Skip to main content

आम्हां घरी धन... (२)

लेखक मोदक यांनी शनिवार, 15/06/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... ---------------- पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.

वाचने 79453
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

मनात माझ्या उंच मनोरे, उंच तयावर कबुतरखाना शुभ्र कबुतर घुमते तेथे, स्वप्नांचा खाऊनिया दाणा शुभ्र कबुतर युगायुगांचे, कधी जन्मले आणि कशास्तव? किती दिवस हे घुमावयाचे, अर्थावाचुन व्यर्थ न का रव? प्रश्न विचारी असे कुणितरी, कुणी देतसे अगम्य उत्तर गिरकी घेवुन अपणा-भोवती, तसेच घुमते शुभ्र कबुतर... -विंदा करंदीकर

तुझिया ओठावरचा मोहर मम ओठावर गळला गं.. अन आत्म्याच्या देव्हार्‍यातुन गंध मधुर दरवळला गं.. आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली गं.. आज सखे मज नकळत अलगज गाठ जिवाची सुटली गं.. आगांतुक हि आज दिवाळी उंबरठ्यावर बसली गं.. आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली गं.. चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या गं.. विश्व-फुलातिल पिवळे केसर खुणा तयाच्या कळल्या गं.. -विंदा करंदीकर

विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला..

In reply to by सामान्य वाचक

दैवी आनंदाच्या बासुंदीत हे परंपरेच्या ओझ्याचं लिंबु का हो पिळलंत? मनाच्या आनंददायी ऊर्मी शरीरभोगाच्या अतृप्त वासनेपेक्षा भिन्न असतात ना... कि आयुष्यभर हा आनंद मिळवलाच नाहि कविने??

जाईच्या वेलीसारखी माझ्यातील बाई स्नेहाने लवलेली भावनेने भिजलेली माझ्याइतकेच सुकोमल तिचे अबोल मन तिची अनाम थरथर जगण्याची.. जगवण्याची फुलण्याची.. फुलवण्याची माझं उमलणं हा तिचा ध्यास तिचा छंद मला वाटतं आभाळभर जावो तिचा सुगंध तिच्या डोळ्यांतून टपटपणार्‍या कळ्यांची जाई होवो बाईच्या जन्माची कहाणी याच जन्मी सुफळ संपूर्ण होवो..

हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात पूर असतो त्यांच्या स्वभावात किनारा सोडतात तेह्वा नदीहून बेफाम होतात.. कोसळतात खोळ तेह्वा किती उंच जातात! जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात, उधळतात गंध, गळून पडतात. नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आप्ले हृदय देतात हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात.

र. वा. दिघे यांच 'पड रे पाण्या 'नावाच एक अतिसुंदर पुस्तक आहे…. त्यातली जात्यावरची गाणी इतकी सुंदर आहेत की अक्षरश: काळजाचा ठाव घेतात. एक ना एक अक्षर सोन्यासारखं आहे. मिळालं तर नक्की वाचा. त्यातली एक ओवी देतेय. पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी. बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली, सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली …. तापली धरणी, पोळले चरणी मी अनुवाणी, पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू?.? खिंडीतोंडी हटवादया नको उभा राहू!! वरड वरड वरडीती, रानी मोरमोरिनीं पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी पाण्या पड तू, मिरागाआधी रोहिणीचा, पाळणा रे लागे भावाआधि बहीनिचा!! आला वळीव खिंडीतोंडी शिवार झोडीत जाईच्या ग झाडाखाली धनी पाभर सोडित. पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी जेवण घेऊन शेतावरी चालली कामिनी!!!

संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहरीमधुनी शीळ घालितो वारा दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथरत्या पाण्याला कसले गुपीत विचारी भरुन काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमीत होऊनी तेथे अवचित थबके वारा किरकीर रात किड्यांची निरवतेस किनारी ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी मध्येच क्षितीजावरुनी वीज लकाकुन जाई अन ध्यानस्थ गिरी ही उघडुनी लोचन पाही हळुच चांदणे ओले ठिबके पानावरुनी कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मौनाचा गाभारा - मंगेश पाडगावकर

In reply to by मोदक

हळुच चांदणे ओले ठिबके पानावरुनी कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मौनाचा गाभारा
किती सुरेख!

आयुष्याची आता । झाली उजवण । येतो तो तो क्षण । अमृताचा ॥ जे जे भेटे ते ते । दर्पणीचे बिंब । तुझे प्रतिबिंब । लाडे-गोडे ॥ सुखोत्सवे असा । जीव अनावर । पिंजऱ्याचे दार । उघडावे ॥ संधिप्रकाशात । अजुन जो सोने । तो माझी लोचने । मिटो यावी ॥ असावीस पास । जसा स्वप्नभास। जीवी कासावीस । झाल्याविना ॥ तेंव्हा सखे आण । तुळशीचे पान । तुझ्या घरी वाण । नाही त्याची ॥ तुच ओढलेले । त्यासवे दे पाणी । थोर ना त्याहूनी । तीर्थ दुजे ॥ वाळल्या ओठा दे । निरोपाचे फुल । ऊरी तरी भुल । शेवटली ॥ - "बा.भ.बोरकर...." एका एका ओळीसाठी दंडवत आहे. केवळ भाषाप्रभू .. आणि याचं खरंच सोनं केलं आहे इथे सलीलने..

