भारतीय भोंगाशास्त्र !
मंडळी, मिपावर पहिल्यादाच लिहायचे धाडस करतोय. सर्व जेष्ठ, श्रेष्ठ जाणत्याचा कळावे लोभ असावा.
विदेशवारीला भारतात आलेल्या एका जर्मन ला दिलेली ही दीक्षा आहे. म्हणजे द्यावीच लागली हो…
तर मुळात हापिसच्या कामासाठी भारतात आलेला हा प्राणी. आत्ता फारिनर (त्याला काय काम सांगायचे का ?) व गोरा म्हनल्यावर काय मजा होती.राव . हिकडचे काहीही काम न करता हादडुन हाण्डी वर येणार म्हनुन सकाळी सकाळी धावायला सुरुवात करतो म्हणाला. कर बाबा म्हटले . आपल्याला तर हे काही पटत नाही. असे धावून धावून पोट कमी झाले असते तर तो रमेश पोवार असा सुजला असता का ? आणि पोहल्याने बारीक होत असते तर पाम्पलेट ला ईव्हडा भाव असता का ? बरं ते जाऊ द्या.
तर सुरवातीला बिचारा दररोज जोशात घरुन निघायचा व अर्ध्या रस्त्यातुन भेदरलेल्या कोकरासारखा घाबरुन परतायचा. एकदा ढसाढसा आत ओतल्यावर त्याची व्यथा बाहेर आली
.
काय तर म्हणे , दररोज सकाळी हा रस्त्याच्या कडेने व (अस्तिव असल्यास) पदपाथाने धावायला जायचा. व मागुन येणा-या वाहनाचा भोंगा वाजला का गोंधळून जायचा. मुळात आपले काय चुकतेय तेच बिचा-याला कळेना. असल्या काही प्रकाराची त्याला सवयच नव्हती. ( आपल्याकडे नसला तरी भोंगा बडवणे विदेशात अपमान करण्यासारखे आहे म्हणे …. )
जर्मन म्हणाला, स्थिरावला समाधित तो स्थितप्रज्ञ कसा असे ?
आयला जर्मन गीता कसा गायला लागला म्हणून मी डोळे चुरू लागलो. पण नाय जरा जास्त झाली होती राव । ते बेणं तर ईचारत होत….
रस्त्यावरुन तुमच्या धावू कसा ? फिरू कसा ? चालू कसा ?
म्हणाला शरण तुम्हा आलो, तुम्हीच योग्य ती दीक्षा द्या… आता इव्हडी स्तुती एकूण आमची छाती फुलुन आली (पोट कधीचाच फुगले होते ) अन क्षणात आमचा मुरली मनोहर झाला बघा .. म्हणालो गुपित तुला सांगतो वत्सा, येथी चालायची कैसे. जीव वाचवायचा कैसे...आणि त्यानेच आर्डर केलेल्या मच्छी प्ल्याटरचा दुवा उडवत आम्ही तेंस भारतीय भोंगाशास्त्राचा महिमा वर्तविला, तो असा…
अध्याय पहिला :-
तुम्ही रस्ताच्या अगदी कडेने जाताहेत अगदी पायाखालच्या मुन्गीकडेही तुमचे बारीक लक्ष आहे. व आपण कुणाच्या अध्यात मध्यात नाही याची तुम्हाला पुर्ण जाणिव आहे… - मागुन अगदी छोटा आणि एकदाच भोंगा वाजतो. -- अजिबात घाबरायचा नाय. ह्या भोंग्याचा काहिही धोका नसतो. ती फक्त एका सुचना असते, की तुमचे शुद्र अस्तित्व वाहनचालकाने मान्य केले आहे. आहे तसाच चालत रहा. वळलास, हाललास, अगदी शिंकरलात तर मेलास म्हणुन समज.
अध्याय दुसरा :-
तुम्ही रस्ताच्या कडेने जाताहेत (अगदी नाही बरं का) आणि पदपाथावरुन चालना-या श्वानावर तुमचे बारीक लक्ष आहे ( व याला हे कसे जमते याचे आश्चर्य आहे) . व आपण कुणाच्या अध्यात मध्यात नाही असा तुमचा समज आहे. …- मागुन थोडा मोठा पण एकदाच भोंगा वाजतो - थोडे घाबरा.. मागे वळून पहा.. आपण किती मोठी चुक करणार होतो ( चुक काय हे आपल्याला समजणे येथे गौण असते) व फक्त त्या ईश्वररुपी वाहनचालकामुळे तुम्ही भुतलालावर आहात हे त्या एका कुत्सित नजरेत तुम्हाला जाणवेल. बाजूला सरका. विसरू नका - तुमचे रस्त्यावरील अस्तित्व नेहमप्रमाणे शुद्रच आहे.
अध्याय तिसरा (खंड १ ) :-
तुम्ही रस्ताने जाताहेत (मग आपल्या बापाचा नाय का पैसा लागला तो बनवण्यात असा तुमचा रुबाब आहे.) आणि पदपाथावरुन चालना-या म्हशीवर तुमचे बारीक लक्ष आहे ( मुळात तिला अडचण होऊ नये म्हणूनच तुम्ही उदार मनाने रस्त्यावरुन (बापाच्या) चालताहेत). व आपण कुणाच्या अध्यात मध्यात येऊचा शकत नाही असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. मागुन अतिशय मोठठा व कर्णकर्कश भोंगा बडवल्या जातो. चालक प्राणी भोंग्यावरच बसलाय हे पण जाणवते.. घाबरा असे सांगणार नाय, तुम्हाला केव्हाच घाम फुटायला सुरवात झालेली असते. खाली नजर गेल्यावर लक्षात येते की पदपाथ काळा झाला आहे आणि बाकी सर्व त्याला रोड समजताहेत. बाप पण दूर दूरपर्यंत दिसत नाहिये.
मागे वळून पहा . - एक अतिशय थंड नजर तुम्हाला सोलुन काढत असते. आता हुश्श म्हणायला हरकत नाही. सहसा ही थंड नजर वातानुकुलित वाहनाच्या काचाआडुनच असते, व ती बर्यापैकी लौकर थंड पण होते. (गाडीबाहेर पडुन आपल्यासारख्या तुच्छ प्राण्याबरोबर बाचाबाची करण्यात त्याला वेळ नसतो, आणि वर उन्हाची, हापिसात लेट होण्याची, कपडे खराब होण्याची त्याला फार चिंता असते. ) थोडेसे ओशाल्यागत हसा.. .तो पुढे निघुन जातो, पण ते नजरेने लेखलेले तुच्छपण तुमचा पिछा काही सोडत नाही.
अध्याय तिसरा (खंड २ ) :-
मघासारखेच कुणाच्या अध्यात मध्यात नसलेले तुम्ही रस्त्यावरची "हिरवळ" न्हाहाळत रस्त्याच्या मध्ये घसरलाय… मागुन अतिशय मोठठा ( पावर हार्न का काय म्हणतात त्याला ) कर्णकर्कश भोंगा बडवल्या जातो. - तुम्ही मागे वळून पाहता, एक (सहसा पांढरी ) गाडी बिनाचालक तुमच्या बुडाला टेकुन उभी असते. बिनाचालक ही गाडी ईथे कशी ब्ब्वा ? असा ईचार मनात येईपर्यन्त तुमच्या कानाखाली भूकंप झाला असतो. क्षणात रोडवरील सर्व गाड्या फेरारी झाल्यासारख्या शांत होतात ( त्या सुजलेल्या कानावर दुसरा आवाज जातच नाय.) हळूहळू जाणीव आल्यावर "ब,भ" ची बाराखडी कानावर पडते. एक काळा पैहलवान (मग असल्याशिवाय हिम्मत करेल का तो ?) तुम्हाला कुठून सोलायचा याची पूर्वतयारी करता असतो.. मघाशी कानाखाली वाजलेल्या दवंडीमुळे आत्ता मस्त तमाशा पाहायला मिळणार म्हणून दर्शक जमलेले असतात. तर घाबरू नका. आत्ता कानाखाली वाजल्यावर घाबरुन काय फायदा तसा पण ?
अंगात विरश्री चढल्याप्रमाणे फेरहमला करा. शरीरात नसला तरी आवाजात जोर आलाच पाहीजे… ( उसना असला तरीबिन चालेल). . रस्ता त्याच्या बापाचा आहे का विचारा (सहसा नसतोच). लक्षात ठेवा, दबलात तर सुजवल्याशिवाय सोडणारा नाही तो सांड. एव्हडे होतपर्यंत तेथे ब-यापैकी न्यायमुर्ती तयार झालेल्या असत्यात. मग त्यांच्या कृपेने भेटलेला आशिर्वाद व प्रसाद घेऊन आज कुणाचे तोंड पाहीले होते हे आठवत पुढे निघा.
अध्याय तिसरा संपेपर्यंत वत्साचा दस्त सुरु झाल्यासारखा चेहरा झाला होता. आपापर्यंत डोक्यात असलेली बियर कंबरेपर्यंत खाली उतरली होती.
वत्स म्हणला, नारायणा ! असा कसा तुमच्या देशात अजब न्याय ? रस्त्यावरुन जाण्या-या सामान्यांना किंम्मतच नाय ?
म्हणालो बाबा आमच असच हाय. आम्हाला मरणाची घाई हाय, आन त्या भोंग्यावरच आमचा राग, लोभ, माया हाय,. आम्हासारखी बिझी समस्त भुतलावर कुनिबिन नाही. आम्हाला आमाच्या गाडीपुढे आलेला गरीब चालत नाही, श्रीमंत चालत नाही. खंगलेल्या जीवांची तमा झिंगलेल्या डोळ्यांना नाय. सांडलेल्या रक्तापेक्षा आणि फाटलेल्या कातडीपेक्षा गाडीला आलेल्या सुरुकुत्याची आम्हाला जास्त पर्वा हाय.
वत्साला ईशारा कळला होता. आणि आमचा पण दुष्टांत संपला होता…
निघालो शेवटी गाडीकडे झिंगतच भोंग्यावर बसायला.......
याद्या
4656
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
वा
ओह, मला वाटलं भारतीयांच्या
+१
In reply to ओह, मला वाटलं भारतीयांच्या by सस्नेह
मस्त
स्वागत..
मस्त!
शिर्षक वाचुन लेख उघडावा की
आरारा !
मस्त लिहिलंय
झकास
अध्याय शेवटचा
मिपावर स्वागत...
*****
नारायण सुर्वे का हो?
In reply to ***** by जेपी
पिपिप्प.. पों पों..
छान खुसखुशीत आवडले
खत्र्या लिवलंय.
लेख आवडला...
तिडीक
शौक नाही गरज.
In reply to तिडीक by वेल्लाभट
धन्यवाद..
धन्यवाद..