✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नर्मदा खो-यातून ...(१)

आ
आतिवास यांनी
Fri, 09/06/2013 - 16:26  ·  लेख
लेख
गेली अनेक वर्ष ‘आंदोलन’ मासिक (http://www.andolan-napm.in) नियमित वाचनात असल्याने “सरदार सरोवर” विषय अद्याप संपलेला नाही याची माहिती होती. गुजरात आणि महाराष्ट्रात माझ्या कामाच्या निमित्ताने धरणग्रस्त परिसरातल्या लोकांशी बोलायची संधी यापूर्वी अनेक वेळा मिळाली होती. मे २०१२ मध्ये ‘सरदार सरोवराला’ भेट दिली होती. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात शासकीय अधिका-यांसोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. त्याचवेळी ‘पुन्हा एकदा धरणग्रस्त परिसराला भेट दिली पाहिजे आणि यावेळी ती भेट आंदोलनाच्या जाणकार लोकांसमवेत केली पाहिजे’ असं ठरवलं होतं. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात जेव्हा १७ ते १९ ऑगस्टच्या “नर्मदा घाटी यात्रा”चं आमंत्रण आलं तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी नावनोंदणी केली. १७ ऑगस्टच्या सकाळी खलघाटला उतरलो तेव्हा मुंबईचे इतर साथी आणि बडवानीचे साथी हजर होते. दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, पुणे-ठाणे-मुंबई-धुळे-लातूर आणि मध्य प्रदेशातून आणखी काहीजण थोड्या वेळाने सामील झाले. दोन विदेशी साथीही होते. आम्ही ५५ जण बाहेरून आलो होतो. यात प्रामुख्याने तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. यातले अनेक विविध सामाजिक कामांत सक्रिय सहभागी आहेत. चार पत्रकारही सोबत होते. त्यामुळे चर्चा तीनही दिवस चालू राहिल्या. माहिती देण्याच्या मेधाताईंच्या (मेधा पाटकर) उत्साहात कधीच खंड पडत नव्हता त्यामुळे सतत नवे प्रश्न विचारायचा धीर गटाला आला आणि आणि तो पुढे तीन दिवस टिकला. दोन दिवस आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो तर तिस-या दिवशी महाराष्ट्रात. गुजरातमध्ये प्रत्यक्ष जायची संधी मिळाली नाही पण त्यावर चर्चा झाली आणि माहिती मिळाली. या भेटीत पाच मुख्य मुद्दे वारंवार समोर आले.
  • सरकार सांगत आहे की “सरदार सरोवर” पुनर्वसनाचा प्रश्न संपला आहे पण तो अद्याप मोठ्या प्रमाणात तसाच बाकी आहे.
  • सरदार सरोवराचे फायदे अपेक्षेपेक्षा फारच कमी मिळाले आहेत.
  • मध्य प्रदेशाच्या सरदार सरोवरग्रस्त भागातच कालव्यांच्या जाळ्याची योजना आहे. या योजनेत पुन्हा एकदा शेतक-यांच्या जमिनीचं अधिग्रहण केलं जात आहे, तिथं पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि आणि त्यात अमाप भ्रष्टाचार होतो आहे.
  • नर्मदेच्या तीरी मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा होत आहे. त्यातून कागदोपत्री पुनर्वसन झालेल्या पण प्रत्यक्ष जुन्याच गावांत असणा-या अनेकांचं जीवन आणि शेतजमीन धोक्यात आहे. गाळ भरून सरदार सरोवराचे आयुष्य कमी होण्याची शक्यता या वाळू उपशामुळे वाढली आहे.
  • कागदोपत्री पुनर्वसन झालेल्या पण जुन्याच गावाच्या जवळच्या टेकडीवर घरे वसवून राहणा-या लोकांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पिण्याचे पाणी अशा अनेक जीवनावश्यक सोयींपासून वंचित राहावं लागतं आहे.
धरणाने ग्रस्त, कालव्यांनी त्रस्त आमच्या प्रवासाची सुरुवात झाली खलघाटपासून. खलघाट हे मुंबई-आग्रा महामार्गावरचं, नर्मदेच्या किना-यावरचं एक महत्त्वाचं शहर. सरदार सरोवरापासून २०० किलोमीटर दूर असलेल्या क्षेत्रात आता आपल्याला जे पहायला मिळेल त्याहून अधिक विपरीत परिस्थिती धरणाच्या जवळच्या भागात असणार ही खूणगाठ मी तिथं मनाशी बांधून ठेवली. खलघाट आंदोलनातलं एक महत्त्वाचं शहर. या परिसरातली आणखी पंधरा गावं धरणाच्या बुडीतक्षेत्रात आहेत. १९९० मधल्या २८ तासांच्या ‘रास्ता रोको’च्या आणि ट्रक्टर परिक्रमेच्या आठवणी मेधाताईंनी आणि इतर लोकांनी सांगितल्या. ४ जुलै २०१३ रोजी कालवे फुटून बडवाह परिसरातली ५०० एकर शेतजमीन आणि घरं पाण्याखाली गेल्याची माहिती दयाराम पटेल यांनी दिली. ‘कालवे हवेत की नकोत – हो का नाही’ एवढं एकाक्षरी उतर घेण्यासाठी या भागात १४ ऑगस्टला ग्रामसभा झाल्या. लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न असे एका अक्षरात कसे सुटतील? हे कालवे नेमके आहेत तरी काय, ते कुणासाठी बनताहेत – असे अनेक प्रश्न मनात आले. nahar हा होता ओकारेश्वर योजनेचा डावा मुख्य कालवा. याची लांबी आहे १५६८७ मीटर. त्यापैकी दोन-तीन किलोमीटरमध्ये आम्ही जे पाहिलं त्यावरून बाकी चित्राची कल्पना आली. अमलठा हे खरगोन जिल्ह्यातल्या बडवा तहसीलमधलं गाव. तिथं नजरेच्या एका टप्प्यात दहा ठिकाणी फुटलेला कालवा दिसला; दीड-दोन किलोमीटर चाललो. दर दहा फुटांवर तेच दृश्य दिसत होतं. amalatha आम्ही चालताचालता पाहत होतो आणि लोकांचं ऐकतही होतो. पुढे नांद्रा गावात तोच विषय झाला. छोटा बडदा गावात एक मोठी सभा रात्री नऊपर्यंत चालली; त्यातही अनेकांनी ‘कालवा’ योजनेबद्दल त्यांचे अनुभव सांगितले. इथला समाज गेली २८ वर्ष त्यांचं गाव. घर, शेत, परिसर सरदार सरोवराच्या बुडीतून वाचावं म्हणून प्रयत्न करतोय. ती लढाई अजून चालूच आहे; तोवर ही एक नवी लढाई समोर येतेय त्यांच्या. ज्या विभागाने, ज्या समाजाने, ज्या गावांनी आधीच सरदार सरोवराची झळ सोसली आहे तिथं पुन्हा हे कालवे कशासाठी? अनेक नव्या गोष्टी समोर आल्या ज्या अस्वस्थ करणा-या होत्या. ओंकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून निघणा-या कालव्यांचं जाळं या भागात नियोजित आहे आणि त्यात सुमारे १०००० हेक्टर जमीन जाणार आहे. याचा फटका कमी अधिक प्रमाणात ११०० गावांना बसणार आहे. सरदार सरोवरात जी गावे बुडीत आहेत, तीच कालव्यांच्या लाभक्षेत्रात दाखवली आहेत – ही सरळसरळ दिशाभूल आहे. कालव्यांच्या योजनेत सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय हे मुख्य लाभ दाखवले आहेत. पण लाभक्षेत्र आधीच सिंचित आहे आणि नर्मदा जवळ असल्याने पिण्याच्या पाण्याची तितकी चणचण नाही. “आधे गाव मे जलाशय आधे गाव मे नहर- अशी आमची स्थिती आहे” असं एक गावकरी म्हणाला तेव्हा चित्र विदारक आहे हे लक्षात आलं. नियोजनाच्या बाबतीत सरकारची नेहमीची बेपर्वाई इथं दिसून आली. कालव्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा हातात घेण्याऐवजी ठेकेदार घाईघाईने खोदकामाला सुरुवात करत आहेत. नांद्रामधल्या लोकांनी “आधीचा टप्पा पूर्ण झाला नाही, आमच्या गावातलं काम सुरु करायची घाई करु नका - म्हणत ठेकेदाराला काम सुरु करण्याला विरोध केला तर पोलिसांनी आम्हाला अटक करून तुरुंगात डांबलं आणि एका रात्रीत १५ मशीन लावून खोदकाम केलं. ही होळीच्या आसपासची गोष्ट – गावात कालवा बांधण्यासाठी संचारबंदी कलम १४४ अ लागू करण्यात आलं होतं त्यावेळी” – असं लालूभाई यांनी सांगितलं. कालवे शेतांच्या मधून जात असल्याने शेतक-याचे शेत आता तुकड्यात विभागले जात आहे. अनेक ठिकाणी कालवे ओलांडून जायची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतक-यांना आपल्याच शेताच्या एका भागातून दुस-या भागात जायला लांबचा वळसा घ्यावा लागतो. कालवे आखताना, कालवे ज्यांच्या जमिनीतून जाणार आहेत त्या शेतक-यांशी सरकारने काहीही सल्लामसलत केली नाही. ठेकेदार आणि सरकार यांची पूर्ण मनमानी चालू आहे. कालव्यांच्या भिंतींचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. quality इथं सरकारी अधिकारी आणि ठेकेदार यांची ‘मिली भगत’ आहे हे स्पष्ट आहे. कालवे खोदताना अनेक ठिकाणी शेतांत मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ते व्यवस्थित भरून देण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे पण ठेकेदार त्या बाबतीत टाळाटाळ करताहेत. खोदकामानंतर निर्माण झालेला मलबा शेतक-यांचा शेतात, सरकारने अधिग्रहण न केलेल्या जमिनीत तसाच ठेवून ठेकेदार निघून जात आहेत. आत्ता धरणातून पाणी कालव्यात सोडलेलं नसताना (महेश्वर धरणाचे दरवाजे उघडे आहेत तर ओंकारेश्वरमध्ये पाणी पूर्ण भरलेलं नाही) केवळ जोरदार पावसाच्या झटक्याने कालवे फुटले. कालव्यातून अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याची – निकासाची – काहीच व्यवस्था नाही. मग पुढे तर काय होईल? कालवे योजनेलासुद्धा धरणाप्रमाणे विस्थापितांच्या पुनर्वसनाचे सर्व नियम लागू आहेत. पण कालव्यात ज्यांच्या जमिनी जाताहेत त्यांच्या पुनर्वसनाचा काहीही विचार नाही, त्यामुळे कृतीही नाही. कोर्टाच्या निर्णयांचं पालन होत नाही याची लोकांना खंत आहे. कोर्टात अनुकूल निर्णय अनेकदा मिळूनही लोकांची लढाई संपत नाही अशी विलक्षण परिस्थिती आहे इथं. ४ जुलैच्या रात्री हे कालवे अनेक ठिकाणी फुटले आणि अनेक गावांत पाणी शिरलं. घरं पाण्याखाली गेल्याने लोकांना रात्र झाडांवर बसून काढावी लागली. शेतातलं पीक पाण्याखाली गेलं. ‘आंदोलना’च्या सर्वेक्षणानुसार केवळ बडवा आणि महेश्वर या दोन तालुक्यांत सुमारे नऊ कोटींचं नुकसान झालं आहे. हे नुकसान म्हणजे ‘नैसर्गिक आपत्ती’ आहे हा शासनाचा दावा असला तरी ज्या अनास्थेने आणि निष्काळजीपणाने कालवे खोदले गेले आहेत त्यावरून ही ‘शासननिर्मित आपत्ती’ हे गावक-यांचे मत पटण्याजोगे आहे. सरकारने या आपत्तीची काही गांभीर्याने दखल घेतलेली नाही असं लोकांच्या बोलण्यात वारंवार येत होतं. कमल जैन, पुन्ना जैन, मुकेश, लालूभाई, राधुभाई पठाण, देवरामभाई अशा लोकांनी अतिशय पोटतिडकीने असे अनेक मुद्दे मांडले. छोटा बडदा या गावात रात्री नऊपर्यंत आमची जोरदार मीटिंग झाली आणि त्यांनतर रात्री साडेनऊ ते अकरा पिपरीमध्ये. छोटा बडदा गावात ‘इंदिरा सागर’चा कालवा येऊ घातलाय आणि हे गावही नर्मदेच्या किना-यावर आहे. गावक-यांनी कालव्यासाठी साफ नकार दिलाय सरकारला आणि पाणी आलं तरी गाव सोडायचं नाही असा त्यांचा निर्धार आहे. ही सगळी ‘राहती गावं’ सरदार सरोवराची उंची १७ मीटरने वाढवणारे ‘गेट’ बांधून झालं की पाण्यात जातील हा विचार अस्वस्थ करणारा होता. हे अजूनही आपण वाचवू शकतो, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे जाणवत राहिलं तीन दिवसांच्या प्रवासात. सरकार पुन्हापुन्हा अशा जनहितविरोधी योजना का बनवतं, नीट नियोजन का केलं जात नाही हे काही केल्या कळत नाही. १९०१ चा Irrigation Commission Report या भागात जमिनीवरून सिंचन (surface irrigation) करू नये असं सांगतो तरी हे कालवे का खोदले जात आहेत? मेधाताईंच्या अंदाजानुसार महू-पिथमपूर-धार या होऊ घातलेल्या औद्योगिक पट्ट्याला पाणी देण्याची ही तयारी आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक क्षेत्रात (डीएमआयसी) या भागातली जमीन असणार आहे. ओंकारेश्वराचं पाणी पाईपने क्षिप्रा नदीत सोडण्याची योजना आहे, इंदोर, बडोदा, अहमदाबाद या शहरांना ‘सरदार सरोवर’ पाणी देतंय – जे मूळ योजनेत नव्हतं. म्हणजे सरकार योजना बनवताना सांगतं एक पण प्रत्यक्षात करतं काहीतरी दुसरंच! लाभ बदलतो पण किंमत मोजणारे मात्र तेच राहतात. पुनर्वसनाच्या भूलथापा सरकार पुनर्वसन पूर्ण झाल्याचं ब-याच वर्षांपासून सांगत आहे. सरकारी आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा याबाबत माझे काही अंदाज आहेत (म्हणजे सरकारने सांगितलेल्या आकडेवारीची किती टक्केवारी गृहित धरायची) – पण दुर्दैवाने तेही अंदाज पार फसले. मध्य प्रदेशमधली १९३ गावं बुडीतक्षेत्रात आहेत – त्यापैकी १५० गावात आजही लोक राहत आहेत. “आमचं पुनर्वसन झाल्याचं सांगताना सरकार निव्वळ खोटं बोलत नाही तर आम्हाला कस्पटासमान लेखते” ही खंत एकाने व्यक्त केली. छोटा बडदा, पिपरी, पिछोडी, कडमाळ, खापरखेडा, भिताडा, बिलगाव ... जिल्हे बदलले, गावं बदलली – पण परिस्थिती मात्र सगळीकडे तीच. जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम नाकारणारे शेतकरी, पाण्याच्या भीतीत जगणारे लोक, सरकारी दडपशाहीचा सामना करणारे लोक, न्यायासाठी कोर्टात खेपा मारणारे लोक, आणि “आमु आखा एक से”, “लडेंगे – जीतेंगे” असा दुर्दम्य आशावाद जागता ठेवणारे लोक. “जमिनीच्या बदल्यात पैसे घ्या आणि आपलं काय ते बघा” अशी मध्य प्रदेश सरकारची भूमिका होती. पण गावकरी त्याला बधले नाहीत. काही अपवाद वगळता बहुसंख्य गावक-यांनी पैसे स्वीकारले नाहीत. जमिनीच्या बदल्यात जमीन – म्हणून सरकारने बाद जमिनी दाखवल्या – त्याही शेतक-यांनी स्वाभाविकच नाकारल्या. ‘कृषी सेवा केंद्राची’ (सरकारी) जमीन कसून तिचं उत्पन्न वाटून घेण्याचा प्रयोग काही वेळा यशस्वी झाला. या सगळ्या खटपटीना यश येऊन मध्य प्रदेश सरकारने २१ कुटुंबाना प्रत्येकी पाच एकर जमीन खलबुजुर्ग या ठिकाणी दिली आहे. तिथं पिछोडीतल्या १० आणि भादलमधल्या ११ कुटुंबाना नुकतीच ही जमीन मिळाली आहे. खलबुजुर्गमधल्या नव्या जमिनीत सध्या हिरवेगार सोयाबीन लहरतं आहे. या २१ कुटुंबांना मिळालेल्या न्यायातून इतर कुटुंबांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि त्यांचा निर्धारही अजून पक्का आहे. या कुटुंबाना जमीन मिळाली असली तरी राहायला घर – त्यासाठी प्लॉट – मात्र अजून मिळाले नाहीत. एकाच घरात नऊ – दहा कुटुंब सध्या राहत आहेत. त्याआधी २००० मध्ये भिताडाच्या ९ कुटुंबाना (गावात ३०० पेक्षा जास्त कुटुंबं आहेत) प्रत्येकी पाच एकर जमीन मिळाली आहे. पिछोडी ते खलबुजुर्ग हे अंतर किमान दीडशे किलोमीटर आहे. पिछोडीत एकूण ७००हून जास्त कुटुंबं आहेत आणि त्यापैकी ११ ना आत्ताशी जमीन मिळाली आहे – यावरून पुनर्वसनाचा वेग आणि वस्तुस्थिती लक्षात यावी. मध्यप्रदेशात अशी ५२५७ घोषित कुटुंबं आहेत. घरांसाठी आणखी जमीन लागणार आहे – आणखी १०००० भूमिहीन कुटुंब आहेत – त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न वेगळाच! त्या घरांचा दर्जा काय हाही प्रश्न वेगळाच! हा आहे खलबुजुर्ग – पुनर्वास. punarvas तिकडे मीटिंग चालू असताना मी शेजारच्या या इमारतीत डोकावले. एक दार दिसलं आधी. door ते उघडल्यावर कळलं की इथं लोक राहतात. lok शेजारी त्याचं स्वयंपाकघर. kitchen एका कुटुंबाला अजून काय द्यायचं सरकारनं – असं वाटतंय ना? माफ करा -किती कुटुंबं राहतात इथं? तर अकरा. भिताडा गावातल्या ११ पुनर्वसित घरांसाठी ही व्यवस्था(!) आहे. अशाच दुस-या ‘घरात’ भादल गावातली १० कुटुंबं राहतात. ही मला दिसलेली पुनर्वसनाची झलक पुरेशी बोलकी आहे. (भाग २ पुढे) (‘आंदोलन’ मासिकाच्या सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मूळ लेखात भर घालून पुनर्प्रसिध्द)
  • नर्मदेच्या खो-यातून ....(२)

Book traversal links for नर्मदा खो-यातून ...(१)

  • नर्मदेच्या खो-यातून ....(२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
7463 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आई गं! कठीण आहे अतिवास.

यशोधरा
Fri, 09/06/2013 - 16:37 नवीन
आई गं! कठीण आहे अतिवास.
  • Log in or register to post comments

खरच कठीण

अनिरुद्ध प
Fri, 09/06/2013 - 17:05 नवीन
आहे सारे.
  • Log in or register to post comments

गर्व से कहो...

मुक्त विहारि
Fri, 09/06/2013 - 17:50 नवीन
मेरा भारत महान...
  • Log in or register to post comments

भयानक!

पैसा
Fri, 09/06/2013 - 18:56 नवीन
पण या सगळ्याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? १९८३ सालात नर्मदा परिक्रमा करणार्‍या रघुनाथ रामचंद्र गुण्ये यांनी "नर्मदे हर" मध्ये हेच लिहिलं आहे.
विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल "एक मोठे शून्य नजरेसमोर उभे आहे." असं ते लिहितात. या योजनांचा लाभ काही लोकांना होईल पण जास्त लोकांना तोटाच आहे. चालताना अनेक लोक धरणाची चौकशी करायचे आणि "नर्मदामैय्या प्रचंड पहाड फोडून येते, ती ही धरणे टिकू देणार नाही" असा विश्वास व्यक्त करायचे! ती सगळी मंडळी आज कुठे आहेत मय्याच जाणे! या धरणांमुळे परिक्रमेचा मार्ग बदलला आहे, त्याचबरोबर या साध्यासुध्या लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागला असेलच. अनेक गावं, पेशवा सरकार राऊंची समाधी, जंगलं सारंकाही एक दिवस नर्मदार्पण होणार आहे,
३० वर्षे झाली. आंदोलन सुरू आहे आणि सरकारचा मुर्दाडपणाही तोच. केंद्र आणि राज्यात अनेक पक्षांची अनेक सरकारे येऊन गेली. नर्मदा आंदोलन आहे तिथेच. विस्थापितांची एक नवी पिढी तरूण झाली. पण काहीच बदल नाही! पर्यावरणाची तर अपरिमित हानी होत आहे. :( वा रे न्याय!
  • Log in or register to post comments

हे पुस्तक सध्या बाजारात मिळते

आतिवास
Mon, 09/09/2013 - 14:52 नवीन
हे पुस्तक सध्या बाजारात मिळते का? प्रकाशक कोण आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुस्तक उपलब्ध आहे

पैसा
Mon, 09/09/2013 - 15:35 नवीन
स्नेहल प्रकाशनचं आहे. मी मॆजेस्टिकच्या प्रदर्शनात घेतलं होतं. पुस्तकाबद्दल जास्त http://www.misalpav.com/node/21054 इथे. अर्थात गुण्ये यांचा भर परिक्रमेवरच आहे. मात्र वाटेत जे दिसलं त्याबद्दल, विस्थापितांबद्दल त्यांनी थोडंफार लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

वाचतेय..

कवितानागेश
Sat, 09/07/2013 - 09:37 नवीन
वाचतेय.. 'लोकशाही' म्हणजे नक्की काय असते, असा प्रश्न पडतोय
  • Log in or register to post comments

सुन्न करणारे वास्तव.

बॅटमॅन
Sat, 09/07/2013 - 11:41 नवीन
सुन्न करणारे वास्तव. शब्दांच्या तोकडेपणाची जाणीव अशा वेळेस होते.
  • Log in or register to post comments

हे सर्व केवळ निषेधार्य आणि

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/07/2013 - 11:58 नवीन
हे सर्व केवळ निषेधार्य आणि हृदयद्रावक आहे. आणि सरकारी अनावस्थेचे हे एकमेव उदाहरण आहे असेही नाही. पण हे असं वाचलं, बघितलं की नेहमी एकच प्रश्न मला पडतो ... सरकार पुन्हापुन्हा अशा जनहितविरोधी योजना का बनवतं, नीट नियोजन का केलं जात नाही हे काही केल्या कळत नाही. १९०१ चा Irrigation Commission Report या भागात जमिनीवरून सिंचन (surface irrigation) करू नये असं सांगतो तरी हे कालवे का खोदले जात आहेत? “आमचं पुनर्वसन झाल्याचं सांगताना सरकार निव्वळ खोटं बोलत नाही तर आम्हाला कस्पटासमान लेखते” ही खंत एकाने व्यक्त केली. “जमिनीच्या बदल्यात पैसे घ्या आणि आपलं काय ते बघा” अशी मध्य प्रदेश सरकारची भूमिका होती असं आपण नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे नक्की काय? आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधिंतूनच ते बनते. मग आता तुमच्या लेखनात ते प्रतिनिधी कुठेच दिसले नाहीत. किंवा हे होऊ नये म्हणून त्यांनी काही केले आहे अथवा आताही ते काही करत आहेत असे लेखात तरी दिसले नाही. मग आता आंदोलन करणार्‍या इतक्या मोठ्या संख्येच्या मतदारांनी निवडणूकीच्या वेळेस कोणाला आणि का निवडून दिले? महत्वाचा मुद्दा म्हणजे (जगभरच्या) राजकारणी लोकांना केवळ मतांची भाषा समजते... सारासारबुद्धीची अथवा तर्काची नाही.
  • Log in or register to post comments

मला वाटतं...

अर्धवटराव
Sat, 09/07/2013 - 21:23 नवीन
लोकांचे प्रश्न लोकशाहीच्या सर्वात समर्थ हत्याराने, मतदानाने, का सुटत नाहित? कारण निवडुन येणं हे स्कील आहे, ते लोकप्रतिनिधीत्व नाहि. जसं उत्तम मार्कांनी वा अगदी काठावर पास होणारा परिक्षार्थी ज्ञानाच्या बाबतीत सुमारच असतो तसच निवडुन येणारा विधायक लोकप्रतिनिधीत्वाच्या बाबतीत यथातथाच असु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कारण निवडुन येणं हे स्कील आहे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/07/2013 - 23:10 नवीन
कारण निवडुन येणं हे स्कील आहे, ते लोकप्रतिनिधीत्व नाहि. तुमच्या उत्तरातच तुम्ही मी सांगितलेले भारतीय लोकशाहीचे सद्याचे अपयश आणि त्यात कोणाचा दोष आहे ते वेगळ्या तर्‍हेने सांगितले आहे ! धन्यवाद ! १. माझा मूळ प्रश्न "आता लढा देणार्‍या मतदारांनी कोणाला आणि का निवडून आणले?" हा होता. जर मतदार "चलाखी" करून त्यांना उल्लू बनविणारा नेता पसंत करत असतील, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा नाही… तर मग खरी समस्या मतदारांच्या विचारसरणीतच नाही काय? एकदा मत दिले की (किंवा मत दिले नाही तरीपण) निवडून आलेला "चलाख" माणूस आपोआप जादू होऊन त्याची चलाखी वापरून स्वत:चाच फायदा करून न घेता जनतेचा फायदा करणारा संत बनेल अशी अपेक्षा करणे याला काय म्हणायचे ते सांगायलाच हवे का? प्रसंगी अगदी निवडून आल्यावरही एखाद्या बाबतीत आपले मत लोकप्रतिनिधीकडे नोंदवायचाही हक्क लोकशाहीत मतदाराला असतो (उदाहरणाखातर... प्रे ओबामांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मतदारांच्या फोन आणि ईमेलच्या दबावाचे कारण उघडपणे मान्य करून "बुडणार्‍या वित्तसंस्थांना अब्जावधी डॉलर्सची मदत करण्याच्या विधेयकाच्या" विरुद्ध मतदान केले होते. हे केवळ एक जगजाहीर झालेले उदाहरणआहे आणि ही गोष्ट लोकशाहीत अपवादात्मक मानली जात नाही.) आपल्या मतदारसंघात विकासाची कामे मंजूर करवून घेऊन ती योग्यपणे होण्यासाठी निगराणी राखणे यासाठी लोकप्रतिनिधिंना निवडून द्यायचे असते. आणि तसे होत नसेल तर आपण निवडून दिलेल्या "लोकप्रतिनिधी (हा शब्द फार महत्वाचा, पण सद्या या लोकांना फारतर नेता म्हणता येईल, लोकप्रतिनिधी नाही)" ला जाब विचारायचा आपल्याला हक्क आहे हे जनतेला जेव्हा माहित असते आणि तो हक्क बजावला जातो तेव्हा खरी लोकशाही येते. २. शिवाय नंतर मोर्चा घेऊन जाणार चाकरमान्या अधिकारांच्याकडे, ज्यांची सुत्रे (आणि बढतीही) नेत्यांच्या हातात असतात. अधिकार्‍यांकडून फक्त आश्वासनापेक्षा जास्त काही हाती लागणार नाही, कारण लोकशाहीत मुख्य/मोठे निर्णय घेणे अथवा ते स्थगित करणे हे काम लोकप्रतिनिधी करतात आणि अधिकारी त्या आदेशाची अंमलबजावणी करतात. हाच मोर्चा नेत्याच्या घरावर नेऊन जेव्हा मतदार नेत्याला जाब विचारायला शिकतील तेव्हाच विकासाची कामे होतील. कारण तेव्हाच योग्य निर्णय घेऊन आणि त्यांची योग्य अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला मते मिळणार नाहीत अशी नेत्यांची खात्री होईल. ३. भारतातही सर्वच पक्ष उघडपणे मान्य करतात की "निवडून येण्याची क्षमता" हीच मुख्य पात्रता निवडणूकीचे उमेदवार निवडताना वापरली जाते. (हे पक्षाच्या दृष्टीने योग्यच आहे कारण निवडून न येणारे उमेदवार सत्ता हस्तगत करायला कुचकामाचे आहेत, आणि सत्ता नाही तर पक्षाच्या देश/राज्य/शहर यांचे भले करण्याच्या गोष्टी केवळ फुकाचे मनोरथच राहतील.) त्याबरोबरच जनतेने जर हे दाखवून दिले की आमचे मत योग्य कामे करणार्‍या उमेदवारालाच मिळेल तर पक्षानाही त्याच उमेदवारांना तिकिटे द्यावी लागतील. अर्थात हे सगळे एका निवडणूकीत होणार नाही... ही एक प्रक्रिया आहे आणि लोकमताचा कल कुठे आहे हे कळले की पक्षमत आणि नेत्यांची वागणुकही बदलू शकेल.... आजच्या भक्कम लोकाभिमुख लोकशाह्या काही एका निवडणूकीने तयार झाल्या नाहीत... पण म्हणतात ना की १००० किलोमीटचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही... लोकशाहीचा प्रवास नागरिकाच्या पहिल्या पावलाने सुरू होतो आणि त्याची दिशा त्याच्याच पावलाच्या दिशेने ठरते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अतिशय महत्त्वाचा,

आतिवास
Sun, 09/08/2013 - 00:41 नवीन
अतिशय महत्त्वाचा, गुंतागुंतीचा आणि सार्वत्रिक मुद्दा आहे. स्वतंत्र धाग्याचं बीज असणारा मुद्दा आहे. तूर्त फक्त पोच. सविस्तर कधी लिहिता येईल ते पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आपण लिहिलेल्या समस्येबद्दल

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/08/2013 - 11:41 नवीन
आपण लिहिलेल्या समस्येबद्दल आणि आपल्या प्रयत्नांबद्दल अत्यंत आपुलकी आणि आदर आहे याबाबत शंका नसावी. किंबहुना या सर्व प्रकाराबद्दल खूप खंत वाटते. मात्र एक वचन मी नेहमी ध्यानात ठेवतो ते असे: "प्रयत्न नक्कीच महत्वाचे... परंतू प्रयत्न कोणत्या दिशेने केले यावरच फळ मिळणार की नाही हे ठरते." (Effort is important... but, where to put the effort is the key to success." आपल्या कार्यामध्ये यश यावे म्हणून अनेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

स्पष्टीकरण

आतिवास
Sun, 09/08/2013 - 12:23 नवीन
एका मुद्यावर स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे. आपल्या प्रयत्नांबद्दल अत्यंत आपुलकी आणि आदर आहे याबाबत शंका नसावी. दुर्दैवाने मी(ही) या कामात प्रत्यक्ष सहभागी नाही; दुरूनच पहात आणि ऐकत होते अद्याप. (त्याच भागातल्या दुस-या कामांत प्रत्यक्ष सहभागी होते इतकंच!) यावेळी माहिती घ्यायला गेले होते - जी माहिती मिळाली ती आणि एकंदर तो अनुभव इथल्या वाचकांशी शेअर करते आहे. त्याच हेतूने हा लेख 'आंदोलन' मासिकात प्रकाशित झाला आहे. त्यामुळे तिथल्या समाजाच्या राजकीय (आणि इतरही) निर्णयप्रक्रियेविषयी मी सध्या मत व्यक्त करु शकत नाही कारण ते जाणण्याची प्रक्रिया माझ्यासाठी आत्ताआत्ताच सुरु झाली आहे. पण तुम्ही मांडलेल्या विषयावर इतर अनुभवांच्या आधारे बरंच काही म्हणता येईल मला - पण ते इथं तितकंस संदर्भाला धरुन असणार नाही म्हणून नंतर कधीतरी लिहिण्याचा उल्लेख केला आहे आधीच्या प्रतिसादात. माझा गैरसमज नाही. आपलाही नसावा म्हणून हे स्पष्टीकरण .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हल्ली टीव्हीवर 'भूमी अधिग्रहण

कवितानागेश
Sat, 09/07/2013 - 23:00 नवीन
हल्ली टीव्हीवर 'भूमी अधिग्रहण विधेयक' म्हणून एक जाहिरात सुरु आहे केन्द्र सरकारची. त्याबद्दल कुणी नक्की काही सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments

सरकार'नी आपल्याच जनतेवर

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/07/2013 - 23:19 नवीन
सरकार'नी आपल्याच जनतेवर अत्यंत निर्दयपणानी केलेले भयंकर अत्याचार आहेत हे! :(
  • Log in or register to post comments

बहुधा आणखी काही वर्षांनी आपण

आतिवास
Sat, 09/07/2013 - 23:39 नवीन
बहुधा आणखी काही वर्षांनी आपण असेही करु. पण तोवर आपण काय किंमत मोजली असेल - ते माहिती नाही.
  • Log in or register to post comments

नर्मदा खो-यातून

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 09/09/2013 - 16:05 नवीन
"समग्र माते नर्मदे" या नावाचे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलेले एक पुस्तक पूर्वी वाचनात आले होते. नर्मदा प्रकल्प हवा कि नको ,त्याचे लाभार्थी आणि विस्थापित, आंदोलक, सरकारी अधिकारी. अशा सर्वांची भेट घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आंदोलकांच्या नेते मंडळीनी त्यांना सहकार्य केले नाही असे त्यांनी पुस्तकात नमूद केल्याचे आठवते. जिज्ञासूनी पुस्तक अवश्य वाचावे.
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Tue, 09/10/2013 - 10:13 नवीन
खूप वर्षां पूर्वी हे पुस्तक वाचले होते. आता नव्याने वाचल्यास अनेक नवे मुद्दे कळतील - म्हणजे जुन्याच गोष्टींचा नवा अर्थ लागेल. या पुस्तकाची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा