Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user धन्या
Submitted by धन्या on गुरुवार, 08/15/2013 - 18:44
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
असतात अशी काही माणसं. स्वतःला अगदी देव नाही परंतू देवाखालोखाल समजणारी. इतरांना कस्पटासमान लेखणारी. स्वतःच्या ज्ञानाबद्दल, क्षमतेबद्दल, त्यांच्याशी निगडीत सार्‍याच बाबींबद्दल अवास्तव कल्पना असणारी. इतर व्यक्तींच्या मताला काडी ईतकीसुद्धा किंमत न देणारी. प्रत्येक संवाद हा आपल्याच वाक्याने संपायला हवा असा अट्टाहास असणारी. समोरच्याच्या बोलण्यात कितीही तथ्य असलं तरीही मी म्हणतो तेच बरोबर असा हेका धरणारी. ही यादी न संपणारी आहे. आणि एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेल की, अशी माणसं तुमच्या आजुबाजूलाही आहेत. काहींच्या घरात आहेत. काहींच्या दारात. तर काहींच्या कार्यालयात. अशी माणसं दारात असतील, कार्यालयात असतील तर आपण त्यांच्याशी जेव्हढयास तेव्हढे संबंध ठेवू शकतो. अगदीच सहन करण्याच्या पलिकडे गेलो तर त्या दारात न जाण्याचा, नोकरी बदलण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. पण अशी व्यक्ती जर घरात असेल तर? तर मात्र "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत त्या व्यक्तीला जशी आहे तशी स्विकारण्यापलिकडे काही पर्याय नसतो. कधी कधी अशा व्यक्तींच्या प्रवृत्ती इतक्या टोकाच्या असतात की घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्याचा नरक होऊन जातो. मानसशास्त्र हे मानवी भावभावनांचा, मानवी मनाचा, मेंदूचा, मानवी स्वभावाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्या शास्त्राला अशा व्यक्ती माहिती नसतील असं कसं होइल? मानसशास्त्र अशा व्यक्तींना आत्मरत व्यक्ती म्हणतं. स्वतःच्या कोशात गुरफटलेली, स्वतःपलिकडे जग नसलेली माणसं. पाश्चिमात्य मानसशास्त्र अशा व्यक्तींना नार्सिसिस्ट म्हणतं. आणि या मानवी स्वभावविकाराला नाव आहे "नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर". कुठून बरं आलं हे नार्सिसिस्ट नाव? ते आलं एका ग्रीक पुराणकथेतून. बोईओटीया मधील थेस्पियाई नावाच्या शहरामध्ये नार्सिसस नावाचा एक सुंदर तरुण राहत होता. जलदेव सेफिसस आणि जलपरी लिरिओपचा हा मुलगा. त्याच्या सौंदर्यामुळे तो खुप नावाजलेला होता. परंतू अंगच्या उद्धटपणामुळे त्याला लोक टाळू लागले. त्याच्या सौंदर्यावर भाळून अनेक जलपर्‍या आणि मुली त्याच्या प्रेमात पडल्या. परंतू नार्सिसस स्वतःमध्येच इतका मशगुल होता की त्या सार्‍यांना त्याने झिडकारले. अशीच एक जलपरी ईको. नार्सिससने आपला अव्हेर केला हे सहन न होऊन तीने स्वतःला विरघळवून टाकले. एके दिवशी नार्सिसस एका तळ्याकाठी गेला असता त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. नार्सिसस आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या एव्हढा प्रेमात पडला की त्याला काळाचे भान राहिले नाही. शेवटी तो तसाच मरुन गेला. narc या आत्मरत व्यक्तींची ठळक स्वभाव वैशिष्ट्ये: १. अशा व्यक्तींना किंचितही त्यांच्या विरोधी मत सहन होत नाही. अशावेळी प्रचंड राग येतो त्यांना. २. स्वतःची ध्येये गाठण्यासाठी इतरांचा शीडीसारखा वापर करतात. ३. स्वतःची प्रचंड भलावण करतात. ४. स्वतःचे यश, बौद्धीक क्षमता, सौंदर्य, बुद्धीमत्ता या विषयी अवास्तव कल्पना असतात. ५. दुसर्‍यांनी आपल्याला नेहमी चांगलंच म्हणावं, सर्व बाबतीत आपल्यालाच प्राधान्यक्रम दयावा अशी अपेक्षा असते. ६. दुसर्‍याचा सुखाचा, यशाचा, कर्तुत्वाचा यांना नेहमी मत्सर वाटतो. ७. आपण कुणीतरी "खास" असल्याची भावना मनात घर करुन असते. ८. दुसर्‍यांच्या भावनांची, अपेक्षांची मुळीच जाणिव नसते. ही यादीसुद्धा न संपणारी आहे. दुसर्‍यांच्या भावनांशी, मतांशी काही घेणंदेणं नसल्यामुळे, आपल्या ईप्सित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगता माणसांना वापरण्याच्या हातोटीमुळे ही माणसं ज्या कामात हात घालतात त्या कामात बहूधा यशस्वीच होतात. नेहमी लोकांना जाळ्यात पकडण्यासाठी अशी लोकं एक हसरा मुखवटा घालून चारचौघात वावरतात. पहिल्या भेटीत अशा व्यक्ती समोरच्यावर नेहमीच छाप पाडतात. परंतू जसजसे आपण अशा व्यक्तींबरोबर वेळ घालवू लागतो तसतसे अशा व्यक्तींचे अंतरंग उघडे पडत जातात. अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या कार्यालयातील साहेब किंवा साहेबीण असेल तर त्यांची अपेक्षा तुम्ही दिवसरात्र कार्यालयात राबावं एव्हढीच असते. तुम्हाला घर-दार आहे, मुलं-बाळं आहेत, तुम्हाला भावभावना आहेत हे त्यांच्या गावीच नसतं. तुम्ही महिनाभर खपून जर एखादा अहवाल बनवलात तर तो अहवाल मीच बनवला असं आपल्या वरीष्ठांना सांगून तुमच्या कामाचं श्रेय लाटणं हा अशा व्यक्तींच्या डाव्या हाताचा मळ असतो. अशी व्यक्ती जर कुटुंबात असेल तर? गरुड पुराणात वर्णन केलेला नरक जिवंतपणीच अनुभवायला मिळतो. दुसर्‍यांनाही भावना आहेत, त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, आपलंही कधीतरी काही चुकत असेल, आपणही कुठेतरी आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असताना कमी पडत असू याचं भानच त्यांना नसतं. प्रत्येक बाबतीत घरच्यांनी त्यांनाच अग्रक्रम द्यावा असा त्यांचा हेका असतो. अशा व्यक्तींचं मन ही अभेदय भिंत असते, कितीही डोकं आपटलं तरी न तुटणारी. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत कधीच फचत नाही. त्यांच्यात ती क्षमताच नसते. जणू काही नियतीने त्यांना तसा शापच दिला असावा. पण असा स्वभाव बनतो कसा? एखाद्या असाध्य आजाराप्रमाणे तो एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत होतो की लहानपणी झालेल्या संस्कारांचा तो परीणाम असावा? असा स्वभाव एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत जनुकांच्या माध्यमातून संक्रमीत होत असावा याला पुष्टी देणारे पुरावा जनुकशास्त्राला अजूनतरी सापडले नाहीत. मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञांच्या मते लहान मुल वाढत असताना मुलाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांची अक्षम्य हेळसांड जर झाली तर ते मुल स्वतःचं मन मारायला शिकतं. आपल्या भावभावना बधिर करतं. आणि त्यामुळेच दुसर्‍यांच्या भावभावना त्याच्यापर्यंत पोहचतच नाहीत. किंवा याच्या अगदी उलटही असू शकतं. एखादया सुखवस्तू घरात मुल वाढत असताना त्याचे अवाजवी लाड झाले, ते मुल म्हणेल ती वस्तू क्षणार्धात त्याच्यासमोर हजर केली जाउ लागली तर त्याच्या मनाचा वेगळाच ग्रह होतो. आपण कुणीतरी खास आहोत, आपल्याला जे जे हवं ते ते आपल्यासमोरक्लगेच हजर व्हायला हवं, आपला तो अधिकारच आहे अशी त्या मुलाच्या मनाची समजूत होऊ लागते. हे ग्रह पुढे खुपच घट्ट होउन व्यक्तीचा स्वभाव आत्मकेंद्री होतो. स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. हे म्हणणं आत्मरत व्यक्तींना तंतोतंत लागू होतं. एखादी व्यक्ती आपला स्वभाव कधी बदलते? जेव्हा त्या व्यक्तीला आपलं काहीतरी चुकतंय असं वाटतं. आत्मरत व्यक्तींच्या बाबतीत अशी काहीच शक्यता नसते. त्यांच्या दृष्टीने ते सर्वज्ञ, सर्वगुणसंपन्न असतात. जी काही वैगुण्ये असतात ती इतरांमध्ये असा आत्मरत व्यक्तींचा ठाम ग्रह असतो. त्यामुळे अशा आत्मरत व्यक्ती सुधारणे किंवा त्यांचा स्वभाव बदलणे ही जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट असते. नाही म्हणायला एखादी आयुष्य ढवळून टाकणारी घटना घडली तर एखादया आत्मरत व्यक्तीचे डोळे खाडकन उघडू शकतात. परंतू असा उ:शाप मिळालेली अहिल्या हजारात एखादीच असते. बाकीच्यांच्या नशिबी शापित शिळेचं जगणं असतं. ज्या शिळेवर कधी कधी कुटुंबच्या कुटुंब आपल्या अपेक्षांचा बळी देतात. अशा व्यक्तींसोबतचं आपलं जीवन सुसह्य करण्याचा मार्ग म्हणजे अशी व्यक्ती जशी आहे तशी स्विकारणं, त्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पुर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही याची मनाशी खुणगाठ बांधणं. गोनिदांनी ज्ञानदेवांच्या जीवनावर लिहिलेल्या "मोगरा फुलला" नावाच्या कादंबरीत एक वाक्य आहे, अपेक्षा फार नसल्या की अपेक्षाभंगाचं दु:ख सहन करावं लागत नाही. हे वाक्य आत्मरत व्यक्तींसोबत आयुष्य जगताना तंतोतंत लागू होतं. पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ "हाऊ टू डील विथ नार्सिसिस्ट?" असा प्रश्न विचारला की "रन अवे फ्रॉम हिम्/हर फॉर युवर लाईफ" असं उत्तर देतात. भारतीय मनाला हे उत्तर पटणार नाही. त्यामुळे परिस्थीतीशी जुळवून घेणं हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. असो. जाता जाता एव्हढंच लिहितो की या लेखाचा उद्देश आत्मरत व्यक्तींना सैतान ठरवणं हा नाही. केवळ वास्तवाशी ओळख करुन देणं एव्हढा हेतू हा लेख लिहिताना समोर आहे. आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी जीव असतात की आपल्यामुळे इतरांना प्रचंड त्रास होतोय याची पुसटशीही जाणिव त्यांना नसते.
  • Log in or register to post comments
  • 20176 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on गुरुवार, 08/15/2013 - 19:03

Permalink

खरं आहे

दुर्दैवाचा भाग असा की आपल्याला असा काही आजार आहे, किंबहुना कोणताही मानसिक आजार आहे हेच असे काही प्रॉब्लेम्स असलेले लोक नाकारतात. त्यामुळे त्यावर उपचार होणे शक्यच नसते. मानसिक आजारामुळे आयुष्य हकनाक फुकट गेलेले उदाहरण आपण इथे मिपावरच पाहिले आहे. त्या व्यक्तीला असा काही आजार आहे हे त्याला किंवा त्याच्या घरच्यांना न कळल्यामुळे एक घर तरुण बुद्धिमान मुलगा गमावून बसलं. :( एखादा मानसिक प्रॉब्लेम असलेल्या व्यक्तीबरोबर रहाणे ही अत्यंत अवघड आणि सतत परीक्षा घेणारी गोष्ट आहे. अशा व्यक्तींच्या घरच्यांबद्दलही मला अतिशय सहानुभूती वाटते. आपल्याला काही प्रॉब्लेम आहे हे एखाद्याने स्वीकारले तर त्याचा बरे होण्याचा रस्ता उघडतो नाहीतर अनेकांची आयुष्यं अशीच फरपटत रहातात.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/16/2013 - 06:14

In reply to खरं आहे by पैसा

Permalink

सिझोफ्रेनिया अन धनाजीरावांनी

सिझोफ्रेनिया अन धनाजीरावांनी केलेला "आत्मरत" ( self centered म्हणता येइल का?) यात खुप फरक असावा पैसाताई. धनाजीरावांनी उल्लेखलेली लक्षण दुसर्‍यांना कमी लेखण्याची अथवा स्वस्तुतीची आहेत. भास आभास होण्याची नाही आहेत. सिझोफ्रेनिक आयुष्यात यशस्वी होउ शकत नाहीत, तर "हे" लोक दुसर्‍यांच हिरावुन घेउन यशस्वी झाल्याचा दावा करतात. अर्थात सिझोफ्रेनिकस ना आपली गरज असते, तर अश्या लोकांपासुन run for your life हेच खर.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 08/16/2013 - 08:36

In reply to सिझोफ्रेनिया अन धनाजीरावांनी by स्पंदना

Permalink

थोडक्यात...

मनाचे पुष्कळ वेगवेगळे आजार आहेत. आणि बहुतेक सगळ्या गोष्टींवर उपायही शक्य अहेत. वेळच्या वेळी केले गेले तरच. पण पुष्कळवेळा केस हाताबाहेर गेल्यावरच लक्षात येते की काहितरी बिघडलय... ओसीडी (परत परत एकच गोष्ट करत राहणारे, एक टिपिकल लक्षण प्रत्येक वेळेस जिना चढताना पायर्‍या मोजणे), क्लिप्तोमॅनिअ‍ॅक (आपल्या नसलेल्या वस्तू नकळत उचलणे), डीप्रेशन (टोकाचं नैराश्य), ऑटिझम(संशोधन आणि उपचार पहिल्या पायरीवरच आहेत! :( ) ...हे असे निदान मान्य तरी करतात की आपले काहितरी बिघडतंय, त्यांना समुपदेशन करणं सोपे जाते. छोट्या छोट्या उपायांमधून, मनाच्या एक्सरसाईझ मधून (!) या गोष्टी सोडवता येतात. सिझोफ्रेनिया मध्ये पॅरानॉईड असेल तर सुरुवातीला प्रत्येकजण आपल्याबद्दल काहितरी बोलतोय असं वाटतं.. हे वाढत गेले की डायरेक्ट कुणीतरी आपल्याला मारण्याचा कट करतोय असं वाटतं. यांनानिदान सुरुवातीलातरी जवळच्या लोकांकडून लपवूनच कामिन्गची औषधे द्यावी लागतात. कठीण असलं तरी सुधारण्याचे थोडी तरी शक्यता असते. पॅरानॉइड नसला तरी हॅल्युसिनशन्स (भास) असतातच. पण हे भास आहेत, हेपण त्यांना पटू शकतं आणि काहितरी उपाय होउ शकतात. पर्सनलिटी डिसॉर्दरमध्ये 'नॉर्मल' वाली पर्सोनालिटी चालू असेल तेंव्हाच संवाद साधणं शक्य असतं. पण कधी 'दुसरी' बाजू डोकं वर काढेल, कुणालाच कळू शकत नाही. अतिशय सावधगिरीनी उपाय करावे लागतात. अर्थात सगळेच उपचार जवळचा/ विश्वासाच्या व्यक्तींकडूनच केले जाउ शकतात. परके लोक त्यात हस्तक्षेप करु शकतच नाहीत. ,,पण नार्सिसिस्ट लोकांसाठी स्पष्ट उपाय नाही. कारण संवाद साधता येत नाही. यांना फार तर स्वतःच्या मरणाची भिती असू शकते, त्यापलिकडे भावनाच नसते. त्यामुळे त्यांच्या कोषात बाकी कुणाला कधीच शिरता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/16/2013 - 11:51

In reply to सिझोफ्रेनिया अन धनाजीरावांनी by स्पंदना

Permalink

माहिती आहे

खाली डॉ खरेंनी दिल्याप्रमाणे कुंपणावरचे लोक आणि हद्द ओलांडून गेलेले यात फरक असतोच. माझा मुद्दा इतकाच की कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर असो की मानसिक रोग, ते लोक आपल्याला काही प्रॉब्लेम आहे हेच कबूल करायला तयार होत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 08/17/2013 - 01:10

In reply to माहिती आहे by पैसा

Permalink

फक्त मानसिकच नाही तर कुठलाही

फक्त मानसिकच नाही तर कुठलाही लहानमोठा शारिरीक आजार असतानादेखिल असा 'सुपरमॅन सिन्ड्रोम' दाखवणारे खूप लोक पाहिलेत. 'मला काही झालेले नाहिये, मी अगदी ठणठणीत आहे' असे सांगणारी अनेक माणसे भोवती दिसतातच. एकंदरीतच आपल्याला उपचाराची/ औषधाची/ आधाराची गरज आहे हे सांगण्यात कमीपणा अनेकांना वाततो. कदाचित बर्याच वेळा कळतच नाही की आपल्याला नक्की काय कमी पडतय, आणि त्यावर आता करायला काय हवं? उलट बाहेरच्या परिस्थितीलाच दोष दिला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 08/17/2013 - 01:25

In reply to फक्त मानसिकच नाही तर कुठलाही by कवितानागेश

Permalink

मला वाटतं शारीरिक आजारात

मला वाटतं शारीरिक आजारात सुपरम्यान सिण्ड्रोम असण्यापेक्षा घरातल्या लोकांनी आजार्यासारखा वागवलेलं आवडत नसावं ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/15/2013 - 19:11

Permalink

एक व्याधी.

थोडक्यात ही एक असाध्य व्याधी आहे. दुर्दैवं असं की इतरांना हे समजू शकतं पण व्याधीग्रस्तं व्यक्तीला हे कधीच समजत नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनांत त्यांच्या इतर कुटुंब सदस्यांना जन्मभराकरीता हा त्रास भोगावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 08/15/2013 - 19:35

In reply to एक व्याधी. by प्रभाकर पेठकर

Permalink

>>>असाध्य व्याधी

>>>असाध्य व्याधी सुधारणा होऊ शकते. व्याधी असाध्य नसावी. पेशन्ट बरोबरच कुटुंबियांचा पेशन्स फार महत्त्वाचा असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/15/2013 - 19:26

Permalink

मानसोपचारतज्ञाकडे नेण्यासंदर्भात

इतर काही व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकार, म्हणजे आत्मरत व्यक्तिमत्त्व (narcissistic personality), कंपल्सिव्ह व्यक्तिमत्त्व, टोकाच्या विचारसरणीची आणि वर्तणुकीची पद्धत असणारी व्यक्तिमत्त्व, यात असामाजिक (antisocial) आणि काठावरचे (boderline) असे दोन्ही प्रकार येतात, या विकारांमधे व्यक्तीचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या सहभागाशिवाय त्यांना काहीच शिकवता येत नाही. त्यांची वरवरची लक्षणं, टँट्रम्स इ. काही प्रमाणात औषधांमुळे ताब्यात आणता येतं. पण सहकार्य, सहभागाशिवाय पूर्ण इलाज होणं कठीण आहे. यांच्यापैकी बर्‍याचशा लोकांची तक्रार "मला इतरांमुळे (कुटुंबीय, समाजव्यवस्था) त्रास होतोय. त्यांना बदला म्हणजे मी आपोआप बदलेन. मला सांगू नका" अशा प्रकारची असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यांमधे हाच प्रकार दिसतो, नवरा-बायको, सासू-सून, मुलं-पालक, इ. या लोकांना पूर्णतः डावलूनही चालत नाही. त्यांची तशी मनःस्थितीही नसते. "बाहेरची परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही, पण स्वतःचा दृष्टीकोन (approach) बदलण्याचं शस्त्र आपण सहज वापरू शकतो. आपण ते करून पाहू. आणि मग बाकीचे बदलतील का ते पाहू", असं त्यांना सांगावं लागतं. ही मानसिक तयारी करून देणं हे समुपदेशकाचं कसब. ... ... जेव्हा माणूस सातत्याने नेहेमीपेक्षा वेगळा वागतोय, एखादवेळा नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संबंधातही त्रास होतोय, चिडचिड होते आहे, कशात रस दाखवत नाहीये, नातेसंबंध बिघडत आहेत, त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होतोय, अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर तज्ञाकडे जाणं इष्ट. आत्मरत, ओसीडीच्या/OCPD च्या रुग्णांना स्वतःला त्रास होत नाही, कारण त्यांना आपलं तेच खरं वाटत असतं. झालाच तर इतर का बदलत नाहीत, आपलं ऐकत का नाहीत याचा त्रास होतो. त्यामुळे जबरदस्ती करणं, राग येणं असं होतं. मुख्य त्रास इतरांना, कुटुंबियांना होतो. तसं होत असेल तर हे सांगून सवरून बदलत नाहीये तर मग तज्ञाची गरज आहे. सरळ सांगून ही व्यक्ती येईलच असं नाही. मग त्यांना सांगताना, आत्ता जे काही होतंय, त्याचा सगळ्यांना त्रास होतोय. व्यक्तिला दोष देण्यापेक्षा परिस्थितीकडे बोट दाखवावं. आपण प्रयत्न केले पण आपल्याच्याने हे सुधारत नाहिये, आता अजून काही करता येईल का यासाठी मानसोपचार तज्ञाकडे जाऊ. असं सांगता येतं. अशा वेळेस रुग्ण "हे लोक आपलं ऐकत नाही निदान तज्ञ, डॉक्टरचं तरी ऐकतील" म्हणून येतात. हे बरेचदा होतं, विशेषतः व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विकारांमधे हे होतं. रुग्णाचं मत "तुम्हालाच मानसोपचाराची गरज आहे" असं असतं. अशा वेळेस "तू तुझ्या तक्रारी सांगायला डॉक्टरकडे चल" असं रुग्णाला सांगता येतं. थोडक्यात खिन्नता, राग, अस्थिरता वरचेवर होत असेल, त्यांच्यावर ताबा ठेवणं कठीण जात असेल, आणि त्यामुळे मानसिक बदल होत आहेत, कार्यपद्धतीमुळे नुकसान होतंय हे दिसत असेल; कळतंय पण वळतही नाही किंवा कळतच नाहीये असं असेल आणि हे सगळं काही आठवडे, महिने होतंय तर तज्ञाकडून मानसोपचार/औषधोपचाराची गरज आहे. ------ सुलभा सुब्रमण्यम या अनुभवी, मानसोपचार-समुपदेशिकेशी केलेल्या प्रश्नोत्तरांमधून.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 08/15/2013 - 19:36

In reply to मानसोपचारतज्ञाकडे नेण्यासंदर्भात by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ऐसीवर ही दोन भागांमधील मुलाखत

ऐसीवर ही दोन भागांमधील मुलाखत वाचली होती. खुप चांगली माहिती दिलीय या मुलाखतीत. ज्या कुटुंबातील व्यक्तींला काही मानसिक आजार असण्याची शक्यता आहे अशा कुटुंबातील व्यक्तींनी आवर्जून वाचावी अशी मुलाखत आहे ती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 08/15/2013 - 19:57

Permalink

सुंदर

सुंदर माहीतीपुर्ण लेख !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/15/2013 - 20:00

Permalink

छान.

छान लेखन. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 08/15/2013 - 20:12

Permalink

पण एक शंका

मी मोठा शहाणा...
पण खरचं एखादा मोठ्ठा शहाणा असेल अन तसा वागत असेल तर त्याला नार्सिसिस्ट म्हणावे काय ? उदा . गॅरी कॅस्पारोव्ह म्हणाला होते ( १९९० च्या आसपास) जेव्हा नायजेल शॉर्ट त्याचा सर्वात चुरशीचा कॉम्पीटीटर होता तेव्हा " My next will be Nigel Short and the match would be even Short " आता ह्या गॅरी कॅस्पारोव्हला (आणि अशाच इतर माणसांना ) नार्सिसिस्ट म्हणावे काय ? ( बायदवे : पुढील मॅच मधे कॅस्पारोव्हने शॉटचा खरच कचरा केला होता ... अगदी लिंबुटिंबु खेळाडुला हरवावे तसे हरवले होते )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 08/15/2013 - 21:00

In reply to पण एक शंका by प्रसाद गोडबोले

Permalink

आत्मविश्वास.

ह्यात नार्सिसिझमचा भाग येत नाही असं वाटतं. हा जबरदस्त आत्मविश्वास आहे. समजा मॅच मध्ये कॅस्पारोव्ह हरला असता आणि त्याचे विश्लेषण करत 'पंचानी चुकीचा निर्णय दिला, त्यांना चेसचे नियमच माहित नाहीत, शॉर्ट जगाच्या दृष्टीने जिंकला असला तरी मुळात तो जबरदस्त हरला आहे. मला कोणी हरविणे शक्यच नाही, कोणाला बुद्धीबळ हा खेळ कळलेलाच नाही' वगैरे विधानं केली असती तर कदाचित कॉस्परॉव्हचे व्यक्तिमत्व नार्सिसिस्टच्या जवळ जाणारे ठरले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on गुरुवार, 08/15/2013 - 20:14

Permalink

ह्म्म्म

नार्सिसिझम बद्दल माहीत होतं पण हा लेख नार्सिसिस्ट व्यक्तीने वाचला तर त्याची/तिची प्रतिक्रिया काय असेल? कदाचित 'यातील एकही लक्षण मला लागू होत नाही' असं असेल की आणखी काही?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 08/15/2013 - 21:50

In reply to ह्म्म्म by रामपुरी

Permalink

जरा आजूबाजूला शोधा.. गुणगुण

जरा आजूबाजूला शोधा.. गुणगुण करणार्‍या लै प्रतिक्रिया सापडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Fri, 08/16/2013 - 01:52

In reply to जरा आजूबाजूला शोधा.. गुणगुण by मोदक

Permalink

हॅ हॅ हॅ

ती सगळी गुणगुण वाचण्यापेक्षा अंकलिपीतील म ची बाराखडी पटकन वाचून होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 08/16/2013 - 14:23

In reply to जरा आजूबाजूला शोधा.. गुणगुण by मोदक

Permalink

तुझी प्रतीक्रिया चांगल्या

तुझी प्रतीक्रिया चांगल्या लेखाचे काश्मीर करू शकते हे लक्षात येते आहे ना ?? बरे असेल कुणी नार्सिसिस्ट, तुम्ही नॉर्मल आहात ना? करा दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 08/15/2013 - 20:38

Permalink

vachatiiye ho Dhanajirao.

vachatiiye ho Dhanajirao. donhee lekh aavaDale.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 08/15/2013 - 20:39

Permalink

छान लेखन.

छान लेखन. पण फक्त एका लेखापुरतं मर्यादित ठेवू नकोस. मानसशास्त्रावर अजूनही लेखन येऊ देत. तेव्हढीच वेगवेगळ्या मनोविकारांबद्दल अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/15/2013 - 22:32

Permalink

@आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी

@आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी जीव असतात की आपल्यामुळे इतरांना प्रचंड त्रास होतोय याची पुसटशीही जाणिव त्यांना नसते. >>> अप्रतिम लिहिलत धनाजीराव..!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 08/15/2013 - 22:49

Permalink

मानसिक रोग हा वेगळा प्रकार आहे

मला आत्मरत असणे हा मानसिक रोग वाटत नाही. तसे असेल तर 'स्वतःकडे दुर्लक्ष करणे' नावाचा अजून मानसिक रोग असे म्हणावे लागेल. 'इतरांकडे लक्ष देणे' , उदा, समाजसेवा, नावाचा अजून एक मानसिक रोग असावा. 'कोणत्यातरी एकाच गोष्टीत लक्ष घालणे' हा ही एक मानसिक आजार ठरावा. लोकांच्या वागण्याने इतरांना त्रास होतो, काही कारणांनी लोक स्वतःशी , इतरांशी नीट वागत नाहीत हे एक सामाजिक सत्य आहे. यात व्याधीवत काही नसावे. मानसशास्त्र सध्याला एक 'प्रमाण मनुष्य' बनवत आहे. जर कोणतीही भावना या प्रमाण मनुष्याच्या भावनेच्या रेंज बाहेर गेली तर तो रोगी समजावा अशी धारणा झालेली दिसते. नवलाची गोष्ट म्हणजे ही रेंज इतकी लहान आहे कि साधारणत: , जो रोगी आहे त्याला, जो त्याच्या बाजूला आहे त्याला आणि समाजाला त्याचा रोग दिसतच नाही ! वर दिसलाच तर तो बरा करता येत नाही. समाजातील लोकांचे दुष्ट वर्तन वर्णन करण्याचा (आणि म्हणून कदाचित समर्थन करण्याचा?) हा मला भलताच प्रकार वाटतो. शेवटी गमतीने - (भीमसेनांचा आत्मरंगी रंगले, मन भवतरंगी रंगले, रंगले, रामरंगी रंगले, मन हो ऐकण्याचा मूड गेला.)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/16/2013 - 01:20

In reply to मानसिक रोग हा वेगळा प्रकार आहे by arunjoshi123

Permalink

बहुदा

'स्वतःकडे दुर्लक्ष करणे' हा नैराश्याचा मोठा भाग असतो. नैराश्य - depression. 'कोणत्यातरी एकाच गोष्टीत लक्ष घालणे' - Obsessive compulsive disorder / OCD तज्ञांकडून याची अधिक माहिती मिळू शकेल. ---
समाजातील लोकांचे दुष्ट वर्तन वर्णन करण्याचा (आणि म्हणून कदाचित समर्थन करण्याचा?) हा मला भलताच प्रकार वाटतो.
संसर्गजन्य रोग असणार्‍या व्यक्तींना 'जीवशास्त्रीय शस्त्रं' घेऊन फिरतात म्हणून कोणीही प्रॉसेक्यूट करत नाहीत. उलट बाबा आमटेंसारख्या, संसर्गजन्य रुग्णांची सेवा करणार्‍यांना, बरं करणार्‍यांना मोठं मानलं जातं. मग मानसिक विकार असणार्‍यांना गुन्हेगार कसं ठरवायचं? कायद्यात, न्यायदान करताना मानसिक विकार असणार्‍या आणि प्रत्यक्ष गुन्हे करणार्‍या लोकांना सूट दिली जाते. इथे आपण 'पर्सीव्ह्ड' गुन्ह्यांबद्दल, चुकांबद्दल, वाईट वर्तनाबद्दल बोलत आहोत; प्रत्यक्ष गुन्हा नव्हे! --- परिस्थितीमुळेच लोक मानसिक विकारांना बळी पडतात असं नव्हे; काही लोक असे विकार घेऊनच जन्माला येतात. (जसं काही लोकांना जन्मजातच शारीरिक व्याधी, विकार असतात.) मानसिक विकारांमधून 'बरं होणं' म्हणजे 'ताप बरा झाला' इतपत सोपं नाही; कर्करोगाचं रेमिशन (बाजूला पडणे) होतं तसंही असू शकतं. (याबद्दल थोडा अधिक तपशील, वर धन्याने उल्लेख केलेल्या मुलाखतीमधे आहे.) --- खटपट्या, तुम्हाला तुमच्या रूम पार्टनरला मानसोपचारतज्ञाकडे नेता येणं शक्य असेल, तेवढी जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर ते करा; ते सगळ्यात उत्तम. हे झेपणार नसेल, जबाबदारी घेण्याची इच्छा नसेल तर बाजूला झालेलंही वाईट नाही. त्याला मारणं वगैरे गुन्हे स्वतःच्या समाधानासाठी करता येतील, पण त्यातून त्या रुग्णाची अवस्था आणखी खालावू शकते. जॅक डी, तुम्ही असं काही केलं नाहीत हे वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Fri, 08/16/2013 - 01:49

In reply to मानसिक रोग हा वेगळा प्रकार आहे by arunjoshi123

Permalink

आत्मरत?

स्वमग्न/आत्मरत हे शब्द ऑटीझम साठी वापरतात अशी समजूत होती.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/16/2013 - 06:15

In reply to आत्मरत? by रामपुरी

Permalink

हो मलाही तसच वाटत. या

हो मलाही तसच वाटत. या प्रकाराला सेल्फ सेंटर्ड म्हणता येइल. "माझ्या" पलिकडे काही न दिसणे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 09:20

In reply to हो मलाही तसच वाटत. या by स्पंदना

Permalink

स्वमग्न हा शब्द ऑटीझमसाठी

स्वमग्न हा शब्द ऑटीझमसाठी प्रचलित आहे. आत्म"रत" हा शब्द स्वताच्या "प्रेमात" पडलेले लोक अशा अर्थी वापरला आहे. तुम्ही म्हणताय तसा सेल्फ सेंटर्डचा मराठी शब्द आत्मकेंद्री हाही चालला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 08/15/2013 - 23:01

Permalink

आमच्या बरोबर काम करणाराच असा

आमच्या बरोबर काम करणाराच असा आहे. तो माझा रुम पार्ट्नर ही आहे. मी समुपदेश करु शकतो का ? सुरुवात कशी करावी ? त्याच्या या स्वभावामुळे घरी त्याचे कोणाशी पटत नहि. त्यामुळे नोकरी लागताच तो वेगळा राहू लागला. घरातील कोणीही त्याच्या संपर्कामध्ये नाहीत. मी काय करू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on गुरुवार, 08/15/2013 - 23:29

In reply to आमच्या बरोबर काम करणाराच असा by खटपट्या

Permalink

रुम बदलावी

रुम बदलावी, अन्यथा हटाई सुरु करावी, थोडा फार झाला तर त्यामुळेच बदल होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on गुरुवार, 08/15/2013 - 23:36

In reply to आमच्या बरोबर काम करणाराच असा by खटपट्या

Permalink

खरच रूम बदलून टाका, मी अश्याच

खरच रूम बदलून टाका, मी अश्याच व्यक्ती बरोबर २ वर्ष काढली आहेत, ते काही बदलणार नाही. उलट तुम्ही अपेक्षा ठेवून बसाल आणि मग तुमचे खूप मानसिक नुकसान होईल. मी रूम सोडल्यावर खूप आनंदात आयुष्य काढले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on गुरुवार, 08/15/2013 - 23:27

Permalink

आजच कळले की अश्या लोकांना काय

आजच कळले की अश्या लोकांना काय म्हणतात ते, भारतात कधी अनुभव आला नव्हता पण अमेरिकेत आल्या वर इकडच्या काही विद्यार्थ्यांचा असाच खूप वाईट अनुभव आला. भारतात असतो तर पोत्यात घालून मारला असता इतकी वाईट वेळ आली होती पण त्यावेळी इकडे पोत मिळाले नाही.:( ती माणसे खरच खूप यशस्वी होतात, पण नंतर त्यांना त्या यशाचे काय करावे हे समजत नसावे बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 08/15/2013 - 23:54

In reply to आजच कळले की अश्या लोकांना काय by जॅक डनियल्स

Permalink

अगदी अगदी … राग आवरला आणि

अगदी अगदी … राग आवरला आणि शांत राहिलो तर अशा लोकांना वाटता कि त्यांचा विजय झाला. किवा त्यांचे म्हणणे आपल्याला पटले आहे. रूम बदलण्याची मानसिक तयारी सुरु आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 09:28

In reply to अगदी अगदी … राग आवरला आणि by खटपट्या

Permalink

कितीही स्वार्थी विचार वाटला

कितीही स्वार्थी विचार वाटला तरी तुम्ही रुम बदलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर तुमच्या रुम पार्टनरला मदत करावीशी वाट असेल तर अगदी सौम्य शब्दांत तो कसा चुकतो, त्याने त्याचा स्वभाव बदलण्याची कशी गरज आहे हे सांगून पाहा. आणि हो, सांगण्यापूर्वी महाप्रलयाला सामोरं जायची मनाची तयारी करा. त्याने तुमचं शांतपणे ऐकून घेतलं, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे असं मान्य केलं, त्याचीही स्वतःला बदलायची ईच्छा आहे असं काही म्हणाला तर त्याला मदत करता येईल. अशा व्यक्तीच्या बाबतीत सायकोथेरपी उपयोगी पडू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 08/15/2013 - 23:59

Permalink

'sharing' न समजल्यमुळे असं

'sharing' न समजल्यमुळे असं होत असावं कदाचित. पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, खाउ, पासून आनंद, दु:ख आणि शिवाय आई, बाबा आणि इतर सर्व... अगदी प्रुथ्वी सुद्धा, आपण सगळी (वेगवेगळ्या नात्यातून संबंध असलेली)भावंडं शेअर करत आहोत, ही भावना कधीच जागी न झाल्याचा हा परीणाम असावा का? फक्त स्वतःपुरता विचार करायची सवय लागून कधीतरी घसरत घसरत असा तोल जात असावा. एक आठवण झाली. मागे एकदा लहान्पणी माझी आई आणि मावशी आश्चर्य करत होत्या, 'आपण आपल्या आईवडलांचा उल्लेख 'आमची आई, आमचे बाबा' असा करतो, तशी ही मुले का बरं करत नाहीत? हे 'माझी' आई, म्हणतात!'
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/16/2013 - 06:17

In reply to 'sharing' न समजल्यमुळे असं by कवितानागेश

Permalink

खरच ग! खरच माऊ! तेंव्हा ती आई

खरच ग! खरच माऊ! तेंव्हा ती आई किमान ४ तरी मुलांची आई असायची, आता फक्त दोघांची असल्याने स्पर्धा कमी होउन एकट्याचा हक्क प्रस्थापित करावासा वाटत असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 08/16/2013 - 01:44

Permalink

स्वभाव जन्मतःच निश्चित असतो.

एकंदरित लेख छान वाटला, परंतु: ........."मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार"......... असे असते, तर एकाच घरात वाढलेल्या सर्व भावंडांचा स्वभाव सारखाच झाला असता, पण असे असलेले दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येकाचा स्वभाव अमूक असा होण्यामागे आणखी खोल, प्रबळ कारणेही असणार. माझ्या अनुभवात आलेले आहे, की जर उत्तम ज्योतिषी असेल, तर तो पत्रिकेवरून स्वभावाचे अचूक वर्णन करतो. तेंव्हा जन्माला आलेल्या बाळाचा एकंदरित स्वभाव पुढे कसा होणार, हे जन्मतःच ठरलेले असल्याने एकाच घरातील एकाच पालकांची मुले वेगेवेगळ्या स्वभावाची असलेली दिसून येतात. संस्कारांचा मोठाच प्रभाव पडत असतो, हे निर्विवाद, पण तेवढेच कारण पुरेसे वाटत नाही. शिवाय अमूक व्यक्तीवर अमूक संस्कारच घडावेत, ही देखील नियतीच. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने हे कसे मांडले जाते, हे ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 10:18

In reply to स्वभाव जन्मतःच निश्चित असतो. by चित्रगुप्त

Permalink

........."मग उरते एकच कारण.

........."मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार"......... असे असते, तर एकाच घरात वाढलेल्या सर्व भावंडांचा स्वभाव सारखाच झाला असता, पण असे असलेले दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येकाचा स्वभाव अमूक असा होण्यामागे आणखी खोल, प्रबळ कारणेही असणार. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने हे कसे मांडले जाते, हे ठाऊक नाही.
तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर इथे आहे: व्हाय चिल्ड्रन इन सेम फॅमिली बिहेव डिफरंटली
माझ्या अनुभवात आलेले आहे, की जर उत्तम ज्योतिषी असेल, तर तो पत्रिकेवरून स्वभावाचे अचूक वर्णन करतो. तेंव्हा जन्माला आलेल्या बाळाचा एकंदरित स्वभाव पुढे कसा होणार, हे जन्मतःच ठरलेले असल्याने एकाच घरातील एकाच पालकांची मुले वेगेवेगळ्या स्वभावाची असलेली दिसून येतात. संस्कारांचा मोठाच प्रभाव पडत असतो, हे निर्विवाद, पण तेवढेच कारण पुरेसे वाटत नाही. शिवाय अमूक व्यक्तीवर अमूक संस्कारच घडावेत, ही देखील नियतीच.
हा मानण्या न मानण्याचा विषय आहे. एकदा नियती आहे असं मानलं की माणसाच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ नाही. जे काही होतं ते नियतीच्या ईशार्‍यावर. आपण फक्त प्रवाहपतितासारखे वाहत जाणे. असो. हा विषय या धाग्यावर नको. मुळ मुद्दा बाजूला राहून धागा नको तिकडे भरकटेल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 08/16/2013 - 23:36

In reply to ........."मग उरते एकच कारण. by धन्या

Permalink

>>>एकदा नियती आहे असं मानलं

>>>एकदा नियती आहे असं मानलं की माणसाच्या कर्तृत्वाला काहीच अर्थ नाही. जे काही होतं ते नियतीच्या ईशार्‍यावर. आपण फक्त प्रवाहपतितासारखे वाहत जाणे. खिक्क. लई घोळ आहे. ;) चालू द्या. :P
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 08/16/2013 - 02:11

Permalink

"नार्सिसिस्टीक पर्सनालिटी

"नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर" हा आजार आहे असे म्हणावे का ? जर हा आजार असेल तर मग लहानपणी होणारे सन्स्कार जबाबदार नाही आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 09:37

In reply to "नार्सिसिस्टीक पर्सनालिटी by खटपट्या

Permalink

आजार म्हणा वा स्वभावविकृती.

आजार म्हणा वा स्वभावविकृती. एक मात्र नक्की की ती व्यक्ती तसं जाणून बुजून, किंवा तुम्हाला त्रास दयायचा म्हणून तसं ठरवून वागत नसते. ते वागणं त्या व्यक्तीच्या अंतर्मनात अगदी खोलवर "नॉर्मल" वागणं म्हणून रुतुन बसलेलं असतं. आपण चुकीचं वागतोय याचं भानच त्यांना नसतं. बरेच वेळा गोष्टी असह्य झाल्या की आपण त्राग्याने म्हणतो की "त्याला/तिला कळत नाही का?". या प्रश्नाचं उत्तर त्याला/तिला कळत नाही असंच असतं. या प्रकाराला लहानपणी होणारे संस्कार कसे जबाबदार ठरतात याचं छान स्पष्टीकरण माऊने वर दिलंय.
'sharing' न समजल्यमुळे असं होत असावं कदाचित. पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, खाउ, पासून आनंद, दु:ख आणि शिवाय आई, बाबा आणि इतर सर्व... अगदी प्रुथ्वी सुद्धा, आपण सगळी (वेगवेगळ्या नात्यातून संबंध असलेली)भावंडं शेअर करत आहोत, ही भावना कधीच जागी न झाल्याचा हा परीणाम असावा का? फक्त स्वतःपुरता विचार करायची सवय लागून कधीतरी घसरत घसरत असा तोल जात असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/16/2013 - 06:19

Permalink

धनाजीराव अतिशय छान मांडलत

धनाजीराव अतिशय छान मांडलत तुम्ही स्वभाव विश्लेषण. एकूण संदेश हाच किप युअर डीस्टन्स. म्हणजे शुद्ध मराठीत जमेल तेव्हढे टाळा, अनुल्लेखाने मारा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 08/16/2013 - 08:14

Permalink

अति नको

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 08/16/2013 - 08:42

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

त्याचा नियम एकच आहे समतोल

त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ? > अगदी पट्लं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 08/16/2013 - 08:49

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

@तात्पर् मावी मल्ये , ईझमस

@तात्पर् मावी मल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?>>> ये हुइ पते की बात! :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 10:02

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

माझा एक डोक्टर मित्र फार

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो.
होय.
त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना ?
मानवी स्वभावविकृती एका विशिष्ट मर्यादेपलिकडे गेले की माणसाचं वास्तवाचं भान सुटतं. आणि एकदा असं भान सुटलं की कसला समतोल अन कसलं काय.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 08/16/2013 - 10:14

In reply to माझा एक डोक्टर मित्र फार by धन्या

Permalink

हा ही एक आजार

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. धन्या हे असे कंट्रोल व्ही दोनदा येणे हा ही एक आजार आहे. सिंहगड रोडला तुला कोणते सायकियात्रिस्ट जवळ पडतात बॉ ? येतोस ना ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 08/16/2013 - 10:23

In reply to हा ही एक आजार by चौकटराजा

Permalink

धन्या हे असे कंट्रोल व्ही

धन्या हे असे कंट्रोल व्ही दोनदा येणे हा ही एक आजार आहे.
जगातल्या कुठल्याशी संगणक आज्ञावलीकर्त्याला (तेच ते सॉफ्टवेअर प्रोग्रामर) विचारलंत तर तो निमिषार्धात म्हणेल की ही अगदी सामान्य बाब आहे. त्यात आजार वगैरे काही नाही. कुठल्याही सॉफ्टवेअरमधील बर्‍याचशा मोठया चुका या प्रोग्रामरने केलेल्या "कॉपी पेस्ट" मुळे असतात. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 08/16/2013 - 13:45

In reply to धन्या हे असे कंट्रोल व्ही by धन्या

Permalink

तो म्हणणारच ..

तो प्रोगामर म्हणणारच ही सामान्य बाब आहे. " आजार" नाही.कारण प्रोग्रामरलाही त्याचा अहं स्वस्थ बसू देत नाही.आपली ती सामान्य बाब व दुसर्‍याचा तो आजार काय ? वस्तादच आहेस की ! ( धन्या हे सगळं तू हलके घेशीला ना रे भौ ? )
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 08/16/2013 - 10:30

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

माझा एक डोक्टर मित्र फार

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना >>> सिंपल आणि खरे ! वेलसेड !!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 08/16/2013 - 10:30

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

माझा एक डोक्टर मित्र फार

माझा एक डोक्टर मित्र फार वर्षापूर्वी मला म्हणाला होता की ज्याला मानसिक विकृति म्हणतात अशी प्रत्येक गोष्ट सर्वांमधे असते. तिचे प्रमाण अति झाले की त्याला आपण " आजार" म्हणून ओळखतो. मिपावर धाग्रे काढून " शहाणे करोन सोडावे सकल जन" चा उद्देश कितीही चांगला असला तरीही मी जर रोज एक नवा धागा काढीत बसलो तर इथले बहुतेक सर्वजण म्हणतील " या चौकटाला येरवड्याला न्या. आत्मस्तुती वा आत्मदोषारोप दोन्ही चा अतिरेक आपले हसे करतो. अशा वेळी एखाद्याला भिडणे याचीही मर्यादा समजून घेतली पाहिजे. शेवटी मी सूर्याला शीतल ठरवायचा कितीही अट्टाहास केला तरी तो काय मला चट्का दिल्याशिवाय रहाणार आहे का? तात्पर्य मानवी मूल्ये , ईझमस याना निसर्गात काहीच अर्थ नाही. त्याचा नियम एकच आहे समतोल पाळा. म्हणून तर त्याने ऋतू निर्माण केले आहेत ना >>> सिंपल आणि खरे ! वेलसेड !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 03/09/2016 - 10:11

In reply to अति नको by चौकटराजा

Permalink

अगदी सहमत आहे. फक्त अति

अगदी सहमत आहे. फक्त अति म्हणजे नेमेके किती? हा प्रश्न सापेक्श आहे. ते केवळ तारतम्यानेच ठरवावे लागते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com