Skip to main content

दुनियादारी

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 20/07/2013 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं. वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच. पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल. मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे. मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे. अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं. संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.) पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या! एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33300
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

सिनेमा पाहण्याचं दुर्भाग्य अजुन वाट्याला आलेलं नाहीये, पण शिरिन आणि साईनाथचं लग्न, एम.के.ला उगं यक्ष्ट्राचा रोल असल्यासारखं कचर्‍यात काढणं आणि श्रेयसचं शिरिनशी लग्न होणं, पुढे श्रेयस खपणं ह्या एव्हढं भांडवल संपुर्ण टीमची आयमाय काढायला पुरेसं आहे. सध्या घाईत आहे, सविस्तर श्राध्द सवडीनं घालायची इच्छा आहेच. अगदी दर्भापासून दहाव्याच्या कावळ्यापर्यंतची सगळी सोय आम्हीच करु, पण एक तेव्हढं मर्तिक मात्र निभवलंच पाहिजे अशी मनापासून तळमळ आहे. अग्गदी...कालच हेमांगीच्या चेपूच्या भिंताडावर लिहिलं की दुनियादारीचं मातेरं करु नये इतकीच काळजी वाटते आणि आज हे दिव्य प्रताप कळाले. सु.शिं.च्या ताजमहालाला आपल्या पदरच्या फुटक्या विटा जोडण्यामागं चिन्मयबुवा मांडलेकरांचा नक्की काय हेतू होता तो एकदा कळालं म्हणजे आम्ही सुखानं प्राण सोडू. वर आणि डायरेक्शनचे भीषण प्रकार, सोबतीला वेशभूषेची लक्तरं....हरे राऽम!!! बरं झालं आमचा सु.शि. जिवंत नाही ही दुनियादारीची धिंड काढलेली पहायला. :(

In reply to by धमाल मुलगा

नाही .. चित्रपट पाहिल्यावर जाणवेल तुम्हाला.. मांडलेकरांनी स्वतःच्या फुटक्या विटांचंच काहितरी बांधलंय, आणी त्यावर फक्त "ताजमहाल" अशी पाटी लावली आहे. ताज महाल चहाचा आग्र्याच्या ताज महालाशी जेवढा संबंध आहे, तेवढाच मांडलेकरांच्या दुनियादारीचा सु.शिं च्या दुनियादारीशी आहे.

बाकी, ते म्हैसचं ट्रेलर बघून केव्हाच डोक्यात तिडीक गेलीय.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत.
यासाठी +१

सुशी असते तर त्यांना खरंच `दुनियादारी' आठवली असती. बाय द वे जितेंद्र जोशीचा विग नाहीये त्यान वाढवलेले केस आहेत ते :)

लेख वाचून खूप मानसिक समाधान मिळाले, कारण पुण्यात असतो तर हा सिनेमा पहिल्या शो ला बाल्कनी मध्ये बसून पहिला असता. नंतर आलेला मनस्ताप मैफिल (कलिंगा हॉटेल च्या खाली)मध्ये ३-४ तास बुडवून पण पुढचा आठवडा खराब गेला असता. नशिबाने आत्ता ती वेळ आली नाही आणि मनाला (ओंगळ)"दुनियादारी" बघायची रुखरुख पण राहिली नाही. धन्यवाद् !

दुनियादारी ची college मध्ये असताना अक्षरशः पारायणं केली होती . इतका जिव्हाळ्याचा विषय आहे माझा ती कादंबरी की पुढच्या महिन्यातल्या India trip मध्ये "must do " च्या यादी मध्ये हा चित्रपट ठेवला होता. आता नाही जाणार . ती कादंबरी "classics " मध्ये मोडते. मला फार च मनस्ताप झाला असता सिनेमा बघून . परीक्षणाबद्दल धन्यवाद. मराठी मालिका आली होती खूप वर्षांपूर्वी याच पुस्तकावर. मूळ कथेशी बरीच प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे "casting " योग्य होतं . शर्वरी जमेनीस , आशुतोष कुलकर्णी वगैरे सगळे त्या वेळचे नवीन पण चांगले कलाकार होते. ती सुद्धा मधेच बंद पडली मला वाटतं . या पुस्तकावर चांगली कलाकृती बनवणं कदाचीत खूप अवघड काम असेल.

In reply to by स्रुजा

सुशि स्वतः नाराज होते मालिकेवर. जे काही कथेचं कडबोळं केलं होतं त्यावरुन. शिवाय आमचा एक मित्र त्या मालिकेत काम करायचा, तो दरवेळी भेटला की "दुनियादारीची काय वाट लावतोय रे आम्ही..." असं म्हणून आईबहिणीवरुन कचकून शिव्या घालायचा. पण एकुण पाहता, ती मालिका परवडली असं म्हणायची वेळ येते की काय असा प्रश्न पडलाय मला.

((चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे...) चि.मा. ने 'तू तिथे मी' सिरीयलची माती केलीये तिथे चित्रपटाचं काय?

In reply to by स्पा

"मूळ 'दुनियादारी' पडद्यावर आणताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं अपरिहार्य बनतं. कादंबरी वाचलेल्यांना कदाचित हे स्वातंत्र्य पटणार नाही. परंतु, हे स्वातंत्र्य घेताना पटकथेला हिसके बसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा एकसंध बनला आहे." असंही लिहिलंय म टा मध्ये. हिसके बसणार नाहीत? उद्या रामायणावर चित्रपत बनवा. त्यात दाखवा, भीम रावणाला सामिल होऊन रामाशी युध्द करतो असं. आणी म्हणा परत अशी लिबर्टी घ्यावीच लागते, म्हणून.

In reply to by श्रीरंग

असंही लिहिलंय म टा मध्ये. हिसके बसणार नाहीत? उद्या रामायणावर चित्रपत बनवा. त्यात दाखवा, भीम रावणाला सामिल होऊन रामाशी युध्द करतो असं. आणी म्हणा परत अशी लिबर्टी घ्यावीच लागते, म्हणून.
आणि महाभारतात दुर्योधनाबरोबर राम असतो व राम विरुद्ध अर्जुन असे युद्ध रंगते इ.इ.इ.

वाटते की ह्या पोदल्यांनी जरातरी वजन कमी करायला हवे होते. ते तुकाराम महाराज साईनाथ म्हणुन कितपत शोभतील ? कोणी काटकुळा मिळाला नाय काय ?

ह्या पिक्चर च ट्रेलर पाहून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मराठी तरुण कलाकारांच स्वताहाच्या शरिराकाडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. नसीर च्या एका मुलाखतीत तो म्हाणाला होता की शरीर हे अभिनेत्याच आयुध असते. पण स्वप्निल जोशी , जितेंद्रा जोशी साारखे पोटेन्षियल असणारे कलाकार याकडे जे दुर्लक्ष करतात ते बघून वाईट वाटत. जुन्या सिनेमात पण पोट हलवत नाचणारे लक्ष्या आणि अशोक सराफ झरकन आठवून गेले. बाकी अभिनेत्यांबद्दल पण (अतुल कुलकर्णी सारखे काही अपवाद वगळता) हीच बोंबाबोंब दिसते. पिक्चर च ट्रेलर मध्ये तरी तेच जुने अभिनेते कॉलेज कुमारांच्या भूमिकेत पाहून चित्रपट 'थकेला' असणार असे वाटत होते. हा चित्रपट बघितल्या जाणार नवताच.

In reply to by पिंपातला उंदीर

असं नाय हां... http://www.youtube.com/watch?v=M2h0PTS2WCg यातला ड्यान्स बघा! विशेष म्हणजे जमिनीवर हात ठेवून गोल गोल फिरण्याची स्टेप. पोटबीट काही असलं तरी हा ड्यान्स महान आहे!

तुमच परीक्षण वाचून सुद्धा हि चित्रपट बघायची रिस्क घेणारे.. बघुया..

यापुढे 'चिन्मय मांडलेकर म्हणजे X ' हे समीकरण पक्कं केल्याबद्दल टीम दुनियादारीचे मनःपूर्वक आभार! मूळ कादंबरीतच एवढं नाट्य असताना हे असले सगळे टुकार प्रकार करायची अवदसा का आठवली असावी यांना? उदाहरणार्थ - श्रेयस.. दिग्याला शहाणं वागायला सांगणारा यश स्वतः मात्र लग्नमंडपात धिंगाणा घालतो? मिनू.. दारू पिऊन पोरांच्या हाॅस्टेलवर?? साई.. शिरिनचा भावी नवरा??? या साईची नि दिग्याची खुन्नस का, हे तर दाखवायलाच विसरलेत लेखक महोदय. त्याहून कहर - एम के.. चक्क आत्महत्या?? हा तर घोर गुन्हा आहे. प्रेमात हरल्यानंतर आयुष्यभर स्वतःचं अोळख मिटवून तरीही स्वतःला जगत राहण्याची शिक्षा देणारा एमके.. असा आत्महत्या करेल? ट्रेलरमध्ये जे पात्र सर्वात अपेक्षाभंग करत होतं ते - दिग्या.. मात्र फर्मास जमला आहे. शरीरयष्टीमधली उणीव अंकुश चौधरीने अभिनयातून उत्तम भरून काढलीय. म्हाताऱ्या दिग्याचा (होय होय.. म्हातारा दिग्या!!) सीनही त्याने क्लास केलाय. हा सिनेमा पाहिल्याचे प्रायश्चित्त म्हणून आता पुन्हा एकशेआठ वेळा दुनियादारी वाचण्याचा संकल्प सोडत आहे!

In reply to by इनिगोय

इनि, मला दे नं ते पुस्तक. तसंही पुस्तकावरुन सिनेमे काढले की वाटच लावतात! शाळेचं तेच केलं. Vinci code ची पण वाट लावलेली. अजूनही असतील.

In reply to by यशोधरा

तसंही पुस्तकावरुन सिनेमे काढले की वाटच लावतात!
असं कै नै हां!! लॉर्ड ऑफ द रिंग्ज व हरी पुत्तर हे सणसणीत अपवाद आहेत त्याला. बॉर्न सेरीज पण तशीच!

In reply to by बॅटमॅन

अजुन या यादी मधले अप्रितम चित्रपट म्हणजे : फोरेस्ट गंप, द हेल्प , इन टू द वाइल्ड, द नोटबुक इ. खूप चांगले चित्रपट निर्माण करता येतात, फक्त तशी इच्छा पाहिजे.

In reply to by जॅक डनियल्स

दिलेल्या यादीतले पिच्चर बुकांवरून घेतले आहेत हे माहिती नव्हतं, रोचक आहे.
खूप चांगले चित्रपट निर्माण करता येतात, फक्त तशी इच्छा पाहिजे.
पूर्ण सहमत! इच्छा अन इच्छाशक्ती दोन्ही असल्यास माष्टरपीसेस बनायला वट्ट हर्कत नस्ते. "अ ब्यूटिफुल माईंड" हे अजून एक उदाहरण त्यावरून आठवले.

In reply to by यशोधरा

सिनेमातली फक्त गाणी छान आहेत. आणि स्मिता पाटील छान आहे. बाकी बोअर झालाय सिनेमा. ते पुस्तक वाचतानाजितके स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे रहाते तित का इफेक्ट सिनेमातून येत नाही. ३ दिवसापूर्वीच पुस्तक वाचलंय, त्यामुळे त्याचा इफेक्ट ताजा आहे. :)

In reply to by कवितानागेश

हो लिगोंबावरच्या महादेवाचे वर्णन पुस्तकात बर्‍याच वेळा येतं पण ते वाचताना प्रत्येकवेळी वेगळं वाटतं. पुस्तक सर्वोत्तम आहे वादच नाही. पण मला चित्रपटही आवडला.

In reply to by बॅटमॅन

हरी पुत्तर हा अपवाद नाही हा... जे काही रोलिंग बाईंनी लिहिलय ते नाय दाखवायला जमल. म्हटल तर पहिले दोन भाग जरा बरे होते.. बाकि ९०% पिक्चर बकवासच पुस्तकावरुन घेतलेले. खाली विजुभौनी लिहिलय ते १००% बराबर हाय

पुस्तकापेक्षा उजवा चित्रपट "थ्री इडीयट्स" गाईड ( हिन्दी) मुळात पुस्तकापेक्षा उजवा डावा असा शब्द प्रयोग चुकीचा आहे. लेखक जे लिहेतो अन वाचक ते वाचताना स्वतःचे इमॅजिनेशन करून मनात रंगवत असतो. कॅमेरा या माध्यमाला मर्यादा आहेत. उदा एखाद्या मोठ्या झुम्बराचे / महालाचे वर्णन लेखक तीन चार किंव अधीक पाने रम्गवू शकतो. कॅमेरा बिचारा तेच झुंबर्/महल तीन सेकंदात दाखवून मोकळा होतो. लेखकाने जर लिहीले की दोन खट्याळ मुले तेथे आली. हे एक वाक्य मात्र कॅमेराला दाखवायला निदान दोन मिनीटे लागता. ( खट्याळ मुलांचा खट्याळपना एस्टॅब्लीश करावा लागतो.) एख्काद्या स्त्रीचे सौदर्य दाखवताना लेखक कवी तीच्या डोळ्यांच्याची तुलना नक्षत्रांशी करतो. कॅमेरा बिचारा फक्त डोळे दाखवु शकतो. वाचकाने मनात रेखाटलेल्या चित्राना कॅमेरा जसेच्यातसे रेखाटू शकत नाही. किंवा तो अनुभव दर्शकाला देवू शकत नाही. अर्थात एखादी सुकुमार कमल नयना सुवर्णकांतीची वेणीची नागीण गजगामिनी असे वर्णन केलेली स्त्री दाखवताना कॅमेरामन ने अलका कुबल/सवीता प्रभुणे/प्रिया अरूण दाखवली तर दर्शक तेथे आपल्या इंमॅजिनेशन ने मधुबाला/माधुरी दिक्षीत्/वर्षा उसगावकर कल्पु शकत नाही

मी हा चित्रपट दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी? कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्‍याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच. शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना? उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?

मी हा चित्रपट आज दुपारी पाहून आलो. पाहण्याच्या आधी तुमचे हे परीक्षण अर्थातच वाचले नव्हते. आणि मला चित्रपट पाहील्याचा पश्चातापही होत नाही. उलट छोटया भावाला आवर्जून चित्रपट पाहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये असताना जेव्हा "फिक्शन" खात असे, तेव्हापासून सुशिंची दुनियादारी मनात घर करुन राहीली आहे. तुम्ही म्हणताय तशी चिन्मय मांडलेकरांनी सुशिंच्या या अजरामर कलाकृतीला ठीगळं लावली आहेत यात शंकाच नाही. परंतू आपण वाचकांनी चित्रपट पाहायला जाताना तो चित्रपट मुळ कादंबरीशी तंतोतंत जुळणारा असेल अशी अपेक्षा का ठेवावी? कादंबरी हे वेगळं माध्यम आहे आणि चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. कलाकृती एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात रुपांतरीत करताना मुळ कलाकृतीतील काही गोष्टींना फाटा मिळणार, काही गोष्टी नव्याने टाकल्या जाणार हे अध्याहृत आहे. शिवाय हे रुपांतर करताना रुपांतर करणार्‍याच्या क्षमतेनुसार गुणवत्तेतही फरक पडणारच. शिवाय आर्थिक गणितं असतात. चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या पुस्तकाचे भक्तगण येत नसतात तर पुस्तक वाचनाचा गंधही नसलेले चित्रपट पाहत असतात. त्यांनाही चित्रपटामध्ये काहीतरी मिळायला हवं ना? उणिवा असल्या तरीही आपली आवडती कादंबरी पडदयावर जिवंत होतेय याने आनंदी व्हायचे सोडून पुस्तकात असं आहे आणि चित्रपटात तसं आहे असा गळा काढण्याला काय अर्थ आहे?

In reply to by धन्या

अहो, मूळ कथेशी थोडीफार फारकत समजू शकतो. एखादं नाव बदलणे, एखादे पात्र घुसवणे, कादंबरीतल्या काही प्रसंगांना छाटणे, इत्यादि. परंतु, आता हेच पहा.. पुस्तकातला श्रेयस, शिरीनचे लग्न ठरल्याचे समजल्यावर, तिच्या होणार्या नवर्यावर अन्याय नको म्हणून स्वतः दूर होतो.. चित्रपटात मात्र लग्नात जाऊन धुडगूस घालून थेत तिला पळवूनच आणतो. चित्रपटाचा उत्तरार्ध तर कादंबरीपेक्षा संपूर्णतः वेगळा आहे. फक्त पात्रांची बावं ती ठेवायची होती, तर उगाच शिरवळकरांच्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचा खोटा दावा का करावा? वाचकांचं प्रचंड प्रेम असलेल्या कादंबरीवर चित्रपट बनवल्याचं सांगून प्रेक्षक खेचायचे, आणी दाखवायचं भलतंच, ही शुध्द फसवणूकच नव्हे काय?

In reply to by श्रीरंग

भलतंच मनाला लावून घेतलंय तुम्ही. चित्रपट पाहून इतका मनस्ताप होत असेल तर चित्रपट पाहण्याचा मुळ उद्देश बाजूला राहतो. :)

In reply to by श्रीरंग

पुस्तकातला श्रेयस, शिरीनचे लग्न ठरल्याचे समजल्यावर, तिच्या होणार्या नवर्यावर अन्याय नको म्हणून स्वतः दूर होतो
-१०० श्रेयस, शिरिनला त्रास होऊ नये म्हणून दूर होतो. आणि शिरिन तिच्या वडीलांसाठी ते लग्न करायला तयार होते. चित्रपट अगदीच टाकाऊ नाहिये. नाहीतर आत्ता खेचत आहे तेवढी पण गर्दी खेचू शकला नसता..

इन फॅक्ट हयात असलेल्या कुठल्यातरी मोठ्या मान्यवर लेखकाच्या बाबतीत चित्रपटकर्त्यांना इतक्या निर्भयतेने असं करता आलं असतं का? चेतन भगतनी श्रेय मिळालं नाही म्हणुन आमीरसारख्याच्या ही नाकी नऊ आणले होते. इथे तर सु.शिं चं नाव वापरून स्वतःला वाट्टेल ती कथा दाखवण्यात येते आहे. शिरवळकरांच्या वतीने भांडायला कोणीही उभे राहणार नाही, असा निर्लज्ज आत्मविश्वास तर यामागे नसावा?

DUNIYADARI..................................KHUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUUP AWADALA................Ekadatari THEATERmadhye jaun pahilach pahije...................Thanks a lot ENTIRE TEAM of DUNIYADARI......................... हे मि फेस बुक आलेलि कोमेन्त्स आहे, आनि दुसरि हि पिच्तुएर बघित्ल्य नन्तर्चि अॅड. मीताली कुलदीप सावळेकरposted toVachoo Aanande Please can anybody tell me where ill get to Read Duniyadari online????????????

धन्यवाद. चला, पैसे वाचले.

पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
क ह र!!!!. मनापासून धन्यवाद गुरूजी, कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी उपकार फिटायचे नाहीत. ह्या सिनेमाची लायकी कळाली. अजून तरी ही ठिगळं थेटरात पैसे घालून पाहिली नाहीत हे माझे परमभाग्य. आता जास्त डोक्याला न लावून घेता पुन्हा एकदा गॉडफादर पाहतो.

'दुनियादारी'वर चित्रपट्/मालिकेच्या संदर्भात सुशिंनी 'दुनियादारी'च्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिलेली काही वाक्ये:
मला वाटतं, दुनियादारी ही फसवी कादंबरी आहे. वाचताना, तिच्यावर उत्कृष्ट काही करता येण्याचा अनेक शक्यता निर्माता- दिग्दर्शकांना भारावू शकतात. तिच्यातले पात्रं व प्रसंगांनी अनेक माणसं झपाटली जातात. हे सगळं ठीक आहे. यात चूक काहीच नाही. एक बारईक्शी चूक दिग्दर्शकाच्या हातून 'आत्मपरिक्षणा'अभावी होत असावी! निर्मितीच्या शक्यतेसाठी कादंबरीनिर्माता/दिग्दर्शकाच्या पसंतीस उतरावी लागते; तसंच, निर्मितीच्या यशासाठी कादंबरीलाही निर्माता/दिग्दर्शक भावणं आवश्यक असतं! याव्यतरीक्त, दुनियादारीच्या निर्मितीतला तिचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल, तर तो म्हणजे या कादंबरीची अफाट लोकप्रियता! कादंबरीबरहुकूम चित्रीकरण करावं, तर दिग्दर्शकाला 'अ‍ॅरेंजर' झाल्यासारखे वाटतं,मुळातं,बरेच दिग्दर्शक अ‍ॅरेंजरच असतात, ते अलाहिदा. )आणि बदल करावेत, तर वाचकांची वाक्यंच्या वाक्यं, प्रसंग-पात्रं तोंडपाठ! त्यांना जरासाही बदल खपत नाही!
'दुनियादारी' ही 'दुनियादारी' आहे. ती स्वयंभूपणे वाचकांवर राज्य करीत आली आहे. मालिका नव्हती, तेव्हाही ती तिच्या-तिच्या स्वयंगतीने विकली जात होती. मालिका चालू असताना,वा, ती संपल्यानंतरही, 'दुनियादारी' विकली जात राहील्च! तिला असल्या कुबड्यांची गरज नाही. फायदा झालाच, तर तो कादंबरीच्या वाचकप्रियतेचा मालिकेला होईल; मालिकेचा कादंबरीला नाही!
तरीही एक स्वतंत्र कलाकृती म्हणुन चित्रपट मला बघायचा आहे.

In reply to by निखिल देशपांडे

तरीही एक स्वतंत्र कलाकृती म्हणुन चित्रपट मला बघायचा आहे.
जरुर बघा. चित्रपट नक्की आवडेल. आपलं होतं काय, एक तर आपण मुळ कलाकृतीने प्रचंड झपाटलेलो असतो किंवा मग आपण मनातल्या मनात त्या मुळ कलाकृतीचे आणि त्या कलाकाराचे "लॉयल" रसिक आहोत हा अहं कुरवाळत असतो. अशा वेळी त्या मुळ कलाकृतीला ठीगळं लावण्याचा प्रकार झाला किंवा मुळ कलाकाराला नावं ठेवली गेली की आपला अहं दुखावतो. आणि मग आपण चवताळून उठतो. अशा वेळी ती मुळ कलाकृतीसुद्धा कल्पनाविलासच आहे हे आपण विसरुन जातो.

In reply to by धन्या

लॉयल असल्याचा अहं?? वाट्टेल ते.. नुसते कादंबरीचे नाव वापरून लोकांची उत्सुकता चाळवायचे, आणी स्वतःला वाटेल तशी कथा वळवायची, या खोटारडेपणाला नावं ठेवण्यात कसला आला आहे अहं?? आणी एवढीच खाज होती मांडलेकर-जाधव मंडळींना तर दुनियादारी नाव तरी का वापरावं? वेगळ्या नावानी काढायचा चित्रपट..

In reply to by श्रीरंग

मालक, मांडलेकरांनी शिरीनचं साईनाथबरोबर लग्न लावण्याचा घाट घालून आणि त्या लग्नात नाटयमयरीत्या श्रेयसला उभा करुन, मारधाड करुन नंतर श्रेयस आणि शिरीनचं लग्न लावून दिलंय. "दुनियादारी"च्या वाचकांच्या दृष्टीने त्यांचा अक्षम्य अपराध आहे हे मलाही मान्य आहे. कारण मी ही "दुनियादारी"च्या भक्तांपैकी एक आहे. ही फसवणूक झाल्याची भावना तुमच्या मनावर स्वार झालीय त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तो तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. परंतू तुम्ही जो स्ट्राँग निगेटीव्ह रीव्ह्यु दिलाय तो प्रमाण मानल्यामुळे इथले बरेच जण एक चांगला मराठी सिनेमा पडद्यावर पाहण्याच्या अनुभवापासून वंचित राहणार आहेत. शेवटी एक लक्षात घ्यायला हवं की हा चित्रपट दुनियादारी या कादंबरीवर "आधारीत" आहे, दुनियादारीचं "लाईन बाय लाईन" रुपांतर नाही. :)

In reply to by धन्या

मी मुळातली कादंबरी वाचलेली नाही. पिच्चर मी अस्सल "चि. मा." असल्याने टी व्ही वर पाहीन कदाचित. पण मी १९७० च्या दशकात स प जवळून पाहिले आहे. मला स प एक सपक कॉलेज वाटत असे. त्यात हे ग्यांग वगैरे प्रकरण असावे असे वाटत नाही. उदय विहार मधे काही " पडीक" पोरं त्या काळात दिसत पण यातील ग्रूपस जर ग्यांग या सदरात मोडणारे असतील तर मूळ कादंबरीच फार काल्पनिक असावी असे वाटते.

फेसबूकवर माझ्या बरेच मित्रांना चित्रपट आवडला असेच अपडेटस आहेत.. आणि ते अपडेट्स प्रामाणिकच असतात, आवडला तर आवडला नाही तर दे दणादण शिव्या.. जवळपास सर्वच जणांनी ते "टिकटिक" गाणे देखील उचलून धरलेय.. हे सर्व मित्र २२ ते ३० च्या वयोगटातले आणि त्यातील कित्येक असे असावेत की दुनियादारी पुस्तक वाचणे तर दूर असे काही पुस्तकावरून हा सिनेमा आहे हे देखील माहित नसावे.. :)

मुळात कादंबरीच इतकी सशक्त आहे की वाचत असतानाच डोळ्यासमोर ती पात्र अगदी चित्रपटासारखी अवतरतात्,त्यामुळे चित्रपट बघण्यापेक्षा पुन्हा एकदा कपाटातली दुनियादारी काढुन वाचावी हेच उत्तम.

जाधव ने आधीच म्हटले होते हा सिनेमा कादंबरी वर आधारीत नसून प्रेरित आहे , मुळात आजच्या कॉलेज मधील १६ ते २० वर्षांची बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या मुलांना दुनियादारी नावाचे मराठी साहित्यात एक वादळ ७० च्या दशकात येउन गेले ह्याची ह्या सिनेमाच्या निमित्ताने माहिती होईल , कदाचित हि कादंबरी वाचण्याचा ते प्रयत्नही करतील , आज ३० उलटलेले अनेक महाभाग आहेत त्यांना सुशी व दुनियादारी माहिती नाहीत , आजही अनेक विचारजंत सुशी ह्यांच्या कादंबर्‍या वाचतात पण त्यांना दिवाणखान्यात मानाचे स्थान देत नाही , तेथे ठरावीक पुस्तके हटकून आढळतात. ज्यांचे नाणे खणखणीत आहे ते पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यावर आधारित पांचट शिनेमा जर गर्दी खेचू शकतो म्हणजे मूळ कलाकृती काय ताकदीची होती ह्यांची सगळ्यांना कल्पना येते. सुशी ह्यांच्या कादंबऱ्यांतील एखादा उतारा शाळेच्या पाठ्यपुस्तकात आला पाहिजे असे मनापासून वाटते. राहिला प्रश्न म्हातारे अवजड देहयष्टी असलेले नट त्यांना इलाज नाही , आमचा खारघर चा इम्रान हाश्मी संतोष जुवेकर , ह्या शिनेमात हवा होता. असे राहून राहून राहून वाटते हा शिनेमा जाधव ह्यांनी केला असला तरी त्यापुढे रवी हे नाव नसल्याने अभ्यासपूर्ण कलाकृती सादर करण्याची अपेक्षा बाळगले हे अती होते. डेविड चा चष्मे बद्दूर हा पराजाप्यांच्या मूळ सिनेमा एवढा सरस का नाही झाला असा टाहो कोणी फोडला नाही कारण जरी डेविड परांजपे ह्यांचा अनेक क्लासिक सिनेमात त्यांचा सहाय्यक होता. बेडकी ची म्हैस व पालीची मगर होणे शक्य नाही हे माहिती असून सुद्धा ह्या सिनेमाला जातांना त्यांच्या मर्यादा व दिग्दर्शकाची कुवत लक्षात घेऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा अपेक्षा करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे. त्यापेक्षा डे डी ला जाऊन त्यावर काही खरडले असते तर आमच्या सारख्या पैलतीरी लोकांना कोमल सारख्या तस्सम लोकांवर विसंबून राहावे लागले नसते. ताजा कलम ज्यांनी child plays , पहिला आहे त्यांनी झपाटलेला भाग १ व २ वर टीका केली नाही महेश चे शिनेमे जसे असतात तसे ते होते. म्हणूनच ते पहिले गेले म्हणजे सहन केले गेले. ह्याच तत्त्वानुसार ज्यांनी चेकमेट, रिंगा रिंगा पाहून सुद्धा मल्टीप्लेक्सेस मध्ये सिनेमा छोट्या पडद्यावर येण्याची वाट न पाहता मोठ्या पडद्यावर पाहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो पाहून उगाच आता त्याच्यावर चिखलफेक करू नये. एक सिनेमा म्हणूनच तो पाहावा .

ही कादंबरी आमच्याकडे आहे पण १५ पाने वाचल्यानंतरही त्यात विंट्रेष्ट वाटेना! मग नाही वाचली. आता शिनेमा हा नेहमीचा शिनेमा म्हणूनच बघीन. या पुस्तकावर आधारीत म्हणून नाही बघणार.

रच्याकने इतक्या संमिश्र प्रतिक्रिया पाहून दुनियादारी पाहण्याची रिस्क घेतोय. कितीतरी आवडत्या पुस्तकांचे सिनेमे बनवल्यानंतर त्यांची झालेली वाट पाहिली, आणखी एकाने काय फरक पडतो. अवांतरः आपण तर बुवा कोणी मायचा दिग्दर्शक सुशिंच्या चारही मानसपुत्रांना एकत्र एका कथेत गुंफून सिनेमा बनवतोय याचीच वाट पाहतोय्.(होय कि नाय रे धम्या?;))

In reply to by किसन शिंदे

आपण तर बुवा कोणी मायचा दिग्दर्शक सुशिंच्या चारही मानसपुत्रांना एकत्र एका कथेत गुंफून सिनेमा बनवतोय याचीच वाट पाहतोय्.(होय कि नाय रे धम्या?smiley)
नक्की का? की सलोनीला पडद्यावर पाहायची सुप्त ईच्छा या निमित्ताने व्यक्त्त करताय ? ;)

सावध केलेत मानून मनापासून आभार खरे पुस्तक जनी वाचले त्यांना हे बदल खपणार नाहीत, त्या मुले न जाणेच चित्रपट बगायला चागले. उगाच जाऊन चुकल्या सारखे वाटायला नको काही वर्ष पूर्वी मणजे जेवा झी मराठी चा अल्फा मराठी हे नाव होते तेवा "दुनियादारी" हि मालिका लागायची. पण ती मधेच बंद करण्यात आलि. त्या मालीकातले काही पत्रे अजून लक्षात आहे DSP - दिग्या - संजय नार्वेकर, शिरीन पटेल - शर्वरी जेमिनीस , त्यातला दिग्या अजून मनात घर करून आहे. आणि जर सुहास शिरावाकारचा पुस्तक फिल्म न बनवनेच चागले. i.e : येता जाता , बरसात चाद्ण्याची

पत्नीहट्टामुळे चित्रपटाची तिकीटे काढायला काल गेलो होतो पण एका चित्रपटग्रुहात हाऊसफुल आणि दुसर्‍यामध्ये पहिली रांग होती म्हणुन गेलो नाही. आज तुमचे परिक्षण वाचुन देव करतो ते भल्यासाठीच करतो यावर विश्वास बसला. :) आजच जाताना वाचनालयातुन दुनियादारी घेऊन अजुन एक पारायण करतो. बाकी पत्नीहट्ट पुरवण्यासाठी 'काट्कोन त्रिकोण' ची तिकिटे काढली आहेत. कसे आहे हे नाटक एनी आयडीया?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काटकोन त्रिकोण नाटक चांगले आहे. ट्विस्टचा जरा अतिरेक केलाय शेवटीशेवटी, पण ऑन द होल चांगले एंजॉयेबल आहे. डायलॉग्स उत्तम आहेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पण एका चित्रपटग्रुहात हाऊसफुल आणि दुसर्‍यामध्ये पहिली रांग होती म्हणुन गेलो नाही.
यातच आलं नाही का? इन फॅक्ट काल हा चित्रपट पुण्यातल्या बर्‍याच थेटरात हाउसफुल होता. माझा भाऊ दोन तास वणवण करुन दिवसभराचे सारे शो हाऊसफुल आहेत हे ऐकून आला. "पीअर प्रेशर" हा प्रकार इतका इफेक्टिव ठरु शकतो याचं आश्चर्य वाटत आहे. :)