✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वारी......

व
विजुभाऊ यांनी
Mon, 07/08/2013 - 00:10  ·  लेख
लेख
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात. आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात. त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो. खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत. गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे. आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात. तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51585 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा

प्रकाश घाटपांडे
Mon, 07/08/2013 - 19:22 नवीन
पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा लोक जर येत असतील तर मुलभूत सुविधांसाठी कुठलीही यंत्रणा पुरी पडू शकत नाही. मग ते सरकार कोणतेही असो.वारी मधे सगळ्या प्रकारचे लोक असतात. हौशे, गवशे, नवशे. वारी हा आता एक इव्हेंट झाला आहे माध्यमांना,राजकारण्यांना. विज्ञानयुगात वारीचे प्रस्थ कमी कमी होत जाईल असे वाटले होते पण उलटच होत चाललय. वारी मुळे अनेक लोकांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जातात म्हणुन वारी टिकून आहे.ते काही असले तरी वारी हा समाजजीवनाचा घटक आहे हे मान्य केले पाहिजे. वारीला समाजाभिमुख बनवताना कालसुसंगत पर्याये दिले पाहिजे. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी| भाविकांनो दुरदर्शनवर लाईव्ह दर्शन घ्या आता वारीचे! तिथे जाउन गर्दी करुन यंत्रणेवरील ताण वाढवू नका! भविष्यात अतिरेकी वारीला टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जरा जपून.
  • Log in or register to post comments

यंत्रणा, ताण आणि घाण....

धमाल मुलगा
Mon, 07/08/2013 - 21:09 नवीन
बाकी सगळं अगदी मान्य केलं, तरी मला एक कळत नाही, आज किती वर्षं झाली पंढरपूरात वारी येते? अजून यंत्रणेच्या अकलेची झोप पुर्ण होत नाही का? का नाही योग्य त्या पायाभूत सुविधा उभारल्या जात? दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्त विठ्ठलाची पूजा बांधता येते, त्या मुख्यमंत्र्यांसाठी, त्यांच्या ताफ्यासाठी सगळी सोय उभारता येते, मग स्वच्छतेच्या दृष्टीनं, मूलभूत सोयी-सुविधा / अत्यावश्यक स्वच्छतेसाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी करताना नक्की काय आडवं येतं? अमुक इतके वारकरी येतात, तमुक तितके वारकरी येतात हे दरवर्षी ऐकायला मिळतं, मग ह्याच आकडेवारीचा अहवाल घेऊन यंत्रणेला तयारी करता येत नाही का? नगरपरिषदेपासून ते मंत्रालयापर्यंत कुणीही ह्याबद्दल गांभिर्यानं विचार करत नाही, केलाच तरी कार्यवाही होत नाही....म्हणून यंत्रणेवर ताण येतो हे आपण कधी मान्य करणार? तळागाळातला अडाणी गावकरी त्या माऊलीच्या कळसाच्या एका दर्शनासाठी इतकी पायपीट सोसून, ऊन-वारा-पाऊस झेलत तडफडत येतो, त्या पंढरीतल्या एका दिवसाच्या आठवणींवर पुढचं उभं वर्ष काढतो. त्याच्या आत्मिक समाधानाची मोजणी आपण कशी अन काय करणार? वारी झाल्यानंतर पुढं जवळपास आठवडाभर वगैरे पंढरपूराचा पुरता उकिरडा झालेला असतो..मान्य! येणारे वारकरी अस्वच्छता प्रचंड प्रमाणावर करतात...मान्य! आजारपणं,रोगराई होण्याचा मोठा धोका संभावतो...मान्य! पण हे जर कळतं आहे, तर ह्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जी यंत्रणेची जबाबदारी आहे ती पुर्ण केली जाते का? फिरत्या शौचालयांची जुजबी सोय केली म्हणजे सगळं झालं का? यंत्रणेवर ताण पडतो हे जर तुम्हा-आम्हाला कळतं तर वर्षांनुवर्षं खुर्च्या उबवणार्‍या निर्णयप्रक्रियेच्या साखळीतल्या सरकारी शुक्राचार्यांना का कळू नये हे कोडं मला काही केल्या उमगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हे धमालराव फार कमी बोलतात पण

किसन शिंदे
Mon, 07/08/2013 - 22:11 नवीन
हे धमालराव फार कमी बोलतात;) पण जेव्हा बोलायला तोंड उघडतात तेव्हा मात्र 'बरंच' काही बोलून जातात. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धमु कमी बोलतो? कधीपासून?

यशोधरा
Mon, 07/08/2013 - 22:14 नवीन
धमु कमी बोलतो? कधीपासून? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

खॅक्क!

धमाल मुलगा
Tue, 07/09/2013 - 00:41 नवीन
ए गप की. कधी नव्हे ते कुणीतरी जरा चांगलं म्हणतंय मला तर लगेच का असं? :P @किसनदेवा: ठ्यांक्यू..ठ्यांक्यू हां! ;) (आपण भेटू तेव्हा एक मामलेदाराची मिसळ प्यार्टी करु आपुन. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

श्रद्धावान महाराष्ट्र.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/09/2013 - 02:03 नवीन
३ लाख भाविकांना सक्काळी सक्काळी ३ तास (६ ते ९) १००% शौचालयाची सोय लागणार आणि पुढे दिवसभरात तुरळक वेळा तरी लागणारच. एका माणसाला आपला कोठा साफ करायला १० मिनिटे लागतात तर ३ तासात एका शौचालयात १८ भाविक मोकळे होऊ शकतील म्हणजे ३ लाख भाविकांना मोकळे होण्यासाठी एकंदर १६६६७ शौचालये पाहिजेत. एका शौचालयास (१.५X१.५ मीटर) २.२५ मीटर जागा लागत असेल तर निव्वळ शौचालयांना ३७५०० चौरस मीटर जागा पाहीजे. त्यात लोकांना यायला जायला रस्ता पाहिजे. मैला वाहून नेण्याची/जाण्याची यंत्रणा पाहिजे. दहा शौचालयात एक ह्या हिशोबाने हातपाय धुण्यासाठी १६६७ मोर्‍या आणि नळ पाहिजेत. ही व्यवस्था महाराष्ट्रात जिथे जिथे वार्‍या मार्गक्रमणा करतात तिथे तिथे सर्व ठीकाणी पाहिजे. तसेच, मुंबईत आंबेडकरी जनतेसाठी ही अशी सोय असावी आणि जिथे जिथे मेळे, जत्रा भरतात तिथे तिथे ही सर्व व्यवस्था हवी. ही यंत्रणा उभारण्यासाठी येणारा खर्च, तसेच कर्मचारी वर्गाचे पगार, त्यांची राहायची व्यवस्था, विजेचा खर्च, डागडुजीचा खर्च सर्व अश्रद्ध लोकांकडून वसूल केला जावा. अशाने श्रद्धावानांची चांगली सोय पाहिली जाईल, अश्रद्धावानांमध्ये (कर टाळण्यासाठी तरी) श्रद्धेचे प्रमाण वाढीस लागेल आणि अवघा महाराष्ट्र अध्यात्म्याच्या वाटेवर वार्‍या, उत्सव, जत्रा, यात्रा, मेळावे वगैरे मार्फत देवाचरणी लीन राहून महाराष्ट्राच्या खात्यावरील पाप कमी होऊन पुण्य वाढीस लागेल. त्यामुळे दरवर्षी योग्य तितका पाऊस पडून शेते भरभरून धान्य येईल, नद्या कोरड्या पडणार नाहीत, अन्नावाचून, पाण्यावाचून कोणी मरणार नाही सर्वत्र आबादीआबाद नांदू लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हिशेब टीशेब आणि प्रतिसादातील विचाराशी सहमत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/09/2013 - 07:28 नवीन
शोचालयाचा तपशिलवार हिशेब आवडला. एका माणसासाठी लागणारा वेळ वगैरे तर लैच भारी. :) बाकी, पंढरपुरात नदीच्या काठावर फार तर हजारभर तात्पुरते शौचालये उभारली जातात. संख्या कमी जास्त असावी. पण पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी ही व्यवस्था अतिशय कुचकामी अशी आहे. काठावर उभे असलेली ही शौचालये केवळ आडोसा याच अर्थाची आहे. सर्व लोंढा उघड्यावर वाहात येतो. पंढरपुरात आषाढी नंतर पंधरा मिनिटेही माणूस थांबू शकत नाही. उघड्यावर माणसांनी केलेला प्रचंड राडा, मरणाची दुर्गंधी, घोंघावणा-या माशा, असो....! गर्दीच इतकी उसळते की कितीही व्यवस्था केली तरी ती कमीच पडावी. बाकी, जसे आत्मिक समाधान वगैरे हे जसे मान्यच आहे तसे शासन यंत्रणेवरील ताण वगैरे हेही मान्यच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हिशोब आवडला. मी वर

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/09/2013 - 11:38 नवीन
हिशोब आवडला. मी वर म्हटल्याप्रमाणे किती ही सुविधा पुरवण्याचा प्रामाणीक प्रयत्न जरी केला तरी तशी ती पुरवणे व्यवहार्य नाही. वारकर्‍यांनो/ श्रद्धावंतांनो पांडुरंगाचे आभासी दर्शन घ्या. तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे.विठठलाच्या दर्शनाला प्रत्येकाला पंढरपुरच कशाला पाहिजे? आणि तेही एका विशिष्ट दिवशी. त्यापेक्षा वर्षभरात अन्यवेळी जा ना हव तर! परमेश्वराच स्थान आपल्या मेंदूत आहे. परमेश्वराशी ( इथे स्पेसिफिक विठ्ठल) संवाद म्हणजे स्वतःशी संवाद. मला तर या वारी प्रकारातील वारकर्‍यांचा भाबडेपणा, गैरसोयी सोसून देखील दर्शनाची आस, परंपरेतील गतानुगतिकता काही लोक एन्जॉय करताना दिसतात. अर्थात मी त्यांना दोष देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत

पैसा
Tue, 07/09/2013 - 12:01 नवीन
फक्त काय होतं की जायचं न जायचं हे आपण आपल्यापुरतं ठरवू शकतो. इतर हजारों लाखों लोक आपलं ऐकणार नाहीत हे गृहीत धरून चालायचं. मग वर चर्चा झाली आहे तशी मुख्यमंत्र्यानी पांडुरंगाची पूजा वगैरे करण्यापेक्षा हज प्रमाणे व्यवस्था करता येणार नाही का? नैसर्गिक आपत्ती आली की सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. आता वारी दर वर्षी नेमक्या कोणत्या दिवसांत असते हे माहिती आहे मग तशी व्यवस्था कायमस्वरूपी करता येईलच की. असेच संमेलन रामलीला मैदानात निरंकारी पंथाचेही भरते. तिथे आता कशी व्यवस्था आहे माहिती नाही. पण काही वर्षांपूर्वी बेळगावहून तिकडे जाणारे एक काका काकू भेटले होते ते म्हणाले की लाखों लोक ७ दिवस एका जागी रहातात. संडास वगैरे फार कमी. मग आम्ही सगळे दिवस पाणी न पिता आणि संडासला न जाता रहातो. ऐकून आम्ही थक्क झालो. दिल्लीहून परत येताना दोन वेळा या निरंकार्‍यांचा भयंकर त्रास झाला होता. आमच्या रिझर्व्ड सीटवर कब्जा करून बसले होते आणि टीसीला पण ऐकत नव्हते. आम्ही देवाच्या कामाला जातो. जरा अ‍ॅडजस्ट करून घ्या म्हणे. अरे पण अ‍ॅडजस्ट म्हणजे १ दिवस झोपेशिवाय कस आणि का काढायचा? तेही आमच्या हातात कन्फर्म्ड तिकिटे असताना? दुसर्‍याची अडवणूक करा किंवा त्रास द्या असे काही देव कोणाला सांगत नाही! पण आपल्याकडे सगळीकडे 'चलता है' अशीच वृत्ती असते. दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करताही येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वैष्णव जन...

प्रभाकर पेठकर
Wed, 07/10/2013 - 16:47 नवीन
दिल्लीहून परत येताना दोन वेळा या निरंकार्‍यांचा भयंकर त्रास झाला होता. आमच्या रिझर्व्ड सीटवर कब्जा करून बसले होते आणि टीसीला पण ऐकत नव्हते. आम्ही देवाच्या कामाला जातो. जरा अ‍ॅडजस्ट करून घ्या म्हणे. अरे पण अ‍ॅडजस्ट म्हणजे १ दिवस झोपेशिवाय कस आणि का काढायचा? तेही आमच्या हातात कन्फर्म्ड तिकिटे असताना? दुसर्‍याची अडवणूक करा किंवा त्रास द्या असे काही देव कोणाला सांगत नाही! पण आपल्याकडे सगळीकडे 'चलता है' अशीच वृत्ती असते. दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करताही येत नाही.
आंबेडकर जयंतीला मुंबईत रेल्वेत आणि दादर परिसरात हाच अनुभव येतो. 'वैष्णव जन तो तेणे कहिए, पीड परायी जाणे रे..' वगैरे वगैरे भजनात म्हणायचे. प्रत्यक्षात?? आचार-विचारातील फरक हाच भक्तीमार्ग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे

अनिरुद्ध प
Tue, 07/09/2013 - 18:15 नवीन
घाट्पान्डे साहेब्,माफ करा लहान तोन्डी मोठा घास घेत आहे.पण तुमच्या कडुन वरिल वाक्याची अपेक्षा नव्हती,कारण उपक्रम वरिल एका लेखात आपण ईश्वर जगात नाही असे प्रतिपादले होते,आणि ईथे बरोबर याच्या विरुद्ध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लिंक

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/09/2013 - 21:32 नवीन
लेखाची लि़क द्या. मला आठवत नाही. मी इश्वर या बाबतीत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार नेहमी घेतो.बरेच लोक कृष्ण धवल दृष्टीने एखाद्या गोष्टी कडे पाहतात. खर तर त्यात करड्या रंगाच्या अनेक छटा असतात. विवेकी मानवतावादी जीवनासाठी इश्वर असणे नसणे मानणे न मानणे याने काही फरक पडत नाही. वारकरी हा सश्रद्ध व इश्वर मानणारा आहे असे गृहीत धरुन त्याला पटेल अशीच इश्वर या संकल्पनेचा आधार मी प्रतिपादनात घेतला आहे. मी व माझा देव या वि शं चौघुले यांच्या पुस्तकाचा परिचय उपक्रमावर दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

लिन्क

अनिरुद्ध प
Wed, 07/10/2013 - 19:39 नवीन
प्रकाश घाटपांडे [23 May 2013 रोजी 04:38 वा.] समाजातले बहुसंख्य लोक देव ही संकल्पना खरी मानतात, (त्याच्या स्वरुपाविषयी मतभिन्नता असेलही.) ही गोष्ट पण कीव करण्यासारखी मानावी लागेल. खर तर काही लोक अस मानतात देखील. पण उघडपणे तस बोलत नाहीत.समाजाचा रोष ओढवून जगता येणार नाही याचे अजुन तरी त्यांना भान आहे. देव ही संकल्पना मानणे ही सरळ सरळ अंधश्रद्धा आहे .अंधश्रद्धा ही बाब वै़ज्ञानिक दृष्टीकोणाच्या विरुद्ध आहे. घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे असे मानले आहे.परिणामी देव ही संकल्पना मानणे ही बाब घटना विरोधी आहे अशी मांडणी देखील करता येते. हा आपल्याच लेखाचा एक भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

खरच असे असेल तर...

अर्धवटराव
Wed, 07/10/2013 - 21:20 नवीन
>>परिणामी देव ही संकल्पना मानणे ही बाब घटना विरोधी आहे अशी मांडणी देखील करता येते... -- घाटपांडे सर दिग्गीराजा आणि राखी सावंत इ. मंडळींना साहित्यसेवा पुरवतात कि काय... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

-- घाटपांडे सर दिग्गीराजा आणि राखी सावंत इ. मंडळींना साहित्यसेवा

अनिरुद्ध प
Fri, 07/12/2013 - 13:30 नवीन
राखी सावन्त बद्दल माहिती नाही पण आपले दिग्गीराजा गेले काही वर्शे सहकुतुम्ब वारीत सहभागी होण्याचा फार्स करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अच्छा शिव शिव रे काउ ही ती

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/18/2013 - 15:41 नवीन
अच्छा शिव शिव रे काउ ही ती लिंक. चर्चेचा ओघातील तुकडा तोडून दिला की आशयाचा फोकस बदलू शकतो. वर मी असे म्हटले आहे की ".... अशी मांडणी देखील करता येते. तो देखील यनावालांच्या "कावळ्याला मृताचा आत्मा दिसतो हे अनेकजण खरे मानतात ही गोष्ट कीव करण्यासारखी आहे." या वाक्याच्या अनुषंगाने दिलेली प्रतिक्रिया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

माफ करा

अनिरुद्ध प
Mon, 07/22/2013 - 19:50 नवीन
आपल्याला असे म्हणणे अशी माझी योग्यता नाही पण त्या प्रतिक्रियेचे शिर्शक ' देव नाही' असेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वारी आणि वारकरी...

धमाल मुलगा
Mon, 07/08/2013 - 21:15 नवीन
आपण आपल्या पांढरपेशा विचारांच्या रिंगणातूनच विचार करतो त्यामुळं कदाचित आपल्याला ह्या गोष्टीतलं मर्म कळत नाही. वारी म्हणजे नक्की काय, त्यात काय काय चालतं, वारीचा विठ्ठल, ग्यानबा अन तुकाराम ह्यांच्या भक्तीशिवाय सोशिओ-इकॉनॉमिक असलेला पदर उलगडून पाहणं हे ही मोठं वेगळं प्रकरण आहे. पहा एकदा! शोधा..त्यातही गंमत आहे.
  • Log in or register to post comments

पोट धरुन हसत आहे.

अग्निकोल्हा
Mon, 07/08/2013 - 22:49 नवीन
.
  • Log in or register to post comments

डोक्याला शॉट

प्रसाद गोडबोले
Mon, 07/08/2013 - 23:41 नवीन
कैच्या कै फालतु लिहिलय ... अकाऊंटॅबिलीटी नाही म्हणुन काय वाट्टेल ते लिहितात लोक ... खरच राव हिंदुधर्माचे मऊ लागले म्हणुन कोपर्‍याने खणणयातला प्रकार झालाय ... फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे
  • Log in or register to post comments

याल्ला हबीबी, आधी ते फतवा

बॅटमॅन
Tue, 07/09/2013 - 00:42 नवीन
याल्ला हबीबी, आधी ते फतवा बितवा अन मुतव्वा जरा थंड घ्या बरं ;) हिंदू धर्माचे *ट वाकडे होणार नाही त्याविरुद्ध कोणी बरळल्यामुळे. राहता राहिला लेख. कैच्याकै आहेत काही मुद्दे, पण वारीमुळे सोयीसुविधांवर ताण पडतो अन त्याकरिता कोणी पावले उचलत नाही योग्य तितकी हे खरे नाही काय? लेखातला योग्य मुद्दा असेल तर तो इतकाच आहे. बहुत काय लिहिणे? तुम्ही सूज्ञ असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माझ्या सहसभासदांनो, मित्र आणि मैत्रीणींनो

चिंतामणी
Tue, 07/09/2013 - 00:18 नवीन
सगळे एव्हढे Excite का होत आहात. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्टीची दखल न घेतल्यमुळे हा धागाप्रपंच आहे हे तुमच्या लक्षात नाही का येत? विजूभौ सध्या परदेशस्थ आहेत. त्यामुळे या विचारसरणीचा पगडा त्यांचावर झाला असेल. पण परदेशागमनाची फारशी दखल न घेतल्यामुळे हा हा धागाप्रपंच आहे हे कृपया समजुन घ्या. :P
  • Log in or register to post comments

हा हा हा!!!

धमाल मुलगा
Tue, 07/09/2013 - 00:40 नवीन
पंत, इजाभाऊंचं लोकायतप्रेम (हे लोकायत निराळं...चार्वाकवालं!) पाहता, आश्चर्याचं कारण नसावं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

काही अंशी पटले

हुप्प्या
Tue, 07/09/2013 - 00:32 नवीन
अफाट लोकसंख्येमुळे पंढरीची वारीमुळे सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण पाडत असेल हे नक्कीच खरे. पावसाळा असल्यामुळे अस्वच्छता, रोगराई, अपघात वाढत असतील. त्यामुळे ही वारी कालबाह्य आहे असे मानायला जागा आहे. मात्र वारीवर बंदी घालणे वा असे विचार मांडायलाच बंदी घालणे ही भारतीय संस्कृती नाही. निदान नसावी. ज्यांना वारीचे दुष्परिणाम जाणवतात त्यांनी आपापल्या परीने लोकांपर्यंत पोचवावे. मिसळपाव हे व्यासपीठ ह्याकरता योग्य आहे. निदान ह्या विषयावर उहापोह होतो आहे आणि काही बाबींचे स्पष्टीकरण होते आहे हे ही नसे थोडके. ह्या सगळ्या प्रकारातील सरकारी सहभाग मर्यादित असावा असे वाटते. सार्वजनिक शिस्त ठेवण्याकरता पोलिस वापरले तर ठीक आहे पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा वगैरे खुळे बंद करावीत. त्याच प्रमाणे गणपती वा नवरात्र ह्या उत्सवांना हल्ली बाजारू, सवंग, गुन्हेगारी रुप आले आहे त्याविरुद्धही टिळकांप्रमाणेच समाज प्रबोधन केले पाहिजे. कदाचित कणाकणाने परिस्थिती सुधारेलही.
  • Log in or register to post comments

डोक्याला शॉट

विजुभाऊ
Tue, 07/09/2013 - 01:57 नवीन
डोक्याला शॉट गिरीजा - Mon, 08/07/2013 - 23:41 कैच्या कै फालतु लिहिलय ... अकाऊंटॅबिलीटी नाही म्हणुन काय वाट्टेल ते लिहितात लोक ... खरच राव हिंदुधर्माचे मऊ लागले म्हणुन कोपर्‍याने खणणयातला प्रकार झालाय ... फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे हिंदु धर्मच नव्हे तर बहुतेक धर्म हे जुनाट झालेले आहेत. बुरसटलेल्या विचाराना धरून राहिल्यामुळे त्यात शेवाळ साचलेले आहे. वारी म्हणजे हिंदू धर्म नव्हे किंवा महा आरत्या म्हणजेही धर्म नव्हे. राहता राहीला प्रश्न अकाउंटिबिलीटीचा.... वारीला गेलो/गणेशोत्सवात बीभत्स नाचलो /नवरात्रात डिस्को दांडीया केला/ साधु वान्याची धादान्त खोटारडी गोष्ट ऐकली / गाय या उपयुक्त पशूची विष्ठा -मूत्र प्यालो / डुकराला देवाचा अवतार मानला/कबुतराला चणे खायला घातले किंवा एकादशीला दुप्पट खाल्ली / पितरांच्या नावाखाली ब्राम्हणाला जेवू घातले / गटारी अमावस्येला दारू पिउन लोळलो / देवदासी-मुरळी बनून जटा वाढवल्या जोगती झालो की अकाउंटॅबिलीटी वाढेल असे म्हणायचे आहे काय. ( कृपया हे वैक्तीकरीत्या घेवु नये) मऊ लागले म्हणून कोपराने खणायचे...... स्वतःच्या घरात घाण झाली ती दूर न करता ती घाण दाखवून देणाराच घाणेरडा असाच अर्थ झाला ना त्याचा. असो फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे उत्तम सूचना आहे. मात्र हा फतवा कोणी काढायचा ते ठरवा. कांचीच्या - पुरीच्या शंकराचार्‍यानी की करवीर पीठाच्या शंकराचार्यानी / वल्लभचार्यानी / शिर्डीच्या पुजार्‍यानी की बालाजीच्या पुजार्याने / महंत आखाड्याने/ हिंदु महासभेने की बजरंग दलाने ? आणि फतवा काढणाराचे क्वालीफिकेशन काय ठरवायचे? त्याने केलेले उपास तपास की त्याने( तीने) केलेले इतर धर्मांचे निंदन ? आणि त्या फतव्याचे आदेश मानून त्याचे पालन कोणी करायचे. मुद्देसूद उत्तरे देता नाही आली की गुद्देसूद हालचालीना जवळ करावे लागते हे नेहमीच जाणवते. अवांतरः देवाला दारूचा नवैद्य दाखवा/ देवाला बळी द्या / देवाला मुलीचा नवैद्य दाखवा / देवाला स्वेटर घाला / देवाला दूध पाजा अशा बर्‍याचशा रुढी आहेत. रुढी म्हणजे धर्म नव्हे असेही कोणी साम्गतात. गिरीजा ताई/बै/मावशी तुमच्या डोक्याला षॉट लागून थोडा वेळ उलटला असेल तर मग हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का? व्रते वैकल्ये म्हणजे धर्म नव्हे / पोथ्य पुराणे म्हणजे धर्म नव्हे हेही खरे. अती अवांतरः हिंदू धर्मातील नवव्या अवतारा संदर्भातील बुद्ध पुराण हे वाचण्यास निषिद्ध का मानतात हो? ते निषिद्ध असेल तर बुद्धाला अवतार तरी का मानतात हे सांगाल का? मी कै च्या कै लिहीले असेल ....... शक्य आहे. अजाण बुद्धी बालक आहे. मग नीट चांगले काय ते सांगाल तर हे अजाण बालकाच्या मतीत भर पडेल. हिंदू धर्माचे स्वरूप अल्प मतीला उमजेल.
  • Log in or register to post comments

उत्तर

प्रसाद गोडबोले
Tue, 07/09/2013 - 22:36 नवीन
विजुभाऊ , आपण आग्रह केलत म्हणुन उत्तर देत आहे , एरव्ही अशा काथ्याकुटातुन काहीही कन्स्ट्रक्टीव्ह ऑटपुट निघत नाही असा अनुभव आहे ...
वारी म्हणजे हिंदू धर्म नव्हे किंवा महा आरत्या म्हणजेही धर्म नव्हे.
>>> हिंदु ही जगण्याची पध्द्ती आहे (असं कोर्ट म्हणतं ...मी नाही ). वारी / महाआरती / गणेशोत्स्वव वगैरे वगैरे हे सर्व जगण्याचे भाग आहेत . लाखो लोक भक्तीभावे ते करीत आहे त्यामुळे हे सर्व म्हणजेच हिंदुधर्मच(किंवा जे काही म्हणाल ते) त्याचा अविभाज्य भाग आहे ...आहेतच.
अकाऊंतॅबिलीटी
>>> मला असे म्हणायचे होते की , आज आपल्याला खात्री आहे की हिंदुधर्माविषयी काहीही बोला सगळं खपवुन घेतलं जातं ...सब चलता है... you are not accountable for what you say . आणि म्हणुनच असं काही बोलायचं आपण धाडस करु शकता .इतर धर्मात असता तर हे धाडस केले असते का ? आणि केले असते तर किती काळ जगला असता ?
स्वतःच्या घरात घाण झाली ती दूर न करता ती घाण दाखवून देणाराच घाणेरडा असाच अर्थ झाला ना त्याचा. असो
ओके . मला आपल्या विषयी वैयक्तिक माहीती नाही म्हणुन विचारत आहे १)आपण म्हणता शेतकरी कामधंदा सोडुन वारीला जातात . >>> ह्यामुळे शेतीचे उत्पादन किती प्रमाणात घटते अशे आपण शंशोधना अंती सिध्द केले आहे ? २) शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो >>> शासन यंत्रणेवर अवास्तव ताण आणणार्‍या इतर घटनांबाबत आपण इतरत्र अजुन काही लिहिले आहे का ? शिवाय माझ्या माहीती नुसार शासन हे लोकांच्या सुविधे साठी आहे त्यांच्यावर बंधने आणण्यासाठी नाही . ३) शासन यंत्रणेवर ताण पडु नये म्हणुन आपण किती स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन पर मदत केली आहे ? ४) एकुणच वारी ह्या प्रकाराने (तुमच्यामते) जे काही नुकसान होत आहे , ते होवु नये म्हणुन आपण काय कन्स्त्रक्तीव्ह कार्य करीत आहात ?
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
हा आत्मघातकीपणा फक्त आणि फक्त हिंदुधर्मातच दिसतो ...( कारण परत तेच ... अकांटॅबिलीटी नाही ...उचलली जीभ लावली टाळ्याला ) . आपल्या सणाचे उत्सवांचे उद्देश मागे पडले म्हणुन उत्ववच बंद करायचे की ते उद्देश ठळक करण्या करीता कार्य करायचे ? (अवांतर :आज हिंदुंना कधी नव्हती इतकी जनजागृतीची गरज आहे ... म्यानमार मधल्या वादांचे पडसाद बोधगयेवर उमटतात... आसाम बांग्लादेशी वादाचे पडसाद मुंबैत ... जरा डोळ्यावरचा सेक्युलॅरिझम गॉगल बाजुला करुन पाहिलंत तर कळेल हा दहशतवाद भारता विरुध्द नाहीये , हिंदुधर्माविरुध्द आहे .) हिंदु फतव्या बद्दल बोलायचेच झाले तर ह्यात कोणाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नसेल . फक्त आपण जे बोललात त्याबद्दल " कारणे दाखवा " नोटीस बजावण्यात येईल ... सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल. अवांतर :
हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का?
>>> आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म ही झाली क्लासिकल डेफिनिशन . आजच्या काळात बोलायचे तर "परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम" दुसर्‍यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसर्‍याला (प्रोअ‍ॅक्टीव्हली)पीडा देणे हे पाप असे जो मानतो तो हिंदु ( हे वैयक्तिक मत. प्लीज नोट द बोल्ड पार्ट ...) अती अवांतरः
हिंदू धर्मातील नवव्या अवतारा संदर्भातील बुद्ध पुराण हे वाचण्यास निषिद्ध का मानतात हो? ते निषिद्ध असेल तर बुद्धाला अवतार तरी का मानतात हे सांगाल का?
कोण निशिध्द मानतं ? कर्मयोग ह्या पुस्तकात स्वामी विवेकानंद बुध्दाला हिंदु कर्मयोगाचा आदर्श मानतात ! आणि इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर बुध्दाला अवतार मानणे ही एक क्लासिकल खेळी आहे ...मुत्सद्दीपणाचा कहर नमुना आहे ...हिंसेने जितके धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ते धर्म आज जगात टिकुन आहेत...आणि हिंसा करणारे लयाला गेले आहेत ....हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!! असो . थोडा अजुन काथ्या बाकी आहे तो दुसर्‍या प्रतिसादात कुटतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

थोडा उरलेला काथ्या

प्रसाद गोडबोले
Tue, 07/09/2013 - 23:09 नवीन
विजु भाऊ , गीतेत म्हणलं आहे " न बुध्दीभेदं जनयेद अज्ञानाम् कर्मसंगिनाम् | जोषयेत सर्वकर्माणि विद्वानयुक्तः समाचरन ||" जाणकार माणसाने जे लोक अज्ञानाने श्रधेने कर्म करीत आहेत त्यांच्या मनात बुध्दीभेद निर्माण करु नये. उलट आपण स्वतःच ती कर्मे विद्वान मनुष्याप्रमाणे करावीत ( आणि आदर्श घालुन द्यावा) आपल्याला वारीचा प्रापंचिक भौतिक परिणामांची( शेती ची कामे थंडावणे , शासन यंत्रणेवर ताण ब्लाह ब्लाह ) इतकतीच काळजी आहे तर आपण स्वतः वारीत सहभागी व्हा अन हे सारे कसे टाळता येईल ह्यावर प्रयत्न करा , शासन यंत्रणेवर ताण पडु नये म्हणुन वारकरी स्वयंसेवक नेमा , त्यांच्या कडुन कार्य करुन घ्या , शेतीच्या कामांबाबर काय समस्या येतात ते जाणुन घ्या त्यावर काम करा तर तुम्ही खरे हिंदुधर्मसुधारक ... उगाचच आपल्या मताची पिंक टाकणे ह्यात काही कौशल्य नाही . बिचारे भोळे भाबडे भाविक विठुमाऊलीच्या प्रेमाने ओढीने वारीला जात आहेत त्या बिचार्यंच्या मनात संभ्रम करुन काय गम्य आहे ( उलट अशा श्रध्दातुन मोकळे सुटलेले अन ज्ञानाची पातळी न गाठलेले लोक समाजासाठी फार धोकादायक असतात हे मी पैजेवर सांगु शकतो ) आता लास्टली मला ह्यात बोलायचा किती अधिकार आहे ? काहीच नाही पण अजुन थोडं कन्फुजन आहे तुकाराम महाराज म्हणतात " भले तरी तरी देवु कासेची लंगोटी नाठाळाचे माथी काठी हाणु " ह्याचे अनुकरण करावे की " तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे " ह्यातलं नक्की काय करावं ? कन्फ्युजन क्लीयर होईल तेव्हा भोळ्या भाबड्या लोकांच्या मनात संभ्रम निरमाण करण्याच्या ह्या नाठाळपणा बद्दल डोक्यात काठी घालायला येवु किंव्वा प्रतिसाद द्यायचे बंद करु .... :P अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धन्यवाद गिरीजा तै

विजुभाऊ
Wed, 07/10/2013 - 03:18 नवीन
कोण निशिध्द मानतं ? कर्मयोग ह्या पुस्तकात स्वामी विवेकानंद बुध्दाला हिंदु कर्मयोगाचा आदर्श मानतात ! आणि इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर बुध्दाला अवतार मानणे ही एक क्लासिकल खेळी आहे ...मुत्सद्दीपणाचा कहर नमुना आहे ...हिंसेने जितके धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ते धर्म आज जगात टिकुन आहेत...आणि हिंसा करणारे लयाला गेले आहेत ....हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!! गिरीजा तै आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद. फक्त आपल्यासाठी काही नोंदी : बुद्धा पाखंड सांगुन अधर्म्यांंचा नायनात केला. त्याने पाखंड सांगितले म्हणुन ते वाचू नये. असे म्हण्टले जाते. विवेकानंदानी हिंदू धर्मातील भोंगळपणाबद्दल जे काही सांगितले ते मात्र आपन सोयीस्करपणे विसरताय. हिंदु धर्मातील सोवळे ओवळे/ पली डाव्या हातात धरावी की उजव्या हातात धरावी असले भोंगळ काथ्याकूट वगैरे बद्दल विवेकानंदानी बरेच काही सांगितलेले आहे ( संदर्भः कर्मयोग: विवेकानंद) हिंदुधर्माविषयी काहीही बोला सगळं खपवुन घेतलं जातं ...सब चलता है... you are not accountable for what you say . आणि म्हणुनच असं काही बोलायचं आपण धाडस करु शकता .इतर धर्मात असता तर हे धाडस केले असते का ? आणि केले असते तर किती काळ जगला असता ? खरे तर बहुतेक सगळे धर्म हे कालबाह्य झालेले आहेत. मी स्वतः धर्म मानत नाही. माझ्या घरात बहुतेक धर्मातील लोक आहेत.त्यामुळे तथाकथीत धर्माचरण आम्ही कोणीच करत नाही. एखाद्या धर्मावर टीका केली म्हणजे त्याबद्दल अकाउंटॅबिलीटी नसते या निष्कर्षावर तुम्ही कशा आलात ते कळत नाही. असो. तुम्ही लिहीताना एकाच वाक्यात बौद्ध तत्वज्ञानाला चांगले म्हणता आणि त्याचवेळेस "हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!! " तो धर्म नामशेष केल्याबद्दल तथाकथीत हिंदू धर्मीयाना जिनीयस म्हणत त्यांची पाठ थोपटता. यातला भोंगळपण तुमच्या लक्षात येतोय का. आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म या व्याख्ये नुसार आपण आज कोणत्याचप्रकारे आर्य जीवन पद्धती आचरत नाही ( उदा यज्ञात पशुंचे बळी देणे वगैरे) सनातन संस्कृती: हे नक्की काय प्रकरण आहे सांगाल काय? वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले. वैदीक तत्वज्ञानातील एखादे तत्वज्ञान कळाले तर बरे होईल. निदान इथल्या लोकानातरी माहीत होईल. "आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म " एकीकडे हिंदू हा धर्म नाही. ती जीवन पद्धती आहे असे साम्गता. फक्त आपण जे बोललात त्याबद्दल " कारणे दाखवा " नोटीस बजावण्यात येईल ... सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल. थोडक्यात हे झुंडशाहीचे समर्थन झाले. मग काय फरक उरतो तुमच्या व्याख्येत आणि "खाप पंचायतीच्या" निर्णयात. अवांतर :आज हिंदुंना कधी नव्हती इतकी जनजागृतीची गरज आहे चुकीच्या चालीरीतीबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही. मात्र जनजागृती हवी. हे कसे काय जमवणार बॉ. तुमच्या बहुतेक वाक्यांसाठी एक प्रश्न विचारायचे धाडस करतो. तुम्ही सनातन प्रभातच्या ठाण्यातील कार्यकर्त्या आहात का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सो फतवा कोणीही काढु शकेल ...

विजुभाऊ
Wed, 07/10/2013 - 03:22 नवीन
सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल. मुद्द्यांचा प्रतीवाद करता आला नाही की गुद्द्यांचा आधार घेतला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विवेकानंदानी हिंदू धर्मातील

प्रसाद गोडबोले
Wed, 07/10/2013 - 11:06 नवीन
विवेकानंदानी हिंदू धर्मातील भोंगळपणाबद्दल जे काही सांगितले ते मात्र आपन सोयीस्करपणे विसरताय.
अहो विवेकानंदांनी हिंदुधर्मासाठी अवाढव्य कार्य केलय म्हणुन त्यांना बोलण्याचा अधिकार आहे टीका करण्याचा अधिकार आहे! आपलं काय योगदान आहे धर्मासाठी वारीसाठी ? आपण जर धर्माच्या उत्थानासाठी जराही काही कार्य करीत असाल तर बोला टीका करा अवगुण हटवण्यासाठी प्रयत्न करा... "उगाच अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी ह्यावर बोलताना आपण पुणे म्युनिसिपाल्टीत उंदीर मारायचा कामावर आहोत हे विसरुन जाण्यातला" प्रकार नको.
एखाद्या धर्मावर टीका केली म्हणजे त्याबद्दल अकाउंटॅबिलीटी नसते या निष्कर्षावर तुम्ही कशा आलात ते कळत नाही.
तुम्ही तुमच्या विधानांची अकाऊटॅबीलीती घेत आहात ? वा वा ...आता आपण वारी परंपरेतील गुणदोष घालवण्यासाठी काय कार्य केलेत ? ह्या धाग्याची वाट पहात आहे .
तो धर्म नामशेष केल्याबद्दल तथाकथीत हिंदू धर्मीयाना जिनीयस म्हणत त्यांची पाठ थोपटता. यातला भोंगळपण तुमच्या लक्षात येतोय का.
मी बौध्द तत्वज्ञानाला कुठे चांगले म्हणालो ? मलातरी माझ्या प्रतिसादात असे काही वाक्य दिसत नाही . बुध्द माणुस म्हणुन भारी होता पण त्याचे तत्वज्ञान मुळातच खंडीत आहे अपुर्ण आहे ज्ञानेश्वर माऊलीही त्याला गणेशाच्या तुतलेल्या दाताची उपमा देतात ....
काय फरक उरतो तुमच्या व्याख्येत आणि "खाप पंचायतीच्या" निर्णयात.
माझ्या व्याखेत हिंसेला जागा नाहीये हे सोयीस्कर रित्या विसरलात . इतर धर्माचा स्वतंत्र पर्सनल लॉ बोर्ड आहे मग हिंदुंचा का नसावा ?
चुकीच्या चालीरीतीबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही. मात्र जनजागृती हवी. हे कसे काय जमवणार
बोला की . चुकीच्या चालीरीतींबद्दल . कोण नाय म्हणयत ... पण आधी आरशात पहा स्वतःच तेवढा अधिकार आहे का हे विचारुन पहा ? आपले धर्माला काय योगदान आहे आणि आपण काय बोलतो काय करतो ह्याचा ताळमेळ घातलेला दाखवा . अहो तुकाराम महाराजांनी , कबीरांनी टीका केलीच की अनिष्ट रुढींवर पण त्यांचा अधिकार होता . सावरकर म्हणाले की गाय फक्त उपयुक्त पसु आहे . अहो पण त्याचा बोलण्यचा अधिकार होता , धर्माला योगदान होतं ? आपलं काय योगदान आहे ते दाखवा आधी ... मग बोला .... आणि खरं सांगतो , आपलं सिग्निफिकन्ट योगदान असेल धर्माला आणि मग आपण टीका करीत असाल अन दोष हटवण्याचा प्रयत्न करीत असाल तर आम्ही तुम्हालाही लोटांगण घालुच . ( पण एकुणच असं काही आहे असेल वाटत नाही )
वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.
ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही . अवांतर : मी सनातन प्रभात , आर एस एस , विहिंप , बजरंग दल , वारकरी संप्रदाय , धारकरी संप्रदाय ह्या कोणाशीही संबंधीत नाही . सध्या एका कट्टर मुस्लिम देशात रहात आहे आणि त्रयस्थपणे हिंदुधर्माचा तुलनात्मक अभ्यास करीत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ब्येस्ट

अभ्या..
Wed, 07/10/2013 - 12:20 नवीन
ब्येस्ट गिरीजाभौ. सही भिडलायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

स्पा
Wed, 07/10/2013 - 12:56 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पण एकुणच असं काही आहे असेल

विजुभाऊ
Wed, 07/10/2013 - 19:47 नवीन
पण एकुणच असं काही आहे असेल वाटत नाही ) <
वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.
ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही .
हा हा हा. हेच उत्तर अपेक्षीत होते. वैदीक तत्वज्ञान नक्की काय आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे पुढे बोलन्यात अर्थ नाही ही शुद्ध पळवाट झाली. चालायचे......... धर्माला योगदान द्यायचे म्हणजे काय ते समजुन सांगाल का. म्हणजे मलादेखील कळेल की काय करायला हवे. सावरकरानी :गाय हा उपयुक्त पशू आहे : असे सांगितले होते ते मानायचे मात्र गोमुत्र्/गोमय हे श्रेष्ठ ही श्रद्धा ठेवायची. गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत ही श्रद्धा पुढच्या पीढी कडे सोपवायची हा दुटप्पीपणा राखायचा. या वरून मी असे म्हंणणार नाही की " या वरुन तुमची जाण कळली पुढे बोलण्यात अर्थ नाही " कारण मी तुमच्या चुकीच्या मताला देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. असो. तथाकथीत वैदीक परंपरेचे अभिमानी इतरानी मांडलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही असे कळाल्या नंतर बोलण्यात अर्थ नाही अशी पळवाट शोधतात हा अनुभव मला नेहमीच येतो. तुम्ही अपवाद नाही. असो........... चुकीच्या मतांचा दुराग्रह ठेवणार्‍यांशी चर्चा करण्यात मलाही स्वारस्य नाही.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पळवाट म्हणे

प्रसाद गोडबोले
Wed, 07/10/2013 - 23:55 नवीन
अहो कसली आलीये पळवाट ? तुमच्या एकन एक प्रस्नाचे उत्तर देतो ... वैदीक धर्मावर गच्चम व्याख्यान देतो हवं तर... अहो पण तुम्ही इम्प्लिमेन्टेशन करणार आहात काय ? फील्ड मधे उतरुन काम करणार आहात काय ? वारीला जाऊन जनजागृती करणार आहात काय ? तशी ग्यॅरंटी देत असाल तर बोला... सगळ्या प्रश्णांची उत्तरे देतो. उगाचच नुसतं इन्टलेक्चुअल मास्टर्ब्युशन करण्यात काय अर्थयं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गिरीजा तै/भाऊ

विजुभाऊ
गुरुवार, 07/11/2013 - 18:46 नवीन
गिरीजा तै/भाऊ माझी तयारी आहे. वैदीक धर्मावर किंवा त्याच्यावर डोळस अभ्यासू विवेचन वाचायला आवडेल. कोणी पटवून दिले तर ते अमलात आणायची इच्छा आहे. प्रश्नाना वाटाण्याच्या अक्षता न लावता त्याचे नीट उत्तर मिळाले तर कोण्या मुमुक्षुला आवडणार नाही. जनजागृती चे म्हणाल तर त्यासाठी कायम तयार आहे. मी अभाविप साठी कॉलेजात असताना फील्ड वर्क केले आहे. अनिसं साठीही काम केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी अभाविप साठी कॉलेजात असताना फील्ड वर्क केले आहे.

अनिरुद्ध प
गुरुवार, 07/11/2013 - 19:42 नवीन
विजु भाऊ, कोलेजात असताना,बहुतेकानी फिल्ड्वर्क केले आहे,त्याचा ईथे काय सम्बन्ध्?,मुद्दा असा आहे की आपण एकदाही वारीत भाग न घेता,फक्त पुण्यात घाण झाली म्हणुन प्रथा बन्द कर्ण्याचा सल्ला देत आहात्,म्हणुन मी आप्ल्याला आधी सन्गितले की आपण आधी वारीचा ईतिहास तपासा आणि अभ्यास करावा मग आप्ल्याला हिन्दु धर्मा विषयी अधीक माहिती मिळेल्,मी कोणी तज्ञ नाही परन्तु आपण जेव्हा धागा सुरु केला तेव्हा मला आपल्या वारी बद्दल्च्या ज्ञाना बद्दल शन्का आली म्हणुन मी आपल्याला अभ्यास करुन लिहायला हवे असे उत्तर दिले होते ते आपण दुर्ल्क्षीत केले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी जनजागृतीचे काम करायला तयार

विजुभाऊ
गुरुवार, 07/11/2013 - 20:20 नवीन
मी जनजागृतीचे काम करायला तयार आहे हे साम्गण्यासाठी कॉलेजात असताना फील्डवर्क केले आहे हे सांगितले. मला वारी बद्दल ज्ञान नाही हे मी अगोदरच सांगितलेले आहे. पुण्यातच नव्हे तर मी जो रस्ता पाहीला तो सातारा- पंढरपूर रस्ता अक्षरशः ओपन टॉयलेट झालेला असतो. शासनयंत्रणेवर अनाठायी ताण येतो. सर्वसामान्य पोलीसामवर ताण येतो. इत्यादी गोष्टीमुळे मी ही प्रथा आता बंद करुया असे म्हणालो होतो. एखादी प्रथा पूर्वी चाम्गली होती पण तीचा उद्देश कालबाह्य झाला त्यामुळे अनुचित गोष्टी घुसल्या. त्याचा समाजाला त्रास होतो. धार्मीक गोष्ट म्हणून सर्वसामान्य त्या विरोधात बोलु शकत नाहीत्.अशा कालबाह्य प्रथा बंद कराव्यात असे माझे म्हणणे होते. त्यासाठी वारीचा अभ्यासक असलेच पाहिजे असे नाही. वारीच्या अभ्यासापेक्षाही ;गणेशोत्सवात बिचार्‍या रस्त्यावरच्या हवालदारांचे हाल तुम्हाला समजले तर त्यांची दया येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

एखादी प्रथा पूर्वी चाम्गली होती पण तीचा उद्देश कालबाह्य झाला

अनिरुद्ध प
Fri, 07/12/2013 - 13:16 नवीन
हे तुम्ही कुठल्या अभ्यासा॑वरुन ठरवले?गेली जवळ्पास ७०० वर्षे चाललेली परम्परा कोणीहि कोणावर ही कसल्याही प्रकाराची सक्ति न करता चालु आहे ते सुद्धा अग्दि शिस्तबद्ध पद्धतिने,तसेच बहुतेक वारकरी हे स्वताच्या खर्चने जातात्,सरकार त्यन्च्यासाठी प्रवास फुकट करण्यास परवान्गी देत नाहीत. धार्मीक गोष्ट म्हणून सर्वसामान्य त्या विरोधात बोलु शकत नाहीत्.अशा कालबाह्य प्रथा बंद कराव्यात असे माझे म्हणणे होते. हे तुम्हाला कोनि सनगितले या वारी भाग घेणारे हे सर्वसामान्यच असतात. आणि तुम्हाला अभ्यासक व्हायला कोणी सान्गत नाही आहे.फक्त आपण धागा सुरु करताना आपल्याला एखाद्या गोष्टीचे जुजबी माहिती पण न घेता स्पोटक विधाने करणे हे अधीक घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गिरीजा तै एक व्यक्ती म्हणून

विजुभाऊ
गुरुवार, 07/11/2013 - 20:11 नवीन
गिरीजा तै एक व्यक्ती म्हणून तुमच्या बद्दल पूर्ण आदर बाळगुन आहे तरी ही उगाचच नुसतं इन्टलेक्चुअल मास्टर्ब्युशन करण्यात काय अर्थयं ? मला वाटते तुम्हाला या मास्टरबेशन या शब्दाचा अर्थ समजत असावा. मित्रांसोबत असताना हे वाक्य गम्मत म्हणून एकदम भन्नाट आहे. मात्र या इथे मला ते आक्षेपार्ह आहे. एखाद्या विषयावर नीट माहिती देणे याला तुम्ही तो शब्द वापरत असाल तर मात्र अवघड आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन कोणाशी बोलायची मला इच्छा नाही. तुमची लेव्हल कळाली असे म्हणायचे नाही पण मनात मात्र तो विचार आल्याशिवाय राहीले नाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वर म्हणताय भन्नाट वाक्य खाली

प्यारे१
गुरुवार, 07/11/2013 - 22:26 नवीन
वर म्हणताय भन्नाट वाक्य खाली म्हणताय आक्षेप हाय. तुमचे दोन आयडी आहेत, की तुम्ही दोन आयडींमध्ये विभागले गेला आहात? ;) - हे अवांतर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कदाचित सध्या त्यांना सगळ्या

कवितानागेश
Fri, 07/12/2013 - 15:08 नवीन
कदाचित सध्या त्यांना सगळ्या भन्नाट गोष्टींनाच आक्षेप घ्यायचाय... ;) -हेदेखिल अवांतरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वारी बंद करावी.. मग ?

बन्या बापु
Tue, 07/09/2013 - 06:33 नवीन
विजुभौंशी सहमत नसलो तरी, त्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं, मूलभूत सोयी-सुविधा / अत्यावश्यक मुद्द्यावर काही सुचले ते असे: - वारी सारखेच हज यात्रा दरसाल होत असते. तेथील व्यवस्थापन गुण आपण वारीसाठी लागू करू शकतो का ? शासनाचे व्यवस्थापन विषयक नक्की धोरण ते काय ? जाणून घेण्यास उस्तुक आहे. राज्यशासन आणि केंद्रशासन हज यात्रेकरूंना येण्याजाण्यासाठी तिकिटे काढून देतात.. किमानपक्षी आमचे माळकरी चालत जातात तर त्यांना मुलभुत सुविधा मिळू नयेत का ? - वारी प्रमाणे मुंबईत महानिर्वाण दिवस आणि नागपूर येथे चैत्यभूमीवर दसर्याला साजरे केले जाणारे धम्म चक्र प्रवर्तन दिन ह्याबाबत काय करायचे ? लक्ष्मीनगर येथे राहणारे नातलग सांगतात की लोक प्रात:विधीसाठी वाटेल तिथे बसतात आणि नागपूरचा संडास करून जातात. मग इथेही तोच नियम लावायचा की भीमशक्ती पुढे बोलायचे नाही ? ह्यावर कहर म्हणून रेल्वे / एसटी ह्या शासकीय परिवहन मंडळांना फुकट प्रवास करणार्याचा भुर्दंड बसतो तो वेगळाच ! तुकोबाराया / माउली ज्या वारीत पांडुरंगाच्या ध्यानात दंग झाले तेवढी वारी बरी खुपते आपल्याला ? हे म्हणजे हिरवा चालतो, निळा चालतो, पण भगवा कुठे दिसला की हाण दगड असेच झाले.
  • Log in or register to post comments

टोल माफी.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/09/2013 - 11:31 नवीन
ह्यावर कहर म्हणून रेल्वे / एसटी ह्या शासकीय परिवहन मंडळांना फुकट प्रवास करणार्याचा भुर्दंड बसतो तो वेगळाच !
ह्याही पुढे म्हणजे छगनराव भुजबळांनी सर्व वारकर्‍यांच्या गाड्यांना सर्व 'टोल' माफ केला आहे.
हे म्हणजे हिरवा चालतो, निळा चालतो, पण भगवा कुठे दिसला की हाण दगड असेच झाले.
सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

त्यात काय गैर आहे ?

