दुनियादारी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं.
वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच.
पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल.
मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे.
अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.)
पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या!
एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रतिक्रिया
ग री ब!
सु.शिं.च्या ताजमहालाला आपल्या पदरच्या फुटक्या विटा??
अरे देवा!!! हाही चित्रपट गोळाबेरीजच्या लायनीतच गेला का?
सुशी असते तर त्यांना खरंच
बापरे!
लेख वाचून खूप मानसिक समाधान
अवांतर....
माफ करा, चुकलो. के.एफ ब्लू ची
जेडी, तुझं बिहेव चुकतंय...
हायला ह्ये जुळतंय पघा आपलं !
मिपाचा "मेहफिल कट्टा" करू
दुनियादारी ची college मध्ये
मालिका...
((चिन्मय मांडलेकर सारख्या
मी उद्याच्या शोची तिकीट
म टा ने भारी परीक्षण लिहिलंय
"मूळ 'दुनियादारी' पडद्यावर
असंही लिहिलंय म टा मध्ये.
मला
मला तर नवे तुकाराम महाराज पण
ह्या पिक्चर च ट्रेलर पाहून
असं नाय हां...
शी बाई!
रिस्क
यापुढे 'चिन्मय मांडलेकर
इनि, मला दे नं ते पुस्तक.
नक्की!!
तसंही पुस्तकावरुन सिनेमे
पुस्तक आधारित चित्रपट.
दिलेल्या यादीतले पिच्चर
गॉडफादर
'जैत रे जैत'बद्दल आपलं काय मत
'जैत रे जैत' सिनेमा छानच आहे.
अगदी
सिनेमातली फक्त गाणी छान आहेत.
+१
हरी पुत्तर हा अपवाद नाही हा..
हरी पुत्तर तीन बघताना मला
पुस्तकापेक्षा उजवा चित्रपट
मी हा चित्रपट दुपारी पाहून
मी हा चित्रपट आज दुपारी
अहो, मूळ कथेशी थोडीफार फारकत
भलतंच मनाला लावून घेतलंय
मनाला का लागलं हे लिहिलं आहेच
-१००
इन फॅक्ट हयात असलेल्या
DUNIYADARI...................
चला,
पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं
धन्स... पैसे वाचले
Pagination