Skip to main content

माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद. मागे कधीशी पितृ-दिन येऊन गेला. माझ्या मायबोलीने त्या बद्दल लेखनाचा एक सुंदर उपक्रम सुरू केलेला. मला लिहायच होत पण माझ्या बापाचा मुलगा फारच व्यस्त होता. इतका व्यस्त की त्याला स्वत: च्या बापाकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. लिहायच तर सोडाच त्याला बापाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता. सदा कदा बापावर डाफरत असायचा. बाप आतून दुखायचा पण बोलून दाखवायचा नाही फक्त गप पडून रहायचा. आणि मग असाच तो आषाढातला पहिला ढग आला आणिक बापाला घेऊन गेला. बापाचा मुलगा बघतच राहीला त्या ढगाकडे हताश निशब्द. बापाचा मुलगा बेवारश्या सारखा भटकत राहीला. बापाचे मित्र सांगत राहीले बाप किती मोठ्या मनाचा होता तो. बापाचा मुलगा ऐकत राहीला. बाप म्हणे डायलीसीसच्या आजारपणात पार्ल्यावरून मिरा रोडला एकटा जायचा ट्रेनने. का तर मित्राला पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून. आणि मग ती पुस्तके परत आणायला, नवीन पुस्तके द्यायला. माझ्या बापाचा मुलगा तर एका खोलीतल वर्तमानपत्र सुद्धा बापाला दुसर्‍या खोलीत बापाला आणून द्यायचा नाय. फक्त ओरडायचा त्याच्यावर. बापाला खाण्या-पिण्याची फार आवड होती. पण एकटा कधी खायचा नाही. सर्वांसाठी खायला आणायचा. बापाचा मुलगा मग त्याच्यावर चिडायचा वायफळ खर्च करतो म्हणून पण स्वतः कधी बापासाठी खायला आणायचा नाही. बापाला नाटक-सिनेमाची भारी आवड पण बापसाठी कधी चुकून कधी तिकीट घेऊन आला नाही. बाप तिकीट काढून आणायचा एक कधीच नाही दोन आकडी. सर्व नातेवाईकांना बोलावयचा फोन करुन बोलावायचा नाटकाला. घरी जाऊन तिकीट पोचती करायचा. नातेवाईक आपापसात हसायचे 'नाटकाचे वेड' म्हणून. मग माझ्या बापाचा मुलगा चिडायचा नातेवाईक हसतात म्हणून. पण माझा बाप ऐकून न ऐकल्यासारख करायचा आणि पुढच चांगल नाटक लागल की पहाटे उठून तिकीट काढायला जायचा रांगेत उभ रहायला म्हणून. माझा बाप एकदा बापाचा मुलगा परीक्षेला जाताना घड्याळ घालायला विसरला म्हणून आंघोळ अर्धवट टाकून फक्त टोवेल गुंडाळून सोसायटीच्या गेटपर्यंत धावत आला फक्त घड्याळ द्यालला म्हणून. लोक बापाला हसले. बापाच्या मुलाला माझ्या बापाची खुप लाज वाटली. स्वतः ची वाटायला हवी होती खर तर. माझा बाप स्वतः फारसा शिकला नाही पण त्याने माझ्या बापाच्या मुलाला खुप शिकवल. म्हणायचा माझी नौकरी आहे तो पर्यंत वाटेल तेवढा शिक घरी बसून. घरची काळजी करू नकोस. लोक बापाला सांगायचे बापाच्या मुलाला नोकरी करायला सांग म्हणून पण बाप काही बधायचा नाही. मग बापाचा मुलगा खुप शिकला, बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही. मग आता आषाढात बाप एकदम गेला. बापाचा मुलगा बापाला जाऊन अग्नी देऊन आला. अग्नी संस्काराला अगदी मोजकी माणस होती फार तर ८-१० असतील. माझ्या बापाच्या मुलालाही मग माझ्या बरोबरीने खुप वाईट वाटल. अरे रस्त्यावरचा कुणी फाटका माणूस अगदी मार्केटातला भाजीवाला जरी गेला तरी ह्यापेक्षा अधिक माणस जमतील आणि माझ्या बापाचा लोकसंग्रह तर खुप मोठा होता. मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. पश्चातापाने कदाचित पितृ हत्येच्या पापाच्या भितीने. तिकडे माझा बाप लाकड आणिक आगीत जळून गेला. इकडे माझ्या बापाच्या मुलाची शरीराची लाकड आणिक मनाची आग झाली पण तरीही तो जळून गेला नाही. होरपळत राहिलाय. माझ्या बापाच्या मुलाने आजकाल आयुष्य 'आंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तस भिरकावून दिलय. तो ही असाच कधीतरी मरुन जाईल पटकन. मला कधी कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै 'आषाढस्य प्रथम दिवसे ' चा अर्थ माझ्या कडून समजून घे म्हणून. मी (दिनांक १२/०७/२०१३)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16016
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

:( आषाढातला पाऊस पडतोच आहे आताही.

.......... डोळ्यात पाणी आणलंस दादा. (प्लिज पित्रु दिन ला पितृदिन करा रे कुणी. )

जबरदस्त ताकद आहे हो तुमच्या लिखाणात. डोळे पाणवले... हा बापाचा मुलगा हल्ली प्रत्येकातच असतो का? की अजूनही अपवाद आहेत काही?

.......

*****

फक्त इतकंच म्हणेन, 'अंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तसं आयुष्य भिरकावून चालणार नाही, तो शर्ट तसाच ठेवा, म्हणजे पुढच्या बापाच्या मुलाला बापाला अग्नी द्यायची वेळ येईल तेंव्हा त्याला असं लिखाण करायला लागणार नाही.... (व्य नि पाठवला आहे, जमेल तेंव्हा वाचा.) मुलाच्या बापाला आदरांजली!

असा धीर सोडू नका. एका बापाच्या दृष्टीकोनातून सांगतो आहे. मनाला इतके लावून घेतलेत तर त्या आकाशातल्या बापालाही दु:खच होईल.

चांगलं लिहिलंय असं तरी कसं म्हणू? :(

दिल को टच कर गया ....

बापाच्या मुलांनी वेळेत शहाणपणा शिकावा. आषाढ कधी येईल सांगता येत नाही.

एकाच वेळी बापाचा मुलगा आणि मुलाचा बाप या दोन्ही अवस्थांतून मी स्वतः जात असल्याने हे लेखन मनात खोलवर उतरले. सांभाळा.

बापाच्या मुलाने बाकिच्या बापांच्या मुलांना काहीतरी सांगीतेले तेच खुप काही देउन जाईल बापाला. जपून रहा.

..........आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. .......... आई बद्दल एवढाच उल्लेख??

डोळे पाणावले....
'अंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तसं आयुष्य भिरकावून चालणार नाही
याच्याशी सहमत.
मुलाच्या बापाला आदरांजली!
हेच. आषाढातला पाऊस पडतोच आहे .... आता नेहमीच आषाढ... :( जपून रहा.

ऑफिस मध्ये बसून इथले लेख वाचायचे . आणि ते घरी गेल्यावर बाबांना दाखवायचे . असं नेहमी करतो . आज करेन कि नाही . हा लेख दाखवावा कि नाही . समजत नाहीये . . हिम्मत नाहीये . .

अंतर्मुख करून गेला लेख.. वेदनेला धार असतेच फक्त शब्द सापडायला हवेत, कधी कधी ती वेदनाच शब्दांना हाताशी धरुन घेऊन येते! 'बाप' लिहिलय.

लेख वाचून मन खिन्न झाले. इतर काही जणांनी म्हटल्याप्रमाणे मलाही काय प्रतिसाद द्यावा हाच प्रश्न पडला. ‘हाच मुलाचा बाप’ या मामा वरेरकरांच्या १९१७ साली लिहिलेल्या नाटकाची आणि नयनतारा सहगल यांच्या १९६३ साली लिहिलेल्या From Fear Set Free या आत्मवृत्ताची (मराठी भाषांतर 'ना खंत ना खेद'?) उगीचच आठवण झाली.

नि:शब्द झालो.

ही मनःस्थिती स्वतः अनुभवलेली आहे. ज्या महिन्यात माझ्या बापाच्या मुलाचा वाढदिवस असतो त्याच महिन्यात माझा बाप त्याला सोडून गेला. माझ्या बापाला लहान मुलांची खूप आवड होती. पण स्वतःचा नातू बघायला तो थांबला नाही. सगळ्याची घाई त्याला आयुष्यभर!

काय लिहू कळत नाही ..हेलावुन सोड्ल राव..

नोकरी सोडुन परत बापाच्या पायाशी बसुन सतरंजी वर लोळत राजा शिवछत्रपती ते ही त्याच्या गदगदलेल्या आवाजात ऐकावे वाटले, परत एकदा तालमीत त्याचा "बापू मार चाट पायावर अन कर चितपट लवकर" असा कुस्तीचा धड़ा देणारा बाप आठवला एकदम, ह्या शिपुर्ड्या मुलाचा बाप अजुन धड़धाकट आहे तरी एकदम त्याचे म्हातारपण जाणवले इथेच बसुन, परत गेलो तरी ड्यूटी सोडुन का पळून आलास भाड्या म्हणेल तो कारण तेच त्याला त्याच्या बापाने अन त्याने त्याच्या शिपुर्ड्या पोराला शिकवले आहे, सुट्टी मिळायला हवी लवकरच (नरडी ला कात्री अन काळजाला टोचणी लागलेला) बाप्या :'(

कहर लिहिलंय.

कहर लिहिलंय.

...

त्रास झाला वाचून..ज्याच्याबद्दल जे वाटेल, विशेषत: चांगलं, ते त्याच वेळी सांगितलं पाहिजे, हे आणखी प्रकर्षाने पटलं. बरेचदा हे जे भरभरून वाटणं असतं ते मनातच उरतं आणि वेळ निघून गेल्यावर आपल्यालाच छळतं...

९ व्या वर्षीच बाप देहरूपाने गेला पण अजून माझ्यात झिरपलेला/घुसलेला आतून (सुद्धा) कान पकडतो आणि काय बिशाद माझी त्याला नाही म्हणन्याची (त्याच्या लेकाच्या लेकाला सुद्धा हे माहीतेय चांगल, आणि म्हणून्च सगळ वसूल करून घेतोय सव्याज). पोरका पण मनाने एकटा नसलेला नाखुस.

आधी वर एकदा दिलाय म्हणून पुन्हा प्रतिसाद देणार नव्हतो, पण हा विषयच एका दुखर्‍या कोपर्‍याला पुनःपुन्हा घुसळून काढतो; आमचे वडील गेल्यावर माझ्या भावाने आवेगाने लिहिलेल्या ओळी आठवल्या त्या उद्धृत करतो आहे (माझ्या इथल्या अन्य एका संबंधित धाग्याच्या प्रतिसादांत त्या ओळी आमच्या एका परिचितांनी दिल्या होत्या): *************** 'बहुगुणी' यांच्या परिवाराला मी ओळखतो, आपणा सर्वांच्या संवेदनेबद्दल आभार. या कुटुंबात वडिलांना 'अण्णा' म्हणत, 'बहुगुणी' यांच्या धाकट्या भावाने व्यक्त केलेल्या त्याच्या भावना इथे पोहोचवतोय: ******************* 'तुमच्या सर्व गोळ्या घेतल्यात का, अण्णा?' हे विचारलं मी अण्णा 'इतक्या गोळ्या उष्ण पडतात का?' हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा 'इतक्या गोळ्या घेताहात, काही खाल्लंत का?' हे विचारलं मी अण्णा 'घेतला तो नाश्ता पुरेसा होता का?' हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा 'तुमच्या नियमाप्रमाणे चालून आलात का?' हे विचारलं मी अण्णा 'चालून पाय दुखले असतील, दाबून देऊ का?' हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा 'सारखी सारखी स्कुटी का चालवता?' हे विचारलं मी अण्णा स्कुटीमुळेच माझं औषध वेळेवर मिळालं हे सांगायचं विसरूनच गेलो, अण्णा 'सारखे सारखे फोटो काय काढता अण्णा?' हे विचारलं मी अण्णा आनंदी जगण्यासाठी हे गरजेचं असतं का? हे विचारायचं विसरूनच गेलो, अण्णा 'एवढी काळजी करतोस, सारखा मागे-मागे असतोस, तुला हुलकावणी देऊन, गुपचूप निघून जाईन' म्हणायचात 'तुझी फार तडफड होईल का रे पोरा?' हे विचारायचं विसरूनच गेले, अण्णा

माझा बाप आमची काळ्जी न करता कधीच निघून गेला, पण त्याची जागा आमच्या आईने घेतली अन स्वतः बाप झाली. तिची कायमच विचार्पूस करते.तिच्या आठवणीने डोळे पाणावले. आता लगेच तिला फोन करते.

दोन वर्षांनंतर पुन्हा वर आलेला हा धागा वाचून पुन्हा एकदा अंतर्बाह्य ढवळून निघालोय. अश्रूभरा दंडवत. एक विलाप-चित्रः .