घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी
एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची
सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी
लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे
जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी
युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
आता माझ्या मतल्याची ऐकवण्याची पाळी
गझल माझी बंड आणि अन्यायाला दंडही
शेतकर्यांच्या मुक्तिसाठी आयुधांची थाळी
चेतनेला पेरून देते अभयतेची खते
संघर्षाला पिकवताना प्रतिभा बनते माळी
लयीत नाही कुणीही, बेसूर सत्ताधारी
अर्थशिस्त शिकवी त्यांना लिहिते वृत्त कपाळी
पोशिंद्याच्या रक्षणाचा ’अभय’ घेतो ’मक्ता’
ओतप्रोत भरतो आहे शेरास्त्रांनी हाळी
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------
मिसळपाव
प्रतिक्रिया
गझल आहे उत्तम शब्दांची न्यारी
गझल आहे उत्तम शब्दांची न्यारी खेळी
घ्या माझ्याकडुन ही प्रतिक्रिया निराळी
मनपूर्वक आभार. :)
In reply to गझल आहे उत्तम शब्दांची न्यारी by Bhagwanta Wayal
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. :)
सुरेख गझल!
सुरेख गझल!
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. :)
In reply to सुरेख गझल! by श्रिया
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. :)