पाऊस एक चिंतन
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही. बघा तुम्हाला काय सांगतायत ते.पाऊस - १ पाऊस कधी असाही पाऊस कधी तसाही ----- कधी गंगामाईच्या आरतीसाठी गंगामाईवरच सोडलेल्या दिव्यांसारखा ॠषीतुल्य पाऊस ----- कधी थेम्सच्या कोण्या एका निर्जन तिरावरील गिरीजाघराच्या घंटेसारखा धिरगंभीर पाऊस ----- कधी भिमेवर घुमणार्या विठूनामाच्या गजरासारखा अभंग पाऊस ----- कधी सकाळच्या प्रसन्नतेलाही उदासीची झालर देणार्या भव्य आणि वृद्ध मॅपलसारखा एकटा पाऊस ----- कधी सनातन वडापारंब्यांच्या जाळीतील इवल्याश्या गणपती मंदिरासारखा रहस्यमयी पाऊस ----- कधी सागरी वादळाची निर्लज्ज साथ देणारा निर्दयी पाऊस ----- कधी पहाटेच्या प्राजक्तसड्यावर नाजुक मोत्यांची लड सजवणारा रसिक पाऊस ----- कधी आईच्या हातच्या लोण्याच्या गोळ्यासारखा नवनित पाऊस ----- कधी सखीच्या गजर्यातल्या मोगर्यांच्या कळ्यांसारखा लाजाळू पाऊस ----- कधी लेकीच्या डोळ्यात चमकणार्या आनंदी तार्यासारखा विजेरी पाऊस ----- कधी बाबांच्या अभिमानाने भरलेल्या छातीतील श्वासासारखा घनव्याकुळ पाऊस ----- कधी मनाच्या खोल गाभार्यात घुमणार्या सुन्न शांततेसारखा घरघरणारा पाऊस ----- कधी कभिन्न ढगांमागून लालपिवळ्या सूर्यकिरणांना बालमुठीत पकडणारा पिसा पाऊस ----- तर कधी दूर क्षितीजावर पसरलेल्या सांजलालीसारखा कातर पाऊस ------ पाऊस कधी असाही पाऊस कधी तसाही **************************** पाऊस - २ पाऊस कधी तुझाही पाऊस कधी माझाही ----- कधी तुझ्या मेहंदीभरल्या हातातील किणकिणणार्या पाटल्यांसारखा बावनकशी पाऊस ----- कधी तुझ्या केसात अडकलेल्या चमचमणार्या चांदण्यासारखा लकाकणारा पाऊस ----- कधी तुझ्या अथांग डोळ्यांमधे उडणार्या पक्षांच्या थव्यांसारखा बेभान पाऊस ----- कधी माझ्या ओठी खुलणार्या तुझ्या हास्यासारखा खळखळणारा पाऊस ------ कधी तुझा श्वासगंध माझ्या उरी रुजवणारा हिरवा हिरवा कच्चा पाऊस ----- कधी तुझ्या सचैल भिजलेल्या झळाळकांतीसम तुळसमंजीरी पाऊस ----- कधी माझ्यातला तुझ्या अन् तुझ्यातल्या माझ्या एकसंध धाग्यासारखा अतूट पाऊस ------- कधी माझ्या धमन्यांमधून वाहणार्या तुझ्या रसिक प्रेमासारखा रक्तवर्णी पाऊस ------ पाऊस कधी तुझाही पाऊस कधी माझाही **************************** पाऊस - ३ पाऊस कधी असाही पाऊस कधी तसाही ----- पाऊस कधी कळ पाऊस कधी बळ पाऊस कधी मन पाऊस कधी बन पाऊस कधी रण पाऊस कधी क्षण पाऊस कधी साजण पाऊस कधी पैंजण ---- पाऊस कधी विरह ---- पाऊस कधी झरणं पाऊस कधी सरणं पाऊस कधी विज पाऊस कधी निज पाऊस कधी भिजणं पाऊस कधी थिजणं पाऊस कधी मोहळ पाऊस कधी सढळ पाऊस कधी भान पाऊस कधी पान पाऊस कधी भेट पाऊस कधी पेट ----- पाऊस कधी तू पाऊस कधी मी ----- पाऊस कधी असाही पाऊस कधी तसाही |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१३/०६/२०१३)
अप्रतिम.
पावसाच्या उपमांचा पाऊस आवडला.
वाह
तिन्ही
असेच म्हणतो....पहिला पाऊसच
सुरेख !
चीं.................ब!
खुपच छान..!
अप्रतिम.
__/\__
तिघीजणी
सुरेख !
मिका तू इतके सुंदर लिहले आहेस
हो
मस्तच रे!
जेंव्हा शब्द सपडत नाहीत
पावसाचा मस्त पाउस
परत परत वाचतेय....
सुंदर
एकदम खूप अंगावर आल्यागत झाला
मिका रे एका पावसासाठि किती
+111111
क्ला स....!!
छान....!!
कधी ...
चिम्ब भिजलो ,अति अप्रतिम
सुंदर..
मस्त अप्रतिम ….छान !!
पाऊस एक चिंतन
जबरदस्त
खुप छान. पहिली कविता तर फारच
क्या बात है ! सुरेख !