बन्या बापु
Tue, 07/09/2013 - 12:02 नवीन
पेठकर काका, टोलमाफी करणे आणि दरडोई रु ७०,००० सवलत देणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. विकीपेडीयाला प्रमाण मानले तर २००५ -२०१० ह्या वर्षांमध्ये रु 28,917.7 million इतका खर्च हज यात्रेसाठी आला आहे. "मुळात एकाला एक आणि दुसर्याला दुसरा असा न्याय का ?" हा प्रश्न आहे. फुकाचे बोल आहेत म्हणून फक्त हिंदू परंपरेला दुषणे देत बसा असे का ? क्रिस्ती लोकांचे vatican city हे प्रमुख धर्मस्थळ. त्यावर दर साली $355.5 million इतके पैसे खर्ची पडतात.पंढरपूर सुधारणेसाठी किती पैसे खर्ची पडले आणि कुठे पडले ह्याचा हिशेब कुठेही उपलब्ध नाही. मराठमोळी माणसाची पंढरी ( मराठी माणसाची vatican city ) चर्चेत आली की घाण, व्यवस्थापन, शासन यंत्रणेवर पडणारा ताण, काय करायचे असल्या रूढी घेऊन वैगेरे आठवतं का लगेच ? बाकीचे ते डोळस आणि आम्ही तेवढे अंधश्रद्ध, अडाणी हा सूर आवडला नाही. आणि वैयक्तिक निषेद नोंदविला आहे. बाकी चालू दे. शेवटी आपण मराठी माणसे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आम्ही सर्व देवाचीच मुले.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/09/2013 - 19:24 नवीन
"मुळात एकाला एक आणि दुसर्याला दुसरा असा न्याय का ?"
त्याला विरोध आहेच. माझ्या प्रतिसादातील 'सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.' हे विधान तुमच्या कडून वाचायचे राहून गेले आहे असे दिसते. मी तर ह्या पुढे जाऊन म्हणेन फक्त वारकर्‍यांनाच टोल माफीची सवलत का? आमच्या शेजारचे म्हातारे काका-काकू दरवर्षी शिर्डीला जातात, कोणी वारी व्यतिरिक्त इतर वेळी पंढरीला जातात, जैन त्यांच्या देवाला भेटायला जातात, महाराष्ट्रातील इतर खेडोपाड्यातून आणि शहरांमधूनही मुंबई-पुण्यात गणपती दर्शनासाठी हजारो-लाखो लोकं येत जात असतात, प्रत्येक जाती-धर्मातील लोकं त्यांच्या त्यांच्या गावच्या देवांच्या उरुसाला जात असतात सर्वांनाच टोल माफी करा. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असे का?
क्रिस्ती लोकांचे vatican city हे प्रमुख धर्मस्थळ. त्यावर दर साली $355.5 million इतके पैसे खर्ची पडतात.पंढरपूर सुधारणेसाठी किती पैसे खर्ची पडले आणि कुठे पडले ह्याचा हिशेब कुठेही उपलब्ध नाही.
तसा आग्रह सरकारकडे धरा. राज्यकर्ते (सत्ताधारी आणि विरोधक) दोघेही एक मुखाने मान्यता देतील $355.5 million एवढे मोठ्ठे कुरण मिळणार असेल तर ते नाही कशाला म्हणतील? शेतकर्‍यांना कर्जमाफी स्वरूपात नाही दिले ६५००० कोटी? किती पोहोचले कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यापर्यंत? किती आत्महत्या रोखल्या गेल्या?
मराठमोळी माणसाची पंढरी ( मराठी माणसाची vatican city ) चर्चेत आली की घाण, व्यवस्थापन, शासन यंत्रणेवर पडणारा ताण, काय करायचे असल्या रूढी घेऊन वैगेरे आठवतं का लगेच ?
शेजारच्याच्या घरात काय घाण आहे ह्या पेक्षा माझ्या घरात काय आणि किती घाण आहे ती कशी स्वच्छ करता येईल ह्या विचारांनी मी व्यथित होतो.
बाकीचे ते डोळस आणि आम्ही तेवढे अंधश्रद्ध, अडाणी हा सूर आवडला नाही.
'बाकीचे अंधश्रद्ध आहेत तर आम्ही का नसावे?' हा सूर मलाही आवडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

बौद्धिक चाचणी प्रश्न पहिला -

मोदक
Tue, 07/09/2013 - 07:25 नवीन
बौद्धिक चाचणी प्रश्न पहिला - रिकाम्या जागा भरा. १) वारी २) सिंहस्थ ३) ..?? ४) ..???
  • Log in or register to post comments

जुन्याजुन्या घाणेरड्या रुढी

कवितानागेश
Tue, 07/09/2013 - 11:05 नवीन
जुन्याजुन्या घाणेरड्या रुढी सुरु ठेवनार्‍या जुन्या धर्माचा निषेध! जुने सगळे लाथाडून टाकणार्‍या नवीन धर्माचा निषेध! या दोन्हीत सामिल होणार्‍यांचा 'क्रांतीकारकांचा' निषेध! हे सगळे नुसतं बघत बसणार्‍या सामान्य माणसांचा निषेध! सगळा गोंधळ सुरु असूनही शाबूत असलेल्या भारत सरकारचा निषेध! ... ... .... ..... जाउ द्या ना. आपण किर्तन करु.. जय जय राम कृष्ण हरी| जय जय राम कृष्ण हरी| जय जय राम कृष्ण हरी| जय जय राम कृष्ण हरी|
  • Log in or register to post comments

मान्य आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/09/2013 - 11:35 नवीन
सरकारी यंत्रणेवर ताण पडतो, गर्दी, सुविधांचा अभाव,पर्यावरण, आरोग्य, याबाबतीत समस्या निर्माण होतात हे जर मान्य असेल माणिक वर्मा यांनी गायलेले 'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे ऐकेन म्हणतो....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

'कुठे शोधीशी रामेश्वर......'

प्रभाकर पेठकर
Tue, 07/09/2013 - 11:45 नवीन
किंवा 'कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी....' हे गाणं ऐकत बसावं. इश्वर चराचरात भरून आहे. त्याला शोधण्यासाठी, भेटण्यासाठी देवळात का जावे लागावे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेतकर्‍याच्या शेतात धान्य

यशोधरा
Tue, 07/09/2013 - 11:54 नवीन
शेतकर्‍याच्या शेतात धान्य पिकतं. ते विकत घेऊन खायचं कशाला? बघूनच पोट नाही का भरणार? नद्या, तलाव भरुन वाहतात ( कधी कधी) ते न पिताच तहान भागते का हो? हवा आहेच की अवतीभवती, श्वास कशाला घ्यायचा? घरं बांधून का रहायचं वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे चराचरात देव भरुन असला तरी वारीला जातात. समाधान मिळतं. जीव हरखतो. विठूमाऊली भेटते. पुढल्या वर्षाची उस्तवारी करायचं बळ देते. सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा अमान्य नाहीच पण माशी नाकावर बसते म्हणून नाक कापाल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा