेस्ट केली आहे का? तूली नाही सांगते. हादरलेली सारा तिला हेलसिंकीच्या बर्फाळलेल्या रस्त्यांवरून लिओच्याच घरी घेऊन येते. तेव्हा तूली प्यायलेली असते. साराला ती खरच प्रेग्नंट आहे की नाही हे तपासायचे असते. सारा तिला अजून दारु पाजण्याचे ठरवते. गुंगी येण्यासाठी एका पेल्यात औषध घातलेले मद्य तयार करून ठेवते. गायनॅक असलेली सारा प्रेग्नंसी टेस्ट करण्याचा प्रयत्न करते. पण प्रयत्न फसतो तूली जागी होते. तूलीला संशय आलेला असतो पण लिओचे घर पाहिल्यावर तिलाही साराचे स्वरूप लक्षात येते. नेमका तेव्हाच लिओही घरी येतो. वादात सारा त्याला सांगते की तूली प्रेग्नंट आहे. या सुखद धक्क्याने लिओ तेथे असलेला मद्याचा पेला पिऊन टाकतो. साराच्या फसवणूकीने अस्वस्थ असलेली तूली त्यांच्या नकळत घरातून बाहेर पडते आणि त्याची गाडी घेऊन जाऊ लागते. आता लिओचे विचारच पालटतात. तो सारा ला तेथेच सोडून तूलीच्या मागे दुसरी गाडी घेऊन जातो. तूलीच्या हे लक्षात येते पण ती थांबत नाही. मद्यातले औषध परिणाम करू लागते आणि लिओ एका झाडाला धडकतो. संतापलेली तूली गाडी थांबवते आणि मागे आणते. धडधाकट असलेला लिओ पाहिल्यावर ती त्याला सांगते की तू या बर्फाळ रात्री आता चालतच घरी जा आणि ती निघून जाते. लिओ घरी पोहोचतच नाही. पुढे काय होते... ते चित्रपटातच पाहा. प्रेमाचा तिकोण असलेली कथा सुंदर हाताळली आहे. सर्वांचाच अभिनय सुरेख आहे. साराची भूमिका औती मेन्पा ने अप्रतिम साकारली आहे. चाळीशीची अस्वस्थ, उध्वस्त पण चलाख सारा अप्रतिमपणे उभी केली आहे. तूली प्रथम भेटण्याचा प्रसंग जबरी आहे. पहिल्यांदा तूलीला जवळून पाहताना साराच्या डोळ्यात मत्सर पेटतो तो प्रसंग सुंदर आहे. तूली प्रेग्नंट आहे हे कळल्यावरचा अभिनयही मस्त. आधी बधीर वाटलेली तूली (रिया कात्जा) पुढे सुंदर अभिनय करते. साराचा संशय आल्याचा प्रसंग. किंवा लिओने तिला सोडल्यावर, साराला तिच्या क्लास मध्ये भेटण्याचा प्रसंग अप्रतिम आहेत. फक्त डोळ्यातून तिने दाखवलेला विखार जबरदस्त! रंगेल, रसिक लिओची भूमिका मार्ती सुओसालोने ठिक उभी केली आहे. पण खर्‍या अर्थाने चित्रपट या दोघींचाच आहे. प्रेमाच्या त्रिकोनातले दोन कोन आणि त्यातलेच रंग गहिरे होत जातात. ब्लॅक आईस म्हणजे बर्फाचा न दिसून येणारा एक पातळ थर. हा भयंकर निसरडा असतो. पण तो तेथे आहे हे लक्षात येत नाही. मानवी संबंधातले निसरडे थर जाणवून देणारा चित्रपट असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल. दिग्दर्शन ठिकठाक. अजून चांगले होऊ शकले असते वाटत राहिले. त्यातही सारा लिओकडे परत आल्यावरचा प्रणयप्रसंग, किंवा पार्टीत कंडोमचे फुगे फुगवत तिरकसपणे जाब विचारणे असे काही प्रसंग दिग्दर्शक दाखवून जातात. निरनिराळे पण मोजकेच चित्रपट या दिग्दर्शकाने दिले आहेत. प्रकाश चित्रण ठिकठाक. अजून चांगले करता आले असते. संगीत मात्र सुरेख आहे. काही गाणी खुपच छान आहेत. Black Ice (Musta jää) भाषा - फिनिश वर्ष - २००७ कथा आणि दिग्दर्शन - पेट्री कोत्विका संगीत - इक्का तोपिनेन प्र. भू. सारा - औती मेन्पा तूली - रिया कात्जा लिओ - मार्ती सुओसालो ट्रेलर - http://www.youtube.com/watch?v=VOTNuC2F_DA पुरस्कार बर्लिन आंतराष्ट्रिय चित्रपट मोहोत्सव - बर्लिन गोल्डन बेयर साठी नामांकन फेस्त्रोय त्रुआ - उत्कृष्ठ अभिनेत्री - रिया कात्जा (फिनिश नावांचे उच्चार गंडले असतील तर जाणकारांकडून दुरुस्तीचे स्वागत आहे!)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4734
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

एकवेळ राम गोपाल वर्मा कि आग चालेल पण आत्यंतीक बोरींग क्षणी देखील असे प्रेमत्रिकोण बघणार नाहि.

