Skip to main content

उंदरांची शर्यत

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 18/07/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे. तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो. एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे. शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार. हे कुठवर चालणार आहे. माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता. माणूस कधी होणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51935
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

दहावीपर्यंत सिबीएस्सीत शिकलो (नवोदय विद्यालय).. ट्युशन नव्हतीच. पण नवोदयची 'सिस्टम' म्हणजे अभ्यासतास, मासिक परीक्षा इत्यादी असल्याने गपगुमान पास झालो. बारावीत 'महा' बोर्डात होतो, ट्युशनपण होती, पण गणितात (ते मॅट्रिक्स, सेक थिटा, काॅस थिटा इ.) रुची नसल्याने नापास झालो. मग बारावी काढल्यावर सेकंड क्लासमधे बी. एस्सी. झालो. मग इचार केला की आतापर्यंत लै कचरा झाला, आता जरा अभ्यास करावा. दोन-तीन वर्षं घासली आणि आता सरकारी नोकर आहे.. आता तुम्हीच ठरवा, रॅट का काय ते.. अगदी आयआयटी, आयआयएम, एमबीबीएस करणारेही कित्येकदा त्यांच्या मनाविरुद्धच धावतात असं वाटतं. नाहीतर सिव्हील सर्विसेस मध्ये अश्या उमेदवारांचा वाढता टक्का दिसला नसता.. माझ्या लेकराला उंदिरशर्यतीत धावायला लावणारच नाही, असं म्हणु शकत नाही. ते भविष्यच ठरवेल. पण अगदी केजीपासुन ट्युशन्स किंवा सातवीपासुन आयआयटी प्रवेशाची तयारी ही सोंगं करणार नाही. स्वत:चंच नालायक उदाहरण समोर असल्याने असेल कदाचित.. ;-) :-D

In reply to by चिगो

याचे कारण एक असे सुद्धा असु शकते कि स्वताहा पालक हे कमी शिकलेले असल्याने तसेच मुलाना ईन्ग्रजी माध्यमात शिकावयास घातल्याने त्याना नाईलाजाने असे करावे लागते.

ना आमच्या वेळी ही उंदीर शर्यत होती ना आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलाला अशा शर्यतीत ढकलले. इथे आखातात CBSC शिवाय पर्याय नाही म्ह्णून दहावी पर्यंत CBSC मध्येच शिक्षण झाले. पुढे पुण्यातही कॉलेज शिक्षण घेताना त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता. माझ्या शिक्षण वयात आमच्या घरात अभ्यास घेणे हा प्रकार तर नव्हताच आणि शिकवणी लावली म्हणजे मुलगा/मुलगी 'ढ' आहे ह्याची जाहिरातच मानली जायची. पदवी नंतर १७ वर्षे नोकरी करून, स्वतःच्या मालकीचे घर झाल्यानंतर, आता हरकत नाही ह्या विचाराने, स्वतःच्या आवडीच्या व्यवसायास (उपहारगृह) सुरुवात केली. आयुष्यात समाधानी आहे. मुलालाही ह्याच व्यवसायात ये असा आग्रह नाही. त्या जे करायचे असेल ते करण्यास जी काही मदत शक्य आहे ती नक्कीच करेन. मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय जरी त्या त्या व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न असला तरी मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

+ १०० मी संपूर्णपणे स्वतःच्या मताने डॉक्टर झालो( आईचे मत विरुद्ध असताना) आणी सैन्यात गेलो. साडे अठरा वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन निवृत्त झालो. चार वर्षे दोन कोर्पोरेट रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून काम केले आणी एके दिवशी राजीनामा देऊन बाहेर पडलो. तीन महिने घरी बसून स्वतंत्र व्यवसायाची तयारी केली.( आमची मद्रासी मोलकरीण बायकोला विचारती झाली कि अण्णा काम का करीत नाही?). याला थोडेसे धाडस आणी स्वतः वर विश्वास पाहिजे आणी घरच्यांचा पूर्ण पाठींबा पाहिजे( सुदैवाने मला तो आई वडिलांकडून आणी नंतर बायको कडून मिळाला) स्वतःचा व्यवसाय गेली साडे तीन वर्षे आरामात करीत आहे. सकाळी साडे आठ ते साडे बारा आणी संध्याकाळी साडे पाच ते साडे आठ.घरापासून दवाखाना १ किमी वर आहे. दुपारी थंड झोपतो. कोणतीही शर्यत न पळता किंवा कोणाचाही जास्त पैसे मिळवतो म्हणून हेवा न करता. हेच उदाहरण माझ्या मुलांच्या डोळ्यासमोर ठेवले आहे त्यांना जे काही करायचे आहे ते करा असे मोकळ्या मनाने सांगितले मी तुम्हाला वयाच्या ३० वर्षे पर्यंत पोसेन असे सांगितले आहे. मुलगी कॉमर्स ला गेली आहे मुलगा इंजिनियर व्हायचे म्हणतो आहे. उत्तम त्यांनी सुद्धा आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगावे. एखादे वर्ष रिकामे फिरण्यात घालवले तरी चालेल. बाकी ईश्वरेच्छा

हे मनोरूग्ण पालक व आपल्या आजच्या जगातील मनोरुग्णावस्थेत गेलेले " महान" शिक्षण तज्ञ पाहिले की जगाच्या इतिहासात आपण १९५३ साली म्हणजे योग्य वेळी जन्माला आलो व अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत या बद्द्ल स्वत: चाच हेवा करावासा वाटतो.

In reply to by चौकटराजा

अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत हा अंदाज कसा काढला बरं? काही फॉर्म्युला असला तर आम्हालाही गणित करुन ठेवता येईल. बाकी रॅट रेस मधे मागेच राहिलो होतो. पण नशिबाने हात दिला त्यामुळे तरंगलो तरी!

In reply to by तिमा

अ‍ॅव्हरेज इंडियन लाईफ एक्स्पेक्टन्सी फॉर मेल्स सुमारे साडे अडुसष्ट वर्षे आहे. त्यांनी स्वतःला दीड वर्षे ग्रेस दिलेली दिसतात ;)

डॉक्टरसाहेब, लेखतील उदाहरणांतून एका महत्वाच्या सामाजिक समस्येवर इथे भाष्य केले आहे. अनेक प्रतिसाद विचारांत पाडणारे आहेत. मी व माझ्या पिढीतील अनेक लोक इतके नाही तर या प्रकारच्या दडपणातून गेले आहेत (खास करून ८वी ते १२वी या काळात). माझे स्वतःचे सांगायचे तर दडपणामूळे १२वीत गाडी घसरली तरी त्यानंतर कुठलेही दडपण न घेता आवडीच्या विषयांमध्ये (संगणकशास्त्र) स्वतःला झोकून दिले व इतर अनेक विषय अभ्यासक्रमात असले तरी (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अकौंटींग, स्टॅटिस्टीक्स इत्यादी) त्यांचा केवळ पास होण्यापूरता अभ्यास केला. या धोरणाचा मला पहिली नोकरीत सहजपणे मिळण्यात व नोकरीतील प्रगती करण्यात चांगलाच लाभ झाला. या समस्येवर व्यवस्थेद्वारा व सामाजिक संकल्पनांतील बदलांद्वारा तोडगा निघेल असे सध्यातरी वाटत नाही. किमान गेल्या काही वर्षांपासून १०वी १२वी ची प्राविण्ययादी बंद झाली आहे हीच काय एक दिलासा देणारी बाब.

विनोबा भावेचे कार्य करणारे एक सदगृहस्थ मला माझ्या कॉलेज जीवनात भेटले त्यांच्याशी बोलताना बेकारी विषयावर मी बोलू लागलो तेंव्हा त्यांनी मला पुढील प्रश्न विचारले तुला कॉलेज मधे जाण्यास कोणी सांगितले ? पदवी प्राप्त झाल्यावर तुला नोकरी देण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे ? वय वर्षे १८ पूर्ण झाली की कायद्याने शहाणे समजले जाते . पण १८ व्या वर्षी हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत . वरील प्रश्न विचारणे शहाणपणाचे ठरते ? परंतु या प्रश्नाकडे संपूर्ण आयुष्यभर दुर्लक्ष करता येते का ? योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले गेले पाहिजेत . त्या प्रश्नाची उत्तरे मिळवली पाहिजेत शिक्षण हे क्षेत्र राजकारणाचे कसे ? काय शिकवायचे , कसे शिकवायचे ,हे ठरवणारी व्यक्ती अक्षरशत्रू असली तरी चालते कारण POLICY ठरवणे हे काम कुणीही करू शकतो आणि POLICY चुकीची असली तर ती व्यक्ती बदलण्याची संधी ५ वर्षाने मिळतेच TWO ON A TOWER ही कादंबरी मला कॉलेजला होती . ती कादंबरी अश्लील आहे असे पुणे महानगरपालिकेच्या सभासदांचे मत होते आणि ती कादंबरी काढून टाकावी असा त्यांचा ठराव पास झाला होता महानगरपालिकेचे हे काम आहे ? लोकशाही म्हणजे दुस -याने काय करावे हे सांगण्याचे स्वातंत्र्य असा आपला समज आहे

इथे उस गावात काही भारतीय लोकांकडुन असे एकले कि जिथे आशियाई वंशाची मुले शाळेत जास्त असतात तिथले स्थानिक लोक आपल्या मुलांच्या शाळा बदलत आहेत कारण आशियाई वंशाची मुले खूप अभ्यास करत असल्याने त्यांच्या मुलांना या रॅटरेसमध्ये धावावे लागु नये म्हणून :-) हे कितपत खरे आहे महित नाही.

मुद्दॅ वाचले, काही पटले. इतक्या लहान वयात मुलाला ट्युशनला घालतायत म्हणजे वर ऋषिकेशने म्हटलय तसं त्यांचा वेळ देता येत नाही मुलाला हा न्युनगंड असण्याची शक्यता जास्त. होमलोनचे हप्ते भरताना येणार्‍या फेसामुळे दोघांना नोकरी करणे तर आवश्यकच ना. पण दुसरा मुद्दा 'शाळा बुडेल' हा मुद्दा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असावा. साधारणपणे ३ ते ५ वर्षांची मुलं (ज्यांचा स्वभाव ठरण्याचा हा कालावधी) बरीच हुषार असतात. त्यांच्याकडे निगोशिएशन्स स्कील्स आलेली असतात आणि पूर्णवेळ घरात राहून ती अनंत उद्योग करू शकतात. त्यांना सांभाळणे ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे, त्यापेक्षा मुलाचे 'रुटीन' लागलेले असणे केव्हाही चांगले. तो शाळेत जाईल तेव्हा आई इतर कामे पटापट उरकू शकेल, त्यालाही चार मुलांमध्ये वावरता येईल, वेगळे वातावरण मिळेल. हेच जर तो सलग घरी राहिला, तर शाळेची सवय सुटण्याची शक्यता जास्त. ज्यांच्या घरात आजी-आजोबा नाहीत तेथे हा प्रश्न अजून भेडसावतो. आता रॅट रेस बद्दल. ती होती, आहे आणि राहाणारच. निव्वळ रॅट रेस मध्ये धावणार नाही ह्या हट्टापायी तसेच थोड्या आळशीपणे किंवा खोड्या आत्मविश्वासापायी हुशारी फुकट घालवून नैराश्य आलेल्यांची पण कितीतरी उदाहरणे समोर बघतो, मग त्यावेळी प्रवाहपतितांनी प्रवाहाच्या प्रगतीनुसार प्रगती केल्याने त्यांचं कौतुकच वाटत. तस्मात, प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं. शेवटी 'लोकल मॅक्झिमा' च्या बाहेरही जग असतच, तुमच्या कक्षा रुंदवल्या की ते दिसतच! - उपास

In reply to by उपास

प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं. प्रचंड सहमत!!! हे वाक्य फक्त मुलांनाच नाही तर असंख्य कॉर्पोरेट जनांनाही लागू पडेल बहुदा!

त्या वरून आठवले, लहान असताना अभ्यास नाही केला की आई म्हणायची "क्लास ला पाठवीन". मी करायचो मग अभ्यास. शाळेचा प्रकार परत कोण क्लास मधे शिकणार?

बीटेक आणि एमटेक करून साधे एक वाक्य नीट इंग्लिश मध्ये बोलू न शकणार्‍या किंवा चेन्नई ला जायला तयार नसलेल्या किंवा गोलमाल उत्तरे देणार्‍या किंवा उगीचच नोकर्‍या बदलणार्‍या किंवा अवास्तव अपेक्शा ठेवणार्‍या मठ्ठ गाढवांना मी आमच्या कंपनीच्या इंटर्व्ह्यु मध्ये पास करत नाही. बाकीच्यांच्या साठी आजही भरपूर नोकर्‍या आहेत.

खरतर साडेपाच वर्षापर्यंत शाळेत घालायचे नाही असा निय्म करायला हवा. मी इथली मुले पहाते. त्यांना प्रेप ( पहिलीच्या आधी १ वर्ष प्रेप मध्ये जाव लागत) पर्यंत अगदी ए बी सी डी सुद्धा शिकवत नाहीत. का? तर नंतर त्यांना बोअर होइल म्हणुन. पण त्या वयातल्या मुलांला उच्चारावरुन स्पेलींग लिहाय्ची मुभा असते. सो नो रट रट. प्रेप ची मुले एफ आर डी हे फ्रेंड म्हणुन लिहीतात अन टीचर ते वाचते. मी विचारल तू पहिला स्पेलिंग का नाही करुन घेत तर म्हणे व्यक्त होण महत्वाच, इंग्लेश येणे नव्हे!!

In reply to by सहज

खरेच बिचारी मानसी. इतकी झोप येत असताना त्या बिचारीला शाळेत पाठवलेच कशाला. बर पाठवले तर पाठवले त्या शिक्षिकेने तरी तिला उठवण्यासाठी इतके कष्ट घ्यावेत कशाला झोपु द्या ना त्या बिचारीला.

In reply to by सहज

पिल्लु आजारी आहे,खोकतय्,साला सर्दी खोकल्याच्या औषधाने थोडीशी गुंगी येते. त्यामुळे झोपतय बाकी काही नाही. आपला तर पहिली पासुन वैद्यकिय शिक्षाण पुर्ण होइपर्यंत दुपारच्या जेवणानंतरच्या जो कुठला ही तास असु दे मास्तर कितीही शिव्या घालु देत्,पन तरी झोप काढल्याशिवाय अजिबात जमत नव्हत. साला दुपारच्या जेवणानंतर समोरच्या मास्तरच ते संथ लयीतील शिकवण आणी त्याचा शरिर आणी मनावर आलेला गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव परत या धकाधकीच्या जिवनात मिळालाच नाही, त्यामुळे आजही वाटत दुपारी मजबुत बासुंदी पुरी,किंवा पुरणपोळी खावी,आणी समोर माझ्या चरकच्या किंवा बालरोग च्या मास्तरांचे व्याख्यान आसावे,असा योग परत नाही......

In reply to by बाबा पाटील

मी पण गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव इंजिनियरिंग मध्ये घेतला आहे. इंजिनियरिंगचा पहिला दिवस आणि पहिला गणिताचा तास, मस्त झोप. फक्त पहिला दिवस असल्यामुळे वर्गाच्या बाहेर केले नाही.

In reply to by सहज

लै बेकार वाटलं राव! काय त्या लेकराचा छळ. वर आणि व्हिडो शूट करतीये मास्तरीण! पालकांना पुरावा दाखवायला असेल बहुतेक. अन त्या मानसीची अवस्था म्हणजे..."उभी दुनया गेली खड्ड्यात! च्यायला एक जरा तासभर पडू द्या रे! " अशी.

मुक्तविहारी यांनी लिहिलेली 'मुलांची शेती' हि सुंदर लेखमाला इच्छुकांनी जरुर वाचावी. लिंकः मुलांची शेती

माझी मुलगी १ ली त आहे. काल तिची dictation test होती. (दर वीक ला असणार म्हने आता)....तिने काहिच लिहिले नाहि. ती ं=म्हनत होती की मी होमवर्क लिहुन घेत होते. मला खुप टेण्शन आले. फोन केला एका पालकाला.. तर ति म्हणाली, आर्य ने तर लिहिले स्पेलीन्ग्स, ......मला वाइट वाट्ला..रागावले मी मुलीला.... काय करनार....पालकाची जास्त कुतरअओड होतीय...:(

In reply to by रानी १३

राणी ताई आपल्याला पहिलीत( फार कशाला नववीपर्यंत च्या सर्व इयत्तांमध्ये) किती मार्क होते हे आता आठवते आहे का? आणि त्याचा आपल्या आयुष्यात किती फरक पडला? मला इतकेच म्हणायचे आहे कि ज्या गोष्टीचा आयुष्यात काहीही फरक पडणार नाही त्या साठी इतकी आटाआटी कशाला?

In reply to by अनुप ढेरे

>आयुष्यभर मौज मजा करावी आणि जावं निजधामास.. सगळ्यात फर्मास प्रतिसाद! (पण आलीयेत ना ती आता बाहेर...) मुलांचा कल शोधणं हा सर्वावर एकमेव पर्याय आहे. त्यानं संगोपनापासूनच तुफान मजा येते. मुलाला रेस खेळल्यासारखं वाटत नाही. माझा मुलगा स्वेच्छेनं चित्रकार (ग्राफिक डिजायनर) कसा झाला, त्याच्या शिक्षणाचं कधीही टेंशन आलं नाही आणि त्याचं मस्त चाललंय याची गोष्ट वेळ झाला की लिहीन.

ज्या मुलांना पहिल्यापासुन सक्ती असते जास्त अभ्यास आणि एकही दिवस खाडा न करण्याची ती त्यांच्याकडून शालेय जीवनात पुर्ण राबवताना मी पाहीले आहे. माझ्या मुलीच्या शाळेत १००% अटेंडंन्स वाल्यांना बक्षिस दिले जाते रिझल्टच्या वेळी. काही आया मुलांना बरे नसले तरी पाठवतात शाळेत. खुप राग येतो अशा पालकांचा. अरे अभ्यासाच समजू शकतो पण बक्षिसासाठी ?

In reply to by जागु

जागू ताई, शाळेत गेल्याने अभ्यास होतो हे (जास्तीत जास्त) अर्धसत्य आहे. माझी मुलगी बी कॉम च्या पहिल्या वर्षाला फार तर दोन महिने(सगळे मिळून) कॉलेजला गेली असेल आणि कोणताही क्लास नाही तरी तिला सत्तर टक्के मिळाले.( कसे कुणास ठाऊक) आमच्या सौ. नि बराच आरडा ओरडा केला होता( ती पहिलीपासून हुशार मुलात गणली जात असे आणि बर्याच वेळा आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार हि मिळाला होता असे ऐकले) पण त्याने काहीच फरक पडला नाही.( मुलीला माझी फूस आहे असा बराच त्रागा सुद्धा झाला) आता वातावरण निवळले आहे. दोन्ही मुलांनी दहावी पर्यंत फार अभ्यास केला असावा असे वाटत नाही तरीही त्यांचे काहीही बिघडलेले नाही. आता त्यांचे त्यांना कळले आहे कि आपली करियर आपण करणे आवश्यक आहे. बाप आयुष्याला पुरा पडणार नाही. बस इतकेच सांगणे आहे

In reply to by सुबोध खरे

मी बी.कॉम केले तेंव्हा नोकरी करीत होतो. मुंबईतला ३ तासांचा धकाधकीचा लोकलचा प्रवास, ८ तास नोकरी, नाटकांच्या तालीमी ह्या सगळ्या रगाड्यात कॉलेजची उपस्थिती अशक्यच होती. चारही वर्षे पुस्तके वाचून स्वतःच अभ्यास (सेल्फ स्टडी) केला बी. कॉम केले. मार्क विचारायचे नाहीत. कधी कुठला क्लास लावला नाही पण नापासही कधी झालो नाही. पुढे कोबोल प्रोग्रॅमिंग केले. आखातात आलो. १० वर्षे नोकरी केली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. आनंदात आहे.

दोन महिन्यांपुर्वी कन्यारत्न पहिलीत गेले.आणी शाळेतुन आल्यावर पहिल्याच दिवशी,"पपल्या उद्या शाळेत चल्,प्रिनसिपल बाईंना सांग क्लासटीचर बदलुन पाहिजे"आयच्या गावात मला चौथीपर्यंत आमच्या मातोश्रीच शिकवायला असल्यान वर्गात काहीही घडो पहिला मार अस्मादीकांनाच मिळायचा त्यामुळे शिक्षकांविषयी अनादर दाखवायची कधी हिंमतच झाली नाही.त्यामुळे बाइसाहेबांना खोदुन खोदुन विचारल्यावर कळल की बाळाने दुसर्‍या एका मुलाने बॉयकट वरुन चिडवल म्हणुन त्याला धोपटला त्यामुळे वर्गशिक्षिकाबाईंनी कोपर्‍यात उभे करायची शिक्षा दिली होती. असेही कन्या रत्न मागचे सहा महिने अभ्याससोडुन कराटे क्लास ,स्केटींग ,क्रिकेट असे सगळेच रिकामे उद्योग करतय. पिस्तोल शुटींग शिकायला निघाल होत पण वय बसत नसल्यामुळे एडमिशन मिळाली नाही. यावर्षी पोहायला शिकवायच वचन माझ्याकडुन कधीच घेतलय. माझ्या मते मुलांना त्यांच्या जबाबदारीवर सोडुन द्याव,आताची चिल्ली पिलीही त्यांना काय करायच आहे याचे निर्णय सभोवतालच्या परिस्थीतीनुसार बरोबर घेतात्,आपण फक्त त्यांना योग्य दिशा सांगायची. आजची पोर आपलीही बाप आहेत्,जमाना बहोत बदल गया है बॉस.........

In reply to by बाबा पाटील

लई भारी गोष्ट, यासाठीच मी पोराला शाळेत उशीरा घातलंय अगदी बायकोशी वाद घालुन, आता पोरगं आणि मी दोघंही जाम सुखात आहोत, निदान आम्ही दोघं तरी असं मानतो. आणि हो सध्याचा जमाना पाहता कराटे आणि पोहणं आलंच पाहिजे पोरांना.

आईवडीलांची रजा शिल्लक नाही म्हणून कितीतरी लहान मुले तशीच शाळेत येताना पहात होते. मग एकदा शाळेनेच दटावणारे पत्र पाठ्वले सगळ्यांना! आजारी मुलांची हेळसांड होतेच आणि वर तब्येत बरी असणार्‍यांना संसर्ग! मुलांना फार पळवत ठेवणारे पालक नात्यागोत्यात, मित्र मंडळीत दिसतात. एकीनं तर चक्क विचारलं होतं की तिच्या मुलीला जसं अठवड्याचे ६ वेगळाले क्लासेस असतात तसे माझ्या मुलाला नसल्याने "का गं, परवडत नाही का?" आनंदानं "नाही" असं सांगितलं. मग पुढे एका चांगल्या पोहण्याच्या वर्गाच्या शोधात असताना तिनं माहिती दिली "ए, पण जरा महाग आहे हां तो क्लास, परवडेल ना?" तशाच आनंदानं "हो" म्हणून सांगितलं. ;)

In reply to by रेवती

"परवडत नाही का?" असा प्रश्न विचारणारी ती माऊली महान आहे. माझ्यातर्फे तिला एक दंडवत घाला.

In reply to by मृत्युन्जय

चालायचच! ;) फक्त एका डॉक्टर मैत्रिणीनं मात्र प्रामाणिकपणे सांगितलं की दोन्ही मुलांना पाच पाच क्लासेस लावलेत पण त्यात ती रमत नाहीत आणि मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचा अपराधीपणा मनातून जात नाही म्हणून बिचारी मुलं मात्र पळत असतात. असेही भेटतात म्हणून वर उल्लेख केलेल्यांचा वेडेपणा खपून जातो.

एक तर मुळात खुप पैसा म्हणजे यश हे समीकरणच चुकीच आहे. खुप शिक, मोठा हो, मग खुप पैसा मिळेल, मग मोठं घर होईल, मग गाडी होईल, मग परदेशवारी होईल.. म्हणजे लोक चारदा नाव घेतील.. मग तु खुप यशस्वी "म्हणवला" जाशील.. कुणी असं का म्हणत नाही की खुप वाच..खुप ऐक, सम्रुद्ध हो, खुप खेळ, निरोगी रहा, खुप माणसं जोड, हसत रहा, लोकांना मदत कर, संवेदनशील हो आणि मुख्य म्हणजे समाधानी रहा.. मग तु "यशस्वी होशील"... तुमच्या मुलात ह्यातले काही जरी गुण असले तरी तो आनंदी आयुष्य जगेल, ह्या पेक्षा जास्त काय हवं.. पैसा , नोकरी, शिक्षण हे सगळं शेवटी आनंदी रहाणे ह्या साठीच आहे ना.. आता आनंद हा काही विकत मिळत नाही.. तो मानावा लागतो. मी तर म्हणेन की काही शिकवायच असेलच मुलांना तर "आनंद कसा मानावा" हे शिकवा.. ह्या रॅट रेस पायी वखवखलं मुल ह्या दुनियेत सोडुन तुम्ही त्याच्याच आयुष्याच नुकसान करताय.. त्याला कितीही मिळालं तरी ते असमाधानीच असणार.. कारण सतत मिळवत रहायची, पुढे जायची वृत्ती तुम्हीच त्याच्यात निर्माण केलीत.. असं नसतं तर तथाकथित मोठ्या संस्था (आय.आय्.टी) आणि कंपन्या मधील(हुषार आणि मोठे पॅकेजेस असणार्‍या) मुलांनी मानसिक ताणामुळे आत्महत्या नसत्या केल्या. अनेक लोक असे दिसतात जे वरकरणी अल्पसंतुष्ट वाटतील, पण ते लहान सहान गोष्टीं मध्ये पण खुश असतात. सतत आनंदी असतात.. तुमची आजी पहा.. तुम्हाला तिचा पांडुरंग खरा की खोटा असे प्रश्न पडत असतिल.. पण ती मात्र ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा हरिपाठ वाचत असते, तेव्हा समईच्या मंद प्रकाशातला तिचा चेहरा पहा. ते समाधान तुम्हला करोड रुपये देऊन तरी मिळेल का? मग ती अडाणी (?) बाई जास्त यशस्वी की तुम्ही? आज तुम्ही हॉटेलात जाऊन हजारो रुपये उधळण्याच्या लायकीचे झालात, पण आई जसं जेवण बनवते ती चव आणि माया तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकला नाहित तर पालक म्हणुन तुम्ही यशस्वी की तुमचे मवाळ, मध्यमवर्गीय अल्पसंतुष्ट आई बाप? तुमचा वेळ, तुमची उबदार कुस, तुमच्याशी मारलेल्या गप्पा ह्या त्या मुलाला कोण देऊ शकतं? शालेय शिक्षणा मध्ये पुढे जायला शाळा/ ट्युशन असु शकतात.. पण पुढे जाताना जो ताण वाढत जातो त्याला तोंड द्यायला तुम्ही आणि तुमचे मुल दोघही भावनिक द्रुष्ट्या तयार आहात का? स्पर्धेत भाग घेणं वाईट नाहीचे, पण आयुष्याला स्पर्धा मानणं चुक.. स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही..

In reply to by पिलीयन रायडर

मी तर म्हणेन की काही शिकवायच असेलच मुलांना तर "आनंद कसा मानावा" हे शिकवा..
तुमच्या मुलाला मिसळपावचे सदस्य बनवा. इथे 'आनंद कसा मानावा', 'जगावे कसे' ह्यावर एक धागा (सुखाचा?) आहे. तो वाच म्हणावं आणि तेच अंतिम सत्य आहे हेच मानलेस तर आणि तरच यशस्वी आणि सुखी होशील.

In reply to by प्रभाकर पेठकर

अय्या विसरलेच मी... असं सोप्पं सोप्पं कसं बुवा चालेलं.. मी असं म्हणायला हवं होतं का.. मुला तुझं मन तुझ्या बहेर आहे आत नाही, तुला वाटतं की तु तु आहेस.. नाही.. तु तुझं मन आहे.. तुला जे वाटतय ते खरं तर तुझ्या मनाला वाटतय जो तु नाहीस.. आता जो तु नाह्चेस त्याला तु सम्जाव कि तो तु नाहियेस आनि ह्या सत्याला तु बिनशर्त स्वीकार.. मग बघ तु कसा सुखी होशील.. आणि हे सगळं तुला समजत नसेल तर तुझी चित्तदशा विमन्स्क आहे.. आणि तु नीट वाचतहि नसशील.. तरीही शांतपणे वाच.. समजलच नाही तर "एक धागा सुखाचा" वाच.. ते आपलं आयुष्य जगण्याचं नवनीत गाईड आहे.. तिथे सोपं करुन सांगितलय!

In reply to by सुबोध खरे

खरं आहे. आमच्या मुलाच्या (वय साडेतीन) शाळेत ' व्हॉट यू वाँट यूवर चाईल्ड टू बी' असं फॉर्मवर भरून घेतलं . 'अ काईंड हार्टेड गुड नेचर्ड ह्युमन बिईंग' असं आम्ही लिहून दिलंय . बाकी सगळ्यानी डॉक्टर, इंजिनीयर , आय ए एस. ;)

In reply to by पिलीयन रायडर

खुप शिक, मोठा हो, मग खुप पैसा मिळेल, मग मोठं घर होईल, मग गाडी होईल, मग परदेशवारी होईल.. म्हणजे लोक चारदा नाव घेतील.. मग तु खुप यशस्वी "म्हणवला" जाशील.. कुणी असं का म्हणत नाही की खुप वाच..खुप ऐक, सम्रुद्ध हो, खुप खेळ, निरोगी रहा, खुप माणसं जोड, हसत रहा, लोकांना मदत कर, संवेदनशील हो आणि मुख्य म्हणजे समाधानी रहा.. मग तु "यशस्वी होशील"... मला तुमचा comment पटला . फक्त एक मला highlight करावसं वाटतं . तुम्ही म्हणता तसं यशस्वी होण्यासाठी म्हणजे सुखी समाधानी संवेदनशील वगैरे होताना तुम्हाला पैसा पण कमावता येतो. या दोन व्याख्या mutually exclusive नसाव्यात . मला अशी खूप लोकं माहिती आहेत जी दोन्ही अर्थानी यशस्वी आहेत. आहे त्यात समाधान मानण आणि अल्पसंतुष्ट असणं यात आपल्याकडे नेहमीच घोळ होतो. ज्याला आपण rat race म्हणतो आहोत ते बर्याच अंशी peer pressure असतं . आणि ते पालक च ओढवून घेतात. लोकांचे हस्तक्षेप आणि आपला लोकांमध्ये हस्तक्षेप अशा दोन्ही भूमिकांमध्ये आपण कधी न कधी असतोच. मुळात आपल्याकडे boundry issues खूप आहेत . कुठे थांबायचा हे अनेकांना कळत नाही . मला अजून मुलं वाढवायची वेळ आलेली नाही . त्या मुळे पालकांच्या अनेक problems चा किंवा peer pressure ला बळी पडण्यच्या वृत्ती ला judge करण्याचा काही उद्देश नाही . मला एक च वाटतं एखाद्या गोष्टीची आवड नसणं आणि एखादी गोष्ट अजिबात च न कळणं या अतिशय भिन्न गोष्टी आहेत . त्यामुळे CBSC चा अभ्यास कठीण आहे असं म्हणणं मला फारसं पटत नाही . जर नीट शिकवलं तर ती गोष्ट निदान कळू शकतेच. आधुनिक मानव इतका "ढ " नाही . त्या विषयात अंगभूत गती असणं किंवा नसणं आणि ती गोष्ट न कळणं या वेगळ्या गोष्टी वाटतात मला . आपल्याकडे शिकवणं हे बर्याचदा त्या विषयासाठी नावड च निर्माण करतं . त्या मुळे ज्या विषयात गती नाही तो एखादा प्रवाहातला विषय असला तर तुम्हाला न्यूनगंड येतोच. कुठली ही गोष्ट लहान मुलांना नीट समजावून सांगितली कि कळते . मी हे मात्र स्वानुभवाने सांगू शकते. माझ्या भाची ला मी बटाटे कुस्कर्ण्यापासून ते भांडी लावायला मदत करणे आणि abcd , रंग ओळखणे पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत . आणि हे अनेकदा ती खेळायला कंटाळली आहे म्हणून तिचं मन रमवायला केलेले उद्योग आहेत. ती आत्ता फक्त ३ वर्षांची आहे. यातल्या बर्याच कामांची ती कास सोडून देणार जशी मोठी होत जाईल तशी. मात्र एखादी गोष्ट कुणी समजावत असताना ती समजून घेऊन अनुकरण करणं हा अनुभव किंवा धडा तिच्या आयुष्यभर कामी येणार . शिवाय making difference हे feeling तीला मिळतं हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा . आपण पहिली दुसरी मध्ये जे शिकतो किंवा कुठल्याही टप्प्यावर जे शिकतो त्याचा काय उपयोग हा प्रश्न मला म्हणून च पटत नाही . पालकांना वेळ नसणं आणि त्यातून मुलं कुठे कमी पडायला नको म्हणून proxy उभी करणं हा अगदी core उद्देश असावा nursery , day care किंवा tuition चा . यात आणखीन एक खूप मोठा point आहे . आपलं क्षितीज वाढवण्याचा . आई ची माया आणि तिच्या हाताची चव या गोष्टींना तोड नाहीच पण सुजाण आणि carrer केलेल्या आई नी तुमच्या aspirations वाढव्ण्यासाठी किंवा तुम्हाला मोठी स्वप्नं बघण्यास उत्तेजन देण्यासाठी केलेले प्रयत्न ही तितकेच मोलाचे असतात . त्याला कमी लेखण्यात काही अर्थ नाही. आयांनी सुद्धा केवळ घरी जेवण बनवलं नाही म्हणून guilty वाटून घेऊ नये असं माझं ठाम मत आहे. एक पुस्तक मध्ये वाचलं होतं - घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती . त्यात असं म्हणलं होतं की जन्माला येणारं प्रत्येक मूल हे ज्ञानेश्वरांच्याच प्रतिभेचं असतं मात्र त्याचं संगोपन पुढची दिशा ठरवतं . ज्ञानेश्वरांची प्रतिभा ते अयशस्वीते चा शिक्का इथपर्यंत एखादं मूल कसं पोहोचतं याचा विचार सगळ्यानीच करायला हवा. हा लेख आपल्याला विचार करण्यास भाग पाडतोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे .

In reply to by स्रुजा

आहे त्यात समाधान मानण आणि अल्पसंतुष्ट असणं यात आपल्याकडे नेहमीच घोळ होतो. ज्याला आपण rat race म्हणतो आहोत ते बर्याच अंशी peer pressure असतं
परफेक्ट !!

In reply to by स्रुजा

तुमचं म्हणणं पटलं मला.. पैसा मिळवणं आणि समाधानी असणं ह्या गोष्टी mutually exclusive नाहीचेत.. पण आपण अशा पालंका विषयी बोलतोय ज्यांच्या साठी पैसा मिळवणं ही यशाची व्याख्या आहे. एखादं मुलं ह्या ठराविक कॅटेगरी मध्ये बसत नसलं तर ते अयशस्वी.. हे चुक आहे.. पैसा हा महत्वाचा आहे.. पण ते आपल्याला जे हवं ते मिळवण्याचं एक साधन आहे... साध्य नव्हे.. मला वाटतं गफलत इथे होते. मुलं ह्या मुळे भौतिक गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायला लागतात. जसं की आई वडीलांचा सहवास, एखादी बागेतली सहल ह्या पेक्षा मॅक्-डी मधील बर्गर जास्त प्रिय होते.. एकंदरित ही जी एक संवेदनशीलता नष्ट होते ती वाचन, खेळ, संगीत ह्यांच्या पेक्षा अभ्यास आणि मार्क आणि नोकरि आणि पैसा ह्याला अवास्तव महत्व दिल्याने. मी स्वतः नोकरी करते आणि मला एक मुलगा आहे. माझी आईपण नोकरी करत होती आणि आम्ही पाळणाघरात राहिलो.. मला माझ्या आईच्या करिअरबद्दल अभिमान आहे आणि मी आभारी आहे की तिने नोकरी केल्याने आम्हाला थोडी गैरसोय जरी सहन करावी लागली तरि त्या बदल्यात १०० फायदे झाले. मी पाळणाघरात राहीले पण माझ्या आइने ह्या बद्दल स्वतःला कधीच गिल्टी समजले नाही. उलट तिने आणि वडीलांनी तिच्या नोकरि मुळे होणार्‍या अगणित फायद्यांची सतत जाणिव करुन दिली. त्यामुळे गिल्ट पोटी आमचे जास्त लाड करणे,नेहमी बाहेर खायला नेणे, आम्हाला शिकवणी लावणे असले प्रकार केले नाहीत. ती लक्ष पुर्ण द्यायची अभ्यासा कडे ,पण समोर बसवुन एक एक अक्षर बघणे इतकं पण तिने कधी केलं नाही. त्यामुळे आमचा अभ्यास आम्हीच करायचो, कसा, कधी ,किती हे आम्हीच ठरवायचो.. तिला आमच्या बुद्धिमत्तेची जाणिव होती. तिने तेवढ्याच अपे़षा ठेवल्या. आणि किमान त्या तरी ती पुर्ण करायला लावायची. तिथे बहाणे चालायचे नाहीत. पण १ ला नंबर च हवा अशा दुसर्‍यांशी तुलना होईल अशा अपेक्षा केल्या नाहीत. तुझी लायकी ९०% ची आहे, तेवढे तुला मिळाले पाहीजेत. तिथे आळस नको. अर्थात निकाल काहीही लागला तरी तिने नेहमी तो पेढे वाटुन साजराच केला. तिला कायम तिच्या मुलींचे कौतुक वाटत आले आहे. बाकी तिच्या अनेक मैत्रीणींची मुले परदेशात आहेत. पण तिच्या मुली भारतात आहेत आणि सर्व साधारण पैसे कमावतात. मी परदेशात मुल जावे म्हणुन देव पाण्यात घालुन ठेवलेले लोक पाहीलेत. आमचे पालक, आमच्या मुली किती वाचतात, किती धीट आहेत अशा विषयांवर कौतुकाने बोलत बसतात. त्यांना आमचे पगार आणि पोस्ट ह्यात फारसे स्वारस्य नाही. पण त्यातले किती आम्ही संस्थाना दान करतो हे मात्र ती नीट बघते. मी तिला पंचतारंकित हॉटेलात नेलं तरि तिला त्याचं अप्रुप वाटत नाही पण माझ्या मुलाचं वजन नीट भरलं नाही तर ती कच्चुन शिव्या घालते. मला वाटतं की आई बाबांना कुठे थांबाव हे कळालय, आम्ही शर्यतीत पळतोय ना नीट, हे त्यांनी पाहिलं, पण आम्ही तेवढं एकच एक काम कर करत नाही ना हे ही पाहिलं... काहीही करा, हवं वाटलं तर उर फुटेस्तोवर धावा ह्या शर्यतीत, फक्त त्यातला आनंद मिळत रहायला हवा. peer pressure ला आपण खरचं बळी पडतो.. ते खरं तर नाही होऊ द्यायला पाहिजे.. मी माझ्या आइ बाबांसोबत होते तोवर peer pressure ला नाही फारशी बधले.. जशी नोकरी सुरू झाली, पैसा आला, माहेर सुटलं, स्वतःच घर हातात आला सांभाळायला... मी peer pressure पुढे गुडघे टेकत गेले.. आता माझी इच्छा आहे.. किमान मुलावर तरी ते येऊ नये...

In reply to by पिलीयन रायडर

तिला आमच्या बुद्धिमत्तेची जाणिव होती. तिने तेवढ्याच अपे़षा ठेवल्या. आणि किमान त्या तरी ती पुर्ण करायला लावायची. तिथे बहाणे चालायचे नाहीत. पण १ ला नंबर च हवा अशा दुसर्‍यांशी तुलना होईल अशा अपेक्षा केल्या नाहीत.
लाख मोलाची गोष्ट आहे ही . बर्याच पालकांना आपल्या पाल्याची गती एखाद्या तथाकथित प्रवाहापेक्षा वेगळया विषयात असेल तर त्याचं कौतुक वाटून पण व्यवहारात याचा काय उपयोग हा प्रश्न सतावत असावा . असो. या लेखावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादा नंतर मला प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही . पण यशोधरा, बाळ सप्रे आणि पिल्लियन रायडर च्या प्रतिक्रिया मला उत्साह वर्धक वाटल्या - धन्यवाद ! त्यामुळे उशीर झालेला असून ही मला ते acknowledge करणं महत्त्वाचं वाटलं .
काही बाबतीत मोठ्या माणसांच्या शर्यतीबद्दल प्रतिसाद आले आणि धागा थोडा भरकटला (असो त्यामुळे दुसरे आणि वेगळे विचार वाचायला मिळाले हि एक दुसरी उपलब्धी/फायदा ).
हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा धागा भरकटवण्यात माझा नकळत सहभाग होताच :P . पण विषयाची व्याप्ती अशी होती की ते आपो आप झालं .

In reply to by पिलीयन रायडर

स्पर्धेत भाग घेणं वाईट नाहीचे, पण आयुष्याला स्पर्धा मानणं चुक.. स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही.. एक नंबर !

In reply to by पिलीयन रायडर

पिरा, माझ्या मनातले बोललीस, खरे तर काय प्रतिक्रिया देऊ हेच समजत नव्हते, आजची गरज म्हणुन मुलांना ssc इंग्लिश मिडीयम मध्ये घातले आहे, पण दोघांना हि टयूशन लावले नाही, तरी माझी दोन्ही मुले स्वतःच्या अभ्यास स्वः क्षमते वर करून चांगले मार्क्स काढतात, एकदा माझ्या मुलाने स्वतः मला विचारले कि आई मी काय होऊ? असे तुला वाटते, मी त्याला एवढेच म्हंटले जे तुला आवडेल पण एक चांगला माणुस हो, चांगला नागरिक हो … एवढे ऎकुन माझ्या ९ वर्षाच्या मुलाने मला घट्ट मिठी मारली. मी तिथेच भरून पावले. मी स्वतः जास्त शिकले नाही आहे, पण मला खूप वाटते माझ्या मुलांनी खुप शिकावे, पण त्यासाठी मी कधीच त्यांना बळजबरी केली नाही, करणार नाही, कारण शैक्षिणिक अनुभव तर ते दोघेही घेतील, स्वतःची आर्थिक प्रगती करतीलच यात शंका नाही, पण हे होताना व्यवहारिक जगात त्यांच्यातला माणुस हि तेवढाच समृद्ध व्हायला हवा असे मला तरी वाटते.

२ वर्षे पूरी झाली की लगेच शाळेत घालतात ? त्याबद्दल काय वाटते आपल्याला.

In reply to by आशु जोग

गेल्यावर्षीपर्यंत अशा लोकांना मी तोंडावर शिव्या घालायचो. आमच्या पोट्ट्यालाही २ वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवण्याचं टुमणं सुरु झालं होतं...चारचौघात मिसळायची सवय लागते, लवकर अभ्यास आत्मसात होतो वगैरे कारणं देणं सुरु झालं होतं. एकदा ठणकाऊन सांगितलं, "तुमच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये असतं पोरगं. मिपाकर भेटले की त्यांच्या जोडीनं दंगा घालतं, पूनमसारख्या हाटेलातल्या सगळ्या स्टाफसोबत गप्पा मारतं, हिंडून येतं! आणखी काय चारचौघात मिसळायची वेगळी सवय लावायचीये? अन अभ्यासात पडलं मागं तर पडू द्या. त्याचा बा खंबीर आहे." ३ वर्षं पुर्ण झाल्यावर आत्ता शाळेत जायला लागलं पोरगं. मास्तरणींचे अभिप्राय - लक्ष देऊन शिकतो. शी शू चा त्रास देत नाही (बाकीची बरीचशी लेकरं शाळेत पोचायच्या गडबडीत बहुतेक तशीच येतात त्यामुळं शिकता शिकता कार्यक्रम उरकतात.). सगळ्यांशी मिसळून असतो. इ.इ.इ. आता ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं पोराच्या आयशीला. तिनं चांगल्या सवयी लावल्या..पोरानं त्या आत्मसात केल्या. त्यासाठी त्याला शाळेत जायची गरज पडली नाही. अन २ वर्षापासून शाळेत जाणार्‍या पोरांची प्रगती तशी पाहता ज्या पातळीवर व्हायला हवी होती तशी ती दिसत नाही. मग काय उपयोग लेकरांच्या आयुष्यातलं हुंदडायचं एक वर्ष मारुन मुटकून वाया घालवण्याचा? आता दुसरा अनुभव - एका मित्राचा मुलगा काही केल्या बोलायलाच शिकत नव्हता. एकलकोंडा झालेला. आजी, आई आणि बाबा ह्यापलिकडे कुणाकडं पहायचाही नाही. त्याच्या डॉक्टरांनी सल्ला दिला, शाळेत घाला...शिकेल आपोआप. आता वर्षाभरानंतर किमान जाणवण्याइतपत तरी प्रगती आहे. ह्या समोर पाहिलेल्या अनुभवाअंती माझं मत बरंच बदललंय. सरसकट २ पुर्ण झालेल्या पोरांना शाळेत घालण्याची आवश्यकता मुळीच नाही, ते प्रगतीसापेक्ष आहे. असं माझं वैयक्तिक मत झालेलं आहे.

मिसळीच्या मालकांनाही हा धागा उपयोगी आहे. धाग्याचा छान आहेर झाला.

लेखातील विचारांशी सहमत!

माझा मूळ विषय हा चिमुकल्या मुलांच्या खांद्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादून त्यांना या उंदीर दौडीत उतरवणाऱ्या आणि त्यांचे बालपण हरवणाऱ्या/ नासवणार्या पालकांबद्दल होता. काही बाबतीत मोठ्या माणसांच्या शर्यतीबद्दल प्रतिसाद आले आणि धागा थोडा भरकटला (असो त्यामुळे दुसरे आणि वेगळे विचार वाचायला मिळाले हि एक दुसरी उपलब्धी/फायदा ). मूळ मुद्दा इतक्या लहान मुलांच्या पालकांसाठी होता. वैयक्तिक दृष्ट्या माझे मत असे आहे कि शैक्षणिक यश हे यशस्वी आयुष्य जगण्यास फार तर दहा टक्के जबाबदार आहे(academic success is at the most 10% responsible for success in life ) . त्यामुळे त्याचा इतका बाऊ करणे हे गैरलागू आहे.

आमच्या लेकीच्या वर्गातल्या एका मुलीची आई तिला किंडरगार्टन पासुनच क्लासला पाठवते.. कमाल वाटली ! अजुन एक - आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तर मुलं घरीच म्हणुन दर आठवड्याला कसलातरी कँप लावलाय. खरं तर बाकीचे लोकं मुलांना इतकं रेटताना बघुन वाटतं आपलं पिल्लु मागे तर नाही राहणार ना ! कधीकधी थोडा ताण वाटतो तेवढाच.

In reply to by शिल्पा ब

शिल्पा ताई, हा ताण नोकरी करणाऱ्या बायकांना अजूनच जाणवतो कारण ज्या बायका घरी असतात त्यांना अशा सर्व वर्गाना मुलांना आणायला आणि पोचवायला वेळ असतो आणि त्यावर काहीना आम्ही किती सुजाण पालक आहोत हे दाखवायची हौस असते(जितके जास्त क्लास किंवा छंद यांची शिबिरे तितके जास्त सुजाण) यातून त्या नोकरी करणाऱ्या बायकांना न्यूनगंड देत असतात. आधीच त्या दुप्पट मेहनत करीत असतात वर अशा बायकांचे सूचक उद्गार ( घरी असलं कि कसं मुलांवर संस्कार करता येतात इ इ) म्हणजे झालेच. चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? जेंव्हा तुमचा शेजारी ती विकत घेतो तेंव्हा. आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला अग्रक्रम द्यायचा ते आपण ठरवले पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा धागा काढवा लागेल असे दिसते. ;) पण न्यूनगंड देणे इ. दोन्ही बाजूकडून तेवढ्याच उत्साहाने चालते याचा अनुभव मी नोकरी करत असताना आणि सोडल्यावर घेतलाय. गृहिणी म्हणजे घरी बसून झोपा काढणारी व्यक्ती असे किंवा याप्रकारचे दुसर्‍याकडून म्हटले गेल्यावर मग समोरचा मनुष्य जवळ असल्या नसल्या वैचारिक भांडवलावर ;) विरुद्ध पार्टीला नामोहरम करू इच्छितो (किंवा उलट). खरेतर नोकरी करणे किंवा न करणे ही फक्त त्या त्या वेळची परिस्थिती असते व दोन्ही गोष्ती चांगल्या किंवा वाईट नसतात याकडे दुर्लक्ष होते. ताण जाणवणे हे खरेतर आपण स्विकारलेल्या परिस्थितीनुसारच असते. वेळाच्या दृष्टीने नोकरी करताना थोडी कमतरता जाणवते तशी दुसर्‍या बाजूलाही वेगळे काही जाणवत असते.

In reply to by रेवती

तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा धागा काढवा लागेल असे दिसते. जरूर वेगळा धागा काढा. या निमित्ते एक प्रश्नाची उहापोह होईल. माझी आई सुरुवातीला माझा आणी माझ्या भावाचा जन्म होईपर्यंत मैट्रिक होती. आमच्या बरोबर तिने आपलेपण शिक्षण पूर्ण केले (एम ए, बी एड) आणी शेवटी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझी बायको डॉक्टर असून माझ्या लष्करी नोकरीमुळे थोड्या आणी लांब कालावधी साठी गृहिणी झाली होती आणी माझी वहिनी संगणक अभियन्ति असून मुलांच्या संगोपनासाठी मधील काळ गृहिणी झाली होती. त्यामुळे हा प्रश्न मी फार जवळून पाहिलेला आहे आणी माझी काही मते ठाम बनली आहेत तरीही मला दुसरी बाजू जाणून घेणे नक्कीच आवडेल.

In reply to by सुबोध खरे

बायकोने नोकरी करावी की नाही हे परिस्थितीनुरुप, दोघांनी विचारविनिमय करून, ठरवावे. गृहीणीला नोकरीकरणार्‍या बाईपेक्षा कमी व्याप असतात आणि 'अशा बायका' (तुमचाच, मला न पटलेला शब्दप्रयोग) नोकरी करणार्‍या बायकांना न्यूनगंड देतात हा निव्वळ भ्रम आहे. नोकरीत किंवा गृहकृत्यात स्त्रीला कितपत रस आहे ह्यावर होणारा त्रास अवलंबून असतो. जे काम मनाविरुद्ध करावे लागते त्यात प्रचंड त्रास होतो आणि त्याचे दुष्परीणाम, त्या व्यक्तीसह, कुटुंबातील इतरांना सोसावे लागतात. गृहीणीची भूमिका निभवायची की नोकरी करायची ह्यातून एकाची निवड करण्याची संधी निदान कांही स्त्रीयांना तरी असते. (पुरुषांना तशी संधी मिळत नाही. झक्कत नोकरी करावीच लागते) जेवढी मोठी स्वप्ने बघावीत तेवढी वाढीव अर्थार्जनाची 'गरज' आणि अपरिहार्यता निर्माण होते. दोघांच्या विचारविनिमयातून घरच्या स्त्रीला नोकरी करण्याची गरज असेल तर नवर्‍याने घरकामात मदत केलीच पाहिजे. पत्नी गृहीणी असेल तर नवर्‍याने घरकामांत मदत करणे ऐच्छिक असू शकते. बाकी , नवर्‍याला आवड असेल (जशी मला स्वयंपाकाची आहे) तर त्याने सोयीनुसार घरकाम जरूर करावे पण त्यात उपकाराची भावना असता कामा नये. तसेच, 'तुम्ही काय दिवसाचे १०-१२ तास बाहेर असता, मी ह्या चार भिंतीत गाडलेली असते' असा बायकोचा सूर असू नये. बायकोच्या घरकामास कमी लेखले तर तीला घरात काय काय कामे करावी लागतात ह्याची यादी ऐकावी लागते. तेंव्हा सूज्ञ नवर्‍याने तो मोह टाळावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

गृहीणीची भूमिका निभवायची की नोकरी करायची ह्यातून एकाची निवड करण्याची संधी निदान कांही स्त्रीयांना तरी असते. (पुरुषांना तशी संधी मिळत नाही. झक्कत नोकरी करावीच लागते)
लाख बोललात इतकेच म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

त्यावर काहीना आम्ही किती सुजाण पालक आहोत हे दाखवायची हौस असते(जितके जास्त क्लास किंवा छंद यांची शिबिरे तितके जास्त सुजाण) यातून त्या नोकरी करणाऱ्या बायकांना न्यूनगंड देत असतात.
सहमत. बहुतेक (सो क्वाल्ड) होममेकर बायकांवर गृहिणीपण लादलेले असते. कारण विविधं असतात. शिक्षण नसणे, नवर्‍या मागोमाग (दुसर्‍या गावात/राज्यात/देशात) शेपुट म्हणून गेल्यामुळे नोकरी करायची परवानगी नसणे/वाव नसणे वैग्रे वैग्रे. मग या न्युनगंडातून 'आम्ही मुलांना वेळ देतो', (किरकोळ घरगुती जमाखर्च बघत असले तरीही) 'घराचं अर्थकारण सांभाळतो' वैग्रे वृथासमर्थन सुरू होतं.

In reply to by दादा कोंडके

कोंडके दादा, कुणी गृहीणी बनावे, कुणी नोकरी करावी हा विषय नाही पण त्याचा मुलांना काय फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे. विषय मुलांवरच्या ओझ्याचा आहे.

In reply to by दादा कोंडके

शेठ, हे जरा जास्तच जनरायलेझन होतंय असं नाय का वाटत? हे म्हणजे 'चंगळवादासाठी अन पैशाच्या हव्यासापायी पोटच्या पोरांची आबाळ करुन नोकर्‍या करणार्‍या स्त्रियांना स्वतःच्या कर्तुत्वाचा माज असतो' असं म्हणल्यासारखं नाही का वाटत? :)

ह्या धाग्याच्या निमित्ताने खलिलभाऊंना क्वोट करत आहे "Your children are not your children.They are the sons and daughters of Life's longing for itself. They come through you but not from you, And though they are with you yet they belong not to you." -- खलिल गिब्रान http://www.katsandogz.com/onchildren.html

काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण २००८, २००९ असेल. झी टीवीवर सारेगमप लिटल चँप सुरु होते. त्यात नात्यातल्या एका मुलीचा समावेष होता. तिच्या घरच्यांकडून तिच्या गाण्याचे फार कौतुक ऐकले होते. प्रत्यक्ष टीवी वर तिचे गाणे पाहताना इतर स्पर्धकांपेक्षा तिच्या गाण्यात अनेक दोष, कमतरता आहेत हे जाणवत असे. परंतु तिचे आईवडील तिच्या गाण्याचे कौतुक ऐकवताना थकत नसत. विशेष करुन आजोबांनी तिला महागायिका बनवण्याचा चंगच बांधला होता. या स्पर्धेमधेही ती फारशी टिकली नाही. त्याबद्दल तिच्या घरच्यांना कारण विचारले असता 'पॉलिटिक्स दुसरे काय ?' असे उत्तर ते देत असत. अशी उदाहरणे पाहिल्यावर एक गोष्ट प्रामाणिकपणे वाटते ती म्हणजे "आपला छंद हा आपल्या रोजीरोटीचे साधन होवू शकेलच असे नाही" याची जाणीव लहान मुलांना करून द्यायला हवी. किंवा "बाळा, तूझे गाणे अगदीच सुमार आहे त्यामुळे गाण्याचा नाद तू सोड" असे सांगणारा गुरु भेटायला हवा.