'लोकायत' विचारचर्चा

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
19 Sep 2013 - 8:57 am

माधव : असे आश्रय ज्ञानाचा।
निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा ।
धनी माझ्या नमस्काराचा ।
शिव सृष्टीकर्ता।। १

पावले जे दर्शनसागरापार।
करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार।
असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर ।
मम आश्रयदाता।।

विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर ।
गहन, दुस्तर तरी आनंद देई फार।
अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर ।
होई आल्हाददाता।

पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव!

माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता?

पुरूष क्र. १ : माधवराव, मी सुरूवातीपासून तुमचं भाषण ऐकतोय. अहो, तुम्ही तो शिव मोक्ष देणारा आहे,
असं कसं म्हणता?

माधव : का हो त्यात काय चूक आहे ?

पुरूष क्र. १ : माधवराव, बृहस्पतीमतानुसारी, नास्तिक शिरोमणी चार्वाकाने हे विधान सर्वथा त्याज्य ठरवले आहे
आणि त्यावरचा त्याचा युक्तिवाद खोडून काढणं महाकठीण आहे.

माधव : काय सांगता? म्हणतो काय नास्तिक शिरोमणी चार्वाक यावर?

पुरूष क्र. १ : कसं आहे बघा, ते म्हणतात ना,

“यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।”

जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं
तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?

माधव : असं कसं म्हणता? धर्म तर असे काही सांगत नाही ?

पुरूष क्र. १ : धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण
लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.

माधव : हे जरा स्पष्ट करून सांगा बरं!

पुरूष क्र. १ : माधवराव, आता जरा इथे या आणि सांगा तिथे त्या कोपर्‍यावर काय दिसतंय?

माधव : कुठे? तिथे? त्या शिंदीच्या झाडांजवळ ?

पुरूष क्र.१ : हो! हो! तिथेच, तिथेच. काय आहे सांगा जरा!

माधव : अहो, ते तर त्रैलोक्य मदिरालय आहे.

पुरूष क्र. १ : बरोबर. आता आपलं मदिरालयाशी काही सोयर - सूतक नाही. पण त्यातल्या मदकारी वारूणीचा
आपण विचार करू.

माधव : आता इथे वारूणीचा काय संबंध ?

पुरूष क्र. १ : सांगतो. शिंदीसारख्या फळांचा रस, साळी- सातुसारखी धान्यं, गूळ आणि किण्व या चार द्रव्यांच्या
संयोगातून तयार होणार्‍या वारूणीत मद निर्माण करण्याची शक्ती उत्पन्न होते. बरोबर?

माधव : बरोबर. या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो
झिंगतो.

पुरूष क्र. १ : अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून
देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.

माधव : अच्छा असा संबंध आहे होय ?

पुरूष क्र. १ : मग तर काय! तसंच तर आहे.

माधव : म्हणजे ही चार तत्त्वं देहामध्ये एकत्र आली की त्यांच्यात चैतन्य निर्माण होतंय आणि देहाकार
झालेली ही महाभूत नष्ट झाली की चैतन्य आपोआपच नष्ट होतंय की काय?

पुरूष क्र.१ : मग काय तर ! आता माधवराव, त्या बृहदारण्यक उपनिषदातच नाही का म्हण्टलंय.

“विज्ञानयन एवैतेभ्यो भूतेभ्य: समुत्थाय तान्येवानुविनश्यति | न प्रेत्य ज्ञास्ति |”

जाणवणारा जीव महाभूतांमधून उत्पन्न होतो आणि ती महाभूते नष्ट झाल्यावर त्यांच्या सोबतच तो
ही नष्ट होतो. मेल्यावर कुठे कसली जाणीव उरते?

माधव : बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच
आत्मा, असा घ्यायचा का?

पुरूष क्र.१ : मग काय तर ! आमच्या मते प्रत्यक्ष हे एकच प्रमाण आहे. इतर
अनुमानादि प्रमाणांना प्रत्यक्षाची जोड नसेल तर त्यांचा स्विकारच करता येणार नाही.

माधव : हे कसं मान्य करावं? अनुमान इत्यादींना प्रमाण म्हणून मान्यता द्यायलाच पाहिजे. कारण
त्याशिवाय, धूर दिसल्यावर जनसामान्यांना आगीच्या असण्याबद्दलची जाणीव होते, ती कशी होईल?

पुरूष क्र.१ : माधवराव, हा सगळा मनाचा खेळ आहे हो ! अनुमान हे प्रमाण असल्याचं मानणार्‍यांनी व्याप्ती आणि
पक्ष यांनी युक्त असणारा हेतु हेच निर्दोष अनुमानाचे गमक म्हणून सांगितले आहे. व्याप्ती म्हणजे
अनिश्चितता आणि संदिग्धता विरहीत हेतु आणि साध्यामधील संबंध. हा संबंध चक्षु आदी
इंद्रियांच्याद्वारे झालेल्या ज्ञानानेच अनुमानाला साहाय्यक होतो.

माधव : बुवाजी, काही उदाहरण देऊन समजवा ना !

पुरूष क्र.१ : माधवराव, तुमच्या सारख्या विद्वानालाही आमच्यासारख्यांची टर खेचावीशी वाटते, असं दिसतंय !

माधव : नाही हो, बुवाजी ! या आजुबाजूला ऐकणार्‍या लोकांनाही कळावं म्हणून विचारतोय.

पुरूष क्र.१ : असं म्हणताय? बरं करतो प्रयत्न. माधवराव, मला सांगा, ते अनुमानप्रमाणाचं नेहमीचं उदाहरण कोणतं?

माधव : ते ना, “पर्वतो वह्निमान्, धूमवत्त्वात् !” म्हणजे पर्वतावर आग आहे कारण तिथे धूर दिसतोय.

पुरूष क्र.१ : बरोबर. आता इथे पर्वत हा पक्ष, त्यावरची आग हे साध्य आणि तिथला धूर हे लिंग म्हणजेच हेतु.

माधव : खरं आहे, या उदाहरणातलं “यत्र धूम : तत्र वह्नि:” म्हणजे जिथे धूर तिथे आग ही व्याप्ती म्हणजेच
लिंग (हेतु) आणि साध्य यांच्यातला निर्दोष संबंध.

पुरूष क्र.१ : माधवराव, हा संबंध म्हणजेच व्याप्ती, तेव्हाच निर्दोष असेल जेव्हा हेतु, लिंग किंवा खूण ही पक्षाच्या
ठिकाणी, साध्याच्या उपाधि संबंधानेच उपस्थित असावी. म्हणजे धूर हा आगीच्या उपाधि संबंधानेच
पर्वतावर दिसत असल्यास व्याप्ती निर्दोष होऊन अनुमान प्रमाण म्हणून मान्य होऊ शकते अन्यथा
तसं मानता येणार नाही.

माधव : बरं! बरं! म्हणजे “यत्र हिंसा तत्र अधर्मसाधनम्” अर्थात जिथे हिंसा तिथे अधर्माचरण इथे हिंसा हे
लिंग निषिध्दत्व या उपाधिनेयुक्त आहे हे ‘अधर्मसाधनम्’ या शब्दातून समजते. पण असं असलं तरी
यज्ञातली हिंसा निषिध्द नसल्याने ती मात्र अधर्मसाधन होऊ शकत नाही. मग म्हणूनच, “यत्र हिंसा
तत्र अधर्मसाधनम्” मधली उपाधि संदिग्धतेमुळे दूषित बनल्याने या परिस्थितीतले अनुमानही दूषित
बनते नि प्रमाण म्हणून वापरता येत नाही.

पुरूष क्र.१ : माधवराव एकदम छान ! अगदी योग्य तेच बोललात. आता पहा, प्रत्यक्षज्ञानाच्या समयी, या ज्ञानाची
साधनं असलेली चक्षुरादि इंद्रिये उपस्थित असायला हवीत आणि त्यांद्वारे ज्ञान व्हायला हवं. यावेळी
त्या इंद्रियांचंच ज्ञान होण्याची गरजच नाही. अनुमानाच्या संबंधाने अशी परिस्थिती नाही ना !
अनुमानाचे साधन नुसते आस्तित्त्वात असून चालत नाही तर त्याचं ज्ञान आणि ते ही पुन्हा
इंद्रियांद्वारेच व्हांव लागतं. या अशा सगळ्या प्रकारामुळेच प्रत्यक्ष हेच आपलं प्रमाण !

माधव : मग बुवाजी, वेद वाक्याला प्रमाण मानणारं शब्द प्रमाण, त्याचं काय?

पुरूष क्र.१ : माधवराव, त्याचंही असंच आहे की ! प्रत्यक्ष न ऐकलेल्या आणि न जाणे कुणी लिहिलेल्या ग्रंथातल्या
शब्दांचे काय ते प्रमाण?

माधव : तुम्ही मगाशी म्हणालात की अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. याचं प्रत्यक्ष स्पष्टीकरण कसं
कराल?

पुरूष क्र.१ : खरं म्हणजे स्त्रियांच्या आलिंगनादिंपासून मिळणारं सुख हाच एक पुरूषार्थ आहे. हे सुख दु:खमिश्रित
असलं तरी टाळता येण्यासारखं नसल्यामुळे त्याला बाजूला सारून फक्त सुखाचा तेवढाच उपयोग घ्यावा.

माधव : म्हणजे बाजारातून आणलेल्या धान्यांतून तूस वगैरे दूर करून निवडलेले धान्यच तेवढं मनुष्य ग्रहण
करेल, तसंच ना?

पुरूष क्र.१ : किंवा मासे खायची इच्छा करून मनुष्य खवले आणि काटे यांनी युक्त मासे आणतो आणि त्यातला
खाण्यायोग्य भागच निवडून खवले – काट्यांचा त्याग करतो. अशाचप्रकारे दु:खाला दूर लोटून केवळ
सुखाचाच तेवढा उपभोग घ्यावा.

माधव : अहो, दु:खाची भीती वाटते.

पुरूष क्र. १ : माधवराव, दुखाःच्या भीतीने आल्हाददायक सुखाचा त्याग का चांगला मानायचा! हे चूकच आहे. असं
बघा, गुरं तोंड घालतात, पाखरं टिपतात म्हणून कुणी अन्न शिजवायचं थांबतो का ? असं वागणारा
भित्रा मनुष्य सर्वथैव मूर्ख ठरेल.

माधव : पण मग असं असेल तर समाजातील विद्वान मंडळी पुष्कळ द्रव्य खर्च करून शारीरिक कष्टाने साध्य
होणारे अग्निहोत्र इत्यादि यज्ञयाग करण्यासाठी कसे काय प्रवृत्त होतात?

पुरूष क्र. १ : बरा विषय काढलात माधवराव ! पारलौकीक सुखप्राप्ती स्वर्गारोहणाच्या माध्यमातून करवण्याचं
आश्वासन देणारे यज्ञयाग आदि कर्मकाण्डांचे प्रयोग हा काही प्रमाण मानता येईल असा युक्तिवाद होऊ
शकत नाही.

माधव : का बरं?

पुरूष क्र. १ : कारण असं आहे की ज्याच्या संदर्भाने या गोष्टी केल्या जातात, ते, असत्य विधानं, परस्पर विरूध्द
वचनं आणि पुनरूक्ती अशा दोषांनी दूषित आहे.

माधव : बुवाजी, असं आडून आडून बोलू नका. स्पष्ट काय ते बोला. नको, मीच तुम्हाला स्पष्टपणे विचारतो.
वेदवाक्ये प्रमाण का मानू नयेत.?

पुरूष क्र. १ : आता तुम्ही स्पष्टच विचारलंय तर मी ही स्पष्टच उत्तर देतो. स्वतःला वेदशास्त्रसंपन्न मानणार्‍या
बगळ्यासारख्या धूर्त लोकांनी वेदवाक्यांच्या प्रमाणत्वाचे परस्परच खंडन केलेय. असं असताना त्यांना
प्रमाण मानण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो?

माधव : असं कसं म्हणता बुवाजी तुम्ही? हे कसं शक्य आहे?

पुरूष क्र १ : असं बघा माधवराव, वेदप्रामाण्य मानणार्‍या कर्मकाण्डी मीमांसकांनी वेदांतील ज्ञानकाण्डाचे पूर्णतः
खण्डन केले आहे आणि ज्ञानकाण्ड प्रमाण मानणार्‍या वेदान्त्यांनी कर्मकाणडाचे पूर्णतः खण्डन केले
आहे. वेदशास्त्राची दोन्ही अंगे परस्परच खण्डीत झाली असताना त्याचं प्रामाण्य कसं मानायचं? म्हणून
या संदर्भात लोकायत प्रवर्तक बृहस्पतींचे मतच ग्राह्य व्हावं.

माधव : असं? काय म्हणतात याबद्दल बृहस्पती?

पुरूष क्र. १ अहो, ते म्हण्टलंच आहे ना,

“अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्।
बुध्दिपौरूषाहीनानां जीविकेति बृहस्पतिः ।।“

अर्थात, अग्निहोत्रादि यज्ञयाग, तिन्ही वेद, संन्यासी होऊन तीन दण्ड धारण करणं, अंगाला भस्म
चोपडून साधू बनणं या सार्‍या गोष्टी म्हणजे बुध्दी आणि पौरूष यांचा अभाव असणार्‍या व्यक्तींच्या
उपजीविकेची साधनं आहेत असंच बृहस्पती मानतात.

माधव : बुवाजी, शब्दार्थात हे सारं सिध्द होण्याचा प्रसंग येत असला तरी समाजाच्या श्रध्दास्थानांचा असा
विध्वंस योग्य नव्हे. श्रध्देवर समाज टिकलेला असतो. समाजाच्या श्रध्दांचा विध्वंस सामाजिक
विध्वंसाला कारणीभूत ठरतो. निःश्रध्द समाज, निर्नायकी अवस्थेत कोणत्याही इष्ट लक्ष्याच्या अभावी
नष्ट होऊन जाईल. हे होणे योग्य नाही पण तुमची मतं तसाच परिणाम करवण्याची शक्यता आहे. हे
कसं टाळावं?

पुरूष क्र. १ : माधवराव, तुम्ही खरोखरच सायणकुलभूषण आहात. तुमच्या मूलगामी बुध्दीचा त्रिवार जयजयकार
आहे. चार्वाकांच्या भूमिकेचा समाजावर होणार्‍या परिणामांचा तुम्ही केलेला विचार हा प्रत्यक्ष
चार्वाकांनाही विचारप्रवण करायला लावणारा आहे हे निश्चित !

माधव : बुवाजी पण यावर उपाय कसा होणार ?

पुरूष क्र. १: सामाजिकांच्या अलौकिक श्रध्दांना लौकीक पातळीवर पर्याय उभा केल्यास तुमची अडचण दूर होते असं
म्हणू शकतो.

माधव : हे उलगडून सांगा बरं जरा.....

पुरूष क्र. १ : कसं आहे माधवराव स्वर्ग – नरक प्रत्यक्षात कुणी पाहिलाय? वरती आकाशाच्यावर कुठे स्वर्ग आणि
जमिनीच्या खाली कुठे नरक असं आपलं मानायचं याला काय अर्थ आहे?

माधव : मग ? पुढे त्याचं काय?

पुरूष क्र १ : सांगतो. यामुळे काटे, दगड- धोंडे इत्यादि तापदायक गोष्टींनी उत्पन्न होणारे दुःख म्हणजेच नरक
आणि त्यांच्या अभावाने साधणारे सुख हाच स्वर्ग. लोकांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झालेला राजा हाच परमेश्वर
तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा आणि त्या देहाचा विनाश हीच मोक्षप्राप्ती हे समजून घेणं हाच उत्तम
उपाय आहे.

माधव : म्हणजे बुवाजी, सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि आचारणामध्ये कोणत्याही प्रकराचा आधात्मिक
पसारा न मांडता लोकायत दर्शन सहज आत्मसात होण्यासारखं आहे, असं दिसतयं. स्त्री – पुरूषांना
आलिंगनादिंच्याद्वारे मिळणारं सुख हाच काम अर्थात एक पुरूषार्थ, कोणत्याही वेदनेपासून उत्पन्न
होणारे दुःख हाच नरक, लोकांमध्ये प्रतिष्ठित राजा म्हणजेच परमेश्वर होय. चैतन्ययुक्त देहाचा विनाश
हाच मोक्ष तेव्हा ज्ञानाने मोक्षप्राप्ती हा सिध्दान्त अमान्य. जगात पृथ्वी, जल, तेज आणि वायू हीच
चार महाभूते असून त्यांच्या संयोगातूनच चैतन्योत्पती होते, येवढ्यातच जनसामान्यांना सहजी
आकळणार्‍या लोकायत दर्शनाचं सार सामावल्याचं दिसतंय.

पुरूष क्र. १ : साधु माधवराव, साधु लोकायत दर्शन सारांशरूपाने मांडणार्‍या तुमच्या बुध्दीला माझे त्रिवार प्रणाम !

(क्रमशः)
(श्रीमन्माधवाचार्यांच्या प्रसिद्ध 'सर्वदर्शनसंग्रह' ग्रंथाच्या वाचनादरम्यान त्यातील चर्चा संवाद-शैलीत अधिक सहजगत्या समजेल अशी भावना निर्माण झाली म्हणून हा प्रयत्न. वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)

संस्कृतीनाट्यधर्मइतिहासवाङ्मयशब्दक्रीडाशिक्षणमौजमजाप्रकटनआस्वादवाद

प्रतिक्रिया

आतिवास's picture

19 Sep 2013 - 9:36 am | आतिवास

स्तुत्य प्रयत्न.
अधिक वाचण्यास उत्सुक आहे.
अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

प्रास's picture

19 Sep 2013 - 11:11 pm | प्रास

माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम's picture

19 Sep 2013 - 9:38 am | उद्दाम

आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही.

चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा's picture

19 Sep 2013 - 9:57 am | चौकटराजा

धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे.
एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

एस's picture

20 Sep 2013 - 12:04 am | एस

+१

अर्धवटराव's picture

19 Sep 2013 - 11:31 pm | अर्धवटराव

लईच भारी :)

अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं.
असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे.

'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय.

मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चित्रगुप्त's picture

20 Sep 2013 - 12:30 am | चित्रगुप्त

साधु साधु
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रसाद गोडबोले's picture

20 Sep 2013 - 2:55 am | प्रसाद गोडबोले

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत .
(अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :(
असो.
म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2013 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

प्यारे१'s picture

20 Sep 2013 - 2:18 pm | प्यारे१

येऊ द्या आणखी!

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.

पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?

जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं
तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?

आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.

या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून
देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.

नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?

बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच
आत्मा, असा घ्यायचा का?

देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही.

उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

अनिरुद्ध प's picture

20 Sep 2013 - 7:10 pm | अनिरुद्ध प

आवडला वाचनीय आहे,तसेच चार्वाक दर्शनावरचा लेख अभिनन्दनिय्,पुभाप्र.

अग्निकोल्हा's picture

20 Sep 2013 - 11:24 pm | अग्निकोल्हा

चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती :)

एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.

पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?

पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.

आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.

शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?

द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो

येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते.

चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.

चैतन्ययुक्त देह हाच आत्मा

आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.

चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती

नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.

बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही.

शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते...
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: !
जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

अग्निकोल्हा's picture

21 Sep 2013 - 2:40 am | अग्निकोल्हा

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...

विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .

शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?

अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.

नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.

सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.

असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.

शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

एस's picture

23 Sep 2013 - 12:54 am | एस

आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद.

चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे.

देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.

थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते.

जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय.

बाकी चालू द्या.

अर्धवटराव's picture

23 Sep 2013 - 8:52 am | अर्धवटराव

चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज.

>>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे.
-- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि.

>>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय.
-- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

छान प्रश्न विचारले आहेत आपण

मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.

हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि

या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी.

चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात
लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे.

चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली.

याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.

माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय.

थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

शिवोऽहम्'s picture

23 Sep 2013 - 8:24 pm | शिवोऽहम्

समतोल प्रतिसाद आणि उत्तम विवेचन आहे!

चर्चा अधिक विस्ताराने झाली तर फार आनंद होईल.

अर्धवटराव's picture

30 Sep 2013 - 11:17 pm | अर्धवटराव

माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली.
चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो.

सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते.

चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं.

हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि.

थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला.

यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला.

आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित.

असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु.

अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे.

व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे.

असो.

चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही.

एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

अग्निकोल्हा's picture

24 Sep 2013 - 6:37 am | अग्निकोल्हा

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही

आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).

त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.

आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.

थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.

अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.

आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).

यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.

देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.

सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो.

वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.

थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.

इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.

आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत

टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज.

आय्नीवेय...

स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.

याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.

स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.

यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.

अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

अनिरुद्ध प's picture

24 Sep 2013 - 1:35 pm | अनिरुद्ध प

म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

उद्दाम's picture

21 Sep 2013 - 11:53 am | उद्दाम

त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: !
जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !!

please explain in marathi. ( net problem - so english)

शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

उद्दाम's picture

24 Sep 2013 - 2:19 pm | उद्दाम

There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग's picture

21 Sep 2013 - 3:00 pm | आशु जोग

लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा's picture

22 Sep 2013 - 6:19 pm | पैसा

संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

22 Sep 2013 - 9:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

पुढील भाग येउद्यात