Skip to main content

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - १)

लेखक सुधीर
सोमवार, 15/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाच्या दुकानात सेल्फ-हेल्प नावाचं एक दालन असतं, त्याच्या वाट्याला जाण्याचं फारसं काही कारण नव्हतं. केवळ कुतूहल म्हणून मी नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक ज्ञानामृत का बोधामृताबरोबर झोपेचा डोसही फ्री मिळतो की काय असा प्रश्न पडायचा. म्हणजे नुकतीच पूर्ण झोप झाली आहे, चहा पाण्याचा कार्यक्रमही आटपलाय आणि यातल्या काही पुस्तकांपैकी एखादं हाती घेतली की हमखास अर्ध्या तासात डुलकी लागते. बरं त्यातून फारसं काही हाती गवसतं असही नाही आणि गवसलं तरी प्रत्यक्षात अमलात आणलं जातं का, हाही एक प्रश्न असतो. या दालनाला कायमचा रामराम म्हणण्यापूर्वी "क्लासिकल बेस्टसेलर" वाचून पाहूया असं म्हणून एक पुस्तक हाती घेतलं. या पुस्तकाने माझे सगळे पूर्वानुभव मोडीत काढले. हे पुस्तक वाचताना मला लेखकाची तळमळ, प्रामाणिकपणा, पुस्तकातले विचार मांडण्यापूर्वी त्याने स्वतः घेतलेले श्रम यांची जाणीव होत होती. हे पुस्तक नुसतंच प्रभावित करत नाही तर मार्ग शोधण्याचं योग्य तंत्र सांगतं. मग तो मार्ग प्रगतीकडे जाणारा असेल, दुरावलेल्या नात्यांना जोडणारा असेल वा कामगार-व्यवस्थापन यात सुसंबंध निर्माण करणारा असेल. त्यामुळेच कदाचित या पुस्तकाने जी उंची गाठली ती या प्रकारातल्या फार कमी पुस्तकांना गाठता आली. अर्थातच मी स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स विषयी बोलतोय. या पुस्तकाचा सारांश एका दमात मांडणे हे माझ्यासारख्या नवख्याला शिवधनुष्य पेलवण्यासारखं आहे. तरीही त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हा एक धाडसी प्रयत्न. "सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल" या आपल्या शीर्षकातूनच कव्ही एफिशिएंट (निपुण) असण्यापेक्षा इफेक्टिव म्हणजेच परिणामकारक असण्यावर वर भर देतात. म्हणजे एखाद्याकडे शिडी भराभर चढण्याचं नैपुण्य (एफिशिएंट) जरूर असेल पण त्याने ती शिडीच जर का योग्य भिंतीला लावली नसेल तर भराभर शिडी चढून ती व्यक्ती चुकीच्या ठिकाणीच लवकर पोहोचेल. याउलट एखाद्याकडे शिडी चढण्याचं तेवढं नैपुण्य नसेल पण त्याने शिडी योग्य भिंतीला लावली असेल तर इच्छित स्थळी तो नक्कीच पोहोचेल (इफेक्टीव). या अगोदरच्या काही नावाजलेल्या पुस्तकांनी व्यक्तिमत्त्वातल्या पैलूंना (Personality Traits) म्हणजेच चालणं, बोलणं, दिसणं, एखादी कला वा समोरच्याला प्रभावित करणारी एखादी कॢप्ती यांना विशेष महत्त्व दिलं होतं. कव्हींनी सर्वप्रथम असं सांगितलं की, परिणामकारक होण्यासाठी या सगळ्यांची गरज असेलही पण त्यांचं स्थान दुसरं आहे. सर्वप्रथम गरज असते ती माणसाच्या चांगुलपणाची (Character Traits) आणि योग्य तत्त्वांना अनुसरून केलेल्या मार्गक्रमणाची. याच्या समर्थनार्थ, ते असं म्हणतात की, आपण ज्या कुणा व्यक्तीवर विश्वास टाकतो वा ठेवतो, ते त्याच्या संभाषण कौशल्यामुळे वा त्याच्या नातेसंबंध जपण्याच्या कौशल्यामुळे (human relationship technique) नाही तर त्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेमुळे. परिणामकारक आयुष्यासाठी कव्हींनी सात सवयी सांगितल्या आहेत त्यापैकी पहिल्या तीन सवयी ह्या स्वावलंबनाशी म्हणजेच व्यक्तिगत यशाशी (Private Victory) निगडित आहेत तर पुढल्या तीन या परस्परावलंबनाशी म्हणजेच सामाजिक यशाशी (Public Victory) निगडित आहेत तर शेवटची सवय ही नूतनीकरणाची सवय आहे. या प्रत्येक सवयीपाठी एक कालातीत तत्त्व आहे. संपूर्ण पुस्तकात कव्हींनी योग्य तत्त्व आणि मूल्यांना अनुसरून निर्णय घेण्यावर भर दिला आहे तर पुस्तकाच्या शेवटी वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी तत्त्व आणि मूल्यावर सुंदर भाष्य केलंय. ते म्हणतात, तत्त्व ही कालातीत असतात आणि केलेल्या कृतीचे परिणामही तत्त्वांना अनुसरून असतात. पण मूल्यांचं तसं नाही, चोर-दरोडेखोरांनाही मूल्य असतात. म्हणून मूल्यांची जोपासना ही योग्य तत्त्वांच्या चौकटीत व्हायला हवी. सवयीच का? तर यावर त्यांची एक सुंदर कोट आहे. "विचार पेरा कृती घ्या, कृती पेरा सवय घ्या, सवय पेरा व्यक्तिमत्त्व घ्या, व्यक्तिमत्त्व पेरा नियती घ्या". आता या सात सवयी काय आहेत ते पाहू. सवय पहिली : सजगता (बी प्रोअ‍ॅक्टीव्ह) तत्त्व : दूरदृष्टी जर पहिली सवय एका वाक्यात सांगायची झाली, तर वामनराव पैंच्या "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या वाक्याचा आधार घेता येईल. परिस्थिती नाही तर आपले निर्णय वा प्रतिसाद आपल्या वागणुकीला कारणीभूत असतात. आपणच आपल्या स्वभावाला-वागणुकीला आणि एकंदर आयुष्याला जबाबदार (responsible म्हणजेच response able) असतो. आपल्याला नेहमीच प्रतिसाद निवडीचं स्वातंत्र्य असतं. आत्मपरीक्षणाव्यतिरिक्त माणसाला कल्पनाशक्ती, सदसद्विवेकबुद्धी आणि स्वतंत्र इच्छाशक्तीचं वरदान आहे. "आपल्या आयुष्यात काय घडलं" यापेक्षा "आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेला आपण कसा प्रतिसाद दिला" हे सर्वात महत्त्वाच ठरतं. अर्थात जे काही वाईट घडतं त्यामुळे कधी शारीरिक तर कधी मानसिक धक्का बसतो. पण खरं तर अशा घटनेमुळे आपल्या मूळ स्वभावाला-वागणुकीला धक्का बसण्याचं काहीच कारण नाही. उलटपक्षी अशा घटनांना दिलेल्या प्रतिसादातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असतात. काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात तर काही गोष्टींविषयी आपण नक्कीच काहीतरी करू शकतो त्या म्हणजे नियंत्रणातल्या गोष्टी (Circle of Influence). प्रोअ‍ॅक्टीव्ह माणसं कधीच परिस्थितीला वा इतरांना दोष देत नाहीत. त्यांचे निर्णय हे नेहमीच सदसद्विवेकबुद्धी आणि तत्त्वांना धरून असतात आणि ते नियंत्रणातल्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसतात. आपल्याला प्रतिसाद निवडीचं स्वातंत्र्य आहे खरं पण त्याचे "परिणाम" निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. कुठल्याही कृतीचे परिणाम हे निसर्गनियमांना धरून असतात आणि ते आपल्या हाताबाहेर असतात. आपल्यापैकी ज्यांना त्यांनी घेतलेल्या एखादं-दुसर्‍या निर्णयाचा खेद वाटतो, त्यांनी सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण केलेल्या चुका ह्यासुद्धा आपल्या हाताबाहेरच आहेत. आपण त्या भूतकाळात जाऊन नाही सुधारू शकत आणि ना आपण त्याचे "परिणाम" नियंत्रित करू शकत. त्यामुळे चुका झाल्या हे लक्षात आल्यावर मान्य करा, सुधारा आणि त्यातून शिका. आपण केलेल्या चुकांपेक्षा आपण निवडलेला प्रतिसादच आपल्याला जास्त दु:ख देतो. आपल्या चुकांना दिलेला योग्य प्रतिसादच आपल्या आयुष्यात येणार्‍या पुढल्या क्षणांचा दर्जा ठरवतो. सवय दुसरी: शेवट ठरवूनच सुरुवात करा तत्त्व : स्वतःच्या आयुष्याचं नेतृत्व दुसरी सवयीसाठी भा. रा. तांबे यांच्या कवितेतली "मी जाता राहील कार्य काय?" ही ओळ समर्पक आहे. प्रत्येक गोष्ट ही दोनदा होते. प्रथम आपल्या मनात आणि दुसर्‍यावेळी आपल्या कृतीने. दुसरी सवय ही व्यक्तिगत नेतृत्वगुण अधोरेखित करते. व्यक्तिगत नेतृत्वगुण म्हणजेच आपल्या मनात तयार होणारी "पहिली निर्मिती - डाव्या मेंदूचं काम" तर व्यवस्थापन म्हणजेच प्रत्यक्ष कृतीने तयार होणारी "दुसरी निर्मिती - उजव्या मेंदूचं काम". Peter Drucker आणि Warren Bennis च्या भाषेत बोलायचं तर "Management is doing things right; leadership is doing the right things." कार्यक्षम व्यवस्थापनापेक्षा (efficient management) परिणामकारक नेतृत्व (effective leadership) लाखमोलाचं का? ते यामुळे. "मी जाता राहील कार्य काय?" हा विचार केला तर आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा सापडेल, अपेक्षित शेवटाचं "ते चित्र" म्हणजेच पहिली निर्मिती पक्की होईल. आयुष्याच्या केंद्रस्थानी असलेले "विचार" आपल्या सुरक्षितता, मार्गदर्शन, ज्ञान आणि सामर्थ्याचे स्रोत असतात. संतुलनासाठी हे चारही घटक स्वतंत्ररीत्या अस्तित्वात असणं फार गरजेचं असतं. उ.दा. जोडीदाराला वा कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवणार्‍या विचारधारेच्या (Spouse/Family Centered) माणसांची भावनिक सुरक्षितता, जोडीदार वा कुटुंब सदस्य आपल्याशी कसा वागतो म्हणजेच त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधावर अवलंबून असते. नात्यात कटुता आल्यास अशांना फार असुरक्षित वाटतं, नैराश्यही येतं. त्यामुळे अशांसाठी जोडीदाराची वा कुटुंब सदस्याची मर्जी राखणं, त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं स्वाभाविकपणे मार्गदर्शक तत्त्व ठरतं. साहजिक आहे, जोडीदारावर अवलंबून राहिल्यामुळे सामर्थ्य लटकं पडतं आणि ज्ञानही मोजकंच राहतं. अशाच पद्धतीने, पैसा केंद्रस्थानी असणारी विचारधारा (Money Centered), कामात व्यस्त राहण्याची विचारधारा (Work Centered), बाजारात येणार्‍या नवनवीन गोष्टींची मालकी असावी असं वाटणारी विचारधारा (Possession Centered), आयुष्य फक्त मजा लुटण्यासाठी आहे असं वाटणारी विचारधारा (Pleasure Centered), आयुष्य हे शत्रूंना नामोहरम करण्यासाठी आहे असं वाटणारी विचारधारा (Enemy Centered), कर्मकांडावर भर देणारी विचारधारा (Church Centered), केवळ स्वहित पाहणारी विचारधारा (Self Centered) अशा सगळ्या विचारधारणेत सुरक्षितता, मार्गदर्शन, ज्ञान आणि सामर्थ्य यामध्ये एक मर्यादितपणा येतो. म्हणूनच कव्ही तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवण्याचा आग्रह धरतात. तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवणार्‍या व्यक्ती परिस्थिती वा भावनेच्या आहारी न जाता, निर्णयाच्या वेळी इतर विचारधारा केंद्रस्थानी असणार्‍या व्यक्तींपेक्षा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकतात. पहिल्या सवयीत म्हटल्याप्रमाणे, आपली कृती ही योग्य तत्त्वांना धरून असेल तर तिचे परिणामही निर्सगनियमांना धरूनच असतात. त्यामुळेच तत्त्वांची समज जितकी जास्त तितका आपल्या कृती करण्याच्या वा निर्णय घेण्याच्या क्षमतेतला स्वाभाविकपणा जास्त. तत्त्वांची महती सांगता सांगता कव्ही हेही प्रांजळपणे मान्य करतात की, सभोवतालचं विश्व समजून घेण्याच्या माणसाच्या मर्यादेमुळेच सगळीच्या सगळी तत्त्वे समजून घेता येतीलच असे नाही. तत्त्वनिष्ठ माणसं ही जोडीदारावर/कुटुंब सदस्यावर तितकंच प्रेम करतात जितकं "जोडीदाराला/कुटुंबाला केंद्रस्थानी" ठेवणार्‍या व्यक्ती करू शकतात, फरक इतकाच की निर्णयाच्यावेळी अशी माणसं तत्त्वांना प्राधान्य देतात. अपेक्षित शेवटाचं चित्र, म्हणजेच "पहिली निर्मिती" पक्की झाली की, सुरुवात मात्र ध्येय ठरवूनच म्हणजेच "मिशन स्टेटमेंटने" ने करावी लागते. "मिशन स्टेटमेंट" (वा ध्येय म्हणा) आपल्याला शोधून नाही सापडत; तर आपलं मिशन स्टेटमेंट काय असायला हवंय, हे कधीतर एकदा आपल्याला उमजतं. ("We detect rather than invent our mission in life") मिशन स्टेटमेंट एका रात्रीत कधीच लिहून होत नाही. ते अंतिमस्वरुपात आणण्यापूर्वी खोलात आत्मपरीक्षण करावं लागतं, अनेक विश्लेषणं करावी लागतात, गहन विचार करावा लागतो आणि अशा पद्धतीने ते आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरावर ते पुनःपुन्हा लिहावे लागते. मिशन स्टेटमेंट नेहमी प्रथम योग्य तत्त्वांवर अवलंबून असावी आणि मगच त्यात आपल्याला वाटणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांचा अंतर्भाव असावा. आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या भूमिका निभावाव्या लागतात. कधी आपण पालक असतो, कधी जोडीदार, कधी मित्र, कधी शिक्षक, कधी व्यावसायिक, तर कधी समाजसेवक. आणि या सगळ्या भूमिका महत्त्वाच्या असतात. या वेगवेगळ्या भूमिकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून मिशन स्टेटमेंटमध्ये या सगळ्यांचा अंतर्भाव असणं गरजेचं आहे. या प्रत्येक भूमिकेसाठी दीर्घकालीन उद्दिष्टं ठरविली पाहिजेत. मग आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता वापरून छोट्या आणि मोठ्या कालावधींसाठीची ध्येय (Short & Long Term Goals) ठरवू शकतो. सवय तिसरी: पहिली गोष्ट प्रथम तत्त्व स्वतःच्या आयुष्याचं व्यवस्थापन संत तुकारामांच्या "याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दीस गोड व्हावा" या ओवीतला (दुसर्‍या निर्मितीसाठी केलेला) अट्टहास म्हणजेच तिसरी सवय. पहिली निर्मिती हे उजव्या मेंदूच काम तर दुसरी निर्मिती हे डाव्या. नुसतीच पहिली निर्मिती पुरेशी नाही तर त्या दिशेने "परिणामकारक आणि कार्यक्षम रित्या" मार्गक्रमण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, तरच "दुसरी निर्मिती" प्रत्यक्षात साकार होईल. कव्हींनी या तिसर्‍या सवयीमध्ये वेळेच्या व्यवस्थापनावर भर दिला आहे.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे, आपण आपला वेळ चार प्रकारच्या कामांवर खर्च करत असतो. कुठलंही काम दोन परिणामांनी निश्चित करात येते. त्यापैकी एक "निकड (urgency)" आणि दुसरं "महत्त्व (importance)". पैकी तातडीची कामे सहज दिसून येतात, त्यांना वेळ देणं बर्‍याचदा महत्त्वाचंही असतं, ती सोपी असतात, लोकप्रिय असतात आणि आनंदही देतात पण बर्‍याचदा महत्त्वाची नसतात. याउलट महत्त्वाच्या कामांकडून, परिणाम अपेक्षित असतात. आपल्या अत्यंत महत्त्वाच्या ध्येय आणि मूल्यांशी ती संलग्न असतात. तातडीच्या कामांना (महत्त्वाची असो वा नसो) आपल्याला "रीऍक्ट" व्हावं लागतं. पण बर्‍याचवेळा महत्त्वाच्या पण तातडीच्या नसलेल्या कामांच्या बाबतीत आपणहून पुढाकार घ्यायचा असतो. जर आपण दुसर्‍या सवयीचा सराव नाही केला तर आपल्याला हे कधीच कळणार नाही की कुठलं काम "महत्त्वाचं", जे केल्याने अपेक्षित शेवटाच्या दिशेने आपला प्रवास होईल. परिणामकारक व्यक्ती ह्या नेहमीच दुसर्‍या क्वाड्रंटवर लक्ष केंद्रित करताना दिसतात. एकदा का ही गोष्ट ध्यानात आली की मग तुम्ही तुम्हाला सोयीची वाटणारी कुठलीही व्यवस्थापनाची पद्धत वापरा (साधी डायरी, टू-डू लिस्ट, गेटींग थिंग्स डन इ.). कव्हींनी या सवयीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांच्या दृष्टिकोनातून आठवड्याचं नियोजन कसं करायचं ते सांगितलं आहे (विकली प्लानर). क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11648
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