"द इन्हेरिटन्स ऑफ लॉस" नावाची किरण देसाई या लेखिकेने लिहिलेली बुकर पारितोषिकप्राप्त कादंबरी नुकतीच वाचली. अरविंद अडिगा नावाच्या मथ्थडाला बुकर मिळाल्यानंतर या पारितोषिकावरचा विश्वास उडाला होता. काही अंशी तरी तो परत आणण्याचं काम या कादंबरीने केलं. कालिम्पाँग या टुमदार हिमालयन गावात घडणार्‍या या कादंबरीला स्वतंत्र गोरखालँडच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. गोरखालँडसाठी पडद्याआडून सूत्रं हलवणारे चाणक्य आणि प्रत्यक्ष लढणार्‍या तरूणांचा भाबडेपणा असा छान पट मांडला आहे. त्या भाबड्या तरूणांविषयी लेखिका लिहिते:
Anyone could see they were still mostly just boys, taking their style from Rambo, heads full up with kung fu and karate chops, roaring around on stolen motorcycles, stolen jeeps, having a fantastic times. Money and guns in their pockets. They were living the movies. By the time they were done, they would defeat their fictions and the new films would be based on them...

आसमंत दाराशी सुरु होतो.पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रांपर्यंत असमंताच्या अविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंगं उलगडतात. प्रतिमांच्या पलिकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात. विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो, आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्यांचा साठा अमाप आहे.निसर्गाच्या लोभस प्रतिमा पहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या अविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर? जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर? कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते? कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात? कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात? कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात? कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव? - बा भ बोरकर.

पुढील उतारा माझ्याकडे टिपून ठेवलेला आहे.त्याचा काहीच संदर्भ मी लिहून ठेवलेला नाही. पण, त्यामध्ये जे लिहीले आहे ते अद्भूत आहे. ' यवत - पुण्याहून दक्षिणेकडे जाणार्‍या रेल्वेचे प्यासेंजर गाडीचे एक स्टेशन. जवळ सर्वत्र टेकडया. दिवे घाटातून गेल्यावर एका टेकडीवर भुलेश्वरची लेणी व दुसर्‍या छोट्या टेकडीवर कानिफनाथांची वस्ती व कानिफनाथांचे देउळ. देवळात गेल्यावर वेगळीच संवेदना होते.गरगरल्यासारखे, अंगावर चारही बाजूंनी वजन आल्यासारखे वाटते. फार वेळ थांबवत नाही, थांबताच येत नाही. बरोबर होकायंत्र न्यावे. ते पाहिल्यावर असं दिसतं की काटे गरागर फिरत आहेत. ते स्थिरच होत नाहीत. नाथांचा निदर्शक म्हणून एक फक्त जमिनीचा उंचवटा आहे. त्या उंचवट्यावरच असा अनुभव येतो. बाहेर आल्यावर यंत्राचे काटे पूर्ववत होतात. यंत्र पुन्हा आत नेलं तर काटे गरगरतात.बाहेर आल्यावर आपणहि पूर्ववत होतो.' ज्याला शक्य होइल त्याने हा अनुभव घ्यावा व मिपावर त्याचा वृत्तांत टाकावा.

In reply to by अनिता ठाकूर

धन्यवाद. तुमच्याकडे या संदर्भात आणखी माहिती असल्यास जरूर कळावावी. भुलेश्वरप्रेमी वल्ली यावर अधिक प्रकाश टाकतीलच!!

In reply to by अनिता ठाकूर

या उंचवट्यावरच असा अनुभव येतो. बाहेर आल्यावर यंत्राचे काटे पूर्ववत होतात. यंत्र पुन्हा आत नेलं तर काटे गरगरतात.बाहेर आल्यावर आपणहि पूर्ववत होतो.'
तसं काही नसतं हो. कानिफनाथला गेलोय आणि तसा काहीही अनुभव आलेला नाही. बाकी कानिफनाथ आणि भुलेश्वर एकमेकांपासून बर्‍यापैकी लांब आहेत. भुलेश्वर यवत पासून जवळ तर कानिफनाथ बोपदेव घाट ओलांडल्यावर.

माणसाचे आयुष्य म्हणजे कर्म व दैव यांच्या एकत्रित परिणामाचा खेळ . त्यात कशाचा वाटा किती ह्याचे काही ठराविक गणित नाही. आपण क्यारम खेळताना विशिष्ट ठिकाणी स्ट्रायकर ठेवून सोंगट्यांचा व्यूह फ़ोडतो. अगदी शंभर वेळा समोरच्या दोनही भोकात सोंगट्या अगदी हुकुमीपणे गेल्या तर फ़ोडला जाणारा बोर्ड दरवेळी सारखा असतो काय ? नक्कीच नाही . म्हणजे आपले कर्म म्हणजे त्या दोन सोंगट्या जाणे जिथे काही अभ्यासाने कौशल्य प्राप्त करून परिणाम हवा तसा मिळविता येतो पण दरवेळी निरनिराळ्या आकृती बंधासह समोर येणार सोंगट्यांचा पसारा म्हणजे दैव .त्याचा कोणताही नियम कोणालाही सापडलेला नाही. --चौकटराजा