Skip to main content

कृष्ण तो आतला ...

लेखक आतिवास यांनी बुधवार, 17/07/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला. युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला. निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला. प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला. अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला. **
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6098
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

व्वाह!! खुपच सुंदर
प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला.
क्या बात है!!

In reply to by धन्या

ना.धांपेक्षा गूढ वाटलं .. काहीच समजले नाही . मिकाला काहीतरी कळल आहे, सांग कि रे - ( फक्त मिकाच्याच कविता कळणारा ) स्पा

In reply to by स्पा

खरंतर मी अस म्हणणार होतो:
जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा
पण प्रयत्न करतो नक्की.

हे रसग्रहण नाही, पण हि रचना वाचून सुचलेल्या काही ओळी. प्रत्येक कडव्याला एक धरुन माझ्या ओळी खाली दिल्या आहेत: ------------ रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला.
मन पाकोळी पाकोळी, जीव अधीर अधीर जाळ पेटला अंतर्मनी, घाव बधीर बधीर
युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला.
सदा संगर चालला, मन सावर सावर रेटीयला दिस कसा, रात आवर आवर
निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला.
वाहत्या मातीला नसे, भय स्थावर स्थावर संवेदना गोठल्या तरी, लव कातर कातर
प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला.
रानभर झडे, पाऊस गंभीर गंभीर देहभर थिरकते, आस अस्थिर अस्थिर
अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला.
दूरवर क्षितीजाशी, घन विभोर विभोर परी घनःश्याम झाकोळला, आत तिमीर तिमीर
आता मी वरची कविता सोपी केली आहे कां अजुन कठीण केली ते मात्र मी नाही सांगू शकत. ;) कवि / कवियत्रीला आवाहन आहे कि त्यांनी यातली माझी समज किती योग्य आहे ते जरुर कळवावे.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

काय तरल रचना ! अन अर्थही उमगला आता . दंडवत हो मिका !

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

धन्यवाद मिका. मजा आली मला तुमच्या ओळी वाचताना. मलाही असा अर्थ उलगडून सांगता येणार नाही. हाच अर्थ मला अभिप्रेत होता का - हेही नाही सांगता येणार. पण मुळात कवितेचा एकच अर्थ असावा असं काही नाही. त्यामुळे बरोबर की चूक असंही काही नाही. कवितेचा अर्थ व्यक्तीनुसार (अगदी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात परिस्थितीनुसार वगैरे वगैरे... .) बदलण्याची शक्यता मी नेहमी गृहित धरुन चालते - तीच कवितेची ताकद असते आणि मर्यादाही :-)

आता मी वरची कविता सोपी केली आहे कां अजुन कठीण केली ते मात्र मी नाही सांगू शकत
कविता दोघांच्याही आवडल्याच पण.. सुलभ अर्थ समजला तर बर होईल , डायरेक रसग्रहण का काय ते पण कवितेचं बर्याच वेळा असं संदर्भासहित स्पष्टीकरण नाही देता येत , कविता समजायला अर्थात कवी मन हव. असो :)

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. अनेक प्रतिसादकांनी 'कविता समजली नाही' असं म्हटलं आहे. मी तुम्हा सर्वांची भावना समजू शकते कारण अनेक कविता मलाही अनेकदा समजत नाहीत. तुमच्या प्रतिसादातून कविता समजून घेण्याची तुमची इच्छा व्यक्त झाली आहे - त्याबद्दल आभारी आहे पुन्हा एकदा. मिका यांनी इथं मदत दिली आहे; तशी मदत प्रत्येक वेळी मिळत नाही आपल्याला. "सर्वांना समजेल अशी कविता लिहायला" मला कधी जमेल का? - असा प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात आला इतकं मात्र खरं :-)

कविता आवड्ली. तथापी ती 'शांतरस'मध्ये आहे असे वाटत नाही. ती आणि 'एका' रसाच्या थोडी अलीकडील आहे असे म्हटले तर कदाचित त्यावरचा गुढतेचा पडदा पण हटेल.

In reply to by निवांत पोपट

अगदी मान्य. पण मला हवा तो पर्याय तिथं नव्हता (तो काय हवा हे मला माहिती नाही :-),) आणि काहीतरी पर्याय निवडल्याविना मला कविता प्रकाशित करता येत नव्हती. त्यातल्या त्यात मग जिथं क्लिक झालं ते निवडलं. तुम्ही कोणता 'रस' सुचवता आहात? ते कळल्यास मदत होईल. निदान पुढची कविता प्रकाशित करताना :-)

मिकाची कविताही आवडली. खरं तर कोणत्याही कविताच काय लिखाणाला अनेक अर्थ आणि पदर असू शकतात. अगदी पेपरमधे आलेल्या बातमीचा अर्थ आणि जोर कोणत्या भागावर आहे याबद्दलही मतभिन्नता असू शकते. तेव्हा एकदा लिखाण लिहून प्रसिद्ध केलं की ते संपूर्णपणे वाचकांचं!प्रत्येकाला हवा तो अर्थ घ्यायचं स्वातंत्र्य आहे आणि दर वेळी अर्थ कळलाच पाहिजे असंही नाही!

खरं तर कोणत्याही कविताच काय लिखाणाला अनेक अर्थ आणि पदर असू शकतात सहमत. तेव्हा एकदा लिखाण लिहून प्रसिद्ध केलं की ते संपूर्णपणे वाचकांचं!प्रत्येकाला हवा तो अर्थ घ्यायचं स्वातंत्र्य आहे मान्य. वाचक म्हणून मला जितकं स्वातंत्र्य हवं असतं तेच मी माझ्या वाचकांनाही द्यायला हवं! दर वेळी अर्थ कळलाच पाहिजे असंही नाही! यात थोडी दुरुस्ती करेन मी. दर वेळी मला कळलेलाच अर्थ इतरांना कळला पाहिजे असं नाही - असं मी म्हणेन.

मला आवडली आतिवासताई... तुमचं नेहमीचं लिखाण साधं-सरळ असतं. हे मधेच वेगळ्याच पद्धतीचं फार आवडलं... :)

कविता बर्‍याच वेळेस वाचली. विशेष काही कळाले नाही. मिका यांच्या अन्वयार्थानेही फारसा प्रकाश पडला नाही. थोडे थोडे ग्रेससारखे वाटले. अर्थ कळत नसला तरी "काहीतरी वेगळं आहे बॉ" असं वाटायला लावणारं.