In reply to by अर्धवटराव

चुकताय अर्धवटराव. बर्‍याचदा असे चित्रपट त्यातल्या अभिनयासाठी, मांडणीसाठी पहायचा प्रय्त्न करा. मग तुम्ही "विहीर" बद्दल काय म्हणाल? खिळुन रहातो माणुस तो चित्रपट बघताना, घडत काय? तस विषेश काहीच नाही पण जे डोळ्यांना दिसत पण शब्दात बांधता येत नाही ते शब्दात बांधायचा अट्टाहास न करता बनवलेला चित्रपट म्हणुन विहीर अतिशय उंची गाठुन जातो.

In reply to by स्पंदना

चार सेन्सीबल लोकं चित्रपट आवडल्याची पोच देतात तेंव्हा चित्रपटात निश्चितच काहितरी चांगलं असणार. कधीमधी असे आडवळणाचे चित्रपट, समीक्षकांच्या सल्ल्यावरुन, आवर्जुन बघितले आहेत व ते आवडले देखील. पण अशा धाडसाची आवड म्हणुन नाहि मला. काहि लोक्स हमखास असे चित्रपट पाहातात, अगदी जिवाचा आटापिटा करुन जमवतात. मी नेमकं उलट करतो... अगदी शेवटचं ऑप्शन म्हणुन असे चित्रपट पाहतो.

खूप मस्त वर्णन केले अहे. सिनेमा नक्की पाहण्यात येइल.
ब्लॅक आईस म्हणजे बर्फाचा न दिसून येणारा एक पातळ थर. हा भयंकर निसरडा असतो. पण तो तेथे आहे हे लक्षात येत नाही. मानवी संबंधातले निसरडे थर जाणवून देणारा चित्रपट असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल.
ब्ल्याक आईस वरून खूप वेळा साष्टांग नमस्कार मी घातला आहे आणि या थंडीत पण घालीन याची खात्री आहे. ;)

शिव शिव मद्यपान काय, कंडोमाचे फुगे फोडणे काय, प्रेग्नंसी टेस्ट काय, प्यालेल्या बायका काय, गाडी धडकणे काय, तथाकथित प्रेयसीने बर्फाळ रात्री चालत यायला सांगणे काय... धन्य त्या ललना आणि धन्य त्यांचा तो बारा भानगडीवाला गडी (त्यापेक्षा दादा कोंडक्यांचा एकादा आचरट सिनेमा का बघू नये)?

In reply to by चित्रगुप्त

कसले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि काय हो - फालतू धंदे!! भयंकर चित्रपट आणि त्याचे कसले आस्वाद काय घेतात लोकं!? यामुळे आपली संस्कृती 'फिन्निश' होईल याची अजिबात काळजी करत नाहीत. असले लेखक खरं तर मिपावरून ब्यानच केले पाहिजेत! ;)

परीक्षण आवडले. पण गोष्ट काही फार आवडली नाही. 'लिओ' च्या तोंडी, 'सारा प्यार तुम्हारा मैनें बांध लिया है आँचलमें, हे गाणं खपून गेलं असतं!

In reply to by तिमा

बरेचदा कथा फालतू असली तरी सादरीकरण इतके तूफान असते की मजा येऊन जाते.

In reply to by मदनबाण

मदनबाणा, चांगला दादला आणि 'आई' व्हायला तयार असलेली मुलगी मिळणं अवघड होत चाललं आहे पाश्चात्य देशात... मग जे मिळाले आहे ते राखायची धडपड साहजिकच.

अभिनंदन हो निनाद! शेवटी किबोर्ड्ला हात लागला तर लिखाणासाठी. आता येत र्‍हावा भावा. आन ते दिवाळी अंकाच जरा मनावर घ्या. काय तरी स्पेश्शल लिहुन पायजे! आता चित्रपटाबद्दल. त्रिकोण असो चौकोन असो, नाहीतर पंचकोन असो. अगदी मोनोगामी असो. जर मांडणी चुकली असेल तर कोणीच पाच मिनिटांच्यावर न कळत्या भाषेतला चित्रपट पहाणार नाही. ज्याअर्थी चित्रपट संपेपर्यंत तुम्ही खुर्चीत होतात,त्याअर्थी चित्रपट खरच बघणेबल. शोधुन पहाण्यात येइल. मलाही कित्येक दिवस 'द कोर्प्स" बद्दल लिहायच आहे, जमतच नाही. आतातर संदर्भही हरवले. बा द वे...एस बी एस ..झिंदाबाद! ;)

In reply to by स्पंदना

जर मांडणी चुकली असेल तर कोणीच पाच मिनिटांच्यावर न कळत्या भाषेतला चित्रपट पहाणार नाही.
+ १ धन्यवाद ताई! एसबीएस ची कृपा ,म्हणून असे काही पाहायला मिळते. नाही तर लायब्रर्‍या धुंडाळत फिरावे लागले असते... वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ते ही केले आहे एके काळी :) वेळ मिळेल तसे लेखन करेन.

लिओ घरी पोहोचतच नाही.
हे लै आवडले. म्हणजे कसे की भारतीय प्रेक्षकाच्या दृष्टीने लै शक्यता निर्माण झाल्या. ;) सांगा की, काय होते पुढे?