✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाड्यात.... १

ग
गवि यांनी
Mon, 05/06/2013 - 15:33  ·  लेख
लेख
मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..? मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली. गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई. शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो. आता कॉम्प्युटर क्लासमधे जाऊनच काहीतरी सुरुवात करायला हवी होती, नाहीतर रिकामे बसलो की बेकारतुंबडी म्हणणारच सगळे लोक. आणि तसं कितीवेळ चालवणार? तसे आम्ही आपले आपण कुठेतरी जाण्याच्या हिमतीचे नव्हतोच. आणि आपण गांडू आहोत अशी जाणीवही होती. शेपटावर पाय पडेपर्यंत पेटायचे नाही अशा प्रकारातले आम्ही होतो. मोमीन त्याच्या कोणा भावबंदाच्या मदतीने पुण्यात कुठेतरी खोली घेऊन राहिला होता. मग त्याची काडी वापरुन मीही पुण्यातच जायचं असं ठरवलं आणि परांजप्याला डायरेक्ट सांगून टाकलं. आला तर आला.. असंही इथे काय शाट करियर करणार होता तो. आमच्यासारख्या सेकंडक्लास पोरांना पुढे काही खास करता येऊ शकतं असं काही माहीतच नव्हतं खरं तर. कॉम्प्युटरला बरे दिवस आहेत आणि तो शिकला की मरण नाही असं खूपजणांकडून ऐकलं आणि परांजपेसाठी महिनाभर वाट पाहून शेवटी एकटाच निघून आलो. येण्याच्या आदल्या रात्री ब्राऊला मिठी मारुन रडलो. पण आता पूर्वीसारखं घुसमटवणारं जोरदार रडू येत नाही.. म्हणून वाचलो. पुण्यात पोचलो रात्री झोपेच्या वेळी.. मोमीनची खोली गाठली आणि लक्षात आलं की तो आणखी तीन पोरांसोबत एका वाड्यातल्या छोट्या जळमटल्या खोलीत पालीप्रमाणे राहात होता. खोलीत चिरडलेल्या ढेकणांचा पादरट वास येत होता. "आयच्चा.. इथे राहायला नाही जमणार मोम्या..", मी खूपच हळू मोमीनच्या कानात बोललो. मोमीनने मात्र आवाज अजिबात न लपवता खणखणीत बोलायला सुरुवात केली, "केळ्या, भडव्या,तुझा बंगला गावी ठेवून ये आधी.. तरच इथे जमेल.." "अरे तसं नाय रे, इथे आधीच फुल्ल आहे ना रूम, म्हणून म्हटलं..", मी त्याचा आवाज खाली आणण्यासाठी म्हटलं.. च्यायला आल्याआल्याच भांडण नको. "फुकन्या, इकडे सगळे आपल्यासारखेच आहेत. इथे चौघात पाचवा आरामात झोपेल.", मोमीनने मधे पॉज घेतला. तो या खोलीत मला घेण्यासाठी आणखी मुद्दा शोधतोय असं वाटलं. "आणि मेन म्हणजे इथे बाजूच्याच वाड्यात मेस आहे.. इथे राहून तुला बरं पडेल. बाहेर कुठे गेलास तर हजार बाराशेच्या खाली जागा नाही. आणि इथे राहिलास तर आम्हाला सुद्धा शेअरिंग होईल. तुझा शेअर फक्त दोनशे.." मी इथे राहिल्याने मोमीनचेही पैसे वाचणार आहेत हे माझ्या लक्षात आलं. कोपर्‍यातल्या सोलापुरी चादरीच्या ढिगातून एक काटकुळा पोरगा उठून बसला आणि कानात करंगळी घालून खटाखट हलवत म्हणे, "वैसे बी छे लोगा का रूम है.. हम पूरे रूम का भाडा देते. तुम आयेगा तो सबका भाडा बचेगा.. और तेरा बी." मोमीनने त्याची "अरुणी" म्हणून ओळख करुन दिली.. अरुणीने स्वत:च्या नावाचा करेक्ट उच्चार अर्नी आहे असं क्लियर केलं. मोमीनने तिथे भिंतीला लागून पडलेली दोन मोठी खोकी खोलीच्या मधे ढकलली आणि म्हणाला,"आत्ता रात्री तर नाही ना चाललास दुसरी रूम शोधायला? मग आत्ताच्या वेळी इथे पड.. नंतर बघू काय ते.." दमलो तर मी होतोच. म्हणून मग गपचूप तिथे बॅग टाकली आणि तिचीच उशी करुन आधीच घातलेल्या चटईवर अंग सोडलं. बॅग उघडून आपली चादर इथे अंथरावी असा विचारही मनात आला नाही कारण इथल्या घाणीत ती चादरही घाण झाली असती. पुन्हा एखादा ढेकूणही त्यात भरला असता तर.. ? इथे मी राहणं बापजन्मात शक्य नव्हतं. खोली एकदम थंड आणि शांत होती. अंधाराने भरलेली होती. अशा जागी इतकी शांत झोप लागते हे मला सकाळी उठल्यावरच कळलं. उठल्याबरोब्बर बघितलं तर अर्नी गायब झाला होता. पण खोलीतला आणखी एक उरलेला काळा केसाळ काटकुळा सांगाडा कुबटशा अंथरुणात उठून बसला होता. मोमीन आधीच क्लासला पळाला होता. आणि चौथा गोराघारा गुबगुबीत पोरगा डोळे मिटून पद्मासनात उघडाबंब अन श्वास रोखून बसला होता. एका बोटाने नाकपुडी दाबून. एकेक येडझवे नमुने दिसताहेत हे लगेच लक्षात आलं. आजच्या आज अन आत्ताच्या आत्ता उठून चांगलं हॉटेल शोधायला पाहिजे असं म्हणून उठणार होतो तितक्यात अर्नी दोन वाट्या हातात घेऊन हाय हुई करत खोलीत शिरला. त्याची बोटं पोळत होती असं वाटलं. माझ्यासमोर वाटी ठेवली तेव्हा एकात एक वाटी उलटी मारुन आणलेला चहा दिसला. मला असला वाटी चहा अजिबात आवडत नाही. म्हणजे चहा आवडतो, पण ती वाटी नाही. काचेच्या ग्लासातून चहा पिणं म्हणजेच खरा चहा पिणं. सँडोजच्या चहाचा ग्लास आठवून जिभेला चरका लागल्याचा भास झाला. च्यायला या सौथिंडियन लोकांना बाकी खाण्यापिण्याची मजा कळते पण चहा कसा प्यायचा ते कळत नाही. मी तोंड वाकडं होताहोता सरळ केलं आणि "थँक्स रे.." म्हटलं. मग माझ्या लक्षात आलं की सांगाडा आणि ध्यानमग्न यांच्या चहाचं काय? मलाच व्हीआयपी ट्रीटमेंट का? "अर्नी.. इनकी चाय?" "ये काल्या तो खुद जाके पीता.. तुम आजही आया ना तो गेष्ट है ना मोमीन का.. इसलिये. और ये फडके तो एकदम योगाचारी , वो तो सेंट आदमी.. इसलिये चाय नही पीता. ओन्ली गायका मिल्क. अबी उसका ऐसा आसनही और एक घंटा चलेगा. तुम पीले रे चाय तुम्हारी.." वाटीत चहा ओतला. पुण्यातल्या सकाळच्या थंडीतही अर्नीने पळत पळत आणल्यामुळे चहा तसा गरम राहिला होता. पण मला एकदमच कढत चहा लागतो. पुन्हा एकदा सँडोचा वाफाळत्या चहाची सय काढत डोळे भरले आणि वाटी तोंडी लावली. चहा आणखीच कोमट लागायला लागला.. जास्त गोड होता.. मुसुंबीचा रस पिऊन आजारपण भोगल्याचा भास झाला पण अर्नीने सकाळी सकाळी माझी आठवण ठेवली होती ते जाणवलं.. प्रेशर आल्याबरोब्बर टॉवेल लावला आणि संडास कुठे म्हणून विचारलं. अर्नी मला दोन खडखडते जिने उतरुन वाड्याच्या तळाशी कुठेतरी असलेल्या त्या जागेच्या अगदी दारात घेऊन गेला. तिथे दिवसाही अंधार होता. आता हा अर्नी आतपर्यंत सोबत करतो की काय असं वाटायला लागलं. "मैं जायेगा अर्नी अब.. थँक यू यार..", मी म्हणालो. "तू पानी ज्यादा डालेगा हा..वो वाडा की मालकीन हर इकका होने के बाद चेक करता पानी डाला की नही..फिर चिल्लाता सब के सामने.. तू संभालो.. और बाजूवाला संडास में मत जा.. वो ओनर का संडास रेहना" अर्नीच्या हिंदीने लईच हसू येत होतं. आणि आत गेल्यावर जो काही गुप्पकन अंधार झाला म्हणता. बसायचं कुठे तेही कळेना. "अर्नी.. लाईट लगा ना यहांका", मी ओरडलो. "लाईट नही लगाता मालकीन. किसदिन हमने गल्तीसे ऑन छोडा तो निकाली बल्ब... मोंबत्ती रखा उदर उप्पर.. माचिस भी रखा.. उसको जला" थरथरत्या हाताने काड्यापेटी चाचपली अन मेणबत्तीचा अर्धा इंच उरलेला तुकडा पेटवला. दोन काड्या खर्ची पडल्या. आता आपण बाहेर आलो की मालकीण उभी असणार चेक करायला या विचाराने आतच गोळा आला आणि दहा मिनिटांचं काम पाच मिनिटांत संपलं. संडासात नळ नव्हता. समोरच्या टाकीतून तीनचार वेळा डबा भरुन ओतणं भाग होतं. बाहेर आवाज न करता यावं म्हटलं तर जुनाट आणि जडशीळ कोयंडा जोर लावून उघडल्याबरोब्बर खळ्ळ खाट आवाज करत दारावर आपटला. बाहेर येतो तोच समोर लगबगीने आलेल्या मालकीणबाई दिसल्या. मी खालच्या मानेने टाकी ते संडास अशी पखालसेवा सुरु केली. "कोणाकडे आलायत? फडक्यांकडे का?", नाकातल्या आवाजात लठ्ठ मालकीणबाई म्हणाल्या. प्राणायाम करणारा फडके हा या खोलीचा मुख्य भाडेकरु आहे हे समजलं. "हो. फडकेंकडे.. म्हणजे तिथेच .. मोमीन माझा मित्र..", मी हळूच बोललो. "मोमीन? मोमीन नाव कोणाचं आहे इथे?" मालकीणबाई धक्का बसल्यासारख्या बोलल्या. हगलो तिच्यायला.. मोमीन काय नाव लपवून राहिलाय की काय इथे? मी उगाच बल्ल्या केला की काय? "नाही. म्हणजे मी फडकेंकडेच आलोय.. गेस्ट.. मला बाकीच्यांची नावं नीट माहीत नाहीत.. काहीतरी गोंधळ झाला असेल माझा.." "बरं..पाणी नीट ओतत चला.." मला एकदम चीड आली.. पण इथे रहायचं नसल्यामुळे उगं ताणाताणी कशाला, म्हणून घुटका गिळून गप्प झालो. "किती दिवस मुक्काम आहे? रात्री मुक्कामाला तर नाहीत ना? गेस्ट चार्ज लागतो." "नाही. मुक्काम नाही. आजच्या दिवसात इथून जाईन." डगमगत्या जिन्याने रूमवर आलो. अर्नीने माझ्यासाठी उप्पिटाची ताटली उघडी केली आणि समोर धरली. उडप्याचं चिक्कट उप्पीट मला आवडतं तसंच. उप्पीट खाता खाता मोमीनबद्दल मी केलेली काशी मी अर्नीच्या कानावर घातली. ऐकता ऐकता फडकेने डोळे उघडले आणि आसन सोडलं. त्याचे डोळे हिरवेगार दिसले. "मालक वेडझवा आहे. म्हणून आम्ही मोमीनचं नाव इथे अमित म्हणून सांगितलं आहे. तो सकाळी तुला सांगायला विसरला असणार." "आयचा घो.. मी घाण केली उगीच खाली.",मी म्हणालो. "हरकत नाही. आपण धुवू घाण म्हणे..", फडके हसून बोलला. अर्नी मागून म्हणाला,"मोमीन नाम बताना तो पूरे पेठ में जगाह नही मिलना.. बोत दूर जगा मिलना..क्लास बी दूर पडना.." दरवाजा लोटून काल्या आत आला. हातातला पेपर बघत त्याने घोषणा केली, "हा बघ पिक्चर कोणता लागलाय.. मालिबू मडस्लाईड.." "कंप्लीट आहे का पण? की हाफ?", फडके म्हणाला. "एकदम कंप्लीट नाही रे.. थेटरला लागतो तेवढा कंप्लीट आहे.. चल दुपारीच जाऊया..", काल्याने स्पष्ट केलं. "केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला. मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची जाम म्हणजे जाम आठवण झाली. "चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो. "मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला. खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं. .... (क्रमशः)
  • वाड्यात.....२

Book traversal links for वाड्यात.... १

  • वाड्यात.....२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
38565 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

ढेकूणपुराण आवडले.

प्रचेतस
Mon, 05/06/2013 - 22:32 नवीन
ढेकूणपुराण आवडले. ही जात लैच चिवट, आमच्या एका मिपाकर मित्राकडे भयानक ढेकूण होते. दुसर्‍या दिवशी भटकंतीस त्याचेबरोबर जायचे असल्याने अजून एका मिपाकराबरोबरच त्याच्याकडे मुक्कामाला गेलो. ढेकूण असतील अशी पुसटशी शंका आली होतीच. पहाटे लवकरच उठलो तर ढेकणांची रांगच्या रांग, जिकडे बघावे तिकडे ढेकूण फरशीवर, सोफ्यावर, भिंतींवर, उशांवर, गाद्यांवर आणि ते पण चांगले टेणे, टम्म फुगलेले, अगदी बिन्धास्तपणे हिंडतायत. इतके ढेकूण आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. शेवटी त्या मित्राचे अम्ही काही जणांनी जोरदार ब्रेनवाशिंग केले आणि पेस्ट कन्ट्रोल त्याच्याकडून करवून घेतले. आता तो मिपाकर मित्र पूर्णपणे जरी नाही तरी बर्‍यापैकी ढेकूण विरहित जीवन जगतोय. ढेकणावर आलेली ही ढेकणांचा अड्डा ही मजेदार कविता पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगायायायायाञा ढेकूणपुरीच की

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 22:59 नवीन
अगायायायायाञा ढेकूणपुरीच की हो एकदम =)) =)) =)) बाकी कविताही मस्तच! वर काहाडल्या गेली आहे, धन्यवाद वल्लीशेठ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा हा हा...

छोटा डॉन
Tue, 05/07/2013 - 14:35 नवीन
सीओईपी हॉस्टेलचा विजय असो ! जबर्‍या रे ब्याट्या, मजा आणलीस एकदम. गवि, लेख उत्तमच. काही काळ शिवाजीनगर आणि कसब्याच्या वाड्यात राहिलो असल्याने बरेच रिलेट करता आले. पुढच्या भागाची वाट पहात आहे. - (हॉस्टेलवाला) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद डान्राव

बॅटमॅन
Tue, 05/07/2013 - 14:51 नवीन
धन्यवाद डान्राव :) सीओईपी हाष्टेलचा विजय असो! विजय असो!! विजय असो!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय मीपण उत्सुकतेने. (ए २०६, आय २०४, डी- २०३ अन डी २०३ वाला ) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अरे ह्या ढेकणांपायी कसबा

पिंगू
Mon, 05/13/2013 - 22:33 नवीन
अरे ह्या ढेकणांपायी कसबा पेठेत माझ्या मित्रांनी एक गादी जाळली आहे. मी मात्र जेव्हा ढेकूण चावायचे, तेव्हा मालकाला फोन करुन चावायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा...

दादा कोंडके
Sun, 08/04/2013 - 13:21 नवीन
ढेकूण लै झाले की कॉटा रूमबाहेर आणायच्या. त्या आधी सगळी अंथरुणे-पांघरुणे झाद झाड झाडायची, तिथून काही ढेकूण बाहेर पडायचे. हे प्रीप्रोसेसिंग झाले, की मग कॉटांवर पेपर अंथरायचे-शक्यतोवर पुणे टाईम्सची रद्दी. शिवाय काही पेपर असे गुंडाळून त्यांची चूड करायची. मग ती पेटवायची. आणि सगळे पेपर जाळायचे.
अगदी जुन्या आठवणी जागवल्या आणि जळक्या ढेकणांचा वास आला. ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेखन आवडले

jaypal
Mon, 05/06/2013 - 19:18 नवीन
>>>येण्याच्या आदल्या रात्री ब्राऊला मिठी मारुन रडलो. पण आता पूर्वीसारखं घुसमटवणारं जोरदार रडू येत नाही.. म्हणून वाचलो. नि:शब्द झालोराव. ___/\___
  • Log in or register to post comments

मस्त! पुन्हा लिहिते झाल्याचं

मराठे
Mon, 05/06/2013 - 19:20 नवीन
मस्त! पुन्हा लिहिते झाल्याचं बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

गवि लगे रहो!

निमिष ध.
Mon, 05/06/2013 - 19:23 नवीन
वा मस्त सुरुवात आहे. चालू द्या. आम्ही ही होतो एके काळी फक्त पेठ नाही तर कोथरूडला!! तुमचे बारीक निरिक्ष्ण आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

आजानुकर्ण
Mon, 05/06/2013 - 19:28 नवीन
मस्त लेख... ढेकणांच्या आठवणीने हळवा झालो. अनेक महिने तो प्राणी दिसलेला नाही. :(
  • Log in or register to post comments

गवि, पुभाप्र!

आदूबाळ
Mon, 05/06/2013 - 19:44 नवीन
गवि, पुभाप्र! कोणी आधीच्या भागांच्या लिंका देईल काय?
  • Log in or register to post comments

गवि स्पेशल!!!

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 19:45 नवीन
गवि स्पेशल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भारी

अभ्या..
Mon, 05/06/2013 - 19:45 नवीन
मस्त लिहिलेय गवि. येऊद्या पुढचे भाग लवकर. बाकी मला घरमालक्/मालकीण यांचा कधी त्रास झाला नाही. फारच प्रेमाने वागायचे. अगदी पुण्यात पण ;) माझ्या पार्टनर्सनी मात्र परस्पर घर विकायचेच बाकी ठेवले होते. ;)
  • Log in or register to post comments

कॉलेजची पोरे

पैसा
Mon, 05/06/2013 - 20:01 नवीन
आमच्या रत्नागिरीच्या शेजार्‍यांनी त्यांचा डबल बेडरूम फ्लॅट ६ मुलग्यांना रहायला दिला होता. मालक फक्त पैसे गोळा करायला यायचा. काही काळातच तिथे १२ मुलगे राहू लागले. रोज २/३ वेळा आंघोळ्या करून त्या पोरांनी सोसायटीच्या तोंडचे पाणी पळवले. टँकर मागवायची पाळी आली. आम्ही अधून मधून तिकडे जातो. एकदा ३ महिन्यांनी गेले तर दाराला टेकून चपलांचा स्टँड आणि त्याच्याबाहेर चपला आणि बुटांचा खच पडलेला. मी तिथेच आरडाओरडा केला आणि स्टँडसकट चपला जिन्यातून खाली फेकून दिल्या. कोणीही बाहेर आले नाही! मग सोसायटीच्या सेक्रेटरीकडे रीतसर तक्रार केली. तेव्हा तिथे रात्री दारूच्या पार्ट्या चालतात क्वचित अनोळखी मुली दिसतात; आम्हाला इथे रहायलाही भीती वाटते असे काहीबाही इतर लोक सांगू लागले. मग सगळ्यांनी मिळून त्या फ्लॅटमालकाला त्या पोरांना काढून टाकायला लावले. नंतर सोसायटीत शांतता झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

व्हरमाँट

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 19:47 नवीन
व्हरमाँट ची माझी घर मालकीण अतिशय सुंदर व अतिशय खड्डूस होती. सुंदर बायका/मुली खडूस असणे हा नियमच पाहीला आहे. (मारला खडा मोहोळाला अभी आन दो!!);)
  • Log in or register to post comments

फोटू

कपिलमुनी
Fri, 05/10/2013 - 01:26 नवीन
मालकिणीचा फोटू आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

अभी आया

अभ्या..
Mon, 05/06/2013 - 19:52 नवीन
आधी व्यत्यास सिध्द करावा लागेल ;)
  • Log in or register to post comments

हाहाहा "अभी" म्हणजे फक्त तूच

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 19:54 नवीन
हाहाहा "अभी" म्हणजे फक्त तूच का रे? रच्याकने - व्यत्यास ला इंग्रजी शब्द काय? :( कटते आता - प्रत्यक्ष संपादकांच्या धाग्यावर अवांतर बरं नाही दिसत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

व्यत्यास- कॉन्व्हर्स.

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 20:40 नवीन
व्यत्यास- कॉन्व्हर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

वाह... मस्त सुरुवात... सगळं

सुहास झेले
Mon, 05/06/2013 - 20:13 नवीन
वाह... मस्त सुरुवात... सगळं एकदम डोळ्यासमोर घडतंय असे वाटले.... तुमची ती खासियतच आहे म्हणा :) पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :) :)
  • Log in or register to post comments

हास्टेल च्ये दिस आठव्ले..

कोमल
Mon, 05/06/2013 - 20:28 नवीन
ढेकुण नव्ह्ते पण चिक्कार झुरळं होती, इतकी कि कधी कधी भातात्/आमटीत पण यायची.. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच.

राही
Mon, 05/06/2013 - 20:46 नवीन
गविंचा लेख, आणि आवडला नाही असे शक्यच नाही. ब्राउ एका वाक्यात चटका लावतो. बाकी हा आठवडा मूषक-मत्कुण-निर्दालन सप्ताह दिसतोय. तिकडे विक्रांतवरचे 'जंगी' किंवा 'घमासान' युद्ध आणि इथे चकमकी आणि दग्धभू धोरण. एकेकाळी मुंबईच्या लोकलमध्ये लाकडी बाके असत आनि त्यात भरमसाट ढेकूण होत त्याची आठवण झाली. अलीकडे मात्र ही जमात अस्तंगत होऊ लागली आहे असे दिसते. घरात ढेकूण,झुरळे, उवा अतोनात झाल्या तर ते अमंगळाचे लक्षण असते अशी समजूत ऐकली आहे.
  • Log in or register to post comments

ब्राउ एका वाक्यात चटका लावतो.

रामदास
Mon, 05/06/2013 - 21:03 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

वा! छानच जमलीये

रेवती
Tue, 05/07/2013 - 01:21 नवीन
वा! छानच जमलीये वातावरणनिर्मिती. पुढील लेखनाची वाट पहावी लागणार की काय?
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
Tue, 10/29/2013 - 13:53 नवीन
+१ अजूनही पुढील लेखनाची वाट पहावी लागणार की काय? केळकरच्या प्रतिक्षेत सेन्च्युरी झाली. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाचतीय हो!

