Skip to main content

डोंबिवली कट्टा वृत्तांत..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 30/05/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत कट्टा करायचा असं मुक्त विहारींनी ठरवलं, आणि कट्टा होणार की नाही इथपासून तुम्ही डोंबिवलीकरांनी राजकारण केलंत पर्यंतच्या ब-याच चर्चा मिपावर घडून आल्या. पण काहीही झालं तरी कट्टा करायचाच असा ठाम निर्धारच मु.वि. नी केलेला असल्यामुळे अखेरीस ठरलेल्या दिवशी, रविवार २६ मे, रोजी, नंदी पॅलेस मध्ये कट्टयाचा बेत ठरला. कट्ट्याची उपस्थिती किती हा मुद्दा गौण असल्याने जितके आले ते कट्टेकरी. आलो तर येईन पासून रात्री उशीर होईल पण नक्की येईन असं सांगून टांग देणारे वगळले, तरी ४ जण नक्की येणार हे कळलं. मुलूंडच्या डॉ. सुबोध खरेंना खास निमंत्रण होतं, आणि त्यांनीही येण्याचं मान्य केल्यामुळे चौघांमध्ये सुद्धा कट्टा रंगणार याची खात्री झाली. ठरलेल्या वेळी मु.वि. हाटेलात जाऊन मोक्याची जागा पकडून बसले. (हो, त्याच दिवशी आयपीएल चा अंतिम सामना असल्यामुळे हाटेल वाल्यांनी मोठ्या पडद्यावर सामना दाखवण्याची सोय केली होती) पाठोपाठ डॉ. खरे सुद्धा आले. मी आणि निम मात्र डोंबिवलीच्या संडे स्पेशल ट्रॅफ़िकमध्ये अडकलो, आणि जवळपास दीड तास उशिरा, ९.१५ ला पोहोचलो. नंदी पॅलेस डोंबिवलीतल्या रहदारी आणि कोलाहलाच्या बाहेर, एमआयडीसी मध्ये हायवे वर असणारं एक जब्राट हॉटेल आहे. त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये आमचा कंपू जमला होता. संध्याकाळचा सुखद गारवा, हॉटेलमध्ये चालू असलेल्या लाईव्ह गझला, आयपीएल सामना आणि आमची गप्पाष्टकं, सुंदर मिलाफ़ जमला होता. ओळखपाळख झाल्यानंतर, आधी मु.वि. चे आखाती देशांबद्दलचे अनुभव, तिथल्या नोकरीच्या संधी, यांवर चर्चा झाली. त्यानंतर डॉ. खरेंचं मेडिकल आणि नौदलाचं अनुभवकथन सुरू झालं, आणि बाकी सगळे विषय मागे पडले. हे विश्व आम्हां तिघांना अगदीच अपरिचित, त्यामुळे विक्रांतवरचे दिवस, आलेले बरे वाईट अनुभव, हे खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकण्यातली मजा निराळीच होती. सोबत उदरभरणासाठी वशाट कोंबडं आणि इतर पदार्थ होतेच. गप्पांमध्ये दोन अडीच तास कसे गेले कळलंच नाही. त्यातच मुंबई पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्याचा वाटेवर होती, त्यामुळे स्टेडियम सारखाच गदारोळ आणि उत्साह इकडेही दिसत होता. पेटपूजा, गप्पा, आणि चेन्नईचे फ़लंदाज धारातिर्थी पडल्यावर टाळ्या शिट्ट्य़ा अशा धमाल वातावरणात चौघांचाच, पण आठवणीत राहील असा कट्टा रात्री १२ च्या सुमारास आटोपला, आणि पुन्हा एकदा भेटण्याचं आश्वासन देऊन सगळे आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले. a उपस्थित कट्टेकरी (डावीकडून) - प्रथम फ़डणीस, मुक्त विहारी, सुबोध खरे आणि निम.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12864
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

कट्टा वृत्तांत आवडला. डॉ.सुबोध खरे यांनाही कट्ट्यावर पाहतांना आनंद वाटला. मनातल्या मनात : हल्ली कोणत्याही धाग्यावर मूळ विषयावरील प्रतिसादांपेक्षा अवांतर उपप्रतिसाद फारच पडायला लागलेत वाटतं. असो, चालायचंच. -दिलीप बिरुटे

कट्टावृत्तांताने आनंद झाला. फक्त ... एकीकडे मॅच आणि तिथेच दुसरीकडे गझलचा लाईव्ह कार्यक्रम ही अरेंजमेंट फार विचित्र वाटली. कोणीतरी हॉटेलात पैसा कमावण्यासाठी का होईना, गातोय आणि तिथेच लोक मॅचकडे प्रसंगोपात्त लक्ष लावून बसले आहेत याने एक ओळ गावी आणि तिकडे सिक्सर बसावा, की लोक याला दाद द्यायची सोडून मधेच तिकडे चियर करणार असं?? एकवेळ खाता पिता लाईव्ह गझल (कला) ऐकणं आता अ‍ॅक्सेप्ट केलं आहे पण त्यातही एकावेळी दोन ऑप्शन्स?

In reply to by गवि

अहो दोन काय तीन ऑप्शन होते. एकीकडे मैच होती ती म्युट मध्ये होती आणी त्यासमोर फक्त क्रिकेट प्रेमी होते. मुक्त विहारिनी जागा पण अशी मोक्याची पकडली होती कि आम्हाला समोर मैच दिसत होती. उजवीकडे गझल पाहता आणी ऐकता येत होते. समोर नॉन व्हेज प्लैटर होता. (आणी पिणेकरांची पिण्याची सोय होती.)

छोटेखानी कट्टा छानच झालेला दिसतोय. अवांतरः कुठल्याही अधिवेशनाला एखाद्या पक्षाच्या वळचणीला लागण्याच्या नुसत्या शक्यतेच्या भीतीनेदेखील अधिवेशनाला जाणारांची गर्दी कमी होतेच. ;)

छान झालेला दिसतोय कट्टा. वर्णन वाचून डॉ.खर्‍यांना भेटण्याची इच्छा तीव्र झाली. पुढच्या वेळेस.

बर्‍याच दिवसांनी मिपाकरांच्या कट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळाला. उपस्थितांची संख्या नेहमीपेक्षा कमी असली तरी कट्टा जोरदार झालेला दिसतोय. यशस्वी आयोजनाबद्दल संबंधीतांचे अभिनंदन. डॉक्टर साहेबांना फोटोत प्रथमच बघून कल्पनेपेक्षा प्रत्यक्षातले व्यक्तिमत्व खूपच वेगळे निघाल्याचा धक्का बसला. ते डॉक्टर आहेत हे ठाऊक नसतं तर त्यांचा फोटो पाहून ते (डॉक्टर नसलेले) लष्करी अधिकारीच वाटले असते :-). बाकी मुविं यांचे मुलांच्या शेतीचे प्रयोग चांगलेच यशस्वी झाले असले तरी कर्मधर्मसंयोगाने डोक्यावरील केसांची शेती थांबून अनेक वर्षे झाले असल्याचे दिसत आहे ;-).

मित्रहो मला स्वतः ला असे वाटते आहे कि माझे कौतुक जर जास्तच होत आहे. कदाचित नवा सदस्य असल्याने असेल पण एक तर तेवढी माझी लायकी नाही आणि मला असे वाटत नाही कि कोणाचे ही व्यक्तीगत रित्या एवढे कौतुक करावे.कोणीही सदस्य मूळ संस्था किंवा समूहापेक्षा मोठा नसतो आणि नसावा. मी आपला आभारी आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी मिपा वर कित्येक नव्या सदस्यांच रॅगिंग कसं कसं घेतलं जातं माहीत आहे ना.. तुम्ही खरचं तुमच्या क्षेत्रातील जाणकार आहात, तुमचे लिखाण, तुमचे अनुभव सगळ्यांनाच आवडतात.. आणि अशांच मिपाकर दिल खोलून कवतिक करतात.. :)

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी, लष्करी अधिकाऱ्यापद्धल नेहमीच भितीयुक्त आदर वाटत आला आहे. आपण कदाचित या प्रतिक्रियांना आपले कौतुक म्हणत असाल. पुढल्या कट्टयावर आपणास भेटण्यास नक्किच उत्सुक आहे.

छान छान!! कट्टा वृत्तांत आवडला. सुबोध खरे यांना पाहतांना आनंद वाटला. मुवी तुम्ही चेपुवरच्या फोटोपेक्षा इथे वेगळे दिसताय. पुढच्या वेळेस डोंबिवलीत कट्टा झाल्यास नक्कीच येईन. :-)

वा... पुढल्या कट्ट्याला येण्यास पसंती दाखवणार्‍यांची संख्या वाढतेय पाहून आनंद झाला.. :)

नंदी पॅलेसच्या फार जुन्या आठवणी आहेत, आणि त्या पुन्हा उजळाव्या अशा नाहीत हे खरं कारण न येण्याचं, आणि हो कट्टा जरा कौटुंबिक झाला असे प्रतिसाद आले असते ते वेगळेच. असो, पुढच्या कट्ट्याला हजर राहण्यात येईल.

ब्वॉरं... तसाही पुढला कट्टा पावसाळ्यात असल्याने शक्यतो कुठेतरी भटकंतीच्या ठिकाणीच ठरवू म्हंजे कसं??

कट्टा झकास झालेला दिसतो. हा कट्टा मला जमणे कठीण होते. असो, पुढील कट्ट्याला भेट होईलच. अवांतर :- जुन्या कट्टे आयोजकांना मरगळ आली असताना नवीन कट्टे आयोजक तयार होत आहेत हे बघून आनंद झाला :-)