Skip to main content

पोरगं अभ्यासच करत न्हाय राव !

लेखक १००मित्र यांनी गुरुवार, 16/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही वर्षांपूर्वी क्रेट्स विकायचो.[माझ्या बहुविध उद्योजकतेचा आणखी एक [अ]यशस्वी टप्पा !- हा हा हा ! तेव्हा एकदा संगमनेरला गेलो, सक्काळी-सक्काळी मार्केट-यार्डला पोचलो. थेट एका दुकानात शिरलो. दुकानात एक लहानसं- ९-१० वर्षांचं पोरगं होतं. आम्ही जरा इकडे-तिकडे घुटमळतोय असं दिसल्या-दिसल्या त्याचा प्रश्न :- "कॅरट विकता काय ?" "हो, मालक कुठेत" -- माझा व्यवहारी, मॅच्युअर्ड प्रश्न ! चक्क दुर्लक्ष करून तो पुढे :- "किती ग्राम ? १६५ दिसतोय , शेकंडचा माल हाय का नव्वा ?" लग्गेच "कॅरट" काट्यावर पोचवलसुद्धा "कार्ट्या"नं ! वजन तब्बल (३) ग्रामनी चुकलं हो - १६२ ग्राम भरलं. त्याचा आगाऊपणा चालूच :- "काय रेट?" , "अर्धी गाडी देता का?" , "चेक पेमेंटच लागतं का?", "इथे आम्हाला कॅशच मिळते" वगैरे वगैरे.... तेवढ्यात दस्तुरखुद्द मालक ऊर्फ त्या आगाऊ कार्ट्याचे वडील हज्जर ! "सॉरी, जरा उशीरच झाला राव, जा रे च्या सांग..." "तुमचा...हा...मुलगा आहे का ?"-- मी. " कसला भारी आहे राव " " अहो, हो ना ! हितं बसतो सारखा, सांगतो लेका शाळंला दांड्या नको मारू, असं शिक्षणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल , काय म्हनता ?" "खरंय" --- मी अवाक.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4398
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

खरंय. नर्‍हे मध्ये मी राहतो तिथं जवळ एक मेडिकल स्टोअर आहे. तिथं फार्मासिस्टचा ९-१० वर्षाचा मुलगा आहे. डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन वाचण्यापासून (सगळ्यात अवघड काम) औषध घेऊन पैसे देऊन दीड मिन्टात माणूस बाहेर पडतो.

लेख आवडला. आमच्या ऑफीसजवळ्सुद्धा मागच्या १-२ महीन्यापासुन चहाच्या टपरीवर एक छोटा (९-१० वर्षे) मुलगा आलाय. मे महीना सुट्टी म्हणुन आला असावा. पण त्याच्या २ मोठ्या भावांपेक्षा (वय १८-२० वर्षे) तो लयीच फाष्ट आहे. पटापट चहा, सामोसा, सिगारेट, वडा-पाव ई. हिशोब करतो. शिवाय इतक्या कमी वेळात त्याने गिऱ्हाईकांशीदेखिल चांगलीच ओळख केली आहे. काहीजण जन्मजात उद्योजक, नेते असतात हेच खरे

हा हा हा किस्सा आवडला. पोरगं चुणचुणीत होतं तर. बाकी पुढे-मागे बापाचीच गादी चालवणार असेल तर मग जुजबी शिक्षण घेउन हे 'व्यावसायीक' शिक्षण घेतलं तर उत्तमच. आम्हीतरी चार बुकं शिकुन कुठले मोठे दिवे लावले म्हणा. ;)

ज्यांची दुकानं/स्वःताचा व्यवसाय असतो त्यांच्या मुलांना ते उपजतच बाळकडु मिळत. त्यात आच्शर्य ते काय? वाघाच्या बछड्यांना जशी शीकार शीकवावी लागत नाहि तसाच काहिसा प्रकार :)

In reply to by दिपक.कुवेत

शिक्षण कुठलं ह प्वाइंटाचा मुद्दा हाय दीपकशेठ !
वाघाच्या बछड्यांना जशी शीकार शीकवावी लागत नाहि तसाच काहिसा प्रकार
येकदम राइट पघा ...

छान. अशी कितीतरी पोरं/पोरी असतात भवताली, ज्यांची गरज 'शाळा' भागवू शकत नाही. ज्याला/जिला जे आवडतं ते शिकायला मिळणा-या शाळा कधी होतील आपल्याकडे? दुसरा विचारः जे आवडतं तेच फक्त केलं तर कालांतराने इतर काही आवडण्याची शक्यता कमी होऊन जाते का? उद्या जगण्याच्या लढाईत दुसरा काही पर्याय स्वीकारावा लागला तर? तेव्हा मग 'शाळा शिकलो/शिकले असते तर...' असं दु:ख वाटण्याची कितपत शक्यता?

In reply to by आतिवास

हं....काही काही आहेत म्हणा. पण "शाळा" म्हटलं की पुन्हा समूह आलाच. आणी आवडतं तेच फक्त करायचं म्हटलं ....की......हो, खरंच "न" आवडणा~या गोष्टी वाढत जातात. एक प्रकारे रेझिस्टन्स वाढत जातो. त्यापेक्षा जे करू, किंवा जे समोर येइल, ते आवडून करण्याची "साधना" केली तर ?

चलाख पोरग! अतिवासच म्हणन पण पटतय तरीही, ज्यात गती आहे ते करायची संधी देत बाकिचे शिक्षण पुरवणी म्हणुन सुरु ठेवता आल अतर किती बर होइल अस वाटत कधी कधी. मिपावर स्वागत. लिहीत रहा.

आयुष्य हीच एक मोठी शाळा आहे. अनुभवांचा शिक्षक तुम्हाला घडवत असतो. विद्यार्थी हुशार असेल तर व्यावहारिक आणि संवाद चातुर्यात खूप प्रगती करू शकेल. ह्या भांडवलावर तो कुठल्याही व्यवसायात प्रगती करु शकेल. तो करत असलेला व्यवसाय सोडून इतर कांही करण्याची वेळ आली तर काय? अशी भिती बाळगण्याचे कारण नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी पटलं प्रभाकर.... विद्यार्थी हुशार असेल, असं म्हणण्यापेक्षा हुशार तोच जो विद्यार्थी.... असं फक्त म्हणेन. आणी ही "भीती" च तर मारक ठरतिये ना !

In reply to by १००मित्र

त्यांना प्रथमच मिपावरती कुणी असं पहिल्या नावानं हाक मारत असावं. :) त्यांनी आता "अंकल्स क्लब" सोडावा अशी जाहिर विनंती.

आपल्याकडे, १०वीत चान्गले मार्क = पोरगा हूशार १०वीत कमी मार्क = पोरगा नालायक/ढ/कामातून गेला

अभ्यास, शिक्षण, पदवी वगैरे बाबत इतकेच दिसून आले की प्रतिथयश विद्यापीठाची पदवी, परिक्षेत उत्तम गुण मिळाले म्हणजे वाईट अथवा भले होतेच असे नाही अथवा त्यात न शिकल्याने हमखास भले अथवा वाईट होतेच असे नाही. उपलब्ध शिक्षण, आसपास काय घडते आहे त्याचे भान व त्या त्या परिस्थितीत वेळोवेळी घेतलेले निर्णय याचा एकत्रित परिणाम आयुष्य पुढे सुखकर होते की नाही त्यावर होतो. भले मुलगा दुकानात शाळेपेक्षा जास्त शिकेल पण शाळेत-कॉलेजात गेला असता एखादे सर, एखादा मित्र अथवा त्या मित्राचे कुटुंबिय यांच्या सानिध्यात अजुन महत्वाच्या चार गोष्टी शिकला असता तर तोही मोठा फायदा. भले दुकानात धंदा शिकेल , पैसे कमवेल पण दोस्ती-नात्यात चार महागड्या गुंतवणूक इन्शुरन्स पॉलीस्या, भलत्या जागी गुंतवणूक, गरजेपेक्षा जास्त सट्टा असा व्यवहार करुन बसला, वेळ, पैसा गणीत न जमल्याने कुटूंबात दुरावा आला तर त्याची फळे भोगावी लागतीलच. तुमचा किस्सा आवडला पण ह्या पलीकडेही पाहीले पाहीजे. शिक्षण आवश्यक, सतत शिक्षण/ आढावा आवश्यक. आता ते नेमके कसे व कुठे घ्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे! Costly - affordable or not normally depends on the currency it is expressed in - plate of 4 samosas - Rs. 70 (not expensive on the wallet) however when you see it as 'running a half marathon' (same calories as 4 samosas!!) - it looks damn damn expensive!!

In reply to by सहज

पण दोस्ती-नात्यात चार महागड्या गुंतवणूक इन्शुरन्स पॉलीस्या, भलत्या जागी गुंतवणूक, गरजेपेक्षा जास्त सट्टा असा व्यवहार करुन बसला, वेळ, पैसा गणीत न जमल्याने कुटूंबात दुरावा आला तर त्याची फळे भोगावी लागतीलच.
प्रिय सहज- मी तुमचा मुद्दा खोडून कढतोय , असं कृपया समजू नका...पण १. मला असं अजिबात म्हणायचं नाहिये की शाळा-कॉलेजात जावू नये. फक्त त्या पोराच्या बापाच्या 'मिझरी" ची गंमत वाटतिये. आणी गणितं ...? माझी असंख्य वेळा चुकली-चुकतायतच हो ! शाळा कॉलेज काय याची खात्री देइल, उलट थोडा अशिक्षित माणूस "डायरेक्ट' लफडा करेल, उच्चशिक्षित अत्यंत स्मार्टपणे करेल. असो, पण तुमची तळमळ नक्कीच भावतीये.

किस्सा आवडला. आपल्या सभोवती अशी अनेक मुलं आपलं लक्ष वेधून घेतात. क्षणभर आपण आवाक होतो. पोराचा गालगुच्चा धरावा वाटतो. व्वा. काय पोरं हुशार असतात अशी मनोमन दाद द्यावी लागते. आणि मग पुन्हा, नै तर पाहा आपली पोरं या विषयाकडं वळावं लागतं. -दिलीप बिरुटे

पण कोणीही १२ वी पर्यंतचे शालेय शिक्षण जरूर घेतले पाहिजे. धंदा चांगला चालवायला आता फक्त तोंडी हिशेब आणि गिर्‍हाइकाशी गोड बोलणे एवढेच पुरेसे नसते. पुस्तकी शिक्षणाने थोडीफार तरी बहुश्रुतता नक्कीच येते. इतर जगात काय चालले आहे हे कळायला या शिक्षणानेच मदत होते.

In reply to by पैसा

किस्सा तर आवडलाच, पण त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व (खास करून व्यवसाय व्यवस्थापनाचं) कमी होत नाही. कारण तेही शेवटी इतरांच्या अनुभवातून, मेहनतीतून, चूकांमधून आलेलं असतं. नाहीतर बीस्कूल्सना टाळं लागलं असतं.

लै भारी किस्सा.. पोरगं झ्याक आहे राव ;-) हे चित्र आठवलं .

In reply to by दिपक

एक नंबर ! असं म्हणतात की :- वन पिक्चर इस वर्थ थाउजंड वर्ड्स... मनोमन पटलं.