स्पंदना
Tue, 05/07/2013 - 08:20 नवीन
वाचतीय हो! उगा सांगीतलेले बरे.
  • Log in or register to post comments

वॉव

अलबेला सजन
Tue, 05/07/2013 - 09:21 नवीन
वॉव गवि यान्चि नविन कथा... येउदे... येउदे... (अनुस्वार कसा देतात कोणी सान्गेल का?? प्लीज...)
  • Log in or register to post comments

अनुस्वार

मी_आहे_ना
Tue, 05/07/2013 - 09:28 नवीन
ज्या अक्षराला अनुस्वार हवा त्याच्या नंतर शिफ्ट+एम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलबेला सजन

थँक यू

अलबेला सजन
Tue, 05/07/2013 - 09:35 नवीन
थँक यू :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

पहिलं तर..

पिलीयन रायडर
Tue, 05/07/2013 - 09:23 नवीन
पहिलं तर.. मला खूऊऊऊऊऊऊप बरं वाटलं तुमचं नाव नवीन लेखना मध्ये पाहुन.. त्यात परत केळकरची स्टोरी.. म्हणजे सोनेपे सुहागा...!! धन्यवाद गवि.. "गवि" असल्याबद्दल...!!
  • Log in or register to post comments

क्या बात है! खासच!

वसईचे किल्लेदार
Tue, 05/07/2013 - 10:25 नवीन
ब्राउ कोण ते ठाऊक नाहि (वाचन नाहि तेव्हढे), पण आपण जे जे म्हणुन लिहिता ते वाचुन आम्हि फक्त आणि फक्त "पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत" असतो.
  • Log in or register to post comments

मताबद्दल राग नसावा.

ऋषिकेश
Tue, 05/07/2013 - 13:01 नवीन
काहितरी नव्याची अपेक्षा घेऊन आलो होतो.. पहिला भाग छान आहे, पण तितके वेगळेपण नाही. :( गवि म्हटल्यावर जी अपेक्षा मनात येते ती पुढिल काही भागांत पूर्ण होईल याची खात्री आहेच म्हणा!
  • Log in or register to post comments

खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित

निनाद मुक्काम …
Tue, 05/07/2013 - 14:39 नवीन
खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं. हे वाचून जीवात जीव आला. आता थोड्याच दिवसात केळकर ला वाड्याचा मुक्काम मानवणार असा माझा होरा आहे, आपल्याला आयुष्यात कितीतरी वेळा एखादी गोष्ट , ठिकाण , स्थळ प्रथमदर्शनी अजिबात आवडत नाही , आपण नाक मुरडत लगेच तशी नापसंती व्यक्त करतो. मग हळूहळू लोणच्यासारखे त्याठिकाणी मुरत जातो. गावातून चाळीत लग्न करून येणाऱ्या चाळकरी महिला विशेषतः माझ्या आजीच्या पिढीतील बायकांचे असेच चाळी विषयी , चाळ संस्कृतीविषयी मत असायचे. मग त्या हळूहळू बटाट्याच्या चाळीतील पात्र बनून जायच्या ह्याचा त्यानंच पत्ता लागत नसे. गविंचे वाचन इतक्या दिवसांनी वाचायला मिळत आहे हीच खरे आनंदाची बाब आहे. आता नियमितपणे ही मालिका पूर्ण व्हावी असे मनापासून वाटते. ....
  • Log in or register to post comments

छान जमलय

दिपक.कुवेत
Tue, 05/07/2013 - 15:12 नवीन
पुढिल भाग पटापट टाका....जास्त पॉज घेउ नका हि विनंती
  • Log in or register to post comments

केवळ

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/07/2013 - 16:33 नवीन
केवळ सुंदर लिखाण. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

खल्लास!

धमाल मुलगा
Tue, 05/07/2013 - 17:41 नवीन
केळ्या इज ब्याक! आता मजा येणार :) आता लवकरच रुमवर रुळला की केळ्याच्या आयुक्षातली पैली 'म्हातार्‍या साधूसोबतची बैठक' येईल अशी आशा आहे. (आशा म्हणजे काय राव, रुमवरच्या ग्यांगचा तो एक धर्मच नै का? :) ) गविभाय, आने दो लवकर लवकर पुढचे भाग! - सोनकेळ्या
  • Log in or register to post comments

वाचतोय... आज परत वाचले.... या

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 05/09/2013 - 06:30 नवीन
वाचतोय... आज परत वाचले.... या निमित्ताने ब्राऊ वाचायचं राहिलंय याची आठवण झाली! वाचतोच.
  • Log in or register to post comments

गवि इज बॅक.

अर्धवटराव
Fri, 05/10/2013 - 02:50 नवीन
दिवाळी अंकाच्या संपादकीयनंतर गवि गायबच झाला होता. थोडाफार प्रतिसादांच्या कवडश्यांतुन दिसायचा. आता दरवेळी मिपा उघडताना वाड्यात काय नविन झालय याची उत्सुकता लागुन राहिल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान

प्रसाद गोडबोले
Sun, 05/12/2013 - 16:37 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

+१

मोदक
गुरुवार, 06/20/2013 - 01:35 नवीन
+१ पु भा प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+११

उपास
गुरुवार, 06/20/2013 - 02:36 नवीन
गवि.. पुढे येउंद्या! ते पाणी टाकलय किती ते बघायचं डिट्टो ! आमचे मालकही तसेच... आणि दोघं राहतोय सांगून गाव जमवणही टिपिकल. ढेकूण म्हणजे कहर.. भारतापासून अगदी अमेरिकेपर्यंतही त्यांनी पाठ सोडली नाही, इतकी दाट मैत्री आणि त्यात रक्ताचं नातं.. :-)) - (सदाशिव पेठेत रुम शेअर करुन राहिलेला बॅचलर) उपास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बर्‍याच दिवसांनी केळ्याला परत

पिंगू
Mon, 05/13/2013 - 22:31 नवीन
बर्‍याच दिवसांनी केळ्याला परत आलेला पाहून आनंद झाला..
  • Log in or register to post comments

झक्कास !

ब़जरबट्टू
गुरुवार, 06/20/2013 - 08:52 नवीन
जबरी लेखन राव.. सम्पुर्ण गवि लेखनमाला वाचायला घेतलिया,,,
  • Log in or register to post comments

मालक जबरदस्त ...

वसईचे किल्लेदार
Fri, 08/02/2013 - 22:11 नवीन
पुढिल भागांची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments

क्षणभर वाटलं दोण लंबरचा भाग

आदूबाळ
Fri, 08/02/2013 - 22:30 नवीन
क्षणभर वाटलं दोण लंबरचा भाग आला की काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वसईचे किल्लेदार

ढेकणाचा असाही त्रास होतो

देशपांडे विनायक
Sat, 08/03/2013 - 20:16 नवीन
ढेकूण पुराण वाचून एक नक्की समजले की मिपाला ढेकणाची ALLERGY नाही मग माझी ढेकणावरची कथा दोनदा काढली का गेली असावी ? त्या संबधी विचारणा केली होती पण उत्तर अजुनी आले नाही . ढेकणाचा असाही त्रास होतो तर !!!
  • Log in or register to post comments

खत्तरनाक!

दादा कोंडके
Sun, 08/04/2013 - 13:15 नवीन
मजा आली वाचून. खोलीचं आणि पोरांचं वर्णन वाचून सुरवातीच्या दिवसांची आठवण आली.
  • Log in or register to post comments

गवी इज ब्याक इन फॉर्म.

विजुभाऊ
Mon, 08/05/2013 - 23:22 नवीन
गवी इज ब्याक इन फॉर्म. पांडुरंग सांगवीकर पुन्हा एकदा बोलता झालाय.
  • Log in or register to post comments

पुढे??

कपिलमुनी
गुरुवार, 10/24/2013 - 15:41 नवीन
गवि , लिहा की पुढचा भाग !!
  • Log in or register to post comments

पुभाप्र.. लवकर लिहा गवि

राजो
Fri, 10/25/2013 - 19:22 नवीन
पुभाप्र.. लवकर लिहा गवि
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा