Skip to main content

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर
Published on मंगळवार, 07/05/2013
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना.. तर हा भैय्या तिची फर्माईश ऐकून किंचित हडबडून गेला, मात्र ग्राहक हईच हमार भगवान बोलत जवळच पडलेल्या एका खरकट्या प्लेटमधील चमचा बादलीभर पाण्यात बुचकळून तत्परतेने तिच्या हातात ठेवला. आता ही बया त्या चमच्याचा अगदी नजाकतदारपणे वापर करून एकेक करत ताटलीतील पाणीपुरी उचलून उचलून खाऊ लागली आणि इथेच अंड्या विचारात पडला... काय राव, अशी चमच्याने पाणीपुरी खाण्यात कसली मजा आलीय, अंड्याला नाही झेपले हे काही. जोपर्यंत ती पाणीपुरी न फुटता, त्यातील पाणी न सांडवता, कसरत करत तोंडापर्यंत नेत नाही आणि नेमके तोंडाजवळ आल्यावर त्यातील पाणी गळायला सुरुवात होऊन ओठांच्या किनार्‍याने ओघळत हनुवटीवर येत नाही अन त्यापासून शरीराच्या इतर भागाला वाचवण्यासाठी आपण तोंड पुढे झुकवत नाही तोपर्यंत पाणीपुरी हा प्रकार खाल्यासारखा वाटूच शकत नाही. म्हणजे बघा हा, उद्या कोणी तुम्हाला वडापाव काटाचमच्याने किंवा नूडल्स हाताने खायला लावले तर मजा येईल का? वेज-पनीर-शेजवान रोल म्हणजे आजकाल फ्रॅंकी की काय बोलतात ते उलगडून चपातीभाजी सारखे खाऊ घातले तर..... तर कदाचित मूळ पदार्थाची चव तशीच राहील... मान्य... मात्र ते खाण्यातील लज्जत तशीच जाणवेल का? पण असतात एकेकाच्या खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी. हे असले प्रकार करताना एकेक नग आजूबाजुला बरेच दिसतील. अहो सॅंडवीचमधील एकेक काकडी टमाटर वेचून खाणारे लोक पाहिलेत या अंड्याने. जाब विचारला तर म्हणतात की आमच्या जबड्यात अख्खे सॅंडवीच घुसत नाही..... वा रे वा... मग घेता कशाला तसे बनवून.. बिचार्‍या त्या सॅंडवीचवाल्याची ही मेहनतही वाया घालवता.. त्यापेक्षा हारवाल्याकडून जसे देवाच्या हाराबरोबर सुट्टी फुले मागून घेतात तसे चटणीपावाबरोबर सुट्टे कांदा टमाटर अन काकडीचे तुकडे शेपरेट घ्या की राव..!! बाकी काही जणांचे कॉंबिनेशनही हटके असतात राव. त्यातले काही प्रकार अंड्याच्या डोक्यातच जातात. अश्यापैकीच एक म्हणजे कोलसवलेला भात अन चपातीचा घास... च्यामारी..!! अंड्याच्या आवडीची भाजी नसली तर अंड्या एकवेळ लोणचे चपाती खाईल पण डाळभाताबरोबर चपातीचा घास घेणे म्हणजे... काय राव.. काय चव लागत असेल याची कल्पनाही नाही करवत. एका अश्याच महाभागाला मी विचारले तर तो उलट मलाच म्हणाला, "शेवटी सगळे पोटातच जाणार ना..." घ्या..!! आता काय बोलणार..! राजा मग पाणी ही ओत की त्यात आणि सारेच एकत्र कोलसवून खा... ते तरी कशाला वेगळे पितोस..!! आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो. एवढेच नव्हे तर केकसुद्धा बिस्किटसारखा चहात बुडवून खातो. नशीब यासाठी तो क्रीमचा नाही तर माव्याचा केक वापरतो. पण यासाठी त्याला अंड्याचा केकही चालतो बरे का. त्याचेच पाहून मी देखील एकदा ट्राय केले आणि....................................... बॉक बॉक बॉक..!! डॉक्टर म्हणाला, बे अंड्या, अंड्याचा केक चहात बुडवून खाल्लास त्यानेच मळमळले की.. बस्स तोच पहिला आणि शेवटला प्रयोग.. अंड्याने त्या दिवशीच अंड्याशी कोणताही खेळ न करायचे ठरवले.. अन या सार्‍यातून एकच चांगले झाले की माझे बघून आणि डॉक्टरचा सल्ला ऐकून त्या धास्तीने माझ्या भावाने अंड्याचा केकच खाणे सोडले. .............मात्र फरसाण तो अजूनही चहात टाकून खातोच. खास करून तिखट शेव. जाब विचारला तर कारण बघा अन काय देतो, "असे फरसाण चहात टाकून खायला भारी मजा येते ती येतेच, मात्र त्यातील मसाला चहात मिसळल्याने चहाचीही मस्त तिखट झणझणीत मसाला चाय बनते.." ............अरे राजा, मसालादूध, मसाला चाय म्हणून वेगळा असा खास प्रकार मिळतो रे जगात, त्यासाठी असला काही प्रयोग करायची गरज नाही, हे त्याला आता कोण समजवणार... उद्या फिल्टर कॉफीला बरर्रफ मार के कोल्ड कॉफी बनवशील तर कसे चालेल. चहा वरूनच आठवले, की एकवेळ हे परवडले पण काही जणांना ग्लुकोजच्या बिस्किटांचाही चहात लिबलिबित लगदा करून खायची सवय असते. आता दात नसलेल्या आजोबांचा नाईलाज असतो म्हणून त्यांनी शोधलेला हा खाद्यप्रकार. पण त्यांच्या दात आलेल्या नातवंडांना कसा गिळवतो हे एक अंड्याला न उलगडलेले कोडे. पण काही जणांना असे वेगवेगळे प्रयोग करायची सवयही असते बरं का.. फार लांब कशाला जा, आमच्या घरचे काकाच आहेत असे.. पावामध्ये फरसाण घालून खातात आणि त्याला सुका मिसळपाव बोलतात. भातामध्ये तर काय काय घालतील याचा नेम नाही. फोडणीच्या भातात द्राक्षे अन डाळिंबाचे दाणे घालणे म्हणजे कहर बोलू शकतो. नशीब आता त्याला दाबेलीभात नाही बोलत. कधी कधी अश्यांचे प्रयोग आवडून जातात हे ही खरेय.. याच काकांमुळे मी पावभाजीची भाजी आणि पावाच्या जागी साधा डोसा हे हटके कॉम्बिनेशन खायला शिकलो. हॉटेलमधील वेटरही अश्यावेळी कौतुकाने बघतात हा माझा यावरचा अनुभव. मी तेवढ्यावरच थांबलो मात्र काकांचे आजही हक्का नूडल्स, वेज मंच्युरीअन, अमेरीकन चॉप्सी असे नाना प्रकार डोश्यामध्ये लपेटून खायचे प्रयोग चालूच आहेत. आनंदा, कधीतरी हे अमुकतमुक नक्की ट्राय करून बघ असे अधूनमधून सुचवतही असतात. चायनीज फूडवरून आठवले, याबद्दल तर बोलायलाच नको, मुळात तो आपला भारतीय खाद्यप्रकार नसल्याने प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने खातो. लहान असताना चायनीजच्या गाड्या रस्तोरस्ती दिसायच्या, तेव्हा ते नवीनच फॅड होते. आमच्या पॉकेटमनीमध्ये तेव्हा फक्त सूपच परवडायचे म्हणून तेच खाल्ले जायचे. कधीतरी पार्टी असल्यास वाढीव बजेट नुसार फ्राइड राइस घेतला जायचा. तेव्हाही आमच्यात सूप हे राईसच्या आधी घ्यायचे की नंतर यावरून नेहमी वाद व्हायचा. अर्धे जण त्याला स्टार्टर मानून आधी प्यायचे तर अर्धे जण डेझर्ट मानून नंतर. मी मात्र नेहमी आधीच घ्यायचो आणि याचे कारण म्हणजे त्यातील अर्धे सूप पिऊन अर्धे मी फ्राइड राईसमध्ये टाकायचो अन्यथा तो सुकासुका तळलेला तेलकट भात माझ्या घशाखाली उतरायचा नाही. आता हे कधी कोणाला विचित्र वाटले नाही आणि वाटले असते तरी अंड्या काही ही सवय सोडणार नव्हता, ना आजवर सोडलीय. काही प्रकार एखाद्या ठिकाणची खासियत असते, मात्र इतरांना नाही झेपत ते. अश्यापैकीच एक म्हणजे मिसळीच्या जोडीला स्लाईस पाव. मध्यंतरी बाहेरगावी एके ठिकाणी जाणे झाले होते तेव्हा या प्रकारच्या मिसळपावचा अनुभव आला. साधारण गोडूस चवीचे असणारे हे स्लाईस ब्रेड कसे लोक मिसळीबरोबर खाऊ शकतात देव जाणे. कदाचित जवळपास चांगले पाव मिळत नसतील किंवा चांगले बनवता येत नसतील, कदाचित मिसळच काही खास नसावी ज्याबरोबर मग पाव खा किंवा ब्रेड खा एकच, अथवा मुद्दाम वेगळेपणा दाखवायचा अट्टाहास असावा वा तेथील ग्राहकांचीच अशी आवड असावी, जे काही कारण असेल ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अंड्याला मात्र मिसळ किंवा पावभाजीसारखा तिखट झणझणीत प्रकार असो वा चिकन-मटण वा अंड्याची भुरजी, त्याबरोबर भट्टीचे पावच लागतात. पावावरून आठवले अंड्याने नाश्ता म्हणून दारूपाव खाणारे बेवडेही पाहिलेत. जरा नाक डोळे उघडे ठेवले तर तुम्हालाही आजूबाजुला अशी खोर्‍याने उदाहरणे मिळतील, पण शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे..!! - आनंद उर्फ अंड्या -------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------- अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://misalpav.com/node/24353 अंड्याचे फंडे ३ - छंद - http://misalpav.com/node/24356 अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://misalpav.com/node/24372 अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://misalpav.com/node/24449 अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://misalpav.com/node/24573 -------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------------

याद्या 5951
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

हा हा हा.. मस्त.. मला पण खारी चहामधे टाकुनच खायला आवडते. आणि तसेच मी चहाच्या कपात साधे पोहे टाकुन पण खाते. मस्त लागते एकदम. माझ्या आजोबांची सवय मला पण लागली. :D

हा ही भाग जमलाय. (काही ठिकाणी पटला नाही, पण ओघवत्या शैलीमुळं आवडला. )

In reply to by मन१

कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..
मेलो. मेलो. वाचवा. खादाडीचा धागा अन.. सुरुवातिलाच ओकारी. हा चवीचा मामला आहे, आपल्या आपल्या चॉईसचा मामला आहे हे मात्र खरं. अशा खादाडी शिवाय एक दिवसही जाउ शकत नाही.

In reply to by अग्निकोल्हा

+११११११११११. व्यॉक्क्क्क्क..........

काही ठिकाणी मिसळी बरोबर भाकरी सुद्धा देतात कारण पाव उपलब्ध नसतात.

आता आमच्या घरातही असे काही महाभाग भरले आहेत. माझा दूरचा भाऊ आहे एक, जो चहात फरसाण किंवा खारी कुस्करून टाकतो आणि हातात फावडे धरल्यासारखे चमचा घेऊन त्याचा फडशा पाडतो.
गरमागरम आमटीत बेकरीतली मस्का खारी बुडवणे हा माझ्या अत्यंत प्रिय पदार्थांपैकी एक आहे. मॅगी मिसळ वेगळीच. याकरिता "मॅगी मसाला यो"चा कप (इन्स्टंट नूडल्स) घ्यावा. त्यात उकळते पाणी जरा जास्त टाकून नीट ढवळून घ्यावे. म्हणजे आपोआप इन्स्टंट मसालेदार पण कमी तेलाची तर्री बनते. चार मिनिटे झाकून नूडल्स तयार झाल्या तरी बराच एक्स्ट्रा रस्सा शिल्लक असेल. त्यात कुरकुरीत पापडी, फरसाण, शेव , खारी बुंदी यांपैकी आपल्याला आवडणारा एक किंवा अनेक पदार्थ टाकावेत. ते योग्य प्रमाणात मऊ होऊन नूडल्सशी एकरुप होतात आणि उत्तम टेस्ट आणतात. अंड्याचा लेख आवडला.

In reply to by गवि

ते योग्य प्रमाणात मऊ होऊन नूडल्सशी एकरुप होतात +७८६ हे योग्य प्रमाण खूप महत्वाचे.. मी सुद्धा मॅगीच नाही तर आमटीभात देखील कढईट एकत्र करून तो ढवळून गरम करताना योग्य वेळी त्यात शेव-फरसाण सारखे आयटम टाकतो.. बरेचदा त्यात इतर भाजी किंवा अंड्याची सेपरेट अर्धी कच्ची भुरजी बनवून घेऊन मग ती टाकतो..

खायच्या काहि काहि सवयी विचित्र असतात खर्‍या. पण चहात फरसाण टाकुन खायला मला पण आवडत आणि मॄणालीनी प्रमाणे मी सुद्धा चहात कच्चे पोहे (जाड) टाकुन खातो. त्याने मस्त नाश्ता होतो सकाळि :)

मला कच्चा पापड, मॅगीच्या कच्च्या शेवया तशाच खायला आवडते. कधीकधी मसाल्याचे पाकीट फोडून तोही वरपतो थोडाफार. संहत असल्याने लै झेपत नै पण सोबत पाणी प्याले की मग ठीक होऊन जाते सगळे. बाकी, कैच्याकै खाण्याबद्दल माझ्या एका मित्राने सुचवलेले काँबो म्हंजे: चहा आणि भात. कल्पना करा, सौथिंडियन खानावळींत बादल्या भरभरून सांबार जसे ओतले जाते, तशीच ग्रमग्रम भाताच्या ढिगार्‍यावर वाफाळत्या चहाची धार =)) =)) =))

In reply to by बॅटमॅन

आमरसभात खाल्ला आहे. पण चहाभात ऐकला किंवा सुचला नव्हता. वाटते तेवढा वाईट नसेल लागत. वर्थ अ ट्राय. दूधभात चालतो तर चहाभातात काय वाईट आहे. हो, मात्र चहा पांचट नसावा. पूर्ण दुधाचा किंवा बहुतांश दुधाचा बनवावा हे बरे.

In reply to by गवि

आम्रसभात? अर्र्रर्ररर्र.....असोच. चहाभाताच्या सूचनेबद्दल सहमत आहे. मग कॉफीभात कसा लागेल? फिल्टर कॉफीबरोबर भात? =)) =))

In reply to by बॅटमॅन

मित्राने सुचवलेले अजून काही भयानक कोम्बो शिकरण पोळी आमटी बरोबर, दुध-गुळ-पोळी+कांदा . आमरस(पांचट करून) पाणीपुरी. श्रीखंड पाव, पास्ता अन् धपाटे (पोळीभाजी स्टाईलने)

In reply to by लॉरी टांगटूंगकर

श्रीखंड पाव अन पास्ता धपाटे तरी ठीक आहे, पण शिक्रणपोळी विथ आमटी अन आमरस-पाणीपुरी हे निव्वळ कहर आहे. दूध-गूळ-पोळी विथ कांदा हेपण जब्री एकदम. त्याप्रमाणेच शिर्‍यात काजूबेदाणे पेरतो तसे कांदे भुरभुरावेत. लय मज्जा =)) =)) (खाद्यपर्व्हर्ट) बॅटमॅन.

In reply to by Mrunalini

वोडकापुरी तसेच अन्य एका प्रदर्शनात गेलेल्यांकडून वारणा पुरी (कोल्लापुरी तांबडा मटनरस्सा पाणीपुरीत भरुन) हे दोन प्रकार ऐकण्यात आले आहेत.

In reply to by गवि

वार्णापुरी भारी प्रकार दिसतोय! पाणीपुरीवाला एक तांबड्या रश्श्याचं तर एक पांढर्‍याचं भांडं घेऊन उभा आहे असे दृश्य डोळ्यांसमोर तरळले अन तोंडातच दोनतीन कारंजे तयार झाले. हाच प्रकार मिसळीबद्दलही करता येईलच, नैका? मिसळीतले बाकीचे सर्व आयटम पुरीत भरून वट्ट तर्री तेवढी नंतर घालायची पुरीत. मस्त लागेल!

In reply to by आदूबाळ

ही थेअरी आम्ही केली होती, प्रॅक्टीकल करावे लागेल आता. पाच पुर्‍यात एक नाईन्टी होते का? ;) नाही म्हणजे नवीन आय्टेम सुरु केला तर रेट लावायला बरा.

------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------- अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास - http://misalpav.com/node/24353 अंड्याचे फंडे ३ - छंद - http://misalpav.com/node/24356 अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद - http://misalpav.com/node/24372 अंड्याचे फंडे ५ - शर्यत - http://misalpav.com/node/24449 अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल - http://misalpav.com/node/24573 --------------------------------------------------------------------------------------
अंड्याचे फंडे हे "पाकृ" सदरात हवे होते. पण ते त्याखाली नसल्याने वरील पैकी एकही भाग उघडुन वाचायची तसदी घेतली नव्हती. जो अंदाज केला तो बरोबर निघाला. सगळीकडे फक्त लाल लाल दिसत होते.

चहा+ दिवाळीच्या फराळातली करंजी. खाताना करंजीला छोटंसं भोक पाडून चहात बुडवावी म्हणजे चहा आत शिरतो आणि तशीच्या तशी करंजी उचलून खावी. मजा येते. घरी मेथीचे लाडू केले असतील तर ते पण चहात बुडवून खायला मजा येते. कधी लहर आली तर ते बुडवून न खाता एक लाडवाचा घास घेऊन एक घोट गरम गरम चहा प्यायचा. पुरणपोळीवर चमचाभर तूप टाकायचं आणि ती कटाच्या आमटीसोबत खायची, तिखट आणि गोड कॉम्बिनेशन भन्नाट लागतं. खिचडीवर (उपासाच्या नव्हे) मिरची आणि आलं ठेचून घातलेलं ताक घालून खाणंही प्रचंड आवडतं, सोबत मिरगुंडं, कुरडया असं काही असलं की आणखी मजा येते.

मला आवडणारे काही कोम्बिनेशन्स १) पुरण पोळी कटाच्या आमटीत बुड्वून, त्या सोबत कटाच्या आमटीतच भिजवलेले गोल भजी २) साधा भात्+कटाची आमटी+कुरडई+भजी मस्त मिक्स करुन ३) पोहे+दहि (पोहे कोरडे लागत असतिल तर) ४) तसेच रवा उपमा, शेवई उपमा सोबत हि दहि भन्नाट लागते