लादेन ध्यानप्रकार
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे.
सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे, विचार केला आहे ते निखालस असत्य आहे हे तुमच्या मठ्ठ डोक्यात आधी भरवून घ्या. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे ते स्मृतीमध्ये जातं. आणि तुमचं मन तुमच्या या स्मृती वापरून तुम्हाला भलतेसलते संदेश देतं. पण तरीही कृपया आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन या लेखावर प्रतिसाद लिहून मात्र नक्की करा. कारण तुम्ही काहीही लिहिलं तरी त्यातून तुमचं अडाणीपण, अभ्यासाचा अभाव, बुद्धीचा कोतेपणा, खालची वैचारिक पातळी याच गोष्टी दिसत रहाणार हे उघड आहे. तेव्हा मला त्या दाखवून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवू नका. कारण हा आनंद हा सच्चिदानंद आहे, ब्रह्मानंद आहे. या आनंदाची प्राप्ती करण्यासाठीच हा सृष्टीचा पसारा निर्माण झालेला आहे. पण दुर्दैवाने हे कोणालाच कळत नाही. दुर्दैव म्हणजे, ज्यांना कळत नाही त्यांचं दुर्दैव. माझं सुदैवच, कारण मला पुन्हा पुन्हा 'तुम्हाला हे कळलेलं नाही' असं सांगण्याची संधी मिळते. आणि माझ्या ब्रह्मानंदाच्या अकाउंटमधली ब्यालन्स वाढत वाढत जाते.
हा ब्रह्मानंद वाढवण्यासाठी मी एक सोप्या प्रकारचं ध्यान करतो. त्याचं नाव आहे लादेन ध्यानप्रकार. हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे. पौर्वात्य म्हणजे पुरातन असं आपण मानतो. पण नव्या संशोधनानुसार सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली. त्यामुळे तो मध्यपूर्वेतला भाग सगळ्यात पुरातन आहे. लादेन ध्यानप्रकारही तिथेच निर्माण झाला. या संस्कृतीची जाण नसलेल्या पाश्चिमात्यांनी त्याला अतिरेक, दहशतवाद वगैरे म्हटलं. पण यावरूनच त्यांच्या ज्ञानाची पातळी दिसून येते. अभ्यास करून ती वाढवायला त्यांना शतकंही पुरणार नाहीत हे उघडच आहे.
हे तंत्र साध्य करणारा मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. ही साधना करायला सुरूवात केल्यावर सर्वप्रथम दृष्य परिणाम म्हणजे त्वचेची जाडी वाढायला लागते. जसजशी ती साधना अधिकाधिक करायला लागू तसतशी ती त्वचा अधिकाधिक जाड होते. नुसती ती जाडच होते असं नाही, तर तिला नखासारखं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे कितीही आघात केला तरी जखम होत नाही, आगीने चटका बसत नाही. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' अशा स्वरूपाचा हा आत्माच नखरूपी त्वचेत रूपांतरित होतो. मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे. त्यामुळे वाग्बाण तर काय, खरे बाणही लागत नाहीत. काही साधकांच त्वचा जाड होण्याबरोबर तेलकटही होते. त्यामुळे कोणी त्यांना पकडायला गेलं तर हातातून पटकन् निसटून जाता येतं. आणि पकडायला जाणारे तेल लागलेले हात चोळत बसतात. मी अर्थातच या स्थितींच्या बराच पुढे गेलेलो आहे. आणि पुढच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. या पुढची पातळी म्हणजे त्वचा जाड आणि तेलकटच नव्हे तर मेंदूभोवती एक अभेद्य कवच तयार होतं. हाडं अश्मीभूत होण्याच्या प्रक्रियेला ऑस्सिफिकेशन असं म्हणतात. ही प्रक्रिया सजीवांमध्ये होताना दिसत नाही, पण लादेन ध्यानप्रकार करणारांना मात्र ही प्रक्रिया स्वतःमध्ये घडवून आणता येते. यामुळे इतरांचे विचार डोक्यावर आपटून दाण्णकन खाली पडतात. अशा कडेकोट बंदोबस्तामुळे साधकाला ध्यानपद्धती पुढे चालू ठेवणं सोपं जातं.
आता मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो. इतर ध्यानपद्धतींमध्ये अंतर्मुख होणं, स्वतःच्या विचारांच्या अधीन न होता सहज भरकटू देणं वगैरे काहीतरी भंपक गोष्टी असतात. आत्मोन्नतीसाठी आत्म्याचं निरीक्षण, मनाच्या अवस्थांचं वेगवेगळ्या पद्धतींनी नियंत्रण वगैरे निरर्थक गोष्टी असतात. या सगळ्यांचा तोटा असा की हे सर्व वैयक्तिक असतं. आपल्यापुरतं असतं. हा शुद्ध वेडेपणा आहे. असं करणारांना अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन. लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो. या ध्यानप्रकारात भिंतीकडे तोंड करून बसायचं नसतं, तर मोठ्ठ्या जनसमूहाला हातात मायक्रोफोन घेऊन 'हे बघा हे ध्यान करणं म्हणजे हे असं असतं' असं सांगायचं असतं. मग कोणी जर काही प्रश्न विचारले तर त्याला 'तुझ्यासारखा महामूर्ख आत्तापर्यंत पाहिला नाही' असं त्या मायक्रोफोनवरूनच ओरडून सांगायचं. अक्कल काढणे, वैयक्तिक बोलणे अशा जितक्या अधिक गोष्टी करता येतील तितकं ते ध्यान यशस्वी होतं. जितकी जास्त चर्चा 'तू अज्ञानी... नाही नाही तूच अज्ञानी.... तू माझ्या दुप्पट अज्ञानी..... तूच तूच तूच तूच शंभरवेळा अज्ञानी' या स्वरूपाची चालेल तितकं ते ध्यान यशस्वी झालं असं समजावं.
हे प्रकार खुलवण्यासाठी मुद्दामूनच काही विसंगतीपूर्ण विधानं करणं हे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण विडंबनं करायची, आणि इतरांनी आपल्याला चेष्टेने काही बोललं तर त्यांना 'तुम्ही विडंबनं करता, चेष्टा करता म्हणजे तुमची पातळी हीन आहे हे सिद्ध होतं' असं म्हणायचं. किंवा कधी मनाच्या दोन विंग्ज आहेत म्हणायचं कधी तीन विभाग म्हणायचं. खरं तर काही सुसंबद्ध बोलायचंच नाही. म्हणजे लोकांना चेव येतो आणि आपण कचाट्यात सापडू असं त्यांना वाटतं. ते जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या तैलत्वचेच्या सहाय्याने सुळ्ळकन् सटकून निघून जायचं.
असो. ही केवळ सुरूवात आहे. मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे. तुम्ही हा ध्यानप्रकार करून बघा आणि परिणाम काय होतो ते तपासून बघा. त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपली
आपली
मोजमापाचे परिमाण
१. आपण करत असलेला लादेन
त्वचेची जाडी कमाल
हं अं अं
म्या फार्फार त्रासात होते.
हा हा हा हा
इतरांप्रमाणे तुम्ही मनाची
गुर्जी, मधल्या कुठल्यातरी
त्वचेची जाडी कमाल
हं..वाटलंच...
ही खाजकुयली जितकी फोफावेल तितके तण कमी होईल
लीमाउजेट
फलप्राप्ती का नाय लिव्ली?
गुर्जी...
अर्थातच. लादेन ध्यानपद्धतीचं
ही बिन-लादेन पद्धत तर अजूनच
अत्यंत अभ्यासू लेख
स्फोटक धागा
आता मी या ध्यानपद्धतीविषयी