या पुस्तकाचा सारांश एका दमात मांडणे हे माझ्यासारख्या नवख्याला शिवधनुष्य पेलवण्यासारखं आहे.
किती ती विनयशिलता? :) नुसतं शिवधनुष्य छान पेललेलं नाही तर प्रत्यंचा ही व्यवस्थीत ताणली आहे. पुढल्या भागात चक्षूभेद नक्कीच. वाट पहातोय.

छान आहे , पुभाप्र .

चुकून "सेव्हन हॉबिट्स" वाचलं अन फँटसि स्टोरि असेल या नादात धागा उघडला.... अन्

@माझीही शॅम्पेन, @मिसळपाव, @मुक्त विहारि, @गणपा, @तथास्तु प्रतिसादाबद्धल धन्यवाद! @सिवाजी-द-बॉस फँटसी कथा आवडणार्‍या बर्‍याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.

In reply to by सुधीर

फँटसी कथा आवडणार्‍या बर्‍याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.
वास्तव निरीक्षण आहे. उगा खाटल्यावर बसलेले असताना देवाने/हॅरि पॉटरने ह्यांना आयतं हातात घबाड ठेवावं हिच यांची अपेक्षा असते. कश्ट नकोत बगा ना मनाचे ना शरिराचे. असो तुम्हि अनावश्यक विषयांतर केलच होत तर म्हटल दोन शब्द मी सुध्दा लिहावेत. राहता राहिला सेल्फ हेल्पचा फंडा, ते फारच जेनेरिक स्टेमेंट आहे म्हणुन विरोध करत नाहि. पण रस्त्याच्या कडेला मिळणारी हि म्यानेजेमेंटची पुस्तके मुळातच कॉमन्सेन्स निर्माण करायला त्रोटक असतात. अस वैयक्तिक मत आहे. या जगात हायलि इफेक्टिव कसे बनावे याचे लेखन वाचन करणे व प्रत्यक्ष बनणे यात जमिन आस्मानचा फरक असतो. व ही पुस्तके वाचुन वा अ‍ॅप्रिशिएट करुन व्यक्ति हायलि इफेक्टीव्ह नवे तर हायलि डिफेक्टिव्ह बनतो असेच निरीक्षण आहे.

In reply to by अग्निकोल्हा

या जगात हायलि इफेक्टिव कसे बनावे याचे लेखन वाचन करणे व प्रत्यक्ष बनणे यात जमिन आस्मानचा फरक असतो. व ही पुस्तके वाचुन वा अ‍ॅप्रिशिएट करुन व्यक्ति हायलि इफेक्टीव्ह नवे तर हायलि डिफेक्टिव्ह बनतो असेच निरीक्षण आहे. याच्याशी सहमत. नुसती पुस्तक वाचून फक्त पुस्तकी शहाणपण येतं. प्रत्यक्ष कृती फार कमी लोक करतात. पण कधी कधी अडल्या नडल्याला मार्गदर्शन होतं.

In reply to by अग्निकोल्हा

फँटसी कथा आवडणार्‍या बर्‍याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.
विरोध! फँटसी कथा या सेल्फ हेल्पपेक्षा भारी असतात असं मला वाटतं. नायक/नायिका संकटात आहेत आणि अचानक देवदूत/परी वगैरे धावून येते आणि नायकाची सुटका होते असं फँटसी पुस्तकांत सहसा घडत नाही. (अगदी "जादूगाराचा जीव पोपटात" वगैरे छाप कथांमध्ये पण नाही.) . मिपावरच किमान दोन तरी आयडींनी बॅटमॅन सीरिजमधली वाक्यं आपल्या स्वाक्षरीत वापरली आहेत. हॅरी पॉटर सीरीजमधे सुष्टांना जादू येते तशीच दुष्टांनाही येते. सुष्टांचा विजय होतो कारण प्रेम, आदर, मैत्री, शौर्य वगैरे "मानवी" गुण त्यांच्यामधे असतात म्हणून. "विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी" हा खरंच महत्त्वाचा विचार आहे. सेल्फ हेल्प अजून काय वेगळं असतं?

In reply to by आदूबाळ

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी"
वगैरे ठिक आहे हो. पण मुद्दा पावर निर्माण झालि कशी तर चकटफुच ना ?

In reply to by अग्निकोल्हा

ग्रेट पॉवर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी सारखे फंडेच मुळात "फँटसि" असतात कारण (रिस्पॉन्सिब्लिटी) जबाबदारिची जाणिव एखादी क्षमता विकसित करु शकेल परंतु एखादी विकसित क्षमता जबाबदारिची जाणीव निर्माण करेलच असे नाहि. तसही मोस्ट ओफ द रिस्पॉन्सिब्लिटीज कम्स विदाउट (ग्रेट) पॉवर हे वास्तव फँटसिबाजांना शक्य तेव्हडे टाळायचे असते म्हणून ग्रेट पॉवर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी सारखे शब्दछ्चल त्यांना प्रभावित करतात. कालच समोरचा पप्पु त्याचि स्वप्नसुंदरी जिवनसाथि म्हणून कधि मिळेल याचा विचार करत होता. मी म्हटलं कधिही नाही. त्याला पुढं बोलु न देता इतकच म्हणालो कि बाबारे याच एकमेव कारण फक्त हेच आहे की तुझ्या (व प्रत्येकाच्या) स्वप्नात केवळ एक नव्हे तर अनेक मुलि येत असतात. :)

In reply to by अग्निकोल्हा

सहमत. फँटसी (विशेषतः अ‍ॅडल्ट फँटसी) हा मुळातच एक प्रकारचा पलायनवाद आहे. पण हा पलायनवाद विचारांत असलाच तरी कृतीत असेल असं नाही. तुमचा पप्पू स्वप्नसुंदरी कधी मिळेल याचा विचार करत होता. कुणी सांगावं, तो त्या दिशेने पावलं उचलतसुद्धा असेल. तुम्ही त्याला पुढं बोलू दिलं असतंत तर कदाचित त्याने सांगितलं असतं. :)
याच एकमेव कारण फक्त हेच आहे की तुझ्या (व प्रत्येकाच्या) स्वप्नात केवळ एक नव्हे तर अनेक मुलि येत असतात.
हा मुद्दा कळला (कस्टमायझेशन ऑफ फँटसीज). पण याचा "रिस्पॉन्सिब्लिटी - पॉवर" या वरच्या चर्चेशी संबंध कळला नाही. कृपया उस्कटून सांगावे...

In reply to by आदूबाळ

हा मुळातच एक प्रकारचा पलायनवाद आहे. पण हा पलायनवाद विचारांत असलाच तरी कृतीत असेल असं नाही
बिंगो! हा पलायनवाद आहे व फँटसिबाज विचारांनी कसे असतात हे स्पश्ट करायचे होते.
तुमचा पप्पू स्वप्नसुंदरी कधी मिळेल याचा विचार करत होता. कुणी सांगावं, तो त्या दिशेने पावलं उचलतसुद्धा असेल. तुम्ही त्याला पुढं बोलू दिलं असतंत तर कदाचित त्याने सांगितलं असतं
त्याने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. माझं काम त्याला त्याच्या फॅंटसिची क्षणभंगुरता दाखवुन त्यात त्याने किती गुरफटावे याबद्दल सावध करणे इतपतच आहे. एका मर्यादेपर्यंत त्याच्या कार्याला माझ्या कोटी कोटी शुभेछ्चाच आहेत.
हा मुद्दा कळला (कस्टमायझेशन ऑफ फँटसीज). पण याचा "रिस्पॉन्सिब्लिटी - पॉवर" या वरच्या चर्चेशी संबंध कळला नाही. कृपया उस्कटून सांगावे...
फॅटसिबाजांची मनोवृत्ति विशद करायला हे उदाहरण दिले होते. थोडक्यात ते स्वतःच्या काल्पनिक विश्वाला इतके चिकटुन असतात कि सहज सोपं मुलभुत वास्तव त्या नादात ते कसे आरामात विसरतात हे स्पश्ट करायचे होते. फँटसि हे बहुतांश कल्पनारम्यता/मनोरंजन आहे, तर सेल्फ हेल्प ह्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसल्याने त्याचि व्यापकता गरज खोलि या फॅटसिबाजाना आकलन होण्यास तुलनेने कठिण असतात. त्यामुळे उस्कटुन समजावणे कितपत जमेल याबाबत शंका आहे तरिही इछ्चा असल्यास सहकार्य नक्कि देइन.

In reply to by अग्निकोल्हा

म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की "फँटसी बाज" आणि "सेल्फ हेल्प बाज" हे म्युचुअली एक्स्क्लूजिव असतात?

In reply to by अग्निकोल्हा

फँटसि हे बहुतांश कल्पनारम्यता/मनोरंजन आहे, तर सेल्फ हेल्प ह्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसल्याने त्याचि व्यापकता गरज खोलि या फॅटसिबाजाना आकलन होण्यास तुलनेने कठिण असतात.
याच्यावरून. समजा दोन्ही गोष्टींची आवड असलेला माणूस असेल तर तो भलताच इंट्रेष्टिंग असेल!

In reply to by आदूबाळ

याच्यावरून
असेल असेल...तुम्हाला ते तसं वाटतय तर ते तसच असणार, मला ते समजुन घ्यायला अवघड जातय हा निव्वळ माझा दोष.
समजा दोन्ही गोष्टींची आवड असलेला माणूस असेल तर तो भलताच इंट्रेष्टिंग असेल!
आब्सोलुटली येस. मोस्ट इंटरेस्टिंग पर्सन. एंड अन फॉर्चुनेट्ल्यी अ बिट नर्सिसिस्ट. म्हणजे त्याचे फंडे मनोरंजक असणार पण त्यात मी चि बाराखडी नसेलच याचि अजिबात खात्रि नाही.

In reply to by अग्निकोल्हा

म्हणजे त्याचे फंडे मनोरंजक असणार पण त्यात मी चि बाराखडी नसेलच याचि अजिबात खात्रि नाही.
:) खरडवही पहा! तुमचा गैरसमज होतो आहे असं वाटतंय.

In reply to by अग्निकोल्हा

बरोबर. पावर चकटफूच निर्माण झाली. पण या देवदत्त/निसर्गदत्त पावरचा विनियोग चांगल्या कामासाठी करता का वाईट हाच त्या रिस्पॉन्सिब्लिटीचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडची (पैशांची आणि सत्तेची, बहुदा फुकट मिळालेली) पावर जाणवून एखादा माजतो आणि अंगावर सात किलो दागिने घालून* शरीराचं "वामन हरी पेठे" करतो. दुसरा गुपचूप त्या पैशांचा आणि सत्तेचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी करतो. हाच तो "रिस्पॉन्सिब्लिटीचा मुद्दा". फँटसी वास्तवाला भिडते ती इथे. - *अतिशय अवांतरः या लोकांना विमानतळावरच्या सिक्युरिटी चेकला किती वेळ लागत असेल!

मिठाचा खडा टाकण्याबद्दल क्षमा करावी. पण मला हे पुस्तक "बोलाची कढी बोलाचाच भात" या पठडीतलं वाटतं. म्हणजे थियरी उत्तम, पण प्रत्यक्ष जगण्यातल्या खाचाखोचांसाठी काय उपाय?? काही मार्गदर्शन??? दोन उदाहरणं: १. "मिशन स्टेटमेंट" - हे पुस्तक वाचल्याचं आणि आवडल्याचं सांगणारे कैक भेटले, पण तुझं मिशन स्टेटमेंट काय रे भौ? असं विचारल्यावर बरेच गडबडले. जे उरले त्यांनी आपली मिशनं काळसुसंगत / परिस्थितीसुसंगत बदलली. असं होण्याचं कारण म्हणजे माणूस सर्वज्ञानी नाही. माणसाकडे "सीमित शहाणपण" (बाऊंडेड रॅशनालिटी) असते. त्या त्या परिस्थितीत तो त्याला योग्य वाटेल असे निर्णय घेतो. तात्कालिक परिस्थितीच्या रेट्याने तत्त्वंसुद्धा बदलावी लागतात, तिथे मिशन स्टेटमेंटचं काय घेऊन बसला राव! २. क्वाड्रंट प्रकरण - हा माझ्या बॉसचा आवडता उद्योग होता. तो सगळ्यांना आपली कामं अशी चार चौकटींमध्ये विभागायला लावायचा. इथपर्यंत छान. मेथॉडिकल वगैरे. पण त्याचे आणि माझे क्वाड्रंट कधी जुळायचेच नाहीत. त्याच्यामते जे क्वा.१ ते माझ्यामते क्वा.३. मग मारामार्‍या!

In reply to by आदूबाळ

तुमचं म्हणणं योग्य आहे. पण... मिशन स्टेटमेंट यावर त्यांनीच केलेलं भाष्य मला आवडलं "We detect rather than invent our mission in life" आणि ते मला पटलं. हे डिटेक्ट कधी होईल ते मात्र सांगण कठीण आहे. १० वर्षापूर्वी जर का माझ्या हातात हे पुस्तक दिलं असतं तर मलाही फारसं आवडलं नसतं. ह्या पुस्तकातले विचार हा "टॉप डाऊन" अ‍ॅप्रोच आहे. म्हणजे तुम्हाला प्रथम मिशन, व्हिजन कळलं पाहिजे वगैरे. मग तुम्ही क्वाड्रंट वगैरे वर येता. समाजातली फार कमी लोक असतात की त्यांना ध्येय वगैरे कळलेलं असतं. मिशन आणि क्वाड्रंटच्या अगदी उलटा अ‍ॅप्रोच डेव्हिड अ‍ॅलनचा (जीटीडी) आहे. तो "बॉटम अप" आहे. तो एकदम मिशन स्टेटमेंटवर येत नाही. "पहिली हातातली कामं" यावर येतो आणि १-२ आठवडे, वर्ष वगैरे वर जायला सांगतो. कदाचित ते पुस्तक तुम्हाला थोडफार योग्य वाटेल.

In reply to by सुधीर

बरोब्बर! डेव्हिड अ‍ॅलनचं जीटीडी मला बर्‍याच अंशी पटलं. विशेषकरून जीटीडीची स्टेशनरी (डायर्‍या वगैरे) तर फारच मनमोहक आहे!
१० वर्षापूर्वी जर का माझ्या हातात हे पुस्तक दिलं असतं तर मलाही फारसं आवडलं नसतं.
हे एकदम मान्य! कदाचित दहा वर्षांनंतर डेव्हिड अ‍ॅलन "मायक्रो मॅनेजर" वाटेल आणि कोवे पटेल, कुणी सांगावं!

In reply to by सुधीर

बरोब्बर! डेव्हिड अ‍ॅलनचं जीटीडी मला बर्‍याच अंशी पटलं. विशेषकरून जीटीडीची स्टेशनरी (डायर्‍या वगैरे) तर फारच मनमोहक आहे!
१० वर्षापूर्वी जर का माझ्या हातात हे पुस्तक दिलं असतं तर मलाही फारसं आवडलं नसतं.
हे एकदम मान्य! कदाचित दहा वर्षांनंतर डेव्हिड अ‍ॅलन "मायक्रो मॅनेजर" वाटेल आणि कोवे पटेल, कुणी सांगावं!

In reply to by आदूबाळ

१. लोकानी मिशन स्टेटमेंट केलं नाहि हा लोकांचा दोष, कोव्हीचा नाहि१ २. क्वाड्रंट जुळले नाहित ठिक आहे. पण मुळात तुला क्वाड्रंट पद्धतीत काहि त्रुटी जाणवल्या का? चुकिच्या कारणांसाठी पुस्तक/विचार बाजूला सारतोयस असं वाटलं.

तद्दन भंपक पुस्तक आहे. वाचकांनी सावध असावे!

In reply to by ऋषिकेश

स्पा यांनी दिलेल्या लिंक बद्धल आपलं मत असतं तर कदाचित योग्य आहे. कारण त्या पीडीएफ मध्ये आकृत्या नाहीत. मुद्रण आवृत्ती मधले सगळे उतारे असतील का तेही मला सांगता यायचं नाही. पुस्तकात जे काही आहे ते मी दोन भागात मांडलं आहे. मला तरी त्यात वावगं असं काहीच दिसलं नाही. तुम्ही म्हणताय तसं "गोल गोल शब्द फेक" यानंतर आलेल्या दुसर्‍या पुस्तकांमध्ये मला प्रकर्षाने जाणवली. पण यात मला लेखकाचा प्रामाणिक भावला. असो, कव्हींनीच म्हटलयं की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक आवडलं नाही हे तुमचं मत आहे. पण माझं मत तरी मला हे खूप वेगळ वाटलं आणि आवडलं.

In reply to by सुधीर

यानंतर आलेल्या दुसर्‍या काही पुस्तकांमध्ये मला प्रकर्षाने जाणवली.

वाचकांनी सावध असावे! कशापासून ते पण लिहा :)

In reply to by स्पा

इथे लोक वर्षानुवर्शांची मेहनत, प्रयत्न, कश्ट, अभ्यास याच्या आधारे भगिरथ प्रयत्नानी भौतिक यश खेचुन आणतात त्यांचे परिश्रम, चिकाटी वगैरे वगैरेचे कौतुक बाजुलाच राहो, त्याकडे संपुर्ण दुर्लक्ष करुन नुसते दोन फंडे मनात रेंगाळुन बाकिच सगळ आपोआप फुकटात घडत असत असलं भुक्कड सिक्रेट शिकवणे म्हणजे त्या लेखकाने समाजाचि खरोखर केलेलि कृर चेष्टा आहे. चपलिने मारलं पाहिजे असलि अंधश्र्द्धा पसरवणार्‍याला.

In reply to by स्पा

हे पुस्तक प्रामुख्याने "लॉ ओफ्फ अ‍ॅट्रक्शन" विस्कुटुन (सिक्रेट) सांगते असा दावा करते. बर हे सिक्रेट काय आहे तर "थोट्स बिकम्स रिअ‍ॅलिटी". म्हणजे काय मला १० कोटी हवेत असा विचार करत असाल तर १० आपोआप मिळणारच. बास दॅट्स इट. तुम्हि करोडपति झालात समजा. आणि फक्त हेच तत्व वापरुन जगातल्या महान लोकानी महान गोश्टी साध्य केल्यात. ज्याना साध्य करता आलं नाही त्यांना हे सिक्रेटच माहित नाही हेच एकमेव कारण आहे. अरे हो... आता यशाचे इतक सोप सिक्रेट मिळाल्यास लगेच हुरळु नये, कारण लेखक रांना तोडीस तोड आहेच पण त्याने एक सॉलिड पाचर मारलि आहे या सिक्रेट्मधे. काय तर म्हणे आपण जेंव्हा १० कोटी हवेत हा विचार करतो तेंव्हा मुळात आपल्याकडे १० कोटी नाहित हाच विचार आपण खरे करत असतो अन सिक्रेट काय म्हणत तर "थोट्स बिकम्स रिअ‍ॅलिटी" म्हणून आपल्याकडे १० कोटी येत नाहित. तरा हा असला "लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन" प्रेम्,पैका व एखाद्या कार्यातिल यश, रिलेशन्शिप, व्यक्तिगत महत्वाकांक्षापुर्ति यासाठि कसा अप्लाय करायचा ह्याचे फंडे दिलेत, पण अर्थातच पाचर ठोकुनच. सोबतिला उगाच फ्रिक्वेन्सि, डिमेन्शन वगैरे वैज्ञानीक वापरुन अंधश्रध्दांचा इतका आचरट्पणा भरला आहे कि... लेखक प्रत्यक्ष समोर आला तर...

सुधीर भाऊ : आपण खुपच छान असे परिक्षण लिहिले आहे. आपली मेहनत लक्षात घ्यायला हवी. आढावा कसा घ्यावा हे आपल्या लेखातुन समजु शकते. पुनश्च अभिनंदन आणि पूढील काळासाठी शुभेच्छा.

दोन्ही भाग आवडले. Life is a journey, not a destination.Slow down and enjoy life. It's not only the scenery you miss by going too fast - you also miss the sense of where you are going and why. यासाठी मिशन स्टेटमेंट हवंच...पण प्रत्यक्षात ते कसे करायचे हे शोधणे हे अतिशय अवघड आहे..आपले मिशन शोधणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. मला तरी आतापर्यन्त स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील "अभौतिक" मिशन स्टेटमेंट बनवलेला कोणी भेटलेला नाही. :)