Skip to main content

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - २ अंतिम)

लेखक सुधीर
मंगळवार, 16/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १
व्यक्तिगत आयुष्यात प्रगती कडे नेण्यार्‍या सवयी कुठल्या हे आपण पहिल्या भागात पाहिले. या भागात आपण सामाजिक यश काय ते पाहू. व्यक्तिगत यश हे सर्वप्रथम येते त्यानंतरच मग सामाजिक यश! सामाजिक यशाशी निगडित असलेल्या पुढल्या सवयी ह्यात पुस्तकाचा खरा आत्मा आहे. या पुस्तकानंतर काही शब्द जनमानसात प्रचलित झाले. जसे विन-विन, पी-पिसी वर्क, पॅराडाईम शिफ्ट वगैरे. पुढल्या तीन सवयींची ओळख करून देण्याअगोदर काही संकल्पना समजवून घेऊ आणि मग उरलेल्या सवयी पाहू. पॅराडाईम शिफ्ट (Paradigm Shift) म्हणजेच दृष्टिकोन/चश्मा बदल थॉमस कून (Thomas Kuhn) यांनी पॅराडाईम शिफ्ट ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. पुस्तकाच्या पहिल्याच पाठात ही संकल्पना कव्हींनी ब्रिटिश व्यंगचित्रकार विल्यम हिल यांच्या "My Wife and My Mother-in-Law" या चित्रावरून समजावून सांगितली आहे. वरील चित्र मी आंतरजालावरून घेतली आहेत. त्यांच्या प्रताधिकाराचा प्रश्न उद्भवल्यास कृपया चित्र काढून टाकून ही लिंक पहा. चित्र क्र १
चित्र क्र २
चित्र क्र ३
वर्गातल्या अर्ध्या जणांना चित्र क्र. १ दाखवण्यात आलं, तर उरलेल्यांना चित्र क्र २. जेव्हा त्या सर्वांना एकत्रितरीत्या चित्र क्र. ३ दाखविले गेले तेव्हा पहिल्या समूहाला चित्रात एक सुंदर ललना दिसली, तर दुसर्‍या समूहाला आजी दिसल्या. आणि विशेष म्हणजे दोन्ही समूहाने आपली बाजू किती बरोबर आहे यासाठी वाद घातला. नंतर मग त्यांना सत्य कळून चुकलं. कव्ही म्हणतात, The way we see the problem is the problem. बरेचजण या जगाकडे, व्यक्तिगत आणि सामाजिक प्रश्नांकडे "आपल्याच चश्म्यातून" बघत असतात, त्यामुळेच बर्‍याचवेळेला तंटे-बखेडे निर्माण होत असतात. पण जर आपण दुसरी बाजू पाहण्याचा, समजण्याचा, ऐकण्याच प्रयत्न केला तर आपल्याला खूप मोठं चित्र दिसू लागतं आणि समस्येवर योग्य तो तोडगा निघू शकतो. दीर्घकालीन तोडग्यासाठी कुठल्याही कौशल्यापेक्षा माणसाच्या आतला चांगुलपणाच जास्त कामाला येतो. म्हणून कायमस्वरूपी तोडग्यासाठी आपल्याला आपल्या स्वत:च्या दृष्टिकोनाच्या मूळ चौकटीवर (बेसिक पॅराडाईमवर) काम करणं जास्त गरजेच ठरतं. मात्र ही चौकट चांगुलपणाच्या "तत्त्वांवर" आधारलेली असली पाहिजे. अशी तत्त्वं जी निसर्ग नियमांना धरून आहेत. मग अशी तत्त्व नेहमीच दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतात. भावनांचे खाते (Emotional Bank Account) जसं बचत खातं आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज देतं तसंच नात्यामधलं भावनांचं खातं आपल्या नात्यातल्या बंधाचा अंदाज देतं. एखाद्याला समजून घेणं, शब्द पाळणं, सच्चेपणा (Integrity प्रामाणिकपणाच्या वरची पायरी), दुखावल्यावर क्षमा मागणं, प्रत्युत्तर काय द्यायचंय हे आधीच न ठरवता, कुठलाही पूर्वग्रह दूषित न ठेवता, केवळ ऐकण्याच्या उद्देशाने दुसर्‍याचं ऐकणं या गोष्टी भावनांच्या खात्यात भर घालतात. परिणामी नात्यांमधल्या विश्वासाची पातळी वाढून बंध अधिकाधिक मजबूत होतो. जेव्हा ह्या विश्वासाची पातळी वर असते, तेव्हा संभाषण कौशल्य कमकुवत असलं तरी परिणामकारक संभाषण होताना आपण पाहतो. परस्परावलंबतेचा चश्मा (Interdependence Paradigm) या पुढल्या तीन सवयी या एकमेकांना पूरक आहेत आणि बर्‍याचवेळा त्या एकत्रितरीत्या सांगणं जास्त सयुक्तिक ठरतं. या तीन सवयी आंतरवैयक्तीक संबंधावर आणि परस्परावलंबनावर भाष्य करतात. पहिल्या तीन सवयींच्या परिणितीतून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, समाजातली काही माणसं व्यावसायिक आयुष्यात यश-शिखरावर पोहोचलेली दिसतात. व्यावसायिक आयुष्यात यश-शिखरावर पोहोचलेल्या काही व्यक्ती मात्र खाजगी/कौटुंबिक आयुष्यात वा इतरांबरोबरच्या स्नेहसंबंधात कुठेतरी चुकल्यासारखी वाटतात. पुढच्या तीन सवयी या नेमक्या याच मुद्द्यावर भाष्य करतात. आपल्याला होणारं दु:ख, मनस्ताप, आनंद आणि अपयशाच्या मार्गातले अडथळे याची सांगड नेहमी परस्परावलंबनाशी घातली जाते. संपूर्ण निसर्गच परस्परावलंबनाच्या तत्त्वावर चालतो, त्यामुळे परस्परावलंबन ही स्वावलंबनानंतरची महत्त्वाची पायरी आहे. आता उरलेल्या सवयी पाहू. सवय चौथी: विन-विन विचारसरणी तत्त्व: आंतरवैयक्तिक नेतृत्व/ विन-विन विचारांची बैठक पक्की करणे विन-विन ही सेव्हन हॅबिट्स नंतर प्रचलित झालेली संज्ञा आहे. विन-लूज (मी जिंकलो तू हरलास), लूज-विन (ठीक आहे तू जिंकलास), लूज-लूज (मी हरलो तरी चालेल, पण तू हरलाच पाहिजेस), विन-विन (मीही जिंकेन अन तू ही जिंक) संवादाच्या ह्या विचारधारांपैकी योग्य विचारधारा कोणती याचं उत्तर "परिस्थितीवर अवलंबून" आहे. जर आपण खेळाच्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर "विन-लूज" हीच योग्य आहे. पण जर का आपल्या प्रियजनांसोबतच्या मतभेदात आपण विन-लूज विचारधारा अवलंबविली तर आपल्या नात्यावर त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत. अधिकाराचा फायदा घेऊन जर का आपण विन-लूज अवलंबवितं राहिलो तर दीर्घ काळाने त्याची जागा लूज-लूज घेऊ शकते. याउलट प्रियजनासोबतच्या एखाद्या शुल्लक वादात "लूज-विन" हाच श्रेष्ठ उपाय आहे. संवादाची अजून एक पद्धत आहे ती म्हणजे विन-विन ऑर नो डिल. जोपर्यंत दोन व्यक्ती किंवा दोन समूह सर्वमान्य-परस्परपूरक तोडग्यावर (विन-विन) येत नाहीत तोपर्यंत ते अजून वरच्या पातळीचा म्हणजेच विन-विन ऑर नो डिलचा विचार करू शकतात. बर्‍याचवेळा दोन व्यक्तींची मूल्य वा ध्येय परस्पर विरुद्ध असतात, हा विसंवाद परस्परांबद्दल अपेक्षा करण्यावेळीच ओळखणं जास्त उपयुक्त ठरतं. विन-विन ऑर नो डिल म्हणजेच असं म्हणणं की, "असा सर्वमान्य तोडगा ज्याने मला स्वतःला आणि त्याचबरोबर तुलाही समाधान असेल आणि असा सर्वमान्य तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण कुठलाही सौदा करायचा नाही". काही वेळा नो डिल हा पर्याय मारकही ठरू शकतो. उदा. तुमच्या लहानग्याशी झालेल्या मतभेदात तुम्ही "नो डिल" नाही म्हणू शकतं, अशावेळी कव्ही म्हणतात की, "कॉम्प्रमाईज", म्हणजेच खालच्या पातळीवरचं विन-विन करणं फायदेशीर ठरू शकतं. पण इतर बर्‍याचवेळी विन-विन ऑर नो डिल जास्त उपयुक्त ठरतं. विन-विन आणि लूज-विन यामधला फरक सांगताना कव्ही म्हणतात. लूज विन म्हणजे "Being a nice guy, even if nice guys finish last" लूज विन व्यक्तींना दुसर्‍याची कदर असते पण धैर्याचा अभाव असतो याउलट विन-विन म्हणजे "नाईस अॅण्ड टफ". थोडक्यात कव्ही म्हणतात परस्पर संबंधामध्ये "विन-विन विचारसरणी" ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असली पाहिजे. पण त्यासाठी गरज असते ती सच्चेपणा, मनाचा मोठेपणा, परिपक्वता आणि त्याच जोडीला धैर्याची. सवय पाचवी: आधी समजून घ्या मग समजून घेतले जाण्याची अपेक्षा करा तत्त्व: दुसर्‍याचे सहभावनापूर्वक ऐकणे बहुतेकवेळा आपल्याला दुसर्‍याला चांगला सल्ला देऊन मदत करावीशी वाटते खरी पण दुर्दैवाने बऱ्याचवेळा आपण दुसऱ्याची बाजू "न लक्षात घेताच" सल्ला देऊन मोकळे होतो आणि दुसऱ्याने तो समजून घ्यावा अशी अपेक्षा करतो. जर आपल्याला दुसर्‍याशी सुसंवाद साधायचा आहे, त्याला आपलं म्हणणं पटवून द्यायचं आहे वा त्यांना आपल्या संवादातून प्रभावित करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते आपण "फक्त" "संभाषण कौशल्य" वा "इतर कोणतीही कॢप्ती" वापरून नाही करू शकत. कारण जर का त्या व्यक्तीला कळलं की आपण कॢप्ती वापरतोय, तर ती व्यक्ती आपल्या वागणुकीवर शंका घेईल, आणि सरते शेवटी आपल्यावर अविश्वास दाखवून आपल्याशी मोकळेपणाने बोलणार नाही. त्यामुळे गरज असते ती सहभावनापूर्वक ऐकण्याची. सहभावनापूर्वक म्हणजेच दुसर्‍याच्या चश्म्यातून समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजून घेणं. पण सहभावनापूर्वक म्हणजे सहानुभूतिपूर्वक नव्हे. सहभावनापूर्वक म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर आहे असं मानणं नव्हे. तर "शब्दांच्या पलीकडे" त्या व्यक्तीला भावनिक आणि बौधिकदृष्ट्या सखोल व पूर्णपणे समजून घेणं. मूलभूत गरजांनंतरची माणसाची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे दुसर्‍या व्यक्तीने आपल्याला भावनिक पातळीवर समजून घेणे, आपल्याला सहमती दर्शवणे, आपली योग्यता ओळखणे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या ह्या गरजा आपण पूर्ण करतो तेव्हाच आपण त्या व्यक्तीला प्रभावित करून प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. "नंतर समजवून घ्यायची अपेक्षा करा" हा या सवयीचा दुसरा तितकाच अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दुसर्‍याला समजून घेण्यामध्ये "दुसर्‍याची कदर करणे" महत्त्वाचे असते तर दुसर्‍याने समजून घ्यायची अपेक्षा करण्यामध्ये धैर्य महत्त्वाचे असते. ग्रीक तत्त्वज्ञानानुसार, इथोज म्हणजेच तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमच्यावर असलेली इतरांची श्रद्धा, विश्वास आणि तुमची इतरांबरोबर असलेली "इमोशनल बँक बॅलन्स". पॅथोज म्हणजेच इतरांसोबत असलेलं तुमचं भावनिक नातं. तर लोगोज म्हणजे तुमचा तर्कवाद. तुमचं म्हणणं इतरांना समजवून देण्यासाठी या तिनंही गोष्टींची त्याच अनुक्रमाने गरज असते. नाती जोपासण्याच्या दृष्टीने दुसर्‍याला वेळ दिला गेला पाहिजे. अगदी कव्हींच्या भाषेत म्हणायचं तर "The time you invest to deeply understand the people you love brings tremendous dividends in open communication". जेव्हा आपण एक-दुसर्‍याला आतून ओळखू लागतो तेव्हाच तिसर्‍या सृजनशील पर्यायाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. दोघांच्या दृष्टिकोनातला फरक हा संवाद आणि प्रगतीतील अडथळा न होता ती एक परस्पर सहकार्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गामधली एक पायरी बनते. सवय सहावी: परस्पर सहकार्य तत्त्व: सृजनशील सहकार्यातून तिसरा उत्तम मार्ग शोधणे एखाद्या प्रश्नावर दोन व्यक्तींमध्ये मतभेद असणं आणि दोन्ही व्यक्ती आपापल्या जागी बरोबर असणं हे तर्काला धरून आहे. कारण तो मानसशास्त्राचा भाग आहे. केवळ डाव्या मेंदूच्या तर्कशास्त्राच्या आधारावर काही प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी उजव्या मेंदूच्या सर्जनशीलतेचा वापर करून तिसर्‍या उत्तम पर्यायाचा मार्ग शोधावा लागतो. कारण कव्ही म्हणतात, "Life is not just logical - it is also emotional". आपण आपल्याच अनुभवावर अवलंबून राहिलो तर कदाचित आपल्याकडे फारच तोकडी माहिती उपलब्ध असेल. दुसर्‍या व्यक्तीच्या या वेगळेपणातूनच आपल्या ज्ञानात भर पडत असते. परस्पर सहकार्याच्या भावनेमध्ये आपण एक असा उत्तम मार्ग शोधून काढतो ज्याची पूर्वी आपण कल्पना केलेली नसते. आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या सवयी आपल्याला ह्या सवयी पर्यंत आणून सोडतात. आयुष्यात नेहमी हे किंवा ते असे दोनच पर्याय नसतात. बऱ्याचवेळा तिसरा उत्तम पर्याय उपलब्ध असतो. गरज असते ती, तो पर्याय शोधण्याची. मला म्हातारी बाई दिसतेय, तुला ती तरुणी. छान! आता मला समजविण्यास मदत कर की ती तुला त्या चित्रात तरुणी कशी काय दिसतेय. अशा वागण्याने माझी फक्त जाणीवच समृद्ध होत नाही तर मी दुसऱ्याला भावनिक आधार देत असतो. आपली बाजू राखण्यामागची नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत असतो आणि आपण सहकार्याची वातावरणनिर्मिती करत असतो. सवय सातवी: कुर्‍हाडीला धार लावणे तत्त्व: समतोल आणि नावीन्य आपल्याला जे मिळवायचं आहे ते म्हणजेच पी (P for Production) आणि ज्यापासून साधनांपासून ते मिळणार आहे ते म्हणजे पिसी (PC for Production Capacity). आपली सर्वात महत्त्वाची "आर्थिक संपत्ती" जर का कुठली असेल ती स्वतःची "अर्थार्जनाची क्षमता" (PC). आर्थिक स्वातंत्र्य हे संपत्ती असण्यामध्ये नसतं तर ते आपल्या संपत्ती निर्माण करण्याच्या ताकदीवर असतं. म्हणूनच उत्तम अर्थार्जनासाठी (P), आपल्या या क्षमतेवर अधिक भर देणं जास्त गरजेचं ठरतं. पण जर का, या क्षमतेकडेच दुर्लक्ष केलं (P/PC Balance बिघडवला), तर अधिक काळासाठी उत्तम अर्थार्जन करणं कठीण होऊन जाईल. सातवी सवय ही थोडक्यात आपल्याला पी-पीसी संतुलन राखण्यास सांगते. "पी-पीसी संतुलन" म्हणजे शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि भावनिक या चार सर्वात महत्त्वाच्या स्तंभांची देखभाल करून त्यांची मजबुती वाढवणे. शारीरिक: यामध्ये नियमित संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे यांचा समावेश होतो. आध्यात्मिक: अध्यात्म हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि खाजगी पैलू आहे जो आपल्या स्फुर्थीचा आणि विकासाचा स्रोत असतो. आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्यातले व्यक्तिगत नेतृत्वगुण विकसित करतो म्हणून तो दुसर्‍या सवयीशी निगडित आहे. सर्वात महत्त्वाच्या लढाया ह्या दररोज हृदयाच्या आत होत असतात. आपल्या अंतर्गत चाललेली ही द्वंद्वं जर का आपल्याला जिंकता आली तरच आपल्याला मनःशांती लाभते, आपल्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते. बौद्धिक : आपल्यापैकी बहुतेकांचा बौद्धिक विकास हा नेहमीच्या शिक्षणातूनच होत असतो. पण फार कमी जण शाळा, कॉलेज सुटली तरी एखाद्या विषयाचा ध्यास घेताना दिसतात, "सतत शिक्षणाची" वृत्ती जोपासताना दिसतात. दर एक-दोन महिन्यांनी एखादं चांगलं पुस्तक वाचणे, विविध विषयातल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवणे हे सर्व बौद्धिक स्तंभाच्या मजबुतीसाठी आवश्यक असतं. भावनिक : जसे शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक हे तीन स्तंभ पहिल्या तीन सवयींशी म्हणजेच व्यक्तिगत यशाशी निगडित आहेत त्याचप्रमाणे चौथा स्तंभ हा आपल्या सामाजिक यशाच्या सवयींशी निगडित आहे. आपलं भावनिक विश्व हे आपल्या इतरांबरोबरच्या नातेसंबंधावर अवलंबून असते. परस्परावलंबनाच्या तीन (चौथी, पाचवी आणि सहावी) सवयींमधूनच आपण आपली भावनिक सुरक्षा वृद्धिंगत करत असतो. अशी आतून निर्माण होणारी भावनिक सुरक्षा सेवाभावीवृत्तीमुळे निर्माण होते. या सेवाभावी वृत्तीसाठी त्यांनी टॅनरची सुंदर कोट दिली आहे. "Service is the rent we pay for the privilege of living on this earth. -N Eldon Tanner" नूतनीकरण म्हणजे अशी योग्य तत्त्व आणि कृती ज्यामुळे आपल्यात सतत बदल घडून येतो आणि आपल्यात सुधारणा होऊन आपण सतत मोठे होत असतो. आपण जेव्हा स्वत:बद्दल जागरूक होतो, तेव्हा आपण आपल्या जगण्याचा अर्थ शोधतो आणि त्यानुसार तत्त्व आणि मूल्य जोपासतो. मग अशा तत्त्वांना धरून केलेल्या कृतीतून आपण शिकतो, तत्त्वांबद्दलची आपली समज अधिक खोल होते आणि आपण आपल्या वाढीच्या दिशेने एक एक पाऊल टाकतो. कव्हींच्या भाषेत ते मग एक "Upward Spiral" बनते. आपल्या प्रामाणिक प्रयत्नातून ज्ञानाचं भांडार उघडून देणार्‍या या लेखकाला त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली. लेखकाची भाषाशैली किर्तनकारासारखी मधाळ आहे. लेखाचा शेवटही त्यांच्याच शब्दात, पुस्तकाच्या शेवटच्या पॅराने करतो. ...I personally struggle with much of what I have shared in this book. But the struggle is worthwhile and fulfilling. It gives meaning to my life and enables me to love, to serve, and to try again. Again, T. S. Eliot expresses so beautifully my own personal discovery and conviction: "We must not cease from exploration. And the end of all our exploring will be to arrive where we began and to know the place for the first time." - The Seven Habits of Highly Effective People - Dr. Stephen Covey समाप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3045
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

दोन्ही भाग आवडले, स्वाती

या आणि पहिल्या भागात प्रतिसाद देणार्‍या वाचकांचा मी आभारी आहे.