✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लादेन ध्यानप्रकार

र
राजेश घासकडवी यांनी
Sun, 08/11/2013 - 22:04  ·  लेख
लेख
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे, विचार केला आहे ते निखालस असत्य आहे हे तुमच्या मठ्ठ डोक्यात आधी भरवून घ्या. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे ते स्मृतीमध्ये जातं. आणि तुमचं मन तुमच्या या स्मृती वापरून तुम्हाला भलतेसलते संदेश देतं. पण तरीही कृपया आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन या लेखावर प्रतिसाद लिहून मात्र नक्की करा. कारण तुम्ही काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचं अडाणीपण, अभ्यासाचा अभाव, बुद्धीचा कोतेपणा, खालची वैचारिक पातळी याच गोष्टी दिसत रहाणार हे उघड आहे. तेव्हा मला त्या दाखवून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवू नका. कारण हा आनंद हा सच्चिदानंद आहे, ब्रह्मानंद आहे. या आनंदाची प्राप्ती करण्यासाठीच हा सृष्टीचा पसारा निर्माण झालेला आहे. पण दुर्दैवाने हे कोणालाच कळत नाही. दुर्दैव म्हणजे, ज्यांना कळत नाही त्यांचं दुर्दैव. माझं सुदैवच, कारण मला पुन्हा पुन्हा 'तुम्हाला हे कळलेलं नाही' असं सांगण्याची संधी मिळते. आणि माझ्या ब्रह्मानंदाच्या अकाउंटमधली ब्यालन्स वाढत वाढत जाते. हा ब्रह्मानंद वाढवण्यासाठी मी एक सोप्या प्रकारचं ध्यान करतो. त्याचं नाव आहे लादेन ध्यानप्रकार. हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे. पौर्वात्य म्हणजे पुरातन असं आपण मानतो. पण नव्या संशोधनानुसार सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली. त्यामुळे तो मध्यपूर्वेतला भाग सगळ्यात पुरातन आहे. लादेन ध्यानप्रकारही तिथेच निर्माण झाला. या संस्कृतीची जाण नसलेल्या पाश्चिमात्यांनी त्याला अतिरेक, दहशतवाद वगैरे म्हटलं. पण यावरूनच त्यांच्या ज्ञानाची पातळी दिसून येते. अभ्यास करून ती वाढवायला त्यांना शतकंही पुरणार नाहीत हे उघडच आहे. हे तंत्र साध्य करणारा मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. ही साधना करायला सुरूवात केल्यावर सर्वप्रथम दृष्य परिणाम म्हणजे त्वचेची जाडी वाढायला लागते. जसजशी ती साधना अधिकाधिक करायला लागू तसतशी ती त्वचा अधिकाधिक जाड होते. नुसती ती जाडच होते असं नाही, तर तिला नखासारखं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे कितीही आघात केला तरी जखम होत नाही, आगीने चटका बसत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' अशा स्वरूपाचा हा आत्माच नखरूपी त्वचेत रूपांतरित होतो. मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे. त्यामुळे वाग्बाण तर काय, खरे बाणही लागत नाहीत. काही साधकांच त्वचा जाड होण्याबरोबर तेलकटही होते. त्यामुळे कोणी त्यांना पकडायला गेलं तर हातातून पटकन् निसटून जाता येतं. आणि पकडायला जाणारे तेल लागलेले हात चोळत बसतात. मी अर्थातच या स्थितींच्या बराच पुढे गेलेलो आहे. आणि पुढच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. या पुढची पातळी म्हणजे त्वचा जाड आणि तेलकटच नव्हे तर मेंदूभोवती एक अभेद्य कवच तयार होतं. हाडं अश्मीभूत होण्याच्या प्रक्रियेला ऑस्सिफिकेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया सजीवांमध्ये होताना दिसत नाही, पण लादेन ध्यानप्रकार करणारांना मात्र ही प्रक्रिया स्वतःमध्ये घडवून आणता येते. यामुळे इतरांचे विचार डोक्यावर आपटून दाण्णकन खाली पडतात. अशा कडेकोट बंदोबस्तामुळे साधकाला ध्यानपद्धती पुढे चालू ठेवणं सोपं जातं. आता मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो. इतर ध्यानपद्धतींमध्ये अंतर्मुख होणं, स्वतःच्या विचारांच्या अधीन न होता सहज भरकटू देणं वगैरे काहीतरी भंपक गोष्टी असतात. आत्मोन्नतीसाठी आत्म्याचं निरीक्षण, मनाच्या अवस्थांचं वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रण वगैरे निरर्थक गोष्टी असतात. या सगळ्यांचा तोटा असा की हे सर्व वैयक्तिक असतं. आपल्यापुरतं असतं. हा शुद्ध वेडेपणा आहे. असं करणारांना अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन. लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो. या ध्यानप्रकारात भिंतीकडे तोंड करून बसायचं नसतं, तर मोठ्ठ्या जनसमूहाला हातात मायक्रोफोन घेऊन 'हे बघा हे ध्यान करणं म्हणजे हे असं असतं' असं सांगायचं असतं. मग कोणी जर काही प्रश्न विचारले तर त्याला 'तुझ्यासारखा महामूर्ख आत्तापर्यंत पाहिला नाही' असं त्या मायक्रोफोनवरूनच ओरडून सांगायचं. अक्कल काढणे, वैयक्तिक बोलणे अशा जितक्या अधिक गोष्टी करता येतील तितकं ते ध्यान यशस्वी होतं. जितकी जास्त चर्चा 'तू अज्ञानी... नाही नाही तूच अज्ञानी.... तू माझ्या दुप्पट अज्ञानी..... तूच तूच तूच तूच शंभरवेळा अज्ञानी' या स्वरूपाची चालेल तितकं ते ध्यान यशस्वी झालं असं समजावं. हे प्रकार खुलवण्यासाठी मुद्दामूनच काही विसंगतीपूर्ण विधानं करणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण विडंबनं करायची, आणि इतरांनी आपल्याला चेष्टेने काही बोललं तर त्यांना 'तुम्ही विडंबनं करता, चेष्टा करता म्हणजे तुमची पातळी हीन आहे हे सिद्ध होतं' असं म्हणायचं. किंवा कधी मनाच्या दोन विंग्ज आहेत म्हणायचं कधी तीन विभाग म्हणायचं. खरं तर काही सुसंबद्ध बोलायचंच नाही. म्हणजे लोकांना चेव येतो आणि आपण कचाट्यात सापडू असं त्यांना वाटतं. ते जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या तैलत्वचेच्या सहाय्याने सुळ्ळकन् सटकून निघून जायचं. असो. ही केवळ सुरूवात आहे. मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे. तुम्ही हा ध्यानप्रकार करून बघा आणि परिणाम काय होतो ते तपासून बघा. त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती
मदत
वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
36647 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

.

आशु जोग
Sun, 08/11/2013 - 22:25 नवीन
नावात काय नाही ! अशी एक म्हण आहे मराठीत.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sun, 08/11/2013 - 22:27 नवीन
ठार! क्रमशः राहिलंय काय? असो, तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल?? =))
  • Log in or register to post comments

ज्योति, मी तुला व्यक्तिशः ओळखत नाही तरीही

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 22:38 नवीन
तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??
असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

??

पैसा
Sun, 08/11/2013 - 22:47 नवीन
माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर लेखात भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहिते आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे वापरत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे वापरू शकता? आँ. आणि संपादक झाले म्हणून काय झाले, आम्हाला काय आवडीनिवडी, भावना असू नयेत काय! -हिलरी क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ज्योति

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 22:55 नवीन
तुझं खरं नाव काय आहे मला माहित नाही. किंबहुना तूही खरी आहेस की नाही हे मला माहीत नाही. हे मी स्वीकारू शकतो. कारण माझं मन मला काय सांगतं याकडे मी लक्ष देत नाही. पण सहीमध्येच तू ज्योति कामत असं लिहिलेलं आहेस. कदाचित ते तुझं नाव नसेलही. कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल. या सगळ्या गोष्टी मी सूज्ञ असल्याने मला समजतात. तुला समजत नाहीत म्हणून अनुकंपा वाटते. पण सर्वांनीच सतत माझी वैयक्तिक पातळीवर उतरून चेष्टा करावी हे बरोबर नाही. हे स्पष्ट सांगणं याला जर तुझ्या बुद्धीची कुवत काढणं असं वाटत असेल तर समज बापडी. त्यावरून तुझ्या मानसिकतेची समज येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

परत तेच

पैसा
Sun, 08/11/2013 - 23:00 नवीन
माझी मानसिकता काढल्याने तुमचा प्वॉइंटाचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो ब्वॉ? सगळी माया आहे हे समजायला सूक्ष्मात जायची गरज नाही. असं तुम्हाला कधीपासून होतंय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुमची मानसिकता काढल्याने

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 23:07 नवीन
तुमची मानसिकता काढल्याने प्वॉइंटाचा मुद्दा सिद्ध बिलकुल होत नाही. मला या साधनेचे मिळणारे प्वॉइंट्स वाढतात. हे लेखात इतक्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढावा ही विनंती. माया या शब्दाच्या अर्थाच्या पातळ्याही तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत. माया म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली - तो फारच ढोबळ अर्थ आहे. माया म्हणजे प्रेमसुद्धा. माया म्हणजे जाडी वाढल्यावरही कपडा मोठा करता यावा यासाठी ठेवलेली जागासुद्धा. आणि माया म्हणजे गोळा करण्याची मायाही. मी इथे प्रतिसादांची माया गोळा करतो आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही. एकंदरीत तुमचं नाव काहीही असलं तरी 'सूज्ञा' निश्चित नसावं असं वाटत रहातं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असो.

पैसा
Sun, 08/11/2013 - 23:18 नवीन
तुमचंच बरोबर! लेख शांतपणेच काय प्रिंट औट काढून वाचेन आणि अर्थ कळलाच तर परत येईन. आता माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली. तुमचं चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

येस्स!

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 23:20 नवीन
अशा तिरक्या प्रतिसादांत जेव्हा समोरची व्यक्ती दगडावर डोकं आपटत बसल्याचं फीलिंग घेऊन शेवटी कंटाळून, वैतागून निघून जाते तेव्हा मला बोनस पॉइंट्स मिळतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

साकार बोनस पॉईंट्स की निराकार

मोदक
Sun, 08/11/2013 - 23:49 नवीन
साकार बोनस पॉईंट्स की निराकार बोनस पॉईंट्स..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

निराकार

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 00:03 नवीन
बोनस पॉइंट्स हे निराकारच असतात. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड वगैरे नाही का? त्या कंपन्या ज्या बोनस पॉइंट्स वगैरे देतात त्यांविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? आपलं इतकं अज्ञान इतक्या प्रच्छन्नपणे उघड करण्याची लोकांना हौस असावी. स्ट्रीकिंग करणं वगैरेची काही लोकांना विकृत हौस असते त्यातलाच हा प्रकार असावा. असो. तुमच्या अज्ञानावर पांघरूण घालून लज्जारक्षण करण्याचाच माझा प्रयत्न आहे. तर या निराकार बोनस पॉइंट्सचा वापर मला पुढच्या सिद्धी मिळवण्यासाठी करता येतो. जसे की इथल्या सर्व सदस्यांची व्यक्तिगत माहिती उघड करण्याची शक्ती. ती थोड्या प्रमाणात मिळालेली आहेच, पण पुरेसे पॉइंट्स झाले की ही शक्ती अजूनही वाढेल. मग मला सगळ्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, व्यक्तिगत पत्रं सगळं काही दिसेल. अमेरिकन सिक्युरिटीवाल्या लोकांना या सिद्धीमुळेच तर हे सगळं करता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अर्रे..???

मोदक
Mon, 08/12/2013 - 00:31 नवीन
अर्रे..??? साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!! नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे की तुमच्या कंपूत (त्या मैदानावर पळणार्‍यांच्या) ओढण्याचा प्रयत्न..? असो.. सिद्धी प्राप्त झाली की कळवा. त्यावेळचे त्यावेळी पाहू ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

साध्या प्रश्नावरून पार

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 00:57 नवीन
साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!
लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

खाली लिहिला आहे तोच प्रतिसाद

मोदक
Mon, 08/12/2013 - 01:03 नवीन
खाली लिहिला आहे तोच प्रतिसाद पुन्हा एकदा येथे देतो.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तिरक्या प्रतिसादांत

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 01:18 नवीन
शेवटचा प्रतिसाद आपलाच ठेवण्याची धडपड आवडली. पण मी ती चालू देणार नाही. कारण शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

(No subject)

मोदक
Mon, 08/12/2013 - 01:23 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सेम टु यू...

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 01:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चला,

प्रास
Mon, 08/12/2013 - 01:35 नवीन
घासकडवींच्या आजच्या रविवारचा दिनक्रम कळला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

छे छे

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 01:46 नवीन
रविवार दुपार फुकट घालवण्याची गरज नाही. मी कधीतरी साताठ दिवसांनी येईन आणि हळूच इथे शेवटचा प्रतिसाद देऊन जाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

वाचनखूण साठवली आहे!

मोदक
Mon, 08/12/2013 - 01:48 नवीन
वाचनखूण साठवली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

धन्यू..

मोदक
Mon, 08/12/2013 - 01:36 नवीन
धन्यू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स,

अनिरुद्ध प
Mon, 08/12/2013 - 13:59 नवीन
हे बघ्ण्याची सिद्धी एका सोफ्ट्वेर (Software),मध्ये आधीच आहे,आपण सिद्धी प्राप्त करे पर्यन्त त्यानी सुद्धा पुढील पातळी गाठ्ली असेल्,असो सिद्धी प्राप्त कर्ण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हेच काम बीपीओ कंपन्यातल्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/12/2013 - 16:41 नवीन
हेच काम बीपीओ कंपन्यातल्या कर्मचार्‍यांना व्हितॅमीन एम् चा प्रसाद चढवून काही साधकांनी अगोदरच केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

थंड घ्या

देवांग
Tue, 08/13/2013 - 18:28 नवीन
थंड घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अरारारा..

चिगो
Fri, 08/16/2013 - 16:58 नवीन
कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल.
मी इथंच गचकलो.. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

स्मायली

क्लिंटन
Mon, 08/12/2013 - 10:02 नवीन
पोट धरधरून गडाबडा लोळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हीच ना? आधी = मग ) मग )

बॅटमॅन
Mon, 08/12/2013 - 12:42 नवीन
=)) हीच ना? आधी = मग ) मग ) टाईपवा विदौट स्पेस, होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पण

प्रसाद गोडबोले
Mon, 08/12/2013 - 16:31 नवीन
पण त्यात पोट धरलेलं कुठ दिसतय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फ्रंट व्ह्यू आहे हो तो,

बॅटमॅन
Mon, 08/12/2013 - 17:13 नवीन
फ्रंट व्ह्यू आहे हो तो, डोक्याने सगळे झाकून टाकलेय. त्यामुळे ऑर्थोग्राफिक नियमाप्रमाणे डोस्कंच तेवढं दिष्णार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

परस्पेक्टॆव्ह बरोबर

अभ्या..
Mon, 08/12/2013 - 17:54 नवीन
परस्पेक्टॆव्ह बरोबर आयसोमेट्रिक बी गण्डलय काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाहा अगदी अगदी

बॅटमॅन
Mon, 08/12/2013 - 17:58 नवीन
हाहा अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आईंग??

नानबा
Mon, 08/19/2013 - 12:15 नवीन
फ्रंट व्ह्यू मध्ये दात डाव्या बाजूला कसे दिसतील ओ?? ही घ्या हो एक स्माईली. यात पोट धरून हसत नाहीये पण तुमचं काम होऊन जाईल याने. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

गुरुजी पैसातै सोबत सहमत.

विजुभाऊ
Mon, 08/12/2013 - 00:51 नवीन
गुरुजी पैसातै सोबत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गुरुजी पैसातै सोबत सहमत.

विजुभाऊ
Mon, 08/12/2013 - 00:58 नवीन
गुरुजी पैसातै सोबत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अहो सात मिनिटांपूर्वीच कळलं

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 01:01 नवीन
अहो सात मिनिटांपूर्वीच कळलं होतं ते. पुन्हा पुन्हा काय सांगताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सबटेक्स्ट वाचायचा प्रयत्न करा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/12/2013 - 02:57 नवीन
"शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात." असं तुम्हीच ना म्हणाला होतात. विजुभाऊ मिसळपाववरचे सन्माननीय आणि अनुभवी सदस्य आहेत. अशा (लवेचेप्रच्या) युक्त्या तुमच्या आधीपासून त्यांना माहित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अरे अरे घासू, मी कित्ती

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/11/2013 - 22:37 नवीन
अरे अरे घासू, मी कित्ती कित्ती हसू..! ? हसून हसून हुभा र्‍हाऊ,की मांडी घालुन बसू..! Image removed. =================================== @मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =)) @लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =)) प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..! Image removed.
  • Log in or register to post comments

मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 22:41 नवीन
मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल. निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्यत्यास

मैत्र
Sun, 08/11/2013 - 23:24 नवीन
"निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते. " याचा व्यत्यास असा होईल काय ? "उच्च स्तरावर काम करतो असे वाटणार्‍या बुद्धीला कमालीचा अहंगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक खोली गाठता येत नाही. मग गंभीरपणाचा आव आणून ती स्वतःचा समर्थन करू पाहते."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

होय

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 23:30 नवीन
होय. हा व्यत्यास सत्य आहे. पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

प्रचंड टाळ्या...

मैत्र
Mon, 08/12/2013 - 00:54 नवीन
पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.
प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

परत तेच

अनिरुद्ध प
Mon, 08/12/2013 - 17:01 नवीन
कुठेतरी वाचले आहे कि 'अहन्कार जळोनी जावा' पण ईथे 'मी' पणा काही सुटत नाही,असो या आमच्या प्रतिसादाने आपले बोनस (बोगस) गुण वाढोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/11/2013 - 23:48 नवीन
@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही.>>> Image removed. @निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो>>> =)) हे राम... Image removed. आत्मा दहन..आपलं ते हे..आत्मदहन करीत आहे मी या वाक्यावर! =)) @कारण तिला कुठलीही वैचारिक उंची Image removed. गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आत्मा दहन

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 18:49 नवीन
हे कस काय बुवा,कारण आम्ही गीतेतील 'नैनन छिन्दन्ति' असे काहिसे ऐकले आहे.तेव्हा या अज्ञानाचे निराकरण करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फार गोधळ उडलाय तुमचा...

चौकटराजा
Mon, 08/12/2013 - 16:46 नवीन
हे पहा राजेश की काय कोण असाल ते...., तुम्ही हा धागा लिहिताना तुमचा फार नि पार गोंधळ उडलाय याला आमच्या आमच्या अध्यात्माच्या भाषेत ( तुम्हाला ती भाषा कळणे नाही ) संभ्रमावस्था म्हणतात. अर्थात ज्याला बुद्धी त्यालाच संभ्रम पडणार हेही आम्ही जाणतो.आता तुमच्यावरआम्ही ही सरळ सरळ का टीका करतो आहोत हे सांगतो. धाग्यात तुम्ही म्हणताय शिक्षण मौजमजा . ओके? मग मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे हे वाक्य कशासाठी ? ऑं ? तुम्ही एकतर मौज ठेवा किंवा गंभीरपणा.. एक पे रहना .. ग्वोडा चतुर ग्वोडा चतुर ये कया लगाया हे या ग्वोडा बोलो या चतुर...... अरे बापरे पण मी इथे मौज मजा करायला आलो होतो मलाही संभ्रमाची बाधा झाली की काय ?? ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

माझ्या मते शिक्षण ही गंभीर

राजेश घासकडवी
Mon, 08/12/2013 - 16:54 नवीन
माझ्या मते शिक्षण ही गंभीर मौजमजाच असते. पण विषयांमध्ये गंभीर असं कुठे सापडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

साइड इफेक्ट??!!

कवितानागेश
Sun, 08/11/2013 - 22:44 नवीन
हे राम!!!!!! =)) =))
  • Log in or register to post comments

_/\__/\__/\_

अवतार
Sun, 08/11/2013 - 22:58 नवीन
_/\__/\__/\_
  • Log in or register to post comments

'०'

प्रभाकर पेठकर
Sun, 08/11/2013 - 23:27 नवीन
हा: हा: हा: पालथ्या घड्यावर अजून बादलीभर पाणी. उपयोग शून्य.
  • Log in or register to post comments

ताक कीबोर्डवर सांडलंय. बाकीचं

बॅटमॅन
Sun, 08/11/2013 - 23:33 नवीन
=)) =)) =)) =)) ताक कीबोर्डवर सांडलंय. बाकीचं नंतर सांडतो आपलं सांगतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा